Sunday, March 31, 2019

मौजे कारेगांव येथे आयोजित वनामकृवितील रासेयोच्‍या शिबिरात 102 स्‍वयंसेवकांनी केले रक्‍तदान

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठांतर्गत असलेल्‍या कृषि महाविद्यालय, कृषि अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालय, कृषि अन्‍नतंत्र महाविद्यालय व उद्यानविद्या महाविद्यालय यांच्‍या संयुक्‍त विद्यमाने राष्‍ट्रीय सेवा योजनेचे विशेष शिबीर मौजे कारेगांव येथे दिनांक 25 ते 31 मार्च दरम्‍यान आयोजित करण्‍यात आले असुन दिनांक 30 मार्च रोजी रक्‍तदान शिबिराचे आयोजन करण्‍यात आले होते. शिबिराचे उदघाटन विस्‍तार शिक्षण संचालक डॉ प्रदिप इंगोले यांच्‍या हस्‍ते करण्‍यात आले. यावेळी प्राचार्य डॉ धर्मराज गोखले, प्राचार्य डॉ उद्य खोडके, प्राचार्य डॉ ए आर सावते, रक्‍त संक्रमण अधिकारी डॉ कनकदंडे, डॉ प्रशांत देशमुख आदींची प्रमुख उपस्थिती होती.   
यावेळी मार्गदर्शन करतांना विस्‍तार शिक्षण संचालक डॉ प्रदिप इंगोले म्‍हणाले की, रासेयोच्‍या विविध उपक्रम म्‍हणजे विद्यार्थ्‍यांमध्‍ये माणुसकी निर्माण करणारी प्रक्रिया आहे. रक्‍तदानाच्‍या माध्‍यमातुन समाजासाठी आपले काहीतरी देणे लागतो ही भावना रक्‍तदात्‍यात असते असे सांगुन घेणे सारेच जाणतात, देणे शिकु या, रक्‍तदान करू या, असा संदेश दिला तर रक्‍त संक्रमण अधिकारी डॉ कनकदंडे यांनी रक्‍तदानाचे महत्‍व सांगितले. स्‍वयंसेविक तुलसी चांडक, विशाल सरवदे यांनी मनोगत व्‍यक्‍त केले. सुत्रसंचालन सिध्‍देश्‍वर शिंदे व स्‍वप्‍नील झरकर यांनी केले तर आभार कार्यक्रमाधिकारी प्रा संजय पवार यांनी मानले.
शिबिरात 102 स्‍वयंसेवक, स्‍वयंसेविका व प्राध्‍यापकांनी रक्‍तदान केले. तसेच स्‍वयंसेविक व स्‍वयंसेविकांनी गावामध्ये नारी शक्‍ती नवदुर्गा, मतदार राजा जागा हो, व्‍यसनमुक्‍ती आदीवर पथनाटय सादर करून जनजागृती करण्‍यात आली. कार्यक्रम यशस्‍वीतेसाठी कार्यक्रमाधिकारी प्रा एस पी सोळंके, प्रा व्‍ही बी जाधव, डॉ जे डी देशमुख, डॉ पी एच गौरखेडे, डॉ प्रविण घाटगे, प्रा संजय पवार, प्रा एस के सदावर्ते आदींच्‍या मार्गदर्शनाखाली स्‍वयंसे‍वकांनी परिश्रम घेतले.

Friday, March 29, 2019

सकारात्‍मक दृष्‍टीकोनच यशस्‍वी जीवनाचा पाया.....प्रा कुशाल राऊत

वनामकृवितील परभणी कृषि महाविद्यालयात दोन दिवसीय व्‍यक्‍तीमत्‍व विकास कार्यशाळा संपन्‍न
वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील परभणी कृषि महाविद्यालयाच्‍या रोजगार व समुपदेशन कक्षाच्‍या वतीने दिनांक 26 व 27 मार्च रोजी विद्यार्थ्‍यांकरिता व्‍यक्‍तीमत्‍व विकासावर दोन दिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्‍यात आले होते. सदरिल कार्यशाळेत पुणे येथील काम्‍युनीकेअर संस्‍थेचे संचालक प्रा कुशाल राऊत यांनी मार्गदर्शन केले. कार्यशाळेचे उदघाटन शिक्षण संचालक डॉ विलास पाटील यांच्या हस्ते करण्‍यात आले, यावेळी प्राचार्य डॉ धर्मराज गोखले, डॉ के व्‍ही देशमुख, डॉ पी आर झंवर, डॉ आर व्‍ही चव्‍हाण आदींची प्रमुख उपस्थिती होती.
कार्यशाळेत मार्गदर्शन करतांना प्रा कुशाल राऊत म्‍हणाले की, सकारात्‍मक दृष्‍टीकोनच यशस्‍वी जीवनाचा पाया असुन महाविद्यालयीन जीवनात जाणीवपुर्वक विद्यार्थ्‍यांनी यासाठी प्रयत्‍नशील असले पाहिजे असे सांगुन त्‍यांनी नेतृत्‍वगुण, नौकरी करिता मुलाखतीची तयारी, बायोडाटा तयार करणे, संवाद कौशल्‍य, सादरीकरण कौशल्‍य आदी विषयावर प्रात्‍यक्षिक व खेळाच्‍या माध्‍यमातुन प्रशिक्षण दिले.
अध्‍यक्षीय समारोत शिक्षण संचालक डॉ विलास पाटील यांनी जीवनात यशस्‍वीतेसाठी कोणताही शार्टकट नसतो, आपला मार्ग आपण निवडुन कठोर परिश्रम घेण्‍याचा सल्‍ला त्‍यांनी दिला. प्रास्‍ताविकात प्राचार्य डॉ धर्मराज गोखले यांनी परभणी कृषि महाविद्यालय विद्यार्थ्‍यांच्‍या व्‍यक्‍तीमत्‍व विकासासाठी कटिबध्‍द असल्‍याचे सांगितले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन डॉ एस एल बडगुजर यांनी केले. कार्यशाळेत महाविद्यालयातील विद्यार्थ्‍यी व विद्यार्थ्‍यींनी मोठया संख्‍येने उपस्थित होते.

