Monday, February 28, 2022

भविष्‍यात परभणी जिल्‍हा विज्ञानाची राजधानी होईल ...... जिल्‍हाधिकारी मा श्रीमती आंचल गोयल

राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त विज्ञानवारी कार्यक्रमास शालेय विद्यार्थ्‍यांचा भरभरून प्रतिसाद

वनामकृवि आणि परभणी अस्‍ट्रोनोमिकल सोसायटी यांचा संयुक्‍त उपक्रम

प्रत्येक नागरिकांनी वैज्ञानिक वृत्ती जोपासली पाहिजे, असे भारतीय राज्यघटनेतील मूलभूत कर्तव्यात नमुद केले आहे. विज्ञानाशिवाय मानवाचे अस्तित्‍व नाही, विज्ञानापुढे आपण जाऊ शकत नाही. कोरोना महामारी मध्‍ये विज्ञानाचे महत्‍व अधोरेखीत झाले आहे. शास्‍त्रज्ञांनी अथक परिश्रमाने कोरोना रोगावर प्रभावी लस निर्माण केली, त्‍यामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव आपण रोखु शकलो, ही किमया विज्ञानानी केली. शालेय विद्यार्थ्‍यांनी घोंकमपट्टी करू नये, प्रयोगातुन शिकले पाहिजे. परभणीचे आमदार मा डॉ राहुल पाटील, कुलगुरू मा डॉ अशोक ढवण व डॉ रामेश्‍वर नाईक यांच्‍या पुढाकाराने परभणी कृषि विद्यापीठ आणि परभणी अस्‍ट्रोनोमिकल सोसायटी यांच्‍या माध्‍यमातुन भव्‍य विज्ञान संकुल उभारण्‍यात येणार आहे, भविष्‍यात परभणी जिल्‍हा विज्ञानाची राजधानी म्‍हणुन ओळखला जाईल, अशी अपेक्षा जिल्‍हाधिकारी मा श्रीमती आंचल गोयल यांनी व्‍यक्‍त केली.

देशाच्‍या स्‍वातंत्र्याचा अमृत महोत्‍सव आणि वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाचे सुवर्ण महोत्‍सवी वर्षाचे औजित्‍य साधुन वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ आणि परभणी अस्ट्रोनोमिकल सोसायटी यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय विज्ञान दिना निमित्त विज्ञानवारीचे २०२२ चे आयोजन करण्यात आले होते, यावेळी आयोजित कार्यक्रमात विशेष अतिथी म्‍हणुन त्‍या बोलत होत्‍या. कार्यक्रमाच्‍या अध्‍यक्षस्‍थानी कुलगुरू मा डॉ अशोक ढवण हे होते तर स्‍वागताध्‍यक्ष म्‍हणुन परभणी विधानसभेचे माननीय आमदार मा डॉ राहुल पाटील हे उपस्थित होते. व्‍यासपीठावर जिल्‍हा परिषदेचे मुख्‍य कार्यकारी अधिकारी मा श्री शिवानंद टाकसाळे, शिक्षण संचालक डॉ धर्मराज गोखले, परभणी अॅस्‍ट्रोनॉमीकल सोसायटीचे अध्‍यक्ष डॉ रामेश्‍वर नाईक, उपाध्यक्ष पी आर पाटील, शिक्षणाधिकारी  श्रीमती आशाताई गरूड, सचिव सुधीर सोनूनकर, प्रा सुनिल मोडक आदींची प्रमुख उपस्थिती होती.

