वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाच्या वतीने दरवर्षी १७ सप्टेंबर रोजी मराठवाडा मुक्ती संग्राम दिनानिमित्त रब्बी शेतकरी मेळाव्याचे तसेच बियाणे विक्रीचे आयोजन करण्यात येते. परंतु कोरोना विषाणूचा संसर्ग व प्रादुर्भावाच्या पार्श्वभुमीवर यावर्षी रब्बी मेळावा ऑनलाइन पद्धतीने संपन्न झाला.
मराठवाड्यातील शेतकऱ्यांना हरभरा, करडई, गहू, जवस, सूर्यफूल, रब्बी ज्वारी आदी रबी पिकांचे विद्यापीठ उत्पादित विविध वाण पेरणीसाठी उपलब्ध होण्याच्या अनुषंगाने विद्यापीठ अंतर्गत मराठवाड्यात कार्यरत असलेले कृषि विज्ञान केंद्रे, संशोधन केंद्र व कृषि महाविद्यालयात सप्टेबर महिन्याच्या शेवटच्या आठवडयात उपलब्ध करून देण्यात येणार आहे. यात औरंगाबाद, बदनापुर (जिल्हा जालना), खामगाव (जिल्हा बीड), तुळजापूर (जिल्हा उस्मानाबाद) येथील कृषी विज्ञान केंद्रे तसेच लातुर येथील गळीत धान्य संशोधन केंद्र, नांदेड येथील कापूस संशोधन केंद्र, गोळेगाव (जिल्हा हिंगोली) व आंबेजोगाई (जिल्हा बीड) येथील कृषी महाविद्यालय विविध रबी पिकांचे बियाणे विक्रीसाठी उपलब्ध करून देण्यात येणार आहे. तसेच दिनांक २२ सप्टेंबर रोजी पासुन परभणी मुख्यालयी असलेल्या बीज प्रक्रिया केंद्रावर बियाणे विक्रीसाठी उपलब्ध होणार आहे, तरी शेतकरी बांधवांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन विद्यापीठाच्या वतीने करण्यात येत आहे.