महाविद्यालयीन युवकांनी आपली ऊर्जा सकारात्‍मक कार्यास खर्च करावी......शिक्षण संचालक डॉ विलास पाटील

मौजे कारेगांव येथे वनामकृवितील महाविद्यालयाच्‍या रासेयो विशेष शिबिर
राष्‍ट्रीय सेवा योजनेच्‍या माध्‍यमातुन विद्यार्थ्‍यांना सामाजिक प्रश्‍नांची जाण होते. महाविद्यालयीन युवकांमध्‍ये मोठी ऊर्जा असते, ती ऊर्जा सकारात्‍मक कार्यास खर्च करावी. आयुष्‍यात यशस्‍वी होण्‍यासाठी वेळेचे नियोजन करा. आपले शारिरीक व मानसिक आरोग्‍य चांगले राहण्‍यासाठी महाविद्यालयीन जीवनातच जाणीवपुर्वक प्रयत्‍न करावेत, असा सल्‍ला शिक्षण संचालक डॉ विलास पाटील यांनी दिला. वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठांतर्गत असलेल्‍या कृषि महाविद्यालय, कृषि अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालय, कृषि अन्‍नतंत्र महाविद्यालय व उद्यानविद्या महाविद्यालय यांच्‍या संयुक्‍त विद्यमाने राष्‍ट्रीय सेवा योजनेचे विशेष शिबीर मौजे कारेगांव येथे दिनांक 25 ते 31 मार्च दरम्‍यान कालावधीत आयोजित करण्‍यात आले असुन दिनांक 29 मार्च रोजी ते रोसयोच्‍या स्‍वयंसेविकांना मार्गदर्शन करतांना बोलत होते. यावेळी कृषि महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ धर्मराज गोखले, कृषि अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ उद्य गोखले, कवि राजकुमार नायक, प्रा एस पी सोळंके, प्रा व्‍ही बी जाधव, डॉ जे डी देशमुख, डॉ पी एच गौरखेडे, प्रा एस एन पवार, प्रा एस के सदावर्ते आदींची प्रमुख उपस्थिती होती.
प्राचार्य डॉ उद्य खोडके यांनी रासेयोच्‍या विविध उपक्रमामुळे स्‍वयंसेवक विद्यार्थ्‍यांना समाज जीवनाची ओळख होते असे मत व्‍यक्‍त केले तर प्राचार्य डॉ धर्मराज गोखले यांनी रासेयोमुळे विद्या‍र्थ्‍यांच्‍या व्‍यक्‍तीमत्‍व विकासास चालना मिळते असे प्रतिपादन केले.
सुत्रसंचालन प्रा विजय जाधव यांनी केले तर आभार अक्षय गोडभरले यांनी मानले. यावेळी कवि राजकुमार नायक यांनी आपल्‍या भरदार कवितां सादर केल्‍या. स्‍वयंसेविकांनी नारी शक्‍ती याविषयावर आधारित नवदुर्गा हे लघुनाटिका सादर केली तसेच स्‍वयंसेवकांनी मौजे कारेगाव येथे प्रभातफेरी काढुण स्‍वच्‍छता अभियान राबविले. कार्यक्रम यशस्‍वीतेसाठी रासेयोचे स्‍वयंसेवक व स्‍वयंसेवकांनी परिश्रम घेतले.

मौजे कारेगांव येथे वनामकृवितील महाविद्यालयाचे रासेयो विशेष शिबिराचे आयोजन

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठांतर्गत असलेल्‍या कृषि महाविद्यालय, कृषि अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालय, कृषि अन्‍नतंत्र महाविद्यालय व उद्यानविद्या महाविद्यालय यांच्‍या संयुक्‍त विद्यमाने राष्‍ट्रीय सेवा योजनेचे विशेष शिबीर मौजे कारेगांव येथे दिनांक 25 ते 31 मार्च दरम्‍यान कालावधीत आयोजित करण्‍यात आले असुन दिनांक 28 मार्च रोजी रासेयोतुन युवा शक्‍तीचा विकास याविषयावर प्रमुख वक्‍ते योगेश महाराज सेलुकर यांनी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाच्‍या अध्‍यक्षस्‍थानी कृषि महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ धर्मराज गोखले हे होते तर जिमखाना उपाध्‍यक्ष तथा विभाग प्रमुख डॉ सय्यद इस्‍माईल, शिक्षण विभागाचे प्रभारी अधिकारी डॉ आर व्‍ही चव्‍हाण, संतोष भालेराव, रासेयोचे कार्यक्रमाधिकारी प्रा. एस पी सोळंके, प्रा व्‍ही बी जाधव, डॉ जे डी देशमुख, डॉ पी एच गौरखेडे, प्रा एस एन पवार, प्रा पी यु घाटगे, प्रा एस के सदावर्ते आदींची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी मार्गदर्शन करतांना योगेश महाराज सेलुकर म्‍हणाले की, पुरातन भारतीय शिक्षण पध्‍दती विद्यार्थ्‍यी केंद्रीत होती व ही शिक्षण पध्‍दतीत विद्यार्थ्‍यांचा सर्वांगिण व्‍यक्‍तीमत्‍व विकासास पुरक होती. अध्‍यक्षीय समारोप प्राचार्य डॉ धर्मराज गोखले यांनी केले. सुत्रसंचालन धनश्री जोशी व दिपाली जाधव यांनी केले तर आभार विशाल सरवदे यांनी केले. कार्यक्रम यशस्‍वीतेसाठी रासेयोचे स्‍वयंसेवक व स्‍वयंसेवका अच्‍युत पिल्लेवाड, कृष्‍णा शिंदे, येशे अमिल, नितेश वैद्य, कृष्‍णा उफाड, मेघा कोहुरवार, पुजा जाधव, तुलसी चांडक, स्‍वप्‍नील झरकर, सिध्‍देश्‍वर शिंदे, तुकाराम चव्‍हाण, पल्‍लवी बोबडे आदींनी परिश्रम घेतले.

