Monday, September 30, 2019

वनामकृविचा विद्यापीठ आपल्या दारी उपक्रमास पाथरी तालुक्यात शेतकऱ्यांचा मोठा प्रतिसाद

 
वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी आणि कृषी विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने विद्यापीठाचे तंत्रज्ञान प्रभावीपणे शेतक-यांच्‍या बांधापर्यंत पोहोचण्याकरिता विद्यापीठ आपल्या दारी तंत्रज्ञान शेतावरी या विस्‍तार उपक्रमांतर्गत विशेष पिक संरक्षण मोहिम दिनांक १९ सप्‍टेंबर ते ७ ऑक्‍टोबर दरम्‍यान परभणी व हिंगोली जिल्ह्यातील एकूण ५६ गावांमध्ये राबविण्‍यात येते असुन या उपक्रमाचा कृती आराखडा कुलगुरू मा. डॉ. अशोक ढवण व विस्तार शिक्षण संचालक डॉ. प्रदीप इंगोले  यांच्या मार्गदर्शनानुसार व मुख्य विस्तार शिक्षण अधिकारी डॉ प्रशांत देशमुख यांच्‍या सहकार्याने तयार करण्यात आला आहे. दिनांक १९ सप्टेंबरपासून सुरवात करण्यात आलेल्‍या या मोहिमेंतर्गत शेतकऱ्यांच्या शेतावर भेट, छोटे मेळावे, गटचर्चा, प्रशिक्षणे, प्रात्यक्षिकाद्वारे मार्गदर्शन करण्यात येत आहे. यासाठी विद्यापीठ शास्त्रज्ञाचे दोन पथक करण्यात येऊन यात कृषिविद्या, कीटकशास्त्र, वनस्पतीशास्त्र आणि उद्यानविद्या विभागातील विषय तज्ञांचा समावेश आहे. या पथकात कृषि विद्यावेत्‍ता डॉ यू एन आळसे यांच्‍या नेतृत्‍वात डॉ एस जी पुरी, डॉ एम एस दडके, डाँ पी बी  केदार, प्रा डी डी पटाईत, डॉ ए टी दौंडे, डॉ अे जी बडगुजर, डॉ एस आर बरकुले, डॉ सी व्ही अंबाडकर, डॉ एस व्ही पवार, डॉ आर एस जाधव, डॉ आय ए बी मिर्झा आदींचा समावेश आहे. या उपक्रमांतर्गत दिनांक २५ सप्‍टेबर रोजी विद्यापीठ शास्त्रज्ञ व तालुका कृषी अधिकारी, यांनी पाथरी तालुक्यातील मौजे रेनापुर, जैतापूरवाडी, बोरगव्हाण व रामपुरी (खु.) या गावातील शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. यावेळी विस्तार कृषी विद्यावेत्ता डॉ. यु. एन. आळसे, किटकशास्त्रज्ञ, डॉ. अे. जी. बडगुजर, वनस्पती विकृती शास्त्रज्ञ डॉ. सी. व्ही. अंबाडकर, तालुका कृषी अधिकारी श्री. व्ही. टी. शिंदे व इतर कर्मचारी उपस्थित होते. सदरिल गावांत मोठ्या प्रमाणात शेतकरी उपस्थित होते. यावेळी विविध कृषि विषयक समस्‍याबाबत विद्यापीठ शास्‍त्रज्ञांनी मार्गदर्शन केले. 
डॉ.बडगुजर यांनी कपाशीवरील आकस्मिक मर आढळल्‍यास करावयाच्‍या उपाययोजने बाबत मार्गदर्शन केले. कपाशीच्‍या उमळलेल्या झाडांना युरिया अधिक म्युरेट ऑफ पोटॅश प्रत्येकी १५० ग्रॅम व कॉपर ऑक्सीक्लोराईड ३० ग्रॅम प्रती १० लिटर पाण्यात मिसळून आळवणी करण्‍याचा सल्‍ला दिला. तर कपाशीवर लाल्या विकृती आढळल्यास मॅग्नेशियम सल्फेट ०.२ टक्के (२० ग्रॅम / लिटर) व डीएपी २.० टक्के (२० ग्रॅम / लिटर) प्रमाणे दोन फवारण्या करण्याचा सल्ला डॉ. आळसे यांनी दिला. 
काही कपाशीवर सध्या फुलकिडे व पांढरी माशीचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात असुन त्यासाठी फेनप्रोपॅथ्रीन १५ टक्के ईसी + पायरी प्रॉक्झीफेन टक्के ईसी मिली / लिटर पाण्यातून साध्या पंपाने फवारण्याचे सुचवले. वनस्‍पती विकृतीशास्‍त्रज्ञ डॉ. अंबाडकर यांनी कपाशीवरील अनुजीव जन्य करपा व पानावरील ठिपके रोगाकरिता कॉपर ऑक्सीक्लोराईड अधिक स्ट्रोटोसायक्लीन २.५ ग्रॅम + ग्रॅम प्रति लिटर पाण्यातून फवारावे असे सांगितले. तालुका कृषी अधिकारी श्री. शिंदे यांनी विद्यापीठ आपल्या दारी कार्यक्रमाचे महत्त्व विषद करून कृषी विभागाच्या विविध योजनांची शेतकऱ्यांना माहिती दिली. 

