Saturday, August 22, 2026

वनामकृवि – आरपीटीओ येथे सारथी प्रायोजित सेनापती धनाजी जाधव शेतकरी ड्रोन प्रशिक्षणाच्या दुसऱ्या बॅचचे प्रशिक्षण पूर्ण

माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांची फ्लायिंग ग्राऊंडला भेट; प्रशिक्षणार्थींना मार्गदर्शन व प्रमाणपत्रांचे वितरण


वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाच्या परभणी येथील कृषि अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालयात स्थापन करण्यात आलेल्या नागरी विमान वाहतूक संचालनालय (DGCA) मान्यताप्राप्त ‘रिमोट पायलट ट्रेनिंग ऑर्गनायझेशन’ (वनामकृवि – आरपीटीओ / VNMKV–RPTO) येथे सारथीच्या सहकार्याने आयोजित करण्यात आलेल्या सेनापती धनाजी जाधव शेतकरी ड्रोन प्रशिक्षण कार्यक्रमांतर्गत ड्रोन पायलट प्रशिक्षणाच्या दुसऱ्या बॅचचे सात दिवसीय प्रशिक्षण दिनांक १७ ते २३ ऑगस्ट २०२६ या कालावधीत यशस्वीरीत्या पूर्ण झाले. प्रशिक्षण पूर्ण केलेल्या प्रशिक्षणार्थींना विद्यापीठाचे माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांच्या हस्ते प्रमाणपत्रे प्रदान करण्यात आली.

या प्रसंगी माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांनी वनामकृवि – आरपीटीओच्या फ्लायिंग ग्राऊंडला भेट देऊन प्रशिक्षणार्थींशी संवाद साधला. त्यांनी प्रशिक्षणार्थींनी घेतलेल्या प्रत्यक्ष ड्रोन उड्डाण प्रशिक्षणाची माहिती जाणून घेतली तसेच कृषि क्षेत्रातील ड्रोन तंत्रज्ञानाच्या वाढत्या वापराबाबत मार्गदर्शन केले. ड्रोन तंत्रज्ञानाचा उपयोग केवळ कृषि फवारणीपुरता मर्यादित न ठेवता सर्वेक्षण, मॅपिंग, पीक निरीक्षण, आपत्ती व्यवस्थापन तसेच विविध कृषि-आधारित सेवांसाठी करून रोजगार व स्वयंरोजगाराच्या संधी निर्माण करण्याचे आवाहन त्यांनी प्रशिक्षणार्थींना केले.

वनामकृवि – आरपीटीओ येथे डीजीसीएच्या मानकांनुसार ड्रोन पायलट प्रशिक्षण देण्यात येत असून, प्रशिक्षणामध्ये सैद्धांतिक ज्ञान, सिम्युलेटर प्रशिक्षण तसेच प्रत्यक्ष ड्रोन उड्डाणाचा समावेश आहे. प्रशिक्षणार्थींना सुरक्षितपणे ड्रोन हाताळणी, उड्डाण संचालन आणि कृषि क्षेत्रातील ड्रोनच्या विविध उपयोगांची माहिती देण्यात येत आहे.

यापूर्वी दिनांक ५ ते ११ ऑगस्ट २०२६ या कालावधीत पहिल्या बॅचमधील १० प्रशिक्षणार्थींचे प्रशिक्षण यशस्वीरीत्या पूर्ण झाले आहे. आता दुसऱ्या बॅचचेही प्रशिक्षण पूर्ण झाले असून, सारथीच्या सहकार्याने वनामकृवि – आरपीटीओ येथे दर महिन्याला तीन ड्रोन पायलट प्रशिक्षण बॅच आयोजित करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. पुढील तिसरी बॅच दिनांक २७ ऑगस्ट २०२६ पासून सुरू होणार आहे. यामुळे मराठवाड्यातील युवकांना आधुनिक ड्रोन तंत्रज्ञानाचे अधिकृत प्रशिक्षण घेऊन कृषि तसेच इतर विविध क्षेत्रांमध्ये रोजगार व उद्योजकतेच्या नव्या संधी उपलब्ध होणार आहेत.

या प्रमाणपत्र वितरण कार्यक्रमास संचालक शिक्षण डॉ. बाबासाहेब ठोंबरे, संशोधन संचालक डॉ. भगवान आसेवार, कृषि अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. राहुल रामटेके, कृषि महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. प्रविण वैद्य, उपसंचालक (बियाणे) तथा विभाग प्रमुख डॉ. हरिकांत काळपांडे, कीटक शास्त्र विभाग प्रमुख डॉ. पुरुषोत्तम नेहरकर,  पाणी सिंचन व्यवस्थापन विभागाचे वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. हरीश आवारी, वनामकृवि – आरपीटीओचे प्रमुख डॉ. विशाल इंगळे, कीटक शास्त्रज्ञ डॉ. अनंत लाड, डॉ. दिगंबर पटाईत, डॉ. श्रद्धा धुरगुडे, श्री. ऋषिकेश औंढेकर तसेच कृषि महाविद्यालयातील विद्यार्थी आणि इतर मान्यवर उपस्थित होते.

