Thursday, July 24, 2025

वनामकृविच्या चाकूर येथील पदव्युत्तर कृषि व्यवसाय व्यवस्थापन संस्थेचे उल्लेखनीय यश: कोरोमंडल इंटरनॅशनल प्लेसमेंट ड्राइव्हमध्ये ७ विद्यार्थ्यांची उच्च पॅकेजसह निवड

 माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांनी केले यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाच्या चाकूर (जिल्हा लातूर) येथील पदव्युत्तर कृषि व्यवसाय व्यवस्थापन संस्थेत नुकतेच कोरोमंडल इंटरनॅशनल लिमिटेड या नामांकित कंपनीद्वारे प्लेसमेंट ड्राइव्हचे आयोजन करण्यात आले. या ड्राइव्हमध्ये महाविद्यालयातील अंतिम वर्षाच्या १३ विद्यार्थ्यांनी रिटेल स्टोर मॅनेजर या पदासाठी मुलाखती दिल्या. यापैकी कु. स्वरूपा दुधाळे, साक्षी देऊळकर, कु. वैष्णवी झाडे, कु. वैष्णवी पाटील, शिवम पवार, महेश जाधव व आकाश शिंदे या ०७ विद्यार्थ्यांची निवड झाली.  असून, त्यांना कंपनीकडून ८ ते ८.५ लाख रुपये (इन्सेंटिव्हसह) एवढे आकर्षक वेतन कामगिरीच्या आधारावर मिळणार आहे.

या यशस्वी विद्यार्थ्यांचे मन:पूर्वक अभिनंदन करताना, माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि आणि शिक्षण संचालक डॉ. भगवान असेवार यांनी त्यांच्या उत्तम कामगिरीचे विशेष कौतुक केले असून, भविष्यातील उज्ज्वल वाटचालीसाठी त्यांना हार्दिक शुभेच्छा दिल्या. तसेच शिक्षण संचालक डॉ. भगवान असेवार यांनीही यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून महाविद्यालयातील इतर विद्यार्थ्यांनीही असेच आपले यश मिळवावे असे आवाहन केले.

सदरील प्लेसमेंट ड्राइव्हसाठी कंपनीचे वरिष्ठ प्रतिनिधी उपस्थित होते. यामध्ये श्रीमती मानसा (एचआर झोन, महाराष्ट्र), श्री कौशिक कुमार (एचआर एक्झिक्युटिव्ह, झोन महाराष्ट्र), श्री कन्हैय्या कोंडेकर (रिटेल झोनल हेड, महाराष्ट्र) आणि श्री विष्णू शेम्बडे (रिटेल, एएमआरओ) यांचा समावेश होता. त्यांनी विद्यार्थ्यांच्या मुलाखती घेऊन त्यांच्या कौशल्याची आणि ज्ञानाची पडताळणी केली.

तसेच या वर्षी अंतिम वर्षामधील एकूण ३२ विद्यार्थ्यांपैकी १६ जणांनी प्लेसमेंट ड्राइव्ह च्या माध्यमातून अभ्यासक्रम पूर्ण होण्या अगोदर नामांकित कंपन्या जसे की, कोरोमंडल आंतरराष्ट्रीय कंपनी, कलश सीड्स, गोदरेज ॲग्रोव्हेट, स्वाल कॉर्पोरेशन लिमिटेड, अदामा लिमिटेड आणि पालवी ॲग्रो या कंपन्यांमध्ये चांगल्या वेतन पॅकेजसह नोकरीच्या संधी मिळवल्या आहेत.

या यशस्वी प्लेसमेंटमुळे महाविद्यालयाची कीर्ती आणि विद्यार्थ्यांचे उज्ज्वल भविष्य अधोरेखित झाले आहे. या यशाचे श्रेय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. संतोष कांबळे, प्लेसमेंट इंचार्ज डॉ. ज्योती झिरमिरे आणि प्रा. अभिषेक राठोड यांच्या अथक प्रयत्नांना देण्यात येत आहे. डॉ. कांबळे यांनी विद्यार्थ्यांना नेहमीच प्रोत्साहन देत त्यांना करिअरच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न केले, तर डॉ. झिरमिरे यांनी प्लेसमेंट ड्राइव्हच्या यशस्वी आयोजनासाठी अथक परिश्रम घेतले.

