महान व्यक्तिमत्त्वांच्या आदर्शातून विद्यार्थ्यांनी घडवावा सर्वांगीण विकास : माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांचे मार्गदर्शन
भारतीय संविधानाचे शिल्पकार महामानव भारतरत्न डॉ.
बाबासाहेब आंबेडकर आणि क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त दिनांक
११ एप्रिल २०२६ रोजी वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाच्या वर्षा मुलींच्या
वस्तीगृहात सकाळी सहा वाजल्यापासून सलग १८ तास वाचन कार्यक्रमाचे उद्घाटन माननीय
कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांच्या हस्ते करण्यात आले. शिक्षण संचालक डॉ.
भगवान आसेवार तसेच वस्तीगृह अधीक्षिका डॉ. वीणा भालेराव यांची प्रमुख उपस्थितीत हा
कार्यक्रम उत्साहात पार पडला.
माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांनी
विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना या महान व्यक्तिमत्त्वांचे गुणवैशिष्ट्ये
अभ्यासून त्यांचे चांगले गुण आत्मसात करण्याचे आवाहन केले. त्यांनी सांगितले की, महामानव
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर दररोज १८ तास ज्ञानार्जन करत असत आणि त्यांना
वाचनाची विशेष आवड होती. ही बाब लक्षात घेऊन विद्यार्थ्यांनी परिश्रमपूर्वक
अधिकाधिक वेळ अभ्यास करून वैयक्तिक प्रगती साधावी, असे
त्यांनी नमूद केले.
तसेच महात्मा ज्योतिबा फुले व त्यांच्या अर्धांगिनी
सावित्रीबाई फुले यांच्या अथक परिश्रमांमुळेच शिक्षणाची दारे सर्वांसाठी खुली झाली
असून आज शिक्षण घराघरात पोहोचले आहे, असेही त्यांनी सांगितले. भारतरत्न
डॉ. बाबासाहेब आंबेडकर तसेच तथागत गौतम बुद्ध यांच्या विचारांचा आदर्श डोळ्यासमोर
ठेवून समता, बंधुता आणि सहिष्णुता या मूल्यांचा अवलंब विद्यार्थ्यांनी
आपल्या जीवनात करावा, असा संदेश त्यांनी दिला.
शिक्षण संचालक डॉ. भगवान आसेवार यांनी आपल्या मनोगतात
सांगितले की,
समाजातील खोटेपणा, भेदभाव, गरिबांचे शोषण आणि जातीयवाद दूर करण्यासाठी भारतरत्न डॉ. बाबासाहेब
आंबेडकर यांनी संपूर्ण आयुष्य वेचले आणि धर्मनिरपेक्षतेचा संदेश समाजाला दिला.
वस्तीगृह अधीक्षिका डॉ. वीणा भालेराव यांनी
विद्यार्थ्यांना आत्मसन्मान मिळवण्यासाठी उच्च शिक्षणाबरोबरच आवश्यक कौशल्ये
विकसित करण्यावर भर देण्याचे आवाहन केले.
कार्यक्रमाचे आयोजन वस्तीगृह अधीक्षिका डॉ. वीणा भालेराव, श्रीमती रेखा लाड, श्रीमती गंगा ढगे तसेच विद्यार्थी प्रतिनिधी वैष्णवी पंडित आणि ऋतुजा कदम यांच्या पुढाकाराने करण्यात आले.