Saturday, September 28, 2019

गुणवंत विद्यार्थ्‍यांचा कृषी अभ्‍यासक्रमाकडे वाढता कल......कुलगुरू मा डॉ अशोक ढवण

वनामकृवितील परभणी कृषि महाविद्यालयात आयोजित प्रथम वर्षात नवप्रवेशित विद्यार्थ्‍यांच्‍या स्‍वागत समारंभात प्रतिपादन

कृषीच्‍या विद्यार्थ्‍यांना शासकीय क्षेत्रात, बॅकिंग व खासगी शेती निविष्‍ठाच्‍या कंपनी मध्‍ये रोजगाराच्‍या संधी आहेत. परंतु कृषि व कृषी सलंग्‍न उद्योगात स्‍वयंरोजगाराच्‍या अमर्याद संधी उपलब्‍ध असुन यासाठी विद्यार्थ्‍यींनी उद्योजकता विकासाकडे लक्ष देण्‍याची गरज आहे. यावर्षी मोठया प्रमाणात कृषि व कृषि संलग्‍न अभ्‍यासक्रमात गुणवंत विद्यार्थ्‍यांनी प्रवेश घेतला असुन गुणवंत विद्यार्थ्‍यांचा कृषी अभ्‍यासक्रमाकडे कल वाढत आहे, असे प्रतिपादन कुलगुरू मा डॉ अशोक ढवण यांनी केले. वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील परभणी कृषी महाविद्यालयात कृषि पदवीच्‍या प्रथम वर्षात नवप्रवेशित विद्यार्थ्‍यांचा स्‍वागत समारंभ व उदबोधन कार्यक्रमाचे आयोजन दिनांक २५ सप्‍टेबर रोजी करण्‍यात आले होते, त्‍या प्रसंगी ते अध्‍यक्षीय भाषणात बोलत होते. व्‍यासपीठावर परभणी कृषि महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ धर्मराज गोखले, कृषि अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ उदय खोडके, उद्यानविद्या महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ तुकाराम तांबे, सहयोगी अधिष्‍ठाता (निम्‍नस्‍तर शिक्षण) डॉ डि एन धुतराज, शिक्षण विभागाचे प्रभारी डॉ रणजित चव्‍हाण आदींची प्रमुख उपस्थिती होती.
कुलगुरू मा डॉ अशोक ढवण पुढे म्‍हणाले की, बहुतांश कृषीचे विद्यार्थ्‍यी हे मध्‍यमवर्गीय व शेतकरी कुटूंबातुन आलेले असतात, प्रतिकुल परिस्थितीत देखिल अनेक कृषि पदवीधरांनी विविध क्षेत्रात मोठे यश संपादन केले आहे. महाविद्यालयीन जीवनातच विद्यार्थ्‍यांचा व्‍यक्‍तीमत्‍व विकास होत असतो, महाविद्यालयातील वातावरण व शिक्षकांचे संस्‍कारामुळे विद्यार्थ्‍यी घडत असतात. शिक्षणामुळेच आपणास प्रतिकुल परिस्थितीवर मात करण्‍याचे सामर्थ्‍य प्राप्‍त होते.    