आपल्‍या भाषणात आमदार मा डॉ राहुल पाटील म्‍हणाले की, परभणी कृषि विद्यापीठ व अस्‍ट्रोनोमिकल सोसायटी वतीने उभारण्‍यात येणा-या विज्ञान संकुल करिता राज्‍य शासनाने अकरा कोटी रूपयाचा निधी उपलब्ध करून दिला आहे, या विज्ञान संकुलामुळे शालेय विद्यार्थ्‍यांना आंतरराष्‍ट्रीय दर्जाचे व्‍यासपीठ उपलब्‍ध होणार होऊन त्‍यांच्‍यात वैज्ञानिक दृष्‍टीकोन विकसित होईल, त्‍यांच्‍यातुन आंतरराष्‍ट्रीय र्कितीचे शास्‍त्रज्ञ घडतील. हे विज्ञान संकुल उभारण्‍यात समाजातील प्रत्‍येक घटकांनी आपले योगदान दिले पाहिजे. परभणी शहर हे शिक्षणाचे हब होण्‍याकरिता आपण प्रयत्‍नशील असुन परभणी जिल्‍हयात भविष्‍यात तीन ते चार विद्यापीठ निर्माण करण्‍याचा मानस त्‍यांनी व्‍यक्‍त केला.

अध्‍यक्षीय समारोपात कुलगुरू मा डॉ अशोक ढवण म्‍हणाले की, कृषि विद्यापीठात उभारण्‍यात येणारे विज्ञान संकुलामुळे मराठवाडयातील शालेय विद्यार्थ्‍यांमध्‍ये वैज्ञानिक दृष्‍टीकोन विकसित होण्‍यास मदत होईल, यातुनच जागतिक दर्जेाचे शास्‍त्रज्ञ घडतील. औंढ नागनाथ परिसरात गुरूत्‍व लहरीचा अभ्‍यास करणारी जागतिक किर्तीची नासानंतरचे तिस-या क्रमांकाची लिगो नावाची प्रयोगशाळेची उभारणी होत आहे. सदरिल प्रयोगशाळेत आपल्‍याही विद्यार्थ्‍याना संधी प्राप्‍त होऊ शकेल. प्रत्‍येक वर्षी राष्‍ट्रीय विज्ञान दिनी शालेय विद्यार्थ्‍यांकरिता विज्ञान प्रदर्शन विद्यापीठात भरविण्‍यात येईल, असेही ते म्‍हणाले.

जिल्‍हा परिषदेचे मुख्‍य कार्यकारी अधिकारी मा श्री शिवानंद टाकसाळे आणि शिक्षण संचालक डॉ धर्मराज गोखले यांनीही आपले मनोगत व्‍यक्‍त केले. कार्यक्रमात अमेरिकेच्या राष्ट्रीय आंतरीक्ष संस्थेचे अंतरीक्ष राजदूत श्री अविनाश शिरोडे यांनी ऑनलाईन माध्‍यमातुन संवाद साधला. प्रास्‍ताविकात डॉ रामेश्‍वर नाईक यांनी विज्ञानवारीची भुमिका मांडली. कार्यक्रमाचे सुत्रसंचालक प्रा. नितिन लोहट यांनी केले तर आभार प्रा रणजित लाड यांनी मानले.

राष्‍ट्रीय विज्ञान दिनान‍िमित्‍त विद्यापीठाच्‍या नाहेप प्रकल्‍पाच्‍या परिसरात विविध कार्यक्रम व विभागीय विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन करण्‍यात आले होते. यात तांबट पक्षा विषयी व जैवविविधता माहितीपट दाखविण्‍यात आला तसेच प्रकाशाच्या वर्णपट, थ्रीडी प्रिंटिंग तंत्रज्ञान यांत्रिक कलम संयंत्र, वसंतराव नाईक सभागृह कृषी विज्ञान विषयक चित्रफिती, ताऱ्यांचे विश्व, रोबोटिक्स, ड्रोन आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्स, डोम प्लॅनेटोरियम शो (तारांगण), शालेय विद्यार्थ्यांचे विज्ञान प्रदर्शन, चला शिकूया प्रयोगातून विज्ञान, कृषी प्रदर्शन, डे टाईम ॲस्ट्रॉनॉमी गणित आणि विज्ञान साहित्य, अंधश्रद्धा निर्मुलन दालन, संवाद शास्‍त्रज्ञांशी कार्यक्रम, चालता बोलता प्रश्न मंजुषा आदी विविध उपक्रम राबविण्‍यात आले. विज्ञान प्रदर्शनीत शालेय विद्यार्थांनी विविध विज्ञान विषयक प्रयोगाचे सादरीकरण केले, यातील उत्‍कृष्‍ट प्रयोग सादर करणा-या विद्यार्थ्‍यांना मान्‍यवरांच्‍या हस्‍ते गौरविण्‍यात आले. मान्‍यवरांच्‍या उपस्थित शालेय विद्यार्थ्‍यांनी कृत्रिम उपगृह प्रक्षेपणाचे प्रात्‍यक्षिक दाखविले. सदरिल उपक्रमास मराठवाडयातील शालेय विद्यार्थ्‍यांनी भरभरून प्रतिसाद दिला.

