Sunday, July 26, 2026

वनामकृविचे माननीय कुलगुरू म्‍हणुन प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांना चार वर्ष पुर्ण

माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांच्‍या नेतृत्‍वात विद्यापीठाचे उल्‍लेखनीय कार्य : चार वर्षांची यशस्वी कारकीर्द - नेतृत्व, नवोन्मेष आणि प्रगती

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाचे माननीय कुलगुरू म्‍हणुन प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांनी २५ जुलै २०२२ रोजी पदाची सुत्रे स्‍वीकारली, यास चार वर्ष पुर्ण होत आहेत. देश व राज्‍याच्‍या विकासातील शेती व शेतकरी हेच आधारस्‍तंभ असुन विद्यापीठाने ‘शेतकरी देवो भव:’ भावनेने कार्य करण्‍याचा संकल्‍प त्‍यांनी आपल्‍या पहिल्‍याच भाषणात व्‍यक्‍त केला. कृषि संशोधन व शिक्षण क्षेत्रात देशातील अग्रगण्‍य संस्था नवी दिल्‍ली येथील भारतीय कृषि संशोधन संस्‍थेत त्‍यांनी ३० वर्षापेक्षा जास्‍त काळ सेवा केली. राष्‍ट्रीय व आंतरराष्‍ट्रीय पातळीवरील गाढा अनुभव त्‍यांना आहे. परभणी विद्यापीठासमोर अनेक समस्‍या समोर असतांना उपलब्‍ध मनुष्‍यबळ आणि साधनसामुग्रीचा कार्यक्षम वापर माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांच्‍या नेतृत्‍वाखाली कृषि शिक्षण, संशोधन आणि विस्‍तार शिक्षण या तिन्‍ही क्षेत्रात विद्यापीठाची घोडदौड सुरू आहे. गेल्‍या चार वर्षातील महत्‍वपुर्ण बाबींचा थोडक्‍यात आढावा.

विद्यापीठास ‘ए ग्रेड’ मानांकनासह आयसीएआर द्वारा पाच वर्षांसाठी अधिस्वीकृती

विद्यापीठास भारतीय कृषि अनुसंधान परिषदेच्या (आयसीएआर) राष्ट्रीय कृषि शिक्षण अधिस्वीकृती समितीद्वारा प्रतिष्ठेचे ‘ए ग्रेड’ मानांकनासह अधिस्‍वीकृती प्राप्त झाली. विद्यापीठास १ एप्रिल २०२३ ते ३१ मार्च २०२८ या कालावधीसाठी अधिस्वीकृती प्रदान करण्यात आली असून या मूल्यांकनात विद्यापीठास उच्चांकी ‘३.२१’ गुण प्राप्त झाले. ही अधिस्वीकृती विद्यापीठाच्या शैक्षणिक गुणवत्ता, संशोधनातील सातत्य व विस्तार सेवांतील कार्यक्षमतेची अधिकृत पावती आहे. माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांच्या दूरदृष्टीपूर्ण नेतृत्व व प्रभावी मार्गदर्शनामुळे हे ‘अ’ श्रेणी मानांकनासह अधिस्‍वीकृती प्राप्त झाली. या अधिस्वीकृतीमुळे विद्यापीठाची शैक्षणिक आणि संशोधन क्षेत्रातील प्रतिष्ठा अधिक उंचावली असून, मराठवाड्यातील कृषि शिक्षणाला नवसंजीवनी लाभली आहे.  ही अधिस्वीकृती विद्यापीठाच्या राष्ट्रीय स्तरावरील शैक्षणिक विश्वासार्हतेला बळकटी देणारी असून, विद्यार्थ्यांसाठी गुणवत्तापूर्ण कृषि शिक्षणाच्या नव्या संधी खुल्या करणारी ठरणार आहे. तसेच विद्यापीठानी भारतीय शैक्षणिक संस्था मूल्यांकन प्रणाली (आयआयआरएफ – IIRF) २०२६ च्या कृषि व उद्यानविद्या विद्यापीठांच्या गटात राष्ट्रीय स्तरावर ३४ वा आणि राज्यात प्रथम क्रमांक मिळवून एक मानाचा ठसा उमटवला आहे.

राष्‍ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० ची अमंलबजावणी

राज्‍यातील कृषि विद्यापीठ नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० राबविण्‍यास शैक्षणिक वर्ष २०२४-२५ मध्‍ये सुरूवात झाली असुन सदर धोरण कृषि विद्यापीठात प्रभावीपणे राबविण्‍याकरिता माननीय कुलगुरू यांच्‍या मार्गदर्शनाखाली विविध पातळीवर कार्य चालु आहे.

विद्यापीठ बीजोत्‍पादन वाढ

विविध पिकांच्‍या विद्यापीठ विकसित वाणाच्‍या दर्जेदार बियाणास शेतकरी बांधवामध्‍ये मोठी मागणी आहे, यात सोयाबीन, तुर, ज्‍वारी आदीच्‍या वाणास शेतकरी बांधवाची विशेष पसंती लक्षात घेता बीजोत्‍पादन वाढ करणे आवश्‍यक होते. विद्यापीठातील मध्‍यवर्ती प्रक्षेत्र विभागाकडे स्‍थापनेपासुन मोठया प्रमाणावर जमिनीचे क्षेत्र उपलब्‍ध आहे. या क्षेत्रावर १९७२ ते २००१ दरम्‍यान बीजोत्‍पादन घेतले जात होते, परंतु गेल्‍या काही वर्षापासुन निधी व मनुष्‍यबळ अभावी यातील बहुतांश क्षेत्र लागवडीखाली आणण्‍यात अडचणी निर्माण झाल्‍या. गेल्‍या चार वर्षात विद्यापीठाचे माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांनी विद्यापीठाचे बीजोत्‍पादन वाढ करण्‍याच्‍या उद्देश्‍याने मध्‍यवर्ती प्रक्षेत्र विकासाकडे विशेष लक्ष दिले. विद्यापीठाची इंचनइंच जमीन वापराखाली आणण्‍याचा मानस माननीय कुलगुरू यांनी व्‍यक्‍त केला आहे.  पडित जमीन लागवडीखाली आणण्‍यातील प्रमुख अडसर ठरणा-या क्षेत्रावरील काटेरी झाडेझुडपे काढुण जमिनीची नागंरणी, मोगडणी, चा-या काढणे इत्‍यादी मशागतीचे कामे करण्‍यात आली. याकरिता विद्यापीठातील विविध प्रकल्‍प व योजनातील ट्रॅक्‍टर्स, आवश्‍यक औजारे, जेसीबी यांचा वापर करण्‍यात आला. मध्‍यवर्ती प्रक्षेत्रावरील जवळपास ३००० एकर जमिन क्षेत्र या पैदासकार बीजोत्‍पादन हाती घेण्‍यात आले आहे. विद्यापीठ परिसरात नवीन चार मोठया क्षमतेची शेततळी निर्माण करण्‍यात आली असुन जुन्या मोठ्या शेततळयाची दुरूस्‍ती करण्‍यात आली आहे, या माध्‍यमातुन ८ – ९ कोटी लिटर पाण्‍याची साठवण क्षमता शक्‍य होत आहे. यामुळे बीजोत्‍पादनाकरिता संरक्षित सिंचन देणे शक्य होत आहे.  यामुळे खरीप व रबी हंगामामध्‍ये विद्यापीठाचे बीजोत्‍पादन वाढीस मदत झाली. यामुळे विद्यापीठ विकसित वाणांचे जास्‍तीत जास्‍त बियाणे शेतकरी बांधवाना उपलब्‍ध होणार आहे. तसेच बीजोत्‍पादनाकरिता २५० पेक्षा जास्‍त शेतकरी उत्‍पादक कंपन्‍यासोबत करार करण्‍यात आले आहेत.

