Wednesday, March 27, 2024

वनामकृवितील प्रायोगिक पूर्व प्राथमिक शाळेचा १२ वा दीक्षांत समारंभ संपन्न

बालकांच्या विकासाकरिता कुटुंबातील वातावरण आनंदी असणे आवश्यक!.... कुलगुरू डॉ इन्द्र मणि

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील सामुदायिक विज्ञान महाविद्यालय अंतर्गत असलेल्या प्रायोगिक पूर्व प्राथमिक शाळेचा १२ वा दीक्षांत समारंभ दिनांक २७ मार्च रोजी संपन्न झाला. कार्यक्रमाचे आयोजन प्रायोगिक पूर्व प्राथमिक शाळा, मानव विकास व कौटुंबिक अभ्यास विभागाद्वारे करण्यात आला होते. दीक्षांत समारंभात भारतीय संस्कृतीचे जपणूक करत विद्यावस्त्रे परिधान केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यापीठाचे माननीय कुलगुरू डॉ. इन्द्र मणि हे होते तर विशेष अतिथी म्हणून विद्यापीठाचे संचालक शिक्षण डॉ. उदय खोडके हे होते. व्यासपीठावर  कार्यक्रमाच्या आयोजक  सहयोगी अधिष्ठाता डॉ. जया बंगाळे, सहयोगी प्राध्यापक डॉ. निता गायकवाड आणि डॉ. वीणा भालेराव यांची उपस्थिती होती. 

अध्यक्षीय भाषणात माननीय कुलगुरू डॉ. इन्द्र मणि यांनी सुरुवातीस आयोजकांचे अभिनंदन केले ते पुढे म्हणाले की, शिक्षणाची पहिली परीक्षा म्हणजे अंगी नम्रता येणे होय. नम्रतेने सर्वांगीण विकास साधने शक्य होते आणि याद्वारे जनहिताचे कार्य आणि सेवा साध्य करता येते. शिक्षणाने विद्यार्थ्यातील पात्रतेची क्षमता वाढून त्यांचे सहनशील व्यक्तिमत्व बनते. याकरिता पालकांनी त्यांच्या बालकांचे संगोपन नैसर्गिक वातावरणामध्ये करावे. प्रत्येक विद्यार्थ्यांमध्ये एक वेगळा गुण असतो त्यास चालना द्यावी. आपल्या अपेक्षा त्यांच्यावर लादू नयेत‌. बालकांच्या विकासाकरिता कुटुंबातील वातावरण प्रसन्न आणि आनंदी ठेवावे. या विद्यापीठात पूर्व प्राथमिक शिक्षणापासून ते आचार्य पदवी पर्यंतचे शिक्षण दिले जाते ही एक अभिमानाची बाब असे नमूद करुन बालकांचा पार पडलेला  दीक्षांत समारंभाबाबत समाधान व्यक्त केले आणि बालकांना तसेच त्यांच्या पालकांना उज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या.

याप्रसंगी विद्यापीठाचे शिक्षण संचालक डॉ. उदय खोडके यांनी प्रायोगिक पूर्व प्राथमिक शाळेस मागील ४१ वर्षापासून केलेल्या कार्याचा अतिशय उत्कृष्ठ असा इतिहास आहे. या कार्याचे कौतुक केले आणि विद्यार्थ्यांना तसेच शाळेला पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाच्या आयोजक सहयोगी अधिष्ठाता डॉ. जया बंगाळे यांनी प्रास्ताविकात प्रायोगिक पूर्व प्राथमिक शाळेने नवीन शैक्षणिक धोरणानुसार २०२३-२४ निपुण भारत मिशन याचा अवलंब केला असून याअंतर्गत विद्यार्थ्यांचा शैक्षणिक पाया भक्कम करण्यासाठी पायाभूत शिक्षण सुरू केले असल्याचे विशद केले. याबरोबरच शाळेने वर्षभरात राबविलेल्या  विविध उपक्रमाची माहिती दिली.

समारंभात एकूण ४२ विद्यार्थ्यांना त्यांचे पूर्व प्राथमिक शिक्षण यशस्वीरित्या पूर्ण केल्याबद्दल  मान्यवरांच्या हस्ते सन्मानपत्रे प्रदान करण्यात आली. या समारोहात ब्रिज सेक्शनचे अन्वी डाके, सत्यजित गरुड, अद्विता सरनाईक, विघ्नेश कसलवार, अनन्या कुंभार, आणि वेदिका सुभेदार यांनी शाळेविषयी त्यांच्या असणाऱ्या हृदयस्पर्शी भावना प्रतिनिधिक स्वरूपात व्यक्त केल्या.

कार्यक्रमाचे आयोजन सहयोगी अधिष्ठाता डॉ. जया बंगाळे यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ. वीणा भालेराव, डॉ. निता गायकवाड, प्रा. प्रियंका स्वामी आणि प्रायोगिक पूर्व प्राथमिक शाळेच्या सर्व शिक्षिका आणि मदतनीस यांनी केले. सुत्रसंचलन आणि आभार डॉ वीणा भालेराव यांनी मानले. या कार्यक्रमांमध्ये जनसंपर्क अधिकारी डॉ. शंकर पुरी, विस्तार शिक्षण विभागाचे डॉ. विद्यानंद मनवर, शाळेचे विद्यार्थी, महाविद्यालयातील अधिकारी, प्राध्यापक आणि विद्यार्थ्यांचे पालक यांनी उत्स्फूर्तपणे प्रतिसाद नोंदवला.