 

मान्‍यवरांच्‍या उपस्थित शालेय विद्यार्थ्‍यांनी कृत्रिम उपगृह प्रक्षेपणाचे प्रात्‍यक्षिक दाखविले

Sunday, February 27, 2022

स्वानुभवातुन एकात्मिक पध्दतीने केलेली सेंद्रीय शेती अधिक किफायतशीर .....डॉ. आदिनाथ पसलावार

वनामकृवित आयोजित सेंद्रीय शेती प्रशिक्षणात प्रतिपादन 

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील सेंद्रीय शेती संशोधन आणि प्रशिक्षण केंद्राच्‍या वतीने तीस दिवसीय राज्यस्तरीय सेंद्रीय शेती प्रशिक्षण कार्यक्रमाचे ऑनलाईन माध्यमातुन दिनांक १५ फेब्रुवारी ते ३१ मार्च दरम्यान आयोजन करण्यात आले असुन सदरिल प्रशिक्षणात दिनांक २६ फेब्रुवारी रोजी “महाराष्ट्रासाठी शाश्वत सेंद्रीय शेती’’ या विषयावर अकोला येथील डॉ पंजाबराव देशमुख कृषि विद्यापीठातील कृषिविद्या विभागाचे विभाग प्रमुख डॉ. आदिनाथ पसलावार यांच्या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्‍या अध्यक्षस्थानी गोळेगांव कृषि महाविद्यालयाचे प्राचार्य तथा कृषिविद्या विभागाचे प्रमुख डॉ. भगवान आसेवार हे होते तर मौजे बोरगव्हाण (ता. पाथरी, जि. परभणी) येथील प्रगतशील शेतकरी श्री. वैभव खुडे, आयोजक प्रमुख अन्वेषक डॉ. आनंद गोरे, विभाग प्रमुख डॉ. स्मिता खोडके आदींची प्रमुख उपस्थिती होती. सदरिल प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन कुलगुरु मा. डॉ. अशोक ढवण व संचालक संशोधन डॉ. दत्तप्रसाद वासकर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले आहे. 

अध्‍यक्षीय भाषणात डॉ. भगवान आसेवार यांनी प्रदुषणावर मात करण्यासाठी, जमिनीची सुपिकता वाढविण्यासाठी, जैवविविधता टिकविण्यासाठी आणि सकस - संतुलीत आहाराच्या उपलब्धतेसाठी सेंद्रीय शेती करणे आवश्‍यक असल्‍याचे सांगितले.

प्रमुख वक्ते डॉ. आदिनाथ पसलावार म्‍हणाले की, रासायनिक खतांचा व कीटकनाशकांचा अवाचवी वापर यामुळे पारंपारीक शेतीचा किफायतशीरपणा कमी झाला आहे. शेतकरी बांधवाचे स्वत:च्या शेतातील अनुभवातुन स्वत: शास्त्रज्ञ बनुन एकात्मिक पध्दतीने सेंद्रीय शेती केल्‍यास निश्चितच अधिक किफायतशीर होईल. सेंद्रीय शेतीत देशी वाणांची निवड, पिकांची फेरपालट, मुलस्थानी पालापाचोळा कुजवणे, जैव आच्छादनाचा वापर, सापळा पिकांचा वापर, जैविक किटकनाशकांचा वापर करुन उत्पादन वाढ करता येते, असे सांगुन त्‍यांनी दशपर्णी अर्क, पंचगव्य, बीजामृत, जीवामृत आदींचे महत्व सांगितले.

प्रगतशील शेतकरी श्री. वैभव खुडे यांनी सेंद्रीय पध्दतीने रेशीम उद्योगा बाबतचे स्वत: चे अनुभव सांगितले. त्‍यांनी बचतगटाच्या माध्यमातुन रेशीम उद्योगासोबतच शेळीपालन, कुक्कुटपालन, दुग्धोत्पादन आदीं पुरक व्यवसायांची जोडी दिली असुन सेंद्रीय शेतीमध्ये विविध प्रयोग करुन जीवनमान उंचावन्यास मोलाची मदत झाली असल्‍याचे त्यांनी सांगितले. 

प्रशिक्षण कार्यक्रमास शेतकरी बंधू भगिनी, विद्यार्थी, कृषि शास्त्रज्ञ, कृषि विज्ञान केंद्राचे विषय विशेषज्ञ आदींनी मोठ्या प्रमाणावर सहभाग नोंदविला. सुत्रसंचलन डॉ. विशाल अवसरमल यांनी केले तर आभार डॉ. पंकज ददगाळे मानले तसेच श्री. ऋषिकेश औंढेकर यांनी संकलक म्हणुन काम पाहिले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी डॉ.अनुराधा लाड, डॉ. संतोष बोरगावकर, दिपक शिंदे, अभिजीत कदम, सतीश कटारे, योगेश थोरवट आदींनी परिश्रम घेतले.

राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त विज्ञानवारी २०२२ चे आयोजन

वनामकृवि आणि परभणी अस्‍ट्रोनोमिकल सोसायटी यांचा संयुक्‍त उपक्रम

देशाच्‍या स्‍वातंत्र्याचा अमृत महोत्‍सव आणि वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाचे सुवर्ण महोत्‍सवी वर्षाचे औजित्‍य साधुन वसंतराव नाईक मराठवाडा कृषि  विद्यापीठ आणि परभणी अस्ट्रोनोमिकल सोसायटी यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय विज्ञान दिना निमित्त विज्ञानवारीचे २०२२ चे आयोजन करण्यात आले असुन दिनांक २८ फेब्रुवारी रोजी सकाळी ९ ते सायंकाळी ५ दरम्‍यान विद्यापीठाच्‍या नाहेप प्रकल्‍पाच्‍या सभागृहात विविध कार्यक्रम व विभागीय विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन करण्‍यात आले आहे. दुपारी २.०० वाजता मार्गदर्शन व बक्षीस वितरणाच्‍या कार्यक्रमाचे आयोजन करण्‍यात आले असुन कार्यक्रमाच्‍या अध्‍यक्षस्‍थानी कुलगुरू मा डॉ अशोक ढवण हे राहणार असुन स्‍वागताध्‍यक्ष म्‍हणुन परभणी विधानसभेचे माननीय आमदार मा डॉ राहुल पाटील हे राहणार आहेत. विशेष अतिथी म्‍हणुन जिल्‍हाधिकारी मा श्रीमती आंचल गोयल, जिल्‍हा परिषदेचे मुख्‍य कार्यकारी अधिकारी मा श्री शिवानंद टाकसाळे, पोलिस अधिक्षक मा श्री जयंत मिना, महानगर पालिका आयुक्‍त मा श्री देविदास पवार आदी उपस्थित राहणार असुन शिक्षण संचालक डॉ धर्मराज गोखले, संशोधन संचालक डॉ दत्‍तप्रसाद वासकर, विस्‍तार शिक्षण संचालक डॉ देवराव देवसरकर, कुल‍सचिव डॉ धीरजकुमार कदम, परभणी अॅस्‍ट्रोनॉमीकल सोसायटीचे अध्‍यक्ष डॉ रामेश्‍वर नाईक आदींची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे. 