देश-विदेशातील विविध नामांकित संस्‍थासोबत सामंजस्‍य करार

राष्‍ट्रीय व जागतिक स्‍तरावरील कृषि क्षेत्रातील संशोधन व ज्ञानाची माहिती विद्यापीठ शास्‍त्रज्ञ व विद्यार्थ्‍यांना अवगत असणे आवश्‍यक आहे. शेतकरी हाच विकासाचा केंद्रबिंदु असुन शेती विकास व शेतकरी कल्‍याणाकरिता सर्व शासकीय व अशासकीय संस्‍थांनी एकत्रित कार्य करण्‍यावर माननीय कुलगुरू यांचा भर असुन त्‍यांच्‍या कार्यकाळात देश – विदेशातील संस्‍थासोबत आजपर्यंत ४० सामंजस्‍य करार करण्‍यात आले आहेत. यात जगातील अग्रगण्‍य विद्यापीठे अमेरिकेतील कन्‍सस स्‍टेट युनिवर्सिटी, फ्लोरिडा युनिवर्सिटी, वेस्टर्न सिडनी विद्यापीठ यांच्‍या सोबत कृषि शिक्षण व संशोधन करिता करार करण्‍यात आला असुन यामुळे आंतरराष्‍ट्रीय पातळीवरील कृषि तंत्रज्ञान व संशोधन क्षेत्रात विद्यापीठ शास्‍त्रज्ञ व विद्यार्थी यांच्‍यात कौशल्‍य विकास शक्‍य होणार आहे. गत तीन वर्षात देश-विदेशातील अद्ययावत कृषि संशोधन आणि तंत्रज्ञानाची ज्ञान अवगत करण्‍यात करिता नाहेप प्रकल्‍पांतर्गत विद्यापीठातील ५१ विद्यार्थी आणि २४ प्राध्‍यापक / संशोधक यांनी अमेरिका, स्पेन, हंगेरी, ऑस्ट्रेलिया, मलेशिया, ब्राझिल, थायलंड, कॅनडा, जपान आदी देशातील अग्रगण्‍य विद्यापीठांमध्ये प्रशिक्षण पूर्ण केले, हे विद्यापीठासाठी एक ऐतिहासिक बाब आहे. तसेच, देशातील विद्यापीठाने आयआयटी आणि इतर अग्रणी कृषि संशोधन संस्थांमध्ये ७०० पेक्षा अधिक विद्यार्थ्यांना आणि प्राध्‍यापकांनी प्रशिक्षण पुर्ण केले. यामुळे, विद्यापीठाच्या शैक्षणिक आणि संशोधन मानकांमध्ये सुधार होण्यास मदत होणार आहे.

डिजिटल शेती, ड्रोन व कृत्रिम बुध्‍दीमत्‍ता तंत्रज्ञानाचा कृषि क्षेत्रात वापर  

डिजिटल शेती संशोधनास प्रोत्‍साहनाकरिता विद्यापीठात जागतिक बँक व भारतीय कृषि अनुसंधान परिषद, नवी दिल्‍ली पुरस्‍कृत राष्‍ट्रीय उच्‍च शिक्षण प्रकल्‍पाच्‍या माध्‍यमातुन कृषि ड्रोन, यंत्र मानव आणि स्‍वयंचलित तंत्रज्ञान विकासावर भर देण्‍यात येत आहे. येणा-या काळात ड्रोन तंत्रज्ञानाचा शेतीत फवारणी करिता आणि किड व रोगांचे निरीक्षण आदी करिता वापर वाढणार आहे. शेतीत ड्रोन तंत्रज्ञानाच्‍या वापराबाबत मार्गदर्शक तत्‍वे निश्चित करण्‍यात करिता राष्‍ट्रीय पातळी कुलगुरू डॉ इन्‍द्र मणि यांच्‍या अध्‍यक्षतेखाली पाच समित्‍या गठीत करण्‍यात आल्‍या होत्‍या. या समित्‍यांनी विविध पिकांत किटकनाशके, अन्‍नद्रव्‍य व खते देण्‍याकरिता ड्रोनचा वापराबाबत मार्गदर्शक तत्‍वे निश्‍चित केले आहेत. ड्रोन तंत्रज्ञानाचा उपयोग शेतकरी बांधवांना व्‍हावा याकरिता विद्यापीठाने वॉव गो ग्रीन कृषि विमान संस्‍थेसोबत सामंजस्‍य करार केला असुन या माध्‍यमातुन विविध गावात ड्रोन फवारणीचे प्रात्‍यक्षिके दाखविण्‍यात आली. या माध्‍यमातुन शेतकरी बांधवाना फवारणी करिता ड्रोन भाडे तत्‍वावर उपलब्‍ध झाले. तसेच सेरेब्रोस्‍पार्क इन्‍नोव्‍हेशन कंपनीसोबत सहा महिन्‍याचा अॅग्रीड्रोन व्‍यावसायिक अभ्‍यासक्रम सुरू करण्‍यात आला असुन आजपर्यंत २८ युवकांनी अभ्‍यासक्रम पुर्ण केला असुन सर्वांना स्‍वयंरोजगार व रोजगार प्राप्‍त झाला आहे. यावर्षी नागरिक उड्डयन महासंचालनालय (DGCA) मान्यताप्राप्त रिमोट पायलट प्रशिक्षण संस्था (Remote Pilot Training Organisation – RPTO) विद्यापीठात स्थापन करण्यात आली आहे. या संस्थेमार्फत ड्रोन पायलट प्रशिक्षणासह अधिकृत DGCA ड्रोन पायलट परवाना (Licence) मिळविण्याची सुविधा उपलब्ध झाली असून, कृषि क्षेत्रासाठी कुशल व प्रमाणित ड्रोन पायलट तयार करण्यास चालना मिळणार आहे.

विद्यापीठास विविध संशोधन व प्रशिक्षण प्रकल्‍प

सीएनएच न्‍यु हांलड कंपनी द्वारा कोर्पोरेट सामाजिक जबाबदारी (CSR) निधीच्‍या माध्‍यमातुन १५०० तरूण शेतकरी बांधवांना आधुनिक कृषि अवजारे यांचा उपयोग, दुरूस्‍ती आणि देखरेख विषयोंवर प्रशिक्षीत करण्‍यात आले आहे. जे फार्म कंपनीच्‍या कोपॉरेट सामाजिक जबाबदारी निधीच्‍या माध्‍यमातुन महाराष्‍ट्र यात्रिकीकरण प्रशिक्षण केंद्राची सुविधा उपलब्‍ध करण्‍यात आली आहे. माननीय कुलगुरू हे राष्‍ट्रीय पातळीवरील अनेक संशोधन निधी देणा-या संस्‍थेवर सदस्‍य म्‍हणुन कार्य करतात, याचा लाभ विद्यापीठास झाला. विद्यापीठास गत तीन वर्षात अनेक संशोधन प्रकल्‍प मंजुर झाले असुन यात भारत सरकारच्‍या विज्ञान व तंत्रज्ञान विभागाचे (DST) चार संशोधन प्रकल्प, राष्‍ट्रीय कृषि विज्ञान निधीचे (NASF) चे एक प्रकल्प, मुख्‍यमंत्री सहय्यता निधीतुन आठ प्रकल्पे, राष्‍ट्रीय कृषि विकास योजनेतुन पाच प्रकल्प, राजीव गांधी विज्ञान व तंत्रज्ञान आयोगाचे दहा प्रकल्प, आणि इफ्कोचा एक नेटवर्क प्रकल्प, पोकरा अंतर्गत संवर्धन शेती संशोधन कार्यास सुरवात झाली आहे. तसेच जर्मनीच्‍या संस्थेव्‍दारे अॅग्रीपीव्‍ही प्रकल्‍प आणि अमेरिकेतील पर्ड्यू विद्यापीठाव्‍दारे संशोधन प्रकल्पाचे कार्य प्रगतीपथावर आहे. कॉर्पोरेट क्षेत्राकडुन व्‍यावसाईक सामाजिक जबाबदारी निधी संशोधन व प्रशिक्षण करिता उपलब्‍ध होत आहे. शेतकरी बांधवा मध्‍ये विद्यापीठाच्‍या जैविक खते आणि बायोमिक्‍सची मागणी पाहता राष्‍ट्रीय कृषि विकास योजनेतुन प्रत्‍येक जिल्‍हयात ही उत्‍पादने उपलब्‍ध होत आहेत.

