Monday, October 19, 2020

वनामकृविच्‍या इतिहासात केवळ एका निविष्‍ठा पासुन विक्रमी महसुल प्राप्‍त होण्‍याची पहिलीच वेळ ....... कुलगुरू मा डॉ अशोक ढवण

वनामकृवि विकसित बॉयोमिक्‍स ची विक्रमी विक्रीआर्थिक वर्षात आजपर्यंत अडीच कोटी पेक्षा जास्त महसुल जमा, राज्‍यातील व परराज्‍यातील हळद उत्‍पादकांमध्‍ये मोठी मागणी

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील वनस्‍पती रोगशास्‍त्र विभागात विविध पिकांकरिता उपयुक्‍त सुक्ष्‍म बुरशी व जीवाणुंचे मिश्रण असलेले बॉयोमिक्‍सची या आर्थिक वर्षात 2 कोटी 56 लाखाची विक्रमी अशी विक्री झाली. यानिमित्‍त बायोमिक्‍स विक्री लक्षपुर्ती सोहळा व द्रवरूप ट्रायकोडर्मा माऊफंग चे उदघाटन कार्यक्रम दिनांक 19 आक्‍टोबर रोजी संपन्‍न झाला. कार्यक्रमाच्‍या अध्‍यक्षस्‍थानी कुलगुरू मा डॉ अशोक ढवण हे होते तर संशोधन संचालक डॉ दत्‍तप्रसाद वासकर, शिक्षण संचालक डॉ धर्मराज गोखले, सहयोगी अधिष्‍ठाता डॉ सय्यद इस्‍माईल, सहयोगी अधिष्‍ठाता (निम्‍न शिक्षण) डॉ डी एन धुतराज आदींची प्रमुख उपस्थिती होती. 

अध्‍यक्षीय भाषणात कुलगुरू मा डॉ अशोक ढवण म्‍हणाले की, यावर्षी कोरोना रोगाचा प्रादुर्भाव व लॉकटाऊन असुनही एप्रिल पासुन आजपर्यंत विद्यापीठ निर्मित बॉयोमिक्‍स 170 मेट्रिक टन अशी विक्रमी विक्री होऊन 2 कोटी 5लाख रूपयाचा महसुल विद्यापीठास प्राप्‍त झाला. विद्यापीठाच्‍या इतिहासात केवळ एका निविष्‍ठापासुन विक्रमी महसुल प्रथमच प्राप्‍त झाला आहे. बॉयोमिक्‍स पिक वाढीकरिता वरदान ठरत असुन बॉयोमिक्‍सला शेतकरी बांधवामध्‍ये मोठी मागणी आहे. राज्‍यातुनच नव्‍हे तर परराज्‍यातुनही शेतकरी बांधव लांबच लांब रांगा लावुन बॉयोमिक्‍स खरेदी करतात, ही विद्यापीठावरील दर्जेदार निविष्‍ठांवर असलेला शेतकरी बांधवाचा विश्‍वास आहे. लवकरच बियाणे विक्री प्रमाणे विद्यापीठ विकसित बॉयोमिक्‍स व इतर जैविक उत्‍पादके मराठवाडयातील विविध जिल्‍हयात विक्री करिता उपलब्‍ध करण्‍यात येणार असल्‍याचे ते म्‍हणाले.

संशोधन संचालक डॉ दत्‍तप्रसाद वासकर आपल्‍या भाषणात म्‍हणाले की, बॉयोमिक्‍स व इतर विद्यापीठ निविष्‍ठा विक्री करता स्‍वतंत्र ऑनलॉईन पोर्टल लवकरच तयार करण्‍यात येणार असुन शेतकरी बांधवाना निविष्‍ठाची उपलब्‍धता व किंमत यांची माहिती होऊन ऑनलाईन बुकिंगची सुविधा करण्‍यात येणार असल्‍याचे सांगितले. तर शिक्षण संचालक डॉ धर्मराज गोखले म्‍हणाले की, विभागात मर्यादित मनुष्‍यबळ असतांनाही पदवी व पदव्‍युत्‍तर शिक्षण, कृषि विस्‍तार व संशोधन कार्यात कोणतीही बाधा येऊ न देता, बॉयोमिक्‍सची विक्रमी निर्मिती व विक्री झाली असुन निश्चितच विभागातील सर्व प्राध्‍यापक व कर्मचारी यांचे योगदान मोठे असल्‍याचे म्‍हणाले

कार्यक्रमा बायोमिक्‍स विक्री लक्षपुर्ती बाबत कुलगुरू मा डॉ अशोक ढवण यांच्‍या हस्‍ते विभाग प्रमुख डॉ कल्‍याण आपेट सह विभागातील कार्यरत प्राध्‍यापक व कर्मचारी यांचा सत्‍कार करण्‍यात आला. तसेच माऊफंग या ट्रायकोडर्मा जैविकांचे द्रवरूप मिश्रणाच्‍या विक्रीचे उदघाटन करण्‍यात आला. याप्रसंगी मान्‍यवरांच्‍या हस्‍ते डॉ चंद्रशेखर अंबाडकर, डॉ कल्‍याण आपेट व डॉ मिनाक्षी पाटील लिखित अळिंबी लागवड तंत्रज्ञान पुस्तिकेचे विमोचन करण्‍यात आले.

