Wednesday, April 29, 2015

भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर ही एक ज्ञानरूपी संस्था होती....... मा. न्या. सी एल थुल

वनामकृवित कास्‍ट्राईब कर्मचारी महासंघाच्‍या वतीने महात्‍मा ज्‍योतीबा फुले व भारतरत्‍न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्‍या संयुक्‍त जयंती महोत्‍सव निमित्‍त व्‍याख्‍यान कार्यक्रम संपन्‍न
मार्गदर्शन करतांना राज्‍य अनुसुचित जाती जमाती आयोगाचे अध्‍यक्ष मा न्‍या सी एल थुल
महात्‍मा फुले व डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्‍या प्रतिमेचे पुजन करतांना 
भारतीय संविधानाचे शिल्‍पकार भारतरत्‍न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी कायदे, अर्थशास्‍त्र, शेतक-यांचे प्रश्‍न, स्‍त्री सबलीकरण, लोकसंख्‍या, वीज व धरण निर्मिती, कामगारांचे प्रश्‍न अशा विविध क्षेत्रात कार्य केले, ते एक ज्ञानरूपी संस्‍थाच होती, त्‍यांच्‍या कार्याची दखल घेत कोलंबिया विद्यापीठातर्फे डॉ आंबेडकरांना जगातील शंभर विद्वांनाच्‍या यादीत प्रथम क्रमांक देऊन गौरविण्‍यात आले, असे प्रतिपादन राज्‍य अनुसुचित जाती जमाती आयोगाचे अध्‍यक्ष मा न्‍या सी एल थुल यांनी केले. वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाच्‍या कास्‍ट्राईब कर्मचारी महासंघच्‍या वतीने महात्‍मा ज्‍योतीबा फुले व भारतरत्‍न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्‍या संयुक्‍त जयंती महोत्‍सव निमित्‍त दि २८ एप्रिल रोजी आयोजीत कार्यक्रमात ते बोलत होते. कार्यक्रमाच्‍या अध्‍यक्षस्‍थानी कुलगुरू मा. डॉ बी व्‍यंकटेश्‍वरलु होते तर केंद्रीय मजुर युनियनचे सरचिटणीस मा जे एस पाटील, संशोधन संचालक डॉ दत्‍तप्रसाद वासकर, विस्‍तार शिक्षण संचालक डॉ बी बी भोसले, कुलसचिव डॉ दिनकर जाधव, महासंघाचे अध्‍यक्ष डॉ जी के लोंढे, महासंघाचे सचिव प्रा ए एम कांबळे यांची व्‍यासपीठावर प्रमुख उपस्थिती होती.
मा न्‍या सी एल थुल पुढे म्‍हणाले की, भारतरत्‍न डॉ बाबासाहेब आंबेडकर निर्मीत संविधानामुळेच आज देशाचा कारभार चालु आहे. संविधानातील समता, स्‍वातंत्र्य, बंधुता व न्‍याय आदींमुळे भारतीय समाज एक संघ आहे. कामगारांच्‍या प्रश्‍नावर त्‍यांनी मोठे कार्य केले असुन देशाच्‍या आर्थिक विकासाकरीता कामगारांच्‍या कौशल्‍य वृध्‍दीसाठी त्‍यांनी प्रयत्‍न केले. श्रमाचे विभाजन करणारी जाती व्‍यवस्‍थेमुळेच श्रमिकांवर अन्‍याय होतात, असे त्‍यांनी सांगितले व डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्‍या विचारांचे जीवनात आचरण करण्‍याचा सल्‍ला यावेळी त्‍यांनी दिला.
केंद्रीय मजुर युनियनचे सरचिटणीस मा जे एस पाटील आपल्‍या भाषणात म्‍हणाले की, भारतरत्‍न डॉ बाबासाहेब आंबेडकर व महात्‍मा ज्‍योतीबा फुले यांच्‍या विचार व कार्यामुळेच मजुरांच्‍या संघटना निर्मिण झाल्‍या असुन या संघटना अधिक मजबुद करणे गरजेचे आहे. 
अध्‍यक्षीय समारोपीय भाषणात कुलगुरू मा. डॉ बी व्‍यंकटेश्‍वरलु म्‍हणाले की, भारतरत्‍न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी अनेक देशाच्‍या घटनेचा अभ्‍यास केला, पंरतु भारतीय परिस्थितीस अनुकूल अशी एक मजबुद संविधान तयार केले असुन त्‍याचा मुलभुत ढाचा कोणीही बदलु शकत नाही. घटनेमुळे देशातील कमजोर समाजास एक संरक्षण प्राप्‍त झाले आहे. 
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन डॉ रामप्रसाद खंदारे व प्रा पपिता गौरखेडे यांनी केले तर आभार प्रदर्शन प्रा निता गायकवाड यांनी केले. कार्यक्रमास विविध महाविद्यालयचे प्राचार्य, विभाग प्रमुख, प्राध्‍यापक, कर्मचारी व विद्यार्थी मोठया संख्‍येने उपस्थित होते. कार्यक्रम यशस्‍वीतेसाठी महासंघाच्‍या सर्व पदाधिकारी व सदस्‍यांनी परिश्रम घेतले. याप्रसंगी कास्‍ट्राईब कर्मचारी महासंघाच्‍या कार्यालयाचे उद्घाटन मान्‍यवरांच्‍या हस्‍ते करण्‍यात आले तसेच शैक्षणिक व क्रीडा स्‍पर्धे वि‍शेष प्राविण्‍या प्राप्‍त विद्यापीठातील कर्मचा-यांच्‍या पाल्‍याचा गुणगौरव मान्‍यवरांच्‍या हस्‍ते करण्‍यात आला.
मार्गदर्शन करतांना कुलगुरू मा डॉ बी व्‍यंकटेश्‍वरलु
मार्गदर्शन करतांना केंद्रीय मजुर युनियनचे सरचिटणीस मा जे एस पाटील