विज्ञानवारीमध्ये विद्यापीठातील नाहेप प्रकल्‍पाच्‍या परिसरात विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. यात तांबट पक्षा विषयी व जैवविविधता माहितीपट दाखविण्‍यात येणार असुन प्रकाशाच्या वर्णपट, थ्रीडी प्रिंटिंग तंत्रज्ञान यांत्रिक कलम संयंत्र, वसंतराव नाईक सभागृह कृषी विज्ञान विषयक चित्रफिती, ताऱ्यांचे विश्व, रोबोटिक्स, ड्रोन आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्स, डोम प्लॅनेटोरियम शो (तारांगण), शालेय विद्यार्थ्यांचे विज्ञान प्रदर्शन चला शिकूया प्रयोगातून विज्ञान, कृषी प्रदर्शन, डे टाईम ॲस्ट्रॉनॉमी गणित आणि विज्ञान साहित्य, अंधश्रद्धा निर्मुलन दालन, कृत्रिम उपगृह प्रक्षेपण, संवाद शास्‍त्रज्ञांशी कार्यक्रम, चालता बोलता प्रश्न मंजुषा आदी उपक्रमाचे आयोजन करण्‍यात आले असुन दुपारी २ ते ३ वाजता समारोपीय कार्यक्रमात मान्‍यवरांच्‍या हस्‍ते बक्षीस वितरण होणार आहे. तरी सदरिल विज्ञानवारीत जास्तीत जास्त शिक्षक आणि विद्यार्थ्यांनी सहभाग घेण्‍याचे आवाहन संचालक शिक्षण डॉ धर्मराज गोखले, कुलसचिव धीरजकुमार कदम, अध्यक्ष डॉ रामेश्वर नाईक, उपाध्यक्ष पी आर पाटील, सचिव सुधीर सोनूनकर आदींनी केले आहे .

परभणी ऍस्ट्रोनॉमिकल सोसायटीच्या वतीने राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त आयोजित विज्ञानवारी पूर्व परीक्षा २०२२ मराठवाड्यातील आठ जिल्ह्यांमधील निवडक शाळेत घेण्‍यात येऊन २५ विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली. तसेच प्रश्नमंजुषा स्‍पर्धेतील विद्यार्थ्यांना विज्ञानवरी कार्यक्रमात मान्‍यवरांच्‍या हस्‍ते प्रमाणपत्र देऊन गौरविण्‍यात येणार आहे.

Saturday, February 26, 2022

वनामकृविच्‍या ज्‍वार संशोधन केंद्रास कुलगुरू मा डॉ विलास भाले यांची भेट

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील ज्वार संशोधन केंद्रास दिनांक २५ फेब्रुवारी रोजी अकोला येथील डॉ. पंजाबराव देशमुख कृषि विद्यापीठाचे कुलगुरु मा. डॉ. विलास भाले यांनी भेट दिली. याभेटी दरम्यान त्यांनी या संशोधन केंद्रा अंतर्गत राबविल्या जाणा-या विविध प्रयोगांची व उपक्रमांची माहिती घेतली. प्रभारी अधिकारी डॉ. के. आर. कांबळे, डॉ. एल. एन. जावळे, डॉ. विक्रम घोळवे, डॉ. मोहम्मद ईलियास, प्रा. प्रितम भुतडा आदींनी प्रक्षेञावरील राबविण्‍यात येत असलेल्‍या विविध प्रयोग व संशोधनाची माहिती दिली. यावेळी ज्‍वारी पिकांतील करित असलेल्‍या संशोधनात्‍मक कार्याची त्‍यांनी कौतुक करून ज्‍वारीचे लागवडीचे क्षेत्र वाढीकरिता व संशोधनाच्‍या पुढील दिशा यावर मार्गदर्शन केले.

भेटीचे आयोजन कुलगुरू मा डॉ. अशोक ढवण व संशोधन संचालक डॉ. डि. पी. वासकर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. या भेटी दरम्यान संचालक शिक्षण डॉ. डि. एन. गोखले, गोळेगाव कृषि महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बी. व्हि. आसेवार, डॉ. एन. डब्ल्यु. नारखेडे, डॉ. आर. व्हि. चव्हाण, डॉ. पी. के. वाघमारे, डॉ. मिलींद सोनकांबळे आदींची प्रमुख उपस्थिती होती.

