Friday, January 3, 2025

खादगाव (ता. पैठण) येथील ७०० एकरावरील गोदावरी वाणाच्या प्रक्षेत्रास माननीय कुलगुरू डॉ इन्द्र मणि यांची भेट

 

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याच्या पैठण तालुक्यातील मौजे खादगाव येथे एकाच ठिकाणी जवळपास ७०० एकर प्रक्षेत्रावर वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ विकसित तुरीच्या गोदावरी या वाणाची पेरणी केलेली आहे. या प्रक्षेत्रास माननीय कुलगुरू डॉ इन्द्र मणि यांनी दिनांक 3 जानेवारी रोजी भेट देऊन पाहणी केली. त्यांच्या समवेत संशोधन संचालक डॉ. खिजर बेग, कृषि विस्तार विद्यावेत्ता डॉ एस बी. पवार, विद्यापीठाच्या बदनापूर येथील कृषी संशोधन केंद्राचे प्रभारी अधिकारी डॉ के.टी जाधव, वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ डी.के. पाटील उपस्थित होते. यावेळी खादगाव येथील शेतकऱ्यांशी माननीय कुलगुरू डॉ इन्द्र मणि यांनी संवाद साधला. याबरोबरच शेतकऱ्यांना तुरीच्या विक्री व्यवस्थापन आणि प्रक्रियाबद्दल मार्गदर्शन केले. २०१८ मध्ये खादगावचे शेतकरी छत्रपती संभाजीनगर येथील कृषि विस्तार विद्यावेत्ता यांच्या संपर्कात आले होते. त्यांवेळी त्यांना विद्यापीठाने विकसित केलेली तुरीच्या बीडीएन ७११ या वाणाची माहिती करून दिली. तेव्हापासून खादगावचे शेतकऱ्यांद्वारे त्यांच्या प्रक्षेत्रावर बीडीएन ७११ वाणाची जवळपास १००० एकरवर पेरणी केली जात असे आणि त्यापासून कोरडवाहू क्षेत्रात एकरी ७ ते ८ क्विंटल उत्पादन घेत असत. आता २०२१-२२ पासून याच ठिकाणी गोदावरी वाणाची पेरणी केली जात आहे. भेटी दरम्यान शेतकऱ्यांनी माननीय कुलगुरू यांना दिलेल्या प्रतिक्रियानुसार गोदावरी या वाणाचे गुणविशेष नमूद करताना सांगितले की, या वाणाच्या शेंगांमध्ये चार ते पाच दाणे असून मर रोगास बळी पडत नाही. गोदावरी या वाणापासून कोरडवाहू क्षेत्रात एकरी १० ते १२ क्विंटल आणि ठिबक सिंचन वर लागवड केल्यास जवळपास १८ क्विंटल पर्यंत उतार मिळू शकतो. शिवाय एखाद्या शेतकऱ्यांनी कमी क्षेत्रावर लागवड केली तर त्यास कोरडवाहू मध्ये १२ ते १४ क्विंटल उतार मिळते तसेच अनेक शेतकऱ्यांनी सोयाबीनचे आंतरपीक घेवून सोयाबीनचे ७ते ८ क्विंटल उत्पादन घेतल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले. माननीय कुलगुरू यांनी यावेळी शेतकऱ्यांचे अभिनंदन केले आणि यांत्रीकारण आणि लागवडीचे योग्य मानके अवलंब करून कमी खर्चात अधिक उत्पादन मिळवावे असे सांगितले. ते पुढे बोलताना म्हणाले की, दाळ हे प्रथिनांचे प्रमुख स्त्रोत असून दाळ उत्पादनामध्ये भारत देश आघाडीवर आहे. याबरोबरच सर्वात जास्त खाण्यासाठीही आपल्याला दाळ लागते यामुळे आयात पण आपण करतो. भविष्यात डाळीची आयात बंद करण्यासाठी तुरीचा गोदावरी हा वाण नक्कीच लाभदायक ठरेल अशी आशा यावेळी मा कुलगुरू यांनी व्यक्त केली.