Thursday, July 23, 2026

वनामकृविच्या परभणी कृषि महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजनेच्या वतीने वृक्षारोपण

 

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठांतर्गत कृषि महाविद्यालय, परभणी येथील राष्ट्रीय सेवा योजना (NSS) विभागाच्या वतीने दिनांक २३ जुलै २०२६ रोजी महाविद्यालय परिसरात भव्य वृक्षारोपण कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला.

कार्यक्रमाची सुरुवात शिक्षण संचालक डॉ. बाबासाहेब  ठोंबरे यांच्या हस्ते वृक्षारोपण करून करण्यात आली. या उपक्रमांतर्गत महाविद्यालय परिसरात विविध प्रजातींच्या १८० वृक्षांची लागवड करण्यात आली. पर्यावरण संवर्धन, जैवविविधतेचे संरक्षण आणि हरित परिसर निर्मितीचा संदेश देणाऱ्या या उपक्रमातून वृक्षारोपणाबरोबरच वृक्षसंवर्धनाची सामूहिक जबाबदारी अधोरेखित करण्यात आली.

यावेळी मार्गदर्शन करताना शिक्षण संचालक डॉ. बाबासाहेब  ठोंबरे यांनी "झाडे लावा, झाडे जगवा" हा संदेश देत प्रत्येकाने वृक्षांची लागवड करून त्यांचे संगोपन करण्याचा संकल्प करावा, असे आवाहन केले. तसेच कृषि महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. प्रवीण वैद्य यांनी महाविद्यालय परिसरात १,००० वृक्ष लागवडीचा संकल्प जाहीर केला असून, या वृक्षारोपण मोहिमेची सुरुवात या कार्यक्रमातून करण्यात आली.

यावेळी विविध विभागांचे विभागप्रमुख डॉ. राजेश कदम, डॉ. पुरुषोत्तम नेहरकर, डॉ. रावसाहेब भाग्यवंत, डॉ. प्रफुल घंटे, डॉ. हरिहर कौसडीकर, डॉ. किरण जाधव, पदव्युत्तर शिक्षण प्रभारी प्रा. मकरंद भोगावकर, पदवी शिक्षण प्रभारी डॉ. दिलीप झटे, डॉ. शंकर नरवाडे, डॉ. मिर्झा बेग, डॉ. सुरेश वाईकर, राष्ट्रीय छात्र सेना (NCC) अधिकारी डॉ. जय देशमुख, श्री. विजय गारकर, राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी डॉ. धीरज पात्रीकर व डॉ. फरिया खान, प्राध्यापक, कर्मचारी तसेच NSS व NCC चे स्वयंसेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी डॉ. धीरज पात्रीकर व डॉ. फरिया खान यांनी केले. हा उपक्रम पर्यावरण संरक्षणाबाबत जनजागृती निर्माण करण्याबरोबरच महाविद्यालय परिसर अधिक हिरवागार, स्वच्छ व पर्यावरणपूरक करण्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण ठरला.