कार्यक्रमाच्‍या प्रास्‍ताविकात डॉ कल्‍याण आपेट म्‍हणाले की, बॉयोमिक्‍साचा वापर गेल्‍या तीन वर्षापासुन शेतकरी बांधव करीत आहेत, विशेषत: हळद पिकात यामुळे चांगली वाढ होतांना दिसत आहे. हे बॉयोमिक्‍स बुरशीजन्‍य रोगांचा प्रतिबंध होण्‍यास उपयुक्‍त असुन झाडांची व रोपाची वाढ चांगली होऊन उत्‍पादन वाढ होत असल्‍यामुळे राज्‍यातील हजारो शेतकरी हे बॉयोमिक्‍स खरेदी करण्‍यात येतात. सुत्रसंचालन डॉ मिनाक्षी पाटील यांनी केले तर आभार डॉ चंद्रशेखर अंबाडकर यांनी मानले. कार्यक्रमास प्राचार्य डॉ उदय खोडकेप्राचार्य डॉ अरविंद सावते आदीसह विविध विभागाचे विभाग प्रमुख, प्राध्‍यापक, कर्मचारी उपस्थित होते.

वनामकृवि  निर्मीत माऊफंग  : ट्रायकोडर्मा जैविकांचे द्रवरूप  मिश्रण 

माऊफंग हे एक जमिनीतील उपयुक्‍त सुक्ष्‍म बुरशी व जिवाणुंचे अनोखे मिश्रण असुन या मिश्रणामध्‍ये ट्रायकोडर्माच्‍या विविध प्रजाती तसेच सुडोमोनास फ्ल्‍युरोसन्‍स या उपयुक्‍त जीवाणुचा समावेश आहे. माऊफंग मुळे पिकावरील मर, रोपावस्‍थेतील मर, आले व हळदीवरील कंदकुज व पानावरील करपा या रोगांचा बंदोबस्‍त होतो तसेच बियाण्‍यांव्‍दारे उत्‍पन्‍न होणा-या बुरशीजन्‍य रोगांचा प्रतिबंध होण्‍यास या मिश्रणाचा  उपयोग होतो. या मिश्रणाचा उपयोग भाजीपाला पिके, फळपिके, तृणधान्‍य, गळितधान्‍य, कापसु, उस या सारख्‍या पिकांसाठी करता येतो. या मिश्रणाच्‍या वापरामुळे झाडांची व रोपाची वाढ चांगल्‍या प्रकारे होऊन झाड सशक्‍त बनते व उत्‍पादनात वाढ होते. सदरिल मिश्रण बीजप्रक्रियेसाठी तसेच आळवणीसाठी उपयोगात आणता येते. हे मिश्रण बीजप्रक्रियेसाठी वापरावयाचे असल्‍यास 10 मिली प्रति किलो बियाण्‍यास प्रक्रिया करावी व आळवणीसाठी वापरावयाचे असल्‍यास 10 मिली प्रती लिटर पाण्‍यात मिसळुन आळवणी करावीसदरिल  माऊफंग  द्रवरूप  मिश्रण  विद्यापीठात उपलब्‍ध आहे.



Saturday, October 17, 2020

मौजे मानोली येथे प्रात्‍यक्षिकाकरीता रब्बी ज्‍वारी बियाणाचे वाटप

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठांतील अखिल भारतीय समन्‍वयीत ज्‍वार सुधार प्रकल्‍पांतर्गत मानवत तालुक्‍यातील मौजे मानोली येथील शेतकरी बांधवाना आद्यरेषीय पिक प्रात्‍यक्षिकांतर्गत परभणी सुपर मोती व सीएसव्‍ही २९ आर या रब्‍बी ज्‍वारीचे बियाणे वाटप ज्‍वार संशोधन केंद्राचे प्रभारी अधिकारी डॉ के आर कांबळे यांच्‍या हस्‍ते दिनांक १५ ऑक्‍टोबर रोजी करण्‍यात आले. यावेळी प्रगतीशील शेतकरी श्री मदन महाराज शिंदे, ज्‍वार कृषि विद्यावेत्‍ता डॉ जी एम कोटे, शेषेराव शिंदे, रामराव शिंदे, विठ्ठल शिंदे आदींची उपस्थिती होती.

यावेळी रब्‍बी ज्‍वार लागवडीबाबत मार्गदर्शन करतांना डॉ के आर कांबळे  म्‍हणाले की, संतुलीत आहारात ज्‍वारीचे महत्‍व असुन ज्‍वारीचा कडबा जनावरांसाठी चांगले खाद्य आहे. रब्‍बी करिता विद्यापीठ विकसित परभणी सुपर मोती हे वाण ज्‍वारी व कडब्‍याकरीता चांगला वाण आहे. तसेच खरीप हंगामातील परभणी शक्‍ती या वाणात लोह व जस्‍ताचे प्रमाण इतर वाणापेक्षा अधिक आहे. प्रास्‍ताविक डॉ जी एम कोटे यांनी केले, कार्यक्रमास गावातील शेतकरी बांधव मोठया संख्‍येने उपस्थित होते.

Friday, October 16, 2020

सामुदायिक विज्ञान महाविद्यालयात जागतिक अन्न दिन साजरा

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील सामुदायिक विज्ञान महाविद्यालयाच्‍या अन्न विज्ञान व पोषण विभागाच्‍या वतीने दिनांक १६ ऑक्टोबर रोजी जागतिक अन्न दिन साजरा करण्‍यात आला. यानिमित्ताने पोषण शास्त्र विषयकप्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. प्रदर्शनाचे उद्घाटन महाविद्यालयाच्या प्रभारी प्राचार्या डॉ. जया बंगाळे यांच्या शुभ हस्ते करण्यात आले तर कार्यक्रमास माजी विभाग प्रमुख डॉ. आशा आर्य प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या. प्रदर्शनात पोषण व आहाराविषयी माहिती फलके, पौष्टिक पदार्थ, उपचारात्मक पदार्थ, संरक्षित पदार्थ ठेवण्यात आले होते. वजन कमी करण्याकरिता विशेष पदार्थ तयार करण्‍यात आले. कोरोणा विषयक सर्व बाबी लक्षात ठेवून सामाजिक अंतर राखून महाविद्यालयातील कर्मचा­यांची आरोग्य तपासणी करण्‍यात आली, यात रक्तदाब तपासणी, रक्तशर्करा तपासणी, वजन आणि उंची घेऊन बीएमआई काढून देण्यात आले. कार्यक्रमाच्या आयोजनासाठी विभाग प्रमुख डॉ. तसनीम नाहीद खान, डॉ. फारोखी फरजाना, श्रीमती जोत्स्ना नेर्लेकर आदींनी परिश्रम घेतले.

Tuesday, October 13, 2020

कृषिचा पदवीधर केवळ नौकरदार न बनता, नौकरी देणारा दाता बनला पाहिजे ..... कुलगुरू मा डॉ एन एस राठौर

वनामकृविच्‍या वतीने आयोजित एक दिवसीय ऑनलाईन राष्‍ट्रीय वेबीनार मध्‍ये प्रतिपादन 

भारतात तब्बल ३४ वर्षांनंतर नवीन शैक्षणिक धोरण २०२० तयार करण्यात आले असुन नवीन शैक्षणिक धोरणा मध्ये एकूण राष्ट्रीय उत्पन्नाच्या (जीडीपी) किमान ६ टक्के शिक्षणावर खर्च करण्‍याचे उद्दीष्‍ट आहे. सदरिल धोरणानुसार कृषि शिक्षणात ही बदल करण्‍यात येणार असुन कृषिचा पदवीधर केवळ नौकरदार न बनता, नौकरी देणारा दाता बनला पाहिजे, असे धोरण राबविण्‍यात येणार आहे, असे प्रतिपादन उदयपुर (राजस्‍थान) येथील महाराणा प्रताप कृषि व तंत्रज्ञान विद्यापीठाचे कुलगुरू मा डॉ एन एस राठौर यांनी केले.

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठांतील शिक्षण संचालनालय व राष्‍ट्रीय उच्‍च कृषि शिक्षण प्रकल्‍प (नाहेप) यांचे संयुक्‍त विद्यमाने नवीन शै‍क्षणिक धोरण २०२० च्‍या पार्श्‍वभुमीवर भारतातील कृषि शिक्षणाचे पुनरूज्‍जीवन यावरील आयोजित एक दिवसीय ऑनलाईन राष्‍ट्रीय वेबीनार प्रसंगी प्रमुख व्‍यक्‍ते म्‍हणुन (दिनांक १२ आक्‍टोबर रोजी) ते बोलत होते. कार्यक्रमाच्‍या अध्‍यक्षस्‍थानी कुलगुरू मा डॉ अशोक ढवण होते तर वेबिनारचे मुख्‍य आयोजक शिक्षण संचालक डॉ धर्मराज गोखले, नाहेप प्रकल्‍प अन्‍वेषक डॉ गोपाल शिंदे, डॉ राजेश कदम आदींची प्रमुख उपस्थिती होती.

मा डॉ एन एस राठौर पुढे म्‍हणाले की, कृषि विद्यापीठात पाचव्‍या अधिष्‍ठाता समितीनुसार राबविण्‍यात येते असलेले अभ्‍यासक्रम नवीन शैक्षणिक धोरणाशी अनुरूपच आहे. लवकरच भारतीय कृषि अनुसंधान परिषद, नवी दिल्‍ली याबाबत धोरण निश्चित करणार आहे. या धोरणात विद्यार्थीची कौशल्‍य व गुणवत्‍ता वृध्‍दीवर भर देण्‍यात येणार आहे. यात विविध अभ्‍यासक्रमात आंतरशाखीय धोरण राबविण्‍यात येणार असुन विद्यार्थी आपल्‍या क्षमतेनुसार व आवडीनुसार कोणत्‍याही विविध शाखेत प्रवेश घेण्‍यास पात्र राहील. महाविद्यालयीन शिक्षणात कला, वाणिज्य, विज्ञान, कृषि अशा शाखा प्रवेश प्रक्रियेत आहेत. पण नवीन मसुद्यानुसार कोणत्‍याही शाखांमधले काही विषय निवडून विद्यार्थ्यांना पदवीचे शिक्षण घेता येणार आहे. देशपातळी उच्च शिक्षण नियामक अशी एकच संस्था स्थापन करण्यात येईल. उच्च शिक्षण संस्थांच्या स्वायतत्तेला आणि गुणवत्तेला प्राधान्य देणे. गुणवत्तापूर्ण संशोधनाला चालना देण्यात येणार आहे. उच्च शिक्षण ही स्वायत्त आणि स्वतंत्र अस्तित्व असलेली संस्था म्हणून काम करेल आणि स्वतःचे शैक्षणिक निर्णय स्वतः घेईल. पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रम तयार करतांना ते आंतरराष्ट्रीय शिक्षणाचा दर्जा आणि गुणवत्ता लक्षात घेऊन त्या समकक्ष राहतील यासाठी प्रयत्न करणे आवश्‍यक आहे. येणा-या काळात अध्‍यापन, संशोधन, विस्‍तार आणि उद्योजकता यावर आधारीत शिक्षण प्रमाणीचा विकास होणार आहे. आयआयटीच्‍या धर्तीवर महाराष्‍ट्रातही कृषि शिक्षणाकरिता  एखादी संस्‍था निर्माण व्‍हावी, अशीही अपेक्षा त्‍यांनी यावेळी व्‍यक्‍त केली.

अध्‍यक्षीय समारोपात मा डॉ अशोक ढवण म्‍हणाले की, नवीन शैक्षणिक धोरणात प्रात्‍याक्षिकांवर अधिक भर देण्‍यात येणार असुन डिजिटल व माहिती तंत्रज्ञानाचा वापर वाढणार आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवर आवश्यक कृषि क्षेत्रातील उद्योजकांना लागणा-या मनुष्‍यबळानुसार विद्यार्थीमध्‍ये उद्योजकता व कौशल्‍य विकास करण्‍याचे उद्दीष्‍ट नवीन शैक्षणिक धोरणात अपेक्षित आहे.

कार्यक्रमाच्या प्रास्‍ताविकात शिक्षण संचालक डॉ धर्मराज गोखले यांनी नवीन शैक्षणिक धोरणात गुणवत्तेला अधिक महत्व राहणार असल्याचे सांगितले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन डॉ रणजित चव्‍हाण यांनी केले तर आभार डॉ आयएबी मिर्चा यांनी मानले. ऑनलाईन वेबीनार मध्‍ये झुम मिंटिंग व युटयुब च्‍या माध्‍यमातुन देशातील व राज्‍यातील तीन हजार पेक्षा जास्‍त कृषिचे विद्यार्थ्‍यी, प्राध्‍यापक, शास्‍त्रज्ञ, कृषि विस्‍तारकांनी सहभाग नोंदविला. वेबीनारचे समन्‍वयक डॉ गोपाल शिंदे, डॉ राजेश कदम, डॉ रणजित चव्‍हाण, डॉ प्रविण कापसे, डॉ शिवांनद कल्‍याणकर, डॉ आयएबी मिर्चा हे होते.

Sunday, October 11, 2020

वनामकृविच्‍या वतीने भारतातील कृषि शिक्षणाचे पुनरूज्‍जीवन यावर एक दिवसीय ऑनलाईन राष्‍ट्रीय वेबीनारचे आयोजन

उदयपुर (राजस्‍थान) येथील महाराणा प्रताप कृषि व तंत्रज्ञान विद्यापीठाचे कुलगुरू मा डॉ एन एस राठोर करणार मार्गदर्शन

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठांतील शिक्षण संचालनालय व राष्‍ट्रीय उच्‍च कृषि शिक्षण प्रकल्‍प (नाहेप)  यांच्‍या  वतीने नवीन शै‍क्षणिक धोरण २०२० च्‍या पार्श्‍वभुमीवर भारतातील कृषि शिक्षणाचे पुनरूज्‍जीवन यावर एक दिवसीय ऑनलाईन राष्‍ट्रीय वेबीनारचे दिनांक १२ आक्‍टोबर रोजी सकाळी १२.०० वाजता आयोजन करण्‍यात आले आहे. उदयपुर (राजस्‍थान) येथील महाराणा प्रताप कृषि व तंत्रज्ञान विद्यापीठाचे कुलगुरू मा डॉ एन एस राठोर प्रमुख मार्गदर्शक असुन कार्यक्रमाच्‍या अध्‍यक्षस्‍थानी कुलगुरू मा डॉ अशोक ढवण राहणार आहे. ऑनलाईन वेबीनार मध्‍ये सहभागी होण्‍याकरिता झुम आयडी ९४४ ७२२३ ०७९४ व पासवर्ड १२३४५६ याचा वापर करावा तसेच वेबीनारचे थेट प्रेक्षपण विद्यापीठ युटयुब चॅनेल youtube.com/user/vnmkv यावर होणार आहे. तरी ऑनलाईन राष्‍ट्रीय वेबीनार मध्‍ये कृषिचे विद्यार्थ्‍यी, प्राध्‍यापक, शास्‍त्रज्ञ, कृषि विस्‍तारक आदींनी जास्‍तीत जास्‍त संख्‍येने सहभाग नोंदवावा, असे आवाहन मुख्‍य आयोजक शिक्षण संचालक डॉ धर्मराज गोखले यांनी केले आहे. वेबीनारचे समन्‍वयक डॉ गोपाल शिंदे, डॉ राजेश कदम, डॉ रणजित चव्‍हाण, डॉ प्रविण कापसे, डॉ शिवांनद कल्‍याणकर, डॉ आयएबी मिर्चा हे आहेत.