नाविण्‍यपुर्ण संशोधन

कृषि क्षेत्रात अॅग्री फोटोव्‍होल्‍टेइक तंत्रज्ञानाच्‍या वापराकरिता वनामकृविचा जर्मनीच्‍या जीआयझेड सोबतचे संशोधन कार्य प्रगतीपथावर आहे. अॅग्रीपीव्‍ही तंत्रज्ञानाच्‍या माध्‍यमातुन सौर ऊर्जेतुन वीज निर्मितीसोबत विविध पिकांची लागवड केल्‍यास शेतकरी बांधवाना दुहेरी उत्‍पन्‍न मिळण्‍याचे साधन प्राप्‍त होऊ शकते. हे तंत्रज्ञान भारताकरिता नवीन असुन या तंत्रज्ञानाची मराठवाडयातील पिक पध्‍दतीत कितपत उपयुक्‍त ठरू शकते, याकरिता संशोधनात परभणी कृषि विद्यापीठाने राज्‍यात पुढाकार घेतला आहे. भारतीय अंतराळ संशोधन संस्‍थेचे (इस्रो) अहमदाबाद येथील अंतराळ उपयोग केंद्र आणि विद्यापीठ सामंजस्य करार करण्‍यात आला असुन अचुक हवामान अंदाज व त्‍या आधारे ठोस कृषि सल्‍ला तालुकानिहाय शेतकरी बांधवापर्यंत पोहचविण्‍याकरिता मदत होत आहे.

नवीन वाण निर्मिती

विद्यापीठ विकसित वाण व तंत्रज्ञान केवळ मराठवाडा किंवा राज्‍यापुरते उपयुक्‍त नसुन देशातील अनेक राज्‍यातील शेतकरी बांधवाकरीता उपयुक्‍त आहे. केंद्रीय बियाणे अधिनियम, १९६६ नुसार भारत सरकारने केंद्रीय बियाणे समितीच्‍या शिफारसीनुसार २०२३ मध्‍ये  वनामकृवि विकसित करडई पिकांच्‍या पीबीएनएस १८४, देशी कापसाच्‍या पीए ८३७, खरीप ज्‍वारीच्‍या परभणी शक्‍ती, तुरीचा वाण बीडीएन-२०१३-२ (रेणुका), सोयाबीनचे एमएयुएस-७२५ आणि करडई पिकाचे पीबीएनएस-१५४ (परभणी सुवर्णा) या वाणांचा समावेश केला आहे. यामुळे या वाणांचा प्रचार व प्रसार मोठया प्रमाणावर होण्‍यास मदत होणार आहे. २०२४ मध्‍ये राहुरी ये‍थील महात्‍मा फुले कृषि विद्यापीठात आयोजित संयुक्‍त कृषि संशोधन आणि विकास बैठकीत विद्यापीठ विकसित सहा वाण, ३ तीन कृषि औजारे सह ३६ विविध तंत्रज्ञान शिफारशींना मान्‍यता प्राप्‍त झाली आहे. तसेच २०२४ मध्‍ये अकोला येथील डॉ पंजाबराव देशमुख कृषि विद्यापीठात आयोजित संयुक्‍त कृषि संशोधन आणि विकास बैठकीत विद्यापीठ विकसित भेंडीचा परभणी सुपर क्रांती (पीबीएन ओकरा -१) आणि केळीचा वनामकृवि - एम ३ या नवीन वाणाची आणि पीक उत्पादन तंत्रज्ञानावर आधारित तसेच पोषण आहार, पशुविज्ञान आणि कृषि संलग्न इतर शाखेतील तंत्रज्ञानाच्या ४८ शिफारशींना मान्यता प्राप्‍त झाली आहे.  विद्यापीठाच्या बदनापूर येथील कृषि संशोधन केंद्राद्वारे विकसित करण्यात आलेला तुरीचा बीडिएनपीएच १८ - ५ या संकरित वाणास लागवडीकरिता मान्यता प्राप्‍त झाल असून या वाणाची शिफारस महाराष्ट्रासह भारताच्या मध्य विभागासाठी करण्यात आलेली आहे. विशेष बाब म्हणजे महाराष्ट्रातील कृषि विद्यापिठाद्वारे शिफारस करण्यात आलेला हा पहिलाच तुरीचा संकरित वाण आहे. यावर्षी परभणी येथे झालेल्‍या ५३ व्‍या बैठकीत विद्यापीठ विकसित नवे चार वाण, दोन यंत्रे आणि ५३ तंत्रज्ञान शिफारशींना मान्‍यता मिळाली. यात ज्वारीचा परभणी परभणी सुपर दगडी (एसपीव्ही  २७३५) या धान्य व कडब्याच्या अधिक उत्पादन देणार वाणास मान्‍यता मिळाली तर परभणी पद्मा (सिपीबी २२०१) या चवळी पिकाचा अधिक उत्पादन देणारा, लवकर पक्व होणारा, पिवळा केवडा या रोगास प्रतिकारक्षम वाण मराठवाडा व पश्चिम महाराष्ट्र या विभागाकरिता खरिप हंगामात लागवड करण्याची शिफारस मान्‍य करण्‍यात आली. तिळाचा टीएलटी ७ हा पांढरा व टपोरा दाण्याचा अधिक बियांचे व तेलाचे उत्पादन देणारा,  रोग व कीडीस सहनशील असणा¬या वाणाची  राज्यात उन्हाळी हंगामात लागवडीसाठी शिफारस मान्‍य केली गेली तर तिळाचा टीएलटी १० हा वाण तेलंगणा राज्यासाठी खरीप व रब्बी / उन्हाळी हंगामासाठी प्रसारित करण्यात आली.

विद्यापीठ विकसित मनुष्य चलित रोपवाटीका भाजीपाला टोकन यंत्राची रोपवाटीके मध्ये मिरची, वांगे, टोमॅटो, कांदे, कोबी व कोथींबीर या पिकाची रोप तयार करण्यासाठी वापर करणासाठी प्रसारीत करण्‍यात आले तर विद्यापीठ विकसीत विविध धान्यापासून लाहया व खरमूरे बनविण्याच्या लघुउद्योगासाठी, एलपीजी चलित (उच्च तापमान कमी वेळ आधारीत), अर्धस्वयंचलित पफिंग व पॉपिंग संयंत्र प्रसारीत करण्यात आले.