कार्यक्रमाचे प्रास्‍ताविक प्राचार्य डॉ धर्मराज गोखले यांनी केले. सुत्रसंचालन संजय येवले व वैभव ठोंबरे यांनी केले तर आभार प्रा विजय जाधव यांनी मानले. कार्यक्रमास म‍हाविद्यालयातील गुणवंत विद्यार्थ्‍यांचा सत्‍कार मान्‍यवरांच्‍या हस्‍ते करण्‍यात आला, तसेच कृषि अभ्‍यासक्रमाबाबत शैक्षणिक बाबत मार्गदर्शन करण्‍यात आले. कार्यक्रमास महाविद्यालयातील प्राध्‍यापक, विद्यार्थ्‍यी व विद्यार्थ्‍यांचे पालक मोठया संख्‍येने उपस्थित होते.

वनामकृविचा विद्यापीठ आपल्या दारी तंत्रज्ञान शेतावरी उपक्रमांर्गत सोनपेठ तालुक्यात शेतकऱ्यांना मार्गदर्शन


वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी आणि कृषी विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने विद्यापीठाचे तंत्रज्ञान प्रभावीपणे शेतक-यांच्‍या बांधापर्यंत पोहोचण्याकरिता विद्यापीठ आपल्या दारी तंत्रज्ञान शेतावरी या विस्‍तार उपक्रमांतर्गत विशेष पिक संरक्षण मोहिम दिनांक १९ सप्‍टेंबर ते ७ ऑक्‍टोबर दरम्‍यान परभणी व हिंगोली जिल्ह्यातील एकूण ५६ गावांमध्ये राबविण्‍यात येते असुन या उपक्रमाचा कृती आराखडा कुलगुरू मा. डॉ. अशोक ढवण व विस्तार शिक्षण संचालक डॉ. प्रदीप इंगोले  यांच्या मार्गदर्शनानुसार व मुख्य विस्तार शिक्षण अधिकारी डॉ प्रशांत देशमुख यांच्‍या सहकार्याने तयार करण्यात आला आहे. दिनांक १९ सप्टेंबरपासून सुरवात करण्यात आलेल्‍या या मोहिमेंतर्गत शेतकऱ्यांच्या शेतावर भेट, छोटे मेळावे, गटचर्चा, प्रशिक्षणे, प्रात्यक्षिकाद्वारे मार्गदर्शन करण्यात येत आहे. यासाठी विद्यापीठ शास्त्रज्ञाचे दोन पथक करण्यात येऊन यात कृषिविद्या, कीटकशास्त्र, वनस्पतीशास्त्र आणि उद्यानविद्या विभागातील विषय तज्ञांचा समावेश आहे. या पथकात कृषि विद्यावेत्‍ता डॉ यू एन आळसे यांच्‍या नेतृत्‍वात डॉ एस जी पुरी, डॉ एम एस दडके, डाँ पी बी  केदार, प्रा डी डी पटाईत, डॉ ए टी दौंडे, डॉ अे जी बडगुजर, डॉ एस आर बरकुले, डॉ सी व्ही अंबाडकर, डॉ एस व्ही पवार, डॉ आर एस जाधव, डॉ आय ए बी मिर्झा आदींचा समावेश आहे.
या उपक्रमांतर्गत दिनांक २४ सप्‍टेबर रोजी सोनपेठ तालुक्यातील मौजे नारवाडी, खपाट पिंपरी आणि धामोणी येथे भेट देऊन विद्यापीठ शास्‍त्रज्ञांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. मौजे नारवाडी आणि खपाट पिंपरी येथे शेतकरी मेळाव्यात किटकशास्‍त्रज्ञ डॉ पी बी केदार यांनी कापूस, सोयाबीन, तूर, मका आदीं पिकावरील किडींच्‍या नियंत्रणाकरिता विविध उपाययोजन व कीटकनाशक हाताळताना घ्यावयाची काळजी याबाबत मार्गदर्शन केले तसेच डॉ एस व्ही पवार यांनी पिकावरील रोग व्यवस्थापनाबाबत माहिती सांगून रबी हंगामाच्या नियोजनात बीजप्रक्रिया बाबत मार्गदर्शन केले. प्रास्‍ताविकात डॉ एस जी पुरी यांनी विद्यापीठाच्या विस्तार कार्याची माहिती दिली. मौजे नारवाडी येथील शेतकरी श्री. अर्जुन जोगदंड यांचे ठिबक सिंचनावरील नांदेड-४४ बीटी कापसाच्या प्रक्षेञास शास्‍त्रज्ञांनी भेट दिली. तसेच मौजे धामोणी येथे प्रगतशील शेतकरी कृषिभूषण श्री नाथराव कराड यांच्या प्रक्षेत्र आणि पूरक उद्योग समूह एक हजार कडकनाथ कोंबडी पालन व्यवसायास भेट दिली. सोनपेठ तालुक्यातील सदरिल उपक्रमास तालुका कृषी अधिकारी श्री गणेश कोरेवाड, मंडळ कृषी अधिकारी श्री वाळके, कृषी विभाचे श्री मुंडे, श्री पवार आदींचे मोलाचे सहकार्य लाभले.