मान्यवरांच्या हस्ते प्रशिक्षण पूर्ण केलेल्या प्रशिक्षणार्थींना प्रशस्तिपत्रे व प्रमाणपत्रे प्रदान करून त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या. वनामकृवि – आरपीटीओच्या माध्यमातून कृषि क्षेत्रात ड्रोन तंत्रज्ञानाचा प्रसार करण्यासोबतच युवकांना कौशल्याधारित प्रशिक्षण देऊन रोजगार व स्वयंरोजगाराच्या नव्या संधी निर्माण करण्याचे कार्य सुरू आहे.









सोयाबीन पिकातील पाने खाणाऱ्या अळ्यांचे असे करा व्यवस्थापन; वनामकृविच्या शास्त्रज्ञांचा सल्ला

 

महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी सोयाबीन हे महत्त्वाचे नगदी पीक असून, त्याच्या उत्पादनावर शेतकऱ्यांचे आर्थिक उत्पन्न मोठ्या प्रमाणात अवलंबून आहे. सोयाबीन पिकाची उत्पादकता कमी होण्यामागे किडींचा प्रादुर्भाव हे प्रमुख कारण आहे. पाने खाणाऱ्या अळ्यांमुळे सोयाबीनचे एकत्रितपणे ७१ टक्क्यांपर्यंत, तर केवळ उंटअळीमुळे ५० टक्क्यांपर्यंत नुकसान होऊ शकते. सध्या सोयाबीन पिकावर उंटअळी व तंबाखूवरील पाने खाणाऱ्या अळीचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी पिकाचे नियमित निरीक्षण करून एकात्मिक कीड व्यवस्थापन पद्धतीचा अवलंब करावा, असे आवाहन वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाच्या कीटकशास्त्र विभागातील शास्त्रज्ञ डॉ. अनंत लाड, डॉ. पुरुषोत्तम नेहरकर, डॉ. राजरतन खंदारे व डॉ. योगेश माने यांनी केले आहे.

सोयाबीन पिकाचे वेळोवेळी कीड सर्वेक्षण करून पीक तणमुक्त ठेवावे. तंबाखूवरील पाने खाणारी अळी व केसाळ अळी यांची अंडी आणि अळीग्रस्त पाने अलगद तोडून अळीसह नष्ट करावीत. तंबाखूवरील पाने खाणारी अळी व हिरवी घाटेअळी यांच्या सर्वेक्षणासाठी प्रत्येक किडीसाठी हेक्टरी पाच कामगंध सापळे लावावेत. मोठ्या प्रमाणात नर पतंग पकडून नष्ट करण्यासाठी हेक्टरी १५ ते २० सापळे लावण्याची शिफारस करण्यात आली आहे. तसेच शेतात इंग्रजी ‘T’ अक्षरासारखे ५० पक्षीथांबे प्रतिहेक्टरी उभारावेत.

तंबाखूवरील पाने खाणाऱ्या अळीच्या व्यवस्थापनासाठी नोमुरिया रिलाय या बुरशीची ४ ग्रॅम प्रतिलिटर पाण्यात मिसळून प्रादुर्भाव आढळताच फवारणी करावी. प्रतिबंधात्मक उपाय म्हणून ५ टक्के निंबोळी अर्काची फवारणी करावी.

किडींची संख्या आर्थिक नुकसान पातळी ओलांडल्यानंतरच कीटकनाशकांची फवारणी करावी. यासाठी फ्लूबेंडामाईड ३९.३५% एससी ०.३ मिली, क्लोरॅन्ट्रानिलीप्रोल १८.५% एससी ०.३ मिली, इमामेक्टीन बेंझोएट १.९०% ईसी ०.८५ मिली, टेरॅनिप्रोल १८.१८% एससी ०.५–०.६ मिली, नोव्हाल्युरॉन ५.२५% + इंडॉक्साकार्ब ४.५०% एससी १.६५–१.७५ मिली किंवा ॲसिटामीप्राईड २५% + बायफेंथ्रीन २५% डब्लूजी ०.५ ग्रॅम प्रतिलिटर पाण्यातून यापैकी एका कीटकनाशकाची आलटून-पालटून फवारणी करावी.

वरील कीटकनाशकांचे प्रमाण साध्या किंवा नॅपसॅक पंपासाठी असून, पेट्रोल पंपासाठी हे प्रमाण तीनपट वापरावे. फवारणीसाठी स्वच्छ पाणी वापरावे तसेच फवारणी करताना सुरक्षिततेची योग्य काळजी घ्यावी, असे आवाहन तज्ज्ञांनी केले आहे.