वनामकृविच्‍या औरंगाबाद येथील कृषि विज्ञान केंद्र येथे दुग्ध प्रक्रिया प्रशिक्षण संपन्‍न

औरंगाबाद: वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठांतर्गत असलेल्‍या औरंगाबाद येथील कृषि विज्ञान केंद्र व आत्‍मा औरंगाबाद यांच्‍या संयुक्‍त विद्यमानाने कृषि विज्ञान केंद्रात दिनांक 27 ते 29 मार्च दरम्‍यान दुग्ध प्रक्रिया विषयाचे तीन दिवसीय प्रशिक्षण कार्यक्रम संपन्‍न झाला, यात मौजे आंबेगांव (ता गंगापुर, जि औरंगाबाद) येथील महिला बचत गटातील 20 महिलांनी सहभाग नोंदविला. दि 29 मार्च रोजी प्रशिक्षणार्थींना प्रमाणपत्र वितरण करण्‍यात आले. यावेळी कार्यक्रम समन्‍वयक प्रा दिप्‍ती पाटगांवकर यांनी महिलांनी दुध प्रक्रिया पदार्थ बनवुन गटामार्फत विक्री करण्‍याचे आवाहन केले तर आत्‍मा प्रकल्‍प उपसंचालक श्री पी बी आव्‍हाळे यांनी महिलांनी दैनंदिन जीवनात आवश्‍यक असणारे दही, ताक, तुप याची निर्मिती करून व योग्य त्‍या लायसन्‍स काढुन पदार्थ विक्री करावी असा सल्‍ला देऊन आत्‍मा अंतर्गत विविध उपक्रमांची माहिती दिली. 
प्रशिक्षणात दुग्ध व्‍यवसाय सुरू करण्‍यासाठी प्रस्‍ताव तयार करणे, व्‍यवसायासाठी लागणारे विविध परवाणे, यंत्रसामग्री, पदार्थ्‍यांची पॅकींग, विविध भारतीय दुधजन्‍य पदार्थ्‍यांची निर्मितीचे प्रशिक्षण देण्‍यात आले. तसेच टंचाई परिस्थितीत पशु व्‍यवस्‍थापनात हायड्रोपोनिक्‍स अॅझोला, चारा प्रक्रिया आदी विषयावर प्रशिक्षण समन्‍वयक डॉ अनिता जिंतुरकर यांनी मार्गदर्शन केले. एमआयटी अन्‍नतंत्र महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ अशोक रोडगे यांनी महिलांसाठी उपयुक्‍त दुध प्रक्रिया उपक्रमांची माहिती देऊन एमआयटी केयर्स येथे भेटीचे नियोजन केले. पॅकिंग, रेडींग, खवा मशीन, कुल्‍फी मशीन यावर प्रा स्‍नेहल पांडे, प्रा श्रृतीका देव, प्रा प्रविण वैरागर आदींनी मार्गदर्शन केले.

Saturday, March 23, 2019

बालवयातच वैज्ञानिक दृष्टीकोन विकासित करण्याची गरज.....कुलगुरू मा. डॉ अशोक ढवण

वनामकृवित जागतिक हवामान दिन साजरा, हवामान विषयक प्रदर्शनीस शालेय विद्यार्थ्‍यांचा मोठा प्रतिसाद