Thursday, September 26, 2019

कृषिच्‍या विद्यार्थ्‍यांमध्‍ये उद्योजकता विकासाकरिता सामजंस्‍य करार

वनामकृवितील परभणी कृषि महाविद्यालय व महाराष्‍ट्र उद्योजकता विकास केंद्र, परभणी यांचा उपक्रम
वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील परभणी कृषि महाविद्यालय व महाराष्‍ट्र उद्योजकता विकास केंद्र, परभणी यांच्‍यात कुलगुरू मा डॉ अशोक ढवण यांच्‍या प्रमुख उपस्थितीत दिनांक 16 सप्‍टेंबर रोजी सामजंस्‍य करार करण्‍यात आला. यावेळी शिक्षण संचालक डॉ प्रदिप इंगोले, कुलसचिव श्री रणजित पाटील, प्राचार्य डॉ धर्मराज गोखले, प्रकल्‍प अधिकारी श्रीमती रूपाली कनगुडे, विभाग प्रमुख डॉ राकेश आहिरे, शिक्षण विभागाचे प्रभारी डॉ रणजित चव्‍हाण आदींची उपस्थिती होती. परभणी कृषी महाविद्यालयाच्‍या विद्यार्थ्‍यांमध्‍ये उद्योजकता विकास व्‍हावा या उद्देशाने हा सामजंस्‍य करार करण्‍यात आला असुन करारावर प्राचार्य डॉ धर्मराज गोखले व प्रकल्‍प अधिकारी श्रीमती रूपाली कनगुडे यांनी सहया केल्‍या. या करारानुसार कृषीच्‍या विद्यार्थ्‍यांमध्‍ये उद्योजकता विकासाकरिता वेळोवेळी कार्यशाळा आयोजित करण्‍यात येणार आहेत तसेच शासनाच्‍या विविध उद्योजकता विकास कार्यक्रम व योजना यांची माहिती विद्यार्थ्‍यांपर्यंत पोहचविण्‍यात येऊन कृषि निगडीत उद्योग करण्‍यासाठी मार्गदर्शन करण्‍यात येणार आहे.