Thursday, April 23, 2015

स्वत:तील कमतरता ओळखुन त्याचा स्वीकार करा ........जिल्हाधिकारी मा श्री सचिंद्रप्रताप सिंह

वनामकृवितील कृषि महाविद्यालय व स्‍पर्धामंचाच्‍या वतीने स्‍पर्धा परीक्षा मार्गदर्शन वर्गात प्रतिपादन


सकारात्मक दृष्टिकोन व अविरत प्रयत्‍न हेच यशाची गुरुकिल्‍ली असुन स्‍वत:च्‍या क्षमतेवर विश्‍वास ठेवा, स्‍वत:तील कमतरता ओळखुन अपयशाची जबाबदारी स्‍वीकारा, असा सल्‍ला जिल्‍हाधिकारी मा श्री सचिंद्रप्रताप सिंह यांनी दिला. वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाच्‍या परभणी येथील कृषि महाविद्यालय व स्‍पर्धामंच यांचे संयुक्‍त विद्यमाने दि. १९ एप्रिल रोजी आयोजीत स्‍पर्धा परीक्षा मार्गदर्शन वर्गात ते बोलत होते. कार्यक्रमाच्‍या अध्‍यक्षस्‍थानी सहयोगी अधिष्‍ठाता डॉ. धर्मराज गोखले होते तर विद्यार्थी कल्‍याण अधिकारी डॉ. महेश देशमुख, विभाग प्रमुख डॉ. बाबासाहेब ठोंबरे, प्रा. संदीप बडगुजर, प्रा. रणजीत चव्‍हाण आदींची प्रमुख उपस्थिती होती.
जिल्‍हाधिकारी मा श्री सचिंद्रप्रताप सिंह पुढे म्‍हणाले की, ज्‍या क्षेत्रात करीयर करावयाचे आहे त्‍याक्षेत्राचे परिपुर्ण ज्ञान संपादन करा, अपयशाचे कारण शोधा, दुस-याकडे बोट दाखवु नका. अनेक विद्यार्थी आत्‍मविश्‍वासाच्‍या जोरावर उच्‍च सनदी अधिकारी झाले आहेत. समाजात बदल घडवायचा हेतु ठेऊन प्रशासनात या. हार्ड वर्क पेक्षा स्‍मार्ट वर्क करा, असा सल्‍ला त्‍यांनी दिला. लोकसेवा आयोगाच्‍या परीक्षेला सामोरे जातांना तयारी कशी असावी, या विषयावर त्‍यांनी सविस्‍तर मार्गदर्शन केले तसेच ‍विद्यार्थ्‍यांनी विचारलेल्‍या शंकांचे निरसन त्‍यांनी केले.
वेळेचे नियोजन हे स्‍पर्धा परीक्षेच्‍या दृष्‍टीने महत्‍वाचे असल्‍याचे प्रतिपादन अध्‍यक्षीय भाषणात सहयोगी अधिष्‍ठाता डॉ. धर्मराज गोखले यांनी केले. कार्यक्रमाचे प्रास्‍ताविक विद्यार्थी कल्‍याण अधिकारी डॉ. महेश देशमुख यांनी केले. सुत्रसंचालन श्री मांजरे तर आभार प्रदर्शन स्‍पर्धा मंचचे विद्यार्थी अध्‍यक्ष श्रीकृ‍ष्‍णा वारकड यांनी केले. कार्यक्रमास विद्यापीठातील विद्यार्थी मोठ्या संख्‍येने उपस्थित होते.

