Sunday, June 21, 2026

योगाच्या माध्यमातून स्वस्थ शरीर, शांत मन आणि आनंदी जीवनाचा मार्ग अधिक सुलभ होतो.... माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि

 आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठात उत्साहात योग दिन साजरा


योग ही केवळ शारीरिक हालचालींची पद्धत नसून शरीर, मन आणि आत्मा यांना एकत्रित करणारी भारतीय संस्कृतीची प्राचीन जीवनशैली आहे. नियमित योगाभ्यासामुळे शरीर लवचिक, मजबूत आणि ऊर्जावान राहते. त्याचबरोबर मानसिक ताणतणाव, चिंता आणि नैराश्य कमी होऊन मन शांत व स्थिर राहण्यास मदत होते, असे प्रतिपादन वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाचे माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांनी केले. ते दिनांक २१ जून २०२६ रोजी आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात बोलत होते. विद्यापीठाच्या विद्यार्थी कल्याण अधिकारी कार्यालयाच्या वतीने राष्ट्रीय सेवा योजना अंतर्गत कृषि महाविद्यालयासमोरील प्रांगणात हा कार्यक्रम उत्साहात आयोजित करण्यात आला. भारत सरकारच्या आयुष मंत्रालयाने यंदाच्या आंतरराष्ट्रीय योग दिनासाठी दिलेल्या “Yoga for Healthy Ageing” (निरोगी वृद्धत्वासाठी योग) या संकल्पनेनुसार कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.

यावेळी पुढे बोलताना माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि म्हणाले की, दरवर्षी २१ जून रोजी जगभर आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा केला जातो. भारताच्या प्राचीन परंपरेचा अमूल्य वारसा असलेला योग आज संपूर्ण जगाने आरोग्यदायी आणि संतुलित जीवनशैलीचा प्रभावी मार्ग म्हणून स्वीकारला आहे. नियमित योगाभ्यासामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढते व विविध आजारांपासून संरक्षण मिळते. हृदयाचे आरोग्य सुधारण्यास, रक्तदाब नियंत्रणात ठेवण्यास तसेच जीवनशैलीशी संबंधित आजारांवर नियंत्रण मिळविण्यास योग अत्यंत उपयुक्त ठरतो. योगामुळे आध्यात्मिक विकास साधला जाऊन सकारात्मक ऊर्जा, मानसिक स्थैर्य आणि अंतरिक शांततेचा अनुभव मिळतो. निरोगी, समृद्ध आणि शांततामय जीवनासाठी नियमित योगाभ्यास अत्यावश्यक आहे.

आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या निमित्ताने प्रत्येक नागरिकाने योगाला आपल्या दैनंदिन जीवनाचा अविभाज्य भाग बनवून योग करा – निरोगी रहा” हा संदेश प्रत्यक्ष आचरणात आणावा. योगाच्या माध्यमातून स्वस्थ शरीर, शांत मन आणि आनंदी जीवनाचा मार्ग अधिक सुलभ होतो. त्यामुळे प्रत्येकाने नियमित योगाभ्यास करून निरोगी भारत घडविण्यास हातभार लावावा, असे आवाहन त्यांनी केले.

यावेळी शिक्षण संचालक डॉ. भगवान आसेवार यांनी योगाभ्यासाचे शारीरिक, मानसिक आणि बौद्धिक आरोग्यासाठी असलेले अनन्यसाधारण महत्त्व अधोरेखित करत, नियमित योगसाधना ही निरोगी, संतुलित आणि आनंदी जीवनाची गुरुकिल्ली असल्याचे सांगितले. तसेच सर्वांना निरोगी, सकारात्मक आणि तणावमुक्त जीवनासाठी शुभेच्छा दिल्या.

प्रास्ताविकात विद्यार्थी कल्याण अधिकारी डॉ. राजेश कदम यांनी आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या पार्श्वभूमीवर योगाचे शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक आरोग्यातील महत्त्व विशद केले. विद्यापीठामार्फत विद्यार्थी, कर्मचारी आणि समाजामध्ये योगाविषयी जनजागृती निर्माण करून निरोगी जीवनशैली रुजविण्यासाठी राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांची माहिती त्यांनी दिली.

या प्रसंगी माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि, शिक्षण संचालक डॉ. भगवान आसेवार, विस्तार शिक्षण संचालक डॉ. राकेश अहिरे, विद्यापीठ अभियंता श्री. दीपक कशाळकर, सहयोगी अधिष्ठाता डॉ. प्रविण वैद्य, डॉ. राजेश क्षीरसागर, डॉ. राहुल रामटेके, डॉ. नीता गायकवाड, विद्यार्थी कल्याण अधिकारी डॉ. राजेश कदम यांच्यासह विद्यापीठातील विभागप्रमुख, प्राध्यापक, अधिकारी, शास्त्रज्ञ, विद्यार्थी आणि राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते. सर्वांनी सामुदायिक स्वरूपात विविध योगासने व प्राणायामाचे प्रात्यक्षिक सादर केले.

याप्रसंगी परभणी येथील आर्ट ऑफ लिव्हिंगचे योगशिक्षक प्रा. दिवाकर जोशी व त्यांच्या पथकातील अर्चना घनवट, राजकुमार चव्हाण आणि संस्कृती गोंधळकर यांच्या मार्गदर्शनाखाली विविध योगासने व प्राणायामाचे सामुदायिक प्रात्यक्षिक करण्यात आले. यावेळी प्रा. दिवाकर जोशी यांनी मानवी जीवनात पृथ्वीप्रमाणेच आरोग्याचे मूलभूत महत्त्व अधोरेखित केले. शेवटी त्यांनी वंदना आणि शांतीपाठ घेतला.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. संघर्ष श्रंगारे यांनी केले, तर आभार प्रदर्शन विद्यार्थी कल्याण अधिकारी डॉ. राजेश कदम यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी विद्यार्थी कल्याण अधिकारी कार्यालयातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले.