Thursday, September 16, 2021

शेतकरी बांधवानी आधुनिक कृषि तंत्रज्ञानाची कास धरावी..... मा आमदार डॉ राहुल पाटील

वनामकृविच्‍या वतीने आयोजित मौजे पिंगळी येथील शेतकरी मेळाव्‍यात प्रतिपादन 

परभणी कृषि विद्यापीठाने संशोधनाच्‍या आधारे विविध पिकांचे वाण निर्माण केले असुन पिकांवरील कीड व रोग व्‍यवस्‍थापनातही अनेक तंत्रज्ञान विकसित केले आहे. शेतकरी बांधवानी आधुनिक कृषि तंत्रज्ञानाची कास धरावी, त्‍याशिवाय तरणोपाय नाही, असे प्रतिपादन परभणीचे माननीय आमदार तथा विद्यापीठ कार्यकारी परिषदेचे सदस्‍य मा डॉ राहुल पाटील यांनी केले.

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील परभणी कृषि महाविद्यालय आणि रेशीम संशोधन केंद्र यांच्‍या संयुक्‍त विद्यमाने ग्रामीण जागरूकता कार्यानुभव कार्यक्रम (रावे) अंतर्गत दिनांक १६ सप्‍टेंबर रोजी शेतकरी मेळाव्‍याचे आयोजन करण्‍यात आले होते, त्‍या मेळाव्‍याच्‍या उदघाटन प्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमास पंचायत समिती सभापती श्री भानुदासराव डुबे, श्री रविंद्र पतंगे देशमुख, किटकशास्‍त्र विभागाचे प्रमुख डॉ संजीव बंटेवाड, कृषी विद्यावेत्‍ता डॉ गजानन गडदे, तालुका कृषि अधिकारी श्री प्रभाकर बनसावडे, रेशीम संशोधन केंद्राचे प्रभारी अधिकारी डॉ चंद्रकांत लटपटे, सरपंच सौ सविताताई डिगांबर गरूड, तंटामुक्‍ती समिती अध्‍यक्ष श्री अजित गरूड, श्री काशीनाथ गरूड, रावे कार्यक्रम अधिकारी डॉ अनंत लाड, जिल्‍हा परिषद सदस्‍य श्री संभाजी लोखंडे, श्री नारायण गरूड, श्री संजय गरूड, तलाठी श्री भारत नखाते, कृषी मंडळ अधिकारी विजय संघई आदींची प्रमुख उपस्थिती होती.

मा आमदार डॉ राहुल पाटील पुढे म्‍हणाले की, आज कृषि शिक्षणात मुलींचे प्रमाण वाढत आहेत, समाजात मुलींना समान दर्जा प्राप्‍त होत आहे, मुलीमध्‍ये आत्‍मविश्‍वास वाढत आहे, ही चांगली बाब आहे. आमदार आपल्‍या दारी कार्यक्रमाच्‍या माध्‍यमातुन शासनाच्‍या विविध योजना सर्वसामान्‍य पर्यंत पोहचविण्‍यात येत आहेत.   

याप्रसंगी श्री रविंद्र पतंगे देशमुख म्‍हणाले की, ग्रामीण जागृकता कार्यानुभव कार्यक्रमातुनच चांगले कृषि पदवीधर घडतात, शेतीतील विविध तंत्रज्ञानाची प्रत्‍यक्ष माहिती कृषिच्‍या विद्यार्थ्‍यांना होते.

मा आमदार डॉ राहुल पाटील यांच्‍या हस्‍ते गुलाबी बोंडअळीच्‍या प्रभावी व्‍यवस्‍थापनासाठी कामगंध सापळयांचे कापुस उत्‍पादक शेतक-यांना वाटप करण्‍यात आले. मेळाव्‍यात तुर व हरभरावरील किड व्‍यवस्‍थापनावर डॉ संजीव बंटेवाड यांनी मार्गदर्शन केले, रबी पिकांची लागवड यावर डॉ गजानन गडदे, रेशीम किटक संगोपन यावर डॉ चंद्रकांत लटपटे, कापसावरील गुलाबी बोंडअळी यावर डॉ अनंत लाड, ई पीक पाहणी अॅप बाबत श्री प्रभाकर बनसावडे आदींनी मार्गदर्शन केले.