Thursday, April 16, 2015

सघन लागवड फळबागेत सुक्ष्‍म अन्‍नद्रव्‍याचा संतुलित वापर करा....... कृषि शास्‍त्रज्ञ

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाच्‍या शास्‍त्रज्ञांची झरी येथे फळबागेस भेट
मराठवाड्यातील बरेच शेतकरी अधिक उत्‍पादनासाठी फळबागेत सघन लागवड पध्‍दतीचा अवलंब करीत आहेत. सदरिल फळबागेत सुक्ष्‍म अन्‍नद्रव्‍यांचे योग्‍य व्‍यवस्‍थापन न केल्‍यास फळपीकांमध्‍ये समस्‍या निर्माण होत आहेत. झरी येथील प्रगतशील शेतकरी कृषिभुषण श्री सुर्यकांतरावजी देशमुख यांच्‍या पेरु व मोसंबी बागेस दि. १४ एप्रिल रोजी वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील विस्‍तार शिक्षण संचालक डॉ. बी. बी. भोसले यांच्‍या नेतृत्‍वाखाली फळबाग शास्‍त्रज्ञ डॉ. ए एस कदम, वनस्‍पती विकृतीशास्त्रज्ञ डॉ. जी. पी. जगताप, फळबागतज्ञ प्रा. बी. एम. कलालबंडी व संशोधन सहाय्यक डॉ. चव्‍हाण व श्री राम शिंदे यांनी भेट दिली.
    सदरिल फळबागेतील पेरु पिकाची १८ महिन्‍याचे ललित या वाणाची सधन लागण पध्‍दतीने ३ x ३ मीटर अंतरावर लागवड करण्‍यात आलेली असुन काही झाडांचे पान लाल होऊन कालांतराने झाड वाळत असलेले आढळले. ही समस्‍या जमिनीच्‍या सुक्ष्‍म अन्‍नद्रव्‍यांच्‍या  कमतरतेमुळे होते असल्‍याच्‍या शास्‍त्रज्ञांनी निदान केले. यामध्‍ये मुख्‍यत: जस्‍त अन्‍नद्रव्‍याची कमतरता कारणीभूत असुन जमिनीच्‍या सामु ८.५ टक्‍के पेक्षा अधिक असणा-या जमीनीत या प्रकारची समस्‍या मोठ्या प्रमाणात आढळते. यासाठी उपाययोजना म्‍हणुन ५० ग्रॅ. झिंक सल्‍फेट अधिक २५ ग्रॅ. कळीचा चुना एकत्र करुन फवारणी करण्‍याचा सल्‍ला शास्‍त्रज्ञांनी दिला. तसेच जमीनीतून जस्‍त, तांबे, बोरॉन व लोह एकत्रीत सुक्ष्‍म अन्‍नद्रव्‍य प्रति झाड देण्‍याबाबत मार्गदर्शन केले. झाडांची मर थांबण्‍यासाठी कॉपर ऑक्‍सीक्‍लोराईड ३० ग्रॅ. प्रति १० लिटर पाण्‍यात मिसळून प्रभावीत झाडाभोवती आळवणी करणे व झाडावरील फळांची विरळणी करण्‍याचे मार्गदर्शन केले. 

