Tuesday, September 27, 2016

नॅनो तंत्रज्ञानाच्‍या आधारे खतांची कार्यक्षमता वाढवता येणे शक्‍य.......मा. डॉ. पी. चंद्रशेखरराव

वनाकमृवित शाश्‍वत शेतीसाठी नॅनो तंत्रज्ञानाचा वापर यावर आयोजित व्‍याख्‍यानमालेत प्रतिपादन
नॅनो तंत्रज्ञानात शेती उत्‍पादन वाढविण्‍याची क्षमता आहे, परंतु नॅनो तंत्रज्ञानाचा पर्यावरणावर व मानवी स्‍वास्‍थावर होणा-या परिणामाबाबत संशोधनाची गरज असल्‍याचे प्रतिपादन राजेंद्रनगर (हैद्राबाद) येथील जयशंकर तेलंगणा राज्‍य कृषी विद्यापीठाचे माजी अधिष्‍ठाता तथा मृदाशास्‍त्रज्ञ मा. डॉ. पी. चंद्रशेखरराव यांनी केले. वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील मृदा विज्ञान व कृषी रसायनशास्‍त्र विभाग व भारतीय मृदाविज्ञान संस्‍था परभणी शाखा यांच्‍या वतीने कै. डॉ. एन. पी. दत्‍ता मेमोरीयल व्‍याख्‍यानाचे आयोजन कृषी महाविद्यालयाच्‍या सभागृहात दिनांक २७ सप्‍टेंबर रोजी करण्‍यात आले आहे, त्‍या प्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाच्‍या अध्‍यक्षस्थानी कुलगुरू मा. डॉ. बी. व्‍यंकटेश्‍वरलु हे होते तर व्‍यासपीठावर माजीमंत्री मा. श्री. सुरेशरावजी वरपुडकर, शिक्षण संचालक डॉ. अशोक ढवण, भारतीय मृदाविज्ञान संस्‍था परभणी शाखेचे अध्‍यक्ष तथा विभाग प्रमुख डॉ. विलास पाटील, प्राचार्य डॉ. डि. एन. गोखले, उपाध्‍यक्ष डॉ. सय्यद ईस्‍माइईया ल आदींची प्रमुख उपस्थिती होती.
मा. डॉ. पी. चंद्रशेखरराव पुढे म्‍हणाले की, पीक वाढीकरिता रासायनिक खतांचा वापर करतांना खते प्रत्‍यक्षात कमी प्रमाणात पीकांना लागु होतात, नॅनो खतांचा वापर केल्‍यास रासा‍यनिक खतांचा कार्यक्षमरित्‍या वापर होउुन कमी खत मात्रेत अधिक उत्‍पादन आपण घेऊ शकु, असे प्रतिपादन त्‍यांनी केले.
कुलगुरू मा. डॉ. बी. व्‍यंकटेश्‍वरलु अध्‍यक्षीय समारोपात म्‍हणाले की, देशात युरिया या नत्र खताचा मोठया प्रमाणात वापर होतो, यासाठी मोठया प्रमाणावर सबसिडी दिली जाते. परंतु युरियाचा वापर करतांना त्‍याचा मोठया प्रमाणावर –हास होतो, ही हानी पाच टक्के जरी नॅनो तंत्रज्ञानाचा वापर करून कमी केली, तरी मोठया प्रमाणावर आर्थिक बचत करू शकतो. कृषीक्षेत्रात नॅनो तंत्रज्ञानाचा उत्‍पादन वाढीसाठी वापर शक्‍य आहे, जैवसुरक्षीतता, पर्यावरण अनूकुलता व खर्च परिमाणकारकता आदीच्‍या दृष्‍टीने नॅनो तंत्रज्ञानाचा संशोधनात्‍मक अभ्‍यास करावा लागेल. शिक्षण संचालक डॉ. अशोक ढवण आपल्‍या भाषणात म्‍हणाले की, भारतीय मृदविज्ञान संस्‍थेच्‍या वतीने आयोजित करण्‍यात येत असलेल्‍या व्‍याख्‍यानांचा उपयोग नवसंशोधकासाठी मार्गदर्शक आहे.