या यशस्वी प्लेसमेंट ड्राइव्हमुळे विद्यार्थ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून, महाविद्यालयाच्या या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे. भविष्यातही अशा संधी विद्यार्थ्यांना उपलब्ध करून देण्यासाठी महाविद्यालय कटिबद्ध असल्याचे अधिष्ठाता डॉ. संतोष कांबळे यांनी सांगितले. या ड्राइव्हच्या यशस्वी आयोजनासाठी अधिष्ठाता डॉ. संतोष कांबळे, प्रा. डॉ. ज्योती झिरमिरे, प्रा. श्री. अभिषेक राठोड, कक्ष अधिकारी श्री. आशिष मैदरकर, श्री. पितांबर पिरंगे, श्री. कैलास शिंदे, श्री. निखिल सूर्यवंशी, श्री. शिवानंद चिकाळे, श्री. विष्णू कांबळे, श्री. वाजिद शेख तसेच प्रथम वर्षातील सर्व विद्यार्थ्यांनी विशेष मेहनत घेतली.


Wednesday, July 23, 2025

वनामकृवितील कृषि विस्तार शिक्षण विभागाच्या अभ्यास मंडळाची ७३ वी बैठक संपन्न

 

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी येथील कृषि विस्तार शिक्षण विभागाच्या अभ्यास मंडळाची ७३ वी बैठक दिनांक २३ जुलै रोजी संपन्न झाली.

या बैठकीस कृषि महाविद्यालय, परभणीचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. प्रवीण वैद्य प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. ही बैठक विभागप्रमुख व अभ्यास मंडळाचे अध्यक्ष डॉ. राजेश कदम यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली.

या वेळी छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषदेचे कृषि विकास अधिकारी श्री. प्रकाश पाटील तसेच अर्धापूर तालुक्यातील शेलगाव येथील प्रगतशील शेतकरी श्री. हनुमंत उर्फ युवराज माणिकराव राजगोरे-पाटील यांची विशेष उपस्थिती होती.

या बैठकीत पदवी, पदव्युत्तर आणि आचार्य पदवी अभ्यासक्रमातील एकूण ३० विद्यार्थ्यांनी (२६ पदवी व पदव्युत्तर आणि ४ आचार्य पदवी) त्यांच्या संशोधन प्रकल्पांची रूपरेषा सादर केली. सर्व सदस्यांच्या सूचनांनंतर त्यास मंजुरी देण्यात आली.

प्रमुख पाहुणे डॉ. प्रवीण वैद्य यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की, विद्यापीठात विकसित होणाऱ्या तंत्रज्ञानाच्या अंमलबजावणीसंबंधी वास्तव माहिती व परिणामकारकता विस्तार शिक्षण विभागाच्या माध्यमातूनच संशोधनाच्या आधारावर समजते. यासाठी द्विमार्गीय संवादाच्या पद्धतीचा अवलंब करीत तंत्रज्ञान पोहोचवावे, अंमलबजावणीतील अडचणी संशोधन केंद्राला कळवाव्यात आणि त्यावर आधारित शिफारसी तयार करून सामाजिक-आर्थिक विकासासाठी प्रयत्न करावेत, असे ते म्हणाले.

अध्यक्षीय भाषणात डॉ. राजेश कदम यांनी सांगितले की, दरवर्षी विभागातील ३२ विद्यार्थी मराठवाड्यातील सुमारे ४,००० शेतकऱ्यांपर्यंत पोहोचून माहिती गोळा करतात. त्यांनी विद्यार्थ्यांना अचूक माहिती संकलनावर भर देत समाजासाठी उपयुक्त संशोधन शिफारसी देण्याचे आवाहन केले. तसेच, "विद्यापीठाचे दूत" म्हणून कार्य करत शेतकऱ्यांपर्यंत संशोधन पोहोचवावे, असेही त्यांनी सांगितले.

श्री. हनुमंत राजगोरे-पाटील यांनी आपल्या मनोगतात नमूद केले की, शास्त्रज्ञांच्या शिफारशींच्या आधारेच शासन धोरणं व योजना ठरवल्या जातात, त्यामुळे अचूक संशोधन अत्यावश्यक आहे.

