Saturday, May 31, 2025

वनामकृविचे डॉ. मदन पेंडके: मराठवाड्यातून 'उत्कृष्ट कृषी शास्त्रज्ञ' पुरस्काराचे मानकरी

 


महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री मा.ना.श्री. देवेंद्र फडणवीस यांच्या शुभहस्ते आणि कृषि मंत्री तथा विद्यापीठाचे प्रतिकुलपती मा. ना. अॅड. माणिकरावजी कोकाटे, सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण, पाणी पुरवठा व स्वच्छता, उर्जा, महिला व बालकल्याण, सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम) राज्यमंत्री तथा परभणी जिल्हा पालकमंत्री मा.ना. श्रीमती मेघनाताई साकोरे-बोर्डीकर, कृषि, वित्त, नियोजन, मदत व पुनर्वसन, विधी व न्याय, कामगार राज्यमंत्री  मा.ना. अॅड. आशिष जयस्वाल तसेच कुलगुरू मा. प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांच्या प्रमुख उपस्थित वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाचे शास्त्रज्ञ डॉ मदन पेंडके यांना “उत्कृष्ट कृषी शास्त्रज्ञ २०२५” या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

हा पुरस्कार त्यांना वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी व महाराष्ट्र कृषि शिक्षण संशोधन परिषद, पुणे यांचे संयुक्‍त विद्यमाने राज्यातील चारही कृषि विद्यापीठाची ५३ व्या संयुक्त कृषि संशोधन आणि विकास समिती-२०२५ च्या उद्घाटन समारंभात दिनांक २९ मे रोजी प्रदान करण्यात आला.

यावेळी लोकसभा सदस्य, विधान परिषद सदस्य, विधानसभा सदस्य व विद्यापीठाचे कार्यकारी परिषद सदस्य, महाराष्ट्र राज्याचे प्रधान सचिव (कृषि), कृषि परिषदेचे महासंचालक, कृषि आयुक्त,  पोकराचे प्रकल्प संचालक, चारही विद्यापीठाचे कुलगुरू, परभणीचे सर्व वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी आदी मान्यवर उपस्थित होते.

शास्त्रज्ञांनी संशोधनात उल्लेखनीय कार्य  केल्याबद्दल “उत्कृष्ट कृषी शास्त्रज्ञ” या पुरस्काराने संयुक्त कृषि संशोधन आणि विकास समिती च्या बैठकीमध्ये सन्मानित करण्यात येते.

डॉ. मदन श्रीधरराव पेंडके यांचा परिचय

डॉ. मदन पेंडके हे वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाच्या भारतीय समन्वयित कोरडवाहू शेती संशोधन केंद्रात वरिष्ठ शास्त्रज्ञ (मृदा व जलसंधारण अभियांत्रिकी) या पदावर कार्यरत आहेत. ते सध्या विभाग प्रमुख (मृदा व जलसंधारण अभियांत्रिकी) म्हणून अतिरिक्त जबाबदारी सांभाळत आहेत. वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठात १९९२ पासून अध्यापन, संशोधन व विस्तार सेवा देत आहेत. त्यांनी मृदा व जलसंधारण अभियांत्रिकी विषयात पदवी, पदव्युत्तर व आचार्य (डॉक्टरेट) पदवी प्राप्त केली आहे.

शिक्षण, संशोधन आणि विस्तार कार्यातील योगदान –

त्यांचे मराठवाडा विभागातील विविध कृषी हवामान विभागांनुसार शेतकऱ्यांचे आकारमान निश्चित करून राज्य शासनासाठी शिफारसी केल्या, मृदा व जलसंधारणाच्या कामांचे मूल्यांकन करून कार्यक्रम ठरवले, बंधारे, विहीर, कुपनलिका पुनर्भरण, मराठवाडा विभागासाठी शेततळ्याची आकार निश्चिती,  हवामान बदलनुरूप तंत्रज्ञान, जलसंधारण पद्धती इत्यादींवर संशोधन, कोरडवाहू शेतीसाठी उपयोगी तंत्रज्ञान तयार करून मराठवाडा प्रदेशात प्रसार केला, १०० हून अधिक संशोधन लेख प्रकाशित, १० पुस्तिकांचे लेखन व ५ पुस्तके प्रकाशित आहेत, तसेच १४ पदव्युत्तर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.

त्यांना मिळालेले पुरस्कार व सन्मान-  

त्यांना भारतीय कृषी संशोधन परिषदेतर्फे वसंतराव नाईक पुरस्कार (२०१८), आदर्श शिक्षक आणि राधाकिशन शांती मल्होत्रा पुरस्कार, याशिवाय भारतीय कृषी अभियंता संघटना नवी दिल्ली यांचा संशोधन कार्यासाठी एस जे हिरण पुरस्कार यासह अनेक उत्कृष्ट सादरीकरण पुरस्कार प्राप्त झालेले आहेत