Wednesday, September 25, 2019

विद्यापीठ आपल्‍या दारी तंत्रज्ञान शेतावरी उपक्रमांतर्गत विद्यापीठ शास्‍त्रज्ञाची टीम पूर्णा तालुक्यात


वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ व कृषी विभाग महाराष्ट्र शासन यांच्या संयुक्त विद्यमाने कुलगुरू मा डॉ अशोक ढवण व विस्‍तार शिक्षण संचालक डॉ प्रदिप इंगोले यांच्‍या मार्गदर्शनाखाली विद्यापीठ आपल्‍या दारी: तंत्रज्ञान शेतावरी हा उपक्रम दिनांक 19 सप्‍टेबर ते 7 ऑक्‍टोबर दरम्यान परभणी व हिंगोली जिल्ह्यात राबविण्यात येत आहे. या उपक्रमांर्गत दिनांक 19 सप्‍टेबर रोजी विद्यापीठ शास्त्रज्ञांचा चमू व कृषी विभाग अधिकारी यांनी पूर्णा तालुक्यातील दस्तापूर, कमलापूर, मजलापुर, खडाळा माख्णी, धानोरा (काळे), कानडखेडा या गावांतील शेतक-यांच्‍या प्रक्षेत्रास भेट व गटचर्चा कार्यक्रम घेऊन शेतकऱ्यांच्‍या पिक परिस्थिती व गरजेनुसार मार्गदर्शन करण्‍यात आले. मौजे दस्तापूर येथील श्री. रामानंद कारले यांच्या गांडूळ खत निर्मिती केंद्र व सेंद्रिय डाळिंब बागेला भेट देऊन आयोजित चर्चासत्रात उपस्थित शेतकऱ्यांना सद्यपरिस्थितीतील कीड-रोग व्‍यवस्‍थापन, रब्बी नियोजन, प्रधानमंत्री शेतकरी सन्मान योजना, प्रधानमंत्री शेतकरी पेन्शन योजना आदीं विषयी मार्गदर्शन करण्यात आले. तसेच दस्तापूर येथील श्री माणिक कारले, मजलापुर येथे श्री बाळासाहेब हिंगे व मौजे कमलापूर येथील श्री. गजानन सूर्यवंशी यांच्या कापूस पिकास भेट देऊन मार्गदर्शन करण्यात आले. मौजे खंडाळा येथे शेतकरी चर्चासत्रात उपस्थित शेतकर्‍यांना कीटकनाशके हाताळताना घ्यावयाची काळजी, कापूस व हळद किड व रोग व्यवस्थापन, रब्‍बी नियोजन याविषयी तसेच यावेळी उपस्थित शेतकर्‍यांना टाटा रॅलीस कंपनी तर्फे कीटकनाशक संरक्षण किट वाटप करण्यात आली. यावेळी कीटकनाशक हाताळताना घ्यावयाची काळजी याविषयी जनजागृती मोहिमेचे उद्घाटन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी श्री. एस. बी. आळसे व विस्तार कृषी विद्यावेत्ता डॉ यू एन आळसे यांच्या हस्ते करण्यात आले.
मौजे माखणी व धानोरा (काळे) येथील विद्यापीठ व महाबीज यांच्याद्वारे विकसित नांदेड 44 बीटी कपाशी वाणाच्या प्रक्षेत्रास भेट देऊन शेतकऱ्यांना विविध किडींची व मित्र किडीची प्रत्यक्ष शेतात ओळख करून देण्यात आली तसेच फवारणीसाठी कीटकनाशक निवडताना महत्त्वाच्या सूचना देण्‍यात आलया. मौजे कानडखेड येथील शेतकरी श्री. अमृत कदम यांच्या शेतातील हळद पिकास भेट देऊन कंदमाशी, खोडकिडा, करपा, कंदकूज याविषयी ओळख करून व्यवस्थापन विषयी माहिती देण्यात आली. उपस्थित शेतकर्‍यांना चर्चासत्रात शेतकऱ्यांच्या ग्राम बीजोत्पादन, प्रक्रिया उद्योग, कपाशी कीड व्यवस्थापन याविषयीच्या प्रश्नांची सखोल उत्तरे देऊन शेतकऱ्यांशी चर्चा करण्यात आली. मोहिमेअंतर्गत तालुक्यातील २०० ते २५० शेतकऱ्यांनी प्रत्यक्ष सहभाग नोंदवून विद्यापीठ शास्त्रज्ञ व कृषी विभाग अधिकारी यांच्याशी संवाद साधला. सदर कार्यक्रमास विद्यापीठाच्‍या चमूमध्ये चमू प्रमुख व विस्तार कृषी विद्यावेत्ता डॉ यु एन आळसे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी श्री एस बी आळसे, उपविभागीय कृषि अधिकारी श्री सागर खटकाळे, आत्माचे प्रकल्प संचालक श्री के आर सराफ, रोग शास्त्रज्ञ डॉ एम एस दडके, कीटकशास्त्रज्ञ श्री डी डी पटाईत, तालुका कृषी अधिकारी श्री. नितीन देशमुख, मानवत तालुका कृषी अधिकारी श्री. पी. एच. कच्छवे, पाथरी तालुका कृषी अधिकारी श्री. व्‍ही. टी. शिंदे व विविध मंडळ कृषी अधिकारी यांनी सहभाग घेतला.