श्री. प्रकाश पाटील यांनी विद्यार्थ्यांनी संपूर्णतः शास्त्रीय दृष्टिकोन अंगीकारावा, लॉजिकल रिझनिंग वापरून विश्लेषण करावे, आणि भरपूर माहिती संकलित करून विचारपूर्वक निष्कर्ष काढावेत, असे सांगितले. त्यांनी जिल्हा परिषद राबवत असलेल्या विविध योजनांचा उल्लेख करत, त्यांचा अभ्यास विभागाने करावा, असे सुचवले. त्यांनी डीबीटी योजना, रासायनिक खतांचा वापर आणि त्यावरील खर्च यासंदर्भातही संशोधनाची गरज व्यक्त केली. यावेळी त्यांनी एक महत्त्वाचा मुद्दा उपस्थित केला की, बहुतांश शेतकरी सरकारी अधिकाऱ्यांकडून योजना माहितीसाठी येतात, परंतु तांत्रिक मार्गदर्शनासाठी खाजगी संस्थांवर अवलंबून राहतात. त्यामुळे सरकारी अधिकाऱ्यांनी आपली विश्वासार्हता वाढविण्याची गरज आहे, असे ते म्हणाले.

बैठकीचे सूत्रसंचालन व आभारप्रदर्शन अभ्यास मंडळाचे सचिव डॉ. सुनीलदत्त जक्कावाड यांनी केले. या बैठकीस परभणी आणि लातूर येथील विस्तार शिक्षण विभागाचे प्राध्यापक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.








Tuesday, July 22, 2025

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठात “शुद्ध देशी गोवंश जतन आणि संवर्धन दिन” साजरा

 माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांच्या नेतृत्वाखाली संकरीत गो पैदास प्रकल्पाचा पुढाकार


वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी अंतर्गत संकरीत गो पैदास प्रकल्पाची स्थापना सन १९७५ मध्ये करण्यात आली. या प्रकल्पामागचा मुख्य उद्देश म्हणजे देशी जातीच्या गाईंचे संकरीकरण करून दुग्धोत्पादन वाढवणे आणि त्याचबरोबर देशी गोवंशाचे संवर्धन करणे हा आहे. मराठवाड्यातील प्रसिद्ध देवणी जातीची जनावरे ही दुहेरी उपयोगिता (दुग्धोत्पादन व शेतीकाम) यासाठी ओळखली जातात.

सद्यःस्थितीत प्रकल्पात होलस्टीन फ्रिजियन (होलदेव) व देवणी गोवंशाचे एकूण १७० जनावरे आहेत, त्यापैकी ९० जनावरे ही देवणी गोवंशाची आहेत. महाराष्ट्र शासनाच्या कृषि, पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास व मत्स्यव्यवसाय विभागाच्या दिनांक १३ जून २०२५ च्या आदेशानुसार राज्यात दरवर्षी २२ जुलै रोजी “शुद्ध देशी गोवंश जतन आणि संवर्धन दिन” साजरा करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

देशी गायीच्या दुधाची पौष्टिकता, तसेच शेण व गोमुत्राच्या उपयोगामुळे गायीस "कामधेनू" असे मानले जाते. राज्यातील विविध भागांत विविध देशी गायींच्या जाती आढळतात. उदा. मराठवाड्यात देवणी, लालकंधारी; पश्चिम महाराष्ट्रात खिल्लार; उत्तर महाराष्ट्रात डांगी; तर विदर्भात गवळाऊ. मात्र, देशी गायींची संख्या दिवसेंदिवस घटत चालल्याचे चित्र आहे. त्यामुळे त्यांच्या संवर्धनासाठी शासनाने २० सप्टेंबर रोजीच्या निर्णयान्वये देशी गायीस “राज्यमाता गोमाता” म्हणून घोषित केले आहे.