Wednesday, April 15, 2015

वनामकृवित भारतरत्‍न डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्‍साहात साजरीवसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाच्‍या विद्यार्थी कल्‍याण अधिकारी कार्यालयाच्‍या वतीने भारतरत्‍न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची १२४ वी जयंती साजरी करण्‍यात आली. यावेळी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्‍या प्रतिमेचे कुलगुरू मा डॉ बी व्‍यंकटेश्‍वरलु यांच्‍या हस्‍ते पुजन करून अभिवादन करण्‍यात आले. व्‍यासपीठावर शिक्षण संचालक डॉ अशोक ढवण, संशोधन संचालक डॉ दत्‍तप्रसाद वासकर, विस्‍तार शिक्षण संचालक डॉ बी बी भोसले, कुलसचिव डॉ दिनकर जाधव, प्राचार्य डॉ धर्मराज गोखले, प्राचार्य डॉ पी एन सत्‍वधर, प्राचार्य डॉ पी एस कदम, प्राचार्या प्रा विशाला पटणम, प्राचार्य डॉ उदय खोडके, विद्यार्थी कल्‍याण अधिकारी डॉ महेश देशमुख यांची प्रमुख उपस्थिती होती. याप्रसंगी कुलगुरू मा डॉ बी व्‍यंकटेश्‍वरलु यांनी भारतरत्‍न डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्‍त शुभेच्‍छा दिल्‍या तसेच जयंती निमित्‍त राबविलेल्‍या सतत अठरा तास उपक्रमात पाचशे विद्यार्थ्‍यांच्‍या सक्रिय सहभागाबाबत कौतुक केले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन तुकाराम मंत्रे यांनी तर आभार प्रदर्शन नितीन थोरात यांनी केले. विद्यापीठाच्‍या वतीने ढोलताश्‍याच्‍या गजरात भारतरत्‍न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्‍या प्रतिमेची मिरवणुक काढण्‍यात आली. कार्यक्रमास विद्यापीठातील अधिकारी, कर्मचारी व विद्यार्थी-विद्यार्थींनी मोठ्या संख्‍येने उपस्थित होते.

Monday, April 13, 2015

भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकरांची दृष्टी काळाच्या पुढे होती

