Friday, March 25, 2022

आदिवासी शेतकरी बांधवाकरिता विद्यापीठ राबवित असलेले कार्य समाधानकारक ....... महाराष्‍ट्र राज्‍य अनुसूचीत जाती – जमाती आयोगाचे अध्‍यक्ष मा श्री. ज. मो. अभ्‍यंकर

महाराष्‍ट्र राज्‍य अनुसूचीत जाती – जमाती आयोगाची वनामकृवित बैठक संपन्‍न

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील दिनांक २५ मार्च रोजी महाराष्‍ट्र राज्‍य अनुसूचीत जाती – जमाती आयोगाची बैठक पार पाडली. बैठकीस आयोगाचे अध्‍यक्ष मा श्री ज. मो अभ्‍यंकर, कुलगुरू मा डॉ अशोक ढवण, आयोगाचे सदस्‍य (सेवा) मा श्री आर डी शिंदे, सदस्‍य (सामाजिक व आर्थिक) मा श्री के आर मेढे, जनसंपर्क अधिकारी मा श्री रमेश शिंदे, शिक्षण संचालक डॉ धर्मराज गोखले, संशोधन संचालक डॉ दत्‍तप्रसाद वासकर, विस्‍तार शिक्षण संचालक डॉ देवराव देवसरकर, कुलसचिव डॉ धीरजकुमार कदम आदींची प्रमुख उपस्थिती होती. 

बैठकीत कुल‍सचिव डॉ धीरजकुमार कदम यांनी विद्यापीठातील अनुसुचित जाती व अनुसूचित जमाती यांच्‍या करिता राबविण्‍यात येणारे विविध उपक्रम, कार्यक्रम आदींची माहिती दिली तसेच पदभरती, बिंदु नामावली, मागासवर्गीय कक्ष, विविध समित्‍यांची अहवाल सादर केला.

मार्गदर्शनात मा श्री ज. मो. अभ्‍यंकर म्‍हणाले की, देशाच्‍या सकल राष्‍ट्रीय उत्‍पादनातील शेती क्षेत्राचा केवळ १३ टक्के वाटा आहे, परंतु ६५ टक्के लोकसंख्‍या ही शेतीवर अवलंबुन आहे. हवामान बदलाचा शेतीवर मोठा परिणाम होत आहे. कृषि विद्यापीठ करित असलेले संशोधन कार्य अत्‍यंत कौतुकास्पद असुन आदिवासी शेतकरी बांधवासाठी असलेले उपक्रम अतिशय चांगल्‍या प्रकारे राबविण्‍यात येत आहेत. विद्यापीठातील मागासवर्गीय करिता असलेल्‍या तक्रार निवारण समितीने तक्रार नोंदविण्‍याकरिता महिन्‍यातील निश्चित एक दिवस ठरवावा, असा सल्‍लाही त्‍यांनी दिला.  

कुलगुरू मा डॉ अशोक ढवण म्‍हणाले की, विद्यापीठाने नांदेड जिल्‍हयातील आदिवासी बहुल भागाकरिता किनवट तालुक्‍याकरिता स्‍वंतत्र कृषि महाविद्यालयाचा प्रस्‍ताव दाखल केला आहे. विविध आदिवासी उपयोजनेच्‍या माध्‍यमातुन कृषि तंत्रज्ञानाचा प्रसार व प्रचार करून आदिवासी शेतकरी बांधवाच्‍या सामाजिक व आर्थिक स्‍तर उंचावण्‍याकरिता कार्य करत असल्‍याचे सांगितले. 

यावेळी शिक्षण संचालक डॉ धर्मराज गोखले यांनी शैक्षणिक कार्याबाबत तर संशोधन कार्याबाबत संशोधन संचालक डॉ दत्‍तप्रसाद वासकर यांनी माहिती दिली. बैठकीचे सुत्रसंचालन डॉ रणजित चव्‍हाण यांनी केले. बैठकीस उपकुलसचिव श्री पी के काळे, सहाय्यक नियंत्रक श्री किरण कोल्‍हे, सहाय्यक कुलसचिव श्री पी एम पाटील, डॉ एच व्‍ही काळपांडे, डॉ डि डि टेकाळे, डॉ रणजित चव्‍हाण, श्री नरेंद्र खरतडे आदींची उपस्थिती होती.


