Friday, August 30, 2013

मराठवाडयाकरिता कृषि हवामान सल्ला पञिका

भारतीय हवामान विभाग, मुबई यांचेकडून प्राप्‍त झालेल्‍या हवामान अंदाजानुसार, मराठवाडा विभागामध्‍ये आकाश ढगाळ राहील. कमाल तापमान ३०.० ते ३१.० अंश सेल्‍सीअस राहील तर किमान तापमान २२.० ते २४.० अंश सेल्‍सीअस राहील. वारे ताशी ६.० ते ११.० कि.मी. प्रति तास वेगाने पश्चिम-वायव्‍य दिशेने वाहतील. सकाळची सापेक्ष आर्द्रता ८१.० ते ९४.० टक्‍के तर दुपारची सापेक्ष आर्द्रता ४४.० ते ६६.० टक्‍के राहील.

विशेष सुचना : या आठवडयात  आकाश ढगाळ राहून तुरळक ठिकाणी अतिहलक्‍या स्‍वरूपाचा पाउस पडेल.

एकात्मिक कृषिहवामान सल्‍ला सेवा योजनाहवामानशास्‍त्र विभाग, वनामकृवि, परभणी यांचा शेतकरी बांधवांना कृषी सल्‍ला 

  • सोयाबीन चे पीक शेंगवाढीचे अवस्‍थेत आहे. सोयाबीन पिकांत उंट अळी, तंबाखुवरील पाने खाणारी अळी व चक्रीभुंग्‍यांचा प्रादूर्भाव दिसून येत आहे. पाने खाणा-या अळयांच्‍या नियंत्रणासाठी क्विनॉलफॉस २५ टक्‍के २० मिली किंवा क्‍लोरोपायरीफॉस २० टक्‍के २० मिली किंवा इमामेक्‍टीन बेन्‍झोएट ३.५ ग्रॅम प्रति १० लिटर पाण्‍यात मिसळुन फवारणी करावी.
  • बाजरीचे पीक दाने भरण्‍याच्‍या अवस्‍थेत आहे. पिकाचे पक्षा पासुन संरक्षणासाठी बेगडी पटया लावाव्‍यात.
  •  काढणीस तयार झालेल्‍या मुगाची काढणी करून मुग दाने कोरडया व हवेशीर ठिकाणी साठवण करावी. उडीद पिकात पाने खाणा-या अळीचे नियंत्रणासाठी इमामेक्‍टीन बेन्‍झोएट ३.५ ग्रॅम प्रति १० लिटर पाण्‍यातुन फवारणी करावी. 
  • तीळ/कारळाचे पिकात पाने गुंडाळणा-या अळीचा प्रादूर्भाव दिसून येत आहे. त्‍यांच्‍या नियंत्रणासाठी डायमिथोएट ३० टक्‍के १० मिली प्रति १० लिटर पाण्‍यात मिसळुन फवारणी करावी.
  •  हळद व आले पिकात करपा/पानावरील ठिकपे रोगाचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. याच्‍या नियंत्रणासाठी कॉपर ऑक्‍सीक्‍लोराईड २५ ग्रॅम प्रति १० लिटर पाण्‍यात मिसळुन फवारणी करावी.
  •  डाळींबावर ठिपके रोगाचा प्रादूर्भाव दिसून येत असलयास कार्बेन्‍डाझिम १० ग्रॅम प्रति १० लिटर पाण्‍यात मिसळुन फवारणी करावी.
  •  नविन लागवड केलेल्‍या आंबा बागेत नविन फुटीवर पाने खाणा-या अळीचा प्रादूर्भाव दिसून येत आहे. नविन फुटीचे संरक्षणासाठी क्विनॉलफॉस २५ टक्‍के २० मिली प्रति १० लिटर पाण्‍यात मिसळुन फवारणी करावी. 
  •  कोबीवर्गीय भाज्‍यांची पुनर लागवड ४५ x ४५ सेंमी अंतरावर करावी. लागवडी सोबत हेक्‍टरी ८० किलो नत्र, ८० किलो स्‍फुरद व ८० किलो पालाश देण्‍यात यावा. मिरचीवरील फुल किडयाच्‍या नियंत्रणासाठी स्पिनोसॅड ४५ टक्‍के ३.० मिली प्रति १० लिटर पाण्‍यात मिसळुन फवारणी करावी.
  • शेळया व मेंढया मध्‍ये सध्‍याच्‍या पावसाळी वातावरणामुळे अशक्‍तपणा दिसून येत आहे. त्‍यासाठी शेळया मेढयांना टॉनिक ५० मिली प्रति शेळी / मेंढी देण्‍यात यावे.  

सौजन्य 
केंद्र प्रमुख
एकात्मिक कृषिहवामान सल्‍ला सेवा योजना
हवामानशास्‍त्र विभाग, वनामकृवि, परभणी
पञक क्रमांकः ३९                                             
दिनांकः ३०/०८/२०१३


Friday, August 23, 2013

कृषि अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या राष्ट्रिय सेवा योजनाच्या वतीने परीसर स्वंच्छता मोहिम

मार्गदर्शन करतांना सहयोगी अधिष्‍ठाता व प्राचार्य डॉ उदय खोडके, व्यासपीठावर विद्यार्थी कल्‍याण अधिकारी डॉ महेश देशमुख,  कार्यक्रमाधिकारी प्रा रवीद्र शिंदे, प्रा. विवेकानंद भोसले,  प्रा. आवारी,  प्रा. जाधव आदी 

    वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातंर्गत असलेल्‍या कृषि अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालयाच्‍या राष्ट्रिय सेवा योजना मार्फत सहयाद्री वसतीगुहाच्‍या परिसरात स्‍वच्‍छता अभियान राबविण्यात आले.
     यावेळी महाविदयालयाच्‍या सहयोगी अधिष्‍ठाता व प्राचार्य डॉ उदय खोडके यांनी स्‍वच्‍छतेचे महत्‍व सांगताना म्‍हणाले की, वैयक्‍तीक स्‍वच्‍छता व परीसर स्‍वच्‍छता ही मानवाच्‍या आरोग्‍याच्‍या दृष्टिने महत्‍वाची बाब असुन सामाजिक बांधिलकी म्‍हणुन स्‍वयंसेवक व स्‍वंयसेविकांनी याचा प्रचार करावा. विद्यार्थी कल्‍याण अधिकारी डॉ महेश देशमुख यांनी विद्यार्थ्‍यांना मार्गदर्शन केले.
      कार्यक्रमाचे सुत्रसंचलन स्‍वंयसेवक विशाल काळे तर आभार प्रदर्शन कार्यक्रमाधिकारी प्रा रवीद्र शिंदे यांनी केले.
   या स्‍वच्‍छता मोहीमेतंर्गत सहयाद्री वसतीग़हाच्‍या परिसरातील गाजरगवत, तण, कचरा प्‍लास्‍टीक इत्‍यादीची योग्‍य विल्‍हेवाट लावण्‍यात आली. याप्रसंगी प्रा. सौ. स्मिता खोडके, प्रा. विवेकानंद भोसले, प्रा. भुईभार, प्रा. आवारी, प्रा. मुंढे, प्रा. जाधव, प्रा. सुभाष विखे, प्रा.जी.यु.शिंदे, प्रा. प्रमोदीनी मोरे, प्रा. संदीप पायल, प्रा. टेकाळे, प्रा. देशमुख,  श्री. संजय पवार, श्री वाघमारे, श्री राउत, श्री शिवणकर यांच्‍यासह राष्ट्रिय सेवा योजनेचे स्‍वयंसेवक व स्‍वंयसेविकां मोठया संख्‍येने उपस्थित होते.  

Thursday, August 22, 2013

गाजर गवत निर्मुलन सप्‍ताहाची सांगतामॅक्सिकन भुंगे गाजर गवतावर नागपुर येथील महाराष्‍ट्र पशु व मत्‍स्‍य विज्ञान विद्यापीठाचे कुलगुरु मा डॉ. ए. के. मिश्रा व वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाचे कुलगुरू मा डॉ. के. पी. गोरे यांच्‍या हस्‍ते सोडण्‍यात आले त्याप्रसंगी  शिक्षण संचालक डॉ. विश्‍वास शिंदे, संशोधन संचालक डॉ. दत्‍तप्रसाद वासकर, सहयोगी अधिष्‍ठाता व प्राचार्य डॉ. एन. डी. पवार, डॉ. मदन पेंडके, डॉ. बि. व्‍ही. आसेवार, डॉ. अशोक जाधव, डॉ. महेश देशमुख, प्रा. अनिस कांबळे, प्रा. व्हि. बी. जाधव आदी  