मेळाव्‍याचे आयोजन प्राचार्य डॉ सय्यद ईस्‍माईल, रावे समन्‍वयक डॉ व्‍ही बी कांबळे, सहसमन्‍वयक डॉ आर पी कदम यांच्‍या मार्गदर्शनाखाली कार्यक्रम अधिकारी डॉ अनंत लाड, कृषिकन्‍या सायली गायकवाड, ऋतुजा सामाले, गायत्री वाघ, वर्षा रेंगे, ज्‍योती ठाकरे आदींनी केले. कार्यक्रमास कृषि अधिकारी श्रीमती स्‍वाती घोडके, कृषि सहाय्यक श्री खिल्‍लारे, श्रीमती वंदना बेदरे, नामदेव गरूड, काशिनाथ बापु, लक्ष्‍मणराव गरूड, बालासाहेब गरूड, विजयराव गरूड, रामुआबा गरूड आदीसह परिसरातील शेतकरी उपस्थित होते.

Tuesday, September 14, 2021

वनामकृविच्‍या वतीने ऑनलाईन रबी शेतकरी मेळाव्‍याचे आयोजन

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील विस्‍तार शिक्षण संचालनालय व कृषि विभाग (महाराष्‍ट्र राज्‍य) यांचे संयुक्‍त विद्यमाने मराठवाडा मुक्‍ती संग्राम दिनानिमित्‍त दिनांक १७ सप्‍टेंबर रोजी सकाळी ११.०० वाजता ऑनलाईन रबी शेत‍करी मेळाव्‍याचे आयोजन करण्‍यात आले असुन मेळाव्‍याचे उदघाटक म्‍हणुन राहुरी येथील महात्‍मा फुले कृषि विद्यापीठाचे माजी कुलगुरू मा डॉ योगेंद्र नेरकर यांची उपस्थिती लाभणार असुन पुणे येथील अटारीचे संचालक मा डॉ लाखन सिंग यांची विषेश उपस्थिती लाभणार आहे, कार्यक्रमाच्‍या अध्‍यक्षस्‍थानी कुलगुरू मा डॉ अशोक ढवण राहणार आहेत. मेळाव्‍याच्‍या तांत्रिक सत्रात ज्‍वार लागवडीवर डॉ एल एन जावळे, हरभरा लागवडीवर डॉ सी बी पाटील, रबी तेलवर्गीय पीके लागवडीवर डॉ एम के घोडके, करडई लागवडीवर डॉ जी डी गडदे, गहु लागवडीवर डॉ यु एम उमाटे आदींवर मार्गदर्शन करणार असुन शेतकरी बांधवाच्‍या कृषि विषयक तांत्रिक बाबींच्‍या शंकाचे समाधान विद्यापीठ शास्‍त्रज्ञ करणार आहेत. तरि ऑनलाईन मेळाव्‍यास जास्‍तीत जास्‍त शेतकरी बांधवानी सहभाग नोंदवावा असे आवाहन विस्‍तार शिक्षण संचालक डॉ डी बी देवसरकर, परभणी जिल्‍हा अधिक्षक कृषि अधिकारी श्री व्‍ही डी लोखंडे व मुख्‍य विस्‍तार शिक्षणाधिकारी डॉ व्‍ही बी कांबळे यांनी केले आहे. सदरिल मेळाव्‍यात ऑनलाईन सहभागी होण्‍यासाठी झुम मिंटींग आयडी ८११३७४१८३१ असुन पासवर्ड १२३४५. मेळाव्‍याचे प्रसारण विद्यापीठाचे युटयुब चॅनल https://www.youtube.com/user/vnmkv यावर करण्‍यात येणार आहे.

Wednesday, September 8, 2021

कृषीदुत व कृषीकन्‍यांनी ई-पीक पाहणी मोबाईल अॅप जास्‍तीत जास्‍त शेतकरी बांधवापर्यंत पोहचविण्‍याकरिता पुढाकार घ्‍यावा ..... प्राचार्य डॉ सय्यद ईस्‍माईल

वनामकृवितील परभणी कृषि महाविद्यालयाच्‍या वतीने ई पीक पाहणी ऑनलाईन कार्यशाळा संपन्‍न


वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील परभणी कृषि महाविद्यालय आणि परभणी जिल्‍हा प्रशासन यांच्‍या संयुक्‍त विद्यमाने ग्रामीण जागरूकता कृषि कार्यानुभव कार्यक्रम (रावे) अंतर्गत दिनांक 8 सप्‍टेंबर रोजी ई पीक पाहणी मोबाईल अॅप यावरील ऑनलाईन कार्यशाळेचे आयोजन करण्‍यात आले होते.