कमी पाण्‍यात जास्‍त उत्‍पादनाकरिता आधुनिक सिंचन प्रणालीचा वापर करा ...... संशोधन संचालक डॉ. दत्‍तप्रसाद वासकर

मौजे भोसा येथे शेतकरी मेळावा संपन्‍न, अनुसूचित जातीच्‍या शेतक-यांना तुषार सिंचन संचाचे वाटप

पाणी ही राष्ट्रीय संपत्ती असून कमी पाण्यात जास्तीत जास्त उत्पादन घेण्यासाठी ठिंबक व तुषार या सारख्या आधुनिक सिंचन प्रणालीचा वापर वाढवण्याची आवश्यकता आहे. तुषार सिंचन संचाच्‍या वापर करून उन्हाळी हंगामात देखिल सोयाबीन पिकाचे किफायतशीर उत्पादन घेऊ शकतो, असे प्रतिपादन संशोधन संचालक डॉ दत्‍तप्रसाद यांनी केले.

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील अखिल भारतीय समन्वयीत सिंचन पाणी व्यवस्थापन प्रकल्पाच्या वतीने दिनांक २५ मार्च रोजी मौजे भोसा (ता.मानवत, जि.परभणी)  येथे आयोजित शेतकरी मेळाव्‍याच्‍या अध्‍यक्षस्‍थानावरून ते बोलत होते. कार्यक्रमास सरपंच श्री. सुभाषराव जाधव, कोरडवाहू संशोधन केंद्राचे वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. मदन पेंडके, आयोजक मुख्य शास्त्रज्ञ डॉ.हरिश आवारी, कृषी विद्यावेत्‍ता डॉ गजानन गडदे आदींची प्रमुख उपस्थिती होती

कार्यक्रमात भारतीय कृषि अनुसंधान परिषद यांच्या अंतर्गत असलेल्‍या भुवनेश्‍वर येथील पाणी व्यवस्थापन प्रकल्पाकडून प्राप्त निधीतून अकरा अनुसुचित जातीतील लाभार्थांना शेतक-यांना पाणी व्यवस्थापनाचे महत्व अवगत करण्यासाठी व आर्थिकस्तर उंचविण्यासाठी तुषार सिंचन संचाचे वाटप मान्‍यवरांच्‍या हस्‍ते करण्यात आले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविकात मुख्य शास्त्रज्ञ डॉ. हरिश आवारी यांनी सिंचनासोबतच मृद व जलसंधारणाच्या उपाययोजना अंमलात आणण्याचे आवश्यक असल्याचे नमुद केले. सुत्रसंचलन डॉ. गजानन गडदे यांनी तर आभार डॉ. मेघा जगताप यांनी मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी श्री. नंदकुमार गिराम, श्री. सावंत, श्री. कपिलेश्‍वर बालोरे, श्री.विलास जाधव आदीसह पाणी व्यवस्थापन प्रकल्पाचे कर्मचारी आणि भोसा ग्रामवासीयांनी परिश्रम घेतले.


मा. श्री. ज. मो. अभ्यंकर यांची वनामकृविच्या नाहेप प्रकल्‍पास भेट व पाहणी

महाराष्ट्र राज्य अनुसुचित जाती - जमाती आयोगाचे अध्यक्ष मा. श्री. ज. मो. अभ्यंकर यांनी दिनांक २५ मार्च रोजी वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील जागतिक बॅक पुरस्कृत राष्ट्रीय कृषि उच्च शिक्षण प्रकल्प - नाहेप प्रकल्‍पास सदिच्छा भेट देऊन विविध उपक्रमाची पाहणी केली. यावेळी विद्यापीठाचे कुलगुरु मा. डॉ. अशोक ढवण यांनी त्‍यांचे स्‍वागत केले. भेटी प्रसंगी प्रकल्पाचे मुख्य अन्वेषक डॉ. गोपाळ शिंदे यांनी प्रकल्पातील आंरराष्ट्रीय दर्जेचे चालु असलेल्या डिजिटल शेती संशोधन व तंत्रज्ञानाची प्रात्याक्षिकासह माहिती दिली. प्रकल्पातील कृषि यंत्रमानव, ड्रोन स्वंयचित यंत्र आदिंच्या डिजीटल तंत्रज्ञानाचा शेतीतील वापराबाबत त्यांनी माहिती जाणुन घेतली. प्रकल्पात चालु असलेल्या संशोधनात्मक कामाबाबात त्यांनी प्रशंसा केली. यावेळी त्यांच्यासोबत आयोगाचे सदस्‍य मा. श्री. आर. डि. शिंदे, सदस्‍य मा. श्री. के. आर. मेडे, जनसंपर्क अधिकारी  श्री रमेश शिंदे, कुलसचिव डॉ. धिरजकुमार कदम, जनसंपर्क अधिकारी डॉ. प्रविण कापसे, सहाय्यक कुलसचिव श्री. एच. ए. हिवराळे, आदींची प्रमुख उपस्थिती होती.

