Monday, June 6, 2016

वळवाचा पाऊसामुळे हुमणी किडीचे व्‍यवस्‍थापन करणे गरजेचे

वनामकृविच्‍या किटकशास्‍त्रज्ञांचे आवाहन
सध्या मराठवाडयामध्ये सर्व जिल्हामध्ये वळवाचा पाऊस होत असुन हुमणी किडीचे सुप्त्‍ा अवस्थेतील भुंगे जमिनीतुन बाहेर पडत आहे. हुमणीच्या प्रौढ, अंडी, अळी व कोष या चार अवस्था असतात. प्रौढ अवस्था ही बाभुळ, कडुलिंब, बोर ई. झाडावर उपजिविका करतात. तर अळी अवस्था पिकांच्या मुळा कुडतूडुन नुकसान करते. प्रौढ भुंगेरे जमिनीतुन निघाल्यानंतर ते बाभुळ, कडुलिंब, बोर ई. झाडावर राहतात व त्यांचे मिलन होऊन जमिनीत अंडी देतात. व अंडयातून निघालेल्या अळया पिकानां नुकसान पोहचवितात. त्यामुळे सध्या जमिनीतुन निघालेल्या हुमणीच्या प्रौढ भुंगेऱ्याचे वेळीच व्यवस्थापन करणे गरजेचे आहे. प्रौढ भुंगेऱ्याचे व्यवस्थापन अंडी घालण्याअगोदरच झाल्यामुळे अंळी पासून पिकांना होणारे नुकसान टाळता येते. 
प्रौढ भुंगेऱ्याचे व्यवस्थापन
§  झाडाच्या फांदया हालवून खाली पडलेल्या भुंगेऱ्याचा बंदोबस्त करावा. मार्च ते जून महिन्‍यात चांगला पाऊस पडताच सुर्यास्तानंतर सुप्तावस्थेतील प्रौढ भुंगेरे जमिनीतून बाहेर येऊन बाभूळ, कडुलिंब इत्यादी झाडावर पाने खाण्यासाठी व मिलनासाठी जमा होतात. झाडावर जमा झालेली भुंगेरे रात्री 8 ते 9 वाजता बांबुच्या काठीच्या साहाय्याने झाडाच्या फांदया हालवून खाली पाडावेत आणि ते हाताने गोळा करुन रॉकेलमिश्रीत पाण्यात टाकून त्यांचा नाश करावा. हा उपाय प्रादुर्भावग्रस्त क्षेत्रातील सर्व शेतकऱ्यांनी सामुदायिकरित्या करणे गरजेचे आहे. तसेच जो पर्यंत जमिनीतून भुंगेरे निघतात तोपर्यंत हा कार्यक्रम चालू ठेवणे गरजेचे आहे.
§  प्रकाश सापळे किंवा पेट्रोमॅक्साचा वापर करुनदेखील प्रौढ भुंगेरे जमा करता येतात. हे प्रकाश सापळे किंवा पेट्रोमॅक्स सर्व शेतकऱ्यांनी शेतामधील घर, झोपडी, विहीरीजवळ किंवा झाडावर लावावेत. सापळयात जमा झालेले भुंगेरे नष्ट करावेत. हे सापळे साधारणपणे संध्याकाळी 7.30 ते 8.30 या कालावधीत लावावेत.
§  किटकनाशकांची फवारणी केलेल्या बाभूळ, कडुनिंब यांच्या फांदया शेतामध्ये ठिकठिकाणी ठेवावी. रात्रीला भुंगेरे फांदयावरील पाने खाल्यामुळे करुन जातील.
§  जमिनीतून प्रौढ भुंगेरे निघण्याच्या कालावधीत बाभूळ, कडुनिंब, इत्यादी झाडावर किटकनाशकाची फवारणी करावी.

वरिल प्रमाणे शेतकऱ्यांनी हुमणीच्या प्रौढ भुंगेऱ्याचे सामूहीकरित्या व्यवस्थापन करणे गरजेचे आहे, असे आवाहन विस्‍तार शिक्षण संचालक डॉ. बी. बी. भोसले, किटकशास्‍त्रज्ञ डॉ. पी. आर. झंवर व प्रा. बी. व्ही. भेदे यांनी केले आहे.