या पार्श्वभूमीवर वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी अंतर्गत संकरीत गो पैदास प्रकल्प येथे दिनांक २२ जुलै २०२५ रोजी “शुद्ध देशी गोवंश जतन आणि संवर्धन दिन” साजरा करण्यात आला. कार्यक्रमाचे आयोजन माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांच्या नेतृत्वाखाली, संचालक संशोधन डॉ. खिजर बेग यांच्या पुढाकाराने, तसेच प्रकल्प प्रमुख व विभाग प्रमुख डॉ. गजेंद्र लोंढे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले.

कार्यक्रमाची सुरुवात प्रातिनिधिक स्वरूपात देवणी गायीची पूजा करून करण्यात आली. प्रारंभी विभाग प्रमुख डॉ. गजेंद्र लोंढे यांनी देशी गोवंशातील विविधतेचे महत्त्व, वैदिक काळापासून चालत आलेली संवर्धन परंपरा, तसेच सेंद्रिय शेतीतील गोवंशाचे योगदान विषद केले. त्यांनी शेतकऱ्यांसाठी पशुपालनाचा पर्याय आत्महत्यांचे प्रमाण कमी करण्यासाठी महत्त्वाचा असल्याचेही नमूद केले.

पशुविज्ञान शास्त्रज्ञ डॉ. एस. एस. देशमुख यांनी प्रकल्पात १९७५ पासून देवणी गोवंशाचे संवर्धन आणि अभ्यास करण्यात येत असल्याची माहिती दिली. सहयोगी प्राध्यापक डॉ. डी. व्ही. बैनवाड यांनी प्रास्ताविकातून कार्यक्रमाचे महत्त्व स्पष्ट केले. डॉ. पी. व्ही. पडघान आणि शास्त्रज्ञ डॉ. नरेंद्र कांबळे यांनीही देशी गोवंशाच्या ऐतिहासिक व सांस्कृतिक महत्त्वावर प्रकाश टाकला.

पदव्युत्तर विद्यार्थी श्री. सार्थक वाजे व कु. सृष्टी भिंगारडे यांनी संकरीत गो पैदास प्रकल्पातील गोवंश संवर्धन व व्यवस्थापनासंबंधीचे आपले अनुभव शेअर केले. वरिष्ठ संशोधन सहाय्यक श्री. जी. पी. भोसले यांनी आभार प्रदर्शन केले. या कार्यक्रमात कनिष्ठ संशोधन सहाय्यक श्री. रवि काळे, कंत्राटी पशुधन पर्यवेक्षक श्री. महेंद्र कचरे, कंत्राटी गुत्तेदार श्री. माणिक शिंदे, तसेच पदव्युत्तर व आचार्य पदवीचे विद्यार्थी, प्रकल्पातील कामगार व भगिनी वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.



कापूस उत्पादकता व मूल्य साखळी रूपांतरण विषयक राष्ट्रीय परिषदेत वनामकृविचे माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांचे सखोल मार्गदर्शन

 

भारतीय अन्न व कृषी परिषद (ICFA) यांच्या वतीने "कापूस उत्पादकता व मूल्य साखळी रूपांतरण" या विषयावर राष्ट्रीय परिषदेचे आयोजन २२ जुलै २०२५ रोजी इंडिया इंटरनॅशनल सेंटर, नवी दिल्ली येथे करण्यात आले.

या परिषदेत “भारतामध्ये कापसाच्या वाढीसाठी धोरणात्मक व नियामक पाठबळ" या विषयास अनुसरून उद्घाटन सत्राचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी कापूस उत्पादकतेत वाढ घडवण्यासाठी धोरणात्मक आणि नियामक पाठबळ अत्यंत आवश्यक असल्याचे सांगून संपूर्ण मूल्य साखळीत सुधारणा केल्यास कापूस क्षेत्राला अधिक स्थैर्य व आर्थिक लाभ मिळू शकतो, असे मत वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांनी आपल्या मार्गदर्शनात व्यक्त केले. पुढे त्यांनी कापसाच्या उत्पादनात होत असलेल्या घटीची प्रमुख कारणे स्पष्ट केली. हवामानातील अनियमितता, कीड व्यवस्थापन, उत्पादनाला मिळणारे बाजारमूल्य, तसेच संशोधन व विस्तार सेवांमधील अंतर ही त्यामागची महत्त्वाची कारणे असल्याचे त्यांनी नमूद केले.

