Monday, September 18, 2023

हळदीवरील कंद माशी, करपा आणि कंदकुजचे कसे कराल व्यवस्थापन

वनामकृवितील कृषि तंत्रज्ञान माहिती केंद्रातील तज्ञांचा सल्‍ला

सध्यपरिस्थितीत हळद वाढीच्या अवस्थेमध्ये आहे. अशावेळी हळदीला कंदमाशी या किडीचा प्रादुर्भाव दिसून येतो आहे आणि येणाऱ्या काळात करपा, पानावरील ठिपके या रोगांचा प्रादुर्भाव होऊ शकतो. त्यामुळे भविष्यात होणारे नुकसान टाळण्यासाठी या रोगांचे तसेच सद्यस्थितीतील कंदमाशीचे पुढील प्रमाणे व्यवस्थापन वेळीच करण्‍याचा सल्‍ला वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील कृषि तंत्रज्ञान माहिती केंद्रातील तज्ञ डॉ.डी.डी.पटाईत, डॉ.जी.डी.गडदे आणि श्री.एम.बी.मांडगे  यांनी दिला.

हळदी वरील कंदमाशी व्यवस्थापन: प्रत्येक १५ दिवसांच्या अंतराने क्विनॉलफॉस (२५ टक्के प्रवाही) २० मि.ली. किंवा डायमिथोएट (३० टक्के प्रवाही ) १५ मि.ली. यापैकी एका कीटकनाशकाची प्रति १० लिटर पाणी या प्रमाणे झाडावर आलटून पालटून फवारणी करावी व सोबत चांगल्या दर्जाचे स्टिकर मिसळावे. उघडे पडेलेल्या कंदाजवळ कंदमाशीची मादी अंडी घालते त्यामुळे उघडे पडलेले कंद मातीने वेळोवेळी झाकून घ्यावेत. वेळेवर हळदीची भरणी करावी. पीक तण विरहित ठेवावे. जमिनीतून क्‍लोरपायरीफॉस ५० टक्के ५० मि.लि. प्रति १० लिटर पाणी या प्रमाणात घेऊन आळवणी करावी. याच पद्धतीने कीटकनाशकाची आळवणी प्रतिबंधात्मक उपाय म्हणून एक महिन्याच्या अंतराने प्रत्येक महिन्यात निश्चित करावी. हळद पीक काढल्यानंतर शेतात राहिलेल्या पिकांचे अवशेष, सडके कंद नष्ट करावेत. तसेच एकरी २-३ पसरट तोंडाची भांडी वापरून प्रत्येक भांड्यात भरडलेले एरंडीचे बी २०० ग्रॅम घेऊन त्यात १ ते १.५ लिटर पाणी घ्यावे. ८ ते १० दिवसांनी या मिश्रणामध्ये तयार होणाऱ्या विशिष्ट गंधाकडे कंदमाशीचे प्रौढ आकर्षित होतात व त्यात पडून मरतात.

हळदीमधील पानावरील ठिपके आणि करपा व्यवस्थापन: करपाजन्य रोगग्रस्त पाने वेळोवेळी जमा करून जाळून नष्ट करावीत आणि शेतात स्वच्छता राखावी. प्रादुर्भाव कमी असल्यास कार्बेडेंझीम ५० टक्के - ४०० ग्रॅम किंवा मॅन्कोझेब ७५ टक्के ५०० ग्रॅम किंवा कॉपर ऑक्झीक्लोराइड ५० टक्के - ५०० ग्रॅम यापैकी एका बुरशीनाशकाची प्रति एकर याप्रमाणे सोबत स्टिकर मिसळून फवारणी करावी. प्रादुर्भाव जास्त असल्यास एजोक्सिस्ट्रोबीन १८.२ टक्के अधिक डायफेनोकोनॅझोल ११.४ टक्के (पूर्वमिश्रित बुरशीनाशक) - २०० मिली किंवा प्रोपीकोनॅझोल २५ टक्के - २०० मिली किंवा क्लोरथॅलोनील ७५ टक्के - ५०० ग्रॅम यापैकी एका बुरशीनाशकाची प्रति एकर याप्रमाणे सोबत स्टिकर मिसळून फवारणी करावी.

हळदीमधील कंदकुज व्यवस्थापन : कंदकुज करीता प्रतिबंधात्मक उपाय म्हणून एकरी २ ते २.५ किलो ट्रायकोडर्मा शेणखतामध्ये मिसळून जमिनीतून द्यावे. जास्त पावसामुळे शेतात साठलेल्या अतिरिक्त पाण्याचा वेळोवेळी निचरा करावा. जेणेकरून कंदकुज होण्यास कारणीभूत असलेल्या बुरशीचा प्रसार कमी करता येईल. कंदकूज झाली असल्यास जमिनीतून कार्बेडेंझीम ५० टक्के -१ ग्रॅम किंवा मॅन्कोझेब ७५ टक्के -३ ग्रॅम किंवा कॉपर ऑक्झीक्लोराइड ५० टक्के ५ ग्रॅम यापैकी एका बुरशीनाशकाची प्रति लिटर पाण्यात मिसळून दरवेळी महिन्यातून एकदा आळवणी करावी. (आळवणी करताना जमिनीमध्ये वापसा असावा. आळवणी केल्यानंतर पिकास पाण्याचा थोडा ताण द्यावा.)

अधिक माहितीसाठी विद्यापीठातील कृषि तंत्रज्ञान माहिती केंद्राशी दुरध्‍वनी क्रमांक ०२४५२ २२९००० वर संपर्क करावा.





(संदर्भ: हळद संशोधन केंद्र, कसबे डिग्रज जि. सांगली) 

टीप : हळद पिकावर केंद्रीय कीटकनाशक मंडळातर्फे लेबल क्‍लेम नसल्याने विद्यापीठ शिफारशीत संशोधनाचे निष्कर्ष दिले आहेत.

सौजन्‍य : वनामकृवि संदेश क्रमांक: ०६/२०२३  (११ सप्टेंबर २०२३)