वनामकृवित भारतरत्‍न डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्‍त आयोजीत प्रसिध्‍द कवी प्रा संतोष पवार यांचे प्रतिपादन
वनामकृविच्‍या कृषि महाविद्यालयात भारतरत्‍न डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्‍त आयोजीत व्‍याख्‍यानाचा प्रारंभ दिपप्रज्‍वलन करून करतांना शिक्षण संचालक डॉ अशोक ढवण, प्रसिध्‍द कवी प्रा संतोष पवार, प्राचार्य डॉ धर्मराज गोखले, प्राचार्य डॉ के आर कांबळे, विद्यार्थी कल्‍याण अधिकारी डॉ महेश देशमुख, विभाग प्रमुख डॉ बाबासाहेब ठोंबरे, प्रा डि एफ राठोड आदी. 
वनामकृविच्‍या कृषि महाविद्यालयात भारतरत्‍न डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्‍त आयोजीत व्‍याख्‍यान देतांना प्रसिध्‍द कवी प्रा संतोष पवार, व्‍यासपीठावर शिक्षण संचालक डॉ अशोक ढवण, प्राचार्य डॉ धर्मराज गोखले, प्राचार्य डॉ विलास पाटील, प्राचार्य डॉ के आर कांबळे, विद्यार्थी कल्‍याण अधिकारी डॉ महेश देशमुख, विभाग प्रमुख डॉ बाबासाहेब ठोंबरे, नितीन थोरात आदी.
***************************************
भारतरत्‍न डॉ बाबासाहेब आंबेडकर हे असामान्‍य व्‍यक्‍तीमत्‍व होते, बाबासाहेबांच्‍या शेती व शेतकरी विषयक विचारांचा कृषि विद्यापीठात अभ्‍यास व्‍हावा. त्‍याकाळी बाबासाहेबांनी नदीजोड प्रकल्‍पाची कल्‍पना मांडली होती. बाबासाहेबांची दृष्‍टी ही काळाच्‍या पुढे पाहणारी होती, असे विचार प्रसिध्‍द कवी प्रा संतोष पवार यांनी मांडले. वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातंर्गत असेलल्‍या कृषि महाविद्यालयाच्‍या जिमखान्‍याच्‍या वतीने भारतरत्‍न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्‍या जयंती निमित्‍त दि १३ एप्रिल रोजी आयोजीत व्‍याख्‍यान कार्यक्रमात ते बोलत होते.
कार्यक्रमाच्‍या अध्‍यक्षस्‍थानी शिक्षण संचालक डॉ अशोक ढवण होते तर सहयोगी अधिष्‍ठाता डॉ. धर्मराज गोखले, सहयोगी अधिष्‍ठाता डॉ. विलास पाटील, सहयोगी अधिष्‍ठाता डॉ. के आर कांबळे, विद्यार्थी कल्‍याण अधिकारी डॉ महेश देशमुख, विभाग प्रमुख डॉ. बाबासाहेब ठोंबरे, विद्यार्थी प्रतिनिधी नितीन थोरात यांची प्रमुख उपस्थिती होती.  
प्रा संतोष पवार पुढे म्‍हणाले की, आजचा युवक चंगळवादाकडे झुकत असुन बाबासाहेबांच्‍या संघर्षमय जीवनाचे व विचारांचा अभ्‍यास युवकांनी केला पाहिजे. बाबासाहेबांनी तयार केलेल्‍या राज्‍यघटनेत सामाजिक समता, न्‍याय, बंधुता, शिक्षणाचा हक्‍क आदी तरतुदींचा लाभ आज आपण सर्वजण उपभोगत आहोत. जो पर्यंत देशात जातीविरहीत समाज निर्माण होणार नाही, तो पर्यंत देशाची खरी प्रगती साधता येणार नाही, असे प्रतिपादन त्‍यांनी केले.
अध्‍यक्षीय भाषणात शिक्षण संचालक डॉ अशोक ढवण म्‍हणाले की, भारतरत्‍न डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे बहुआयामी व्‍यक्‍तीमत्‍व होते, त्‍यांच्‍या विचारांचे चिंतनासाठीच जयंती साजरी करण्‍याचा उद्देशच असतो, विद्यार्थींनी बाबासाहेबांसारखेच ज्ञान लालसाचे अनुकरण करावे, असा सल्‍ला त्‍यांनी दिला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दलित समाज संघटीत करण्‍याचे महान कार्य केल्‍याचे प्रतिपादन कृषि महाविद्यालयाचे सह्योगी अधिष्‍ठाता डॉ धर्मराज गोखले यांनी आपल्‍या भाषणात केले.
विद्यार्थी विशाल राठोड  व जीवन धोत्रे यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्‍याबाबत आपले वि‍चार मांडले तर प्रमुख पाहुण्‍यांचा परिचय तुकाराम मंत्रे यांनी करून दिला. कार्यक्रमाचे प्रास्‍ताविक विद्यार्थी कल्‍याण अधिकारी डॉ महेश देशमुख यांनी तर सुत्रसंचालन प्रा विजय जाधव यांनी केले. कार्यक्रमास विद्यापीठातील अधिकारी, कर्मचारी व विद्यार्थी-विद्यार्थींनी मोठ्या संख्‍येने उपस्थित होते. 
मार्गदर्शन करतांना शिक्षण संचालक डॉ अशोक ढवण

Sunday, April 12, 2015

भारतीय राज्‍यघटना भारतरत्‍न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी जगाला दिलेली एक अजोड देणगी ...शिक्षण संचालक डॉ. अशोक ढवण

वनामकृवित भारतरत्‍न डॉ. बाबासाहेब आंबेडकर व महात्‍मा ज्‍योतिबा फुले यांच्‍या संयुक्‍त जयंती निमित्‍त अठरा तास अभ्‍यासमालिका

सामाजिक आणि आर्थिक अडचणीवर मात करुन भारतरत्‍न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी आपले उच्‍च शिक्षण पुर्ण केले व भारत देशाची राज्‍यघटनेची निर्मिती केली, ही राज्‍यघटना म्‍हणजे जगाला दिलेली एक अजोड देणगी आहे, असे प्रतिपादन वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाचे शिक्षण संचालक डॉ. अशोक ढवण यांनी केले.    