नाहेप प्रकल्पातील शास्त्रज्ञ व कर्मचारी इंजि. खेमचंद कापगाते, डॉ. अविनाश काकडे, डॉ. हेमंत रोकडे, इंजि. धम्मज्योती पिपंळेकर, डॉ. श्रवेता सोळंके, इंजि. संजीवनी कानवटे, प्रदिप मोकाशे, मुक्ता शिंदे, रामदास शिपंले, जगदीश माने, गंगाधर जाधव आणि मारोती रणेर आदींनी प्रकल्पातील विविध उपक्रमाबाबत माहिती दिली.

Wednesday, March 23, 2022

वनामकृवितील उद्यानविद्या महाविद्यालय विद्यार्थ्यांसाठी संभाषण कौशल्य व व्यक्तिमत्व विकास कार्यशाळा संपन्न

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणीच्या सुवर्ण जयंती महोत्सवाचे औचित्य साधून भारतीय कृषि अनुसंधान परिषदेच्‍या मानव विकास अनुसूचित जाती (उपयोजना) अंतर्गत उद्यानविद्या महाविद्यालयाच्‍या वतीने विद्यार्थ्यांसाठी दिनांक १० ते १६ मार्च दरम्‍यान संभाषण कौशल्य व व्यक्तिमत्व विकास कार्यशाळेचे आयोजन करण्‍यात आले होते. कार्यशाळेचे उदघाटन कुलगुरू मा डॉ. अशोक ढवण यांचे हस्ते झाले. याप्रसंगी प्राचार्य डॉ गिरिधारी वाघमारे, डॉ धनाजी आर्या, प्रा कुशल राऊत आदींची प्रमुख उपस्थिती होती. कार्यशाळेत ‘संभाषण कौशल्य’ या विषयावर अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ महाविद्यालयाचे डॉ. धनाजी आर्या तर ‘व्यक्तिमत्व विकास’ यावर कम्युनिकेयर ट्रेनिंग आणि कन्टेट सोल्युशन्स चे संचालक श्री. कुशल राऊत यांनी मार्गदर्शन केले. कार्यशाळेची सांगता दिनांक १६ मार्च रोजी प्राचार्य डॉ. गिरिधारी वाघमारे यांच्‍या अध्‍यक्षतेखाली झाली. यावेळी प्रमुख पाहुणे म्‍हणुन डॉ. शिवाजी शिंदे होते. सूत्रसंचालन डॉ. अंशुल लोहकरे यांनी केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी प्राचार्य डॉ. गिरिधारी वाघमारे यांच्‍या मार्गदर्शनाखाली जिमखाना उपाध्‍यक्ष  डॉ. वैशाली भगत, डॉ. अंशुल लोहकरे, डॉ. श्रुती वानखेडे आदीसह महाविद्यालयातील प्राध्‍यापक व  कर्मचारी यांनी परिश्रम घेतले. सदरील कार्यशाळेस महाविद्यालयातील चारही वर्षाच्या विद्यार्थ्यांनी लाभ घेतला.