कार्यक्रमाच्‍या अध्‍यक्षस्‍थानी प्राचार्य डॉ सय्यद ईस्‍माईल हे होते तर रावे समन्‍वयक विभाग प्रमुख डॉ व्‍ही बी कांबळे, सहसमन्‍वयक डॉ आर पी कदम, टाटा ट्रस्‍टचे मराठवाडा प्रतिनिधी श्री नारायण कदम, जिल्‍हा प्रतिनिधी श्री आनंद कदम आदींची प्रमुख उपस्थिती होती.

मार्गदर्शनात प्राचार्य डॉ सय्यद ईस्‍माईल म्‍हणाले की, महाराष्‍ट्र शासनाचा ई पीक पाहणी प्रकल्‍प हा एक महत्‍वाचा प्रकल्‍प असुन जिल्‍हानिहाय माननीय जिल्‍हाधिकारी यांच्‍या अध्‍यक्षतेखाली जिल्‍हास्‍तरीय सनियंत्रण समिती गठीत करण्‍यात आला आहे. या कृषि विद्यापीठांतर्गत असलेल्‍या कृषि महाविद्यालयाच्‍या प्राचार्यांचा समावेश आहे. ई पीक पाहणी मोबाईल अॅप वर पिक पेरणी अचुक नोंदीमुळे शेतकरी बांधवाना विविध सरकारी योजनांचा चांगल्‍या प्रकारे लाभ घेता येणार आहे. कृषि अभ्‍यासक्रमातील सातव्‍या सत्रातील विद्यार्थी राज्‍यातील विविध गावात कार्यरत असुन ग्रामीण जागरूकता कृषि कार्यानुभव कार्यक्रमांर्गत शेतकरी बांधवाना सदरिल मोबाईल अॅप डाऊनलोड करणे व पिकांची पेरणीची माहिती नोंदविण्‍यासाठी मदत करावी. सदरिल मोबाईल अॅपची माहिती जास्‍तीत जास्‍त शेतकरी बांधवापर्यंत पोहचविण्‍याकरिता रावेच्‍या कृषिदुत व कृषिकन्‍या यांनी पुढाकार घ्‍यावा, असा सल्‍ला त्‍यांनी दिला.

श्री नारायण कदम म्‍हणाले की, टाटा ट्रस्‍ट व महाराष्‍ट्र शासन यांच्‍यातील सामंजस्‍य करारान्‍वये टाटा ट्रस्‍टने ई पीक पाहणी हे मोबाईल अॅप विकसित केले आहे. शेतक-यांच्‍या सहभागाने मोबाईल अॅपच्‍या आधारे शेतक-यांनी स्‍वत: पीक पेरणीची माहिती ऑनलाइन पध्‍दतीने नोंद करू शकतील. यामुळे राज्‍यभरातील गाव निहाय, तालुका निहाय कोणत्‍या पिकाखालील किती क्षेत्र आहे, याची निश्चित आकडेवारी उपलब्‍ध होणार आहे. यामुळे कृषी विभागाच्‍या विशिष्‍ट पिकासाठी देय असणा-या योजनाचे लाभ खातेधारकांना अचुकरित्‍या देण्‍यास मदत होणार आहे.

श्री आनंद कदम म्‍हणाले की, ई पीक पाहणी अॅप मुळे कृषी गणना अत्‍यंत सुलभ पध्‍दतीने व अचुकरित्‍या पुर्ण करता येणार असुन ई पीक पाहणी पिक निहाय लागवडीचे क्षेत्र व उत्‍पन्‍नाचा अचुक अंदाज काढणे शक्‍य होणार आहे. तसेच खातेदार निहाय पीक पाहणी मुळे खातेदार निहाय पीक कर्ज, पीक विमा योजना, पीक नुकसान भरपाई अदा करण्‍यासही मदत होणार आहे.

कार्यशाळेत श्री नारायण कदम व श्री आनंद कदम यांनी ई पीक मोबाईल अॅप वापराबाबत सविस्‍तर तांत्रिक मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालक डॉ पी एस कापसे यांनी केले. कार्यक्रमास रावेचे कार्यक्रम अधिकारी उपस्थित होते. ऑनलाईन कार्यशाळेस रावेचे शंभर पेक्षा जास्‍त कृषिदुत व कृषिकन्‍यानी सहभाग नोंदविला.

