वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणीचे माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि आणि
हिंगोली जिल्ह्याचे जिल्हाधिकारी श्री राहुल गुप्ता यांच्यात हिंगोली जिल्ह्यातील कृषि
शिक्षण व संशोधनाच्या बळकटीकरणाबाबत दिनांक १० फेब्रुवारी २०२६ रोजी सखोल चर्चा झाली.
या बैठकीत विद्यापीठांतर्गत असलेल्या कृषि महाविद्यालय, गोळेगाव तसेच ऊस संशोधन केंद्र, वसमत नगर यांच्या
सर्वांगीण विकासासाठी विविध विषयांवर विचारमंथन करण्यात आले.
यावेळी माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र
मणि यांनी शिक्षण, शासन व
उद्योग (Academia–Government–Industry) यांच्या समन्वयातूनच
शेतीचा शाश्वत विकास शक्य असल्याचे प्रतिपादन केले. संशोधन हे विकासासाठी मूलभूत आधार असून त्याला
प्रोत्साहन देणे अत्यंत आवश्यक असल्यावर त्यांनी भर दिला. विद्यापीठ, शासन व उद्योग यांच्यातील समन्वय वाढविल्यास शेतकऱ्यांच्या समस्या सोडविण्यासाठी
उपयुक्त तंत्रज्ञान विकसित होऊ शकते, असेही त्यांनी नमूद
केले.
यावेळी माननीय जिल्हाधिकारी श्री राहुल गुप्ता यांनी हवामान
बदलास अनुरूप (Climate Resilient) पिकांवर आधारित
तंत्रज्ञान विकसित करण्याची गरज अधोरेखित केली. बदलत्या हवामान परिस्थितीत
शेतकऱ्यांना उपयोगी ठरणाऱ्या तंत्रज्ञानाचा विकास होणे काळाची गरज असल्याचे
त्यांनी सांगितले.
दोन्ही मान्यवरांमध्ये झालेल्या चर्चेदरम्यान हिंगोली जिल्ह्यात विद्यापीठांतर्गत शासकीय नवीन कृषि विज्ञान केंद्र (KVK) स्थापन करण्याच्या दृष्टीनेही सकारात्मक व सखोल चर्चा झाली. यामुळे जिल्ह्यातील शेतकरी, युवक आणि कृषि क्षेत्राला मोठा लाभ होईल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला. यावेळी सहयोगी अधिष्ठाता डॉ. शिवाजी शिंदे यांची उपस्थिती होती.