बदलते हवामान, तापमानातील वाढ याचा शेती व सर्वसामान्‍याच्‍या जीवनावर परिणाम होत आहे. हवामानाविषयी भावीपिढीत जनजागृती करावी लागेल. बालवयातच वैज्ञानिक दृष्‍टीकोन विकासित करण्‍याची गरज असल्‍याचे प्रतिपादन कुलगुरू मा डॉ अशोक ढवण यांनी केले. वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील कृषि हवामानशास्‍त्र संशोधन प्रकल्‍पांतर्गत ग्रामीण कृषि मौसम सेवा कार्यक्रम व परभणी अॅस्‍ट्रोनॉमिकल सोसायटी यांच्‍या संयुक्‍त विद्यमाने जागतिक हवामान दिनानिमित्‍त दिनांक 23 मार्च रोजी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. व्‍यासपीठावर मुख्‍य प्रकल्‍प समन्‍वयक डॉ कैलास डाखोरे, उपशिक्षणाधिकारी श्री विठ्ठल भुसारे, प्रसिध्‍द -हद्यरोग तज्ञ डॉ रामेश्‍वर नाईक, डॉ राजेश कदम, डॉ एम जी जाधव, डॉ डि एम नाईक आदींची प्रमुख उपस्थिती होती.
कुलगुरू मा डॉ अशोक ढवण पुढे म्‍हणाले की, भारतीय समाजात ग्रहणे व खगोलशास्‍त्रीय इतर घडामोडीबाबत अनेक अंधश्रध्‍दा आहेत, त्‍या विज्ञानाच्‍या आधारे दुर केल्‍या पाहिजेत. विज्ञान व संशोधन क्षेत्रात डॉ अब्‍दुल कलाम, डॉ जयंत नारळीकर यांच्‍या सारख्‍या अनेक शास्‍त्रज्ञांनी मोठे योगदान दिले असुन अशा शास्‍त्रज्ञांचा वारसा आपण जपला पाहिजे. शेतीच्‍या दृष्‍टीने अचुक हवामान अंदाजास मोठे महत्‍व आहे, हवामान अंदाजात अचुकता आणण्‍यासाठी हवामानातील विविध बाबींची अचुक नोंदी घेणे गरजेचे असल्‍याचे मत त्‍यांनी व्‍यक्‍त केले
उपशिक्षणाधिकारी श्री विठठल भुसारे यांनी भाषणात कृषि विद्यापीठाचे कृषि हवामान व कृषि सल्‍लाचा शेतक-यांना मोठा उपयोग होत असल्‍याचे सांगितले तर डॉ.कैलास डाखोरे यांनी हवामान विषयक प्रदर्शनीमुळे शालेय विद्यार्थ्‍यांना प्रेरणा प्राप्‍त होईल असे प्रतिपादन केले.
प्रास्‍ताविकात डॉ रामेश्‍वर नाईक यांनी परभणी अॅस्‍ट्रोनॉमिकल सोसायटी समाजात शास्‍त्रीय दृष्‍टीकोन विकसित करण्‍यासाठी जनजागृती कार्यक्रम वेळोवेळी आयोजित करीत असल्‍याचे सांगितले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन सुधीर सोनुनकर यांनी केले तर आभार प्रमोद शिंदे यांनी मानले
यानिमित्‍त आयोजित प्रदर्शनीत हवामान वेधशाळेशी निगडीत उपकरणे मांडण्‍यात आली होती तसेच परभणी शहरातील शाळेतील विद्यार्थ्‍यीनी हवामानाशी निगडित हवामान, जलचक्र, तापमान, तापमापी, प्रदुषण, ग्‍लोबल वार्मिंग, रिमोट सेन्सिंग सॅटेलाईट, सोलार रेडिएशन, सौर ऊर्जा आदी विषयावर प्रयोगाचे सादरीकरण केलेउत्कृष्ट सादरीकरण केलेल्या विध्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. 
कार्यक्रमात विद्यार्थ्‍यी व शास्‍त्रज्ञ संवाद हवामान तज्ञांनी विद्यार्थ्‍यांच्‍या हवामान विषयक विविध प्रश्‍नांची उत्‍तरे दिली. कार्यक्रमास शहरातील शालेय विद्यार्थ्‍यांनी व नागरिकांनी मोठा प्रतिसाद दिला.  
सदरिल कार्यक्रमाचे आयोजन मुख्‍य प्रकल्‍प समन्‍वयक डॉ कैलास डाखोरे, डॉ रामेश्‍वर नाईक, सुधीर सोनुनकर, प्रसन्‍न भावसार, डॉ सुधीर मोडक, डॉ केदार खटींग, डॉ राजेश मंत्री, डॉ विजयकिरण नरवाडे, डॉ पी आर पाटील, डॉ रणजित लाड, डॉ जगदिश नाईक, ओम तलरेजा, अशोक लाड, प्रसाद वाघमारे, दिपक शिंदे आदींच्‍या पुढाकारांनी करण्‍यात आले होते
पारितोषिके प्राप्‍त विद्यार्थ्‍यी व प्रयोग
प्रथम पारितोषिक पिक वाचवा प्रयोगासाठी ओयॉसीस विद्यालयाची श्रुतीका गडेकर हिने पटकाविले तर तापमापक व आर्हतामापक यंत्र प्रयोगासाठी ओयॉसीस इंग्लीश स्‍कुलचा पार्थ दराडे याने व्दितीय तर तृतीय पारितोषिक रिमोट सेंग्‍सींग सॅटेलॉईट प्रयोगासाठी संस्‍कृती विद्यानिकेतनचे कल्‍पेश पत्‍की व कल्‍पना पत्‍की यांनी पटकाविले. 
कार्यक्रम यशस्‍वीतेसाठी डॉ बालाजी कोंडरे, विनोद मुलगीर, प्रा मोहन लोहट, मदन चंदेल, विठ्ठल कच्‍छवे, ए आर शेख, दत्‍तात्र कुलकर्णी, यादव कदम, अशोक निर्वळ, पांडुरंग कानडे आदींनी परिश्रम घेतले. 

Friday, March 22, 2019

वनामकृवित जागतिक हवामान दिनानिमित्‍त शालेय विद्यार्थ्‍यांसाठी हवामान विषयक प्रदर्शनीचे आयोजन

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील कृषि हवामानशास्‍त्र संशोधन प्रकल्‍पांतर्गत ग्रामीण कृषि मौसम सेवा कार्यक्रम व परभणी अॅस्‍ट्रोनॉमिकल सोसायटी यांच्‍या संयुक्‍त विद्यमाने जागतिक हवामान दिनानिमित्‍त शालेय विद्यार्थ्‍यांसाठी हवामान विषयक प्रदर्शनीचे आयोजन दिनांक 23 मार्च रोजी मध्‍यवर्ती विद्यापीठ संग्रहालयात सकाळी 10.00 ते दुपारी 4.00 दरम्‍यान करण्‍यात आले आहे. प्रदर्शनीचे उदघाटन कुलगुरू मा. डॉ अशोक ढवण यांच्‍या हस्‍ते होणार असुन शिक्षण संचालक डॉ विलास पाटील यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे. प्रदर्शनीत हवामान वेधशाळेशी निगडीत उपकरणे व प्रयोगाचा समावेश राहणार आहे. यात परभणी शहरातील शाळेतील विद्यार्थ्‍यी हवामानाशी निगडित हवामान, जलचक्र, तापमान, तापमापी, प्रदुषण, ग्‍लोबल वार्मिंग, रिमोट सेन्सिंग सॅटेलाईट, सोलार रेडिएशन, सौर ऊर्जा आदी विषयावर प्रयोगाचे सादरीकरण करणार असुन तसेच हवामान तज्ञ विद्यार्थ्‍यांच्‍या हवामान विषयक प्रश्‍नांची उत्‍तरे देणार आहेत. सदरिल प्रदर्शनीचा लाभ जास्‍तीच जास्‍त शालेय विद्यार्थ्‍यांनी घेण्‍याचे आवाहन विद्यापीठातील ग्रामीण कृषि मौसम सेवा प्रकल्‍प व परभणी अॅस्‍ट्रोनॉमिकल सोसायटी यांच्‍या वतीने करण्‍यात आले आहे.
सदरिल कार्यक्रमाचे आयोजन मुख्‍य प्रकल्‍प समन्‍वयक डॉ कैलास डाखोरे, डॉ रामेश्‍वर नाईक, सुधीर सोननकर, प्रसन्‍न भावसार, डॉ सुधीर मोडक, डॉ केदार खटींग, डॉ राजेश मंत्री, डॉ विजयकिरण नरवाडे, डॉ पी आर पाटील, डॉ रणजित लाड, डॉ जगदिश नाईक, ओम तलरेजा, अशोक लाड, प्रसाद वाघमारे, दिपक शिंदे आदींच्‍या पुढाकारांनी करण्‍यात आले आहे.

