वनामकृवि आयोजित ऑनलाईन रब्बी शेतकरी मेळाव्यास शेतकरी बांधवाचा मोठा प्रतिसाद
पिक उत्पादन वाढीकरिता शुध्द व दर्जेदार बियाणे आवश्यक आहे. आज शेतकरी मोठया प्रमाणात शेतमाल उत्पादन घेत आहे, परंतु शेतमालास अपेक्षित मोबादला प्रत्यक्ष शेतकरी बांधवाना मिळत नाही, त्याकरिता उत्पादक ते उपभोक्ता यातील दरी कमी करावी लागेल, थेट उत्पादक शेतकरी व उपभोक्ता यांतील साखळी मजबुत करावी लागेल, असे प्रतिपादन राहुरी येथील महात्मा फुले कृषि विद्यापीठाचे माजी कुलगुरू तथा ज्येष्ट शास्त्रज्ञ मा डॉ योगेंद्र नेरकर यांनी केले. वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील विस्तार शिक्षण संचालनालय व कृषि विभाग (महाराष्ट्र राज्य) यांचे संयुक्त विद्यमाने मराठवाडा मुक्ती संग्राम दिनानिमित्त दिनांक १७ सप्टेंबर रोजी आयोजित ऑनलाईन रबी शेतकरी मेळाव्याच्या उदघाटन प्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कुलगुरू मा डॉ अशोक ढवण हे होते तर कार्यक्रमास विशेष अतिथी म्हणुन पुणे येथील अटारीचे संचालक मा डॉ लाखन सिंग हे उपस्थित होते व संशोधन संचालक डॉ दत्तप्रसाद वासकर, शिक्षण संचालक डॉ धर्मराज गोखले, विस्तार शिक्षण संचालक डॉ डि बी देवसरकर आदींची प्रमुख उपस्थिती होती.
मा डॉ योगेंद्र नेरकर पुढे म्हणाले की, कोरोना विषाणु रोगाच्या पार्श्वभुमीत समाजास शेती व शेतकरी यांचे महत्व पटले आहे. आज मनुष्य आरोग्याच्या दृष्टीने अधिक सजग झाला असुन पौष्टीक अन्नासाठी आग्रही झाला आहे. अन्न पोषणात ज्वारीचे मोठे महत्व असुन परभणी कृषि विद्यापीठाने विकसित केलेले परभणी मोती व सुपर मोती शेतक-यांच्या पसंतीस उतरले आहेत. जागतिकरणामुळे शेतीतही स्पर्धो वाढली आहे, जमिनीची उत्पादकता टिकविणे, शेतीत कमी खर्चात जास्त उत्पादन व नफा मिळविणे आवश्यक आहे. शेतक-यांचे उत्पन्न केवळ दुप्पट करून न थांबता अनेक पटीने वाढीसाठी प्रयत्न करावे लागतील. शेतकरी व शेती यांची प्रतिष्ठा वाढली पाहिजे. गट शेती, शेतकरी उत्पादक कंपन्या यामाध्यमातुन प्रगती होत आहे. शेती यांत्रिकीकरणावर भर दयावा लागेल, कृषि अभियांत्रिकी विभागाने यावर अधिक संशोधन करण्याची गरज आहे. शेतीत ड्रोनचा फवारणीकरिता वापर तसेच ज्वारीच्या कणसावरील पक्षी उडविण्यासाठी होऊ शकतो. आज नॅनो युरिया बाजारात उपलब्ध होत आहे, यामुळे खतांची कार्यक्षमता वाढण्यास मदत होणार आहे. जैविक खते, जैविक किटकनाशके, कामगंध सापळे आदी निविष्ठा शेतक-यांपर्यंत पोहचल्या पाहिजेत. आज शेतकरी स्वत: शेतात अधिकाधिक उत्पादन घेत आहे. महाराष्ट्रात काही भागात अतिवृष्टीमुळे पिकांचे नुकसान झाले आहे, सद्यस्थितीत जमिनीत ओल चांगली असुन रबी हंगामात याचा फायदा होऊ शकतो, असे ते म्हणाले.
