विद्यार्थ्यांनी इतर विद्यार्थ्यांशी तुलना न करता, स्वत:शीच स्वत:ची तुलना करावी, त्यामुळे स्वतःची ताकद आणि कमतरता ओळखता येईल. आपल्या कमतरतेवर मात करण्याचे उपाय शोधावे व आपला व्यक्तिमत्व विकास साधता येईल, असे प्रतिपादन देहरादून येथील डून विद्यापीठाचे माजी कुलगुरु तथा नवी दिल्ली येथील भारतीय कृषि अनुसंधान परिषदेचे माजी महासंचालक (अभि.) प्रा. डॉ. गजेंद्र सिंह यांनी केले.
वसंतराव नाईक
मराठवाडा कृषि विद्यापीठातील कृषी अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालय येथे आयोजित
भारतीय कृषि अभियंता संस्थेच्या कार्यक्रमात बोलत होते. भारतीय कृषी अभियंता
संस्था, परभणी शाखा आणि कृषि अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालय, वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ परभणी यांच्या संयुक्त विद्यमाने चर्चासत्र आयोजित
करण्यात आलेले होते. यावेळी व्यासपीठावर मा. कुलगुरु डॉ. इंद्र मणी, सहयोगी अधिष्ठाता व प्राचार्य डॉ.
यु.एम.खोडके, विभाग
प्रमुख अपारंपरिक उर्जा डॉ. आर.टी. रामटेके, विभाग
प्रमुख डॉ.आर.जी. भाग्यवंत आदी मान्यवर उपस्थित होते.
प्रा. डॉ. गजेंद्र सिंह पुढे म्हणाले की, शैक्षणिक अभ्यासक्रमासोबतच विद्यार्थ्यांनी इतर व्यक्तीमत्व विकासाच्या बाबींमध्ये सहभाग घेतला पाहिजे. त्यामुळे समूहात राहतांना आपल्याला त्याचा उपयोग होतो. भविष्यातील कृषी क्षेत्रातील आव्हानांना कृषी अभियांत्रिकी विद्या शाखा उपाय शोधू शकते. कृषी अभियंत्यांनी कुठल्याहि परिस्थितीत आपण कमी असल्याची भावना ठेवू नये आणि शेती आणि शेतकऱ्यांच्या विकासासाठी ज्या क्षेत्रात कार्यरत असाल त्या क्षेत्राद्वारे आपले योगदान द्यावे असे आवाहन त्यांनी केले.
अध्यक्षीय भाषणात कुलगुरु मा डॉ. इन्द्र मणि म्हणाले की, भविष्यातील शेती ही अभियांत्रीकीची शेती असणार आहे. त्यामुळे पुढील २० वर्षांच्या शेतींच्या गरजांचे नियोजन करुन त्यावर संशोधन करण्यावर भर दिला जाणार असल्याचे प्रतिपादन त्यांनी केले.
कार्यक्रमाचे
प्रास्ताविकात भारतीय कृषि अभियंता संस्थेच्या परभणी शाखेचे अध्यक्ष प्राचार्य डॉ.
यु.एम. खोडके यांनी कृषि अभियांत्रीकी व तंत्रज्ञान महाविद्यालयाच्या
स्थापनेपासूनच्या प्रगतीचा आढावा घेतला व या संस्थेच्या परभणी शाखेमार्फत आगामी
काळात घेण्यात येणाऱ्या विविध उपक्रमाची माहिती दिली.
प्रमुख पाहुण्यांची ओळख डॉ. आर. टी. रामटेके यांनी करुन दिली तर सुत्रसंचालन प्रा. मधुकर मोरे यांनी केले. आभार डॉ. आर.जी. भाग्यवंत यांनी मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी डॉ. स्मिता सोलंकी, डॉ. सुभाष विखे, प्रा. एल.व्ही. राऊतमारे, इंजि. दिपक राऊत आदिंनी परिश्रम घेतले. कार्यक्रमास संस्थेचे सभासद, महाविद्यालयातील विभाग प्रमुख, प्राध्यापक, विद्यार्थी, विद्यार्थीनी ई. मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रा. गजेंद्र सिंग हे भारतीय कृषी अभियंता संस्थेचे २००८ ते २०१० या काळात राष्ट्रीय अध्यक्ष होते तर विद्यमान कुलगुरू डॉ. इन्द्र मणि हे २०१८ ते २०२१ या काळात राष्ट्रीय अध्यक्ष होते. यावेळी त्यांचा परभणी शाखेतर्फे सत्कार सुद्धा करण्यात आला.
प्रा.
गजेंद्र सिंग यांनी विद्यापीठातील कृषी अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालय आणि
अन्नतंत्र महाविद्यालय येथील विविध विभाग आणि प्रकल्प कडधान्य व तेलबिया प्रक्रिया
केंद्र, औजारे तपासणी व प्रशिक्षण केंद्र, पशुशाक्तीचा योग्य वापर योजना आणि
अन्नतंत्र महाविद्यालयातील फळे व भाजीपाला प्रक्रिया केंद्र आदी ठिकाणी भेटी दिल्या.
यावेळी संबधित विभागात संशोधन व शिक्षण कार्य करीत असलेल्या पदव्युत्तर व आचार्य
अभ्यासक्रमाच्या विद्यार्थांशी संवाद साधला. विद्यार्थांचे संशोधन प्रकल्पामध्ये प्रा.
गजेंद्र सिंग यांनी विशेष रस घेतला आणि विद्यार्थांचे संशोधन प्रकल्प मध्ये
सुधारणे साठी सूचना सुद्धा केल्या.