कापसाच्या मूल्य साखळीतील सुधारणेसाठी त्यांनी "उत्पादन, प्रक्रिया, साठवणूक, विपणन आणि निर्यात" या सर्व टप्प्यांमध्ये समन्वय साधण्याचे महत्त्व सांगितले. कापूस उत्पादक शेतकऱ्यांना सूतगिरण्या, वस्त्र उद्योग व निर्यातदारांशी थेट जोडण्याची गरज त्यांनी व्यक्त केली, जेणेकरून शेतकऱ्यांना अधिक लाभदायक दर मिळवून देता येतील. याशिवाय, कीडप्रतिरोधक वाणांचा वापर, सूक्ष्म सिंचन पद्धती, हवामान आधारित सल्ला व डिजिटल प्लॅटफॉर्मचा प्रभावी वापर यावर त्यांनी विशेष भर दिला.

या वेळी मराठवाड्यातील शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी विद्यापीठाने विकसित केलेल्या नांदेड ४४’ या वाणाची माहिती त्यांनी दिली. यासोबतच विद्यापीठाने कापूस पिकावर केलेल्या संशोधनाचा आढावा घेत एनएच २२०३७ बीटी बीजी २’ आणि एनएच २२०३८ बीटी बीजी २’ हे बीटी बीजी-२ प्रकारातील सरळ वाण सादर केले असल्याची माहितीही त्यांनी उपस्थितांना दिली.

या परिषदेच्या उदघाटन समारंभास कर्नाटक राज्य कृषी किंमत आयोगाचे अध्यक्ष व पंतप्रधान शेतकरी उत्पन्न दुप्पट योजना टास्क फोर्सचे माजी अध्यक्ष श्री अशोक दलवाई (निवृत्त आयएएस), इंडियन टेक्स्टाइल्स इंडस्ट्री फेडरेशनच्या महासचिव श्रीमती चंद्रिमा चॅटर्जी, वस्त्रोद्योग मंत्रालयाचे संचालक श्री पुर्णेश गुरु राणी (IRS), भारतीय अन्न व कृषी परिषदेचे महासंचालक डॉ. तरुण श्रीधर आदी मान्यवरांनी उपस्थिती लावली व आपले विचार मांडले. कार्यक्रमात कपाशी उत्पादनातील आव्हाने, प्रक्रिया उद्योगाची क्षमता, जागतिक निर्यात संधी, तंत्रज्ञानाचा वापर व शाश्वत शेती या मुद्द्यांवर सखोल चर्चा झाली.

परिषदेत देशभरातील कृषी विद्यापीठांचे तज्ज्ञ, संशोधक, धोरणकर्ते, उद्योजक आणि शेतकरी प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते.








Sunday, July 20, 2025

कृषि विज्ञान केंद्रांची ८वी वार्षिक कार्यशाळा भुज, कच्छ (गुजरात) येथे सुरू

 वनामकृविचे माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि कार्यशाळेचे मुख्य अतिथी

महाराष्ट्रगुजरात आणि गोवा राज्यांतील कृषि विज्ञान केंद्रांची (KVKs) ८वी वार्षिक विभागीय कार्यशाळा दिनांक २० ते २२ जुलै २०२५ या कालावधीत भुज, कच्छ (गुजरात) येथे आयोजित करण्यात आली आहे. या कार्यशाळेचे आयोजन भारतीय कृषि अनुसंधान परिषद - कृषि तंत्रज्ञान अनुप्रयोग अनुसंधान संस्था (ICAR-ATARI), विभाग क्रमांक VIII, पुणे यांच्या वतीने करण्यात आले असून कच्छ I, कच्छ II, मेहसाणा व पाटण येथील कृषि विज्ञान केंद्रांचे सहकार्य लाभले आहे.