कार्यक्रमात डॉ. विलास पाटील, डॉ. डी. एन. गोखले व डॉ. अनिल धमक लिखित कृषीक्षेत्रातील नवीनतम संशोधन या पुस्‍तकाचे विमोचन मान्‍यवरांच्‍या हस्‍ते करण्‍यात आले. कार्यक्रमाचे प्रास्‍त‍ाविक डॉ विलास पाटील यांनी केले तर प्रमुख प्रमुख वक्‍त्‍याचा परिचय डॉ. सय्यद ईस्‍माइल यांनी करून दिला. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन डॉ. पपिता गौरखेडे यांनी केले आभार डॉ. महेश देशमुख यांनी मानले. कार्यक्रमास विद्यापीठातील प्राध्‍यापक, कर्मचारी व विद्यार्थ्‍यी मोठया संख्‍येने उपस्थित होते. कार्यक्रम यशस्‍वीतेसाठी डॉ. अनिल धमक, डॉ. सुरेश वाईकर, प्रा. सुनिल गलांडे, प्रा. प्रभाकर अडसुळ, सदाशिव अडकीणे, एस एम महावलकर, अजय चरकपल्‍ली, शेख सलीम, विद्यार्थी स्‍वप्‍नील मोरे, प्रमोद शिनगारे आदीसह विभागातील इतर कर्मचारी व विद्यार्थ्‍यींनी परिश्रम घेतले.

गृहविज्ञान महाविद्यालयाच्‍या वतीने मौजे कुंभकर्ण टाकळी येथे कार्यशाळा संपन्‍न

टिप - सदरिल बातमी प्राचार्या, गृहविज्ञान महाविद्यालय, वनामकृवि, परभणी यांच्‍या कडुन प्राप्‍त

Friday, September 23, 2016

वनामकृविच्या गृहविज्ञान महाविद्यालयात राज्यस्तरीय गृहविज्ञान विषयतज्ञांची कार्यशाळा संपन्न

वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील गृहविज्ञान महाविद्यालयाच्‍या वतीने ग्रामीण महिला व बालकांचे योगदान, आरोग्‍य व विकास वृध्‍दींगत करण्‍याच्‍या दृष्‍टीने कृषि विज्ञान केंद्राच्‍या गृहविज्ञान विषयतज्ञ व कार्यक्रम समन्‍वयक यांच्‍या करिता तीन दिवसीय राज्‍यस्‍तरीय कार्यशाळेचे आयोजन दिनांक २० ते २२ सप्‍टेंबर दरम्‍यान करण्‍यात होते, कार्यशाळेचा समारोपीय कार्यक्रम दिनांक २२ सप्‍टेंबर रोजी कुलगुरू मा. डॉ. बी. व्‍यंकटेश्‍वरलु यांच्‍या अध्‍यक्षतेखाली पार पाडला. याप्रसंगी शिक्षण संचालक डॉ. अशोक ढवण, संशोधन संचालक डॉ. दत्‍तप्रसाद वासकर, विस्‍तार शिक्षण संचालक डॉ. बी. बी. भोसले, सहयोगी अधिष्‍ठाता व प्राचार्या प्रा. विशाला पटनम यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यशाळेच्‍या उद्घाटन कार्यक्रमास भुवनेश्‍वर येथील केंद्रीय कृषीरत महिला संस्‍थेच्‍या संचालिका डॉ. जतिंदर किश्‍तवारिया, हैद्राबाद येथील कृषी तंत्रज्ञान उपयोगीता संशोधन संस्‍थेचे संचालक डॉ. वाय. जी. प्रसाद यांची प्रमुख उपस्थिती होती. तीन दिवसीय कार्यशाळेत शेतकरी महिलांची कार्यक्षमता वृध्दिंगत करण्‍यासाठी व त्‍यांचे काबाडकष्‍ट कमी करण्‍याचे तंत्र व साधने, ग्रामीण महिला व बालकांचे आरोग्‍य, विकास व योगदान वृध्दिंगत करण्‍याचे महत्‍व, बाल संगोपन विकासदर्शक संवर्धनासाठी पोषक घरगुती वातावरण, मानसिकरित्‍या दुर्बल बालकांना ओळखण्‍यासाठी सोपे तंत्र, मतिमंद बालक जन्‍माला येण्‍याची कारणे व प्रतिबंधक उपाय, बालकाचा वाढांक मोजण्‍याचे तंत्र, तृणधान्‍याच्‍या व कडधान्‍याच्‍या मुल्‍यवर्धीत पाककृती, लोह समृध्‍द पाककृती, आळीव व नाचणीच्‍या पोषक पाककृती, कृपोषण निर्मूलन कार्यक्रम राबवण्‍यासाठी मार्गदर्शीका, सोयाबीन कापणी व मळणीसाठी संरक्षीत कपडे, पर्यावरणपुरक होळी व कपडयाचे रंग आदीं विषयांवर विविध साधनव्‍यक्‍तींनी प्रात्‍यक्षिके व कार्यानुभवाव्‍दारे मार्गदर्शन केले. याप्रसंगी गृहविज्ञान विषयक पुस्‍तके व शेती अवजारे यांचे प्रदर्शनीचेही आयोजन करण्‍यात आले होते. सदरिल कार्यशाळेत राज्‍यातील विदर्भातील आठ, पश्चिम महाराष्‍ट्रातुन तीन, कोकण व खानदेशातुन प्रत्‍येकी एक तर मराठवाडातुन आठ गृहविज्ञान विषयतज्ञांचा समावेश होता. एकुण २१ कृषी विज्ञान केंद्रातील गृहविज्ञान विषयतज्ञ व ६ कार्यक्रम समन्‍वयक यांनी सहभाग नोंदविला. समारोपीय कार्यक्रमात मान्‍यवरांनी मार्गदर्शन केले तर कार्यक्रमात सहभागी प्रशिक्षणार्थीना मान्‍यवरांच्‍या हस्‍ते प्रमाणपत्राचे वितरण करण्‍यात आले. कार्यशाळेचे प्रमुख समन्‍वयिका म्‍हणुन प्राचार्या प्रा. विशाला पटनम यांनी तर आयोजन सचिव म्‍हणुन वरिष्‍ठ संशोधिका डॉ. जयश्री झेंड यांनी काम पाहिले. प्रास्‍‍ताविकात सहयोगी अधिष्‍ठाता व प्राचार्या प्रा विशाला पटणम यांनी विविध गृहविज्ञान तंत्रज्ञानाची माहिती दिली. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन प्रा. नाहिद खान यांनी केले तर आभार डॉ. जयश्री झेंड यांनी मानले. कार्यक्रम यशस्‍वीतेसाठी अखिल भार‍तीय समन्‍वयीत संशोधन प्रकल्‍प व गृहविज्ञान महाविद्यालयातील कर्मचारी व प्राध्‍यापकवृंद यांनी परिश्रम घेतले. समारोपीय कार्यक्रमास महाविद्यालयातील प्राध्‍यापक व कर्मचारी मोठया संख्‍येने उपस्थित होते. 

गृहविज्ञान शास्‍त्रज्ञांनी ग्रामीण महिला व बालकांच्‍या कार्यक्षमता वृध्‍दींगत करण्‍यासाठी प्रयत्‍नशील रहावे...... कुलगुरू मा. डॉ. बी. व्‍यंकटेश्‍वरलु

गृहविज्ञान महाविद्यालयात राज्‍यस्‍तरीय कार्यशाळेचे उद्घाटन


वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील गृहविज्ञान महाविद्यालयाच्‍या वतीने ग्रामीण महिला व बालकांचे योगदान, आरोग्‍य व विकास वृध्‍दींगत करण्‍यासाठी कृषि विज्ञान केंद्राच्‍या गृहविज्ञान विषयतंज्ञाकरिता तीन दिवसीय राज्‍यस्‍तरीय कार्यशाळेचे आयोजन दिनांक २० ते २२ सप्‍टेंबर दरम्‍यान करण्‍यात आले असुन कार्यशाळेचे उद्घाटन दिनांक २० सप्‍टेंबर रोजी पार पाडले. कार्यक्रमाच्‍या अध्‍यक्षस्‍थानी कुलगुरू मा. डॉ. बी. व्‍यंकटेश्‍वरलु हे होते तर भुवनेश्‍वर येथील केंद्रीय कृषीरत महिला संस्‍थेच्‍या संचालिका डॉ. जतिंदर किश्‍तवारिया, हैद्राबाद येथील कृषी तंत्रज्ञान उपयोगीता संशोधन संस्‍थेचे संचालक डॉ. वाय. जी. प्रसाद, विस्‍तार शिक्षण संचालक डॉ. बी. बी. भोसले, सहयोगी अधिष्‍ठाता तथा प्राचार्या प्रा. विशाला पटणम यांची प्रमुख उपस्थिती होती. अध्‍यक्षीय भाषणात कुलगुरू मा. डॉ. बी. व्‍यंकटेश्‍वरलु म्‍हणाले की, गृहविज्ञान महाविद्यालयाने ग्रामीण महिला व बालकाच्‍या विकास व कार्यक्षमता वृध्‍दींगत करण्‍यासाठी अनेक उपयुक्‍त तंत्रज्ञान विकसित केल आहे, हे तंत्रज्ञान ग्रामीण भागात पोहजविण्‍यासाठी कृषी विज्ञान केंद्रातील गृहविज्ञान तज्ञांनी प्रयत्‍नशील रहावे. डॉ. जतिंदर किश्‍तवारिया आपल्‍या मार्गदर्शनात म्‍हणाल्‍या की, देशाच्‍या विकासात महिलांचा मोठा वाटा असुन कृषी विज्ञान केंद्राच्‍या माध्‍यमातुन महिला व बालविकासावर भर दिला पाहिजे. 
कार्यशाळेत राज्‍यातील कृषी विज्ञान केंद्रातील २६ कार्यक्रम समन्‍वयक व गृहविज्ञान विषयतज्ञांनी सहभाग नोंदविला आहे. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन डॉ जया बंगाळे यांनी केले तर आभार डॉ जयश्री झेंड यांनी केले. कार्यक्रमास विद्यापीठातील अधिकारी, कर्मचारी व विद्यार्थ्‍यी मोठया संख्‍येने उपस्थित होते.