तंबाखूवरील पाने खाणारी व हिरवी घाटेअळी

तंबाखूवरील पाने खाणारी घाटेअळी

तंबाखूवरील पाने खाणारी घाटेअळी

उंटअळी

उंटअळी

उंटअळी

वनामकृवित गाजरगवत निर्मूलन सप्ताहानिमित्त मेक्सिकन भुंग्यांद्वारे जैविक नियंत्रण

गाजरगवताच्या समूळ निर्मूलनासाठी जैविक नियंत्रणाला चालना देण्याचे माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांचे आवाहन




वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणीच्या परोपजीवी कीटक संशोधन योजना व कीटकशास्त्र विभागाच्या संयुक्त विद्यमाने ‘गाजरगवत निर्मूलन सप्ताहा’निमित्त अखिल भारतीय समन्वयित सिंचन पाणी व्यवस्थापन प्रकल्पाच्या प्रक्षेत्रावर गाजरगवताच्या जैविक नियंत्रणासाठी मेक्सिकन भुंग्यांच्या माध्यमातून दिनांक २२ ऑगस्ट २०२६ रोजी विशेष मोहीम राबविण्यात आली. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यापीठाचे माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि होते.

यावेळी संशोधन संचालक डॉ. भगवान आसेवार, शिक्षण संचालक डॉ. बाबासाहेब ठोंबरे व अधिष्ठाता डॉ. प्रवीण वैद्य यांची प्रमुख उपस्थिती होती. मान्यवरांच्या हस्ते परोपजीवी कीटक संशोधन योजना कार्यालयामार्फत निर्मित व संवर्धित करण्यात आलेले मेक्सिकन भुंगे अखिल भारतीय समन्वयित सिंचन पाणी व्यवस्थापन प्रकल्पाच्या प्रक्षेत्रावर गाजरगवताच्या जैविक नियंत्रणासाठी सोडण्यात आले.

मेक्सिकन भुंग्याचे प्रौढ तसेच त्यांच्या अळ्या गाजरगवताची पाने खात असल्याने पानांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होते. परिणामी गाजरगवताची वाढ व पुनरुत्पादन क्षमता कमी होण्यास मदत होते. विद्यापीठ परिसरात या जैविक नियंत्रण घटकांची संख्या वाढवून गाजरगवताचे पर्यावरणपूरक व शाश्वत व्यवस्थापन करण्याच्या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आला.

यावेळी मार्गदर्शन करताना माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांनी गाजरगवताचे केवळ नियंत्रण न करता त्याचे समूळ निर्मूलन करण्याच्या दृष्टीने उपाययोजना करणे आवश्यक असल्याचे सांगितले. गाजरगवत उपटून त्याची योग्य पद्धतीने विल्हेवाट लावणे तसेच त्यापासून नैसर्गिक खत तयार करून त्याचा उपयोग करणे शक्य असल्याचे त्यांनी नमूद केले.

गाजरगवताच्या जैविक नियंत्रणामध्ये मेक्सिकन भुंग्याचे महत्त्वपूर्ण योगदान असल्याचे स्पष्ट करताना माननीय कुलगुरूंनी सांगितले की, मेक्सिकन भुंग्याचे प्रौढ व अळ्या दोन्ही गाजरगवताची पाने खात असल्याने त्याच्या वाढीस मोठ्या प्रमाणात आळा बसतो. अनेक भागांमध्ये मेक्सिकन भुंग्याच्या प्रभावामुळे गाजरगवताचे प्रमाण कमी झाले असून, त्याच्या जैविक नियंत्रणात या भुंग्याची महत्त्वाची भूमिका असल्याचे त्यांनी नमूद केले.

कीड, रोग किंवा तणांचा प्रादुर्भाव झाल्यानंतर त्यांच्या व्यवस्थापनासाठी जैविक पद्धतींचा प्रभावी वापर केल्यास पर्यावरणपूरक व शाश्वत नियंत्रण साध्य करता येते. त्याचप्रमाणे गाजरगवताच्या व्यवस्थापनासाठी गाजरगवताची पाने खाणारे मेक्सिकन भुंगे व त्यांच्या अळ्या तसेच तरोट्यासारख्या स्पर्धात्मक वनस्पतींचा वापर करून प्रभावी नियंत्रण साध्य करता येते. भविष्यात गाजरगवताचे समूळ निर्मूलन करण्यासाठी अशा जैविक उपाययोजनांना अधिक चालना देण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.

कीड व्यवस्थापनामध्ये सापळा पिकांचे महत्त्व विशद करताना माननीय कुलगुरूंनी सापळा पिके आणि जैविक नियंत्रण घटकांच्या प्रभावी वापराबाबत अधिक संशोधन करण्याची गरज व्यक्त केली. विविध पिकांमध्ये सापळा पिकांचा वापर करून कीड व्यवस्थापन अधिक प्रभावी करता येते. त्यामुळे मेक्सिकन भुंगा, त्याच्या अळ्या तसेच सापळा पिकांच्या प्रभावी वापराबाबत संशोधनाला चालना देण्याचे आवाहन त्यांनी केले.

यावेळी उपस्थित मान्यवरांनी अखिल भारतीय समन्वयित सिंचन पाणी व्यवस्थापन प्रकल्पाच्या प्रक्षेत्रावरील ड्रोन प्रशिक्षण केंद्राला भेट दिली. या वेळी कृषी क्षेत्रातील आधुनिक तंत्रज्ञानामध्ये ड्रोनच्या वापराबाबत माहिती देण्यात आली तसेच ड्रोनचे प्रत्यक्ष प्रात्यक्षिक करून दाखविण्यात आले. कीड व रोग व्यवस्थापन, पीक संरक्षण तसेच कृषी क्षेत्रातील विविध कामांसाठी ड्रोन तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करण्याच्या दृष्टीने या प्रात्यक्षिकाचे महत्त्व अधोरेखित करण्यात आले.

कीटकशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. पुरुषोत्तम नेहरकर यांनी विद्यापीठ परिसरात गाजरगवत निर्मूलनासाठी कृषी कार्यानुभव कार्यक्रमातील विद्यार्थ्यांच्या माध्यमातून विशेष मोहीम राबविण्यात येणार असल्याचे सांगितले. या मोहिमेदरम्यान विद्यापीठ परिसरातील गाजरगवत उपटून त्याचे निर्मूलन, योग्य पद्धतीने विल्हेवाट तसेच गाजरगवताची पाने खाणारे मेक्सिकन भुंगे व त्यांच्या अळ्यांच्या माध्यमातून जैविक नियंत्रण याबाबत जनजागृती करण्यात येणार असल्याचे त्यांनी नमूद केले.

कार्यक्रमाची प्रस्तावना करताना परोपजीवी कीटक संशोधन योजनेच्या प्रभारी अधिकारी डॉ. श्रद्धा धुरगुडे यांनी गाजरगवत निर्मूलन सप्ताहाची उद्दिष्टे, गाजरगवतामुळे होणारे दुष्परिणाम तसेच मेक्सिकन भुंग्याचे प्रौढ व अळ्या गाजरगवताची पाने खाऊन त्याचे जैविक नियंत्रण कशा प्रकारे करतात, याबाबत उपस्थित मान्यवरांना माहिती दिली.

या उपक्रमात उपसंचालक (बियाणे) डॉ. हिराकांत काळपांडे, एकात्मिक शेती पद्धतीचे प्रभारी अधिकारी डॉ. किरण जाधव, पाणी व्यवस्थापन योजनेचे प्रभारी अधिकारी डॉ. हरीश आवारी, सहाय्यक कीटकशास्त्रज्ञ डॉ. दिगंबर पटाईत, डॉ. अनंत लाड, डॉ. धनंजय मोहड, कृषी अभियंता डॉ. विशाल इंगळे, वरिष्ठ संशोधन सहाय्यक श्री. ऋषिकेश औंढेकर, संशोधन सहयोगी डॉ. राजरत्न खंदारे व डॉ. योगेश मात्रे यांच्यासह कीटकशास्त्र विभागातील अधिकारी, कर्मचारी, पदव्युत्तर व आचार्य पदवीचे विद्यार्थी तसेच कृषी महाविद्यालय, गोळेगाव येथील रावेच्या विद्यार्थिनींनी उत्स्फूर्त सहभाग घेतला.







Friday, August 21, 2026

गो-म्हैस स्टार्टअप म्हणजे शेतकऱ्याचा स्वाभिमान

 वनामकृविच्या छत्रपती संभाजीनगर येथील कृषि विज्ञान केंद्राद्वारे पाच दिवसीय कौशल्य विकास प्रशिक्षण संपन्न

ग्रामीण अर्थव्यवस्थेला बळकटी देण्यासाठी वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणीचे माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांच्या संकल्पनेतून आणि संचालक विस्तार शिक्षण डॉ. राकेश अहिरे यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यापीठाच्या छत्रपती संभाजीनगर येथील कृषि विज्ञान केंद्राद्वारे गो-म्हैस स्टार्टअप : गोठ्यापासून उद्योगापर्यंत’ या विषयावर पाच दिवसीय कौशल्य विकासाधारित व्यावसायिक प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

दिनांक १७ ते २१ ऑगस्ट २०२६ या कालावधीत आयोजित या प्रशिक्षणात जिल्ह्यातील ९० हून अधिक तरुण शेतकरी, महिला बचत गटांच्या सदस्य तसेच इच्छुक उद्योजकांनी सहभाग घेतला.

प्रशिक्षणाच्या समारोपप्रसंगी प्रमुख अतिथी व तज्ज्ञ मार्गदर्शक जिल्हा दुग्धविकास अधिकारी, छत्रपती संभाजीनगर श्रीमती मनिषा हराळ-मोरे यांनी मार्गदर्शन करताना, गो-म्हैस व्यवसाय हा शेतकऱ्याचा स्वाभिमान, महिलांच्या सबलीकरणाचे माध्यम आणि गावाच्या आर्थिक विकासाचा आधार आहे, असे सांगितले. तरुण पिढीने या व्यवसायाकडे केवळ पारंपरिक व्यवसाय म्हणून न पाहता त्याचे उद्योगात रूपांतर करून रोजगारनिर्मिती करावी, असे आवाहन त्यांनी केले.

कार्यक्रम समन्वयक डॉ. दीप्ती पाटगावकर यांनी मार्गदर्शन करताना गो-म्हैस स्टार्टअपचे महत्त्व स्पष्ट केले. शेतीसोबत दुग्ध व्यवसायातून वर्षभर नियमित उत्पन्न मिळू शकते, महिलांना आर्थिक स्वावलंबन प्राप्त होते, गावातच रोजगाराच्या संधी निर्माण होतात तसेच शेणखताच्या वापरामुळे जमिनीची सुपीकता वाढण्यास मदत होते, असे त्यांनी सांगितले.

प्रशिक्षणाचे समन्वयक म्हणून कृषि विज्ञान केंद्राच्या पशुसंवर्धन व दुग्धशास्त्र विषय विशेषज्ञ डॉ. अनिता जिंतुरकर यांनी काम पाहिले. प्रशिक्षणादरम्यान वैज्ञानिक पद्धतीने गोपालन, गाय-म्हशींची निवड, आहार व संगोपन, आधुनिक गोठा व्यवस्थापन, म्हशींसाठी विविध निवास पद्धती, रोग प्रतिबंध, लसीकरण, स्वच्छता व प्राथमिक उपचार, दुग्ध प्रक्रिया व मूल्यवर्धन, विपणन आणि वित्त व्यवस्थापन या विषयांवर प्रात्यक्षिकांसह मार्गदर्शन करण्यात आले.

कृषि विज्ञान केंद्र, सगरोळी येथील पशुसंवर्धन व दुग्धशास्त्र विषय विशेषज्ञ डॉ. निहाल मुल्ला यांनी चारा व्यवस्थापनावर मार्गदर्शन केले. पशुसंवर्धन विभाग, खुलताबाद येथील सहायक आयुक्त डॉ. उत्कर्ष वानखेडे यांनी शासनाच्या विविध योजनांची माहिती दिली. पशुवैद्यकीय अधिकारी, सावंगी बाजार येथील डॉ. बिचोळे यांनी लसीकरणाबाबत मार्गदर्शन केले. कृषि विस्तार शिक्षण विषय विशेषज्ञ डॉ. बसवराज पिसुरे यांनी जैविक निविष्ठा निर्मितीविषयी मार्गदर्शन केले.

प्रशिक्षणाचा एक भाग म्हणून सावंगी बाजार येथील कृषि विज्ञान केंद्राच्या माध्यमातून तरुण डेअरी उद्योजक श्री. संदीप नलावडे, संचालक, आदर्श डेअरी यांच्या डेअरी उद्योगाला प्रक्षेत्र भेट देण्यात आली. त्यांनी दुग्ध व्यवसायापासून उद्योग उभारणीपर्यंतचा प्रवास आणि यशोगाथा प्रशिक्षणार्थींना सांगितली. तसेच छत्रपती संभाजीनगर येथील श्याम गोसंवर्धन केंद्राला भेट देऊन शेण व गोमूत्रापासून जैविक निविष्ठा निर्मितीचे प्रात्यक्षिक पाहण्यात आले. यावेळी श्री. राजकिरणजी व श्री. सुधीर विद्वांस यांनी मार्गदर्शन केले.

प्रशिक्षणाच्या समारोपप्रसंगी सर्व प्रशिक्षणार्थींना प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात आले. प्रशिक्षणातून प्रेरणा घेत अनेक प्रशिक्षणार्थींनी लवकरच स्वतःचा गो-म्हैस व दुग्ध व्यवसाय सुरू करण्याचा संकल्प व्यक्त केला.

कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी श्री. सतीश कदम, श्री. जयदेव सिंगल आणि श्री. जयदीप बनसोडे यांनी सहकार्य केले. कृषि विज्ञान केंद्रातील सर्व शास्त्रज्ञ व कर्मचाऱ्यांनी प्रशिक्षणाच्या यशस्वितेसाठी विशेष परिश्रम घेतले.






‘पाणी अडवा, पाणी जिरवा, जलयुक्त महाराष्ट्र घडवा’चा संदेश देत परभणीकरांचा ‘महा-वॉकेथॉन’मध्ये उत्स्फूर्त सहभाग

 वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील क्रीडा संकुलापर्यंत या महा-वॉकेथॉनची सांगता

पावसाच्या प्रत्येक थेंबाचे संवर्धन करून जलसमृद्ध महाराष्ट्र घडवूया : माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि



माजी मुख्यमंत्री स्व. सुधाकरराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त तसेच जलसंधारण दिनाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांमध्ये जलसंधारणाबाबत जनजागृती करण्यासाठी ‘पाणी अडवा, पाणी जिरवा, जलयुक्त महाराष्ट्र घडवा’ हा संदेश देत परभणी येथे ‘महा-वॉकेथॉन – वॉक फॉर वॉटर’ चे दिनांक २१ ऑगस्ट २०२६  रोजी आयोजन करण्यात आले. या उपक्रमाला परभणीकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

राज्यभरात २१ ऑगस्ट रोजी जलसंधारण दिन, १५ ते २१ ऑगस्टदरम्यान जलसंधारण सप्ताह, तसेच १५ ऑगस्ट २०२६ ते २६ जानेवारी २०२७ या कालावधीत जलसंधारण अभियान राबविण्यात येत आहे. या अभियानाच्या माध्यमातून नागरिकांमध्ये, विशेषतः युवकांमध्ये, मृद व जलसंधारणाचे महत्त्व पोहोचविण्याच्या उद्देशाने महा-वॉकेथॉनचे आयोजन करण्यात आले.

जिल्हाधिकारी कार्यालय, परभणी येथून वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील क्रीडा संकुलापर्यंत या महा-वॉकेथॉनचे आयोजन करण्यात आले. जिल्हा परिषद अध्यक्षा श्रीमती लता विजयकुमार वाकळे यांच्या हस्ते वॉकेथॉनचा शुभारंभ झाला.

या कार्यक्रमास परभणी महानगरपालिकेचे महापौर श्री. सय्यद इक्बाल सय्यद खाजा, वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि, मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती नतिशा माथुर, मनपा आयुक्त श्री. नितीन नार्वेकर, अपर जिल्हाधिकारी श्रीमती शोभा जाधव, विद्यापीठाचे शिक्षण संचालक डॉ. बाबासाहेब ठोंबरे, कृषि महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. प्रवीण वैद्य, विद्यार्थी कल्याण अधिकारी डॉ. राजेश कदम, वनस्पतीशास्त्र विभाग प्रमुख डॉ. हिराकांत काळपांडे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. संजय घोन्सीकर, जिल्हा जलसंधारण अधिकारी कविराज कुचे, तहसीलदार डॉ. संदीप राजापुरे यांची प्रमुख उपस्थिती होती.

माती आणि पाणी ही अत्यंत महत्त्वाची नैसर्गिक संसाधने असून त्यांच्या संवर्धनासाठी व्यापक लोकसहभाग आवश्यक आहे. केवळ भाषणातून नव्हे, तर प्रत्यक्ष कृतीतून जलसंधारणाचा संदेश जनमानसात रुजविणे गरजेचे आहे. पाण्याची उपलब्धता वाढविणे, जलस्रोतांचे पुनरुज्जीवन करणे आणि भविष्यातील पाणीटंचाईवर प्रभावी उपाययोजना करण्यासाठी जलसंधारणाला लोकचळवळीचे स्वरूप देणे आवश्यक आहे.

क्रीडा संकुल येथे झालेल्या सांगता समारंभात वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाचे माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांनी जलसंधारण अभियानात नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन आपला सहभाग, आपली बांधिलकी – जलसंवर्धनाची हीच खरी शक्ती’ हा संदेश प्रत्यक्षात आणावा, असे आवाहन केले. पावसाच्या प्रत्येक थेंबाचे संवर्धन करून जलसमृद्ध आणि हिरवागार महाराष्ट्र घडविण्यासाठी सर्वांनी एकत्रितपणे प्रयत्न करावेत, असेही त्यांनी सांगितले.

मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती नतिशा माथुर यांनी जलसंधारणाच्या माध्यमातून पाणी अडविणे, पाणी जमिनीत जिरविणे आणि मातीची धूप रोखणे शक्य आहे. त्यामुळे प्रत्येक नागरिकाने आपल्या परिसरातील जलस्रोत, पाणलोट क्षेत्र आणि मातीच्या संवर्धनासाठी योगदान द्यावे, असे आवाहन केले.

मनपा आयुक्त श्री. नितीन नार्वेकर यांनी दैनंदिन जीवनात पाणी बचत आणि जलसंधारणाचे महत्त्व स्पष्ट केले.

पाणी वाचवा, पाणी अडवा, पाणी जिरवा’, ‘माती वाचवा, पाणी वाचवा’, ‘पाण्याचा प्रत्येक थेंब अनमोल, जपुया त्याचे मोल’, ‘पावसाचा प्रत्येक थेंब अडवूया, हिरवागार महाराष्ट्र घडवूया’, ‘थेंब थेंब पाणी साठवूया, भविष्यातील दुष्काळ टाळूया’, ‘पाणी नाही तर विकास नाही’, ‘जलसंधारणाशिवाय पर्याय नाही’, ‘जल है तो कल है’ अशा घोषवाक्यांचे फलक हातात घेऊन नागरिकांनी वॉकेथॉनमध्ये उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. विविध घोषणांनी परिसर दुमदुमून गेला.

चित्ररथाच्या माध्यमातूनही जलसंधारणाबाबत जनजागृती करण्यात आली. तसेच जलसंधारण विभागाच्या वतीने रील्स बनवा, बक्षीस मिळवा’ या उपक्रमाची माहिती देण्यात आली. सोशल मीडियाच्या माध्यमातूनही जलसंधारणाचा संदेश अधिकाधिक नागरिकांपर्यंत पोहोचविण्याचे आवाहन मृद व जलसंधारण विभागाच्या वतीने करण्यात आले.

कार्यक्रम यशस्वीरीत्या पार पाडण्यासाठी सहकार्य केल्याबद्दल मृद व जलसंधारण विभागाच्या वतीने विद्यापीठातील राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी डॉ. धीरज पात्रीकर, डॉ. फरिया खान, कृषि अभियांत्रिकी महाविद्यालयाचे डॉ. सुभाष विखे तसेच गांधी विद्यालयाच्या प्राचार्यांचा स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आला.

कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी सहकार्य करणाऱ्या सर्व नागरिक, विद्यार्थी आणि प्रशासकीय यंत्रणेचे मृद व जलसंधारण विभाग, परभणीचे कार्यकारी अभियंता कविराज कुचे यांनी मनःपूर्वक आभार मानले.








वनामकृविच्या चाकूर येथील पदव्युत्तर कृषि व्यवसाय व्यवस्थापन संस्थेच्या एमबीए विद्यार्थ्यांचे उत्कृष्ट प्लेसमेंट; २२ विद्यार्थ्यांची विविध नामांकित कंपन्यांमध्ये निवड

 माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांनी केले यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाच्या पदव्युत्तर कृषि व्यवसाय व्यवस्थापन संस्था (Post Graduate Institute of Agribusiness Management – PGIABM), चाकूर येथील एमबीए (अ‍ॅग्रीबिझनेस मॅनेजमेंट) २०२४–२६ या बॅचच्या विद्यार्थ्यांनी कॅम्पस प्लेसमेंटमध्ये उल्लेखनीय यश संपादन केले आहे. एकूण ३५ विद्यार्थ्यांपैकी २२ विद्यार्थ्यांची विविध नामांकित कंपन्यांमध्ये यशस्वी निवड झाली असून, प्लेसमेंट प्रक्रियेत सहभागी विद्यार्थ्यांमध्ये ६२.८६ टक्के प्लेसमेंटचे उत्कृष्ट प्रमाण नोंदविण्यात आले आहे.

निवड झालेल्या विद्यार्थ्यांना वार्षिक रु. ५ ते ७ लाखांपर्यंतचे वेतन पॅकेज, तसेच अतिरिक्त प्रोत्साहन व विविध लाभ मिळणार आहेत. कृषी, बँकिंग, कृषी-निविष्ठा, कृषी तंत्रज्ञान, सेंद्रिय उत्पादने, लॉजिस्टिक्स आणि इतर विविध क्षेत्रांतील नामांकित संस्थांमध्ये विद्यार्थ्यांची नुकतीच निवड झाली आहे.

विद्यार्थ्यांच्या या उल्लेखनीय यशाबद्दल माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि आणि शिक्षण संचालक डॉ. बाबासाहेब ठोंबरे यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे मनःपूर्वक अभिनंदन केले. त्यांच्या उत्तम कामगिरीचे कौतुक करून भविष्यातील उज्ज्वल वाटचालीसाठी त्यांनी विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या. तसेच संस्थेतील इतर विद्यार्थ्यांनीही अशाच प्रकारे उल्लेखनीय यश संपादन करावे, असे आवाहन केले.

विद्यार्थ्यांची निवड झालेल्या प्रमुख संस्थांमध्ये आयसीआयसीआय बँक (१), आयडीएफसी फर्स्ट बँक (२), कृषीवन टेक्नॉलॉजीज प्रा. लि., हैदराबाद (२), यूपीएल लि. (२), हिंदुस्थान फीड्स (३), स्वाल कॉर्पोरेशन लि. (२), लिगर शिपिंग प्रा. लि. (१), हायफिल्ड ऑर्गॅनिक्स इंक. (३), विल्सन ॲग्री सायन्स (१), कोरोमंडल इंटरनॅशनल लि. (१), ॲग्रो ब्राइट फार्म सोल्युशन प्रा. लि., पुणे (१), उमंग अँड असोसिएट्स, इंदूर (१) आणि सिंजेंटा प्रा. लि. (२) यांचा समावेश आहे.

विशेष म्हणजे, उर्वरित १३ विद्यार्थ्यांनी कॅम्पस प्लेसमेंट प्रक्रियेत सहभाग घेतलेला नाही. हे विद्यार्थी प्रामुख्याने शासकीय सेवा व सार्वजनिक क्षेत्रात करिअर करण्यास इच्छुक असून, विविध स्पर्धा परीक्षांच्या तयारीवर लक्ष केंद्रित करीत आहेत.

या यशाबद्दल बोलताना पीजीआयएबीएम, चाकूरचे अधिष्ठाता डॉ. संतोष कांबळे यांनी सांगितले की, विद्यापीठाचे माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांनी संस्थेला आणि विद्यार्थ्यांना सातत्याने प्रोत्साहन दिले असून, त्याचीच ही पावती आहे. संस्थेमध्ये विद्यार्थ्यांना मिळणारे दर्जेदार शैक्षणिक मार्गदर्शन, उद्योगाभिमुख प्रशिक्षण, प्रत्यक्ष उद्योगक्षेत्राचा अनुभव, करिअर-केंद्रित उपक्रम, तसेच विद्यार्थ्यांची मेहनत व समर्पण यामुळे हे उल्लेखनीय यश साध्य झाले आहे.

विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल विद्यापीठाचे माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि, शिक्षण संचालक डॉ. बाबासाहेब ठोंबरे, संशोधन संचालक डॉ. भगवान आसेवार, विस्तार शिक्षण संचालक डॉ. राकेश अहिरे,  कुलसचिव श्री. पुरभा काळे, विद्यापीठ अभियंता श्री. दीपक कशाळकर, नियंत्रक श्रीमती भाग्यश्री जाधव, सातत्यपूर्ण मार्गदर्शन, प्रोत्साहन व सहकार्य लाभल्याबद्दल डॉ. संतोष कांबळे यांनी त्यांचे आभार व्यक्त केले.