गाजर गवत निर्मुलन बाबतच्‍या माहिती पत्रकाचे विमोचन करतांना महाराष्‍ट्र पशु व मत्‍स्‍य विज्ञान विद्यापीठाचे कुलगुरु मा डॉ. ए. के. मिश्रा, वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाचे कुलगुरू मा डॉ. के. पी. गोरे,  शिक्षण संचालक डॉ. विश्‍वास शिंदे, संशोधन संचालक डॉ. दत्‍तप्रसाद वासकर, सहयोगी अधिष्‍ठाता व प्राचार्य डॉ. एन. डी. पवार, डॉ. मदन पेंडके, डॉ. बि. व्‍ही. आसेवार, डॉ. अशोक जाधव, डॉ. महेश देशमुख, प्रा. अनिस कांबळे, प्रा. व्हि. बी. जाधव आदी  
  वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी अंतर्गत असलेल्‍या तण व्‍यवस्‍थापन केंद्र व कृषि महाविद्यालयाच्‍या राष्‍ट्रीय सेवा योजनेच्‍या संयुक्‍त विद्यामाने गाजर गवत निर्मुलन सप्‍ताह दि. 16 ते 22 ऑगस्‍ट दरम्‍यान पाळण्‍यात आला. या सप्‍ताहाची सांगता दि.22.08.2013 रोजी करण्‍यात आली. यावेळी नागपुर येथील महाराष्‍ट्र पशु व मत्‍स्‍य विज्ञान विद्यापीठाचे कुलगुरु  मा डॉ. ए. के. मिश्रा व वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाचे कुलगुरू मा डॉ. के. पी. गोरे यांच्‍या हस्‍ते गाजर गवत खाणारा मॅक्सिकन भुंगे विद्यापीठातील प्रशासकीय इमारतीच्‍या परिसरातील गाजर गवतावर सोडण्‍यात आले.
  या प्रसंगी माफसुचे मा. कुलगुरू डॉ. ए. के. मिश्रा म्‍हणाले की, गाजर गवतामुळे शेतपिकांची मोठ्या प्रमाणात नुकसान होते तसेच हे मनुष्‍यांना व जनावरांच्‍या आरोग्‍याला हानीकारक आहे. याच्‍या निर्मुलनासाठी सामुदायीक उपाय योजना करणे आवश्‍यक आहे. राष्‍ट्रीय सेवा योजनेअंतर्गत गाजर गवत निर्मुलन सप्‍ताहात विविध जनजागृतीचे उपक्रम राबवीण्‍यात आले हा विद्यापीठाचा निश्चितच चांगला उपक्रम आहे.
  मा. कुलगुरु डॉ. के. पी. गोरे म्‍हणाले की, राष्‍ट्रीय सेवा योजनेअंतर्गत राबविण्‍यात येणारे विविध कार्यक्रमामुळे विद्यार्थ्‍यामध्‍ये समाजाप्रती असलेली बांधीलकी याची जाणीव होते. गाजर गवतामुळे देशाचे व शेतक-याचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. या गवताच्‍या निर्मुलनाकरीता फक्‍त सप्‍ताहामध्‍ये जणजागृती न करता यासाठी वर्षभर कार्य करावे असा सल्ला त्‍यांनी दिला.
  याप्रसंगी मान्‍यवरांच्‍या हस्‍ते  गाजर गवत निर्मुलन बाबतच्‍या माहिती पत्रकाचे विमोचन करण्‍यात आले. कार्यक्रमास शिक्षण संचालक तथा अधिष्‍ठाता डॉ. विश्‍वास शिंदे, संशोधन संचालक डॉ. दत्‍तप्रसाद वासकर, कृषि महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्‍ठाता व प्राचार्य डॉ. एन. डी. पवार, कोरडवाहू संशोधन केंद्राचे शास्‍त्रज्ञ डॉ. मदन पेंडके, डॉ. बि. व्‍ही. आसेवार, डॉ. अशोक जाधव, विद्यार्थी कल्‍याण अधिकारी डॉ. महेश देशमुख हे उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वितेसाठी राष्‍ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी प्रा. अनिस कांबळे व प्रा. व्हि. बी. जाधव यांच्‍या नेतृत्‍वाखाली स्‍वयंसेवक व स्‍वयंसेविका यांनी परिश्रम घेतले. 

Wednesday, August 21, 2013

माजी संशोधन संचालक डॉ गोवर्धन खंडागळे यांचा सेवानिवृत्ती निमित्य सपत्नीक सत्कार

विद्यापीठाचे संशोधन संचालक डॉ गोवर्धन खंडागळे दि 31 जुलै रोजी सेवानिवृत्‍त झाले त्‍यानिमित्य त्‍यांचा सपत्‍नीक सत्‍कार करतांना विद्यापीठाचे कुलगूरू मा डॉ किशनराव गोरे, शिक्षण संचालक तथा अधिष्‍ठाता डॉ विश्‍वास शिंदे, संशोधन संचालक डॉ दत्‍तप्रसाद वासकर, कुलसचिव श्री का वि पागीरे व सौ खंडागळे 

वसंतराव नाईक कृषि विद्यापीठाचे माजी संशोधन संचालक डॉ गोवर्धन खंडागळे दि 31 जुलै रोजी सेवानिवृत्‍त झाले त्‍यानिमित्य त्‍यांचा सपत्‍नीक सत्‍काराचा कार्यक्रम संशोधन संचालनालयाच्‍या वतीने आयोजीत करण्‍यात आला होता. कार्यक्रमाच्‍या अध्‍यक्षस्‍थानी विद्यापीठाचे कुलगूरू मा डॉ किशनराव गोरे होते तर शिक्षण संचालक तथा अधिष्‍ठाता डॉ विश्‍वास शिंदे, संशोधन संचालक डॉ दत्‍तप्रसाद वासकर, कुल‍सचिव श्री का वि पागिरे, सौ खंडागळे यांची प्रमुख उपस्थिती होती.
अध्‍यक्षीय भाषणात मा कुलगूरू म्‍हणाले की, डॉ खंडागळे यांचे यांनी 38 वर्ष विद्यापीठाची सेवा केली, या त्‍यांच्‍या प्रदिर्घ सेवेकाळात केलेले काम व संशोधनराचे कार्य  हे विद्यापीठाच्‍या शास्‍त्रज्ञांना प्रेरणादायी आहे. त्‍यांच्‍या कार्यकाळात विद्यापीठाचे महत्‍वाचे संशोधनाचे कार्यासह संयुक्‍त कृषि संशोधन व विकास समितीची बैठक यशस्‍वीतेपणे पार पडली असे गौरवौद् गार काढले. सत्‍काराला उत्‍तर देतांनी डॉ. गोवर्धन खंडागळे म्‍हणाले की, विद्यापीठातील सर्व कर्मचा-यांच्‍या सहकार्यानी मला विद्यापीठाची सेवा यशस्‍वीपणे पार पाडता आली. विशेषत: सोयाबीन व कापूस पैदासकार, विभाग प्रमुख, बदनापुर येथे कृषि महाविद्यालयास सहयोगी अधिष्‍ठाता व प्राचार्य तसेच संशोधन संचालक या पदावर यशस्‍वीपणे काम करता आले.
याप्रसंगी नवनियुक्‍त संशोधन संचालक डॉ. दत्‍तप्रसाद वासकर, शिक्षण संचालक तथा अधिष्‍ठाता डॉ. विश्‍वास शिंदे‍ , कुलसचिव श्री का. वी. पागीरे यांनी आपले मनोगत व्‍यक्‍त केले. 
संशोधन उपसंचालक डॉ ए एस कारले यांनी कार्यक्रमाचे प्रास्‍ताविक केले. सुत्रसंचालन श्री उदय वाईकर तर आभार प्रदर्शन श्री जी बी उबाळे यांनी केले. या प्रसंगी नवनियुक्‍त संशोधन संचालक डॉ दत्‍तप्रसाद वासकर यांचा सत्‍कार मा. कुलगूरू यांच्‍या हस्‍ते करण्‍यात आला. कार्यक्रम यशस्‍वीतेसाठी डॉ जी के लोंढे, श्री आर व्‍ही नवगिरे, श्री के बी फाजगे व संशोधन संचालनालयाच्‍या कर्मचा-यांनी परिश्रम घेतले. याप्रसंगी सहयोगी अधिष्‍ठाता डॉ डि बी देवसरकर, कृषि महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्‍ठाता व प्राचार्य डॉ एन डी पवार, गृहविज्ञान महाविद्यालयाच्‍या सहयोगी अधिष्‍ठाता व प्राचार्या प्रा विशाला पटणन, गोळेगांव येथील कृषि महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्‍ठाता व प्राचार्य डॉ व्‍ही डी पाटील, कृषि अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्रभारी डॉ उदय खोडके, उद्यानविद्या महाविद्यालयाचे प्रभारी डॉ रोहीदास, तसेच विद्यापीठातील अधिकारी व कर्मचारी वर्ग मोठया संख्‍येने उपस्थित होते.

