वनामकृविच्या शास्त्रज्ञांचा सल्ला
कापुस पीक सध्या फुलोरा व बोंड
धरण्याच्या अवस्थेत असुन मराठवाडयात मागील तीन आठवडयापासुन पावसाचा खंड
पडला आणि त्यानंतर दोन दिवसात जोरदार पाऊस झाला. त्याचा परीणाम असा झाला की, कापसामध्ये आकस्मिक मर दिसुन येत आहे. हा कुठला रोग नसुन
कापसातील विकृति आहे. सतत १५ दिवस पाण्याचा ताण पडला आणि पाणी दिले किंवा पाऊस
पडला तरी मर होते. प्रखर सुर्यप्रकाश किंवा सतत ढगाळ वातावरण यामुळे ही मर दिसते.
जास्त पाणी झाले तरीही मर होते. या विविध कारणांपैकी एक कारण मर येण्यासाठी पुरेसा
आहे. अशा परिस्थितीत कापुस पीक मुळावाटे
अन्न घेवू शकत नाही. अन्नपुरवठा बंद झाल्यामुळे पीक मलूल होते व सुकल्यासारखे
दिसते. यासाठी शेतकरी बंधुनी घाबरुन न
जाता साधे सोपे उपाय करावेत. प्रथमत: शेतामधुन पाण्याचा निचरा करावा. जास्तीचे पाणी शेतातून काढून टाकावे. त्यानंतर १५ ग्रॅम युरिया + १५ ग्रॅम म्युरेट ऑफ पोटॅश + २ ग्रॅम कॉपर ऑक्झीक्लोराईड प्रति लिटर पाण्यात टाकून चांगले मिसळून
घ्यावे. हे द्रावण १०० ते १५० मि. ली. उमळलेल्या झाडाला टाकून आळवणी करावी. यामुळे पीकाला लगेच अन्नद्रव्य
उपलब्ध होतील आणि बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव होवू नये म्हणून बुरशीनाशकाचा वापर
करावा. जसजसा वापसा होईल तसतसे पीकात सुधारणा
होईल. जमिनीत हवा आणि पाण्याचे प्रमाण
सारखे झाले की मुळे अन्न घ्यायला सुरुवात करतात आणि मर विकृति हळूहळू कमी होते, असा सल्ला वसंतराव नाईक
मराठवाडा कृषी विद्यापीठाचे विस्तार कृषि विद्यावेत्ता डॉ. यु. एन. आळसे यांनी दिला.