रुंद वरंबा - सरी पद्धतीने सोयाबीन लागवड करताना लक्षात घ्यावयाच्या विविध गोष्टी

वनामकृविच्‍या कृषि अभियंताचे मार्गदर्शन

गतवर्षी मराठवाडयातील अनेक शेतक-यांनी सोयाबीनच्‍या अधिक उत्‍पादनासाठी रुंद वरंबा - सरी पद्धतीचा अवलंब करून सोयाबीन लागवड केली परंतु लागवड करतांना अनेक समस्‍याना तोंड द्यावे लागेल, वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील कृषी अभियंता प्रा भुईभार व प्रा टेकाळे यांनी सदरिल पध्‍दतीने लागवड करतांना कोणत्‍या गोष्‍टी लक्षात घ्‍याव्‍यात याबाबत पुढील मुद्दे शेतक-यांना उपयुक्‍त आहेत.



१) रुंद वरंबा - सरी लागवड अवजारामध्ये ३० ते ४५ सें. मी. अंतराच्या बदलासह चार फण आणि ३० ते ६० सें. मी. रुंदीच्या सरीच्या बदलासह १५० ते १८० सें. मी. अंतरावर दोन सरीचे फाळ देण्यात आलेले असतात. रुंद वरंब्यावर ४५ सें. मी. अंतराच्या चार ओळीकरिता १३५ सें. मी. अंतराची आवश्यकता असते. अशा परिस्थितीत सरीचा फाळ ४५ सें. मी. रुंदीच्या सरीकरिता बदल केलेला असल्यास कडेच्या ओळींच्या बाजूला वरंबा निर्माण होणार नाही. तसेच, फाळांची रचना कदाचित ४५ सें. मी. पेक्षा जास्त झालेली असल्यास किंवा फणाचा व फाळांचा, अवजाराच्या रुंदीवर योग्य मध्य साधलेला नसल्यास, पेरणी दरम्यान वरंबा अपुऱ्या रुंदीचा निर्माण होतो. बियाणे भूपृष्ठावर अथवा कमी खोलीवर पडते. कमी ओलाव्याच्या स्थितीत अशा प्रकारे पडलेल्या बियाण्यांची उगवण होत नाही. रोपांची संख्या अपुरी राहते. म्हणून अशा रचनेच्या पेरणी करिता, सरीच्या फाळांची न्यूनतम (३० सें. मी.) रुंदीची सरी पाडण्याच्या दृष्टीने बदल करावा. 

२) रुंद वरंब्यावर ३० सें. मी. अंतरावरील पिकाच्या चार ओळीं करिता अवजाराच्या सरीच्या दोन्ही फाळांमधील अंतर १५० सें. मी. ठेवावे. यामुळे पेरणी दरम्यान, वरंब्यावर बियाणे योग्य खोलीवर पडेल. कडेच्या ओळीच्या बाजूला ७.५ सें. मी. चा वरंबा राहील, तसेच सरीची रुंदी ४५ सें. मी. राहील. अशा प्रकारच्या रचनेमध्ये ६० सें. मी. रुंदीच्या सरीच्या तुलनेत, अनुत्पादित जागेचे प्रमाणकमी राहील. (आकृती - १). 

३) सोयाबीन - तूर आंतरपीक पद्धती करिता रुंद वरंबा - सरी अवजाराच्या, चार फणांपैकी कडेचे फण सोडून, कोणत्याही एका फणाद्वारे तुरीसारख्या आंतरपिकाची पेरणी करणे साध्य होईल. याकरिता आंतरपिकाकरिता ठरविलेल्या बियाण्याच्या कप्प्यातील, बियाणे वितरण चकती, निवड केलेल्या आंतरपिकाशी संबंधित वापरावी. 

४) रुंद वरंबा - सरी लागवड पद्धतीमध्ये, ओळीमधील अंतराच्या तुलनेत, सरीकरिता जरीथोडे-अधिक क्षेत्र व्यापत असते, तरी या अधिकच्या मोकळ्या क्षेत्राचा, वरंब्यावरील कडेच्या दोन ओळीतील पिकांवर अनुकूल परिणाम होतो. पर्यायाने एकूण उत्पादनात वाढ होते. 

५) रुंद वरंबा - सरी लागवडपद्धतीमध्ये सरीने व्यापलेल्या क्षेत्रात, सरी कायम राखण्याच्या दृष्टीने आंतर मशागत करण्यात येत नसल्यामुळे तणांचा प्रादुर्भाव होतो. याकरिता, पारंपारिक क्षेत्राप्रमाणे, सर्व क्षेत्रावर समसमान आंतरमशागत करून, बैलाच्या कोळप्याच्या साह्याने सरी पुनर्निर्माण करण्यात यावी. ट्रॅक्टरचलित रुंद वरंबा - सरी लागवड अवजाराच्या फणावर आंतरमशागतीचे घटक बसवून आंतरमशागत केल्यास आंतरमशागती बरोबरच, सरी पुनर्निर्माण करण्याचे कार्यही होते. परंतु, ट्रॅक्टरच्या साह्याने आंतरमशागत ही पेरणीनंतर जास्तीत जास्त एक महिन्याच्या आत करावी. 

