Wednesday, October 14, 2026

बीड जिल्ह्यातील पाणी फाउंडेशनच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांची वनामकृविच्या मृद विज्ञान विभागास भेट

 मृदा आरोग्य संवर्धन, मृदा परीक्षण आणि सेंद्रिय निविष्ठांच्या वापराबाबत शास्त्रीय मार्गदर्शन



वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी येथील मृद विज्ञान व कृषि रसायनशास्त्र विभागास बीड जिल्ह्यातील पाणी फाउंडेशन उपक्रमाच्या ३० अधिकारी व कर्मचाऱ्यांनी दिनांक १४ ऑक्टोबर २०२६ रोजी भेट देऊन मृदा आरोग्य संवर्धन, मृदा परीक्षण, जैविक व सेंद्रिय खतांचा वापर तसेच रासायनिक खतांच्या संतुलित वापराबाबत शास्त्रीय माहिती जाणून घेतली.

या भेटीदरम्यान माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांच्या मार्गदर्शनाखाली विभागात राबविण्यात येत असलेल्या विविध उपक्रमांची माहिती देण्यात आली. शिक्षण संचालक डॉ. बाबासाहेब ठोंबरे यांनी उपस्थित अधिकारी व कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन केले. तसेच अधिष्ठाता डॉ. प्रवीण वैद्य यांनी तळ्यातील गाळाचा जमिनीच्या पुनर्जीवनासाठी शास्त्रीय पद्धतीने उपयोग करण्याबाबत सविस्तर माहिती दिली.

प्रारंभी विभागप्रमुख डॉ. हरिहर कौसडीकर यांनी विभागातील माहिती दिली. तसेच त्यांनी मृदा परीक्षणाच्या आधारे खत व्यवस्थापनाचे नियोजन, जैविक व सेंद्रिय खतांचा प्रभावी वापर आणि रासायनिक खतांचा संतुलित व मर्यादित वापर यांचे महत्त्व विशद केले. जमिनीची सुपीकता व आरोग्य टिकवून ठेवतानाच उत्पादन खर्च कमी करणे आणि पिकांची उत्पादकता वाढविणे यासाठी शास्त्रीय दृष्टिकोनातून खतांचा वापर करणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. यापुढे मृदा परीक्षण केल्याशिवाय रासायनिक खतांचा वापर करू नये, असे आवाहनही त्यांनी केले.

या भेटीदरम्यान पाणी फाउंडेशनच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी विभागातील केंद्रीय मृदा परीक्षण प्रयोगशाळा, गांडूळ खत निर्मिती प्रकल्प आणि जैविक खते निर्मिती प्रकल्पास भेट दिली. यावेळी माती व पाणी परीक्षणाचे महत्त्व, गांडूळ खत निर्मिती, जैविक खतांचा वापर आणि शेतीमध्ये सेंद्रिय निविष्ठांचा वापर वाढविण्याच्या विविध पद्धतींबाबत प्रात्यक्षिकांसह माहिती देण्यात आली. जैविक खत प्रयोगशाळेच्या प्रमुख डॉ. भाग्यरेषा गजभिये आणि डॉ. स्नेहल शिलेवंत यांची यावेळी उपस्थिती होती.

पाणी फाउंडेशनच्या क्षेत्रीय पथकातील बहुतांश अधिकारी व कर्मचारी कृषि पदवीधर असल्याने त्यांनी विभागातील तांत्रिक माहिती शास्त्रीय दृष्टिकोनातून जाणून घेतली. आपल्या कार्यक्षेत्रातील शेतकरी उत्पादक गट व शेतकरी उत्पादक कंपन्यांशी संबंधित शेतकऱ्यांसाठी विद्यापीठामार्फत विशेष प्रशिक्षण आयोजित करावे, अशी विनंती त्यांनी केली.

यावर डॉ. कौसडीकर यांनी संबंधित शेतकरी उत्पादक गट आणि शेतकऱ्यांनी विद्यापीठाच्या संपर्कात राहून कृषि तंत्रज्ञान व निविष्ठांबाबत प्रशिक्षण घ्यावे, असे आवाहन केले. शेतकरी गटांच्या माध्यमातून सेंद्रिय व जैविक निविष्ठांच्या उत्पादनाचे छोटे-छोटे उपक्रम तालुकानिहाय सुरू केल्यास स्थानिक पातळीवर शाश्वत शेतीला चालना मिळू शकते, असे त्यांनी नमूद केले. कृषि निविष्ठा आणि विभागातील विविध उपक्रमांशी संबंधित अधिकाऱ्यांचे संपर्क क्रमांकही पाणी फाउंडेशनच्या प्रतिनिधींना उपलब्ध करून देण्यात आले.

या भेटीमुळे विद्यापीठातील कृषि संशोधन व तंत्रज्ञान शेतकरी उत्पादक गटांपर्यंत पोहोचविण्यास, मृदा आरोग्याबाबत जागरूकता वाढविण्यास आणि शाश्वत शेतीच्या उपक्रमांना चालना देण्यास मदत होणार आहे.

पाणी फाउंडेशनच्या पथकात विभागीय समन्वयक संतोष शिनगारे यांच्यासह क्षेत्रीय पथकातील विनोद ठोंबरे, महेश गुळभिले, नितीन पाटोळे, हरीशचंद्र पांचाळ, विशाल कारंडे, विशाल घोलप, भागवत कोटकर, अनिल राठोड, शुभम देशमुख, वैष्णवी मस्के, ऋतुजा करे, अक्षय वानखेडे, योगीराज राठोड, सरिता आणि सुवर्णा कांबळे यांचा समावेश होता.