ई पीक पाहणी प्रकल्‍प अंमलबजावणीकरिता परभणी जिल्‍हास्‍तरीय सनियंत्रण समितीचे जिल्‍हाधिकारी मा श्रीमती आंचल गोयल यांच्‍या अध्‍यक्षतेखाली गठण करण्‍यात आले असुन यात निवासी उपजिल्‍हाधिकारी श्री महेश वडदकर, जिल्‍हा अधिक्षक कृषी अधिकारी श्री विजय लोखंडे, जिल्‍हा अधिक्षक भुमि अभिलेख अधिकारी श्री घोडके, जिल्‍हा सुचना व विज्ञान अधिकारी श्री सुनिल पोटेकर, कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ सय्यद ईस्‍माईल, टाटा ट्रस्‍टचे प्रतिनिधी श्री आनंद कदम, जिल्‍हा अग्रणी बॅक व्‍यवस्‍थापक श्री सुनिल हट्टेकर, पीक विमा कंपनी प्रतिनिधी श्री स्‍वप्‍नील घुले यांचा समावेश आहे.

Wednesday, September 1, 2021

कृषी संशोधनात पाय‍थॉन संगणक आज्ञावलीचा मोठा उपयोग …… आयआटी खरगपुरचे तज्ञ डॉ. राजेंद्र माचावरम

नाहेप प्रकल्‍पांतर्गत प्रशिक्षणाचे उदघाटन 

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील जागतिक बॅक व राष्ट्रीय कृषी उच्च शिक्षण प्रकल्प नाहेप प्रकल्‍पाच्‍या विद्यमाने स्मार्ट कॅमेरा आणि पाय‍थॉन संगणक आज्ञावलीचा कृषी संशोधनासाठी उपयोग या विषयावर दि. १ ते १० सप्‍टेबर दरम्‍यान प्रशिक्षण आयोजित करण्‍यात आले असुन प्रशिक्षण उदघाटनाचे दिनांक १ सप्‍टेंबर रोजी झाले.

उदघाटनास खरगपूर येथील आयआयटीचे शास्त्रज्ञ डॉ. राजेंद्र माचावरम हे प्रमुख पाहुणे म्‍हणुन उपस्थित होते तर अध्यक्षस्‍थानी हैद्राबाद येथील सॅरोन डिजीटेक संचालक श्रीमती अरुंधती पांडव या होत्या. प्रकल्‍प अन्‍वेषक डॉ. गोपाळ शिंदे, कृषि हवामान शास्‍त्रज्ञ डॉ. कैलास डाखोरे यांची प्रमुख उपस्थिती होती.

मार्गदर्शनात शास्त्रज्ञ डॉ. राजेंद्र माचावरम म्हणाले की, आधुनिक तंत्रज्ञान जसे की स्मार्ट कॅमेरा, सेन्सर यांचा वापर कृषी क्षेत्रातील उत्पादकता वाढीसाठी आवश्यक झाले आहे. स्मार्ट कॅमे-याचा वापर करताना वेगवेगळ्या संगणक आज्ञावलीची माहिती असणे आवश्यक आहे. यामध्ये सी, सीप्लसप्लस, जावा, पायथॉन या आज्ञावलीचा समावेश होतो. पायथॉन अज्ञावली इतरांच्या तुलनेने समजण्यासाठी व वापर करण्यासाठी सोपी आहे. तरी यांचा अधिकाधिक वापर कृषी संशोधनासाठी करावा असे त्यांनी आवाहन केले.

अध्यक्षीय समारोपात श्रीमती अरुंधती पांडव यांनी सॅरोन डिजीटेक, हैद्राबाद यांच्या वतीने नाहेप प्रकल्पात होत असलेल्या विविध अॅप्स, संशोधन प्रकल्प या विषयी माहिती दिली. तसेच विद्यार्थ्यांनी प्रशिक्षण सत्राचा लाभ घेऊन त्याचा उपयोग कृषी संशोधनासाठी करावा असे आवाहन केले.

प्रकल्‍प अन्‍वेषक डॉ, गोपाळ शिंदे यांनी संशोधक विद्यार्थ्यांकरीता नाहेप प्रकल्पाअंतर्गत उपलब्ध प्रयोगशाळा, संशोधन कार्यक्षेत्र व स्वत:चे भविष्यात्मक डीजीटल तंत्रज्ञान करीअर निवडण्यास आव्हान केले व पायथॉन प्रोग्रामीगद्वारा रोबोट, ड्रोन व स्वंयचलीत यंत्रे कसे संशोधन कार्यात उपयुक्त ठरु शकतात याबाबत माहिती दिली. तसेच प्रकल्पामध्ये उपलब्ध असलेले स्मार्ट कॅमेरे, लिडार, रिअलसेन्स, मल्टिसेप्क्ट्रल कॅमेरा, झेड कॅमेरा इ. चा वापर कृषि संशोधनासाठी करावा असे आवाहन केले.

