परभणीचे पोलिस अधिक्षक मा श्री जयंत मीना यांच्या हस्ते वृक्षारोपण
वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाच्या वतीने कै. डॉ राजेंद्र प्रसाद यांचा जन्म दिवस कृषि शिक्षा दिवस व पर्यावरण जागृकता दिवसाचे निमित्त साधुन दिनांक 3 डिसेंबर रोजी वृक्षारोपण कार्यक्रम राबविण्यात आला. कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणुन परभणी जिल्हयाचे पोलिस अधिक्षक मा श्री जयंत मीना हे उपस्थित होते तर अध्यक्षस्थानी कुलगुरू मा डॉ अशोक ढवण हे होते. शिक्षण संचालक डॉ धर्मराज गोखले, विद्यापीठ नियंत्रक श्रीमती दिपाराणी देवतराज, प्राचार्य डॉ सय्यद ईस्माईल, प्राचार्य डॉ उदय खोडके, प्राचार्या डॉ जयश्री झेंड, प्राचार्य डॉ तुकाराम तांबे आदींची प्रमुख उपस्थिती होती.
पोलिस अधिक्षक मा श्री जयंत मीना यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी मा श्री जयंत मीना म्हणाले की, पर्यावरण संतुलनाकरिता वृक्षलागवड करणे गरजेचे असुन परभणी कृषि विद्यापीठाचा परिसर अत्यंत स्वच्छ, सुंदर व वृक्षांनी नटलेले आहे. विद्यापीठाने हाती घेतलेल्या हरित विद्यापीठ संकल्प निश्चितच अत्यंत स्तुत्य उपक्रम असुन विविध वृक्षांनी नटलेले विद्यापीठ परिसर पाहुन मनास शांतता मिळते, असे ते म्हणाले.
अध्यक्षीय भाषणात कुलगुरू मा
डॉ अशोक ढवण म्हणाले की, देशाचे पहिले राष्ट्रपती डॉ राजेंद्र प्रसाद यांचा जन्म
दिवस कृषि शिक्षा दिवस म्हणुन साजरा करतो. गेल्या दोन वर्षापासुन विद्यापीठाने
हरित विद्यापीठ, स्वच्छ विद्यापीठ व सुरक्षीत विद्यापीठ उपक्रम हाती घेतला असुन
विद्यापीठात हजारो वृक्षांची लागवड करून संवर्धन करण्यात येत आहे. विविध रंगांची
फुले, विविध प्रकारच्या वृक्षांची लागवड करण्यात आली असुन वृक्षलागवड करतांना जैव
विविधतेचे संतुलनाच्या दृष्टीने विशेष लक्ष ठेवण्यात आले आहे. तसेच मधमाश्या व
पक्षांचे वास्तव्य वाढीचा विचार करण्यात आला आहे. परभणी कृषी विद्यापीठात
देशातील विविध राज्यातील विद्यार्थ्यी व विद्यार्थ्यीनी शिक्षणाकरिता येतात, त्यांचे
आईवडील मोठया विश्वासाने त्यांना परभणीस पाठवितात, हे विद्यापीठ त्यांच्या
करिता सुरक्षीत वाटले पाहिजे, यासाठी विद्यापीठ प्रयत्नशील असल्याचे त्यांनी सांगुन
परभणी पोलिस प्रशासनाचे आम्हास चांगले सहकार्य लाभते, असे म्हणाले.
प्रास्ताविकात डॉ हिराकांत काळपांडे विद्यापीठ परिसरात करण्यात आलेल्या वृक्ष लागवड उपक्रमाची माहिती दिली. सुत्रसंचालन डॉ फरिया खान यांनी केले तर आभार डॉ जयकुमार देशमुख यांनी मानले. कार्यक्रमास डॉ राजेश क्षीरसागर, डॉ राजेश कदम, डॉ गजानन गडदे आदीसह विद्यापीठातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.