अध्यक्षीय समारोपात कुलगुरू मा डॉ अशोक ढवण म्हणाले की, कोरोना विषाणुच्या प्रादुर्भावातही विद्यापीठाचे विस्तार कार्य थांबलेले नाही. ऑनलाईन माध्यमातुन विद्यापीठ शास्त्रज्ञ शेतकरी बांधवाच्या सातत्याने संपर्कात आहेत. ऑनलाईन माध्यमामुळे विद्यापीठ तंत्रज्ञान केवळ मराठवाडयातील शेतकरी बांधवा पर्यंतच नव्हे तर संपुर्ण राज्यात तसेच इतर राज्यातील मराठी भाषिक भागात पोहचत आहे. परभणी कृषि विद्यापीठ निर्मिती बायोमिक्स तसेच जैविक खतांची मागणी वाढत आहे. विद्यापीठात डिजिटल शेती प्रकल्प राबविण्यात येत आहे. शेतमाल प्रक्रिया व मुल्यवर्धन यावर विद्यापीठ काम करित आहे. शेतीतील बारकाव्याचा अभ्यास करून नवनवीन तंत्रज्ञान देण्यासाठी विद्यापीठ कटिबध्द आहे. गेल्या तीन वर्षापासुन परभणी कृषि विद्यापीठ निर्मित बियाणे, जैविक खते, जैविक किटकनाशके व बुरशीनाशके केवळ परभणी मुख्यालयी उपलब्ध न करता, विद्यापीठ अंतर्गत असलेल्या मराठवाडयातील कृषि विज्ञान केंद्रे, संशोधन केंद्रे, महाविद्यालये येथे उपलब्ध करून देण्यात आले, या विकेंद्रित विक्री सुविधेस शेतक-यांचाही चांगला प्रतिसाद मिळत आहे. रबी पिकांचे विद्यापीठ निर्मित बियाणे सप्टेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवडयात मराठवाडयात विविध ठिकाणी उपलब्ध होणार असल्याची माहितीही त्यांनी दिली.
विशेष अतिथी मा डॉ लाखन सिंग म्हणाले की, कोरोना रोगाच्या प्रादुर्भाव काळात परभणी कृषि विद्यापीठाने आयोजित केलेल्या विविध ऑनलाईन कार्यक्रमास शेतकरी बांधवानी मोठा प्रतिसाद दिला. परभणी विद्यापीठ विकसित तुरीच्या बीडीएन ७११ हा वाण मोठया प्रमाणात मराठवाडयातच नव्हे तर संपुर्ण राज्यात प्रचलित झाला आहे. कृषि विभाग, कृषि विद्यापीठाच्या समन्वयाने कृषि तंत्रज्ञान विस्तार कार्य अधिक गतिमान होत आहे, असे मत त्यांनी व्यक्त केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविकात डॉ डि बी देवसरकर यांनी विद्यापीठ विकसित विविध रबी पिकांच्या वाणाची माहिती देऊन शेतकरी बांधवांनी रब्बी हंगामात उगवण शक्ती तपासुन स्वत:च्या घरचे बियाणे वापरण्याचा सल्ला दिला. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन डॉ विणा भालेराव व डॉ प्रविण कापसे यांनी केले तर आभार मुख्य शिक्षणाधिकारी डॉ व्ही बी कांबळे यांनी मानले.
मेळाव्याच्या तांत्रिक सत्रात ज्वार लागवडीवर डॉ एल एन जावळे, हरभरा लागवडीवर डॉ सी बी पाटील, जवस लागवडीवर डॉ एम के घोडके, करडई लागवडीवर डॉ जी डी गडदे, गहु लागवडीवर डॉ यु एम उमाटे, अतिवृष्टीच्या पार्श्वभुमीवर पीक व्यवस्थापनावर डॉ व्ही पी सुर्यवंशी, ई पीक पाहणी व नोदंणी वर श्री आनंद कदम आदींनी मार्गदर्शन केले तसेच शेतकरी बांधवाच्या प्रश्नांना विद्यापीठ शास्त्रज्ञ डॉ एस बी पवार, डॉ के टी आपेट, डॉ ए व्ही गुटटे, डॉ व्ही पी सुर्यवंशी, डॉ डी डी पटाईत आदींनी उत्तरे दिली. ऑनलाईन मेळावा यशस्वीतेसाठी नाहेप प्रकल्पाचे मुख्य अन्वेषक डॉ गोपाल शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ अविनाश काकडे, इंजी. रवीकुमार कल्लोजी आदींनी काम पाहिले. मेळाव्यास शेतकरी बांधव व कृषि विभागातील कृषि अधिकारी यांनी मोठया प्रमाणात सहभाग नोंदविला.