वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ अंतर्गत अखिल भारतीय ज्वार सुधार प्रकल्प - ज्वार संशोधन केंद्राच्या वतीने आद्यरेषीय पीक प्रात्यक्षिक योजनेअंतर्गत दिनांक ३० ऑक्टोबर रोजी मौजे उस्माननगर ता. नांदेड जि. नांदेड येथील शेतकरी बांधवांना रब्बी ज्वारीचे बियाणे व कृषि निविष्ठांचे वाटप करण्यात आले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संशोधन संचालक डॉ. दत्तप्रसाद वासकर हे होते तसेच भगवान घोरबांड आणि उपसरपंच भागीरथ घोरबांड प्रमुख अतिथी म्हणुन उपस्थित होते. कार्यक्रमास ज्वार संशोधन केंद्राचे प्रभारी अधिकारी डॉ. एल एन जावळे, रोग शास्त्रज्ञ डॉ. के डि नवगिरे, कीटकशास्त्रज्ञ डॉ. महमद इलियास, कृषी विद्यावेता श्रीमती प्रीतम भुतडा, डॉ. अरविंद पंडागळे, कापुस कृषिविद्यावेत्ता आणि कृषि सहाय्यक श्री उबाळे व अर्जुन घोरबांड आदी उपस्थित होते.
रब्बी ज्वारीचे विद्यापीठ विकसित वाण परभणी सुपर मोती, परभणी शक्ती, परभणी मोती, परभणी ज्योती आदींचे बियाणे तर बीज प्रक्रियेसाठी गाउचू, ट्रायको बूस्ट आणि ट्रायको कार्डचे वाटप संशोधन संचालक डॉ दत्तप्रसाद वासकर यांच्या हस्ते करण्यात आले.
मार्गदर्शनात डॉ. दत्तप्रसाद वासकर म्हणाले की, येणारे वर्ष २०२३ हे जागतिक पातळीवर भरड धान्य वर्ष म्हणुन साजरे केले जाणार असुन जगाला भरड धान्याचे महत्व लक्षात आले आहे. भारतीय शेतीत मोठा प्रमाणात भरड धान्य घेतली जातात, परंतु गेल्या काही वर्षात भरड धान्य लागवडी खालील क्षेत्र कमी झाले आहे. हे क्षेत्र वाढीकरिता प्रयत्न केला जात असे सांगुन त्यांनी ज्वारीचे आहारातील महत्व, त्याबरोबरच विद्यापीठ संशोधनाबाबत माहिती दिली.
प्रास्ताविकात डॉ. एल एन जावळे यांनी सुधारित वाणांविषयी माहिती दिली. डॉ. नवगिरे यांनी ट्रायको बूस्ट व जैविक रोग नियंञण या विषयावर मार्गदर्शन केले तर डॉ. इलियास यांनी कीड, ट्रायको कार्ड व एकात्मीक किड व्यवस्थापन या विषयावर मार्गदर्शन केले. सुत्रसंचालनात श्रीमती प्रीतम भुतडा यांनी आद्यरेषीय पीक प्रात्यक्षिक योजनेबद्दल माहिती दिली तर आभार डॉ. अरविंद पंडागळे यांनी मानले. कार्यक्रमास शेतकरी बांधव मोठया संख्येने उपस्थित होते.