पीजीआयएबीएम, चाकूरच्या विद्यार्थ्यांनी मिळविलेले हे यश विद्यापीठाच्या गुणवत्तापूर्ण शिक्षण, उद्योगाभिमुख कौशल्यविकास आणि विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण करिअर विकासासाठी केलेल्या प्रयत्नांचे द्योतक असल्याचे मानले जात आहे.





वनामकृवित माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांच्या हस्ते सुधारित तुती लागवड उपक्रमाचा शुभारंभ; रेशीम उद्योग अधिक फायदेशीर करण्यासाठी संशोधनावर भर

 

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी येथील रेशीम संशोधन योजनेअंतर्गत सुधारित तुती लागवड उपक्रमास दि. २० ऑगस्ट २०२६ रोजी माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांच्या शुभहस्ते तुतीची रोपे लावून सुरुवात करण्यात आली.

या कार्यक्रमास संशोधन संचालक डॉ. भगवान आसेवार, शिक्षण संचालक डॉ. बाबासाहेब ठोंबरे, विस्तार शिक्षण संचालक डॉ. राकेश अहिरे तसेच अधिष्ठाता डॉ. प्रवीण वैद्य यांची प्रमुख उपस्थिती होती.

यावेळी मार्गदर्शन करताना माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांनी सुधारित तुती लागवड उपक्रमाचा लाभ राज्यातील सर्व रेशीम उद्योजकांपर्यंत पोहोचणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन केले. विद्यापीठामध्ये रेशीम उद्योगाशी संबंधित संशोधन, तंत्रज्ञान विकास आणि प्रात्यक्षिकांना प्राधान्य देण्यात येत असून, संशोधनातून विकसित होणारे तंत्रज्ञान शेतकऱ्यांपर्यंत प्रभावीपणे पोहोचविण्याचे आवाहन त्यांनी केले.

यावेळी त्यांनी कृषि महाविद्यालय, गोळेगाव येथील रावे (Rural Agricultural Work Experience) घटक संलग्नता उपक्रमांतर्गत रेशीम संशोधन योजनेस संलग्न असलेल्या विद्यार्थ्यांशी संवाद साधून मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांनी केवळ नोकरीच्या संधींचा विचार न करता कृषि क्षेत्रातील विविध संधींचा अभ्यास करून कृषि व रेशीम उद्योगामध्ये उद्योजक म्हणून पुढे यावे, असा सल्ला माननीय कुलगुरूंनी दिला.

रेशीम संशोधन योजनेचे प्रभारी अधिकारी डॉ. धीरजकुमार कदम यांनी सुधारित तुती लागवड उपक्रमाचे महत्त्व विशद केले. रेशीम उद्योगासाठी तुतीची लागवड ही अत्यंत महत्त्वाची बाब असून, तुतीची उत्पादकता, पानांची गुणवत्ता तसेच लागवडीसाठी आवश्यक मनुष्यबळ आणि उत्पादन खर्च यांचा विचार करून योग्य लागवड पद्धतीचा अवलंब करणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.

या उपक्रमांतर्गत रेशीम संशोधन योजनेच्या प्रक्षेत्रावर विविध अंतरावर तुतीची वृक्ष व झुडूप पद्धतीने लागवड करण्यात येणार आहे. या प्रक्षेत्रावर विविध लागवड पद्धतींचे संशोधन व प्रात्यक्षिके घेण्यात येणार असून, त्यातून प्राप्त होणाऱ्या निष्कर्षांच्या आधारे महाराष्ट्रातील रेशीम उत्पादक शेतकऱ्यांसाठी अधिक कार्यक्षम आणि आर्थिकदृष्ट्या फायदेशीर तुती लागवड पद्धतीची शिफारस करण्यात येणार आहे. त्यामुळे रेशीम उद्योजकांना तुतीची उत्पादकता वाढविण्यास तसेच रेशीम उद्योग अधिक फायदेशीर करण्यास मदत होणार आहे.

या कार्यक्रमास अधिष्ठाता डॉ. विश्वनाथ खंदारे, विभाग प्रमुख डॉ. हिराकांत काळपांडे, डॉ. के. टी. जाधव, प्रभारी अधिकारी डॉ. हरीश आवारी, डॉ. कुलदीप शर्मा, डॉ. अविनाश राठोड, डॉ. अर्चना घनवट, शास्त्रज्ञ श्री. धनंजय मोहोड, डॉ. संजोग बोकन, श्री. ऋषिकेश औंढेकर आणि श्री. दत्ता जटाळे यांच्यासह विद्यापीठातील अधिकारी, शास्त्रज्ञ, कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी विष्णू गंभीरे, अनंत गाडेकर, रोहित मोरे, राधिका चव्हाण, प्रवीण वडकुते, विश्वनाथ काकडे आणि विठ्ठल मोहिते यांनी परिश्रम घेतले.