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी अंतर्गत असलेल्‍या चाकुर येथील पदव्‍युत्‍तर कृषि व्‍यवसाय व्‍यवस्‍थापन संस्‍थाच्या शिक्षक व शिक्षकेत्‍तर पदास शासनाची मान्‍यता

महाराष्‍ट्र शासनाने दिनांक 21 ऑगस्‍ट 2013 रोजी संपंन्‍न झालेल्‍या मंत्री मंडळाच्‍या बैठकीत वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी अंतर्गत चाकुर, जिल्‍हा लातुर येथे असलेल्‍या पदव्‍युत्‍तर कृषि व्‍यवसाय व्‍यवस्‍थापन संस्‍थेसाठी आवश्‍यक असलेली 21 शिक्षक वर्गीय व 17 शिक्षकेत्‍तर कर्मचारी पदे अशा एकूण 38 पदांना मान्‍यता दिली आहे. या 38 पदासाठी पहिल्‍या वर्षी रु 80­­­.51 लक्ष, दुस-या वर्षी रु 125­.72 लक्ष व तीस-या वर्षी रु 133.00 लक्ष असे एकूण आवर्ती खर्च 650.23 लक्ष व अनावर्ती खर्च रु 1977.63 लक्ष असा एकुण रु 2627.86 लक्ष इतक्‍या खर्चाच्‍या प्रस्‍तावास प्रशासकीय व वित्‍तीय मान्‍यता देण्‍यात आली आहे. या मान्‍यतेसाठी महाराष्‍ट्र राज्‍याचे कृषि मंत्री मा. ना. श्री. राधाकृ‍ष्‍णजी विखे पाटील यांनी विशेष लक्ष दिले. तसेच वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाचे कुलगुरु मा. डॉ. किशनरावजी गोरे यांनी यासाठी शासन दरबारी सातत्‍यपुर्ण प्रयत्‍न केले.
या महाविद्यालयात एम.बी.ए. (कृषि) हा दोन वर्षाचा पदव्‍युत्‍तर अभ्‍यासक्रम सन 2009-2010 या शैक्षणीक वर्षापासुन सुरु असुन प्रवेश क्षमता 35 आहे. अशा प्रकारची हि मराठवाडयातील कृषि विद्यापीठांतर्गत पहिलीच संस्‍था आहे. सदरील अभ्‍यासक्रमात कृषि व्‍यवसाय व्‍यवस्‍थापन संबंधीत विषयांचा समावेश आहे. यामुळे या भागातील विद्यार्थ्‍यांना मोठा लाभ होणार असुन त्‍यांच्‍यातील कृषि व्‍यवसाय व्‍यवस्‍थापन क्षेत्रातील कौशल्‍य गुणांना वाव मिळणार आहे. या महाविद्यालयाच्‍या पदांना मान्‍यता मिळाल्‍यामुळे शैक्षणीक कार्यक्रमास बळकटी प्राप्‍त होणार आहे.
यामुळे मराठवाडा विभागातील जनतेमध्‍ये उत्‍साहाचे वातावरण निर्माण झाले असुन महाराष्‍ट्र राज्‍याचे कृषि मंत्री मा. श्री. राधाकृ‍ष्‍णजी विखे पाटील व वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाचे कुलगुरु मा. डॉ. किशनरावजी गोरे यांचे विविध स्‍तरातुन अभिनंदन करण्‍यात येत आहे. सदरील प्रस्‍तावाचा पाठपुरावा करण्‍यासाठी कुलगुरु मा. डॉ. किशनरावजी गोरे यांच्‍या मार्गदर्शनाखाली डॉ. हेमंत पाटील यांनी परिश्रम घेतले.  

कृषि महाविद्यालयाच्‍या राष्‍ट्रीय सेवा योजनाअंतर्गत वृक्षारोपनाचा कार्यक्रम


 
वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठांतर्गत असलेल्‍या कृषि महाविद्यालयाच्‍या राष्‍ट्रीय सेवा योजनाअंतर्गत विद्यापीठ परिसरात वृक्षारोपनाचा कार्यक्रम घेण्‍यात आला. याप्रसंगी कृषि महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्‍ठाता व प्राचार्य डॉ. एन. डी. पवार यांच्‍याहस्‍ते वृक्षरोपण करण्‍यात आले. या प्रसंगी विद्यार्थी कल्‍याण अधिकारी डॉ. महेश देशमुख, डॉ बी व्ही आसेवार, कार्यक्रम अधिकारी प्रा. अनिस कांबळे, श्री दिवाकर काकडे, जनसंपर्क अधिकारी डॉ. प्रविण कापसे, प्राध्‍यापक कर्मचारी व राष्‍ट्रीय सेवा योजनेचे स्‍वयंसेवक व स्‍वयंसेविका मोठ्या संख्‍येने उपस्थित होते. 

Tuesday, August 20, 2013

आमदार मा श्री माधवराव पवार जवळगावकर यांची अन्‍नतंत्र महाविद्यालयाच्या प्रकल्पास सदिच्छा भेट

विद्यापीठांतर्गत असलेल्‍या अन्‍नतंत्र महाविद्यालयात अनुभवाधारीत शिक्षण कार्यक्रमांतर्गत सार्वजनिक-खासगी भागीदारी प्रकल्‍पात उत्‍पादीत केलेल्‍या विक्रीसाठी उपलब्‍ध असलेल्‍या प्रक्रिया पदार्थाच्‍या माहिती पत्रकाचे विमोचन करतांना विद्यापीठ कार्यकारी परिषदेचे सदस्‍य तथा आमदार मा श्री माधवराव पवार जवळगावकर, कुलगुरू मा. डॉ. किशनराव गोरे, शिक्षण संचालक तथा अधिष्‍ठाता डॉ विश्‍वास शिंदे, विस्‍तार शिक्षण संचालक डॉ अशोक ढवण, संशोधन संचालक डॉ दत्‍तप्रसाद वासकर, डॉ व्‍ही एन पवार, प्रा. दिलीप मोरे, व उद्योजक श्री मोहम्‍मद गौस आदी
  वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठांतर्गत असलेल्‍या अन्‍नतंत्र महाविद्यालयात अनुभवाधारीत शिक्षण कार्यक्रमांतर्गत सार्वजनिक-खासगी भागीदारी प्रकल्‍पास विद्यापीठ कार्यकारी परिषदेचे सदस्‍य तथा आमदार मा श्री माधवराव पवार जवळगावकर यांनी सदिच्छा भेट दिला. या प्रसंगी विद्यापीठाचे मा. कुलगुरू डॉ. किशनराव गोरे यांची प्रमुख उपस्थिती होती. डॉ व्‍ही एन पवार व उद्योजक श्री मोहम्‍मद गौस यांनी प्रकल्‍पाची व विविध प्रक्रिया पदार्थाची सविस्‍तर माहिती दिला.
    मा श्री पवार यांच्‍या हस्‍ते प्रकल्‍पात उत्‍पादीत केलेल्‍या विक्रीसाठी उपलब्‍ध असलेल्‍या पदार्थाच्‍या माहिती पत्रकाचे विमोचन करण्‍यात आले. या प्रसंगी मा श्री माधवराव पवार म्‍हणाले की, अन्‍नतंत्र महाविद्यालयातील हा सार्वजनिक-खासगी भागीदारी प्रकल्‍प निश्चितच प्रसंशनीय असुन यामुळे या भागातील उद्योजकता विकासास निश्च्‍िातच चालना मिळेल. या प्रकल्‍पात ग्रामीण भागातील युवकांना देखिल लघु प्रशिक्षणाची सोय करण्‍यात या‍वी, जेणे करून ग्रामीण युवकांना शेती माला प्रक्रिया उद्योग सुरू करण्‍याची प्रेरणा मिळेल, असे मत व्‍यक्‍त केले.  
    याप्रसंगी शिक्षण संचालक तथा अधिष्‍ठाता डॉ विश्‍वास शिंदे, विस्‍तार शिक्षण संचालक डॉ अशोक ढवण व संशोधन संचालक डॉ दत्‍तप्रसाद वासकर, प्रा. दिलीप मोरे, प्रा सयद हश्‍मी उपस्थित होते.

