वसंतराव नाईक
मराठवाडा कृषि विद्यापीठाच्या हिमायतबाग (छत्रपती संभाजीनगर) येथील फळ संशोधन
केंद्रास विद्यापीठाचे माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांनी दिनांक २७
ऑगस्ट २०२६ रोजी भेट देऊन केंद्रातील विविध संशोधन व विकासात्मक उपक्रमांचा आढावा
घेतला.
यावेळी केसर
आंबा गुणवत्ता केंद्रात नवीन ट्रॅक्टर व कृषि अवजारांचे माननीय कुलगुरू प्रा.
(डॉ.) इन्द्र मणि यांच्या शुभहस्ते पूजन करण्यात आले. आधुनिक कृषि यंत्रसामग्रीचा
वापर वाढवून फळपिकांमधील उत्पादनक्षमता,
कार्यक्षमता व गुणवत्ता सुधारण्याच्या दृष्टीने अशा सुविधांचे
महत्त्व असल्याचे यावेळी नमूद करण्यात आले.
माननीय कुलगुरूंनी
फळ संशोधन केंद्रातील विविध प्रक्षेत्रे,
संरक्षित शेतीविषयक सुविधा तसेच संशोधनासाठी उपलब्ध असलेल्या
पायाभूत सुविधांची पाहणी केली. केंद्रामार्फत सुरू असलेल्या संशोधन कार्याची
माहिती घेत त्यांनी शेतकऱ्यांना उपयुक्त ठरणारे तंत्रज्ञान विकसित करून त्याचा
प्रभावी प्रसार करण्यावर भर देण्याचे निर्देश दिले.
दरम्यान, विद्यापीठाचे संशोधन संचालक डॉ. भगवान आसेवार यांनीही
फळ संशोधन केंद्रास भेट देऊन केंद्रातील संशोधन कार्याचा आढावा घेतला. विविध
फळपिकांवरील संशोधन, तंत्रज्ञान विकास, प्रक्षेत्रावरील उपक्रम आणि भविष्यातील संशोधनाच्या दिशा याबाबत त्यांनी
संबंधित अधिकाऱ्यांकडून माहिती घेतली. यावेळी फळ संशोधन केंद्राचे प्रभारी अधिकारी
डॉ. संजय पाटील तसेच केंद्रातील सर्व अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.