  कृषि महाविद्यालयाच्‍या वतीने भारतरत्‍न डॉ. बाबासाहेब आंबेडकर व महात्‍मा ज्‍योतिबा फुले यांच्‍या संयुक्‍त जयंती निमित्‍त अठरा तास अभ्‍यासमालिकेचे आयोजन दिनांक ११ एप्रिल रोजी करण्‍यात आले होते, या कार्यक्रमाच्‍या उदघाटन प्रसंगी ते बोलत होते. यावेळी सहयोगी अधिष्‍ठाता डॉ. धर्मराज गोखले, विभाग प्रमुख डॉ. बाबासाहेब ठोंबरे, डॉ. पि. आर. झंवर यांची प्रमुख उपस्थिती होती. 

    शिक्षण संचालक डॉ. अशोक ढवण पुढे म्‍हणाले की, भारतरत्‍न डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यार्थीदशेत अठरा तास अभ्‍यास करीत होते. त्‍यांना अन्‍नापेक्षा ज्ञानाची भुक महत्‍वाची होती, त्‍यामुळेच भारतीय राज्‍यघटनेची निर्मिती ते करु शकले. त्‍यांच्‍या जीवनचरित्रापासुन विद्यार्थ्‍यांनी प्रेरणा घेवुन आपला जास्‍तीत जास्‍त महाविद्यालयीन वेळ हा अभ्यासासाठी द्यावा, असा सल्‍ला त्‍यांनी दिला.  

   कार्यक्रमाचे सुत्रसंचालन तुकाराम मंत्रे यांनी केले. अठरा तास अभ्‍यासवर्गाच्‍या उपक्रमात कृषि महाविद्यालयाचे तीनशे विद्यार्थी व विद्यार्थींनीनी सहभाग नोंदविला. कार्यक्रम यशस्‍वीतेसाठी डॉ. व्हि. एस. खंदारे, डॉ. जयश्री एकाळे, प्रा. आशिष बागडे, प्रा. अनिल कांबळे, प्रा. विशाल अवसरमल, प्रा. ए. एम. खोब्रागडे, प्रा. वैशाली भगत, डॉ. जी. पी. जगताप आदिसह विद्यार्थ्‍यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमास विद्यापीठातील विद्यार्थी, विद्यार्थीनी, प्राध्‍यापक व कर्मचारी मोठ्या संख्‍येने उपस्थित होते. Sunday, April 5, 2015