कार्यक्रमाची प्रास्‍ताविक डॉ. कैलास डाखोरे यांनी केले. सुत्रसंचालन इंजी. चेतन ऐस्के यांनी केले  तर आभार इंजी. संजीवनी कानवटे यांनी मानले. प्रशिक्षणासाठी 40 पदव्युत्तर, आचार्य पदवी विद्यार्थी आणि शास्त्रज्ञ यांनी नोंदणी केलेली आहे. प्रशिक्षणांत हैद्राबाद येथील सॅरोन डिजीटेकचे संगणक अभियंता श्री. विनयकुमार कामादी आणि श्री. अनुज पनवेली, यांचे मार्गदर्शन लाभणार आहे. प्रशिक्षणासाठी कुलगुरू मा. डॉ. अशोक ढवण, नाहेप प्रकल्‍पाचे राष्‍ट्रीय प्रमुख संचालक मा. डॉ. आर. सी. अग्रवाल, राष्‍ट्रीय प्रकल्प प्रमुख डॉ. प्रभातकुमार, वनामकृविचे शिक्षण संचालक डॉ. धर्मराज  गोखले यांनी शुभेच्छा दिल्या.

कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी आयोजन सचिव इंजी. रवीकुमार कल्लोजी, इंजी अपुर्वा देशमुख, इंजी संजीवनी कानवटे, इंजी विश्वप्रताप जाधव, इंजी. गोपाळ रनेर यांनी परिश्रम घेतले. तांत्रिक सहाय्यक म्हणुन नाहेपचे इंजी. खेमचंद कापगते, डॉ. अनिकेत वाईकर, डॉ. हेमंत रोकडे, डॉ. अविनाश काकडे, डॉ. शिवराज शिंदे, रहिम खान, इंजी. चेतन ऐस्के, इंजी. शिवानंद शिवपुजे, इंजी. तनझिम खान, श्री. रामदास शिंपले, मुक्ता शिंदे, रेखा ढगे, श्री. मारोती रनेर, श्री. गंगाधर जाधव, श्री. प्रदिप मोकाशे व श्री. जगदीश माने आदींनी काम पाहिले.

Friday, August 27, 2021

सद्यस्थितीत सोयाबीनवरील किड व रोग व्‍यवस्‍थापन करा

वनामकृवितील कृषि तंत्रज्ञान माहिती केंद्राचा सल्‍ला

छायाचित्र - शेंगा करपा


सध्या सोयाबीन वर चक्री भुंगा, खोडमाशी या खोडकिडींचा तसेच उंटअळी, शेंगा पोखरणारी अळी आणि तंबाखूवरील पाने खाणारी अळी (स्पोडोप्टेरा- लष्करी अळी) या किडीचा प्रादुर्भाव दिसून येत आहे तसेच येणाऱ्या काळात रिमझिम पावसामुळे शेंगा लागण्याच्या अवस्थेत शेंगा करपा या रोगाचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता आहे त्याकरिता पावसाचा अंदाज घेऊन पुढील प्रमाणे कीड व रोगांचे व्यवस्थापन करण्‍याचा सल्‍ला वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील कृषि तंत्रज्ञान माहिती केंद्राचे व्‍यवस्‍थापक डॉ जी डी गडदे व किटकशास्‍त्रज्ञ प्रा डी डी पटाईत यांनी दिला आहे.

पाने खाणाऱ्या व खोडकिडीच्या अळी करीता क्लोरॅट्रानिलीप्रोल १८.५ टक्के हे किटकनाशक ३ मिली प्रती १० लिटर पाणी याप्रमाणे प्रती एकर ६० मिली किंवा थायमिथोक्झाम १२.६ टक्के अधिक लँम्बडा सायहँलोथ्रिन ९.५ टक्के (संयुक्त कीटकनाशक) हे २.५ मिली प्रती १० लिटर पाणी याप्रमाणे प्रती एकर ५० मिली  किंवा क्लोरॅट्रानिलीप्रोल ९.३ टक्के अधिक लँम्बडा सायहँलोथ्रिन ४.६ टक्के हे ३ मिली प्रती १० लिटर पाणी याप्रमाणे प्रती एकर ६० मिली (संयुक्त कीटकनाशक) किंवा बिटा सायफ्ल्युथ्रीन ८.४९ टक्के अधिक इमिडाक्लोप्रीड १९.८१ टक्के (संयुक्त कीटकनाशक) हे ७ मिली प्रती १० लिटर पाणी याप्रमाणे प्रती एकर १४० मिली फवारावे. सदरिल कीटकनाशक सर्व प्रकारच्या अळी (खोडकीडी व पाने खाणा-या अळ्या) करीता काम करतात म्हणून कीडीनुसार वेगळे किटकनाशक फवारणी करण्याची आवश्यकता नाही.