कापुस पिकातील बीटी सरळ वाणास केंद्रीय वाण निवड समितीची मान्‍यता

विद्यापीठ विकसित तीन अमेरिकन बीटी सरळ वाण व देशी कपाशीच्या एका सरळ वाणाची केंद्रीय वाण निवड समितीद्वारे लागवडीसाठी शिफारस करण्यात आली आहे. नांदेड येथील कापूस संशोधन केंद्राद्वारे विनियंत्रीत बीटी (क्राय १ एसी जनुक) तंत्रज्ञानयुक्त वाणांची पैदास करण्याचे कार्य सुरू असुन याद्वारे निर्मीत एनएच १९०१ बीटी (NH 1901), एनएच १९०२ (NH 1902) बीटी व एनएच १९०४ (NH 1904) बीटी ही तीन अमेरीकन सरळ वाण अखिल भारतीय समन्वयित कापूस सुधार प्रकल्पाच्या केंद्रीय वाण निवड समितीने मध्य भारत (महाराष्ट्र, गुजरात व मध्य प्रदेश) विभागाकरिता प्रसारीत करण्यासाठी निवड करण्यात आली आहे. विद्यापीठांतर्गत परभणी स्थित कापूस संशोधन केंद्र, महेबूब बाग या केंद्राद्वारे निर्मीत देशी कापूस सरळ वाण पीए ८३३ (PA 833) हा वाण देखिल समितीद्वारे दक्षिण भारत विभागाकरिता (आंध्र प्रदेश, कर्नाटक व तामिळनाडू) प्रसारणासाठी शिफारस करण्यात आला आहे. परभणी कृषि विद्यापीठ विकसित कापुसाच्‍या सरळ वाणात बीटीचा अंतर्भाव केल्‍यामुळे शेतकरी बांधवाचा बियाणांवर होणारा खर्च कमी होण्‍यास मदत होणार असुन कोरडवाहू लागवडीमध्ये उत्‍पादनात सातत्‍य देणारे वाण आहेत. सार्वजनिक क्षेत्रामध्ये बीटी कापूस सरळ वाण प्रसारीत करणारे परभणी कृषि विद्यापीठ हे राज्यातील पहिलेच विद्यापीठ ठरले आहे. सरळ वाणांचे बियाणे उपलब्ध झाल्यामुळे शेतकर्‍यांना आपल्या शेतामध्ये मागील वर्षाच्या लागवडीतून उत्पादीत कपाशीपासून सरकी वेगळी करून तीच सरकी पुढील तीन वर्षांपर्यंत बियाणे म्हणून वापरता येणे शक्य होणार आहे. त्यामुळे शेतकर्‍यांना दरवर्षी नवीन बियाणे बाजारातून खरेदी करण्याची आवश्‍यकता पडणार नाही आणि पर्यायाने बियाण्यावरील खर्च कमी होईल. जुन २०२५ मध्‍ये विद्यापीठ विकसित करण्यात आलेल्या एनएच २२०३७ बीटी बीजी २ व एनएच २२०३८ बीटी बीजी २ या दोन बीजी २ सरळ वाणांना केंद्रीय वाण निवड समितीने मध्य भारत विभागातील महाराष्ट्र, गुजरात आणि मध्य प्रदेश या राज्यांमध्ये सघन लागवडीकरिता कोरडवाहू क्षेत्रासाठी शिफारस करण्यात आली आहे.

माझा एक दिवस माझ्या बळीराजासोबत उपक्रम

कृषि तंत्रज्ञान शेतकरी बांधवापर्यंत पोहचविण्‍याकरिता विद्यापीठाव्‍दारे विविध उपक्रम राबविण्‍यात येतातच, परंतु याची व्‍याप्‍ती व गती वाढविण्‍याकरिता प्रयत्‍न केला जात आहे. सप्‍टेंबर २०२२ मध्ये महाराष्‍ट्र शासनाच्‍या मार्गदर्शनानुसार “माझा एक दिवस माझ्या बळीराजासाठी” उपक्रमातंर्गत मराठवाडा विभागातील विविध गावात राबविण्‍यात आला, यात विद्यापीठ शास्त्रज्ञाच्या पथकांनी गावांना भेटी देऊन शेतकरी बांधवांच्या शेती विषयक समस्या समजुन घेतल्या व पीक लागवड तंत्रज्ञानाबाबत मार्गदर्शन केले, हा उपक्रम विद्यापीठाच्‍या वतीने प्रत्‍येक महिन्याच्‍या दुस-या बुधवारी राबविण्‍याचे ठरविले. गेल्‍या साडेतीन वर्षात आजपर्यंत ३५० पेक्षा जास्‍त गावात उपक्रम राबविण्‍यात आला. यामुळे शेतकरी बांधवाशी विद्यापीठाची नाळ अधिक मजबूत होण्‍यास मदत होत आहे.

विकसित कृषि संकल्प अभियानाची ५८४ गावांमध्ये अंमलबजावणी

भारत सरकारच्या कृषि आणि शेतकरी कल्याण मंत्रालयामार्फत विकसित कृषि संकल्प अभियान दिनांक २९ मे ते १२ जून २०२५ दरम्यान देशभरात राबविण्यात आला. महाराष्ट्रामध्ये या अभियानाचा उदघाटन राज्‍याचे माननीय मुख्‍यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते परभणी येथे करण्यात आले. सदर उपक्रमाव्दारे विद्यापीठांतर्गत असलेल्‍या कृषि विज्ञान केंद्राच्‍या वतीने ५८४ गावांमध्‍ये राबविण्‍यात येऊन एक लाख पेक्षा जास्‍त शेतकऱ्यांना तंत्रज्ञानाचे प्रात्यक्षिकांसह मार्गदर्शन करण्‍यात आले.

खेत बचाव अभियान

अल निनोच्या संभाव्य परिणामांच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना वेळेवर तांत्रिक मार्गदर्शन उपलब्ध करून देण्यासाठी यावर्षी विद्यापीठानी "खेत बचाव अभियान व अल निनो पार्श्वभूमीवर विशेष विस्तार मोहीम" प्रभावीपणे राबविली. या मोहिमेअंतर्गत विद्यापीठातील शास्त्रज्ञांनी शेतभेटी, प्रात्यक्षिके, प्रत्यक्ष सल्लामसलत, हवामानानुरूप पीक व्यवस्थापन, कीड-रोग नियंत्रण, जलसंधारण, पीक विविधीकरण व जोखीम व्यवस्थापनाबाबत मार्गदर्शन केले. या विशेष मोहिमेद्वारे २०५ गावांतील शेतकऱ्यांपर्यंत तांत्रिक माहिती व कृषि सल्ला पोहोचविण्यात आला, ज्यामुळे हवामान बदलाच्या आव्हानांना तोंड देण्यासाठी शेतकऱ्यांची क्षमता बळकट झाली.

ऑनलाईन शेतकरी-शास्त्रज्ञ कृषि संवाद

विद्यापीठाच्‍या वतीने गेल्‍या दोन वर्षापासुन ऑनलाईन शेतकरी-शास्त्रज्ञ संवाद कार्यक्रम दर मंगळवारी व शुक्रवारी सायंकाळी ७ ते ८.३० दरम्‍यान राबविण्‍यात येत आहे. यास मोठया प्रमाणात शेतकरी बांधवा सहभागी होऊन आपले प्रश्‍न विचारतात तर विद्यापीठ शास्‍त्रज्ञ त्‍याच्‍या समस्‍याचे समाधान यशस्‍वीरित्‍या करतात. 

नवीन चार शासन अनुदानित म‍हाविद्यालये व दोन संशोधन केंद्रास मान्‍यता

महाराष्‍ट्र शासनाच्‍या मान्‍यतेने नवीन चार शासन अनुदानित घटक महाविद्यालये स्‍थापना करण्‍यास आली आहे. यात जिरेवाडी (परळी) येथे कृषि महाविद्यालय आणि कृषि व्‍यवसाय व्‍यवस्‍थापन महाविद्यालय, नांदेड येथे कृषि महाविद्यालय तसेच सिल्‍लोड तालुक्‍यात कृषि महाविद्यालयास मान्‍यता प्राप्‍त झाली असुन गेल्‍या दोन वर्षापासुन महाविद्यालयात प्रवेशाची प्रक्रिया सुरू झाली आहे. धर्मापुरी (परळी) येथे सोयाबीन संशोधन व प्रशिक्षण उपकेंद्र आणि सिल्‍लोड येथे मका संशोधन केंद्रास मान्‍यता मिळाली आहे.