Monday, August 19, 2013

सोयाबीन पैदासकार डॉ के एस बेग वसंतराव नाईक कृषीशास्त्रज्ञ पुरस्कारानी सन्माननीत

   वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचे सोयाबीन पैदासकार डॉ के एस बेग यांना पुसद येथील वसंतराव नाईक स्‍मृती प्रतिष्‍ठानाचा वसंतराव नाईक कृषीशास्‍त्रज्ञ पुरस्‍काराने सन्‍माननीत करण्‍यात आले. डॉ. बेग हे गेल्‍या 15 वर्षापासुन वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठात कार्यरत असुन सध्‍या ते सोयाबीन पैदासकार म्‍हणुन काम करित आहेत. त्‍यांनी केलेल्‍या सोयाबीन पिकातील संशोधनाबाबतच्‍या उल्‍लेखनिय कार्यासाठी त्‍यांना या पुरस्‍काराने सन्‍माननीत करण्‍यात आले. 
     दि. 18 ऑगस्‍ट रोजी हरित क्रांतीचे प्रणेते मा कै वसंतराव नार्इक यांच्‍या 34 व्‍या स्‍मृतिदिनानिमित्‍त प्रतिष्‍ठानाच्‍यावतीने आयोजीत कार्यक्रमात त्‍यांना जलसंपदा मंत्री मा ना श्री सुनिल तटकरे यांच्‍या हस्‍ते पुरस्‍कार प्रदान करण्‍यात आला. या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्‍हणुन अन्‍न व औषधी प्रशासन मंत्री मा ना श्री मनोहरराव नाईक उपस्थित होते तर प्रतिष्‍ठानाचे अध्यक्ष कृषिभुषण श्री दिपक आसेगांवकर यांच्या सह अनेक मान्यवर उपस्थित होते.
     सन 2009 मध्‍ये विद्यापीठाने शिफारस केलेल्‍या सोयाबीनचे एमएयुएस-158 हे वाण विकसित करण्‍यात त्‍यांचा मोलाचा वाटा असुन हा वाण खोडमाशी, सुक्ष्‍मजंतुचे पुरळ यास सहनशील असुन 15 दिवसापर्यत शेंगा शाररिक पक्‍कतेनंतर फुटत नाहीत. तसेच सोयाबीनचे दुसरे वाण एमएयुएस-162 हे विकसित करण्‍यात त्‍यांचे योगदान असुन हा वाण 100 ते 103 दिवसात तयार होउन यंत्राव्‍दारे काढणीस वाण योग्‍य आहे. डॉ बेग हे सोयाबीन संदर्भात शेतक-यांना सतत मार्गदर्शन करतात. 
      या पुरस्‍कारानिमित्‍त त्‍यांचे विद्यापीठाचे मा कुलगूरू डॉ किशनराव गोरे, शिक्षण संचालक तथा अधिष्‍ठाता डॉ विश्‍वास शिंदे, विस्‍तार शिक्षण संचालक डॉ अशोक ढवण व संशोधन संचालक डॉ दत्‍तप्रसाद वासकर यांनी अभिनंदन केले.  

Sunday, August 18, 2013

पिंगळी येथे गाजरगवत जागृती सप्ताहानिमित्त कार्यक्रम


वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातंर्गत असलेल्‍या तण विज्ञान संशोधीत केंद्राच्‍या वतीने पिंगळी येथील जिल्‍हा परिषद शाळेमध्‍ये गाजर गवत जनजागृती सप्‍ताहानिमित्‍त जनजागृती रॅलीचे आयोजन करण्‍यात आले होते. तण विज्ञानाचे प्रभारी डॉ. अशोक जाधव यांनी उपस्थितांना गाजर गवत निर्मुलनाबद्दल सविस्‍तर मार्गदर्शन केले.  याप्रसंगी शाळेतील विद्यार्थी, शिक्षक तसेच ग्रामीण कृषि कार्यानुभव कार्यक्रमाचे कृषिदुत यांनी रॅलीत भाग घेतला. विद्यार्थ्‍यांना गाजर गवत निर्मुलनाबाबतची माहिती पत्रके वाटली. शाळेसमोरील भिंतीवर फिती पत्रके लावुन गावक-यांना माहिती देण्‍यात आली. यशस्वितेसाठी  कृषिदूत व जिल्‍हा परिषद शाळेचे श्री कदम सर यांनी विशेष परिश्रम घेतले

Saturday, August 17, 2013

विद्यापीठ आपल्या् दारी : तंत्रज्ञान शेतावरी अभियानात शास्त्र ज्ञांनी केले शेतक-यांच्या् विविध विषयांच्या समस्यांचे निराकरण


विद्यापीठ आपल्‍या दारी: तंत्रज्ञान शेतावरी कार्यक्रमातंर्गत किनोळा येथील शेतक-यांच्‍या शेतास भेट देउन विद्यापीठाचे  शास्‍त्रज्ञ मार्गदर्शन करतांना 
      
    वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाचे तंत्रज्ञान शेतक-यांपर्यंत प्रभावीपणे पोहचविण्‍यासाठी मा. कुलगुरु डॉ.किशनराव गोरे यांच्‍या संकल्‍पनेतून विद्यापीठ आपल्‍या दारी: तंत्रज्ञान शेतावरी हा विशेष विस्‍तार शिक्षण कार्यक्रमाचे उद्घाटन विद्यापीठाचे मा. कुलगुरु डॉ.किशनरावजी गोरे यांच्‍या हस्‍ते दिनांक 16 ऑगस्‍ट रोजी करण्‍यात आले. हा कार्यक्रम मा. संचालक, विस्‍तार शिक्षण डॉ. अशोक ढवण यांच्‍या मार्गदर्शनाखाली संपूर्ण मराठवाडा विभागात विभागीय कृषि विस्‍तार शिक्षण केंद्राच्‍या माध्‍यमातून व सर्व महाविद्यालये, कृषि विज्ञान केंद्रे व संशोधन योजनांच्‍या सहकार्याने राबविण्‍यात येत आहे.   
          या अभियानांतर्गत दि.16 ऑगस्‍ट रोजी परभणी तालूक्‍यातील पेडगाव, पान्‍हेरा, किनोळा, भोगाव परिसरात शास्‍त्रज्ञांच्‍या चमूने भेट दिली असता या भागातील सोयाबीन मध्‍ये चक्रीभूंगा या किडीचा प्रादूर्भाव आढळून आला. या करिता शास्‍त्रज्ञांनी त्‍यांना ट्रायझोफॉस 20 मि.ली् प्रति 10 लिटर पाण्‍यात मिसळून फवारण्‍यास सांगितले. तसेच कपाशीमध्‍ये जास्‍त पावसामूळे पाणी साचल्‍यामूळे कपाशीचे झाडे पिवळी पडलेली आढळून येत आहेत त्‍यामूळे झाडाची वाढ ही खुंटली आहे. त्‍याकरिता शेतक-यांनी 13:0:45 याची 50 ग्रॅम व सूक्ष्‍म अन्‍नद्रव्‍य ग्रेड 2 याची 50 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्‍यात मिसळून फवारणी करावी असे शास्‍त्रज्ञांनी सुचविले. तसेच सध्‍या उघाडी मूळे फूलकिडे व पांढरी माशी चा प्रादूर्भाव आढळून येत आहे व भविष्‍यात मोठया उघाडीमूळे यांचा प्रादूर्भाव मोठया प्रमाणात वाढण्‍याची शक्‍यता आहे त्‍याकरिता फ्रीप्रोनिल 20 मिली प्रति 10 लिटर पाण्‍यात मिसळून फवारणी करावी तसेच मूगावरिल भू‍री करिता पाण्‍यात मिसळणारे गंधक 25 ग्रॅम प्रति 10 लिटर पाणी  व हळदीवरील कंद माशी साठी क्‍लोरोपायरीफॉस 20 मिली प्रति 10 लिटर पाणी या प्रमाणात फवारावे असे शास्‍त्रज्ञांनी सांगितले आहे.
     यासोबतच जनावरांच्‍या खाद्यामध्‍ये हिरव्‍या चा-याचे प्रमाण जास्‍त झाल्‍यामूळे होणा-या रोगाकरिता खाद्यामध्‍ये शुष्‍क  पदार्थ जसे वाळलेल्‍या वैरणीचा समावेश करावा. व रोग ग्रस्‍त जनावरांना सल्‍फाबेलस ही एक गोळी प्रति जनावर सलग तीन दिवस द्यावी.
     अशा विविध मार्गदर्शनाला शेतक-यांनी भरघोस प्रतिसाद दिला. या चमूमध्‍ये  डॉ.अे.के.गोरे, डॉ. बी.व्‍ही.भेदे, डॉ.बी.के.आरबाड, प्रा.ए.टी.दौंडे, डॉ.आर.बी.क्षीरसागर, प्रा.चित्रा बेलूरकर, डॉ.ए.टी.शिंदे, डॉ.यु.पी.वाईकर, श्री.सचिन रनेर या तज्ञांचा तसेच कृषि विभागातर्फे उपविभागीय कृषि अधिकारी श्री.पी.एच.मालेगावकर, श्री.एस.जी.देशमूख, श्री.एम.एस.लाबडे, श्री.पी.एस.लोहार, श्री.जी.एन.गाजवे, श्री.ए.एस.जाधव इत्‍यादींचा समावेश होता.