Saturday, October 10, 2020

जमिनीतील सेंद्रीय कर्ब वाढीकरिता विशेष प्रयत्‍न करावे लागतील ....... कुलगुरू मा डॉ विलास भाले

वनामकृवित आयोजित पंधरा दिवसीय राज्‍यस्‍तरीय ऑनलाईन सेंद्रीय शेती प्रशिक्षण कार्यक्रमाचा समारोप

रासायनिक निविष्‍ठांचा वापर करून अन्‍नधान्‍य उत्‍पादनात आपण वाढ करून शकलो, आज शेतीतील खर्च वाढत आहे, परंतु त्‍या प्रमाणात उत्‍पन्‍नात वाढ होत नाही. कृषि विद्यापीठांनी सेंद्रीय खतांसह रासायनिक खतांचा योग्‍य वापर करण्‍याची शिफारस केली, परंतु शेतीत सेंद्रीय खतांचा वापर न करता केवळ रासायनिक खतांचा अतिरेकी व अयोग्‍य वापरामुळे जमिनीतील सेंद्रीय कर्बाचे प्रमाण कमी झाले आहे. जमिनीतील सेंद्रीय कर्ब वाढीकरिता विशेष प्रयत्‍न करावे लागतील. शेतातील पिकांचे अवशेष जाळुन न टाकता, त्‍याचे जमिनीतच जागेवर कुचुन चांगले खत तयार होते. सेंद्रीय शेतीत ग्राहकांचा विश्‍वास संपादन गरजेचे असुन चांगल्‍या बाजारभावाकरिता सेंद्रीय शेतमालाचे प्रमाणिकरण आवश्‍यक आहे. शेतकरी गटांचा माध्‍यमातुन सेंद्रीय शेतमालाची प्रक्रिया, पॅकिंग, ब्रॅडिंग आदींवर भर दयावा लागेल. सेंद्रीय शेतीत जैविक खते, जैविक किटकनाशके, जैविक बुरशीनाशके आदी जैविक निविष्‍ठांचा वापर करावा लागेल, असे प्रतिपादन अकोला येथील डॉ पंजाबराव देशमुख कृषि विद्यापीठाचे कुलगुरू मा डॉ विलास भाले यांनी केले.

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील सेंद्रीय शेती संशोधन आणि प्रशिक्षण केंद्र, पशुशक्‍तीचा योग्‍य वापर प्रकल्‍प व फार्म टु फोर्क सोल्‍युशन्‍स, मुंबई यांचे संयुक्‍त विद्यमाने पंधरा दिवसीय राज्‍यस्‍तरीय ऑनलाईन सेंद्रीय शेती प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन दिनांक २१ सप्‍टेंबर ते ९ ऑक्‍टोबर दरम्‍यान करण्‍यात आले होते, सदरिल प्रशिक्षणाच्‍या समारोपा प्रसंगी (९ ऑक्‍टोबर रोजी) ते बोलत होते. कार्यक्रमाच्‍या अध्‍यक्षस्‍थानी कुलगुरू मा डॉ अशोक ढवण हे होते तर प्रमुख पाहुणे म्‍हणुन राष्‍ट्रीय कामधेनु आयोगाचे सदस्‍य मा डॉ सुनिल मानसिंहका हे उपस्थित होते. संशोधन संचालक डॉ दत्‍तप्रसाद वासकर, महाराष्‍ट्र पशु व मत्‍स्‍य विज्ञान विद्यापीठाचे संशोधन संचालक डॉ नितीन कुरकुरे, भोपाळ येथील केंद्रीयकृषि अभियांत्रिकी संस्‍थ्‍ेातील पशुशक्‍तीचा योग्‍य वापर प्रकल्‍पाचे प्रकल्‍प समन्‍वयक डॉ महाराणी दीन, भारतीय कृषि संशोधन संस्‍थेचे शास्‍त्रज्ञ डॉ सुभाष बाबु, औरंगाबाद विभागाचे कृषि सहसंचालक डॉ दिनकर जाधव, प्रगतशील शेतकरी डॉ सुर्यकांतराव देशमुख, मुख्‍य आयोजक प्रमुख अन्वेषक डॉआनंद गोरेपशुशक्तीचा योग्य वापर योजनेचे संशोधन अभियंत्‍या डॉस्मिता सोलंकीडॉरणजीत चव्हाण आदींची प्रमुख उपस्थिती होती.

अध्‍यक्षीय भाषणात कुलगुरू मा डॉ अशोक ढवण म्‍हणाले की, सद्यस्थितीत शेतीतील वाढता खर्च, जमिनीची खालवत जाणारी गुणवत्‍ता व शेतमालास अपेक्षित किमान दर मिळत नसल्‍यामुळे शेती ही कष्‍टप्रत होत आहे. शेतीत पशुधन हद्दपार होत आहे. मानवाच्‍या व पर्यावरणाच्‍या आरोग्‍याच्‍या दृष्‍टीने सेंद्रीय शेतीचे महत्‍व वाढत आहे. सेंद्रीय शेतीत पशुधनाचे अत्‍यंत महत्‍व असुन देशी गोवंश संवर्धन करण्‍याची गरज आहे. विद्यापीठ आयोजित पंधरा दिवसीय राज्‍यस्‍तरीय सेंद्रीय शेतीवरील प्रशिक्षाणास राज्‍यातील विविध जिल्‍हयातील पाच हजार पेक्षा जास्‍त प्रशिक्षणार्थी, व शेतकरी बांधव सहभागी होऊन भरभरून प्रतिसाद दिला, यामुळे विद्यापीठाची जबाबदारी वाढली आहे.

प्रमुख पाहुणे मा डॉ सुनिल मानसिंहका आपल्‍या मार्गदर्शनात म्‍हणाले की, शेतकरी बांधवासह मानवाचे आरोग्‍य शेतीच्‍या आरोग्‍यावर अवलंबुन आहे. भारतीय गोवंश व शेतीचे अतुट नाते असुन भाकड गायीचेही महत्‍व आहे. सेंद्रीय शेतीत पशुधन,जीवजंतु आदींचे अत्‍यंत महत्‍व आहे. देशी गोवंशाचे संवर्धन करावे लागेल, पंचगव्‍यात मनुष्‍याचे अनेक आजार कमी करण्‍याची ताकद आहे, असे ते म्‍हणाले.