कृषि उद्योजकता विकासावर भर

अन्‍नतंत्रज्ञान महाविद्यालयात नवी दिल्‍ली येथील केंद्रीय अन्‍न प्रक्रिया उद्योग मंत्रालयाच्‍या प्रधानमंत्री सुक्ष्‍म अन्‍न प्रक्रिया उद्योग योजने अंतर्गत सामाईक उष्मायन केंद्र (कॉमन इन्‍क्‍युबेशन सेंटर) सुरवात करण्‍यात आली असुन यामुळे अन्‍न प्रक्रिया उद्योजक शेतकरी बांधवा लाभ होणार आहे. कौशल्‍य विकास उपक्रमांतर्गत ग्रामीण युवकांना तसेच पदवी अभ्‍यासक्रमाच्‍या विद्यार्थ्‍यांना कृषि उद्योजकतेचे घडे दिले जात आहे. नुकतेच विद्यापीठाने आयएमसी (IMC) चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री,  मुंबई यांच्यासोबत मराठवाडा विभागातील कृषि, व्यापार व गुंतवणूक क्षेत्रात सहकार्य वाढविण्यासाठी सामंजस्य करार करण्यात आला आहे. या करारानुसार दोन्ही संस्थामध्ये स्थानिक शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविण्यासाठी पीक निवडीत मार्गदर्शन, शेती पिकांपासून मूल्यवर्धित उत्पादने तयार करणे, बाजारपेठेची ओळख व मागणीनुसार उत्पादने सुधारित करणे, परभणी जिल्ह्यातील कृषि उत्पादनांचे राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय प्रदर्शनात सादरीकरण, गुंतवणूकदार व खरेदीदारांना शास्त्रज्ञ व उत्पादकांशी थेट संपर्क साधण्यासाठी सुविधा, विद्यापीठातील तांत्रिक प्रगतींचे व्यावसायीकरण, विद्यार्थ्यांसाठी रोजगार व उद्योजकतेच्या संधी निर्माण करणे आदी क्षेत्रात परस्पर सहकार्य करणार आहेत.

सन्‍मान व पुरस्‍कार

प्रगतशील शेतकरी, नन्‍मोषक कृषि उद्योजक, विद्यापीठ शास्‍त्रज्ञ यांचा सन्‍मान - विद्यापीठाच्‍या वतीने आयोजित विविध पातळीवर शेतकरी, कृषि उद्योजक, कृषि शास्‍त्रज्ञ यांना सन्‍माननीत करण्‍यात येऊन त्‍यांना प्रोत्‍साहन देण्‍यात येत आहे. कोणताही मेळावा व कार्यशाळा असो शेतकरी बांधव व महिला प्रतिनिधीस सन्‍मानाने व्‍यासपीठावर स्‍थान दिले पाहिजे, असा आग्रह माननीय कुलगुरू यांचा असतो. नुकतेच  मोदीपुरम (मीरत, उत्तर प्रदेश) येथे भारतीय शेती संशोधन संस्थेमध्ये आयोजित पहिल्या आंतरराष्ट्रीय एकात्मिक शेती पद्धती परिषदेत परभणी येथून माननीय कुलगुरू सोबत प्रगतशील शेतकरी, विद्यार्थी आणि शास्त्रज्ञांसह १५ जणांचा चमू सहभागी झाले होते. तसेच इंदोर येथे संपन्‍न झालेल्‍या माननीय केंद्रीय कृषि मंत्री श्री शिवराज सिंह चौहान यांच्‍या अध्‍यक्षतेखाली झालेल्‍या कार्यशाळेत आपल्‍या भागातील शेतकरी बांधव सहभागी होऊन आपले अनुभव कथन केले.

विद्यापीठास तीन आंतरराष्‍ट्रीय आयएसओ मानांकने

वनामकृविस आयएसओ ५०००१, आयएसओ १४००१, आयएसओ २१००१ ही मानके प्राप्‍त झाली असुन यामुळे विद्यापीठाची राष्‍ट्रीय - आंतरराष्‍ट्रीय पातळीवर विशेष ओळख प्राप्‍त होणार आहे. आयएसओ ५०००१ हे मानक विद्यापीठातील ऊर्जा विनिमय आणि व्यवस्थापन दर्जेाच्‍या आधारे विद्यापीठास प्राप्‍त झाले आहे. पर्यावरण संवर्धन क्षेत्रातील कार्याची दखल देऊन पर्यावरण व्यवस्थापन प्रणालीचे आयएसओ १४००१ हे मानांक मिळाले आहे.  विद्यापीठांतर्गत असलेल्‍या घटक महाविद्यालयांच्या परिसरात ऊर्जा बचत आणि किफायतशीर विद्युत उपकरणे आणि उपकरणे उपलब्धता, उर्जेच्या अपारंपरिक स्त्रोताच्या वापरास प्रोत्साहन, विद्यापीठाच्या आर्थिक विकासासाठी ऊर्जा स्त्रोतांची बचत आदीकरिता आयएसओ १४००१ हे मानांक प्राप्‍त झाले आहे. आयएसओ २१००१ हे आंतरराष्‍ट्रीय मानक शैक्षणिक संस्था व्यवस्थापन प्रणाली करिता प्रदान केले जाते, विद्यापीठ कृषि शिक्षणात करीत असलेल्‍या कार्यास हे मानक प्राप्‍त झाले असुन पदवी, पदव्‍युत्‍तर आणि आचार्य पदवी अभ्‍यासक्रमाची तसेच डिजिटल तंत्रज्ञान प्रशिक्षण याबाबींची दखल घेण्‍यात आली आहे.

हरित विद्यापीठ - वृक्ष लागवडीची  विशेष मोहिम व विद्यापीठास हरित विद्यापीठ पुरस्‍कार २०२३

विद्यापीठ परिक्षेत्रावर २०० एकर वर नवीन फळबागे लागवडीचे कार्य चालु असुन यात फळपिकांच्‍या विविध जातीची लागवड करण्‍यात येणार आहे. तसेच विद्यापीठ परिसरात एक लक्ष वृक्षलागवडीस सुरूवात करण्‍यात आले आहे. गेल्‍या वर्षी पासुन वन विभागाच्‍या माध्‍यमातुन विद्यापीठातील रेल्‍वे लाईनच्‍या लगत ४.५ किलोमीटर फळपिके व वनपिकांची लागवड करण्‍यात आली आहे.  कृषि विद्यापीठास ग्रीन मेंटर्स संस्‍थेचा प्रतिष्ठित आंतरराष्‍ट्रीय हरित विद्यापीठ पुरस्‍कार २०२३ न्‍युयॉर्क ये‍थे आयोजित ७ व्‍या एनवायसी ग्रीन स्कुल कॉन्‍फरन्‍समध्‍ये ७८ व्या संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेच्या अधिवेशना प्रदान करण्‍यात आला.

माननीय कुलगुरू यांच्या काळात वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाला ‘इन्स्टिट्युशनल फेलो ऑफ CHAI-2026’ राष्ट्रीय पुरस्कार सन्मानित करण्यात आले तसेच माननीय कुलगुरू यांना राष्‍ट्रीय-आंतरराष्‍ट्रीय पातळीवर गौरविण्‍यात आले

अमेरिकेतील फ्लोरिड विद्यापीठात मुख्‍यालय स्थित असलेल्‍या कृषि आणि जैवप्रणाली अभियांत्रिकी आंतरराष्ट्रीय अकादमी या अग्रगण्‍य वैज्ञानिक संस्‍थेचे फेलो म्‍हणुन विद्यापीठाचे कुलगुरू मा  डॉ  इन्‍द्र  मणि यांची निवड  झाली, जपान मधील क्‍योटो येथे आयोजित विसावी सीआयजीआर जागतिक परिषदेत त्‍यांना फेलो म्‍हणु अकादमीच्‍या वतीने सन्‍माननित करण्‍यात  आले, ही विद्यापीठाकरिता अभिमानाची बाब आहे.  तसेच "उत्कृष्ट नेतृत्वासाठी वर्षातील कुलगुरू पुरस्कार" (व्हॉइस चान्सलर ऑफ द इयर) या मानाच्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. हा पुरस्कार पुणे येथे झालेल्या ‘८ व्या हायर एज्युकेशन इनोव्हेशन अँड टेक्नॉलॉजी समिट अँड अवॉर्ड्स २०२५’ या राष्ट्रीय परिषदेच्या दरम्यान प्रदान करण्यात आला. कृषि शिक्षण, संशोधन आणि विस्‍तार शिक्षण क्षेत्रात केलेल्‍या उल्‍लेखनीय योगदानाची दखल मा प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांना “कै. वसंतराव नाईक कृषि उल्लेखनीय योगदान पुरस्कार – २०२५” हा प्रतिष्ठित पुरस्काराने सन्‍माननित करण्‍यात आले. तसेच गत वर्षी त्‍यांना देशातील प्रतिष्ठित इंस्टिट्यूशन ऑफ इंजिनीअर्स, इंडिया संस्‍थेने इमिनेंट इंजिनीयर पुरस्काराने तसेच CHAI Honoured Fellow Award 2026 आणि CHAI Lifetime Recognition Award 2026 ने सन्‍माननीत करण्‍यात आले.