Wednesday, September 21, 2016

कापूस, सोयाबीन व तुर पिकांवर विविध किड-रोगांच्या प्रादुर्भावात वाढ होण्‍याची शक्यता

वनामकृविच्‍या शास्‍त्रज्ञांचे शेतक-यांना उपाय योजना करण्‍याचे आवाहन

सदयस्थिती कमी सुर्यप्रकाश व ढगाळ वातावरण असल्यामुळे कापूस, सोयाबीन तुर पिकांमध्ये विविध किड-रोगांचा प्रादुर्भाव होण्यास कारणीभुत ठरू शकते. यासाठी शेतकरी बांधवानी पुढील उपाय योजना करण्‍याचे आवाहन वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचे विस्तार शिक्षण संचालक डॉ. बी. बी. भोसले किटकशास्त्र विभागाचे विभागप्रमुख डॉ. पी. आर. झंवर यांनी केले आहे.
१.   कपाशीमध्ये पाण्याचा ताण बसुन एकदम पाऊस झाल्यामुळे तसेच धुके ढगाळ वातावरण यामुळे कपाशीची नैसर्गिक पातेगळ होत असुन त्यासाठी एन... (प्लॅनोफिक्स) मिली प्रती १० लीटर याप्रमाणे फवारणी करण्यात यावी.
२.  पुढील काळात हवेतील आर्द्रता व तापमान वाढल्यास कपाशीत पांढऱ्या माशीचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता आहे. त्यासाठी फलोनिकॅमिड ५० डब्ल्युजी ग्रॅम किंवा फेनप्रोपॅथ्रीन ३० ईसी मिली किंवा डायफेन्थ्युरॉन ५० डब्ल्युपी १२ ग्रॅम किंवा बुप्रोफेझिन २५ एससी २० मिली किंवा बायफेनथ्रीन १० ईसी १६ मिली किंवा ट्रायझोफॉस ४० ईसी २० मिली किंवा ॲसिफेट ७५ एसपी २० ग्रॅम किंवा ॲसिटामाप्रिड २० एसपी ग्रॅम किंवा यापैकी एक किटकनाक व निंबोळी अर्क ३००० पीपीएम ४०-५० मिली प्रती १० लिटर पाण्यात मिसळुन फवारणी करावी.
३.    कांही ठिकाणी सोयाबीन व कपाशीवर घाटेअळी व तंबाखुवरील पाने खाणारी अळी यांचा प्रादुर्भाव दिसुन येत आहे. त्यासाठी इमामेक्टीन बेन्झोएट टक्के ग्रॅम किंवा स्पिनोसॅड ४५ एससी मिली किंवा क्लोरीपायरीफॉस २० टक्के प्रवाही प्रवाही २० मिली किंवा क्विनालफॉस २० टक्के प्रवाही २० मिली किंवा प्रती १० लिटर पाण्यात मिसळुन फवारणी करावी.
४. विशेषत: जास्त पाऊस झालेल्या किंवा पाणी साचलेल्या शेतांमध्ये कपाशी व तुरीची पानगळ होत आहे. तसेच मर रोगाचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता आहे. त्यासाठी शेतात साचलेले पाणी काढुन दयावे. सुकलेल्या झाडाच्या बुंध्याजवळची माती दाबुन घ्यावी. झाडाच्या खोडापासुन ते . फुट अंतरावर बांगडी पध्दतीने कॉपर ऑक्सीक्लोराईड ३० ग्रॅम किंवा कार्बेन्डाझीयम १५ ग्रॅम १० लिटर पाण्यात मिसळुन आळवणी करावी. सुकलेल्या झाडास १२ तासाच्या आत १०० ग्रॅम युरिया + ३०० ग्रॅम सुपर फॉस्फेट + १० लिटर पाणी हे द्रावण प्रती झाड 1 लिटर याप्रमाणे टाकावे.