यावेळी मार्गदर्शनात डॉ दत्‍तप्रसाद वासकर यांनी करोना रोगाच्‍या प्रादुर्भावात विद्यापीठ आयोजित ऑनलाईन प्रशिक्षणास राज्‍यातील कान्‍याकोप-यांतील शेतकरी बांधवानी सहभाग नोंदविला, सेंद्रीय शेतीतील पिक लागवड पासुन ते विक्री व्‍यवस्‍थापन आदी विविध विषयांवर देशातील नामांकित कृषि शास्‍त्रज्ञ, कृषि अधिकारी व धोरणकर्त्‍यांनी मार्गदर्शन केले, याचा निश्चितच लाभ होणार असल्‍याचे सांगितले तर डॉ नितीन कुरकुरे यांनी सेंद्रीय शेतीत पशुधनाचे महत्‍व आपल्‍या भाषणात अधोरेखित केले. तसेच डॉ महाराणी दीन यांनी सेंद्रीय शेतीत बैलचलित अवजाराचे महत्‍व सांगितले व डॉ सुभाष बाबु यांनी सेंद्रीय शेतीत एकात्मिक पिक व्‍यवस्‍थापनावर मार्गदर्शन केले. डॉ दिनकर जाधव यांनी सेंद्रीय शेतीचे मॉडेल विकसित करण्‍याची गरज असल्‍याचे सांगितले तर प्रगतशील शेतकरी डॉ सुर्यकांतराव देशमुख यांनी सेंद्रीय शेतीची चळवळ सर्वांच्‍या सहकार्यांने पुढे नेण्‍याची गरज असल्‍याचे मत व्‍यक्‍त केले. 

प्रास्‍ताविक प्रकल्‍पाचे प्रमुख अन्‍वेषक डॉ आनंद गोरे यांनी केले. सुत्रसंचालन जनसंपर्क अधिकारी डॉ प्रविण कापसे यांनी केले तर आभार संशोधन अभियंत्‍या डॉ स्मिता सोलंकी यांनी मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी डॉ राहुल रामटेके, डॉ पपिता गौरखेडे, डॉ अनुुुुुुराधा लाड, प्रा ज्‍योती गायकवाड, डॉ मिनाक्षी पाटील, सुनिल जावळेश्रीधर पतंगेसतीश कटारे, योगेश थोरवट आदींनी परिश्रम घेतलेप्रशिक्षण कार्यक्रमाचा राज्यातील शेतकरी बंधू भगिनीविद्यार्थीकृषि विज्ञान केंद्राचे विषय विशेषज्ञकृषि विभागातील अधिकारी कर्मचारी यांनी मोठ्या प्रमाणावर लाभ घेतला.

Wednesday, October 7, 2020

सेंद्रीय भाजीपाला लागवड करतांना स्थानिक व देशी वाणांची निवड करा ... ज्येष्ठ भाजीपाला पैदासकार डॉ. मधुकर भालेकर

वनामकृवित  आयोजित  राज्‍यस्‍तरिय  पंधरा  दिवसीय  प्रशिक्षण  कार्यक्रमात  प्रतिपादन

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील सेंद्रीय शेती संशोधन आणि प्रशिक्षण केंद्र, पशुशक्तीचा योग्य वापर योजना, आणि फार्म टु फोर्क सोल्युशन्स, मुंबई यांचे संयुक्त विद्यमाने आयोजित राज्यस्तरीय पंधरा दिवसीय ऑनलाईन सेंद्रीय शेती प्रशिक्षण कुलगुरु मा. डॉ. अशोक ढवण व संचालक संशोधन डॉ. दत्तप्रसाद वासकर यांच्या मार्गदर्शनाखाली दिनांक 21 सप्टेंबर ते 9 ऑक्टोबर दरम्यान आयोजन करण्यात आले आहे. प्रशिक्षण कार्यक्रमाच्या  तेराव्या  दिवशी  दिनांक 5 ऑक्टोबर रोजी “सेंद्रीय भाजीपाला व फळपिके लागवड तंत्रज्ञान” या विषयंावर  व्याख्यानांचे  आयोजन करण्यात  आले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भाजीपाला संशोधन योजनेचे संशोधन अधिकारी डॉ. विश्वनाथ खंदारे, हे होते प्रमुख व्याख्याते  म्हणून राहूरी येथील महात्‍मा फुले कृषि विद्यापीठातील ज्येष्ठ भाजीपाला पैदासकार डॉ. मधुकर भालेकर व बदनापूर येथील मोसंबी संशोधन केंद्राचे प्रमुख शास्त्रज्ञ डॉ. संजय पाटील, नाशिक येथील प्रगतशील शेतकरी श्री. ज्ञानेश्वर रेवगडे,  श्री. कृष्णा घाडगे,  मुख्‍य आयोजक प्रमुख अन्वेषक डॉ. आनंद गोरे, पशुशक्तीचा योग्य वापर योजने  प्रभारी अधिकारी  डॉ. स्मिता सोलंकी,  डॉ. रणजीत चव्हाण, आदींची प्रमुख उपस्थिती होती .