पानावरील ठिपके व शेंगा करपाकरीता टेब्युकोनॅझोल १० टक्के अधिक सल्फर ६५ टक्के (संयुक्त बुरशीनाशक) हे २५ ग्रॅम प्रति १० लिटर पाणी याप्रमाणे प्रति एकर ५०० ग्रॅम किंवा टेब्युकोनॅझोल २५.९ टक्के  हे १२.५ मिली प्रति १० लिटर पाणी याप्रमाणे प्रति एकर २५० मिली फवारावे.

अधिक माहितीसाठी विद्यापीठातील कृषि तंत्रज्ञान माहिती केंद्राच्‍या दुरध्‍वनी क्रमांक ०२४५२ २२९००० यावर संपर्क साधवा.

संदर्भ - संदेश क्रमांक: ०७/२०२१ (२७ ऑगस्ट २०२१), कृषि तंत्रज्ञान माहिती केंद्र, वनामकृवि, परभणी.

Wednesday, August 25, 2021

कपाशीत पातेगळ व रसशोषण करणा-या किडीचा प्रादुर्भाव

सद्यपरिस्थितीत कपाशी पिकाचे व्यवस्थापनाबाबत विद्यापीठाचा सल्‍ला

कपाशीचे पीक सध्या पाते व फुल लागण्याच्या अवस्थेत आहे तसेच जूनमध्ये लवकर लागवड केलेल्या कपाशीमध्ये बोंड परीपक्वतेच्या अवस्थेत आहेत. सध्या वातावरणामध्ये मोठे बदल दिसून येत आहेत. कधी तापमानात वाढ होत आहे तर कधी सलग ५-६ दिवस पावसाचे वातावरण होत आहे. अशा हवामान बदलामुळे कपाशीत पातेगळ झाल्याचे निदर्शनास येत आहे. तसेच रसशोषण करणा-या कीडी जसे की मावा, तुडतुडे, फुलकीडे यांचा ही मोठ्या प्रमाणावर प्रादुर्भाव आढळून येत आहे व काही ठिकाणी बोंडअळीचाही प्रादुर्भाव दिसून येत आहे. येणाऱ्या काळात आकस्मिक मर, जिवाणूजन्य करपा सुध्दा येण्याची शक्यता आहे, तरी त्या करीता वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील कृषि तंत्रज्ञान माहिती केंद्रातील कृषि विद्यावेत्‍ता डॉ जी डी गडदे व किटकशास्‍त्रज्ञ प्रा डी डी पटाईत यांनी पुढील  उपाययोजना करण्‍याचा सल्‍ला दिला आहे.   

रसशोषक किडी विशेषत: फुलकिडे व्यवस्थापनाकरिता निंबोळी अर्क ५ टक्के किंवा फिप्रोनील ५ टक्के - ३० मिली प्रती १० लिटर पाणी याप्रमाणे प्रती एकर ६०० मिली किंवा स्पिनेटोरम ११.७ टक्के - ८ मिली प्रती १० लिटर पाणी याप्रमाणे प्रती एकर १६० मिली किंवा बुप्रोफेझीन २५ टक्के - २० मिली प्रती १० लिटर पाणी याप्रमाणे प्रती एकर ४०० मिली फवारावे. यापैकी कोणत्‍याही किटकनाशकांची फवारणी करावी.

जिवाणूजन्य करपा रोग दिसुन येत असे तर कॉपर ऑक्सीक्लोराईड ५० टक्के २५ ग्रॅम प्रती दहा लिटर पाण्‍यात मिसळुन एकरी ५०० ग्रॅम याप्रमाणे फवारणी करावी.