Tuesday, March 22, 2022

वनामकृवितील सामुदायिक विज्ञान महाविद्यालयात व्‍यक्तिमत्‍व आणि उद्योजकता विकास प्रशिक्षण

नोकरी-व्यवसायाच्या दृष्टीने विद्यार्थ्यांनी शैक्षणिक अभ्यासक्रम कठोर परिश्रम घेऊन यशस्वीरित्या पूर्ण करावा. करिअर च्‍या दृष्‍टीने व्‍यक्‍तीमत्‍व विकास व संवाद कौशल्‍य जाणीवपुर्वक वृध्‍दींगत करणे आवश्‍यक असल्याचे मत शिक्षण संचालक डॉ. धर्मराज गोखले यांनी व्यक्त केले. वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील सामुदायिक विज्ञान महाविद्यालयांत विद्यार्थ्यासाठी व्यक्तिमत्व आणि उद्योजकता विकास यावरील तीन दिवसीय प्रशिक्षणाचा समारोपीय कार्यक्रमात दिनांक 21 मार्च रोजी अध्यक्षीय भाषणात ते बोलत होते. व्‍यासपीठावर प्राचार्य डॉ जया बंगाळे, प्रमुख वक्‍ते पुणे येथील कम्युनीकेअर अँड कंटेंट सोल्युशन्स संस्थेचे संचालक प्रा. कुशल राऊत, प्रा.संजीव राणे, विद्यार्थी कल्याण अधिकारी डॉ. सचिन मोरे आदींची प्रमुख उपस्थिती होती.

डॉ. जया बंगाळे म्‍हणाल्‍या की, भविष्यात नोकरीच्या संधी जरी मिळाल्या नाही तरी सामुदायिक विज्ञान अभ्यासक्रमाच्या आधारावर विद्यार्थ्यांनी स्वयंरोजगाराकडे वळत यशस्वी उद्योजक बनावे. प्रशिक्षणा दरम्यान वृद्धींगत केलेल्या ज्ञान व कौश्यल्यांच्या आधारावर प्रत्यकाने व्यक्तिमत्व व उद्योजकता विकास साधावा.

सदरिल तीन दिवसीय प्रशिक्षणात प्रा. कुशल राऊत आणि प्रा.संजीव राणे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. या अंतर्गत त्यांनी विविध उपक्रम, प्रात्यक्षिके तसेच दृक-श्राव्य माध्यमांचा उपयोग करत विद्यार्थ्यांना नोकरी – व्यवसायात यशस्वी होण्यासाठी आवश्यक असणा-या प्रभावी व्यक्तिमत्वाच्या अनेक पैलूविषयी अवगत करत विद्यार्थ्यामध्ये आत्मविश्वास निर्माण केला.  याप्रसंगी विद्यार्थी प्रशिक्षणार्थी दिव्या भगत, द्रोपदा मस्के, लवन कुमार, सुनिल पुरोहित यांनी मनोगतात सदरिल प्रशिक्षणामुळे विद्यार्थीमध्‍ये संवाद कौशल्‍य वाढीस लागुन करिअरच्‍या दृष्‍टीने लाभ होईल असे मत व्‍यक्‍त केले. प्रास्‍ताविक कार्यक्रम समन्‍वयक डॉ शंकर पुरी यांनी केलेय तर सूत्रसंचालन वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ निता गायकवाड यांनी मानले. कार्यक्रमासाठी विभाग प्रमुख डॉ. नाहिद खान, डॉ. सुनिता काळे,  डॉ.माधुरी कुलकर्णी, डॉ. वीणा भालेराव, डॉ. इरफाना सिद्दिकी, डॉ. जयश्री रोडगे आणि डॉ. विद्यानंद मनवर यांची उपस्थिती होती. प्रशिक्षणाचे आयोजन प्राचार्या डॉ. जया बंगाळे यांच्या मार्गदर्शनाखाली समन्वयक डॉ. शंकर पुरी यांनी केले. कार्यक्रमांमध्ये महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद नोंदवला.  कार्यक्रम यशस्वीतेसाठी महाविद्यालयातील श्री रवींद्र चंदाले, शितल मोरे, रमेश शिंदे, मारोती गिरी, प्रकाश जोंधळे, रामा शिंदे, अलीम शेख यांनी परिश्रम घेतले. 