विद्यापीठ आपल्या दारी उपक्रमांतर्गत गंगाखेड तालुक्यातील शेतकऱ्यांशी विद्यापीठ शास्त्रीज्ञांचा संवाद व मार्गदर्शन

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी आणि कृषी विभाग यांच्‍या संयुक्‍त विद्यमाने 19 सप्‍टेबर पासुन परभणी व हिंगोली जिल्‍हयातील विविध गावांमध्‍ये विद्यापीठ आपल्‍या दारी तंत्रज्ञान शेतावरी उपक्रमात विशेष संरक्षण मोहिम कुलगुरू मा डॉ अशोक ढवण व विस्‍तार शिक्षण संचालक डॉ प्रदीप इंगोले यांच्‍या मार्गदर्शनाखाली राबविण्‍यात येत आहे. या मोहिमेंतर्गत विद्यापीठ शास्‍त्रज्ञांनी दिनांक 28 सप्‍टेंबर रोजी गंगाखेड तालुक्‍यातील मौजे कौडगाव, शिवाजी नगर, इसाद आणि गंगाखेड येथील शेतक-यांच्‍या प्रक्षेत्रावर प्रत्‍यक्ष भेट देऊन शेतकऱ्यांशी संवाद साधुन मार्गदर्शन केले. यात विद्यापीठ शास्‍त्रज्ञ डॉ एस जी पुरी, प्रा पी के वाघमारे, तालुका कृषी अधिकारी श्री निरस, मंडळ कृषी अधिकारी श्री देशमुख आदींनी शेतक-यांशी सुसंवाद साधुन शेतीविषयक शंकाचे समाधान केले.
मोहिमेंतर्गत मौजे कौडगाव येथे शेतक-यांना मार्गदर्शन करतांना प्रा. वाघमारे यांनी पिकांना रासायनिक खतांचा अतिरिक्त वापर टाळुन सेंद्रिय खते, हिरवळीचे खते, योग्य मशागत करून जमिनीची अन्‍नद्रव्‍यांची भूक भागवावी असे सांगुन कापूस सोयाबीन पिकाची सद्यपरिस्थितीत घ्‍यावयाची काळजी रबी हंगामाच्या नियोजनाबाबत माहिती दिली. डॉ. एस. जी. पुरी यांनी विद्यापीठाच्या विस्तार कार्याबाबत माहिती देऊन मका पिकावरील लष्करी अळीचे एकात्मिक व्‍यवस्‍थापनावर मार्गदर्शन केले. यावेळी महिला प्रगतशील शेतकरी सौ जयश्री जामगे सह अनेक ग्रामस्थ सहभागी होते. मौजे इसाद येथे श्री. रामप्रसाद सातपुतेश्री.राजाभाऊ सातपुते यांच्या पिकांची पाहणी करून उपस्थित शेतकरी बांधवाच्‍या शेती विषयक समस्यांचे चर्चेव्‍दारे समाधान केले तर गंगाखेड येथील शेतकरी श्री पंडित चौधरी श्री महाजन तसेच मौजे शिवाजीनगर येथील शेतकरी श्री काशिनाथ निळे यांच्या शेतावर भेट देऊन कापूस पिकावरील किड व्‍यवस्‍थापनावर मार्गदर्शन केले. कार्यक्रम यशस्वितेसाठी कृषी विभागातील श्री. मुंडे, श्री. कच्छवे, श्री राठोड, श्री राऊत, श्री सोनटक्के आदींनी परिश्रम घेतले.