काही ठिकाणी कपाशीमध्ये आकस्मिक मर ही विकृती दिसून येत आहे. त्याकरिता पुढीलप्रमाणे उपाययोजना कराव्यात. शेतातील अतिरिक्त पाण्याचा लवकरात लवकर निचरा करवा. वापसा येताच कोळपणी व खुरपणी करावी. लवकरात लवकर १.५ किलो युरिया अधिक १.५ किलो पालाश (पोटॅश) अधिक २५० ग्रॅम कॉपर ऑक्सीक्लोराईड प्रति १०० लिटर पाण्यात मिसळून तयार द्रावणाची प्रति झाड १५० मिली आळवणी करावी. किंवा १ किलो १३:००:४५ अधिक २ ग्रॅम कोबाल्ट क्लोराईड अधिक २५० ग्रॅम कॉपर ऑक्सीक्लोराईड २०० लिटर पाण्यातून मिसळून तयार द्रावणाची प्रति झाड १०० मिली आळवणी करावी.

कपाशीतील नैसर्गिक फुलगळीचे व्यवस्थापन करण्यासाठी नॅपथेलिन अॅसीटीक अॅसीड (NAA) २.५ मिली प्रति १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.

कापूस पिकामध्ये दोन महिन्यानंतर नत्रयुक्त खताची मात्रा देण्यासाठी युरिया १ बॅग किंवा अमोनियम सल्फेट २ बॅग प्रति एकर पेरून द्यावे. तसेच कापूस पिकामध्ये १.५ टक्के युरिया (१५० ग्रॅम) किंवा २ टक्के  डायअमोनिअम फॉस्फेट (२०० ग्रॅम) अधिक ५० ग्रॅम सुक्ष्म अन्नद्रव्य प्रती १० लिटर पाण्यातून फवारावे.

अधिक माहितीसाठी वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील कृषि तंत्रज्ञान माहिती केंद्राशी दुरध्‍वनी क्रमांक ०२४५२-२२९००० यावर संपर्क साधावा.

संदर्भ - कृषि तंत्रज्ञान माहिती केंद्र, वनामकृवि, परभणी संदेश क्रमांक: ०६/२०२१  (२४ ऑगस्ट २०२१)




Sunday, August 22, 2021

मानवी जीवन व पर्यावरणाच्‍या रक्षणाकरिता वृक्ष संवर्धनाशी स्‍वत:ला भावनिकरित्‍या बांधुन घ्‍या ........ कुलगुरू मा डॉ अशोक ढवण

वनामकृवित वृक्षवंदन – रक्षाबंधन उपक्रम साजरा

नागरिकांमध्‍ये वृक्ष लागवड आणि वृक्ष संवर्धनाबाबत स्‍वयंप्रेरणा व दायित्‍व भावना निर्माण व्‍हावी म्‍हणुन परभणी जिल्‍हयात वृक्षवंदन - रक्षाबंधन या सप्‍ताहाचे दिनांक २२ ऑगस्‍ट ते ३० ऑगस्‍ट आयोजन करण्‍यात आले असुन यानिमित्‍त दिनांक २२ ऑगस्‍ट रोजी वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठात हा उपक्रम राबविण्‍यात आला.

यावेळी विद्यापीठाचे कुलगुरू मा डॉ अशोक ढवण, त्‍यांच्‍या सुविद्य पत्‍नी श्रीमती उषाताई ढवण, पुरातन वास्‍तु अभ्‍यासक व तज्ञ श्री मल्‍हारीकांत देशमुख, डॉ अनिल दिवाण, डॉ सुभदा दिवाण, कुलसचिव डॉ धीरजकुमार कदम, विद्यापीठ नियंत्रक श्रीमती दिपाराणी देवतराज, माजी शिक्षण संचालक डॉ विलास पाटील, वृक्ष लागवड अधिकारी डॉ हिराकांत काळपांडे, ओंकार ग्राफीक्स चे श्री संजय ठाकरे, श्री दिवाकर काकडे, डॉ वडणेरकर, डॉ राजेश क्षीरसागर, डॉ प्रविण वैद्य, डॉ टेकाळे, डॉ चंद्रशेखर अंबाडकर, डाॅ मिनाक्षी पाटील, डॉ विजय जाधवडॉ फरिया खानडॉ अंबिका मोरे आदीसह शहरातील नागरीक उपस्थित होते.

उपक्रमाची सुरूवात कुलगुरू यांच्‍या सुविद्य पत्‍नी श्रीमती उषाताई ढवण यांच्‍या हस्‍ते वडाच्‍या झाडाचे पुजनाने करण्‍यात येऊन कुलगुरू मा डॉ अशोक ढवण यांच्‍या हस्‍ते वडाच्‍या झाडास राखी बांधुन करण्‍यात आली, नंतर उपस्थित मान्‍यवरांनीही विद्यापीठ परिसरातील वृक्षास राखी बांधुन या उपक्रमात सहभाग घेतला.

