Thursday, November 19, 2020

मराठवाडयाकरिता हवामान अंदाज व कृषि सल्ला

मुंबई येथील प्रादेशिक हवामान केंद्राकडुन प्राप्त झालेल्या अंदाजानुसार मराठवाड्यात पुढील पाच दिवसात आकाश ढगाळ राहून दिनांक २० ते २२ नोव्हेंबर २०२० रोजी परभणी व उस्मानाबाद जिल्हा वगळता मराठवाड्यातील इतर जिल्हयात तुरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाच्या पाऊसाची शक्यता आहे. शेतकरी बांधवानी कापणी केलेल्या पिकांची सुरक्षित ठिकाणी साठवणूक करावी. सद्यस्थितीत शेतीत पुढील प्रमाणे व्‍यवस्‍थापन करावे, असा सल्‍ला वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील ग्रामीण कृषी मौसम सेवा योजनेच्‍या वतीने देण्‍यात आला आहे.

रब्‍बी पिके

रब्बी मध्ये पेरणी केलेल्या हरभरा व करडई पिकात तण नियंत्रणासाठी हलकी कोळपणी करून घ्यावी. ऊस पिकात आवश्यकतेनुसार पाणी व्यवस्थापन करावे. हळद पिक हे कंद वाढीच्या अवस्थेत असून हळद पिकात पानावरील ठिपके हा रोग दिसून येत असल्यास त्याच्या व्यवस्थापनासाठी अॅझोक्सिस्ट्रोबीन १८.२ टक्के अधिक  डायफेनकोनॅझोल ११.४ टक्के एससी १० मीली प्रती १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.

फळबागेचे व्‍यवस्‍थापन

संत्रा व मोसंबी पिक फळ वाढीच्या अवस्थेत असून मृग बहार संत्रा / मोसंबी बागेत फळगळ होत असल्याचे दिसून येत असल्यास त्याच्या  व्यवस्थापनासाठी जीए ३  हे २० मीली प्रती लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.  तसेच  संत्रा / मोसंबी बागेत आवश्यकतेनुसार पाणी व्यवस्थापन करावे.

डाळिंब पिक फळवाढीच्या अवस्थेत असून डाळिंब बागेत खोडावर फुटवे आले असतील तर ते फुटवे कडून घ्यावे. तसेच डाळिंब बागेत आवश्यकतेनुसार पाणी व्यवस्थापन करावे.

फुलशेती व्‍यवस्‍थापन

फुलशेती वाढीच्या अवस्थेत असून फुल बागेत आवश्यकतेनुसार पाणी व्यवस्थापन करून घ्यावे व काढणीस आलेल्या फुलांची काढणी करून घ्यावे.

भाजीपाला पिके

भाजीपाला पिक वाढीच्या अवस्थेत असून पुनर्लागवड केलेल्या भाजीपाला पिकात तण नियंत्रण करून पाणी व्यवस्थापन करावे.

चारा पिके

चाऱ्यासाठी रब्बी ज्वारी पिकाची पेरणी करून १५ दिवस झाले असल्यास पाणी  व्यवस्थापन करावे.  

पशु व्‍यवस्‍थापन

नवीन जन्मलेल्या गाय व म्हेस यांच्या वासरामध्ये विशेषतः म्हशीच्या नर वासरामध्ये टाक्सोकैरा व्हीटूलोरम या गोलकृमाची लागण होते. यासाठी जन्मलेल्या वासरास वयाच्या ७ व्या दिवशी वा त्यानंतर पायपटझीन या जंतनाशक औषधीची मात्रा देणे आवश्यक आहे. अन्यथा वासरामध्ये आवमीश्रीत दुगधरेणारी घट विष्टा टाकल्या जात व प्रसंगी मृत्यु ओढवतो.

सौजन्‍य : मुख्य प्रकल्प समन्वयक,  ग्रामीण कृषी मौसम सेवा, वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी


 

Tuesday, November 3, 2020

वनामकृविचे कुलगुरू मा डॉ अशोक ढवण यांचा कडे राहुरी कृषि विद्यापीठाचा अतिरिक्‍त पदभार

राहुरी येथील महात्‍मा फुले कृषि विद्यापीठाचे कुलगुरू मा डॉ के पी विश्‍वनाथा यांचा कुलगुरू पदाचा कार्यकाळ दिनांक ४ नोव्‍हेंबर रोजी पुर्ण होत असुन सध्‍या राहुरी कृषि विद्यापीठाच्‍या कुलगुरू पदाच्‍या निवडीची प्रक्रिया सुरू आहे. राज्‍याचे माननीय राज्‍यपाल मा श्री भगत सिंह कोश्‍यारी यांनी दिनांक ३ नोव्‍हेंबर रोजी एका पत्राव्‍दारे सदरिल रिक्‍त होणा-या कुलगुरू पदाचा अतिरिक्‍त पदभार वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाचे कुलगुरू मा डॉ अशोक ढवण यांनी दिनांक ५ नोव्‍हेंबर रोजी स्‍वीकारण्‍याबाबत आदेशीत केले आहे. कुलगुरू मा डॉ अशोक ढवण दिनांक ५ नोव्‍हेंबर रोजी राहुरी कृषि विद्यापीठाचा पदभार स्‍वीकारणार असुन हा पदभार राहुरी कृषि विद्यापीठाच्‍या नुतन कुलगुरूंची निवड होईल पर्यंत राहणार आहे. राहुरी कृषि विद्यापीठ देशातील अग्रगण्‍य व राज्‍यातील सर्वात मोठे कार्यक्षेत्र असलेले कृषि विद्यापीठ असुन कुलगुरू पदाचा अतिरिक्‍त पदभार दिल्‍या बद्दल कुलगुरू मा डॉ अशोक ढवण यांनी राज्‍याचे माननीय राज्‍यपाल महोदय यांचे आभार व्‍यक्‍त केले. यानिमित्‍त राहुरी विद्यापीठातील कार्य संस्‍कृती, संशोधन, शिक्षण व विस्‍तार शिक्षणातील चांगल्‍या बाबींचे अध्‍यायन करण्‍याची संधी असुन तेथील चांगल्‍या बाबी परभणी कृषि विद्यापीठात राबविण्‍याचा मानस त्‍यांनी यावेळी व्‍यक्‍त केला.