Friday, September 29, 2017

रब्‍बी हंगामात अधिक उत्‍पादनासाठी योग्‍य पीक व्‍यवस्‍थापन करा

वनामकृविच्‍या शास्‍त्रज्ञांचा सल्‍ला
दरवर्षी हवामानात नवीन बदल होत आहेत. बदल हा निसर्गाचा नियम आहे, त्‍या बदलाला सामोरे जात निसर्गासोबत राहून शेती केल्‍यास निश्चितच उत्‍पादनात वाढ होते. या वर्षी पाऊस आतापर्यंत सरासरीपेक्षा कमी असला तरी काही अपवाद वगळता बरेचशे मोठे व छोटे जलस्‍त्रोत भरले आहेत. मराठवाडयातील जायकवाडी, लोअर दुधना, तेरणा मांजरा ही धरणं पुर्णपणे भरले आहेत परंतु येलदरी, सिध्‍देश्‍वर, हि धरणं अजून पावसाच्‍या प्रतिक्षेत आहेत. मराठवाडयात जलयुक्‍त शिवाराची कामे ब-यापैकी झाल्‍यामुळे या जलस्‍त्रोतांचा वापर रबी हंगामात एखादं संरक्षित पाणी देण्‍यासाठी निश्चितच होऊ शकते.
या वर्षी जलस्‍त्रोतांमध्‍ये पाणी भरपुर प्रमाणांत उपलब्‍ध असल्‍यामुळे त्‍याचे नियोजन रबी हंगामासाठी करावे. पाण्‍याच्‍या उपलब्‍धतेनुसार पीक व पीक पध्‍दतीचे नियोजन करावे. कमी पाण्‍यात येणारी पीके जसे कि, हरभरा, करडई, ज्‍वारी, जवस इत्‍यादी उपलब्‍ध ओलाव्‍यावर पेरणी करुन एखादे पाणी दिले तर हेक्‍टरी ४ ते ५ क्विंटल उत्‍पन्‍न वाढते. सोयाबीन काढणीनंतर शुन्‍य मशागतीवर करडई, हरभरा पेरावीत. देशी हरभरा जमिनीत ओल कमी असल्‍यास ७-१० सें.मी. खोलीवर पेरणी करावी. परंतु काबुली हरभ-याची पेरणी ५ सें.मी. पेक्षा जास्‍त खोलीवर करु नये, उगवणीवर परिणाम होतो कारण त्‍याचा वरचा पापुद्रा पातळ असतो. सोयाबीन नंतर ज्‍वारी पेरतांना ४ किलो ऐवजी ६ किलो प्रति एकर बियाणे घ्‍यावे. उगवण कमी होते म्‍हणून बियाणे जास्‍त घ्‍यावे. करडई बियाणे ५ ते ६ किलो प्रति एकर पेरावे. काही भागात पाऊस कमी पडल्‍यामुळे हुमणी किडींचा प्रादुर्भाव होण्‍याची शक्‍यता आहे. त्‍यासाठी इमिडाक्‍लोप्रिड ४८ टक्‍के प्रति किलो बियाण्‍यास १४ मिली लावून पेरणी करावी. त्‍यामुळे ज्‍वारीत खोडमाशीचाही प्रादुर्भाव कमी होतो.
जमिनीतील ओलाव्‍याचा कार्यक्षम वापर व्‍हावा म्‍हणून ज्‍वारी, हरभरा, करडई पीकांची पेरणी ४५ सें.मी. अंतरावर करावी. एक ते दोन कोळपण्‍या केल्‍यास जमिनीतील ओलावा टिकतो व तणांचा बंदोबस्‍त करता येतो. रबी गहू सोडून बाकी सर्व पिके ऑक्‍टोबरच्‍या पहिल्‍या आठवडयात पेरावीत. लवकर पेरणी केल्‍यास परतीच्‍या पावसामुळे पीकांना मर लागण्‍याची शक्‍यता असते, आणि ज्‍वारीत खोडमाशीचा प्रादुर्भाव वाढतो. उशिरा पेरणी झाल्‍यास पीक परिपक्‍वतेच्‍या अवस्‍थेत पाणी कमी पडून उत्‍पादनात घट येते. म्‍हणून वेळेवर पेरणी करणे महत्‍वाचे आहे.
गव्‍हाची पेरणी नोंव्‍हेबरच्‍या दुस-या आठवडयात करावी. लवकर पेरणी केल्‍यास अकाली परिपक्‍वता येते व उत्‍पन्‍नात मोठी घट होते. पाण्‍याच्‍या उपलब्‍धतेनुसार गव्‍हाचे वाण निवडावेत. कमी पाणी असल्‍यास लोक-१, नेत्रावती हे वाण तर भरपुर पाणी असल्‍यास परभणी- ५१, त्रयंबक, समाधान हे वाण घ्‍यावेत, वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विदयापीठ, परभणी येथे हरभरा-आकाश(बीडीएनजी-७९७), ज्‍वार - परभणी मोती, करडई - पीबीएनएस-१२ व गहू - त्रयंबक, समाधान व नेत्रावती हे वाण मुबलक प्रमाणात उपलब्‍ध आहेत. हे सर्वच वाण किड, रोगास कमी बळी पडणारे आणि अधिक उत्‍पादन देणारे असल्‍यामुळे या वाणांची निवड करावी, असे आवाहन वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील कृषि तंत्रज्ञान माहीती केंद्राच्‍या वतीने करण्‍यात आले आहे.