शेतक-यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब करावा ……… डॉ. आर.पी. कदम


वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी अंतर्गत कृषि महाविद्यालय, परभणीच्‍या तण व्‍यवस्‍थापन केंद्राद्वारे ग्रामीण कृषि कार्यानुभव कार्यक्रमाचा उपक्रम म्‍हणुन पिंगळी ता. परभणी येथे खरीप मेळाव्‍याचे आयोजन करण्‍यात आले होते. शेतकरी मेळाव्‍याच्‍या अध्‍यक्षस्‍थानी सरपंच श्रीमती उज्‍वलाताई खाकरे तर विशेष अतिथी म्‍हणून उपसरपंच श्री  अंगद अंबादासराव गरुड हे उपस्थित होते. या मेळाव्‍यात विद्यापीठाच्‍या शास्‍त्रज्ञांनी विविध विषयावर मार्गदर्शन केले.
      ग्रामीण कृषि कार्यानुभव कार्यक्रमाचा उपक्रम प्रभारी डॉ. आर. पी. कदम ह्यांनी शेतक-यांना मार्गदर्शन करुन आधुनिक तंत्रज्ञानाचा शेतक-यांनी अवलंब करावा आणि कृषि विद्यापीठास वेळोवेळी शेतक-यांनी भेटी द्याव्‍यात असे आवाहन केले. शेतकरी मेळाव्‍यात डॉ. अ.पी. सुर्यवंशी यांनी एकात्मिक पिक रोग नियंत्रण ह्या विषयावर शेतक-यांना विस्‍तृत माहिती दिली. तसेच डॉ. डी. आर. कदम यांनी कापूस व सोयाबीन वरील किड व्‍यवस्‍थापनावर सविस्‍तर मार्गदर्शन केले. डॉ.यु.एन.आळसे यांनी ऊस लागवड तंत्रज्ञानावर मार्गदर्शन करुन एकरी 100 टन ऊस उत्‍पादन करण्‍याचा शेतक-यांना मंत्र दिला. डॉ. अ. एस. जाधव यांनी एकात्मिक तण नियंत्रण या विषयांवर शेतक-यांना मार्गदर्शन करून विविध पिकांसाठी वापरण्‍यात येणा-या तणनाशकांची काळजी व त्‍याचा वापर कसा करावा या बाबतीत माहिती दिली. या प्रसंगी प्रत्‍यक्ष शेतावर जाऊन मार्गदर्शन करण्‍यात आले. मेळाव्‍याचे सूत्रसंचलन श्री विकास हाके यांनी तर प्रा. एस. एल. बडगुजर यांनी उपस्थितांच आभार मानले. मेळाव्‍यास मोठ्या प्रमाणात शेतकरी उपस्थित होते. तण नियंत्रण योजना केंद्राचे कृषिदुत श्री निलेश क्षिरसागर, राहुज मुवेक, सुनिल जावळे, सचिन नावकर, शाम शिंदे, शिवप्रसाद चव्‍हाण, महेश जुगनाके, प्रकाश खटींग, गजानन दासरवाड, शिवराज भांगे, भालचंद्र म्‍हस्‍के, विलास झाटे, दिनेश जगताप, प्रसाद धनवे, ओम देशमुख या विद्यार्थ्‍यांनी मेळावा यशस्‍वीतेसाठी परिश्रम घेतले.

Friday, August 16, 2013

‘विद्यापीठ आपल्‍या दारी : तंत्रज्ञान शेतावरी’ विशेष विस्‍तार कार्यक्रमास प्रारंभ      वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाचे तंत्रज्ञान शेतक-यांपर्यंत प्रभावीपणे पोहचविण्‍यासाठी मा. कुलगुरु डॉ. किशनरावजी गोरे यांच्‍या संकल्‍पनेतून व विद्यापीठ शास्‍त्रज्ञांच्‍या परिश्रमातून विद्यापीठ आपल्‍या दारी: तंत्रज्ञान शेतावरी हा विशेष विस्‍तार शिक्षण कार्यक्रम संपूर्ण मराठवाडयात 2011 पासून यशस्‍वीपणे राबविण्‍यात आला. मागील दोन वर्षीचे यश लक्षात घेऊन याही वर्षी हा कार्यक्रम मा. संचालक, विस्‍तार शिक्षण डॉ. अशोक ढवण यांच्‍या मार्गदर्शनाखाली संपूर्ण मराठवाडा विभागात विभागीय कृषि विस्‍तार शिक्षण केंद्राच्‍या माध्‍यमातून व सर्व महाविद्यालये, कृषि विज्ञान केंद्रे व संशोधन योजनांच्‍या सहकार्याने राबविण्‍यात येणार असून या कार्यक्रमाचे उद्घाटन विद्यापीठाचे मा. कुलगुरु डॉ. किशनरावजी गोरे यांच्‍या हस्‍ते करण्‍यात आले. या कार्यक्रमास प्रगतशील शेतकरी मा. श्री.सोपानरावजी अवचार हे प्रमूख पाहूणे होते तर शिक्षण संचालक तथा अधिष्‍ठाता डॉ.विश्‍वास शिंदे, विस्‍तार शिक्षण संचालक डॉ.अशोक ढवण, कुलसचिव श्री. का. वी. पागीरे, कृषि महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्‍ठाता तथा प्राचार्य डॉ. एन. डी. पवार, कृषि अभियांत्रीकी महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्‍ठाता तथा प्राचार्य डॉ उदय खोडके  उपविभागीय कृषि अधिकारी श्री. पी. एच. मालेगावकर यांची प्रमूख उपस्थिती होती.
      याप्रसंगी उद घाटनपर भाषणात मा. कुलगुरु डॉ. किशनरावजी गोरे म्‍हणाले की, विद्यापीठाचे तंत्रज्ञान शेतक-यांना उपयोगात आले तरच त्‍याला मूल्‍य आहे, मागील दोन वर्ष या कार्यक्रमास शेतक-यांनी भरभरुन प्रतिसाद दिला. यामुळे विद्यापीठाच्‍या विस्‍तार कार्यास गती प्राप्‍त झाली. विद्यापीठातील शास्‍त्रज्ञ शिक्षण व संशोधनाची जवाबदारी सांभाळून या विस्‍तार कार्यक्रमात मोलाचा सहभाग देत आहेत. यावर्षी या कार्यक्रमात गृहविज्ञान महाविद्यालय व अन्‍नतंत्रज्ञान महाविद्यालयातील शास्‍त्रज्ञांचा समावेश करण्‍यात आला आहे. यामूळे शेतकरी महिलावर्गांना मार्गदर्शन होणार आहे. तसेच प्रकिया उद्योगावर अन्‍नतंत्रज्ञान महाविद्यालयातील शास्‍त्रज्ञ मार्गदर्शन करणार आहेत. सध्‍या शेतक-यांना किड व रोगाचे व्‍यवस्‍थापण, मृद व जलसंधारण तंत्रज्ञान व येणा-या रबी हंगामाचे नियोजन याबाबत शास्‍त्रज्ञांचे मार्गदर्शन उपयुक्‍त ठरणार आहे.
      याप्रसंगी प्रमूख पाहूणे श्री. सोपानराव अवचार म्‍हणाले की, शेतक-यांना शेतीत अनेक संकटांना सामोरे जावे लागते तसेच हि संकटे अचानक येतात, त्‍या प्रसंगी विद्यापीठाच्‍या शास्‍त्रज्ञांचे शेतावरील प्रत्‍यक्ष भेट व सल्‍ला मोलाचा ठरतो. हा कार्यक्रम वर्षभर राबविणे आवश्‍यक आहे.
      विस्‍तार शिक्षण संचालक डॉ. अशोक ढवण आपल्‍या मनोगतात म्‍हणाले की, विद्यापीठ आपल्‍या दारी: तंत्रज्ञान शेतावरी हा शेतक-यांच्‍या गरजेवर आधारित काटेकोर विस्‍तार कार्यक्रम असून या कार्यक्रमाची नोंद राजभवनाने सुदधा घेतली आहे. हा कार्यक्रम व्‍यापक व कायमस्‍वरुपी राबविण्‍याचा मानस विद्यापीठाचा आहे.
      उद घाटन कार्यक्रमाचे सुत्रसंचालन श्री. उदय वाईकर यांनी केले तर आभार प्रदर्शन कृषि तंत्रज्ञान माहिती केंद्राचे व्‍यवस्‍थापक डॉ. अनिल गोरे यांनी केले. या प्रसंगी विद्यापीठाचे शास्‍त्रज्ञ व अधिकारी, कर्मचारी मोठया संख्‍येन उपस्थित होते. कार्यक्रम यशसवीतेसाठी डॉ.डि.डी.पटाईत, डॉ.बि.के.आरबाड, श्री.एस.बी.जाधव, श्री. आर.एल.औंढेकर, डॉ.महेश वाघमारे यांनी परिश्रम घेतले.
      विद्यापीठ आपल्‍या दारी: तंत्रज्ञान शेतावरी या कार्यक्रमामध्‍ये छोटे मेळावे, गटचर्चा, मार्गदर्शन, प्रश्‍न–उत्‍तरे अशा स्‍वरुपाचे कार्यक्रम घेतले जाणार असून हंगामी खरीप पिके, ऊस, फळे, भाजीपाला, पीक संरक्षण, एकात्मिक शेती पध्‍दती, मृद व जलसंधारण इ. विषयांवर तसेच रबी हंगामाचे नियोजन यावर शेतक-यांची शास्‍त्रज्ञांकडून मार्गदर्शन केले जाणार आहे. मागणी आधारित काटेकोर विस्‍तार शिक्षण असे या कार्यक्रमाचे स्‍वरुप राहणार आहे.शेतक-यांचे तातडीचे प्रश्‍न आणि शेतक-यांचे समाधान प्रत्‍यक्ष विद्यापीठाच्‍या शास्‍त्रज्ञाकडुन होणार आहे. यामुळे शेतक-यांमध्‍ये उमेद निर्मिती होणार आहे. सदरील कार्यक्रम परभणी व हिंगोली जिल्‍हयांसाठी 16 ऑगस्‍ट 2013 ते 03 सप्‍टेंबर 2013 कृषि तंत्रज्ञान माहिती केंद्र तथा परभणी येथील विभागीय कृषि विस्‍तार शिक्षण केंद्राच्‍या मार्फत राबविला जाणार आहे. या दोन जिल्‍हयांसाठी शास्‍त्रज्ञांचे एकूण तीन चमू तयार करण्‍यात आले असुन साधारणता 110-115 गावांत राबविण्‍यात येणार आहे.

