वनामकृवित चार दिवसीय हार्टफुलनेस शिबिरास सुरूवात
आज लहान मुलांपासुन
ते वृध्दापर्यंत प्रत्येकजण तणावात जीवन जगत असुन जीवनातील आनंद हिरावला आहे. प्रत्येक
व्यक्तीच्या व्यक्तिगत जीवनात आनंदाचे फारच कमी क्षण येतात, जर आपण इतरांच्या आनंदात सहभागी झालो तर आपण
जीवनात जास्त काळ आनंदी राहु. मनस्थिती चांगली असेल तर हातुन चांगले कार्य घडते. आनंदी
व्यक्तीच जीवनात उत्तुंग असे यश प्राप्त करू शकतो. कोणत्याही परिस्थितीत आनंदी
राहण्याची कला प्रत्येकांनी अवगत केली पाहिजे, असे प्रतिपादन
कुलगुरू मा डॉ इन्द्र मणि यांनी केले. वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ आणि हार्टफुलनेस संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने विद्यापीठातील
राष्ट्रीय सेवा योजना आणि राष्ट्रीय छात्रसेना यांच्या माध्यमातुन विविध महाविद्यालयातील
विद्यार्थ्यांकरिता दिनांक १६ नोव्हेबर ते १९ नोव्हेंबर दरम्यान आयोजित चार
दिवसीय हार्टफुलनेस शिबिराच्या उदघाटन प्रसंगी अध्यक्षीय भाषणात ते बोलत होते. सदर
शिबिराचे उदघाटन दिनांक १६ नोव्हेंबर रोजी झाले, कार्यक्रमाच्या
अध्यक्षस्थानी कुलगुरू मा डॉ इन्द्र मणि हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणुन नवी दिल्ली
येथील भारतीय कृषि अनुसंधान परिषदेचे उपमहासंचालक (शिक्षण) मा डॉ आर सी अग्रवाल हे ऑनलाईन माध्यमातुन उपस्थित होते. व्यासपीठावर शिक्षण
संचालक डॉ धर्मराज गोखले, हार्टफुलनेस संस्थेच्या समन्वयिका
मुख्य प्रशिक्षक नेत्ररोग तज्ञ डॉ अंजली निरस, प्राचार्य डॉ
उदय खोडके, प्राचार्य डॉ राजेश्वर क्षीरसागर, विभाग प्रमुख डॉ डि एस पेरके, डॉ माधुरी कुलकर्णी, आयोजक विद्यार्थी कल्याण अधिकारी डॉ सचिन मोरे आदींची प्रमुख उपस्थिती होती.
अध्यक्षीय
भाषणात कुलगुरू मा डॉ इन्द्र मणि पुढे म्हणाले की, प्रत्येकाप्रती आदर व्यक्त केला पाहिजे, प्रत्येकाचा
सन्मान केला पाहिजे. आज तरूणपिढी तणावाखाली वावरत आहे, यांना
तणावमुक्त राहण्याकरिता हार्टफुलनेस सारख्या शिबिराचा निश्चितच लाभ होईल, असे मत त्यांनी व्यक्त केले.
मा डॉ आर सी
अग्रवाल आपल्या मार्गदर्शनात म्हणाले की, देशाच्या प्रगतीत तरूणांची महत्वाची भुमिका असुन एक मजबुद सकारात्मक मानसिकताच
देशाला मजबुद बनवेल. महाविद्यालयीन विद्यार्थी अनेक कारणामुळे तणावाखाली आहे, त्यांना तणावमुक्त जीवन जगण्याची कला शिकविण्याकरिता भारतीय कृषि अनुसंधान
परिषदेने हार्टफुलनेस संस्थेसोबत सामजंस्य करार केला असुन योग आणि ध्यान या विषयावर तीन
आठवडे कालावधीचा अनिवार्य पायाभूत अभ्यासक्रम नवीन कृषि अभ्यासक्रमात समाविष्ट
करण्यात आला आहे. देशातील संपुर्ण कृषि विद्यापीठे, संशोधन केंद्रे, कृषि
विज्ञान केंद्रे आदीतील प्राध्यापक, शास्त्रज्ञ आणि विद्यार्थी
यांना तणावमुक्त करून आनंदी जीवनाकरिता प्रयत्न करण्यात येत आहे.
मुख्य प्रशिक्षक
नेत्ररोग तज्ञ डॉ अंजली निरस यांनी शिबिराबाबत माहिती दिली तर हार्टफुलनेस संस्थेच्या
स्वयंसेवकांना विविध विषयावर मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ सचिन
मोरे यांनी केले. सुत्रसंचालन डॉ रविंद्र शिंदे यांनी केले तर आभार डॉ प्रविण
घाटगे यांनी मानले. शिबिराच्या यशस्वीतेकरिता राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम
अधिकारी डॉ प्रविण घाटगे, डॉ अनुराधा लाड, प्रा संजय पवार, डॉ रविंद्र शिंदे, डॉ विद्याधर मनवर, डॉ वैशाली भगत, राष्ट्रीय छात्रसेनेचे छात्रसेना अधिकारी डॉ जयकुमार देशमुख क्रीडा अधिकारी
डॉ आशा देशमुख, डॉ डि एफ राठोड, प्रा शाहु
चव्हाण आदींच्या मार्गदर्शनाखाली रासेयो आणि राछासेचे स्वयंसेवक आणि हार्टफुलनेस
संस्थेचे स्वयंसेवक स्वयंसेवक गायत्री वाणी, जान्वी चव्हाण
परिश्रम घेत आहेत. शिबिरात विद्यापीठातील कृषि
महाविद्यालय, कृषि अभियांत्रिकी महाविद्यालय, अन्नतंत्रज्ञान महाविद्यालय, सामुदायिक विज्ञान महाविद्यालय
आणि उद्यानविद्या महाविद्यालय येथील ५०० पेक्षा जास्त विद्यार्थी – विद्यार्थींनी
सहभागी झाले आहेत.