वनामकृविच्‍या परभणी येथील कृषि महाविद्यालयामध्‍ये निरोप समारंभ


वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठांतर्गत असलेल्‍या परभणी येथील कृषि महाविद्यालयावतीने दि ३१ मार्च रोजी आयोजीत निरोप समारंभात अंतिम सत्राच्‍या विद्यार्थ्‍यींना निरोप देण्‍यात आला. कार्यक्रमाच्‍या अध्‍यक्षस्‍थानी कुलगुरू मा डॉ बी व्‍यंकटेश्‍वरलु हे होते तर शिक्षण संचालक डॉ अशोक ढवण, सह्योगी अधिष्‍ठाता डॉ डि एन गोखले, सह्योगी अधिष्‍ठाता डॉ विलास पाटील, सह्योगी अधिष्‍ठाता डॉ उदय खोडके, विद्यार्थी कल्‍याण अधिकारी डॉ महेश देशमुख, विविध विभागाचे विभाग यांची प्रमुख उपस्थिती होती.
करियर म्‍हणुन कोठेही काम करतांना सदैव प्रामाणिक काम करा व दुस-यास मदत करण्‍यास सदैव तत्‍पर रहा, असा संदेश कुलगुरू मा डॉ बी व्‍यंकटेश्‍वरलु यांनी विद्यार्थ्‍यांना मार्गदर्शन करतांना दिला. कृषि महाविद्यालयातील चार वर्षाच्‍या कार्यकाळात आपणात मोठा आत्‍मविश्‍वास प्राप्‍त झाला असुन त्‍याचा भावी काळात निश्चित उपयोग होईल, असे मत शिक्षण संचालक डॉ अशोक ढवण यांनी आपल्‍या भाषणात व्‍यक्त केले. 
याप्रसंगी अनुभवतुन शिक्षण कार्यक्रमातंर्गत आयोजीत करण्‍यात आलेल्‍या कृषि प्रदर्शनात उत्‍कृष्‍ट कार्य केल्‍याबाबत दुग्ध उत्‍पादन केंद्रास प्रथम, अंळबी उत्‍पादन युनिटला व्दितीय तर रेशीम उत्‍पादन केंद्रास तृतीय क्रमांकाचे पारितोषिक मान्‍यवरांच्‍या हस्‍ते देऊन गौरविण्‍यात आले तर रासेयोच्‍या विशेष शिबीरात रक्‍तदान केलेल्‍या विद्यार्थ्‍यांना मान्‍यवरांच्‍या हस्‍ते पुष्‍पगुच्‍छ देऊन कौतुक करण्‍यात आले. विद्यार्थीनी कु आधीरा हीने कार्यक्रमात कथ्‍थकनृत्य सादर केले.
कार्यक्रमात सह्योगी अधिष्‍ठाता डॉ विलास पाटील यांनीही मार्गदर्शन केले तसेच अंतिम सत्राचे विद्यार्थी मनिषा दहे, प्रविण तिडके यांनी आपले मनोगत व्‍यक्‍त केले. कार्यक्रमाच्‍या प्रास्‍ताविकात सह्योगी अधिष्‍ठाता डॉ डि एन गोखले यांनी विद्यार्थ्‍यांना शुभेच्‍छा दिल्‍या तर सुत्रसंचालन प्रा एस एल बडगुजर यांनी केले. कार्यक्रम यशस्‍वीतेसाठी सहाव्‍या सत्राच्‍या विद्यार्थ्‍यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमास महाविद्यालयातील विद्यार्थी, अधिकारी, प्राध्‍यापक व कर्मचारी वर्ग मोठ्या संख्‍येने उपस्थित होते.

Saturday, April 4, 2015

लोहगाव येथे राष्ट्रीय सेवा योजनेचे विशेष शिबीर संपन्न

रासेयोच्‍या स्‍वयंसेवकांनी उमेद अतंर्गत मौजे लोहगांव येथे प्रभातफेरी काढुण जागर केला
वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठांतर्गत असलेल्या कृषी महाविद्यालय, कृषी अभियांत्रिकी महाविद्यालय, उद्यानविद्या महाविद्यालय गृहविज्ञान महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय सेवा योजनेचे विशेष शिबीर दिनांक २४ मार्च ते ३० मार्च दरम्‍यान मौजे लोहगाव येथे आयोजित करण्यात आले होते. या विशेष शिबिरांतर्गत मृद व जलसंधारण, बेटी बचाव, दारूबंदी, स्वच्छता मोहीम, कृषी व अन्नप्रक्रिया उद्योग, महिला आर्थिक स्वावलंबन, ज्ञानेश्वरीच्या निवडक गाथांमधून सामाजिक प्रबोधन, रक्तदान शिबीर आदी विविध उपक्रम राबविण्यात आले. तसेच दुष्‍काळसदृश्‍य परिस्थितीस धैर्याने तोंड देण्‍यासाठी शेतकरी बांधवाना धीर देण्‍यासाठी उमेद कार्यक्रमातंर्गत स्‍वयंसेवकांनी गावात प्रभातफेरी काढुन जागर केला तर रक्‍तदान शिबीरात ३५ स्‍वयंसेवकांनी रक्‍तदान केले, या उल्‍ले‍खनिय कार्याबाबत जिल्‍हा आरोग्‍य रूग्‍नालयाव्‍दारे मानचिन्‍ह देऊन विद्यापीठास गौरविण्‍यात आले.
या शिबीराची सांगता दि ३० मार्च रोजी प्राचार्य डॉ. विलास पाटीलप्राचार्य डॉ. उदय खोडके व विद्यार्थी कल्याण अधिकारी डॉ. महेश देशमुख यांच्‍या प्रमुख उपस्थिती झाली. यावेळी प्राचार्य डॉ. विलास पाटीलप्राचार्य डॉ. उदय खोडके व विद्यार्थी कल्याण अधिकारी डॉ. महेश देशमुख यांनी मार्गदर्शन केले. ग्रामीण कथाकथनकार राजेंद्र गहाळ यांनी त्यांच्या विनोदी शैलीतून केलेल्या मार्गदर्शनातून स्वयंसेवकाना सामाजिक आरोग्य जपण्याबद्दलची शिकवण दिली.
शिबिराच्या यशस्वितेसाठी कार्यक्रमाधिकारी प्रा. रवींद्र शिंदे, प्रा. ए एम कांबळे, प्रा. विजय जाधव, प्रा. एस. पी. सोळंके, प्रा. विना भालेराव, हनुमान गरुड आदींसह रासेयोचे स्‍वयंसेवक व स्‍वयंसेवीकांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमास लोहगावचे सरपंच शिवानंद पाटील, जि.प. माजी सदस्य सखारामजी देशमुख, तानाजी भोसले आदींचे सहकार्य लाभले.
रक्‍तदान शिबीर