अशाप्रकारे शेतकरी बंधुनी किड रोगांचे व्यवस्थापन करण्‍याचे आवाहन वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचे विस्तार शिक्षण संचालक डॉ. बी. बी. भोसले किटकशास्त्र विभागाचे विभागप्रमुख डॉ. पी. आर. झंवर यांनी केले आहे
कापसावरील पांढरी माशी
कापसातील मर रोग

कापसावरील बोंडअळी

कृषी अभियंत्‍यानी शेतक-यांसाठी कार्य करावे....... कुलगुरू मा. डॉ. बी. व्यंकटेश्वरलु

वनामकृविच्‍या कृषी अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालयात अभियंता दिन साजरा
वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातंर्गत असलेल्‍या कृषी अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालयाच्‍या वतीने भारतरत्‍न अभियंता डॉ. एम. विश्वेश्वरय्या यांच्या जन्मदिनी १५ सप्टेंबर रोजी अभियंता दिन म्हणून साजरा करण्‍यात आला. कार्यक्रमाच्‍या अध्यक्षस्‍थानी विद्यापीठाचे कुलगुरू मा. डॉ. बी. व्यंकटेश्वरलु होते तर व्‍यासपीठावर प्राचार्य डॉ. उदय खोडके, प्रा. भास्कर भुईभार, डॉ. स्मिता खोडके, प्रा. हरीश आवारी, प्रा. स्मिता सोलंकी आदींची प्रमुख उपस्थिती होती.
अध्‍यक्षीय भाषणात कुलगुरू मा. डॉ. बी. व्यंकटेश्वरलु म्‍हणाले की, कृषी अभियांत्रिक क्षेत्रात अनेक बाबींवर संशोधन करण्यास मोठा वाव आहे. पाणलोट क्षेत्र विकास, सिंचन पद्धती, यांत्रिकीकरण, अपारंपरिक उर्जा, प्रक्रिया व मूल्यवर्धन आदी विषयात संशोधन करून शेतकऱ्यांचे परिस्थितीत सुधारणासाठी व त्यांचे जीवन मूल्य उंचावण्यासाठी कृषी अभियंत्यांनी प्रयत्नशील रहावे. कृषी क्षेत्राच्या विकासासाठी कृषी अभियांत्रिकी मध्ये दर्जात्मक शिक्षण घेऊन विद्यार्थ्यांनी उत्तम संशोधन करून शेतक-यांसाठी कार्य करावे, असा सल्‍ला त्‍यांनी दिला.
प्राचार्य डॉ. उदय खोडके आपल्‍या मार्गदर्शनात म्‍हणाले की, डॉ. एम. विश्वेश्वरय्या हे उत्कृष्ट अभियंता सोबतच उत्तम प्रशासक, बुद्धीवंत, अर्थतज्ञ व मुत्सद्दी होते. त्‍यांच्‍या तंत्रज्ञानाची तत्कालीन ब्रिटीश सरकारने दखल घेऊन डॉ. एम. विश्वेश्वरय्या यांचा गौरव केला होता तर भारत सरकारने त्यांना भारतरत्न देऊन गौरविले. विद्यार्थ्यांनी त्यांच्या व्यक्तिमत्वातील वेळेचे व्यवस्थापन, प्रामाणिकपणा व कामासाठी समर्पण आदी बाबींचे अवलंबन करावे.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विद्यार्थी सीताराम बाच्छे व वृषाली खाकाळ यांनी केले तर आभार प्रदर्शन संदेश खरात यांनी केले. कार्यक्रमात कल्पना भोसले, जान्हवी जोशी, अमृत मुडके, उमेश पवार आदींनी आपले विचार मांडले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी प्रा. रवींद्र शिंदे व संजय पवार यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमास महाविद्यालयातील प्रा. सुमंत जाधव, प्रा. दयानंद टेकाळे, प्रा. सुभाष विखे, प्रा. गोपाळ शिंदे, प्रा. मधुकर मोरे, प्रा. संदीप पायाळ, प्रा. श्याम गरुड, प्रा. संजय पवार, प्रा. रवींद्र शिंदे, इंजी. लक्ष्मीकांत राऊतमारे आदीसह प्राध्यापक, कर्मचारी व विद्यार्थ्‍यी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टिप - सदरिल बातमी प्राचार्य, कृषी अभियांंत्रिकी महाविद्यालय, वनामकृवि, परभणी यांच्‍या कडुन प्राप्‍त