या कार्यशाळेच्या उद्घाटन समारंभास वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाचे माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि हे मुख्य अतिथी म्हणून उपस्थित होते. या प्रसंगी त्यांनी विशेष भाषण केले. आपल्या भाषणात त्यांनी ‘महाविस्तार ॲप’चे महत्त्व सांगून कृषि विस्ताराच्या नव्या दिशा, संशोधनाचे महत्त्व आणि ते शेतकऱ्यांपर्यंत प्रभावीपणे पोहोचवण्याची आवश्यकता यावर भर दिला. यावेळी त्यांनी शेतकऱ्यांसाठी प्रभावी विस्तार कार्य कसे करता येईल, याबाबत विविध विस्तार साधनांच्या वापराबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. तसेच, वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ "शेतकरी देवो भव:" या भावनेतून कार्य करत असून, शेतकऱ्यांसाठी राबविण्यात येणारे माझा एक दिवस माझ्या बळीराजासोबत’ आणि ऑनलाइन शेतकरी-शास्त्रज्ञ कृषि संवाद’ हे देशातील आगळे-वेगळे मॉडेल्स शास्त्रज्ञांसमोर मांडले. या उपक्रमांमुळे शेतकऱ्यांना मोठा लाभ होत असल्याचे त्यांनी नमूद केले.

अशा प्रभावी विस्तार मॉडेल्सचा अवलंब सर्व कृषि विज्ञान केंद्रांनी करून शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी कार्य करावे, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले. याबरोबरच, कृषि विज्ञान केंद्रे संशोधन केंद्रांच्या स्वरूपात पुढे यावीत, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

यावेळी नवी दिल्ली येथील भाकृअपचे कृषि विस्तार विभागाचे माजी उपमहासंचालक डॉ. पी. दास, सबौर येथील बीएयूचे माजी कुलगुरू डॉ. ए. के. सिंह, मोहनपूर येथील बीसीकेव्हीचे माजी कुलगुरू व आटारी, झोन-VIII, पुणे येथील साइट सिलेक्शन कमिटीचे अध्यक्ष डॉ. एम. एम. अधिकारी, तसेच सदाऊ (मुंद्रा) येथील आरएआरडीएसचे ट्रस्टी श्री. रजनीकांत पटवा यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले.

नवी दिल्ली येथील भाकृअपचे कृषि विस्तार विभागाचे सहायक महासंचालक डॉ. आर. रॉय बर्मन यांनी ऑनलाइन माध्यमातून आपले विचार मांडले. कार्यक्रमात आटारी, पुणे संस्थेच्या कार्याचा आढावा सादर करताना संचालक डॉ. एस. के. रॉय यांनी संस्थेच्या विविध उपक्रमांची माहिती दिली. तसेच, आयएफएफसीओचे मुख्य कृषि अधिकारी डॉ. तरनिंदर सिंग यांनी आयएफएफसीओच्या विविध उपक्रमांची सविस्तर माहिती दिली. या कार्यशाळेत विद्यापीठाचे विस्तार शिक्षण संचालक डॉ राकेश अहिरे यांच्यासह मराठवाड्यातील सर्व कृषि विज्ञान केंद्रांच्या कार्यक्रम समन्वयकानीं सहभाग नोंदविला घेतला आहे.

कार्यक्रमाच्या शेवटी, आटारी-पुणे येथील प्राचार्य वैज्ञानिक डॉ. शाकिर अली सय्यद यांनी उपस्थित मान्यवरांचे आभार मानले. या कार्यशाळेत तीनही राज्यांतील कृषि विज्ञान केंद्रांचे शास्त्रज्ञ, तज्ज्ञ व अधिकारी सहभागी होत असून, विविध कृषि तंत्रज्ञान, विस्तार कार्यपद्धती, संशोधन प्रगती, शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवले जाणारे नवकल्पनांवरील चर्चासत्रे व आढावा सादरीकरणे आयोजित करण्यात येत आहेत.

या कार्यक्रमाचा उद्देश म्हणजे कृषि विज्ञान केंद्रांच्या कार्यक्षमतेत वाढ करून शेतकऱ्यांपर्यंत नावीन्यपूर्ण व शाश्वत तंत्रज्ञान पोहोचवणे आणि तिन्ही राज्यांमधील कृषि विज्ञान केंद्रांची मधील अनुभवांची देवाणघेवाण करणे हा आहे.