याप्रसंगी मार्गदर्शनात कुलगुरू मा डॉ अशोक ढवण म्‍हणाले की, भाऊ व बहिण अतुट बंधन अधिक दृढ होण्‍याकरिता आपण रक्षाबंधन साजरा करतो, यात बहिण व भाऊ परस्‍परांचे संरक्षण करण्‍याचे दायित्‍व अपेक्षित असते. त्‍याचप्रमाणे वृक्षालाही आपण राखी बांधुन, लहानपणी त्‍यांचे संवर्धन करू, हीच वृक्ष भविष्‍यात मानवाचे व पर्यावरणाचे रक्षण करणार आहेत. वृक्षास राखीपुर्णिमेच्‍या दिवसी प्रतिकात्‍मकरित्‍या राखी बांधुन वृक्ष संवर्धनाशी आपण भावनिकरित्‍या बांधुन घेत आहोत. सर्व नागरिकांनी वृक्ष संवर्धनाच्‍या प्रक्रियेत सर्वांनी सामिल व्‍हावे, ही सर्वांची सामुदायिक जबाबदारी आहे. पर्यावरण संरक्षणासाठी वृक्ष लागवड व संवर्धनाचा वसा विद्यापीठाने घेतला असुन गेल्‍या तीन वर्षाच्‍या कार्यकाळात विद्यापीठ अंतर्गत मराठवाडयातील महाविद्यालये, संशोधन केंद्रे व कृषि विज्ञान केंद्र परिसरात साधारणत: दहा लाख वृक्षाची लागवड व संवर्धन करण्‍यात आले. परभणी विद्यापीठ परिसरात पाचशे पेक्षा जास्‍त वडाच्‍या झाडाचे लागवड करण्‍यात आली असुन वडाच्‍या झाडाचे आयुष्‍य मोठे असते, यामुळे पक्षी वैभव वाढीस लागणार आहे. विद्यापीठ ऑक्सीजन हॅब होत आहे, भविष्‍यात परिसर गर्द वनराईने नटलेला असेल, अशी आशा त्‍यांनी व्‍यक्‍त केली.

याप्रसंगी श्री मल्‍हारीकांत देशमुख म्‍हणाले की, कोरोनाच्‍या पार्श्‍वभुमीवर प्राणवायुचे मानवी जीवनातील महत्‍व अधोरेखित झाले, मानवास प्राणवायुची पुर्तता वृक्ष पासुनच होते. मानवाचे जीवन सुरक्षित ठेवण्‍यासाठी वृक्षास करून आपण प्राणवायु दे ही मागणी राखी बांधुन करणार असुन यात पुरूष व महिलांनीही सहभाग घ्‍यावा. सर्व वृक्षप्रेमी एकत्रित कार्य करून आपले ऋण म्‍हणुन वृक्षाचे पुजन करू. ही सुरूवात असुन संपुर्ण परभणी जिल्‍हयात ही मोहिम राबविण्‍यात येणार आहे. ज्‍याप्रमाणे रक्षाबंधन करून भाऊ आपल्‍या बहिणीच्‍या रक्षणाची जबाबदारी स्विकारतो अगदी त्‍याचप्रमाणे नागरिकांनी वृक्ष संवर्धनाची जबाबदारी स्‍वीकारावी असा या उपक्रमा मागचा हेतू आहे. वृक्षांचे रक्षण व संवर्धनाबाबत जनजागृती करणे व वृक्षांप्रती दायित्‍वाची भावन रूजवण्‍यासाठी वृक्ष वंदन -  रक्षा बंधन अभियान महत्‍वाचे ठरणार आहे.

दिनांक २३ ते ३० ऑगस्‍ट या सप्‍ताहाचे आयोजन पुरातन वास्‍तु अभ्‍यासक व तज्ञ श्री मल्‍हारीकांत देशमुख यांच्‍या संकल्‍पनेमधुन करण्‍यात आले आहे. या उपक्रमांतर्गत रक्षा बंधनाचे औचित्‍य साधुन जिल्‍हयातील शाळा, महाविद्यालये येथे वृक्षांची लागवड करून त्‍यांची जोपासना करण्‍यात येणार आहे. अभियानातुन लोकसहभाग व जनप्रबोधन करण्‍याचा प्रयत्‍न करण्‍यात येऊन वृक्ष लागवड व वृक्ष संवर्धनाची व्‍याप्‍ती वाढविण्‍याचा उद्देशाने अभियान जिल्‍हाभरात राबविण्‍यात येणार आहे.