Tuesday, September 20, 2016

गृहविज्ञान महाविद्यालयात राज्‍यस्‍तरीय कार्यशाळेचे आयोजन

वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील गृहविज्ञान महाविद्यालयाच्‍या वतीने ग्रामीण महिला व बालकांचे योगदान, आरोग्‍य व विकास वृध्‍दींगत करण्‍यासाठी कृषि विज्ञान केंद्राच्‍या गृहविज्ञान विषयतंज्ञाकरिता तीन दिवसीय राज्‍यस्‍तरीय कार्यशाळेचे आयोजन दिनांक २० ते २२ सप्‍टेंबर दरम्‍यान करण्‍यात आले असुन कार्यशाळेचे उद्घाटन भुवनेश्‍वर येथील केंद्रीय कृषीरत महिला संस्‍थेच्‍या संचालिका डॉ. जतिंदर किश्‍तवारिया यांच्‍या हस्‍ते होणार आहे. कार्यक्रमाच्‍या अध्‍यक्षस्‍थानी कुलगुरू मा. डॉ. बी. व्‍यंकटेश्‍वरलु हे राहणार असुन हैद्राबाद येथील कृषी तंत्रज्ञान उपयोगीता संशोधन संस्‍थेचे संचालक डॉ. वाय. जी. प्रसाद, संशोधन संचालक डॉ. दत्‍तप्रसाद वासकर, विस्‍तार शिक्षण संचालक डॉ. बी. बी. भोसले यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे, अशी माहिती कार्यशाळेच्‍या आयोजिका गृहविज्ञान महाविद्यालयाच्‍या सहयोगी अधिष्‍ठाता तथा प्राचार्या प्रा. विशाला पटणम व प्रा. जयश्री झेंड यांनी कळविली आहे.

Friday, September 16, 2016

वनामकृवि विकसित रबी पीकांचे बियाणे विक्रीसाठी १९ सप्‍टेबर पासुन उपलब्‍ध

वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाने विकसित केलेल्‍या विविध रबी पीकांचे बियाणे विक्री १९ सप्‍टेबर पासुन परभणी मुख्‍यालयी उपलब्‍ध होणार असुन रबी ज्‍वारीचे परभणी मोती, करडईचे पीबीएन-१२ (कुसूम), हरभरा पीकाचे आकाश आदी वाणाचे बियाणे उपलब्‍ध असल्‍याची माहिती सहयोगी संचालक (बियाणे) डॉ. व्‍ही. डी. सोळुंके यांनी कळविले आहे.

