Tuesday, April 14, 2026

वनामकृवित भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३५ वी जयंती उत्साहात साजरी; विचारांचे वर्षभर आचरण करण्याचे माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांचे आवाहन

 




वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाच्या विद्यार्थी कल्याण अधिकारी कार्यालयाच्या वतीने महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३५ वी जयंती दिनांक १४ एप्रिल २०२६ रोजी उत्साहात साजरी करण्यात आली. कार्यक्रमाची सुरुवात तथागत भगवान गौतम बुद्ध, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांना माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांच्या हस्ते पुष्पांजली अर्पण, दीपप्रज्वलन व धूपार्पण करून करण्यात आली.

अध्यक्षस्थानी माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि होते. व्यासपीठावर शिक्षण संचालक डॉ. भगवान आसेवार, संशोधन संचालक डॉ. खिजर बेग, विस्तार शिक्षण संचालक डॉ. राकेश अहिरे, सहयोगी अधिष्ठाता डॉ. प्रविण वैद्य, डॉ. राजेश क्षीरसागर, डॉ. राहुल रामटेके, डॉ. गजेंद्र लोंढे, डॉ. विश्वनाथ खंदारे, विद्यार्थी कल्याण अधिकारी डॉ. राजेश कदम तसेच विद्यार्थी प्रतिनिधी वामन काळबांडे आदींची उपस्थिती होती.

अध्यक्षीय भाषणात माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांनी महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे एक महान व्यक्तिमत्त्व होते, असे नमूद केले. त्यांच्या जन्माच्या पार्श्वभूमीवर त्यांनी सांगितले की, १८५७ च्या स्वातंत्र्यलढ्यानंतर इंग्रजांच्या कठोर राजवटीखाली भारतीय जीवन अत्यंत कठीण झाले होते. १८६० ते १९०० या चाळीस वर्षांच्या कालावधीत भारतात अनेक थोर महापुरुषांचा जन्म झाला आणि त्याच काळात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचाही जन्म झाला. यावरून असे दिसून येते की, जेव्हा समाजाला पीडा होते, तेव्हा महान विभूतींचा जन्म होतो.

पूर्वी समाजात अनेक रूढी-परंपरा होत्या, ज्या अज्ञानाचे परिणाम होत्या. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी शिक्षणाच्या माध्यमातून हे अज्ञान दूर करून जनतेचे कल्याण साधले. त्यांनी “शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे” असे सांगून शिक्षणाचे महत्त्व अधोरेखित केले. त्यांनी स्वतः अत्यंत उच्च शिक्षण घेतले आणि “शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा” हा संदेश दिला.

भारतरत्न डॉ. आंबेडकर यांनी अनेक देशांच्या संविधानांचा अभ्यास करून भारतीय संविधानाची अतुलनीय निर्मिती केली. याशिवाय त्यांनी कृषी, अर्थव्यवस्था, जलसंधारण, शिक्षण, आरोग्य, दळणवळण, महिलांचे अधिकार, विषमता आणि अस्पृश्यता निर्मूलन अशा विविध क्षेत्रांत मोठे योगदान देत सामाजिक क्रांती घडवून आणली.

सध्याच्या युगात शाश्वत शेती आणि आत्मनिर्भरता यांना विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे, आणि या विचारांचे बीज भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनीच पेरले होते, असे त्यांनी नमूद केले. आज जगात अनेक ठिकाणी अशांतता असली तरी आपण शांततेत आहोत, याचे श्रेय महामानवांच्या विचारधारेवर चालणाऱ्या आपल्या समाजाला जाते, असेही त्यांनी सांगितले. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे कोणत्याही एका समाजापुरते मर्यादित नसून ते संपूर्ण राष्ट्राचा अभिमान आहेत, असे त्यांनी स्पष्ट केले.