६) रुंद वरंबा - सरी लागवड अवजारामध्ये या पद्धतीच्या गरजेनुसार फणांची व सरीच्या फाळांचीसंख्या वाढविणे उपयुक्त होणार नाही. काही अपरिहार्य परिस्थितीत किंवा आंतरपीक पद्धतीच्या गरजेनुसार फळांची संख्या वाढविणे आवश्यक असल्यास प्रचलित रुंद वरंबा - सरी लागवड अवजाराच्या एका बाजूचा सरीचा फाळ काढून, दोन फेरीमध्ये आठ ओळींची पेरणी करणे साध्य होईल. याकरिता अवजाराच्या सरीचाएक फाळ व चार फणांच्या रचनेसह, अवजारांच्या घटकांना लागणाऱ्या शक्तीनुसार ट्रॅक्टरचा जोडणी - मध्य साधून उपयोग करावा. 

७) कमी ओलाव्याच्या स्थितीत रुंद वरंबा - सरी लागवड अवजाराच्या साह्याने पेरणी करताना, अवजारामध्ये पेरणीमागे मातीने बियाणे झाकण्याच्या दृष्टीने लोखंडीपास, लोखंडी साखळी अथवा लोखंडी दांड्याचा उपयोग करावा. 

८) शेतीच्या विविध कामांकरिता ४५ ते ५० अश्वशक्तीच्या ट्रॅक्टरचा वापर प्रचलित आहे. अशा ट्रॅक्टरांना विविध शेती कामानुसार इंधनाची कमी / अधिक मात्रालागते. रुंद वरंबा - सरी लागवड अवजाराच्या वापराकरिता अशा ट्रॅक्टराचा वापर अकार्यक्षम होणार नाही. 

९) रुंद वरंबा - सरी लागवड अवजाराच्या वापर करताना अवजाराच्या बियाणे वितरित करण्याच्या व्यवस्थेच्या प्लॅस्टिकच्या चकत्या, गिअर्स तुटण्याने, अवजार निकामी होऊन, पेरणीस अडथळा निर्माण होतो. स्थानिक बाजारातून अशा प्रकारच्या घटकांचा एखादा संच संग्रही असवा. यामध्ये, विविध पिकांच्या गरजेनुसार लागणाऱ्या बियाणे चकत्या असाव्यात.


१०) लागवड करताना जमिनीची मशागत, रुंद वरंब्याचे अंतर आणि अवजाराची योग्य मांडणी लक्षात घेतल्याने योग्य पद्धतीने पेरणी होऊन अपेक्षित उत्पादन मिळेल.




सौजन्‍य
कृषि अभियंता प्रा. भुईभार- ७५८८५७१५४५
कृषि अभियंता प्रा. टेकाळे -७५८८०८२८६७

Saturday, June 4, 2016

माती परिक्षणासाठी सरसावल्या मौजे जवळा जिवाजी गावाच्‍या महीला

वनामकृवितील मृदविज्ञान विभाग अभिनव उपक्रम
वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील मृदविज्ञान विभागाच्‍या फिरती माती परीक्षण प्रयोगशाळेव्दारे सेलु तालुक्‍यातील मौजे जवळा जिवाजी येथे दिनांक ३० मे रोजी माती परीक्षण शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. सदरिल शिबीर मृदविज्ञान व कृषि रसायनशास्‍त्र विभाग, बास्को ग्रामीण विकास केंद्र सेलु, जिवाजी महाराज बचत गट, जय हुनमान बचत गट, रमाबाई बचत गट, श्री निवास बचत गट आदी महिला बचत गटाच्‍या सहकार्याने राबविण्‍यात आले. शि‍बिरात परिसरातील ७० महिला शेतकरी भगीनींनी सहभाग नोंदवुन मातीचे नमुणे गोळा करुन माती परिक्षणासाठी सादर केले. 
    शिबिरात विभाग प्रमुख डॉ व्ही. डी. पाटील यांनी संतुलीत पीक पोषणासाठी माती परिक्षणाचे महत्व या विषयी मार्गदर्शन करून महीलांनी माती परिक्षण शिबीर घेण्याचा निर्णय घेऊन पुर्णत्वासनेल्या बददल महीलांचे कौतुक केले. मृदाशास्त्रज्ञ डॉ अनिल धमक यांनी माती परिक्षण अहवालानुसार खताच्या शिफारसीबाबत तर मृदाशास्त्रज्ञ डॉ पपिता गौरखेडे यांनी माती परिक्षण व पिक व्यवस्थापनावर मार्गदर्शन केले. याप्रसंगी सरपंच अशोक खरात, ज्योती सदाशीवराव समेळ, सिमा विजय वानरे आदीसह शेतकरी मोठया संख्‍येने उपस्थित होते. शिबीराच्‍या यशस्वीतेसाठी डॉ. सदाशिव अडकीणे, शेख साजीद, पदव्युत्तर विद्यार्थी व गावातील ग्रामस्थ यांनी परिश्रम घेतले.