Thursday, August 15, 2013

हिंगोली जिल्हातील गोळेगांव ता. औंढे नागनाथ येथील घटक कृषि महाविद्यालयात मा. कुलगूरू डॉ किशनरावजी गोरे यांच्या हस्ते ध्वजारोहण


वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातंर्गत असलेल्‍या गोळेगांव ता. औंढे नागनाथ जि. हिंगोली येथील  घटक कृषि महाविद्यालयात 67 वा स्वातंत्र्य दिन साजरा करण्‍यात आला. या प्रसंगी विद्यापीठाचे मा. कुलगूरू डॉ किशनरावजी गोरे यांच्‍या हस्‍ते ध्‍वजारोहण करण्‍यात आले. कार्यक्रमास शिक्षण संचालक तथा अधिष्‍ठाता डॉ विश्‍वास शिंदे, विस्‍तार शिक्षण संचालक डॉ अशोक ढवण, कुलसचिव श्री का वि पागिरे, कृषि महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्‍ठाता तथा प्राचार्य डॉ विलास पाटील, सहयोगी संचालक डॉ डि बी देवसरकर, नियत्रंक श्री ना ज सोनकांबळे, कृषि महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्‍ठाता तथा प्राचार्य डॉ ना ध पवार, गृहविज्ञान महाविद्यालयाच्‍या सहयोगी अधिष्‍ठाता तथा प्राचार्या प्रा विशाला पटणम, अन्‍नतंत्र महाविद्यालयाचे डॉ पा नि सत्‍वधर, उद्यानविद्या महाविद्यालयाचे डॉ शि बा रोहीदास, कृषि अभियांत्रिकी महाविद्यालयाचे डॉ उदय खोडके, विभाग प्रमुख डॉ बी एम ठोंबरे, विद्यापीठातील अधिकारी, कर्मचारी, औंढे नागनाथ येथील प्रतिष्टीत नागरिक व विद्यार्थ्‍यी मोठया संख्‍येने उपस्थित होते. 
याप्रसंगी मा कुलगुरू डॉ किशनराव गोरे आपल्‍या भाषणात म्‍हणाले की, विद्यापीठाने कृषि शिक्षण, संशोधन व विस्‍तार क्षेत्रात सर्वाच्‍या सहकार्याने उल्‍लेखनिय कार्य केले आहे. राष्ट्रिय पातळीवर विद्यापीठाच्‍या कार्यामुळे नावजले जात आहे. आपण सर्वांच्‍या सहकार्याने विद्यापीठाचे नाव आंतरराष्ट्रिय पातळीवर नेण्‍यासाठी प्रयत्‍न करणे आवश्‍यक आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्‍यांना उच्‍च कृषि शिक्षणाची संधी उपलब्‍ध म्‍हणुन गोळेगांव ये‍थील कृषि महाविद्यालय गेल्‍या शैक्षणिक वर्षात सुरू करण्‍यात आले आहे. महाराष्‍ट्र शासनाने नुकतेच या महाविद्यालयसाठी 28 शिक्षकवर्गीय व 37 शिक्षकेत्‍तर असे एकुण 65 पदांना मान्‍यता दिली आहे. महाविद्यालयाच्‍या पायाभुत विकासासाठी पुढील पाच वर्षासाठी 38 कोटी रूपये अनुदान मंजुर केले आहे. शैक्षणिक क्षेत्राचा दर्जा व पावित्र्य कायम ठेवण्‍याची जबाबदारी विद्यार्थी, प्राध्‍यापक व विद्यापीठावर आहे, सर्व प्राध्‍यापकवृंदानी आव्‍हाणाना सामोरे जाण्‍यासाठी आपल्‍या विषयातील अद्यावत ज्ञान प्राप्‍त करावे व नवनवीन तंत्रज्ञानाचा वापर करून संशोधन करावे असा सल्‍लाही त्‍यांनी दिला. 

विद्यापीठाचे नाव आंतरराष्ट्रिय पातळीवर नेण्यासाठी सर्वानी प्रयत्न करावेत....... मा. कुलगूरू डॉ किशनराव गोरे

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठात 67 वा स्‍वातंत्रय दिन साजरा करण्‍यात आला. या प्रसंगी कृषि महाविद्यालयाच्‍या मुख्य मैदानावर विद्यापीठाचे मा. कुलगूरू डॉ किशनरावजी गोरे यांच्‍या हस्‍ते ध्‍वजारोहण करण्‍यात आले. कार्यक्रमास शिक्षण संचालक तथा अधिष्‍ठाता डॉ विश्‍वास शिंदे, विस्‍तार शिक्षण संचालक डॉ अशोक ढवण, कुलसचिव श्री का वि पागिरे, सहयोगी संचालक डॉ डि बी देवसरकर, नियत्रंक श्री ना ज सोनकांबळे, कृषि महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्‍ठाता तथा प्राचार्य डॉ ना ध पवार, गृहविज्ञान महाविद्यालयाच्‍या सहयोगी अधिष्‍ठाता तथा प्राचार्या प्रा विशाला पटणम, अन्‍नतंत्र महाविद्यालयाचे डॉ पा नि सत्‍वधर, उद्यानविद्या महाविद्यालयाचे डॉ शि बा रोहीदास, कृषि अभियांत्रिकी महाविद्यालयाचे डॉ उदय खोडके, विभाग प्रमुख डॉ बी एम ठोंबरे, विद्यापीठातील अधिकारी, कर्मचारी व विद्यार्थ्‍यी मोठया संख्‍येने उपस्थित होते.
या प्रसंगी मा कुलगुरू डॉ किशनरावजी गोरे आपल्‍या भाषणात म्‍हणाले की, विद्यापीठाने कृषि शिक्षण, संशोधन व विस्‍तार क्षेत्रात सर्वाच्‍या सहकार्याने उल्‍लेखनिय कार्य केले आहे. राष्ट्रिय पातळीवर विद्यापीठाच्‍या कार्यामुळे नावजले जात आहे. आपण सर्वांच्‍या सहकार्याने विद्यापीठाचे नाव आंतरराष्ट्रिय पातळीवर नेण्‍यासाठी प्रयत्‍न करणे आवश्‍यक आहे. यावर्षी वरूणराजाच्‍या कृपादृष्‍टीने चांगला पाउस झाला असुन पावसाचा पडणारा प्रत्‍येक थेंबा महत्‍व लक्षात घेता भविष्‍यात मुलस्‍थानी जलसंवर्धनासाठी सुयोग्‍य नियोजन करावे लागणार आहे. सध्‍या विद्यापीठात 40 टक्‍के मनुष्‍यबळाची कमतरता असतांना ही कृषि शिक्षण, संशोधन व विस्‍तार क्षेत्रात नावीन्‍यपुर्ण उपक्रम राबवीण्‍यात येत आहे. यावर्षी देखिल परभणी व बदनापुर येथील कृषि महाविद्यालयाच्‍या विद्यार्थ्‍यानी यशाची परंपरा कायम ठेउन कनिष्ठ संशोधन शिष्‍यवृत्‍ती परिक्षा राष्‍ट्रीय पातळीवर कृषि व्‍यवसाय व्‍यवस्‍थापन व वनस्‍पतीशास्‍त्र या विषयात प्रथक क्रमांक पटकावला आहे. कृषि शास्‍त्रज्ञांच्‍या अथक परिश्रमामुळे विद्यापीठाचे कार्य गतीमान झाले आहे. सन 2013-14 या शैक्षणिक वर्षात बदनापुर येथे पदव्‍युत्‍तर अभ्‍यासक्रमास सुरूवात होणार असुन यामुळे विद्यापीठाच्‍या संशोधनाला बळकटी मिळणार आहे.

विद्यापीठाच्‍या संशोधन संचालकपदी डॉ दत्‍तप्रसाद वासकर

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणीच्‍या संशोधन संचालकपदी डॉ दत्‍तप्रसाद वासकर यांची नियुक्‍ती करण्‍यात आली आहे. दिनांक 13 ऑगस्‍ट 2013 रोजी त्‍यांनी या पदाचा कार्यभार स्‍वीकारला. यानिमित्‍त संशोधन संचालनालयातर्फे स्‍वागताचा कार्यक्रम घेण्‍यात आला. डॉ. दत्‍तप्रसाद वासकर यांनी शिक्षण व संशोधनात विविध पदावरील 25 वर्षाचा अनुभव असुन डा‍ळिंब, अंजीर, सिताफळ इत्‍यादी फळपिकात त्‍यांनी विशेष संशोधन केले आहे. यापूर्वी त्‍यांनी पुणे येथील महाराष्‍ट्र कृषि शिक्षण व संशोधन परिषद येथे शिक्षण संचालक या पदावर कार्य केले आहे. सत्‍काराला उत्‍तर देतांना ते म्‍हणाले की, या विभागातील शेतकरी तूर, कापूस व सोयाबीन पिकावरच अवलंबुन न राहता डाळिंब, अंजीर व सिताफळ यासारख्‍या कोरडवाहू फळपिकांची लागवड करुन आपली आर्थिक उन्‍नती केली पाहिजे. कृषि संशोधनाची गती वाढविण्‍यासाठी प्रयत्‍न करणार असल्‍याचे मत त्‍यांनी व्‍यक्‍त केले. कार्यक्रमाचे प्रास्‍ताविक संशोधन उपसंचालक डॉ. आनंद कारले यांनी केले. या प्रसंगी विद्यापीठातील विविध संशोधन केंद्राचे अधिकारी व कर्मचारी मोठया संख्‍येने उपस्थित होते. या  नियुक्‍तीबद्दल विद्यापीठाचे मा. कुलगुरु डॉ किशनरावजी गोरे यांनी त्‍यांचे अभिनंदन केले आहे.