तथागत भगवान बुद्धांचे शिक्षण संपूर्ण जगासाठी आदर्श आहे. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी बुद्धांच्या पंचशील तत्त्वांचा स्वीकार केला होता, आणि आपण सर्वांनीही त्यांचे आचरण करावे, असे आवाहन त्यांनी केले. थायलंड आणि जपान हे बौद्धधर्म स्वीकारलेले देश शांत आणि प्रगत राष्ट्रे आहेत, तसेच त्या देशांत भारतीयांना सन्मानाचे स्थान दिले जाते, असेही त्यांनी नमूद केले. शेवटी त्यांनी विद्यापीठात महामानवांच्या जयंती केवळ उत्सवापुरती मर्यादित न ठेवता त्यांच्या विचारांचे वर्षभर आचरण करावे, असे सांगून त्यांनी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केले.

शिक्षण संचालक डॉ. भगवान आसेवार यांनी महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी मानवाला माणूस म्हणून जगण्याचा अधिकार दिला, असे प्रतिपादन केले. पूर्वी समाजातील अनेकांचा आवाज दाबला जात होता; मात्र भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी त्या अन्यायाविरुद्ध उभे राहत परिवर्तन घडवून आणले आणि दडपलेला आवाज बुलंद केला. त्यांनी स्वतः अनेक संघर्ष सहन करत समाजसुधारणेसाठी कार्य केले व मानवाला माणूस म्हणून जगण्याची प्रतिष्ठा मिळवून दिली, असे गौरवोद्गार त्यांनी काढले. यासोबतच पंचशीलाचे अनुकरण करण्याचा सल्लाही त्यांनी दिला.

प्रस्ताविकात विद्यार्थी कल्याण अधिकारी डॉ. राजेश कदम यांनी कार्यक्रमाचे स्वरूप स्पष्ट करून महामानवांच्या विचारांचे आणि पंचशीलाचे आचरण जीवनात करावे, असे सांगितले.

याप्रसंगी डॉ. रामप्रसाद खंदारे यांनी याचना सादर केली, तर पूज्य भदंत मुदितनंद थेरो यांनी उपस्थितांना त्रिशरण पंचशीलाचे अनुग्रहण करून आशीर्वाद गाथा दिली. तसेच त्यांनी देश बळकट करण्यासाठी पंचशीलाच्या आचरणाचे महत्त्व स्पष्ट केले. पंचशीलाच्या आचरणातून विद्यापीठ, देश आणि संपूर्ण समाज प्रगल्भ होईल, असे त्यांनी नमूद केले. विद्यार्थ्यांनी व्यसनांपासून दूर राहावे, असा सल्लाही त्यांनी दिला.

कृषी महाविद्यालयातील ऋतुजा वारे विद्यार्थिनीने परखड शब्दांत व जोशपूर्ण भावनेत आपले मनोगत व्यक्त केले. या मनोगताने आणि लेझीम पथकाच्या सादरीकरणाने उपस्थितांची मने जिंकली.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कृषी महाविद्यालयाच्या आठव्या सत्रातील विद्यार्थी आशुतोष मदेवाड आणि वेदांत दापके यांनी केले, तर आभार क्रीडा अधिकारी डॉ. संघर्ष शृंगारे यांनी मानले.

यासोबतच विद्यापीठाच्या विविध महाविद्यालयांनी आपापल्या परिसरात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती उत्साहात साजरी केली.

कार्यक्रमाचा समारोप सायंकाळी ५ वाजता विद्यापीठातून काढण्यात आलेल्या भव्य मिरवणुकीने झाला. जयंती उत्सव यशस्वी करण्यासाठी डॉ. राजेश कदम यांच्या मार्गदर्शनाखाली विविध समित्यांनी समन्वय साधून उत्कृष्ट कार्य केले, तसेच विद्यापीठाच्या परभणी येथील कृषि महाविद्यालयाच्या विद्यार्थीस्तरीय समितीचे अध्यक्ष वामन काळपांडे, उपाध्यक्ष गोविंद दराडे, कोषाध्यक्ष सुमेध कांबळे, सचिव चंद्रशेखर खुनेवाड व इतर सदस्यांनी विशेष परिश्रम घेतले.