विविध संशोधन केंद्रास पुरस्‍कार

विद्यापीठांतर्गत असलेल्‍या लातुर येथील गळीतधान्ये संशोधन केंद्राच्‍या अखिल भारतीय समन्वीत संशोधन (सूर्यफुल व भुईमुग) प्रकल्प, करडई संशोधन केद्र, छत्रपती संभाजीनगर येथील बाजरा संशोधन प्रकल्‍पास उत्‍कृष्‍ट संशोधन केंद्र पुरस्‍कार, बदनापुर येथील तुर संशोधन केंद्राला सर्वोत्‍कृष्‍ट मानांकन मिळाले आहे. नांदेड येथील कापुस संशोधन केंद्रास अखिल भारतीय समन्वयीत कापूस संशोधन प्रकल्पातर्फे राष्ट्रीय पातळीवरील ‘उत्कृष्ट संशोधन केंद्र’ या बहुमानाने गौरविण्यात आले असुन सेंद्रीय संशोधन व प्रशिक्षण केंद्रास जैविक इंडिया पुरस्‍कार प्राप्‍त झाला आहे. याप्रकारे एकुण दहा संशोधन प्रकल्‍पास देशपातळीवर गौरविण्‍यात आले.

महत्‍वाचे कार्यक्रम व कार्यशाळेचे यशस्‍वी आयोजन

विद्यापीठाचा २५ वा, २६ वा  व २७ वा दीक्षांत समारंभाचे यशस्‍वी आयोजन करण्‍यात आले, यात स्नातकांना विविध पदवीने माननीय राज्‍यपालांच्‍या हस्‍ते अनुग्रहित करण्‍यात आले. विद्यापीठ आणि परभणी आत्‍मा, कृषि विभाग (महाराष्‍ट्र शासन) यांच्‍या संयुक्‍त विद्यमाने कृषि तथा शेतकरी कल्‍याण मंत्रालय (भारत सरकार), नवी दिल्‍ली पुरस्‍कृत पश्चिम विभागीय कृषि मेळावा आणि कृषि प्रदर्शनीचे भव्‍य आयोजन करण्‍यात आले. यात देशातील सात राज्‍यातील कृषि तंत्रज्ञान पाहण्‍याची संधी शेतकरी बांधवाना मिळाली. छत्रपती संभाजी नगर येथे बारावी राष्‍ट्रीय बियाणे परिषदेचे विद्यापीठाने यशस्‍वी आयोजन केले, यात देशातील बियाणे पैदासकार, तज्ञ, शेतकरी व धोरणकर्ते यांनी सहभाग नोंदविला. तसेच कृषि संशोधनाची दिशा ठरविण्‍याकरिता केंद्र शासनाच्‍या विज्ञान व तंत्रज्ञान विभागाचा कार्यशाळा घेण्‍यात आली, यातही देश पातळीवरील तज्ञांनी सहभाग नोदंविला. खरीप व रब्बी हंगामातील परिस्थितीनुसार वेळोवेळी कार्यशाळा घेण्‍यात आल्‍या, यात मराठवाडयातील कृषि विभागातील अधिकारी, विस्‍तार कार्यकर्ते, शासन व शेतकरी सहभागी झाले. परिस्थितीनुसार शेतीत करावयाच्‍या उपाय योजना शेतकरी बांधवापर्यंत पोहविण्‍याकरिता प्रयत्‍न करण्‍यात आला. ५३ व्या संयुक्त कृषि संशोधन विकास समितीच्या बैठकीचे यशस्‍वीपणे आयोजन करण्‍यात आले,  या बैठकीचे उदघाटन माननीय मुख्‍यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांच्‍या शुभहस्ते करण्‍यात आले. यात राज्‍यातील ३०० पेक्षा जास्‍त कृषि शास्‍त्रज्ञ, व धोरणकर्ते सहभागी झाले होते. विद्यापीठामध्ये प्रथमच तीन दिवसीय आंतरराष्‍ट्रीय परिसंवाद आणि भारतीय कृषि अभियंता संघटनेच्या ५८ व्या वार्षिक अधिवेशनाची यशस्वी आयोजन करण्‍यात आले होते, यात देश-विदेशातील ७५० मान्यवर प्रतिनिधींचा सहभाग नोदविला होता.

विद्यार्थ्‍यांचे कला क्षेत्रातील यश

विद्यार्थ्‍यांच्‍या गुणांना वाव देण्‍याकरिता वेळोवेळी सांस्कृतिक व्‍यासपीठ उपलब्‍ध करून देण्‍यात येत आहे. बंगलोर येथील जैन विद्यापीठात ३६ वा आंतर विद्यापीठ राष्‍ट्रीय युवा महोत्‍सव – जैन उत्‍सव २०२३ स्‍पर्धेत मेंदी कला प्रकारात विद्यापीठांतील लातुर येथील कृषि महाविद्यालयाची विद्यार्थींनी सिध्‍दी देसाई हिने कांस्‍य पदक पटकावले. तर आयसीएआर अॅग्री युनेफेस्‍ट मध्‍ये फाईन ऑर्ट मध्‍ये चॅपियन ट्रॉफी प्राप्‍त केली. एकविसाव्‍या अखिल भारतीय आंतर कृषि विद्यापीठ स्‍पर्धेत व्‍हॉलीबॉल मध्‍ये विद्यापीठ संघाने सुवर्ण पदक प्राप्‍त केले.

मुलभुत सोयी सुविधांचे बळकटीकरण

महाराष्ट्र शासनाने विद्यापीठातील अंतर्गत रस्ते मजबुतीकरणास आणि डांबरीकरणास करण्‍यात आले. विद्यापीठातील गेस्‍ट हाऊस सुविधा, विद्यार्थी व विद्यार्थीनीनीं वसतीगृहाच्‍या चांगल्‍या सुविधा पुरविण्‍याकरिता माननीय कुलगुरू नेहमीच आग्रही असतात, विद्यापीठातील सभागृह, वसतीगृहांचे नुतनीकरणाचे काम करण्‍यात आले असुन गोळेगांव, लातुर, बदनापुर येथील वसतीगृहाचे नुतनीकरण केले गेले आहे.

संशोधन क्षेत्रात शेतकरी बांधवाकरिता उपयुक्‍त संशोधन करणे हा प्रमुख उद्देश्‍य विद्यापीठाचा असुन बदलत्‍या हवामानानुसार संशोधनास गती देण्‍याचे कार्य सुरू आहे. सद्यस्थितीत विद्यापीठात मनुष्‍यबळांचा विचार करता साठ टक्के पेक्षा जास्‍त पदे रिक्‍त असतांना विद्यापीठाचा दर्जा राष्‍ट्रीय पातळीवर उंचावण्‍याचे मोठे आव्‍हान विद्यापीठा समोर आहे. विद्यापीठाचे नामांकन उच्‍चांवण्‍याकरिता दर्जेदार संशोधनाची आवश्‍यकता असुन याकरिता देश पातळीवरील विविध संस्‍थेकडुन तसेच महाराष्‍ट्र शासनाकडुन निधी प्राप्‍त करण्‍याकरिता प्रयत्‍न चालुच आहेत. माननीय कुलगुरू डॉ इन्‍द्र मणि यांच्‍या नेतृत्‍वात विद्यापीठ शेतकरी केंद्रीत विस्तार कार्य, विद्याथी केंद्रीत शिक्षण, नवाचार केंद्रीत संशोधन आणि कर्मचारी केंद्रीत प्रशासन हा दृष्टीकोन ठेऊन कार्य करत आहे. येणा-या काळात माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांच्‍या प्रभावी कार्यामुळे परभणी कृषि विद्यापीठ देशातील एक अग्रगण्‍य कृषि विद्यापीठ म्‍हणुन नावारूपाला येईल, हे निश्चित ।

वनामकृवित ‘सिल्क अँड मिल्क’ कार्यशाळा; २१ प्रगतशील शेतकऱ्यांचा गौरव, ‘मेरा रेशीम मेरा अभिमान २.०’ अभियानाचा शुभारंभ

 


वसंतराव वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाची रेशीम संशोधन योजना, , कृषि विभाग, आत्मा, केंद्रीय रेशीम बोर्ड, जिल्हा रेशीम कार्यालय आणि अग्रणी बँक, परभणी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित सिल्क अँड मिल्क’ शेतकरी कार्यशाळा दिनांक २६ जुलै २०२६ रोजी उत्साहात संपन्न झाली. या कार्यशाळेस परभणी जिल्ह्यातील ६०० हून अधिक शेतकरी उपस्थित होते.