Thursday, September 15, 2016

आई-वडील, शिक्षक व मातीस विसरू नका........पोलिस निरिक्षक श्री. अशोक घोरबांड

परभणी कृषी महाविद्यालयात आयोजीत गणेशोत्‍सवाच्‍या व्‍याख्‍यनमालेचे गुंफले तिसरे पुष्‍प
विद्यार्थ्‍यांनी आई, वडील, शिक्षक व मातीस विसरू नये, यांच्‍या मुळेच माणसे मोठी होतात. आई-वडीलांच्‍या अपेक्षा पुर्ण करा, आयुष्‍यात माणुसकी जपली पाहिजे, असा सल्‍ला पोलिस निरिक्षक श्री. अशोक घोरबांड यांनी दिला. वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातंर्गत असलेल्‍या परभणी येथील कृषी महाविद्यालयाच्‍या विद्यार्थ्‍यांच्‍या वतीने गणेशोत्‍सवानिमित्‍त विविध विषयावर व्‍याख्‍यानमालेचे आयोजन करण्‍यात आले होते, दिनांक १४ सप्‍टेबर रोजी या व्‍याख्‍यानमालेचे तिसरे पुष्‍प गुंफतांना पोलिस निरीक्षक श्री. अशोक घोरबांड बोलत होते. ाविद्यालयाच्‍या या परभणी येथी कार्यक्रमाच्‍या अध्‍यक्षस्‍थानी प्राचार्य डॉ. डि. एन. गोखले होते तर विभाग प्रमुख डॉ. आर. डी. आहीरे, डॉ. ए. एस. कार्ले, गणेशोत्‍सव समिती अध्‍यक्ष प्रविण पोपळघट, उपाध्‍यक्ष ज्ञानेश्‍वर कदम यांची व्‍यासपीठावर उपस्थिती होती.
पोलिस निरिक्षक श्री. अशोक घोरबांड मार्गदर्शन करतांना पुढे म्‍हणाले की, स्‍पर्धेपरिक्षेचा अभ्‍यास करतांना नियोजन करा, अभ्‍यासात स्‍वत: ला पुर्णपणे झोकुण द्या, यश तुम्‍हचेच आहे. अपयशाने खचु नका, पुन्‍हा उभे रहा. घामाला सुगंध असतो, मेहनत करा. आज ज्ञानाची अनेक दालने खुली आहेत, त्‍यांचा वापर करा. म‍हाविद्यालयीन जीवनात रॅगींग, भांडणे, दारूचे व्‍यसन आदीपासुन दुर रहा. युवकांत मोठे सामर्थ्‍य असते, त्‍याचा योग्‍य वापर करा. विद्यार्थ्‍यांत नम्रता असली पाहिजे. शेतकरी हा शेतीचा पुजारी असुन देशाचा अन्‍नदाता आहे, कृषीच्‍या विद्यार्थ्‍यांना त्‍यांची सेवा करण्‍याची संधी आहे.
अध्‍यक्षीय समारोपात प्राचार्य डॉ. डि एन गोखले म्‍हणाले की, समाजाचा पोलिसांबाबतचा दृष्‍टीकोन बदलत असुन पोलिस सर्वसामान्‍यांना आपला वाटला पाहिजे. कार्यक्रमात मीरा आवरगंड हिनेही आपले मनोगत व्‍यक्‍त केले. कार्यक्रमाचे प्रास्‍ताविक केदार बारोळे यांनी केले. सुत्रसंचालन वैभव बदोले यांनी केले तर आभार प्रदिप थोरवे यांनी मानले. कार्यक्रमास महाविद्यालयातील अधिकारी, कर्मचारी व विद्या‍र्थ्‍यी मोठया संख्‍येने उपस्थित होते.

Monday, September 12, 2016

सुप्रसिध्‍द कवि प्रा. इन्‍द्रजित भालेराव यांच्‍या कवितांनी कृषीच्‍या विद्यार्थ्‍यात चढले स्‍फुरण

परभणी कृषी महाविद्यालयातील विद्यार्थ्यी आयोजीत गणेशोत्‍सवाच्‍या व्‍याख्‍यनमालेचे प्रा. इन्‍द्रजित भालेराव यांनी गुंफले दुसरे पुष्‍प
वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातंर्गत असलेल्‍या परभणी येथील कृषी महाविद्यालयाच्‍या विद्यार्थ्‍यांच्‍या वतीने गणेशोत्‍सवानिमित्‍त विविध विषयावर व्‍याख्‍यानमालेचे आयोजन करण्‍यात आले असुन दिनांक ८ सप्‍टेबर रोजी या व्‍याख्‍यानमालेचे दुसरे पुष्‍प सुप्रसिध्‍द कवी प्रा. इन्‍द्रजित भालेराव यांनी गुंफले. ाविद्यालयाच्‍या या परभणी येथी कार्यक्रमाच्‍या अध्‍यक्षस्‍थानी प्राचार्य डॉ. डि. एन. गोखले होते तर प्राचार्य डॉ. विलास पाटील, सहयोगी अधिष्‍ठाता डॉ डि बी देवसरकर, विभाग प्रमुख डॉ. बाबासाहेब ठोंबरे, डॉ. आर. डी. आहीरे, डॉ. पी. आर. झंवर, गणेशोत्‍सव समिती अध्‍यक्ष प्रविण पोपळघट, उपाध्‍यक्ष ज्ञानेश्‍वर कदम यांची व्‍यासपीठावर उपस्थिती होती.
कार्यक्रमात कवी प्रा. इन्‍द्रजित भालेराव यांनी कवितेच्‍या माध्‍यमातुन शेतक-यांचे अर्थशास्‍त्र, समाजशास्‍त्र, मानसशास्‍त्र आदिंची मांडणी केली. कार्यक्रमाचा प्रारंभ विद्यापीठ गीतांनी केली,  
शेती संस्‍कृतीचे कुळ
शेती संस्‍कृतीचे कुळ शेती जीवनाचे मूळ
आम्‍ही लावितो कपाळी रान मळयातली धुळ
इथे शिकवितो आम्‍ही कसे वाढावे झाडाने
इथे ठरवितो आम्ही कसे पिकावे पाडाने
आम्‍ही संशोधनातून देश नेतो पुढे पुढे
शेतकरी बांधवांना आम्‍ही शिकवितो धडे
कसे होतील हिरवे आज सुकलेले माळ