Thursday, June 2, 2016

वनामकृविचे बाभुळगाव येथे कुपनलिका पुनर्भरण प्रात्‍यक्षिक

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातंर्गत असलेल्‍या अखिल भारतीय समन्‍वयीत कोरडवाहु शेती संशोधन प्रकल्‍पामार्फत परभणी तालुक्‍यातील मौजे बाभुळगाव येथे शेतक-यांच्‍या शेतावर हवामान बदलानुरूप राष्‍ट्रीय कृषि उपक्रम मागील तीन वर्षापासुन राबविण्‍यात येत आहे. या संशोधन केंद्राद्वारे कुप‍नलिका पुनर्भरण तंत्रज्ञान विकसीत केले असुन हे तंत्रज्ञान बाभुळगाव येथील ५ शेतक-यांच्‍या शेतावर शेतक-यांच्‍या सहभागातुन राबविण्‍यात येत आहे. या कुपनलिका पुनर्भरण कार्यक्रमाचा शुभारंभ दि. १ जुन रोजी मुख्‍यशास्‍त्रज्ञ डॉ. भगवान आसेवार व सरपंच पारधे यांच्‍या हस्‍ते करण्‍यात आला. यावेळी कुपनलिका पुनर्भरणाचे महत्‍व कृषि अभियंता प्रा. मदन पेंडके यांनी सागितले, कार्यक्रमास बाभुळगाव येथील शेतकरी व ग्रामस्‍त मोठया संख्‍येने उपस्थित होते. तसेच याप्रसंगी खरीप पुर्व नियोजन बैठकीचे आयोजन करण्‍यात येऊन येणा-या खरीप हंगामामध्‍ये संशोधनात्‍मक पिक प्रात्‍यक्षिक घेण्‍याकरीता सर्वानुमते शेतक-यांची निवड करून सदरिल शेतक-यांच्‍या यादीस सर्वांनी अनुमती दिली. सदरील कार्यक्रमास संशोधन केंद्राचे डॉ. गणेश गायकवाड, माणिक समिद्रे, अभिजीत कदम, प्रगतशील शेतकरी ज्ञानेश्‍वर पारधे, गिरीष पारधे, दळवे प्रसाद, दळवे विठल, विकास साखरे हे उपस्‍थीत होते. 
   मागील वर्षी विद्यापीठाने बाभुळगाव येथील १० शेतक-यांच्‍या शेतावर विहीर पुनर्भरण कार्यक्रम रा‍बविला होता व सदरिल विहीरींना कमी पावसात देखील मुबलक पाणी उपलब्‍ध झाले. नुकतेच या विहीर पुनर्भरण उपक्रमास परभणीचे पालक सचिव मा. श्री. एस. एस. संधु तसेच निवासी उपजिल्‍हाधिकारी श्री. अभिमंन्‍यु बोधवड, उप विभागीय अधिकारी सुभाष शिंदे, तहसीलदार संतोष रूईकर, जिल्‍हा अधिक्षक कृषि अधिकारी एस. के. दिवेकर यांनी भेट देऊन उपक्रमाची पाहणी केली.