कार्यशाळेच्या तांत्रिक सत्रात बाल्य व प्रौढ रेशीम कीटक संगोपन तंत्रज्ञान, तुती लागवड तंत्रज्ञान, उझी माशी व्यवस्थापन, रेशीम उद्योगासाठीच्या विविध शासकीय योजना तसेच दुग्ध व्यवसाय वृद्धीविषयी तज्ज्ञ आणि अनुभवी रेशीम उत्पादक शेतकऱ्यांनी सविस्तर मार्गदर्शन केले.

कार्यशाळेच्या उद्घाटक तथा सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण, पाणीपुरवठा व स्वच्छता, ऊर्जा, महिला व बालविकास तसेच सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम) राज्यमंत्री तथा परभणी जिल्ह्याच्या पालकमंत्री माननीय  ना. श्रीमती मेघना साकोरे-बोर्डीकर यांनी परभणी जिल्ह्यात ‘सिल्क अँड मिल्क’ हा पायलट प्रकल्प राबविण्यात येणार असल्याचे सांगितले. तुती लागवडीपासून रेशीम कोष उत्पादन आणि वस्त्रनिर्मितीपर्यंतचा संपूर्ण रेशीम हब परभणी जिल्ह्यात उभारण्याचा मानस त्यांनी व्यक्त केला. या प्रकल्पामुळे स्थानिक युवकांना मोठ्या प्रमाणावर रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. या प्रकल्पाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी जिल्हास्तरावर कोणतीही अडचण येऊ दिली जाणार नाही, असे स्पष्ट करत त्यांनी रेशीम उत्पादनासाठी आधुनिक बाजारव्यवस्था विकसित करणे, रेशीम वस्त्रनिर्मितीस चालना देणे, ‘रेशीम भवन’ उभारण्यासाठी प्रयत्न करणे तसेच जिल्हा नियोजन व विकास समिती (DPDC) मार्फत ‘सिल्क अँड मिल्क’साठी स्वतंत्र योजना मंजूर करण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील, असे सांगितले. जिल्ह्यातील अधिकाधिक शेतकऱ्यांनी या उपक्रमात सहभागी व्हावे, असे आवाहन करत त्यांनी उत्पन्नवाढीसाठी पारंपरिक शेतीबरोबरच रेशीम शेती आणि दुग्धव्यवसायाची जोड देण्याची गरज अधोरेखित केली. “रेशीम शेतीची आस धरा, लक्ष्मी येईल तुमच्या घरा” या संकल्पनेवर आधारित ‘सिल्क विथ मिल्क’ हे मॉडेल शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविण्यासाठी प्रभावी ठरेल, असा विश्वास माननीय पालकमंत्री यांनी व्यक्त केला.

कार्यशाळेचे अध्यक्ष तथा विद्यापीठाचे माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात रेशीम उद्योग हा ग्रामीण भागातील शेतकऱ्यांसाठी कमी गुंतवणुकीत अधिक उत्पन्न देणारा आणि रोजगारनिर्मितीस चालना देणारा प्रभावी पूरक व्यवसाय असल्याचे सांगितले. बदलत्या कृषि परिस्थितीत पारंपरिक शेतीसोबत रेशीम व्यवसायाचा स्वीकार करून शेतकऱ्यांनी उत्पन्नाचे विविधीकरण करत आर्थिक स्वावलंबन आणि शाश्वत प्रगती साधावी, असे त्यांनी आवाहन केले.

यावेळी त्यांनी स्टेट बँक ऑफ इंडियाचे उपमहाप्रबंधक यांना ‘सिल्क अँड मिल्क’ प्रकल्पांतर्गत पात्र शेतकऱ्यांना आवश्यक वित्तीय सहाय्य वेळेत उपलब्ध व्हावे, यासाठी कर्ज मंजुरी व वितरणाची प्रक्रिया अधिक सुलभ, पारदर्शक आणि गतिमान करण्याचे आवाहन केले. शेतकरी, विद्यापीठ, बँका आणि विविध शासकीय संस्थांमधील समन्वयातून हा प्रकल्प ग्रामीण अर्थव्यवस्थेला नवी दिशा देईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

माननीय जिल्हाधिकारी श्री. संजयसिंह चव्हाण(भाप्रसे) यांनी सांगितले की, पारंपरिक पिकांमधून वर्षातून एकदाच उत्पन्न मिळते आणि पावसाच्या अनिश्चिततेमुळे त्यात नुकसान होण्याची शक्यता असते. मात्र, रेशीम उद्योगामध्ये वर्षभरात ८ ते ९ कोषपिके घेता येत असल्यामुळे अधिक उत्पन्न मिळते. त्यामुळे शेतकऱ्यांनी रेशीम उद्योगासोबत दुग्ध व्यवसायही स्वीकारावा. परभणी जिल्ह्यात ‘सिल्क अँड मिल्क’मुळे अनेक शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट झाल्याची उदाहरणे त्यांनी यावेळी नमूद केली.

स्टेट बँक ऑफ इंडियाचे उपमहाप्रबंधक श्री. वाय. व्ही. एस. एस. नागेश्वरराव यांनी बँकेच्या कर्जवाटप धोरणाविषयी मार्गदर्शन केले.

या कार्यशाळेस परभणी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मा. श्रीमती नतिशा माथुर (भाप्रसे), संशोधन संचालक  डॉ. भगवान आसेवार, शिक्षण संचालक  डॉ. बाबासाहेब ठोंबरे, अधिष्ठाता डॉ. प्रवीण वैद्य, विभागप्रमुख डॉ. हिराकांत काळपांडे, मुख्य विस्तार शिक्षण अधिकारी डॉ. प्रशांत देशमुख, प्रादेशिक प्रबंधक, एसबीआय श्री. दिनेश झा, श्री. शिवाजी भरोसे, डॉ. केदार खटिंग व श्री. रामचंद्र अकुलवार यांची प्रमुख उपस्थिती होती.

कार्यशाळेत मेरा रेशीम मेरा अभिमान २.०’ या अभियानाचा शुभारंभ मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आला. अभियानाची माहिती केंद्रीय रेशीम बोर्डाचे शास्त्रज्ञ-‘डी’ श्री. अशोक जाधव यांनी दिली. नानाजी देशमुख कृषि संजिवनी प्रकल्प (पोकरा) -२.० योजनेची घडीपत्रिका प्रकल्प संचालक (आत्मा), परभणी श्री. दौलत चव्हाण यांनी मान्यवरांच्या हस्ते प्रकाशित केली. ग्लोबल विकास ट्रस्टचे श्री. मुक्तेश्वर कडभाने यांनी ट्रस्टतर्फे देण्यात येणाऱ्या अनुदान योजनांची माहिती दिली.