Tuesday, March 19, 2019

मौजे पेठशिवणी येथे तुती रेशीम उद्योग प्रात्यक्षिक प्रशिक्षण कार्यक्रम संपन्न

परभणी आत्मा (कृषि विभाग) आणि वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील रेशीम संशोधन योजना यांच्या संयुक्त विद्यमाने मौजे पेठशिवणी (ता. पालम जि. परभणी) येथे दिनांक 16 मार्च रोजी तुती रेशीम उद्योग प्रात्यक्षिक प्रशिक्षण कार्यक्रम संपन्‍न झाला. मौजे पेठशिवणी येथील शेतकरी श्री. हारीभाऊ कंजाळकर यांचे शेतावर हे प्रात्यक्षिक दाखवण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सरपंच अनंतराव करंजे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून नाबार्डचे विभागीय व्यवस्थापक पी. एम. जंगम, पालम पंचायत समितीचे सभापती प्रशांत वाडेवाले, माजी सरपंच विनायक वाडेवाले, रेशीम संशोधन योजनेचे प्रभारी अधिकारी डॉ. सी. बी. लटपटे आदींची उपस्थिती होती.  
नाबार्डचे विभागीय व्यवस्थापक श्री. पी. एम. जंगम यांनी आपल्‍या भाषणात शेतकरी उत्‍पादक कंपन्‍या स्‍थापन करून रेशीम कोषापासुन धागा निर्मिती करण्‍यासाठी नाबार्ड बॅकेकडे प्रकल्प सादर केल्यास जिल्हयात सर्वतोपरी सहकार्य आश्‍वासन दिले. मार्गदर्शनात रेशीम संशोधन योजनेचे प्रभारी अधिकारी डॉ. सी. बी. लटपटे म्‍हणाले की, कृषि विद्यापीठ, जिल्हा रेशीम कार्यालयात किंवा ग्रामीण स्वयंरोजगार प्रशिक्षण संस्था मार्फत आयोजित करण्‍यात येणा-यात रेशीम उद्योगाचे प्रशिक्षणात सहभाग घेऊन तुती लागवड व दर्जेदार उत्पादन कौशल्य आत्मसात करण्‍याचा सल्‍ला दिला. 
कार्यक्रमास रमेश शिनगारे, रावसाहेब शिनगारे, रूपेश शिनगारे, चेअरमन बालाजी वाडेवाले, नारायण कंजाळकर, हरिश्चंद्र ढगे आदीसह रेशीम उद्योजक शेतकरी मोठया संख्‍येने उपस्थित होते.

वनामकृवितील एलपीपी स्कुलचा दीक्षांत समारंभ थाटात संपन्न

 

सौजन्‍य
विभाग प्रमुख, मानव विकास व अभ्‍यास विभाग
सामुदायिक विज्ञान महाविद्यालय
वनामकृवि, परभणी

Saturday, March 16, 2019

वनामकृवित काचबिंदु जनजागृती अभियानांतर्गत नेत्र तपासणी

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठात महाराष्‍ट्र नेत्रतज्ञ संघटनाच्‍या वतीने काचबिंदु जनजागृती अभियानांतर्गत नेत्र तपासणी मोहिम दिनांक 16 मार्च रोजी राबविण्‍यात आली. यावेळी संशोधन संचालक डॉ दत्‍तप्रसाद वासकर, कुलसचिव श्री रणजित पाटील, डॉ संजय टाकळकर, डॉ संदीप वानखेडे, डॉ विजय शेळके, डॉ अर्जना गोरे, डॉ कल्‍पना मुंदडा, डॉ धनश्री वानखेडे आदींची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी काचबिंदुबाबत मार्गदर्शन करतांना डॉ संजय टाकळकर यांनी नियमित नेत्र तपासणी करण्‍याचा सल्‍ला दिला तसेच डॉ दत्‍तप्रसाद वासकर यांनीही मार्गदर्शन केले. कार्यक्रमात उपस्थित नेत्रतज्ञांनी विद्यापीठातील शंभरपेक्षा जास्‍त अधिकारी व कर्मचारी यांच्‍या डोळयांची तपासणी केली.

Friday, March 15, 2019

वनामकविच्‍या सामुदायिक विज्ञान महाविद्यालयात ‘जागतिक ग्राहक हक्क दिन’ साजरा

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातंर्गत असलेल्‍या सामुदायिक विज्ञान महाविद्यालयातील साधनसंपत्ती व्यवस्थापन आणि ग्राहक विज्ञान विभागाच्या वतीने दिनांक 15 मार्च रोजी जागतिक ग्राहक हक्क दिन साजरा करण्‍यात आला. यानिमित्त ग्राहक जागृतीच्‍या हेतुने वस्तू व सेवाकरया विषयावर परभणी येथील नामांकित सनदी लेखापाल श्री अरविंद निर्मळ यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. मार्गदर्शनात श्री अरविंद निर्मळ यांनी वस्तू व सेवाकरप्रणाली विषयी प्रत्येक ग्राहकांनी जागरुक राहणे आवश्‍यअसल्‍याचे सांगुन जीएसटी करप्रणाली बाबत सविस्‍तर माहिती दिली. कार्यक्रमाच्‍या अध्यक्षस्थानी प्राचार्या डॉ. हेमांगिनी सरंबेकर या होत्‍या. प्रमुख व्यक्त्यांचा परिचय डॉ. जयश्री रोडगे यांनी करुन दिला. सुत्रसंचलन डॉ. माधुरी कुलकर्णी यांनी केले तर आभार डॉ. जयश्री झेंड यांनी मानले. कार्यक्रमास महाविद्यालयातील प्राध्यापक, कर्मचारी व विद्यार्थी मोठया संख्येने उपस्थित होते.