Wednesday, August 14, 2013

जलालपुर येथे वृक्षारोपन


वसंतराव नाईक कृषि विद्यापीठ, परभणी अंतर्गत असलेल्‍या कृषि महाविद्यालयाच्‍या ग्रामीण कृषि कार्यानुभव कार्यक्रमांतर्गत जलालपुर येथे जिल्‍हा परिषद प्राथमिक शाळा आणि ग्रामस्‍थ यांच्‍या सौजन्‍याने वृक्षारोपन कार्यक्रम घेण्‍यात आला. या कार्यक्रमाच्‍या अध्‍यक्षस्‍थानी जलालपुर येथील प्रगतशील शेतकरी डॉ. बाळासाहेब जटाळ आणि कृषि हवामानशास्त्र विभागाचे शास्‍त्रज्ञ तथा कार्यक्रम अधिकारी प्रा. ए. एम. खोब्रागडे, श्री. औंढेकर हे उपस्थित होते.
ग्रामीण कृषि कार्यानुभवाचे विविध कार्यक्रम कृषि महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्‍ठाता व प्राचार्य डॉ. एन. डी. पवार यांच्‍या सूचनेनुसार आणि ग्रामीण कृषि कार्यानुभव कार्यक्रमाचे समन्‍वयक तथा विस्‍तार शिक्षण विभागाचे विभाग प्रमुख डॉ. बि. एम. ठोंबरे व प्रभारी अधिकारी डॉ. राजेश कदम यांच्‍या मार्गदर्शनाने घेण्‍यात आला.

श्री गंगाधर टेकाळे, श्री ज्ञानोबा कोके, श्री पट्टेवार, श्री मुख्‍तार शेख, श्री शेटगार व ग्रामस्‍थ मोठया संख्‍येने उपस्थित होते. कार्यक्रम यशस्‍वीतेसाठी ज्‍वार संशोधन केंद्राचे कृषिदुतांनी परिश्रम घेतले. 

कृषि हवामानशास्त्र विभागास डॉ. बापुजी राव यांची भेट


दिनांक १४ ऑगस्‍ट २०१३ रोजी केंद्रीय कोरडवाहु संशोधन संस्‍था, हैद्राबाद येथील अखील भारतीय समन्‍वयीत संशोधन प्रकल्‍पाचे प्रमुख शास्‍त्रज्ञ डॉ. बापुजी राव यांनी वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाच्‍या कृषि हवामानशास्‍त्र विभागास भेट दिली. या प्रसंगी विभागाच्‍या प्रक्षेत्रावर अखील भारतीय समन्‍वयीत संशोधन प्रकल्‍पातील सोयाबीन व कापुस पीक प्रयोगाची पाहाणी केली. या प्रसंगी कृषि हवामानशास्‍त्र विभागाचे प्रभारी अधिकारी डॉ.बी.व्‍ही.आसेवार, कृषि हवामानशास्‍त्रज्ञ प्रा.एम.जी.जाधव यांनी प्रयोगाबददल माहिती डॉ. बापुजी राव यांना दिली. डॉ. राव यांनी विभागातंर्गत चालु असलेल्‍या इतर संशोधन योजना व पदयुत्‍तर विद्यार्थ्‍याच्‍या प्रयोगाचा आढावा घेउन शास्‍त्रज्ञांना मार्गदर्शन केले. यावेळी कृषि हवामानशास्‍त्र विभागाचे प्रा. पी. आर. जायभाये, प्रा. ए. एम. खोब्रागडे, प्रक्षेत्र अधीक्षक श्री. जी. एन. गोटे व श्री. ए. आर. शेख उपस्‍थीत होते. 

Tuesday, August 13, 2013

चला करूया सामुदायीक गाजरगवतचे निर्मुलन * साजरा करू गाजर गवत जागृती सप्ताह

गाजर गवत हे एक परदेशी तण असुन ह्याला शास्‍त्रीय भाषेत पार्थेनियम हिस्‍टोरियोफोरस असे म्‍हणतात. तसेच पांढरुफुली या स्‍थानिक नावाने सुध्‍दा आपण ओळखतो. गाजर गवताचे मुळस्‍थान उत्‍तर अमेरिकेतील मेक्सिको असून जगातील इतर देशात ह्या तणाचा प्रसार मेक्सिको पासून झालेला आहे. भारतामध्ये सर्वप्रथम गाजरगवत पुणे येथे 1955 मध्‍ये आढळून आले. त्‍यानंतर ह्या तणाचा झपाटयाने सर्वदूर प्रसार झाला.
गाजर गवतामुळे होणारे दुष्‍परिणाम
गाजर गवत हे विषारी, आक्रमक आणि अलर्जी उत्‍पन्‍न करणारे तण आहे. याच्या सानिध्यात आल्यास त्वचा रोग, दमा, श्‍वसनाचा त्रास, शिका, सर्दी, डोळे सुजणे, खाज सुटणे, गुदी येणे, श्‍वसनेंद्रीयाचे विकार इत्यादी व्याधि उत्‍पन्‍न होउ शकतात. जनावरामधे चक्कर येणे, अंर्धागवायु, दुधास कडवट वास यासारख्‍या समस्या निर्माण होतात. शेतातील पिकाबरोबर अन्‍नाद्रव्‍यासाठी स्‍पर्धा केल्‍यामुळे उत्‍पादनात घट आणि पडीक जमिनीतील जनावरांच्‍या चराई क्षेत्रात घट होते. परागकणामुळे तेलबिया, भाजीपाला, फळे इ. पिकांच्‍या उत्‍पादनात घट होते तसेच मुळाद्वारे जमिनीत विषारी रसायने सोडल्‍यामुळे पिकाच्‍या उत्‍पादनात घट होते.
गाजर गवताचा प्रसार
      गाजर गवत हे बहुतेक पडीक जमिनीत शहरातील मोकळ्या जागेत, औद्योगिक वसाहती, महामार्ग, रेल्‍वे मार्ग, राज्‍य रस्‍ते आणि महामार्गाच्‍या दुतर्फा, नदी, नाले, तलाव, डबके इ. ठिकाणी मोठ्या प्रमाणात आढळून येते. तसेच शेतातील जवळपास सर्वच पिकांमध्‍ये जसे की, कापूस, तूर, ज्‍वारी, भुईमूग, उस, भाजीपाला पिके आणि फळ पिकांमध्‍ये सुध्‍दा आढळून येते.
      गाजर गवताची विशेषत: भरपूर बियाणे तयार करण्‍याची अद् भूत क्षमता यामुळे एक चौरस मीटर क्षेत्रात 33 लक्ष परागकणापासून 15000-22500 बी तयार होतात. या बियांचा प्रसार मुख्‍यत: शेणखताद्वारे, हवे द्वारे, नदीनाले यातील पाण्‍याद्वारे, सांडपाण्‍याद्वारे, वाहनाच्‍या टायरद्वारे, शेतातील अवजारे, अप्रत्‍यक्षरित्‍या माणसाद्वारे इत्‍यादी कारणांमुळे होतो.
गाजर गवताचे बी सुक्ष्म असल्यामूळे व हवेद्वारे / पाण्याद्वारे सह्ज एका ठिकाणाउन दुसरीकडे प्रसार होत असल्याने ते सर्वत्र पसरते. एका झाडापासून ५००० ते २५००० बिया तयार होतात. गाजरगवताचा जीवनक्रम ३ ते ४ महिण्यात पुर्ण होतो.