यावेळी सिल्क अँड मिल्क’ या संकल्पनेच्या लोगोचे अनावरण करण्यात आले. तसेच २१ प्रगतशील शेतकऱ्यांना माननीय पालकमंत्री महोदया व मान्यवरांच्या हस्ते प्रशस्तीपत्रे प्रदान करण्यात आली. रेशीम उद्योगाच्या प्रसारासाठी उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल सेवानिवृत्त रेशीम शास्त्रज्ञ डॉ. चंद्रकांत लटपटे यांना सेवागौरव पुरस्कार’ प्रदान करून सन्मानित करण्यात आले.

परभणी जिल्ह्यात ‘सिल्क अँड मिल्क’ संकल्पनेच्या विस्तारासाठी योगदान दिल्याबद्दल श्री. सुनील हट्टेकर, श्री. गोविंद कदम आणि श्री. शंकर वराट यांचा सन्मान करण्यात आला. तसेच महाराष्ट्रात जैविक पद्धतीने रेशीम कीटकांवरील नुकसानकारक उझी माशी व्यवस्थापन तंत्रज्ञानाचा प्रभावी प्रसार केल्याबद्दल रेशीम संशोधन योजनेचे डॉ. संजोग बोकन व श्री. धनंजय मोहोड यांना केंद्रीय रेशीम बोर्ड आणि रेशीम संचालनालयातर्फे पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक उपसंचालक (रेशीम), छत्रपती संभाजीनगर डॉ. महेंद्र ढवळे यांनी केले. सूत्रसंचालन श्री. सुनील हट्टेकर यांनी केले, तर आभार प्रदर्शन डॉ. संजोग बोकन यांनी केले. कार्यशाळेच्या यशस्वी आयोजनासाठी श्री. सागर मिसाळ, श्री. रमेश इक्कर, श्री. दत्ता जटाळे, श्री. परमेश्वर भंडारे आणि श्री. व्यास यांनी विशेष परिश्रम घेतले.














Saturday, July 25, 2026

वनामकृविद्वारा नैसर्गिक व सेंद्रिय शेतीला चालना देणाऱ्या बैलचलित सुधारित शेती अवजारांच्या कस्टम हायरिंग सेंटरसाठी अवजारांचे वितरण

 वनामकृवि - श्री स्वामी समर्थ सेवा मार्ग (दिंडोरी) यांचा संयुक्त उपक्रम


वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी अंतर्गत अखिल भारतीय समन्वयित संशोधन प्रकल्प (AICRP) – पशुसंवर्धनाचे यांत्रिकीकरण योजना आणि श्री स्वामी समर्थ सेवा मार्ग प्रणीत, दिंडोरी, जि. नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने नैसर्गिक व सेंद्रिय शेतीसाठी विकसित करण्यात आलेल्या बैलचलित सुधारित शेती अवजारांच्या कस्टम हायरिंग सेंटर स्थापनेचा महत्त्वपूर्ण कार्यक्रम दिनांक २४ जुलै २०२६ रोजी उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. या कार्यक्रमात वृक्षारोपण, सुधारित शेती अवजारे संग्रहालयाचे उद्घाटन तसेच सुधारित बैलचलित शेती अवजारांचे वितरण करण्यात आले.

अध्यक्षस्थानी माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि हे होते. प्रमुख अतिथी म्हणून कृषिरत्न मा. श्री. आबासाहेब मोरे (श्री स्वामी समर्थ सेवा मार्ग, दिंडोरी प्रणित, नाशिक) उपस्थित होते. व्यासपीठावर संशोधन संचालक डॉ. भगवान आसेवार, शिक्षण संचालक डॉ. बाबासाहेब ठोंबरे, विस्तार शिक्षण संचालक डॉ. राकेश अहिरे, कुलसचिव श्री. पुरभा काळे, विद्यापीठ अभियंता इंजी. दीपक कशाळकर, सहाय्यक नियंत्रक श्री अनंत कदम,  संशोधन अभियंता डॉ. दयानंद टेकाळे, ट्रस्टचे कार्यक्रम समन्वयक श्री. बाळासाहेब शिंदे, प्रगतशील शेतकरी उद्यान पंडित श्री प्रतापराव काळे, संशोधन शास्त्रज्ञ, अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमाची सुरुवात पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत मान्यवरांच्या हस्ते नारळाच्या रोपाचे वृक्षारोपण करून करण्यात आली. त्यानंतर पशुसंवर्धनाचे यांत्रिकीकरण योजनेअंतर्गत विकसित करण्यात आलेल्या सुधारित शेती अवजारे संग्रहालयाचे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.

या संग्रहालयात पेरणीपूर्व मशागत, पेरणी, आंतरमशागत, खत व्यवस्थापन, तण नियंत्रण, फवारणी, प्लास्टिक आच्छादन, उसास माती चढविणे तसेच काढणीपर्यंतच्या विविध शेती कामांसाठी विकसित करण्यात आलेली एकबैल व दोनबैल चालित सुधारित शेती अवजारे आकर्षक पद्धतीने प्रदर्शित करण्यात आली आहेत. प्रत्येक अवजारासमोर त्याची वैशिष्ट्ये, उपयोग, तांत्रिक माहिती व छायाचित्रांसह माहितीफलक लावण्यात आले आहेत. संग्रहालयाची पाहणी केल्यानंतर उपस्थित मान्यवरांनी या अभिनव उपक्रमाचे विशेष कौतुक करत हे संग्रहालय शेतकरी, विद्यार्थी आणि संशोधकांसाठी अत्यंत उपयुक्त ठरेल, असा विश्वास व्यक्त केला.

यानंतर सामंजस्य करारानुसार स्थापन करण्यात येणाऱ्या कस्टम हायरिंग सेंटरसाठी माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांच्या हस्ते कृषिरत्न श्री. आबासाहेब मोरे यांच्याकडे सुधारित बैलचलित शेती अवजारांचे वितरण करण्यात आले.

वितरित करण्यात आलेल्या ११ सुधारित बैलचलित शेती अवजारांमध्ये बैलचलित सौरऊर्जा फवारणी यंत्र, बैलचलित स्लरी अंथरणी यंत्र, खत व बी टोकण यंत्र, धसकटे गोळा करणारे यंत्र, तीन पासांचे खत कोळपे, सुधारित बैलगाडी जू, एकबैल चालित खत व बी टोकण यंत्र, एकबैल चालित वखर, बैलचलित प्लास्टिक आच्छादन यंत्र, बैलचलित उसास माती चढविण्याचे यंत्र तसेच इतर सुधारित अवजारांचा समावेश होता.

अध्यक्षीय समारोपात माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि म्हणाले, नैसर्गिक व सेंद्रिय शेतीचा वाढता प्रसार लक्षात घेता बैलचलित सुधारित शेती अवजारे ही काळाची गरज आहे. कस्टम हायरिंग सेंटरच्या माध्यमातून ही अवजारे शेतकऱ्यांना सहज उपलब्ध होतील. त्यामुळे उत्पादन खर्चात बचत, श्रमात घट आणि शाश्वत शेतीला मोठी चालना मिळेल.

प्रमुख अतिथी कृषिरत्न श्री. आबासाहेब मोरे यांनी श्री स्वामी समर्थ सेवा मार्गामार्फत या अवजारांचा जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत प्रसार करून नैसर्गिक शेतीला अधिक गती देण्याचा संकल्प व्यक्त केला.

कार्यक्रमास विद्यापीठातील विविध महाविद्यालयांचे अधिष्ठाता, संचालक, विभागप्रमुख, शास्त्रज्ञ, अधिकारी, कर्मचारी, श्री स्वामी समर्थ सेवा मार्गाचे पदाधिकारी, नैसर्गिक शेती करणारे शेतकरी तसेच परिसरातील अनेक शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनाबद्दल उपस्थितांनी आयोजकांचे अभिनंदन करून समाधान व्यक्त केले.

नैसर्गिक व सेंद्रिय शेतीसाठी आधुनिक बैलचलित तंत्रज्ञान शेतकऱ्यांच्या दारी पोहोचविण्याच्या दृष्टीने हा उपक्रम राज्यासाठी आदर्श ठरेल, असा विश्वास उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केला.