Tuesday, March 12, 2019

दुष्‍काळ पार्श्‍वभुमीवर फळबाग वाचविण्‍याचे फळ उत्पादक शेतकरी बांधवापुढे मोठे आव्‍हान....कुलगुरू मा डॉ अशोक ढवण

वनामकृवि अंतर्गत असलेल्‍या मराठवाडयातील कृषि विज्ञान केंद्राची वार्षिक कृती आराखडा कार्यशाळा संपन्‍न 
परभणी : मराठवाडयातील आठही जिल्‍हयातील कृषि विज्ञान केंद्र कृषि विस्‍ताराचे कार्य चांगल्‍या पध्‍दतीने करित आहेत. सद्याच्‍या दुष्‍काळ पार्श्‍वभुमीवर फळबाग वाचविण्‍याचा मोठा प्रश्‍न शेतकरी बांधवापुढे असुन फळबाग वाचविण्‍याचे विद्यापीठाकडे उपलब्‍ध तंत्रज्ञान जास्‍तीत जास्‍त शेतक-यांपर्यंत पोहोचविण्‍याचा प्रयत्‍न विषय तज्ञांनी करावा, असा सल्‍ला कुलगुरू मा डॉ अशोक ढवण यांनी दिला. वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठांतर्गत असलेल्‍या मराठवाडयातील कृषि विज्ञान केंद्राच्‍या दिनांक १२ मार्च रोजी आयोजित वार्षिक कृती आराखडा कार्यशाळेच्‍या उदघाटन प्रसंगी ते बोलत होते. व्‍यासपीठावर शिक्षण संचालक डॉ विलास पाटील, संशोधन संचालक डॉ दत्‍तप्रसाद वासकर, विस्‍तार शिक्षण संचालक डॉ प्रदिप इंगोले, मुख्‍य विस्‍तार शिक्षण अधिकारी डॉ प्रशांत देशमुख आदींची प्रमुख उपस्थिती होती.
कुलगुरू मा डॉ अशोक ढवण पुढे म्‍हणाले की, गेल्‍या वर्षी परभणी कृषि विद्यापीठ व कृषि विभाग यांच्‍या वतीने राबविण्‍यात आलेल्‍या कपाशीवरील गुलाबी बोंडअळी व्‍यवस्‍थापन तंत्रज्ञान प्रसार मोहिमेमुळे शेतकरी कमी खर्चात गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव रोखु शकले, याचा फायदा शेतक-यांना निश्चितच झाला. येणा-या हंगामात विद्यापीठ विकसित कपाशीचा नांदेड-४४ वाण बीटी स्‍वरूपात मर्यादीत प्रमाणात उपलब्‍ध होणार आहे, कृषि विज्ञान केंद्रांनी या वाणाचे प्रात्‍य‍ाक्षिके घेऊन बाजारात उपलब्‍ध इतर वाणांशी तुलनात्‍मक अभ्‍यास करावा. भावीकाळात विद्यापीठ विकसित बीटी वाणाच्‍या बाजारातील उपलब्‍धतेमुळे कपाशीच्‍या बियाण्‍याचे भाव योग्‍य पातळीवर राखण्‍यास मदत होणार आहे, असे मत त्‍यांनी व्‍यक्‍त केले.   
संशोधन संचालक डॉ दत्‍तप्रसाद वासकर म्‍हणाले की, शेततळयातील पाण्‍याचे बाष्‍पीभवन रोखण्‍यासाठी सिटाईल अल्‍कोहोल वापरण्‍याची विद्यापीठ तंत्रज्ञान शिफारस शेतक-यांसाठी उपयुक्‍त असल्‍याचे सांगितले तर शिक्षण संचालक डॉ विलास पाटील यांनी कृषि विज्ञान केंद्रांनी शेतक-यांच्‍या सामाजिक व आर्थिक उन्‍नतीसाठी कार्य करित असल्‍याचे मत व्‍यक्‍त केले.
कार्यक्रमात मान्‍यवरांच्‍या हस्‍ते विद्यापीठाची कृषि दैनदिनी २०१९ चे विमोचन करण्‍यात आले. प्रास्‍ताविक विस्‍तार शिक्षण संचालक डॉ प्रदिप इंगोले यांनी केले तर सुत्रसंचालन डॉ प्रशांत देशमुख यांनी केले. कार्यशाळेत विद्यापीठ शास्‍त्रज्ञ व विविध विभागाचे प्रमुख यांनी मार्गदर्शन केले. कार्यशाळेत मराठवाडयातील बारा कृषि विज्ञान केंद्रातील कार्यक्रम समन्‍वयक व विषय विशेषतज्ञांनी सहभाग नोंदविला होता, यात कृषि विज्ञान केंद्राचा वार्षिक कृती आराखडा निश्चित करण्‍यात आला.  