अध्‍यक्षीय भाषणत डॉ. विश्वनाथ खंदारे म्‍हणाले की, आज सेंद्रीय भाजीपाला व फळ पिकांना वाढती मागणी आहे. यामुळे बाजारातील मागणी लक्षात घेऊन योग्य लागवड तंत्रज्ञानाचा अवलंब करून शेतक­-यांनी सेंद्रीय भाजीपाला व फळपिकांची लागवड करावी. जेणे करून चांगले उत्पादन तसेच अधिक बाजारभाव मिळविता येईल. सेंद्रीय शेतीमध्ये संपुर्ण लागवड तंत्रज्ञान व सेंद्रीय बियाणे उत्पादन यावर लक्ष देणे आवश्यक आहे. शेतकरी बंधू भगिनी यांनी गटाच्या  माध्यमातून  सेंद्रीय बिजोत्पादन कार्यक्रम हाती घ्यावा जेणेकरून सेंद्रीय बियाण्यांची उपलब्धता वाढेल आणि बिजोत्पादनाच्या माध्यमातून आर्थिक फायदाही होईल. 

प्रमुख वक्ते डॉ. मधुकर भालेकर आपल्‍या मार्गदर्शनात म्‍हणाले की, सेंद्रीय भाजीपाला लागवड करतांना स्थानिक व देशी वाणांची निवड करण्यावर भर दयावा. तसेच योग्य वेळ, हवामान व योग्य हंगामामध्ये भाजीपाला पिकांची लागवड केल्यास भाजीपाल्यावर रोग, किडीचे प्रमाण कमी राहते. तसेच भाजीपाला पिकामध्ये किड व रोगांचे नियंत्रणासाठी  लिंबोळी अर्क सारखे सेंद्रीय घटकाव्दारे प्रभावी नियंत्रण करता येते व मालाची गुणवत्ता टिकून राहते. भाजीपाला  रोप निर्मिती करतांना नायलॉन  कवर वापर केल्यास रसशोषणारे किडीपासून संरक्षण मिळते, पिकांची फेरपालट व विविध आंतर पिके व बॉर्डर पिके (मका व झेंडु) अशी पिके लावावीत जेणे करुन नैसार्गीक रित्या कीड व रोग नियंत्रणात आणता येतात असे सांगीतले.सेंद्रीय  खतांचा (गांडुळखत, शेणखत इ.) उपयोग केल्यास भाजीपाल्याचे चव, रंग, स्वाद यामध्ये वृध्दी होते व भाजीपाला पिकांना चांगला भाव मिळतो असेही म्हणाले.

मार्गदर्शनात डॉ. संजय पाटील म्‍हणाले की, कोवीड-19 च्या काळामध्ये मोठ्या शहरांत व इतर बाजारपेठांमध्ये सेंद्रीय फळांना चांगली मागणी असून चांगला बाजारभाव मिळत आहे. रासायनिक घटकांपेक्षा सेंद्रीय घटकांचा विशेष प्रभाव गुणवत्तेवर होतांना दिसतो. यावेळी त्‍यांनी सेंद्रीय फळपिकांचे, लागवड तंत्रज्ञान, अन्नद्रव्य व्यवस्थापन, बाजारपेठ, सेंद्रीय प्रमाणीकरण यावर सविस्तर माहिती दिली.

प्रगतशील शेतकरी श्री. कृष्णा घाडगे यांनी सांगीतले की, सेंद्रीय शेतीत यशस्वीपणे काम करता येते. सेंद्रीय शेतीसाठी आवश्यक निविष्ठा घरच्या घरी तयार केल्याने खर्च तर कमी होते तसेच उत्पादनाची गुणवत्ता सुधारते. तसेच चांगला बाजारभावही मिळतो. तर श्री. ज्ञानेश्वर रेवगडे यांनी मनोगतात सेंद्रीय शेती करण्यासाठी प्रयत्न व सातत्य आवश्यक असून योग्य माहिती घेऊन सेंद्रीय शेती केल्यास यश निश्चित  मिळते असे सांगितले.

प्रास्ताविक डॉआनंद गोरे यांनी केले तर सुत्रसंचलन डॉज्योती  गायकवाड यांनी मानलेकार्यक्रम यशस्वीतेसाठी  डॉसुनिल जावळेश्रीश्रीधर पतंगेश्रीसतीश कटारे व श्रीयोगेश थोरवट आदींनी परिश्रम घेतले.  प्रशिक्षण कार्यक्रमाचा राज्यातील  शेतकरी बंधू भगिनी, विद्यार्थी, कृषि विज्ञान केंद्राचे विषय विशेषज्ञ, कृषि विभागातील  अधिकारी  कर्मचारी यांनी मोठ्या प्रमाणावर  लाभ घेतला.

Tuesday, October 6, 2020

पीक निहाय गटांच्या माध्यमातून सेंद्रीय शेती यशस्वी करता येईल... डॉ. आनंद सोळंके

वनामकृवित आयोजित राज्‍यस्‍तरिय पंधरा दिवसीय प्रशिक्षण कार्यक्रमात प्रतिपादन

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील सेंद्रीय शेती संशोधन आणि प्रशिक्षण केंद्र, पशुशक्तीचा योग्य वापर योजना, आणि फार्म टु फोर्क सोल्युशन्स, मुंबई यांचे संयुक्त विद्यमाने आयोजित राज्यस्तरीय पंधरा दिवसीय ऑनलाईन सेंद्रीय शेती प्रशिक्षण कुलगुरु मा. डॉ. अशोक ढवण व संचालक संशोधन डॉ. दत्तप्रसाद वासकर यांच्या मार्गदर्शनाखाली दिनांक 21 सप्टेंबर ते 9 ऑक्टोबर दरम्यान आयोजन करण्यात आले आहे.

