आंतरराष्ट्रीय पातळीवरील शैक्षणिक आणि संशोधन कार्याचा विद्यापीठास लाभ.... कुलगुरू डॉ. इन्द्र मणि
वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी आणि वेस्टर्न सिडनी विद्यापीठ, ऑस्ट्रेलिया यांच्यात आंतरराष्ट्रीय स्तरावरील सहभागातून कृषि संशोधन आणि शैक्षणिक कार्यासाठी सामंजस्य करार नवी दिल्ली येथे दिनांक ६ मार्च रोजी करण्यात आला. या करारावर माननीय कुलगुरू डॉ. इन्द्र मणि, वेस्टर्न सिडनी विद्यापीठाच्या उपकुलगुरू प्रा. देबोराह स्वीने, हॉक्सबरी पर्यावरण व कृषि संस्थेच्या संचालक प्रा. इअन अँडरसन यांनी स्वाक्षऱ्या केल्या. याप्रसंगी वेस्टर्न सिडनी विद्यापीठाच्या इंटरनॅशनल स्ट्रॅटेजी आणि पार्टनरशिप विभागाच्या विभाग प्रमुख डॉ. निशा राकेश, वरिष्ठ संशोधन कार्यक्रमाधिकारी डॉ. कोपाल चौबे आणि दक्षिण आशियाच्या विभागीय संचालक नम्रता आनंद हे उपस्थित होते.
या कराराबाबत माहिती देतांना कुलगुरू मा डॉ. इन्द्र मणि म्हणाले की, वेस्टर्न सिडनी विद्यापीठ हे एक आंतरराष्ट्रीय पातळीवरील अग्रगण्य विद्यापीठ असून परभणी कृषी विद्यापीठाच्या संशोधन आणि शैक्षणिक उपक्रमास लाभ होणार आहे. दोन्ही विद्यापीठाच्या वतीने संयुक्तपणे संशोधन प्रकल्प, शैक्षणिक कार्यक्रम राबविण्यात येणार असुन याचा कृषी शास्त्रज्ञांना आणि विद्यार्थ्यांना लाभ मिळणार आहे.
यासाठी सामंजस्य कराराच्या माध्यमातुन संयुक्त संशोधन प्रकल्प, शैक्षणिक कार्यक्रम राबविणे, विद्यार्थी आणि प्राध्यापक यांच्यात परस्पर भेटीं, परिषदा, परिसंवादाच्या माध्यमातुन विचारांच्या देवाण-घेवाण याचा लाभ शैक्षणिक दर्जा उंचावण्यास होणार आहे. तसेच जागतिक दर्जाच्या ज्ञानप्रसाराला चालना देण्यासाठी संयुक्त प्रकाशाने करणे आणि अभ्यासक्रम राबविणे, नवीन शैक्षणिक धोरणानुसार अभ्यासक्रम तयार करणे, उच्च पदवी विद्यार्थ्यांसाठी दुहेरी पदवी कार्यक्रम आणि शैक्षणिक प्रकल्पांचा विकास साधने, असे या सामंजस्य करारातून विकासात्मक बाबी साधता येणार आहेत.