Saturday, March 9, 2019

चांगुलपणा हा व्यक्तीचा उपजत गुण असतो, तो जपला पाहिजे......गुप्तचर विभागाचे पोलिस उपायुक्‍त मा श्री निसार तांबोळी

परभणी कृषि महाविद्यालयाचेे माजी विद्यार्थ्‍यी मा श्री निसार तांबोळी यांनी साधला मुक्‍त संवाद
चांगुलपणा हा व्यक्तीचा उपजत गुण असतो, तो जपला पाहिजे. महाविद्यालयीन जीवनातच जाणिवपुर्वक चांगल्‍या सवयी लावुन घ्‍या, त्‍याच आधारे आयुष्‍यात यशस्‍वी व्‍हाल. चांगला मित्र, चांगला भाऊ, चांगला मुलगा तसेच चांगला व्‍यक्‍ती बना, असा सल्‍ला परभणी कृषि महाविद्यालयाचे माजी विद्यार्थ्‍यी तथा गुप्तचर विभागाचे पोलिस उपायुक्‍त मा श्री निसार तांबोळी यांनी केले. वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील परभणी कृषि महाविद्यालयाच्‍या रोजगार व समुदेशन कक्षाच्‍या वतीने दिनांक 9 मार्च रोजी महाविद्यालयाचे माजी विद्यार्थ्‍यी तथा गुप्तचर विभागाचे मुंबई पोलिस उपायुक्‍त मा श्री निसार तांबोळी यांच्‍या व्‍याख्‍यानाचे आयोजन करण्‍यात आले होते, त्‍या प्रसंगी ते बोलत होते, कार्यक्रमाच्‍या अध्‍यक्षस्‍थानी प्राचार्य डॉ धर्मराज गोखले हे होते तर व्‍यासपीठावर मुख्‍य वसतीगृह अधिक्षक डॉ राजेश कदम, डॉ रणजित चव्‍हाण, डॉ एस एल बडगुजर आदींची प्रमुख उपस्थिती होती.
मा श्री निसार तांबोळी पुढे म्‍हणाले की, प्रामाणिकपणा अंगी असल्‍यास आपल्‍या विचारात व बोलण्‍यात स्‍पष्‍टता येते, तोच यशस्‍वी जीवनाचा खरा पाया असतो. गुरूजंनाचा व मोठयांचा आदर राखा. विद्यार्थ्‍यांना करिअरच्‍या दृष्‍टीने आज विविध क्षेत्रात संधी आहेत, परंतु आपल्‍या आवडीचे क्षेत्राची निवड केली तरच आयुष्‍यात समाधानी राहाल, ते क्षेत्र स्‍वयंरोजगाराचे असले तरी चालले, असे सांगुन त्‍यांनी आपल्‍या महाविद्यालयीन आठवणींना उजळा दिला. यावेळी त्यांनी उपस्थित विद्यार्थ्‍यांनी स्‍पर्धा परिक्षा व करिअरच्‍या दृष्‍टीने विचारलेल्‍या प्रश्‍न व शंकाचे मुक्‍त संवादाच्‍या माध्‍यमातुन समाधान केले.   
अध्‍यक्षीय भाषणात प्राचार्य डॉ धर्मराज गोखले म्‍हणाले की, परभणी कृषि महाविद्यालयातील अनेक माजी विद्यार्थ्‍यी संषर्घपुर्ण परिस्थितीत घडले असुन विविध क्षेत्रात यशस्‍वी झाले आहेत, त्‍यांचे अनुभव आजच्‍या विद्यार्थ्‍यांसाठी प्रेरणादायी ठरतात. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन डॉ एस एल बडगुजर यांनी केले तर आभार प्रा विजय जाधव यांनी मानले. कार्यक्रमास विद्यापीठातील प्राध्‍यापक, कर्मचारी व विद्यार्थ्‍यी मोठया संख्‍येने उपस्थित होते.

स्त्रियांचा आदर करणे हीच भारतीय संस्कृती......... प्रसिध्‍द स्‍त्रीरोग तज्ञ तथा ज्येष्ठ कवयत्री डॉ.वृषाली किन्हाळकर

वनामकृवि अंतर्गत लातूर येथील कृषि महाविद्यालयात जागतिक महिला दिन साजरा 

लातूर : स्त्रियांचा आदर करणे हीच भारतीय संस्कृती आहे, परंतु आज समाजात स्‍त्रीयांकडे पा‍हाण्‍याचा नकारात्‍मक दृष्‍टीकोन बदलणे आवश्यक आहे. युवक-युवतीमध्ये योग्य शिक्षणातून अहंकार दुर करून स्‍त्री-पुरूष समानतेचे ध्‍येय आपण प्राप्‍त करू शकतो, असे प्रतिपादन प्रसिध्‍द स्‍त्रीरोग तज्ञ तथा ज्येष्ठ कवयत्री मा. डॉ. वृषाली किन्हाळकर यांनी केले. वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ अंतर्गत असलेल्‍या लातुर येथील कृषि महाविद्यालयात दिनांक 8 मार्च रोजी जागतिक महिला दिनानिमित्त आयोजित व्यक्तीमत्व विकास कार्यक्रमांतर्गत मार्गदर्शन करतांना त्‍या बोलत होत्‍या. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शिक्षण संचालक तथा अधिष्ठाता डॉ. विलास पाटील होते तर डॉ. शुभदा रेड्डी, अॅड. रजनी गिरवलकर, प्राचार्य डॉ. बाबासाहेब ठोंबरे, प्राचार्य डॉ. भागवत इंदूलकर, प्राचार्य डॉ. हेमंत पाटील, जिमखाणा उपाध्‍यक्ष डॉ. अरुण कदम, डॉ. शरद शेटगार आदींची प्रमुख उपस्थिती होती.
अध्यक्षीय समारोपात शिक्षण संचालक डॉ.विलास पाटील म्हणाले की, कृषि शिक्षणात मुलींचा टक्का वाढत असून एकाग्रता व कष्ट करण्‍यात नियमीतता या बळावर त्या नौकरी मिळविण्‍यातही अग्रेसर आहेत. केंद्रीय अधिस्‍वीकृ‍ती व मुल्‍यांकन समितीने लातूर कृषि महाविद्यालयास मुल्यांकनात अ दर्जा दिला असून याचे श्रेय शिक्षण, संशोधन व विस्तार कार्यात हिरीरीने कार्य करणारे प्राध्यापक, अधिकारी व कर्मचारी यांनाच जाते असे, प्रसंगोदगार त्‍यांनी काढले.
कार्यक्रामाचे प्रास्ताविक सहयोगी अधिष्ठाता तथा प्राचार्य डॉ. बाबासाहेब ठोंबरे यांनी केले. सुत्रसंचालन डॉ. ज्योती देशमुख यांनी केले तर आभार डॉ. सुनिता मगर यांनी मानले. कार्यक्रमासाठी प्राध्यापक, अधिकारी, कर्मचारी, मजुर, विद्यार्थीनी व विद्यार्थी मोठया संख्येने उपस्थित होते.