प्रशिक्षण कार्यक्रमाच्या बाराव्या दिवशी दिनांक 4 ऑक्टोबर रोजी सेंद्रीय शेतीमधील पीक व्यवस्थापन व सिक्किम राज्यातील सेंद्रीय शेती, मसाले पीक उत्पादन व बाजारपेठ व्यवस्थापन ’’ या विषयांवर व्याख्यानांचे आयोजन करण्यात आले होते.

अध्यक्षस्थानी राहूरी येथील महत्‍मा फुले कृषि विद्यापीठातील कृषिविद्या विभागाचे विभाग प्रमुख डॉ. आनंद सोळंके हे होते तर प्रमुख व्याख्याते म्हणून प्रमुख अन्वेषक डॉ. आनंद गोरे व गंगटोक (सिक्किम) येथील भारतीय इलायची संशोधन संस्‍थेच्‍या  क्षेत्रीय संशोधन केंद्राचे शास्त्रज्ञ डॉ. भारत गुडदे उपस्थित होते. ता. धामनगाव रेल्वे (जि. अमरावती) येथील प्रगतशील शेतकरी श्री. रमेशजी साखरकर, आयोजक डॉ. स्मिता सोलंकी, डॉ. रणजीत चव्हाण हे ऑनलाईन उपस्थित होते.

अध्यक्षीय भाषणात डॉ. आनंद सोळंके म्‍हणाले की, सेंद्रीय शेती उत्पादनांस वाढती मागणी पाहता बाजारातील मागणीनुसार योग्य लागवड तंत्रज्ञानाचा अवलंब करून शेतक­यांनी सेंद्रीय शेती करावी. याकरिता गावागावातून प्रयत्न होण्याची गरज असुन शेतकरी बंधू भगिनी प्रशिक्षण कार्यक्रमाच्या माध्यमातून तंत्रज्ञानाचा अवलंब करावा. पीकनिहाय गट स्थापन करून संबंधीत पिकामध्ये सेंद्रीय ब्रँड विकसीत करावा जेणे करून चांगले उत्पादन तसेच अधिक बाजारभाव मिळविता येईल. कृषि विद्यापीठे, कृषि विज्ञान केंद्रे यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून तंत्रज्ञान प्रसार करावा, असा सल्‍लाही त्‍यांनी दिला.

डॉ. आनंद गोरे यांनी सेंद्रीय शेतीमधील पीक व्यवस्थापनावर मार्गदर्शनात सेंद्रीय शेती ही व्यापक संकल्पना असून विविध घटकांचा एकात्मीक पद्धतीने वापर करणे गरजेचे असल्‍याचे सांगुन सेंद्रीय पीक व्यवस्थापनात मशागती पासून, पिकाची लागवड ते काढणी पर्यंत सेंद्रीय लागवड पद्धत व निविष्ठांचा वापर यावर मार्गदर्शन केले. सिक्किम राज्यात प्रमाणीकरणाची प्रक्रिया ही सुलभ कशी करता येईल हे ही सांगीतले.

डॉ. भारत गुडदे यांनी सिक्किम राज्यातील सेंद्रीय शेती, मसाले पीक उत्पादन व बाजारपेठ व्यवस्थापन या विषयावर मार्गदर्शन करतांना देशात पहिले सेंद्रीय राज्य म्हणून पूढे आलेले सिक्किम राज्यातील सेंद्रीय शेती, मसाले पिके व त्यांचे बाजारपेठ व्यवस्थापन यावर विशेष मार्गदर्शन केले. प्रत्येक शेतकरी हा चिकाटीने आणि स्वयंप्रेरणेने सेंद्रीय शेती करत असून शासनाच्या मदतीने सेंद्रीय शेती यशस्वी केल्याचे त्यांनी सांगीतले. सिक्किम राज्यातील शेतकरी स्वत:च्या सेंद्रीय निविष्ठा स्वत: तयार करून लागवडीवरील खर्च कमी करतात, महाराष्ट्रातही त्याचे अनुकरण करता येईल. मसाले पिके व सेंद्रीय उत्पादनांची वाढती मागणी लक्षात घेऊन आधुनिक पद्धतीने बाजारपेठ व्यवस्थापन केल्यास सेंद्रीय उत्पादनांना चांगला बाजारभाव मिळविता येईल हे त्यांनी सांगीतले.

प्रगतशील शेतकरी श्री. रमेशजी साखरकर यांनी अनुभव सांगतांना म्हणाले की, सेंद्रीय शेतीत देशी वाण व बियाणे यास मोठे महत्व आहे. कीड व रोग यांना प्रतिकारक्षम तसेच जैवविविधता वाढविणा­या विविध प्रकारच्या पिकांच्या वाणांचे संवर्धन होणे व प्रसार होणे ही काळाची गरज आहे. याबाबत शाळा, महाविद्यालये तसेच गावागावात माहितीचा प्रसार होणे व महत्व समजून सांगणे आवश्यक आहे. देशी बियाणे बँकेचे महत्व त्यांनी सांगितले.

कार्यक्रमाचे सुत्रसंचलन डॉ. सुनिल जावळे यांनी केले तर कार्यक्रम यशस्वीतेसाठी श्री. श्रीधर पतंगे, श्री. योगेश थोरवट यांनी परिश्रम घेतले. प्रशिक्षण कार्यक्रमाचा राज्यातील शेतकरी बंधू भगिनी, विद्यार्थी, कृषि विज्ञान केंद्राचे विषय विशेषज्ञ, कृषि विभागातील अधिकारी कर्मचारी यांनी मोठ्या प्रमाणावर लाभ घेतला.