Saturday, July 19, 2025

वनामकृविच्या विद्यार्थ्याचे २२ वा अखिल भारतीय आंतर-कृषि विद्यापीठीय क्रीडा महोत्सवात यश

 माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांनी केले विद्यार्थ्याचे अभिनंदन


कुमारगंज (अयोध्या) येथील आचार्य नरेंद्र देव कृषि व तंत्रज्ञान विद्यापीठात २२ वा अखिल भारतीय आंतर-कृषि विद्यापीठीय क्रीडा महोत्सव २०२४-२५” नुकताच संपन्न झाला. या राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेत देशभरातील विविध कृषि विद्यापीठांतील विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला.

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणीच्या क्रीडा संघांनी विविध क्रीडा प्रकारांमध्ये सहभाग नोंदवला. या संघांना रवाना करताना माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांनी विशेष मार्गदर्शन व यशासाठी शुभेच्छा दिल्या.

या स्पर्धेत विद्यापीठाच्या गोळेगाव येथील कृषि महाविद्यालयातील विद्यार्थी श्री. ओम पोले यांनी ८०० मीटर शर्यतीत तिसरे स्थान (Bronze Medal) पटकावून उल्लेखनीय कामगिरी केली. त्यांच्या या यशामुळे विद्यापीठाचे राष्ट्रीय स्तरावर नाव उज्ज्वल झाले आहे.

विद्यार्थी ओम पोले यांच्या यशाबद्दल माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांनी अभिनंदन करून त्यांच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. या प्रसंगी विद्यापीठाचे शिक्षण संचालक डॉ. भगवान आसेवार, संशोधन संचालक डॉ. खिजर बेग, नियंत्रक श्री. प्रवीण निर्मळ, विद्यापीठ अभियंता श्री. दीपक कशाळकर, सहयोगी अधिष्ठाता डॉ. प्रवीण वैद्य, विद्यार्थी कल्याण अधिकारी डॉ. राजेश कदम, प्रशिक्षक प्रा. डी. एफ. राठोड व प्रा. शिनगारे यांची उपस्थिती होती.






शेतकऱ्यांच्या अडचणी जाणून घेतल्या, हिंगोली जिल्ह्यात ‘पिक लागवड खर्च काढण्याची योजना’अंतर्गत मान्यवर शास्त्रज्ञांचा दौरा

 

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाच्या कृषी अर्थशास्त्र विभागप्रमुख डॉ. सचिन मोरे आणि नवी दिल्ली येथील आंतरराष्ट्रीय अन्नधोरण संशोधन संस्था (IFPRI) वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. अंजनी कुमार यांनी हिंगोली जिल्ह्यातील पिक लागवड खर्च काढण्याची योजना’अंतर्गत निवडलेल्या क्लस्टर गावांना दिनांक १९ जुलै रोजी भेट दिली. या भेटीदरम्यान त्यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधून किमान आधारभूत किंमत (MSP) संदर्भातील अडचणी जाणून घेतल्या आणि त्यांना योग्य मार्गदर्शन केले.

संवादादरम्यान शेतकऱ्यांनी पारंपरिक शेतीतील अडचणी मांडल्या. त्यात मुख्यत्वे अलाभकारक दर, बाजारातील अनिश्चितता, अनियमित पर्जन्यमान, वाढते उत्पादन खर्च आणि हमीभावाचा अभाव अशा समस्या होत्या. या पार्श्वभूमीवर डॉ. अंजनी कुमार यांनी नमूद केले की, सध्या अनेक शेतकरी पारंपरिक शेतीऐवजी हळदसारख्या नगदी पिकांकडे वळत आहेत. या पिकांना चांगला दर मिळतो, धोका तुलनेने कमी असतो, तसेच देशांतर्गत व निर्यात बाजारात याला वाढती मागणी आहे.

या प्रसंगी सहयोगी प्राध्यापक डॉ. रणजित चव्हाण, कनिष्ठ संशोधन सहायक श्री शहाजी ढोले, श्री अजयराव राठोड, श्री प्रशांत मडावी व श्री बी. बी. कानडे हेही उपस्थित होते.

हा दौरा शेतकऱ्यांच्या समस्या समजून घेऊन त्यावर उपाय सुचविणारा ठरला असून, शेतीतील नव्या पर्यायांकडे वळण्यास शेतकऱ्यांना नवी दिशा देणारा झाला आहे.