भारतीय शेतक-यांचे पारंपारीक ज्ञान व शेती पध्दती सेंद्रीय शेतीसाठी पूरक..... डॉ. के. अे. गोपीनाथ, केंद्रीय कोरडवाहू शेती संशोधन संस्था, हैद्राबाद

वनामकृवित आयोजित सेंद्रीय शेती प्रशिक्षणात प्रतिपादन 

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील सेंद्रीय शेती संशोधन आणि प्रशिक्षण केंद्राच्‍या वतीने तीस दिवसीय राज्यस्तरीय सेंद्रीय शेती प्रशिक्षण कार्यक्रमाचे ऑनलाईन माध्यमातुन दिनांक १५ फेब्रुवारी ते ३१ मार्च दरम्यान आयोजन करण्यात आले असुन सदरिल प्रशिक्षणात दिनांक २५ फेब्रुवारी रोजी “सेंद्रीय शेतीसाठी गांडुळ खत व कंपोस्ट खत निर्मिती’’ यावर अकोला येथील डॉ पंजाबराव देशमुख कृषि विद्यापीठातील मृदाशास्‍त्रज्ञ डॉ. शाम जाधव व डॉ. नितीन कोंडे यांच्या व्याख्यानाने आयोजित करण्यात आले होते. कार्यक्रमाच्‍या अध्यक्षस्थानी हैद्राबाद येथील भाकृअप - केंद्रीय कोरडवाहू शेती संशोधन संस्थचे प्रमुख शास्त्रज्ञ (कृषिविद्या) डॉ. के. अे. गोपीनाथ हे होते तर मौजे राणीसावरगांव (ता.गंगाखेड, जि.परभणी) येथील प्रगतशील शेतकरी श्री. शिवप्रसाद कोरे, मौजे लोहगाव (ता.जि.परभणी) येथील प्रगतशील महिला शेतकरी कु. रेणुका सीताराम देशमुख, आयोजक प्रमुख अन्वेषक डॉ. आनंद गोरे, विभाग प्रमुख डॉ. स्मिता खोडके, डॉ. मिनाक्षी पाटील आदींची प्रमुख उपस्थिती होती. सदरिल प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन कुलगुरु मा. डॉ. अशोक ढवण संचालक संशोधन डॉ. दत्तप्रसाद वासकर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले आहे. 

अध्‍यक्षीय भाषणात डॉ. के. अे. गोपीनाथ म्‍हणाले की, सेंद्रीय शेतीत शास्त्रीय ज्ञान तसेच शेतकरी बांधवाचे अनुभव अत्यंत महत्‍वाचे आहेत. भारतीय शेतक-यांचे पारंपारीक ज्ञान व शेती पध्दती हे सेंद्रीय शेतीसाठी पुरकच आहेत. या ज्ञानाच्‍या बळावर आजपर्यंत आपण यशस्वीपणे शेती करत आलेलो आहोत. भारतीय शेतक-यांचे आंतर पीक पध्दती, पीक फेरपालट, शेती मशागतीच्या पध्दती, सेंद्रीय खत निर्मितीच्या पध्दती आदींचे पारंपारीक ज्ञानाचा सेंद्रीय शेती करतांना निश्चितच उपयोगी आहे. हे भारतीय शेतक-यांचे ज्ञान खुपच उपयोगी असल्‍याचे थोर शास्‍त्रज्ञ सर अल्बर्ट होवार्ड यांनीही नमुद केले आहे.

