Saturday, November 28, 2015

Tuesday, November 24, 2015

सुक्ष्मसिंचन व विद्राव्य खत व्यवस्थापनाबाबतचे तंत्रज्ञान शेतक-यांपर्यंत पोहोजविणे गरजेचे........माजी कुलगुरू मा. डॉ. व्ही. एम. मायंदे

कृषी अभियांत्रिकी महाविद्यालयात आयोजित राष्ट्रीय प्रशिक्षणास प्रारंभ

देशातील कृषिक्षेत्र हे सर्वात मोठे सामाजिक क्षेत्र असुन सर्वात जास्‍त रोजगार देणारा आहे. अन्‍नसुरक्षेचे उदिष्‍टे साध्‍य करण्‍यासाठी पिक उत्‍पादकता वाढविणे गरजेचे असुन त्‍यासाठी विविध शेती निविष्‍ठांचे सुनियोजीत व्‍यवस्‍थापन करावे लागेल, त्‍यातील महत्‍वाची बाब म्‍हणजे सुक्ष्‍मसिंचन व विद्राव्‍य खत व्‍यवस्‍थापन होय, असे प्रतिपादन अकोला येथील डॉ पंजाबराव कृषी विद्यापीठाचे माजी कुलगुरू मा डॉ व्ही. एम. मायंदे यांनी केले. वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातंर्गत असलेल्‍या कृषी अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालयात दि. २३ नोव्हेंबर ते २ डिसेम्बर २०१५ दरम्यान भारतीय कृषी अनुसंधान परिषद, नवी दिल्ली पुरस्कृत शेती निविष्‍ठांची वापर कार्यक्षमता वाढविण्‍यासाठी सुक्ष्मसिंचन व विद्राव्य खत व्यवस्थापन या विषयावर राष्‍ट्रीय लघुप्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात असुन या प्रशिक्षणाच्‍या उद्घाटनाप्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाच्‍या अध्यक्षस्‍थानी शिक्षण संचालक डॉ अशोक ढवण हे होते तर व्‍यासपीठावर कुलसचिव डॉ दिनकर जाधव, सहयोगी अधिष्ठाता डॉ उदय खोडके, डॉ अशोक कडाळे आदींची प्रमुख उपस्थिती होती.
माजी कुलगुरू मा डॉ व्ही. एम. मायंदे पुढे म्‍हणाले की, देशातील उपलब्‍ध पाण्‍याचा वापर घरगुती, उद्योगिक क्षेत्र, कृषिक्षेत्र आदीं बाबींसाठी प्रामुख्‍याने होतो, त्‍यातील कृषिक्षेत्रासाठी पाण्‍याची उपलब्धता कमी-कमी होत आहे. कृषिक्षेत्रासाठी उपलब्‍ध पाण्‍याचा कार्यक्षम वापरासाठी अत्‍याधुनिक सिंचन पध्‍दतीचा वापर वाढवावा लागेल. देशातील पिक रचनेत अनेक विविधता असुन त्‍यासाठी अनुकूल सुक्ष्‍मसिंचन प्रणाली व विद्राव्‍य खत व्‍यवस्‍थापनासाठी कृषि शास्‍त्रज्ञांनी संशोधन करावे. देशात व राज्‍यात सुक्ष्‍मसिंचन पध्‍दत अत्‍यंत कमी क्षेत्रावर असुन त्‍याचा वापर वाढविणे गरजेचे आहे. रासायनिक खतांतील अन्‍नद्रव्‍य कमी प्रमाणात पिकांना उपलब्ध होतात, या अन्‍नद्रव्‍यांची कार्यक्षमता वाढविण्‍यासाठी विद्राव्‍य खतांचा वापर देखिल वाढवावा लागेल. सदरिल प्रशिक्षणात अवगत केलेले सुक्ष्‍मसिंचन व विद्राव्‍य खत व्‍यवस्‍थापनाबाबतचे तंत्रज्ञान शेतक-यांपर्यंत पोहोजविण्‍याचे काम प्रशिक्षीत कृषि शास्‍त्रज्ञांनी करावे, असे आवाहन त्‍यांनी याप्रसंगी केले.
अध्‍यक्षीय समारोप शिक्षण संचालक डॉ अशोक ढवण यांनी केला तर कुलसचिव डॉ दिनकर जाधव यांनी ही आपले मनोगत व्‍यक्‍त केले. कार्यक्रमाच्‍या प्रास्‍तावि‍कात सहयोगी अधिष्ठाता डॉ उदय खोडके यांनी प्रशिक्षणाचे महत्‍व विषद केले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन प्रा. एच डब्‍ल्‍यु आवारी यांनी केले तर आभार प्रदर्शन प्रा. सुमंत जाधव यांनी केले. कार्यक्रमास प्रशिक्षणार्थी, विद्यापीठातील अधिकारी व कर्मचारी मोठया संख्‍येने उपस्थित होते.
सदरिल प्रशिक्षणात आंध्रप्रदेश, ओरिसा, कर्नाटक, मध्‍यप्रदेश, केरळ, दिल्‍ली, महा‍राष्‍ट्र आदी राज्‍यातील विविध  कृषी विद्यापीठे व कृषि संशोधन संस्थेतील शास्‍त्रज्ञ, प्राध्यापक व तंत्रज्ञ सहभागी झाले आहेत. सदरील प्रशिक्षणात सिंचन कार्यक्षमता वाढविण्‍यासाठी आधुनिक सिंचन प्रणाली, स्वयंचलित सिंचन पध्‍दती, सुक्ष्मसिंचना व्‍दारे पाणी व खतांची कार्यक्षमता वाढविणे, विविध पिकांसाठी पर्यावरण अनुकूल पाणी व खत व्यवस्थापन आदी विविध विषयावर चर्चा, प्रात्यक्षिके, प्रक्षेत्र भेटीचे आयोजन करण्‍यात आले आहे. पाणी व खतांचे उत्तम व्यवस्थापन करून दर्जेदार पिक उत्पादनात वाढ व उपलब्ध पाण्याचा कार्यक्षम वापर करून शाश्वत पिक उत्पादन यावर विशेष भर देण्‍यात येणार असुन विद्यापीठातील व इतर संस्थेतील शास्‍त्रज्ञ विविध पैलूवर मार्गदर्शन व चर्चा करणार आहे. सदरिल प्रशिक्षण विषय संचालक तथा सहयोगी अधिष्ठाता डॉ उदय खोडके यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्‍यात येत असुन यशस्‍वीतेसाठी कृषि अभियांत्रिकी महाविद्यालयाचे विभाग प्रमुख, प्राध्यापक व कर्मचारी परिश्रम घेत आहेत.