रासेयो हि स्वयंसेवकांच्या सर्वांगीण विकासाला प्रेरणा देणारी योजना होय……संचालक शिक्षण डॉ. अशोक ढवन


     वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठांतर्गत असलेल्या कृषी महाविद्यालय, कृषी अभियांत्रिकी महाविद्यालय, उद्यानविद्या महाविद्यालय व गृहविज्ञान महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय सेवा योजनेचे विशेष शिबीर दिनांक २४ मार्च ते ३० मार्च २०१५, मौजे लोहगाव येथे आयोजित करण्यात आले होते. शिबीराचे उद्घाटन संचालक शिक्षण डॉ. अशोक ढवन यांच्या हस्ते झाले तर शिवाजी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बाळासाहेब जाधव, प्राचार्य डॉ. डी.एन.गोखले व प्राचार्य डॉ. उदय खोडके यांची प्रमुख उपस्थिती होती.
     राष्ट्रीय सेवा योजना महाविद्यालयीन जीवनात युवकांच्या सर्वांगीण विकासाकरिता प्रेरणा देणारी, स्वयंसेवकांच्या मनात श्रमप्रतिष्ठा निर्माण करणारी, समाजाशी नाळ जोडणारी, सामाजिक कर्तव्य भावना निर्माण करणारी हि योजना असल्याचे शिवाजी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बाळासाहेब जाधव यांनी मार्गदर्शन करताना म्हणाले. युवकांच्या व्यक्तिमत्व विकास साधताना समाजसेवा व राष्ट्रसेवा घडावी या उद्देशाने हि योजना विद्यापीठात राबविण्यात येत असल्याचे प्रतिपादन कार्यक्रमाचे अध्यक्ष संचालक शिक्षण डॉ. अशोक ढवन यांनी केले.
     प्राचार्य डॉ. डी.एन.गोखले यांनी युवकांमधील स्पर्धात्मक दृष्टीकोन, सामाजिक सहकार्याची भावना वाढीस लागण्यासाठी अशा प्रकारचे उपक्रम राबविणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन केले तर प्राचार्य डॉ. उदय खोडके म्हणाले कि, रासेयो मुळे स्वयंसेवकांच्या व्यक्तिमत्वाची जडणघडण व पायाभरणी होत असते.
    कार्यक्रमाचे प्रास्ताविक कार्यक्रमाधिकारी प्रा.ए.एम.कांबळे यांनी तर आभार प्रदर्शन प्रा. रवींद्र शिंदे यांनी केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी प्रा. एस. पी. सोळंके, प्रा. विना भालेराव, प्रा. विजय जाधव व विद्यापीठातील सर्व स्वयंसेवक व स्वयंसेविका यांनी परिश्रम घेतले.