Wednesday, September 18, 2019

मराठवाडयातील दुष्‍काळ मुक्‍तीसाठी सर्वांनी प्रयत्‍न करण्‍याची गरज......विधानसभा सदस्‍य मा आमदार श्री अमित देशमुख

वनामकृवितील लातुर येथील कृषि महाविद्यालयात आयोजित रबी पीक शेतकरी मेळाव्‍यास मोठा प्रतिसाद, महिलांचा उल्‍लेखिनीय सहभाग

मराठवाडयात सातत्‍याने पडत असणा-या दुष्‍काळामुळे शेतकरी त्रस्‍त असुन मराठवाडा दुष्‍काळ मुक्‍त करण्‍यासाठी शासन, शेतकरी, कृषी विभाग व कृषि विद्यापीठ सर्वांनी प्रयत्‍न करण्‍याची गरज आहे. इस्राईल सारख्‍या देशात महाराष्‍ट्र पेक्षाही कमी पाऊस पडतो, तरीही तो देश जगात कृषि उत्‍पादनात अग्रेसर आहे. इस्‍त्राईल तंत्रज्ञानाचा अभ्‍यास शास्‍त्रज्ञांनी करून ते तंत्रज्ञान राज्‍यातील शेतक-यांना देण्‍याची आवश्‍यकता आहे, असे प्रतिपादन लातुर विधानसभा सदस्‍य माननीय आमदार श्री अमित देशमुख यांनी केले. वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील विस्‍तार शिक्षण संचालनालय व कृषि विभाग (महाराष्‍ट्र शासन) यांच्‍या संयुक्‍त विद्यमाने मराठवाडा मुक्‍ती संग्राम दिनानिमित्‍त दिनांक १७ सप्‍टेंबर रोजी लातुर येथील कृषि महाविद्यालयात आयोजित रबी शेतकरी मेळाव्‍याच्‍या उदघाटन प्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाच्‍या अध्‍यक्षस्‍थानी विस्‍तार शिक्षण संचालक डॉ प्रदीप इंगोले हे होते तर व्‍यासपीठावर लातुर जिल्‍हा अधिक्षक कृषि अधिकारी श्री डी एस गावसाने, आत्‍माचे प्रकल्‍प संचालक डॉ दिनकर जाधव, प्रगतशील शेतकरी श्री राजकुमार बिराजदार, प्राचार्य डॉ बाबासाहेब ठोंबरे, प्राचार्य डॉ हेमंत पाटील, प्राचार्य डॉ भगवान इंदुलकर, प्राचार्य डॉ व्‍यंकट जगताप, विद्यापीठ नियंत्रक श्री एन एस राठोड, डॉ अरूण कदम, डॉ दिगांबर चव्‍हाण, डॉ सचिन डिग्रसे, प्रगतशील शेतकरी श्री अशोकराव चिंते, प्रगतशील महिला शेतकरी श्रीमती मालनताई राऊत, डॉ महारूद्र घोडके, मुख्‍य विस्‍तार शिक्षण अधिकारी डॉ प्रशांत देशमुख आदींची प्रमुख उपस्थिती होती.
मार्गदर्शनात माननीय आमदार श्री अमित देशमुख पुढे म्‍हणाले की, शेतक-यांनी आपल्‍या शेतीला शेतीपुरक व्‍यवसायाची जोड दयावी. सामान्‍य शेतकरी केंद्रबिंदु ठेवुन शासनाचे कृषि धोरण पाहिजे, गाव आधारित पिक विमा योजना राबवावी लागेल. शेतमालाची आधारभुत किंमती वाढविण्‍याची गरज असुन शेतकरी आत्‍महत्‍या रोखण्‍यासाठी ठोस शासकिय धोरण आखावे लागेल. ऊसापासुन इथेनॉल व वीज निर्मितीवर भर द्यावा लागेल, साखर हा उपपदार्थ झाला पाहिजे, असे मत त्‍यांनी व्‍यक्‍त केले.
