Saturday, February 7, 2026

वनामकृविच्या उद्यानविद्या महाविद्यालयात रोपवाटिका व्यवस्थापनावर तीन दिवसीय कौशल्य विकास प्रशिक्षण संपन्न

 युवकांच्या स्वयंरोजगार व उद्योजकतेसाठी प्रशिक्षण कार्यक्रम महत्त्वाचा – माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि

वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी अंतर्गत उद्यानविद्या महाविद्यालय, परभणी येथे भारतीय कृषी अनुसंधान परिषद, नवी दिल्ली यांच्या अनुसूचित जाती उप-उपयोजना अंतर्गत रोपवाटिका व्यवस्थापनातील कौशल्य विकास” या विषयावर तीन दिवसीय प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. हे प्रशिक्षण दिनांक ३ ते ५ फेब्रुवारी २०२६ या कालावधीत यशस्वीपणे पार पडले.

प्रशिक्षण कार्यक्रमाचे उद्घाटन दिनांक ३ फेब्रुवारी रोजी उद्यानविद्या महाविद्यालयात माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांच्या अध्यक्षतेखाली उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाले. अध्यक्षीय भाषणात त्यांनी युवक-युवतींनी या प्रशिक्षण कार्यक्रमाचा पुरेपूर लाभ घ्यावा, आधुनिक तंत्रज्ञानासह व्यावसायिक कौशल्ये आत्मसात करावीत तसेच नावीन्यपूर्ण विचारसरणीच्या माध्यमातून स्वयंरोजगार व उद्योजकतेच्या संधी निर्माण कराव्यात, असे प्रेरणादायी मार्गदर्शन केले. अशा प्रकारचे प्रशिक्षण कार्यक्रम तरुणांच्या सर्वांगीण विकासासोबतच ग्रामीण व कृषीआधारित अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी अत्यंत उपयुक्त ठरतात, असेही त्यांनी यावेळी नमूद केले.

उद्घाटन समारंभास प्रमुख पाहुणे म्हणून शिक्षण संचालक  डॉ. भगवान आसेवार उपस्थित होते. त्यांनी प्रशिक्षणार्थ्यांनी रोपवाटिका व्यवसायातील उद्योगधंद्याच्या संधी ओळखून त्याचा लाभ घ्यावा, असे सांगितले. विशेष अतिथी म्हणून हिंगोली येथील उपविभागीय कृषी अधिकारी श्री. प्रदीप कच्छवे आणि पुणे येथील प्रगतशील रोपवाटिका उद्योजक श्री. गणेश बाबर यांची उपस्थिती लाभली. प्रास्ताविक सहयोगी अधिष्ठाता डॉ. विश्वनाथ खंदारे यांनी केले

या प्रशिक्षणामध्ये रोपवाटिकेची नोंदणी व कायदेशीर बाबी, रोपवाटिका व्यवस्थापन, फळ, भाजीपाला व फुलपिकांतील अभिवृद्धी तंत्रे, उद्योजकता विकास, आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर, कीड व रोग नियंत्रण तसेच स्वयंरोजगाराच्या संधी यावर सखोल मार्गदर्शन करण्यात आले.

उद्घाटन सत्रानंतर श्री. प्रदीप कच्छवे यांनी रोपवाटिका नोंदणी अधिनियम, नियम व कायदे याविषयी माहिती देत, कायदेशीर बाबींची पूर्तता केल्यास व्यवसाय अधिक सुरक्षित व विश्वासार्ह बनतो, असे नमूद केले. तर श्री. गणेश बाबर यांनी रोपवाटिकेतील डिजिटायझेशन, ऑनलाईन नोंदणी, डिजिटल मार्केटिंग व स्मार्ट व्यवस्थापन यावर मार्गदर्शन केले. यानंतर श्री. अभय काळुंके, प्रगतशील रोपवाटिका उद्योजक, जालना यांनी उद्योजकता विकास व व्यवस्थापनावर मार्गदर्शन केले.

प्रशिक्षणाच्या दुसऱ्या दिवशी डॉ. जी. यू. शिंदे यांनी रोपवाटिका व्यवस्थापनात रोबोटिक्सच्या वापरावर माहिती दिली. डॉ. के. एम. शर्मा यांनी टिश्यू कल्चर तंत्रज्ञानातील नवीन पद्धती स्पष्ट केल्या. डॉ. एस. आर. बरकुले यांनी मध्यवर्ती रोपवाटिकेत प्रत्यक्ष प्रात्यक्षिक सादर केले. तसेच डॉ. व्ही. एस. खंदारे, डॉ. ए. एस. लोहकरे आणि डॉ. ए. टी. दौंडे यांनी अनुक्रमे भाजीपाला रोपवाटिका व्यवस्थापन, फळपिकांचे कलम व संवर्धन तंत्र आणि रोपवाटिकेतील रोग व बडवूड प्रमाणीकरणावर मार्गदर्शन केले.

तिसऱ्या दिवशी डॉ. एस. एस. मोरे, विभागप्रमुख, कृषी अर्थशास्त्र यांनी रोपवाटिकेचे अर्थकारण व विपणन व्यवस्थापनावर मार्गदर्शन केले. डॉ. डी. डी. पटाईत यांनी कीड व्यवस्थापन, डॉ. व्ही. व्ही. भगत यांनी फुलपिकांच्या रोपवाटिका व्यवस्थापनावर माहिती दिली. डॉ. मेघा बागुल यांनी संवाद कौशल्य व व्यक्तिमत्त्व विकास, तर डॉ. एस. बी. पव्हणे यांनी शेडनेट व संरचना तंत्रज्ञानावर मार्गदर्शन केले.

उद्घाटन समारंभाचे सूत्रसंचालन डॉ. आशा सातपुते यांनी केले तर आभार प्रदर्शन डॉ. ए. एस. लोहकरे यांनी केले. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी प्राध्यापक, कर्मचारी व विद्यार्थ्यांनी विशेष परिश्रम घेतले.

समारोप प्रसंगी अध्यक्षस्थानी विस्तार शिक्षण संचालक डॉ. राकेश अहिरे हे उपस्थित होते. त्यांनी स्थानिक बाजारपेठेची गरज लक्षात घेऊन अशा प्रशिक्षणातून कौशल्य आत्मसात करून सुशिक्षित युवक-युवतींनी उद्योग व्यवसायात पुढाकार घ्यावा, असे आवाहन केले.

प्रशिक्षणार्थ्यांनी आपल्या मनोगतात या प्रशिक्षणामुळे रोपवाटिका व्यवसाय उभारणीस निश्चितच चालना मिळेल, असा विश्वास व्यक्त केला.