मार्गदर्शनात प्रमुख वक्ते डॉ. शाम जाधव म्हणाले की, जमिनीचे आरोग्य हे तीन बाबींवर अवलंबुन असुन यात जमिनीचे भौतिक, रासायनिक व जैविक गुणधर्माचा समोवेश होतो. भौतिक गुणधर्मात जमिनीची घनता, पाणी धरुन ठेवण्याची क्षमता, विविध पदार्थाचे प्रमाण याचा समावेश होतो तर रासायनिक गुणधर्मात जमिनीचा सामु, विद्युत वाहकता सेंद्रीय कर्ब उपलब्ध होणारे मुख्य व सुक्ष्म अन्नद्रव्याचा अंतर्भाव होतो. जैविक गुणधर्मात जमिनीमध्ये आढळणारी सुक्ष्मजीव तसेच गांडुळ व कृमी यांचा समावेश होतो. जमिनीचे आरोग्य सुस्थितीत राखण्यासाठी ही गुणधर्म योग्य स्थितीत असणे आवश्यक आहे. सेंद्रीय पदार्थाचे विघटन करण्यासाठी जमिनीतील सुक्ष्मजीव व इतर सजीव यांचा उपयोग होतो, ज्यामुळे पिकांना अन्नद्रव्य उपलब्ध होतात. यावेळी त्‍यांनी कंपोस्ट खत तयार करण्यासाठीच्या विविध पध्दती जसे नाडेप, इंदौर, पी.डी.के.व्ही. कंपोस्ट पध्दत यावर माहिती दिली.

डॉ. नितीन कोंडे म्‍हणाले की, जमिनीतील कर्ब वाढवणे सद्यस्थितीत महत्वाचे असुन मागील काही वर्षापासुन हवामानाच्या बदलामुळे अनियमीत पाऊस तसेच सोसाटयाचा वारा यामुळे जमिनीची धुप मोठया प्रमाणावर होत आहे, जमिनीवरचा अन्नद्रव्य भरपुर प्रमाणात असलेला मातीचा थर वाहुन जात असुन परिणामी पिकाचे उत्पादन घटत आहे. मातीची पाणी धरुन ठेवण्याची क्षमता व निच­याची क्षमता घटत चालली आहे. हे सर्व सुस्थितीत आणण्यासाठी जैविक खते जसे कंपोस्ट खत, गांडुळ खत, लेंडी खत वापरणे गरजेचे झाले आहे.

प्रगतशील शेतकरी श्री. शिवप्रसाद कोरे यांनी त्यांच्या सेंद्रीय टरबूज लागवडीबद्दलचे अनुभव सांगतांना म्‍हणाले की, सेंद्रीय पध्दतीने उत्पादित केलेले टरबुज दिर्घकाळ टिकते व खायला चविष्ट असतात. तर श्रीमती रेणुका सीताराम देशमुख आपल्‍या सेंद्रीय शेतीतील अनुभव सांगताना म्हणाल्या की, सेंद्रीय शेतीत गांडुळ खताचे महत्‍व आहे. माझ्या शेतावर तीन गुंठयावर गांडुळ खत प्रकल्प असुन वर्षाला शंभर टन गांडुळ खत निर्मिती होते, गांडुळ बीज शेतक­यांना पुरवते. चंद्रपुर जिल्हयातील आदिवासी शेतक­यांना गांडुळ खत निर्मितीचे प्रशिक्षण दिले असल्‍याचे त्‍यांनी सांगितले.

सदरिल ऑनलाईन व्‍याख्‍यानात दोन हजार पेक्षा अधिक शेतकरी बंधू भगिनी, विद्यार्थी, कृषि शास्त्रज्ञ, कृषि विज्ञान केंद्राचे विषय विशेषज्ञ आदींनी सहभाग नोंदविला होता. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन डॉ. विशाल अवसरमल यांनी केले आणि आभार डॉ. पंकज ददगाळे यांनी मानले तर प्रा. शरद चेनलवाड यांनी संकलक म्हणुन काम पाहिले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी डॉ. अनुराधा लाड, डॉ. संतोष बोरगावकर, डॉ. पपीता गौरखेडे, दिपक शिंदे, अभिजीत कदम, सतीश कटारे, योगेश थोरवट आदींनी परिश्रम घेतले.