Monday, March 21, 2022

परभणी कृषि विद्यापीठात देशाच्‍या विविधतेतील एकतेचे दर्शन ........ कुलगुरू मा डॉ अशोक ढवण

देशातील १५ राज्‍यातुन वनामकृवित नवप्रवेशित  विद्यार्थ्यांशी साधला कुलगुरू यांनी संवाद

भारत हा वैविध्‍यपुर्ण परंपरा जोपासलेला देश असुन राज्‍याराज्‍यानुसार परंपरा, खानपान, राहणीमान, भाषा यात विविधता दिसुन येते. दिवाळी, ओणम, ख्रिशमस यासारखे सण देशभर साजरे केले जातात, याच प्रमाणे परभणी कृषि विद्यापीठात इतर राज्‍यातील विविध सण महोत्‍सव विद्यार्थी मोठया उत्‍साहाने साजरे करतात. भारताची संस्कृती विविधनेने नटलेले असुन भारत विविधतेत एकता असलेला देश आहे. याच एकतेचे दर्शन म्‍हणजे परभणी कृषि विद्यापीठातही दिसुन येते, असे प्रतिपादन कुलगुरू मा डॉ अशोक ढवण यांनी केले.

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील परभणी मुख्‍यालयी असलेल्‍या कृषि महाविद्यालय, उद्यानविद्या महाविद्यालय, कृषि अभियांत्रिकी महाविद्यालय, अन्‍नतंत्र महाविद्यालय आणि सामुदायिक विज्ञान महाविद्यालयात भारतीय कृषि अनुसंधान परिषदेच्‍या माध्‍यमातुन देशातील १५ पेक्षा जास्‍त राज्‍यातील विद्यार्थी – विद्यार्थींनीनी सन २०२० व सन २०२१ मध्‍ये विविध पदवी व पदव्‍युत्‍तर अभ्‍यासक्रमास प्रवेश घेतला असुन करोना रोगाच्‍या प्रादुर्भाव नंतर विद्यापीठाचे नियमित वर्ग प्रारंभ झाले. या नवप्रवेशित विद्यार्थी – विद्यार्थीनीनी यांच्‍याशी दिनांक २१ मार्च रोजी कुलगुरू मा डॉ अशोक ढवण यांनी एका कार्यक्रमात संवाद साधला. व्‍यासपीठावर शिक्षण संचालक डॉ धर्मराज गोखले, प्राचार्य डॉ सय्यद ईस्‍माईल, प्राचार्य डॉ उदय खोडके, प्राचार्य डॉ जी एम वाघमारे, प्राचार्या डॉ जया बंगाळे आदींची प्रमुख उपस्थिती होती.

कुलगुरू मा डॉ अशोक ढवण पुढे म्‍हणाले की, गेल्‍या दोन वर्षात विद्यापीठात साधारणत: दोनशे पेक्षा विद्यार्थी देशातील १५ पेक्षा जास्‍त राज्‍यातुन प्रवेशित झाले आहेत. बहुतांश विद्यार्थी ग्रामीण व दुर्गम भागातुन आलेले असुन विविध परंपरा आणि भाषाची पार्श्‍वभुमी आहे. सदरिल विद्यार्थी शैक्षणिक क्षेत्रात आघाडीवर असतातच तसेच क्रीडा व कला गुणांनी निपुण असतात. या विद्यार्थी पासुन महाराष्‍ट्रातील विद्यार्थी अनेक बाबी आत्‍मसात करतात, तसेच इतर राज्‍यातील विद्यार्थी अनेक चांगल्‍या बाबी महाराष्‍ट्रातील विद्यार्थ्‍यांकडुन शिकतात. यामुळे संस्‍कृतीचेही देवाणघेवाण होते, व्‍यक्‍तीमत्‍व विकासित होते. विद्यार्थी शैक्षणिक प्रगतीसह क्रीडा व सां‍स्कृतिक विकासाकरिता विद्यापीठ सातत्‍याने प्रयत्‍न करते. विद्यार्थ्‍यांना येणा-या शैक्षणिक अडजणीबाबत विद्यापीठ सजग असल्‍याचे सांगुन त्‍यांनी वि़द्यार्थीच्‍या विविध शैक्षणिक समस्‍या व अपेक्षा जाणुन घेतल्‍या.