अध्‍यक्षीय भाषणात शिक्षण संचालक डॉ प्रदीप इंगोले म्‍हणाले की, परभणी कृषि विद्यापीठ विविध माध्‍यमातुन कृषि तंत्रज्ञान विस्‍ताराचे कार्य करित असुन शेतक-यांनी कृषि तंत्रज्ञानाची माहितीसाठी कृषि विद्यापीठाच्‍या शास्‍त्रज्ञांशी सातत्‍याने संपर्कात रहावे. शेतक-यांनी एकात्मिक शेती पध्‍दतीचा अवलंब करावा. गटशेतीही काळाची गरज असुन शेतमाल विक्रीसाठी शेतक-यांनी एकत्रित येण्‍याची गरज असल्‍याचे ते म्‍हणाले.
जिल्‍हा अधिक्षक कृषि अधिकारी श्री डी एस गावसाने यांनी आपल्‍या भाषणात शेतक-यांनी कृषि विभागाच्‍या विविध योजनेचा लाभ घेण्‍याचे आवाहन केले तर आत्‍माचे प्रकल्‍प संचालक डॉ डि एल जाधव यांनी शेतक-यांनी संघटित होऊन शेती करण्‍याची गरज असल्‍याचे प्रतिपादन केलेप्रगतशील शेतकरी श्री राजकुमार बिराजदार,श्री अशोकराव चिंते, महिला शेतकरी श्रीमती मालनाताई राऊत यांनीही आपले मनोगत व्‍यक्‍त केले.
कार्यक्रमाचे प्रास्‍ताविक डॉ प्रशांत देशमुख यांनी केले. सुत्रसंचालन डॉ दयानंद मोरे व डॉ जयश्री देशमुख यांनी केले तर आभार डॉ बाबासाहेब ठोंबरे यांनी मानले. तांत्रिक सत्रात हवामान बदलावर आधारीत पिक पध्‍दतीवर डॉ भगवान आसेवार, सुधारित हरभरा लागवड तंत्रज्ञानावर डॉ प्रशांत पगार, गळीत धान्‍य लागवड तंत्रज्ञानावर डॉ महारूद्र घोडके तर रबी हंगामातील किडी व्‍यवस्‍थापनावर डॉ संजय बंटेवाड आदी विद्यापीठ शास्‍त्रज्ञांनी मार्गदर्शन केले तर चर्चासत्रात विद्यापीठ शास्‍त्रज्ञांनी शेतक-यांच्‍या विविध शेतीविषयी शंकांचे निरासरण केले. तसेच तुती पिकावरील ऊझी माशीचे व्‍यवस्‍थापन या घडीपत्रिकेचे विमोचन मान्‍यवरांच्‍या हस्‍ते करण्‍यात आले तर काही निवडक शेतक-यांना विद्यापीठ विकसित विविध पिकांचे बियाणे व दोन हजार वृक्ष वाटप करण्‍यात आले. याप्रसंगी विद्यापीठ शिफारसीत तंत्रज्ञानावर आधारित व इतर संलग्‍न विभागांचे प्रदर्शनीचेही आयोजन करण्‍यात आले होते. मेळाव्यात विद्यापीठ संशोधित बियाणांची विक्रीस शेतक-यांचा मोठा प्रतिसाद होता. मेळाव्‍यास शेतकरी बांधवासह बचत गटांच्‍या शेतकरी महिलांचा उल्‍लेखनिय सहभाग होता.