लढायला शिक
शिक बाबा शिक लढायला शिक
कुणब्‍याच्‍या पोरा आता लढायला शिक
जातील हे दीस आणि होईलही ठीक
उद्या तुझ्या शेतामधी उधाणेल पीक
गाळलेल्‍या घामासाठी रस्‍त्‍यावर टीक
कुणब्याच्‍या पोरा आता लढायला शिक’  

या कवितेच्‍या माध्‍यमातुन कवीने शेतक-यांना लढणाचा संदेश दिला

दोस्‍ता
ही कविता सादर करून गावाकडील परिस्थितीचे भान करून दिले

काटयाकुटयाचा तुडवित रस्‍ता
माझ्या गावाकडं चल माझ्या दोस्‍ता
जेव्‍हा दुष्‍काळ, दुष्‍काळ घिरटया घाली
तव्‍हा गावाला, गावाला कुणी ना वाली
कसे सुगीत घालतात गस्‍ता माझ्या गावाकडं.....
या भूमीचा, भूमीचा मूळ अधिकारी
बाप झालाय, झालाय आज भिकारी
गाव असून झालाय फिरस्‍ता, माझ्या गावाकडं...

आधी घडवा चरित्र आपले
घडवा आपला गाव
मग घ्‍या छत्रपतीचे नाव

या कवितेतुन विद्य‍ार्थ्‍यांना आपले चरित्र घडविण्‍याचा सल्‍ला त्‍यांनी दिला.


अध्‍यक्षीय समारोपात प्राचार्य डॉ. डि एन गोखले म्‍हणाले की, प्रा इन्‍द्रजित भालेराव कवितेच्‍या माध्‍यमातुन शेतक-यांचे असलेले विदारक चित्र सर्वस्‍तरापर्यंत पोहचविण्‍याचे मोठे कार्य करीत आहेत. कार्यक्रमाचे प्रास्‍ताविक केदार यांनी केले तर प्रमुख व्‍यक्‍त्‍यांचा परिचय ज्ञानेश्‍वर शिंदे यांनी दिला. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन संदिप खरबळ यांनी केले तर आभार स्‍वप्‍निल भोसले यांनी मानले. कार्यक्रमास महाविद्यालयातील अधिकारी, कर्मचारी व विद्या‍र्थ्‍यी मोठया संख्‍येने उपस्थित होते.

Sunday, September 11, 2016

गृहविज्ञान विस्‍तार व संदेशवहन व्‍यवस्‍थापन विभागात छायाचित्रीकरणावर तीन दिवसीय प्रशिक्षण संपन्‍न

वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठांतर्गत असलेल्‍या गृहविज्ञान महाविद्यालयाच्‍या गृहविज्ञान विस्‍तार व संदेशवहन व्‍यवस्‍थापन विभागाच्‍या वतीने दिनांक १ ते ३ सप्‍टेंबर दरम्‍यान छायाचित्रिकरण (व्हिडीयोग्राफी) या विषयावर तीन दिवसीय प्रशिक्षण संपन्‍न झाले. सदरिल प्रशिक्षणात प्रशिक्षणार्थीना विविध कॅमे-यांची ओळख, विविध प्रकाराचे चित्रीकरण, एडिटींग, मिक्सिंग आदी विषयावर प्रात्‍यक्षिकांसह मार्गदर्शन करण्‍यात आले. प्रशिक्षण कार्यक्रमाचा समारोप महिला आर्थिक विकास महामंडहचे जिल्‍हा समन्‍वयक श्री एम सी पटेल यांच्‍या उपस्थितीत झाला. कार्यक्रमाच्‍या अध्‍यक्षस्‍थानी प्रशिक्षणाचे समन्‍वयीका डॉ प्रभा अंतवाल या होत्‍या तर श्री. योगेश देशमुख हे विशेष अतिथी होते. विद्यापीठातील सोळा विद्यार्थ्‍यांनी प्रशिक्षणात सहभाग नोंदविला, समारोपीय कार्यक्रमात मान्‍यवरांच्‍या हस्‍ते प्रमाणपत्राचे वितरण करण्‍यात आले. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन सौ चित्रा बेल्लुरकर यांनी केले तर आभार सौ शितल राठोड यांनी मानले.