Sunday, November 22, 2015

कृषी अभियांत्रिकी महाविद्यालयात सुक्ष्मसिंचन व विद्राव्य खत व्यवस्थापनावर राष्ट्रीय प्रशिक्षणाचे आयोजन

वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातंर्गत असलेल्‍या कृषी अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालयात दि. २३ नोव्हेंबर ते २ डिसेम्बर २०१५ दरम्यान भारतीय कृषी अनुसंधान परिषद, नवी दिल्ली पुरस्कृत सुक्ष्मसिंचन व विद्राव्य खत व्यवस्थापन या विषयावर राष्‍ट्रीय लघुप्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजित करण्यात असुन प्रशिक्षण कार्यक्रमाचे उद्घाटन दि. २३ नोव्हेंबर रोजी होणार आहे. कार्यक्रमाच्‍या अध्यक्षस्‍थानी कुलगुरू मा डॉ बी. व्‍यंकटेश्वरलू राहणार असुन प्रमुख पाहुणे म्हणून अकोला येथील डॉ पंजाबराव कृषी विद्यापीठाचे माजी कुलगुरू मा डॉ व्ही. एम. मायंदे हे राहणार आहेत. शिक्षण संचालक डॉ अशोक ढवण, संशोधन संचालक डॉ दत्‍तप्रसाद वासकर,  विस्‍तार शिक्षण संचालक डॉ बी. बी. भोसले, कुलसचिव डॉ दिनकर जाधव यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे. सदरिल प्रशिक्षण विषय संचालक तथा सहयोगी अधिष्ठाता डॉ उदय खोडके यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्‍यात येत असुन यशस्‍वीतेसाठी कृषि अभियांत्रिकी महाविद्यालयाचे विभाग प्रमुख, प्राध्यापक व कर्मचारी परिश्रम घेत आहेत. प्रशिक्षणात देशातील विविध  कृषी विद्यापीठे व कृषि संशोधन संस्थेतील शास्‍त्रज्ञ, प्राध्यापक व तंत्रज्ञ सहभागी होणार आहेत. सद्य परिस्थितीत पाण्‍याच्‍या दुर्भीक्षामुळे व विकासासाठी पाण्याची विविध क्षेत्रातील मागणी वाढल्यामुळे कृषी क्षेत्रात सिंचन कार्यक्षमता वाढविणे क्रमप्राप्त झाले असुन आधुनिक सिंचन प्रणाली, स्वयंचलित सिंचन पध्‍दती, सुक्ष्म सिंचना व्‍दारे पाणी व खतांची कार्यक्षमता वाढविणे, विविध पिकांसाठी पर्यावरण अनुकूल पाणी व खत व्यवस्थापन आदी विविध विषयावर सदरील प्रशिक्षणात चर्चा, प्रात्यक्षिके, प्रक्षेत्र भेटीचे आयोजन करण्‍यात आले आहे. तसेच पाणी व खतांचे उत्तम व्यवस्थापन करून दर्जेदार पिक उत्पादनात वाढ व उपलब्ध पाण्याचा कार्यक्षम वापर करून शाश्वत पिक उत्पादन यावर विशेष भर देण्‍यात येणार आहे. प्रशिक्षणात विद्यापीठातील व इतर संस्थेतील विविध पैलूवर मार्गदर्शन व चर्चा करतील.

