Wednesday, February 11, 2026

मृदा ही राष्ट्रीय संपत्ती; तिचे संवर्धन व संरक्षण आवश्यक – माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि

 



मृदा ही केवळ शेतीचा एक घटक नसून मानवी संस्कृतीशी नाते जोडलेली राष्ट्रीय संपत्ती आहे. त्यामुळे तिचे संवर्धन व संरक्षण करणे अत्यंत आवश्यक आहे, असे प्रतिपादन वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणीचे माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांनी केले. ते भारतीय कृषि संशोधन परिषद, नवी दिल्ली आणि कृषि महाविद्यालय, परभणी अंतर्गत मृद विज्ञान विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित माती परीक्षण आणि खतांचा वापर” या विषयावरील तीन दिवसीय प्रशिक्षण शिबिराच्या उद्घाटनप्रसंगी, दिनांक ११ फेब्रुवारी २०२६ रोजी अध्यक्षस्थानावरून बोलत होते.

यावेळी व्यासपीठावर शिक्षण संचालक डॉ. भगवान असेवार, सहयोगी अधिष्ठाता डॉ. प्रवीण वैद्य, प्रशिक्षण संचालक व विभागप्रमुख डॉ. हरिहर कौसडीकर तसेच राहुरी येथील महात्मा फुले कृषि विद्यापीठातील मृद विज्ञान विभागाचे प्रमुख डॉ. बी. एम. कांबळे यांची प्रमुख उपस्थिती होती.

माननीय कुलगुरू पुढे म्हणाले की, बदलत्या काळात मातीचे आरोग्य जपणे व खतांचा शास्त्रीय पद्धतीने वापर करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. अनुसूचित जाती प्रवर्गातील विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाच्या दृष्टीने आयोजित या प्रशिक्षण शिबिराचा प्रशिक्षणार्थींनी पुरेपूर लाभ घ्यावा. सर्व प्रकारच्या शेती पद्धतींमध्ये मातीचे अनन्यसाधारण महत्त्व असून मातीला मातृत्वाचा दर्जा देण्यात आला आहे. त्यामुळे मातीचे संवर्धन व संरक्षण करणे हे आपले कर्तव्य आहे. मातीशिवाय मानवाचे पालनपोषण अशक्य आहे, असेही त्यांनी नमूद केले.

मातीच्या आरोग्याविषयी जागतिक स्तरावर जनजागृती सुरू असून, त्याचाच एक भाग म्हणून हे प्रशिक्षण शिबिर आयोजित करण्यात आले आहे. विद्यार्थ्यांनी या संधीचा लाभ घेऊन या क्षेत्रात प्रावीण्य मिळवावे, असे आवाहन त्यांनी केले.

शिक्षण संचालक डॉ. भगवान असेवार यांनी प्रशिक्षण शिबिरास शुभेच्छा देत विद्यार्थ्यांनी या संधीचा योग्य उपयोग करून घ्यावा, असे सांगितले. विभागप्रमुख डॉ. हरिहर कौसडीकर यांनी प्रास्ताविकात प्रशिक्षण आयोजनामागील उद्दिष्टे व त्याचे महत्त्व विशद केले.

यावेळी प्रशिक्षणार्थ्यांसाठी तयार करण्यात आलेल्या प्रात्यक्षिक पुस्तिकेचे विमोचन करण्यात आले.

कार्यक्रमास कृषि अभियांत्रिकी विभागप्रमुख डॉ. रावसाहेब भाग्यवंत तसेच शिक्षण प्रभारी डॉ. रणजीत चव्हाण यांचीही उपस्थिती होती. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. भाग्यरेषा गजभिये यांनी केले.

या प्रशिक्षण शिबिरासाठी विभागातील प्राध्यापक डॉ. अनिल धमक, डॉ. गणेश गायकवाड, डॉ. सुरेश वाईकर, डॉ. महेश देशमुख, डॉ. सुदाम शिराळे, डॉ. स्वाती झाडे, डॉ. पपिता गौरखेडे, डॉ. संतोष पिल्लेवाड, डॉ. स्नेहल शिलेवंत तसेच कर्मचारी श्री. भानुदास इंगोले, श्री. महेश देशमुख, श्री. रामप्रसाद जोंधळे, श्री. अमोल जोंधळे व श्री. सुदाम मोगल यांच्यासह आचार्य व पदव्युत्तर विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

या प्रशिक्षणासाठी ३० प्रशिक्षणार्थींनी नोंदणी केली असून, त्यांना प्रात्यक्षिकांच्या माध्यमातून मृदा परीक्षण व खतांचा योग्य वापर याबाबत कौशल्यविकासाचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे. कुशल मनुष्यबळाची निर्मिती हा या प्रशिक्षण शिबिराचा मुख्य उद्देश असून, शिबिर यशस्वी करण्यासाठी मृद विज्ञान विभागाचे अधिकारी, प्राध्यापक, विद्यार्थी व कर्मचारी प्रयत्नशील आहेत.