गाजरगवतचे सामुदायीक निर्मुलनाची गरज
देशात सर्वत्र गाजर गवत जागृती सप्ताह दि. १६ ते २२ आगस्त २०१३ दरम्यान साजरा करण्यात येणार असुन वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठांतर्गत असलेल्‍या तणविज्ञान संशोधन केंद्रातर्फे शिवार फेरी, व्याख्याने गटचर्चा, पोष्टर्स लावणे, घडी पत्रिका वाटणे तसेच राष्‍ट्रीय सेवा योजनेच्‍या स्वंयसेवक, ग्रामीण कार्यानुभव कार्यक्रमाचे कृषिदुत यांच्‍या मार्फत गाजर गवत उपटणे, भुंगे सोडणे इत्यादि उपक्रम विविध ठिकाणी घेण्य़ात येणार आहेत. गाजर गवताच्या निर्मुलनासाठी सामुहीक चळवळ राबविणे आवश्यक आहे. यासाठी सामाजिक संस्‍था, शेतकरी गट, धर्मादाय संस्‍था यांनी एकाच वेळी म्‍हणजेच सप्ताहाच्या दरम्यान निर्मुलनाचे विविध कार्यक्रम राबविल्यास गाजरगवत निर्मुलन सह्जरित्या होईल. असा कार्यक्रम २ ते ३ वर्ष सतत राबविल्यास गाजर गवताचे प्रमाण कमी होईल. वंसतराव नाईक मराठवाडा कृषी विदयापीठाचे कुलगुरु मा. डॉ. किशनरावजी गोरे यांच्या मार्गदर्शनाखाली गेल्या २ वर्षापासुन विद्यापीठ परिसरात विविध कार्यक्रम / उपक्रम राबविल्याने तसेच मॅक्सिकन भुंगे सोडल्याने विद्यापीठ परिसर गाजर गवत मुक्त झाला आहे. तरी सर्व नागरीकांना विद्यापीठाच्‍या वतीने आवाहन करण्‍यात येते गाजरगवत निर्मुलन सप्‍ताहामध्‍ये विविध कार्यक्रमाच्‍या माध्‍यमातुन सहभाग नोंदवावा.

गाजर गावत निर्मुलनाचे अनेक उपाय आहेत, जे एकाचवेळी वापरले तर त्याचे निर्मुलन करणे शक्य आहे.
प्रतिंबधक उपाय : पडिक जमिनी, शेतावरचे बांध, कंपोस्ट खड्डे रस्ते, रेल्वे रूळ, इमारती लगतच्या जागा अशा ठिकाणी हे तण फुलावर येण्यापुर्वी मुळासह उपटून काढावे व नष्ट करावे. त्यामुळे गाजर गवताच्या बियांचे उत्पादन थांबते व प्रसार रोखण्यास मदत होते.
निवारणात्मक उपाय : लागवड क्षेत्रात वांरवार आंतंरमशागत करून तसेच शिफारशीप्रमाणे तणनाशकाचा वापर करून  गाजर गवतचे नियंत्रण करता येईल. तर बिगर लागवड क्षेत्रामध्ये उगवणा-या गाजर गवतासाठी २,४ डी हे तणनाशक ३ कीलो ५०० ली पाण्यात मिसळून तण फुलावर येण्यापुर्वी फवारावे.
जैविक उपाय : सन 1986 मध्‍ये गाजर गवताच्‍या नियंत्रणासाठी वसवंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाच्‍या कीटकशास्‍त्र विभागाने मेक्सिकन भूंगे आणून ह्या भूंग्‍याचे प्रयोगशाळेत मोठ्या प्रमाणावर गुणन करुन शेतात सोडले असता ह्या भूंग्‍यानी मोठ्या प्रमाणावर गाजर गवताचा नाश केल्‍याचे आढळून आले

गाजर गवताच्‍या जैविक नियंत्रणाची निकड
·    गाजर गवत हे विषारी असल्‍यामुळे गाजर गवत उपलटण्‍यासाठी मजूर वर्ग सहज तयार होत नाही.
·  रासायनिक तणनाशके ही महागडी असल्‍यामुळे वारंवार त्‍यांचा वापर करणे आर्थिकदृष्‍टया  न परवडणारे आहे.
·    सार्वजनिक क्षेत्रातील गाजर गवत नियंत्रित करणे खर्चिक असल्‍यामुळे शासनाला न परवडणारे आहे.
·    रासायनिक तणनाशकांचा वापर हा पर्यावरणासाठी हानिकारक आहे.
·    रासायनिक नियंत्रण हे प्रभावी नाही, त्‍यामुळे जैविक नियंत्रण महत्‍वाचे आहे.
 या सर्व बाबींमुळे गाजर गवताचे झायगोग्रामाद्वारे जैविक नियंत्रण करणे आर्थिकदृष्‍ट्या व पर्यावरणीयदृष्‍ट्या फायद्याचे आहे.
ओळख झायगोग्रामा भुंग्‍याची
      मेक्सिकोस्‍थीत गाजर गवतावर उपजिविका करणारा झायगोग्रामा भुंगेरा मेक्सिकोतून आयात करण्‍यात आला. म्‍हणुनच या भुंग्‍याला मेक्सिकन भुंगा असे म्‍हणतात. या किडीचे प्रौढ भुंगे मळकट पांढरे असून त्‍यावर काळसर रंगाच्‍या सरळ आणि नागमोडी रेषा असतात. हृया रेषा त्रिशुलाकार असल्‍यामुळे काही ठिकाणी यांना त्रिशुल भुंगे असेही म्‍हणतात. प्रौढ भुंगे आकाराने मध्‍यम, सहा मि.मि. लांब असून मादी भुंगे नरापेक्षा आकाराने मोठे असतात.
झायगोग्रामा भुंग्‍याचा जीवनक्रम
मादी भुंगे अलग-अलग अथवा गुच्‍छात पानाच्‍या खालील बाजूवर साधारणपणे 2000 अंडी घालतात.  अंड्यांचा रंग फिकट पिवळा असून अंड्यातून अळ्या बाहेर पडण्‍याच्‍या वेळी लालसर होतो. अंडी अवस्‍थेचा कालावधी चार ते सहा दिवसांचा असून, अळ्यांचा चार अवस्‍था दहा ते अकरा दिवसात पूर्ण होतात तर कोषावस्‍था 9 ते 10 दिवसांची असते. या भुंग्‍याचा एकूण कालावधी दोन ते तीन महिन्‍याचा असून ते गाजर गवताच्‍या पानांवर उपजिविका करतात.
झायगोग्रामाद्वारे गाजर गवत नियंत्रण
      अंड्यातून बाहेर निघालेल्‍या अळ्या गाजर गवतावरील शेंड्याची पाने खातात. प्रथम अळ्या शेवट्या कळ्या, सहकळ्या आणि नंतर पानाच्‍या कडेने खातात. तरुण अळ्या झाडाची वाढ आणि फुले येण्‍याचे थांबवितात. पुर्ण वाढलेल्‍या अळ्या रंगाने पिवळ्या पडतात आणि कसलीही हालचाल न करता सुक्ष्‍म होवून जमिनीवर कोषावस्‍थेत जाण्‍यासाठी पडतात. कोषांमधून 9 ते 10 दिवसांनी भुंगे जमिनीतून निघतात. पावसाळ्यात जून ते ऑक्‍टोंबरपर्यंत भुंगे गाजर गवत फस्‍त करतात. भुंगे  आणि अळ्या फक्‍त गाजर गवतावरच जगतात. भुंगे व अळ्यांची गाजर गवत खाण्‍याची गती कमी असल्‍यामुळे आणि गाजर गवताची वाढ लवकर होत असल्‍यामुळे गाजर गवताचे ताबडतोब नियंत्रण दिसून येत नाही. परंतु अन्‍न साखळीतील घटक असल्‍यामुळे हे भुंगे महत्‍वाचे आहेत.
गाजर गवत उपलब्‍ध नसल्‍यास भुंगे जमिनीत सुप्‍तावस्‍थेत जातात. नोव्‍हेंबर नंतर भुंगे जमिनीत सात ते आठ महिने दडून बसतात आणि पुढील वर्षी पावसाळ्यात सुरुवातीच्‍या पावसानंतर जमिनीतून निघून गाजर गवताचा नाश करण्‍यास सुरूवात करतात.
हे भुंगे एखाद्या वातावरणात, एखाद्या ठिकाणी स्थिर झाले की पुढच्‍यावर्षी पुन/पुन्‍हा भुंगे सोडण्‍याची गरज पडत नाही. गाजर गवताच्‍या उच्‍चाटनासाठी शेतात प्रति हेक्‍टरी 500 भुंगे सोडल्‍यास हे भुंगे स्थिर होवून गाजर गवताचे प्रभावी नियंत्रण करतात. शक्‍यतोवर मनुष्‍यप्राण्‍याचा अडथळा होणार नाही अशी जागा भुंगे सोडण्‍यासाठी निवडावी. झायगोग्रामामुळे मनुष्‍य प्राण्‍याला कोणताही त्रास होत नाही उलट उपद्रवी गाजर गवतावर झायगोग्रामा आपली उपजिविका करुन मनुष्‍य प्राण्‍यावर एक प्रकारे उपकारच करतात. प्रतिकुल परिस्थितीत सुध्‍दा झायगोग्रामामुळे गाजर गवताचे प्रभावी नियंत्रण पहावयास मिळते. झायगोग्रामा/ मेक्सिकन भुंगे हे परोपजीवी कीटक संशोधन योजना, कृषि कीटकशास्‍त्र विभाग, वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी येथे ऑगष्‍ट ते ऑक्‍टोंबर पर्यंत विक्रीस उपलब्‍ध आहेत आणि याचा दर 1 रुपया प्रति भुंगा असा नाममात्र आहे.

सौजन्‍य
डॉ.अशोक जाधव 9821392192
डॉ.संजय पवार 
तण विज्ञान संशोधन केंद्र, परभणी
डॉ. धीरज कदम 9421621910
परोपजीवी कीटक संशोधन योजना, कृषि कीटकशास्‍त्र विभाग, परभणी