Friday, November 20, 2015

गृहविज्ञान महाविद्यालयातराष्‍ट्रीय एकात्‍मता दिन व जागतिक पुरूष दिन उत्‍साहात साजरा


सौजन्‍य - सहयोगी अधिष्‍ठाता तथा प्राचार्या, गृहविज्ञान महाविद्यालय, वनामकृवि, परभणी

Wednesday, November 4, 2015

तुर व हरभरा पिकावर घाटेअळीचा प्रादुर्भाव

वेळीच व्‍यवस्‍थापन करण्‍याचे वनामकृवि‍चे आवाहन


सद्यस्थितीत तुर पिक फुले शेंगा लागण्याच्या अवस्थेत असून हरभरा पिक रोप अवस्थेत आहे. तसेच मागील 7-8 दिवसापासून ढगाळ वातावरण आहे तुरीवरील घाटेअळीचे पतंग मोठया प्रमाणात आढळून येत आहेत. ही स्थिती तुर हरभऱ्यावरील घाटेअळी / शेंगा पोखणारी अळीच्या वाढीस पोषक असल्यामुळे सध्या घाटेअळीचा प्रादुर्भाव मोठया प्रमाणात आढळून येत आहे. अशातच या अळीने तुरीवरील कळया फुले फस्त करण्यास सुरुवात केली आहे. कीडींचा प्रादुर्भाव कळया, फुले लागल्यापासून शेंगापर्यंत आढळून येतो, त्यामुळे पिकांचे मोठया प्रमाणावर नुकसान होते. सध्या आढळणारी कीड ही अंडी अवस्था, प्रथम अवस्थेतील अळी असल्यामुळे वेळीच उपाय योजना केल्यास कमी खर्चात किडींचे नियंत्रण होऊ शकते. हरभऱ्यावर देखील घाटेअळीचा प्रादुर्भाव पीकाच्या कोवळया पानावर आढळून येत आहे. सुरुवातीस लहान अळया कोवळी पाने, कळया फुले कुरतडून खातात. शेवटी घाटे लागताच अळया घाटे कुरतडून त्यास छिद्र पाडतात आपले डोके आत खूपसून दाणे खातात.सदरिल किडीचे व्यवस्थापन पुढील प्रमाणे करावेहरभरा पिक एक महिण्याचे झाल्यावर पिकापेक्षा अधिक उंचीच्‍या आकाराचे प्रति हेक्टर 50 पक्षी थांबे लावावेत. पिकाच्‍या प्रति मिटर ओळीत 1 ते 2 अळया किंवा प्रति कामगंध सापळयात 8 ते 10 पतंग सतत 2 ते 3 दिवस आढळल्यास ती आर्थिक नुकसानीची पातळी समजून पुढील उपाय करावेत.- पिकास फुले येत असताना सुरुवातीच्या काळात 5 टक्के निंबोळी अर्काची प्रतिबंधात्मक फवारणी करावी.
- घाटेअळी लहान अवस्थेत असताना एच..एन.पी.व्ही. 250 एल. . विषाणूची 500 लिटर पाण्यात मिसळून प्रति हेक्‍टरी फवारणी करावी आणि त्यामध्ये राणीपाल (नीळ) 100 ग्रॅम  टाकावा.- जर कीडींचा प्रादुर्भाव आर्थिक नुकसानीच्या पातळीच्यावर आढळून आल्यास क्लोरोपायरीफॉस 20 टक्के प्रवाही 20 मि.ली. किंवा क्विनालफॉस 20 टक्के प्रवाही 20 मि.ली. प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. तसेच अळींचा प्रादुर्भाव जास्त असल्यास इमामेक्टीन बेंन्झोएट 5 टक्के 4 ग्रॅम किंवा क्लोरॅनट्रॅनीलीप्रॉल 18.5 एस सी 3 मि.ली प्रती 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. पावर स्प्रेसाठी (पेट्रोल पंप) किटकनाशकाचे प्रमाण तीनपट वापरावे. किटकनाशकाचा वापर आलटून पालटून गरज पडल्यास 10 दिवसाच्या अंतराने करावा.अशा प्रकारे हरभऱ्यावरील घाटेअळी / हेलीकोव्हर्पा अळीचे व्यवस्थापन वेळीच करण्‍याचे आवाहन विस्‍तार शिक्षण संचालक डॉ. बी. बी. भोसले कृषि कीटकशास्त्र विभागाचे विभाग प्रमुख डॉ. पी. आर. झंवर यांनी केले आहे.