Monday, May 30, 2016

गृहविज्ञान महाविद्यालयात पालक कार्यशाळा संपन्‍न



टिप : सदरिल बातमी प्राचार्य, गृहविज्ञान महाविद्यालय, वनामकृवि, परभणी यांच्‍या कडुन प्राप्‍त

Thursday, May 19, 2016

शेतक-यांसाठी कार्य करतांना कृषी पदवीधरांनी अभिमान बाळगावा.....मा. डॉ. गुरबचन सिंह

वनामकृवित आयोजीत विशेष व्‍याख्‍यान कार्यक्रमात मा. डॉ. गुरबचन सिंह यांनी केले कृषी पदव्‍युत्‍तर विद्यार्थ्‍यांना मार्गदर्शन



सकल राष्‍ट्रीय उत्‍पादनात कृषी क्षेत्राचा वाटा केवळ १४ टक्के असुन देशाची ५० टक्के पेक्षा जास्‍त लोकसंख्‍या कृषी क्षेत्रावर अवलंबुन आहे. देशाच्‍या आर्थिक विकासासाठी कृषी विकासाशिवाय पर्याय नाही. कृषी पद्वीधरांनी विविध क्षेत्रात कार्य करतांना शेतक-यांसाठी कार्य करावे, शेतक-यांची सेवा करण्‍याची संधी आपणास प्राप्‍त झाली याबाबत रास्‍त अभिमान बाळगावा, असे प्रतिपादन नवी दिल्‍ली येथील कृषी शास्‍त्रज्ञ निवड मंडळाचे अध्‍यक्ष तथा भारतीय कृषी विद्या संस्‍थेचे अध्‍यक्ष मा. डॉ. गुरबचन सिंह यांनी केले. वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील कृषी विद्या विभाग व भारतीय कृषीविद्या संस्‍था शाखा परभणी यांच्‍या संयुक्‍त विद्यमाने दिनांक १९ मे रोजी आयोजीत कार्यक्रमात पदव्‍युत्‍तर विद्यार्थ्‍यांना मार्गदर्शन करतांना ते बोलत होते. कार्यक्रमाच्‍या अध्‍यक्षस्‍थानी शिक्षण संचालक डॉ. अशोक ढवण हे होते तर संशोधन संचालक डॉ. दत्‍तप्रसाद वासकर, विस्‍तार शिक्षण संचालक डॉ. बी. बी. भोसले, प्राचार्य डॉ. डि एन गोखले, डॉ. बी. व्‍ही. आसेवार यांची व्‍यासपीठावर प्रमुख उपस्थिती होती.
मा. डॉ. गुरबचन सिंह पुढे म्‍हणाले की, कृ‍षी पदवीधरांना केंद्र व राज्‍य शासनात अनेक नौकरीच्या संधीसोबतच बॅकिंग क्षेत्र, खाजगी कंपन्‍यातही मोठया संधी उपलब्‍ध आहेत. कृषी पदवीधर स्‍वत:चा कृषी व्‍यवसाय सुरू करून अनेकांना रोजगारही देऊ शकतात, असे मत त्‍यांनी यावेळी व्‍यक्‍त केले. याप्रसंगी देशापातळीवरील कृषि शास्‍त्रज्ञ निवड प्रक्रियाची माहिती देऊन विद्यार्थ्‍यांना मार्गदर्शन केले.
अध्‍यक्षीय समारोपात शिक्षण संचालक डॉ. अशोक ढवण म्‍हणाले की, कृषी क्षेत्र वैविध्यपूर्ण क्षेत्र असुन विविध प्रकाराची पीके, पशु आदींवर काम करणा-यां अनेक संशोधन केंद्र व संस्‍था देशात व राज्‍यात कार्यरत आहेत, तेथे काम करण्‍याची मोठी संधी कृ‍षी पदवीधरांना आहेत. महाराष्‍ट्रातील कृषी पदवीधर संवाद कौशल्‍यात कमी पडतो, त्‍यामुळे देशापातळीवरील अनेक संधीपासुन तो वंचीत राहतो.  

कार्यक्रमात प्राचार्य डॉ. डि एन गोखले यांची भारतीय कृषि विद्या संस्थेच्‍या सल्‍लागार मंडळावर सदस्‍य म्‍हणुन निवडी झाल्‍याबद्दल मान्‍यवरांच्‍या हस्‍ते सत्‍कार करण्‍यात आला. कार्यक्रमाचे प्रास्‍ताविक प्राचार्य डॉ डि एन गोखले यांनी केले. सुत्रसंचालन डॉ. ए. एस. कार्ले यांनी तर आभार प्रदर्शन डॉ. मेधा सुर्यवंशी यांनी केले. कार्यक्रमास विविध महा‍विद्यालयाचे प्राचार्य, विभाग प्रमुख, विद्यापीठातील अधिकारी, कर्मचारी व विद्यार्थ्‍यी मोठया संख्‍येने उपस्थित होते.