यावेळी मार्गदर्शनात शिक्षण संचालक डॉ धर्मराज गोखले म्‍हणाले की, विद्यापीठात सुसज्‍ज ग्रंथालय असुन सर्व प्रयोगशाळा अद्यायावत आहेत. विद्यापीठाने अनेक अधिकारी व शास्त्रज्ञ देशाला व राज्‍याला दिले असुन परभणी कृषि महाविद्यालयातील विद्यार्थी गेल्‍या तीन वर्षापासुन पदव्‍युत्‍तर सामाजिक पात्रता परिक्षेत आघाडीवर आहे. विद्यार्थीच्‍या व्‍यक्‍तीमत्‍व विकासावर महाविद्यालयात विशेष भर दिला जात असल्‍याचे ते म्‍हणाले.

कार्यक्रमाचे प्रास्‍ताविक डॉ सय्यद ईस्‍माईल यांनी केले. सुत्रसंचालन डॉ रणजित चव्‍हाण यांनी केले तर आभार डॉ प्रविण वैद्य यांनी मानले. कार्यक्रमास विद्यापीठातील प्राध्‍यापक, कर्मचारी व विद्यार्थी मोठया संख्‍येने उपस्थित होते.


Sunday, March 20, 2022

नॅनो यूरीयाचा वापर करून पारंपारिक यूरीयाची खत मात्रा ५० टक्क्यानी कमी करणे शक्‍य ........ वनामकृविचे डॉ. गजानन गडदे

मौजे जांब येथे आयोजित पिक परिसंवाद कार्यक्रमात प्रतिपादन

शेतकरी विविध पिकामध्ये यूरीया खताचा वापर मोठ्या प्रमाणावर करतात, ज्यामुळे कालांतराने जमिनीची पोत खराब होते. याला पर्याय म्हणून बाजारामध्ये उपलब्ध असलेला नॅनो यूरीया हा अतिशय उपयुक्त असा खत असून याचे वापरण्याचे प्रमाण पारंपारिक युरीयाच्या तुलनेत अतिशय कमी आहे. नॅनो यूरीयाची ५०० मिली ची एक बॉटल एक बॅग यूरीयाचे काम करते, असे प्रतिपादन वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील कृषि तंत्रज्ञान माहिती केंद्राचे व्यवस्थापक डॉ. गजानन गडदे यांनी दिनांक १६ मार्च रोजी आयोजित मौजे जांब येथे पार पाडलेल्या पिक परिसंवाद कार्यक्रमात केले.

कार्यक्रमाच्‍या अध्यक्षस्‍थानी जिल्हा परिषद सदस्य श्री.बाळासाहेब रेंगे होते तर  प्रमुख पाहुणे म्हणून कृषि तंत्रज्ञान माहिती केंद्राचे व्यवस्थापक डॉ.गजानन गडदे, परभणी कृषि विज्ञान केंद्राचे प्रा. अमित तुपे, सरपंच श्री.रामभाऊ रेंगे, उपसरपंच श्री. बंडू लाड, प्रगतशील शेतकरी श्री. संग्राम भैया, प्रतिष्ठीत नागरीक श्री. कल्याणरावजी रेंगे, इफको कंपनीचे श्री.अजय वाढे, आयपीएल कंपनीचे श्री.खर्चे आदींची प्रमुख उपस्थिती होती.

मार्गदर्शनात डॉ. गडदे पुढे म्‍हणाले की, नॅनो यूरीयाचा २ ते ४ मिली प्रती लिटर पाणी या प्रमाणे पिक ३० ते ३५ दिवसाचे असताना पहीली फवारणी व ५० ते ५५ दिवसाचे असतानी दुसरी फवारणी करावी. तसेच पारंपारिक यूरीया खताचा पहिला डोस लागवडीच्या वेळेस देणे गरजेचे आहे आणि लागवडीनंतर लागणा-या यूरीयाचा पुरवठा नॅनो यूरीयाच्या फवारणी व्दारे  करावे. याचाच अर्थ असा आहे की ५० टक्के पारंपारिक यूरीयाची मात्रा कमी करता येते. कार्यक्रमात उन्हाळी सोयाबीन, ऊस, मोसंबी आदि पिकांच्या बाबतीत खत व पाणी व्यवस्थापन बाबत डॉ.गडदे व डॉ. तुपे यांनी सविस्तर मार्गदर्शन केले. कार्यक्रमास १०० पेक्षा जास्‍त शेतकरी उपस्थित होते.