Wednesday, March 6, 2019

मृदाशास्‍त्रज्ञ कै. डॉ. गंगाराम रुद्राक्ष स्मृती प्रित्यर्थ रोख पारितोषिक

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील मृद विज्ञान व कृषि रसायनशास्त्र विभागातील मृदाशास्‍त्रज्ञ कै डॉ. गंगाराम भगवंतराव रुद्राक्ष यांच्या स्मृतीप्रित्यर्थ मृद विज्ञान व कृषि रसायनशास्त्र विभागातुन आचार्य पदवीत गुणानुक्रमे सर्वप्रथम येणाऱ्या विद्यार्थ्यास रोख पारितोषिक देण्‍यासाठी त्‍यांच्या कुटुंबीयाच्या वतीने त्‍यांच्‍या पत्‍नी श्रीमती विजया गंगाराम रुद्राक्ष यांनी एक लाख रुपयाचा धनादेश दिनांक 6 मार्च रोजी कुलगुरु मा. डॉ. अशोक ढवण यांना सुपूर्द केला.  या रकमेवर येणार्या व्याजामधुन रोख पारितोषिक देण्यात येणार आहे. याप्रसंगी संचालक शिक्षण डॉ विलास पाटील, प्राचार्य डॉ डी एन गोखले, विभाग प्रमुख डॉ सय्यद इस्माईल, सतीश रुद्राक्ष, अमर रुद्राक्ष आदीची उपस्थिती होती. यावेळी कुलगुरु मा डॉ अशोक ढवण यांनी कै. डॉ. गंगाराम रुद्राक्ष यांनी मृद विज्ञान विभागास आपल्‍या कार्यकाळात मोठे योगदान दिले असल्‍याचे सांगुन भावी मृदाशास्‍त्रज्ञांना कै डॉ. रुद्राक्ष यांच्‍या स्‍मृतीप्रित्‍यर्थ पारितोषिकाच्‍या रूपाने सतत प्रेरणा मिळेल असे मत व्‍यक्‍त केले तर डॉ. विलास पाटील यांनी कै डॉ रुद्राक्ष कार्यतत्पर व्‍यक्‍तीमत्‍व होते असे सांगितले. यावेळी ज्येष्ठ अंतरराष्ट्रीय मृदा शास्त्रज्ञ कै डॉ. जशवंत सिंह कनवर यांनाही श्रंध्दांजली अर्पण करण्यात आली. कार्यक्रमास डॉ. प्रविण वैद्य, डॅा. अनिल धमक, डॉ. सुरेश वाईकर, डॉ. महेश देशमुख, डॉ. रामप्रसाद खंदारे, डॉ. सदाशिव अडकीणे, श्री अनिल मोरे, श्रीमती दीपाली सवंडकर, श्री भानुदास इंगोले, श्रीमती संगीता महावलकर आदींची उपस्थिती होती.

मौजे बाभुळगाव व उजळंबा येथील हवामान बदलानुरुप राष्ट्रीय कृषि उपक्रमास प्रमुख शास्त्रज्ञ (कृषिविद्या) डॉ. एम. उस्मान यांची भेट

हैद्राबाद येथील केंद्रीय कोरडवाहू संशोधन संस्था वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील अखिल भारतीय कोरडवाहू शेती संशोधन केंद्राच्‍या वतीने हवामान बदलानुरुप राष्ट्रीय कृषि उपक्रम (निक्रा) मौजे बाभुळगाव उजळंबा येथील शेतकऱ्यांच्या शेतावर राबविण्यात येत आहे. बदलत्या हवामानास अनुकूल कोरडवाहू शेतीच्या आधुनिक तंत्रज्ञानाचे प्रात्यक्षिके शेतकऱ्यांच्या शेतावर प्रायोगिक स्वरुपात घेण्यात येत आहेत, यात प्रामुख्याने हवामान बदलास अनुकूल पीक पीकपध्दती, आंतरपीक पध्दती, जल मृदसंधारण, आपत्कालीन परिस्थितीत पिकांचे नियोजन, चारापिक प्रात्यक्षीक आदीं संशोधनात्मक बाबींवर प्रात्याक्षिके शेतकऱ्यांच्या शेतावर घेण्यात आली आहेत. या प्रात्‍यक्षिकास हैद्राबाद येथील केंद्रीय कोरडवाहू शेती सशोधन केंद्राचे प्रमुख शास्त्रज्ञ (कृषिविद्या) डॉ. मोहम्मद स्‍मा यांनी नुकतीच भेट दिली. यावेळी त्यांनी शेतकऱ्यांच्या शेतावरील हरितगृह, रेशीमशेती, शेततळी, विहीर कुपनलिका पुनर्भरण प्रात्यक्षिक आदी उपक्रमांची पाहणी करुन शेतकऱ्यांशी संवाद साधला. सदर भेटी दरम्यान डॉ. उस्मान यांनी उपस्थित शेतक-यांना मार्गदर्शन करून शेतकऱ्यांच्या शेतावर राबविण्यात येणाऱ्या तंत्रज्ञानाबद्दल समाधान व्यक्त केले. यावेळी मुख्यशास्त्रज्ञ डॉ. भगवान आसेवार, वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. मदन पेंडके, वरिष्ठ संशोधन सहाय्यक आर. बी. परिहार, कृषि सहाय्यक सारिका नारळे, वरिष्ठ संशोधन सहयोगी डॉ. हनुमान गरुड, बाभुळगाव येथील प्रगतशील शेतकरी श्री. माऊली पारधे उजळंबा येथील श्री. राजेभाऊ रगड आदींसह शेतकरी मोठया संख्‍येने उपस्थित होते.