वनामकृविच्‍या मुलीच्‍या वसतीगृहात कार्यशाळा संपन्‍न

युवतींना भेडसावणा-या आरोग्‍य विषयक प्रश्‍नावर मार्गदर्शन

Wednesday, September 27, 2017

मानसाच्‍या मनाचा मोठेपणा आज कमी होतोय...... गट शिक्षणाधिकारी श्री विठ्ठल भुसारे

देशाचा अन्‍नदाता शेतकरी आज आत्‍महत्‍या करतोय, समाजातील संवेदनशीलता कमी होत आहे.  नातेवाईक, मित्र व शेजा-यांशी संवाद कमी होतोय, एकमेकांच्‍या सुख-दु:खात सहभाग कमी होतोय, मानसाच्‍या मनाचा मोठेपणा आज संपलाय म्‍हणुन आत्‍महत्‍याचे प्रमाण वाढत आहे, असे प्रतिपादन गट शिक्षणाधिकारी श्री विठ्ठल भुसारे यांनी केले़. वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील परभणी कृषि महाविद्यालयात दिनांक 26 सप्‍टेबर रोजी व्‍याख्‍यानाचे आयोजन करण्‍यात आले होते, त्‍याप्रसंगीत ते बोलत होते. कार्यक्रमाच्‍या अध्‍यक्षस्‍थानी प्राचार्य डॉ डि एन गोखले हे होते तर व्‍यासपीठावर सहयोगी अधिष्‍ठाता डॉ डि बी देवसरकर, विभाग प्रमुख डॉ बी एम ठोंबरे, डॉ. टि बी तांबे, डॉ सय्यद ईस्‍माईल, डॉ आर पी कदम आदींची उपस्थिती होती. 
श्री विठ्ठल भुसारे पुढे म्‍हणाले की, जे विद्यार्थ्‍यी उत्‍साहात आत्‍मज्ञानानी शिकले ते जिंकले, जे नाही शिकले ते हुकले. विद्यार्थ्‍यांनी व्‍यसनापासुन दुर राहण्‍याचा सल्‍लाही त्‍यांनी दिला. कार्यक्रमाचा अ‍ध्‍यक्षीय समारोप प्राचार्य डॉ डि एन गोखले यांनी केला. यावेळी विद्यार्थ्‍यां आपला सांस्‍कृतिक कलागुणांचे सादरीकरण केले. महाविद्यालयातील पदवी व पदव्‍युत्‍तर अभ्‍यासक्रमात तसेच क्रीडा क्षेत्रात विशेष प्राविण्‍य मिळविलेल्‍या विद्यार्थ्‍यांचा मान्‍यवरांच्‍या हस्‍ते सत्‍कार करण्‍यात आला. कार्यक्रमाचे प्रास्‍ताविक प्रा रणजित चव्‍हाण यांनी केले. सुत्रसंचालन गणेश कापावर व दिपाली जाधव यांनी केले़ तर आभार सौरभ मोकाशे यांनी मानले. कार्यक्रमास महाविद्यालयातील प्राध्‍यापक, कर्मचारी व विद्यार्थ्‍यी मोठया संख्‍येन उपस्थित होते. 

Tuesday, September 26, 2017

वनामकृविचे प्रा. ए. एम. कांबळे यांना राज्यस्तरीय रासेयोचे कार्यक्रम अधिकारी प्रशंसा प्रमाणपत्र पुरस्कार


राष्ट्रीय सेवा योजनाचे राज्यस्तरीय पुरस्कार वितरण सोहळा दि. २४ सप्टेंबर रोजी मुंबई विद्यापीठात उच्च व तंत्र शिक्षण मंत्री मा. ना. श्री. विनोद तावडे, उच्च व तंत्र शिक्षण राज्यमंत्री मा. ना. श्री. रविंद्र वायकर यांच्‍या प्रमुख उपस्थितीत पार पडला. या सोहळ्यात वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील कृषी महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी प्रा. ए. एम. कांबळे यांनी रासेयो माध्‍यमातुन श्रमदान, रक्तदान शिबीर, अंधश्रद्धा निर्मुलन, ग्रामीण आरोग्य, व्यसनमुक्ती, महिला मेळावा, कृषी महोत्सव, ग्रामीण कृषी कार्यानुभव आदी विविध सामाजिक उपक्रमात उत्कुष्ट कार्य केल्याबद्दल त्यांना महाराष्ट्र शासनातर्फे सन २०१४-१५ चा राज्यस्तरीय कार्यक्रम अधिकारी प्रशंसा प्रमाणपत्र पुरस्कार मान्‍यवरांच्‍या हस्‍ते प्रदान करण्‍यात आला. याबद्धल कुलगुरू मा. डॉ. बी. व्‍यंकटेश्‍वरलू, शिक्षण संचालक तथा अधिष्ठता डॉ. व्ही. डी. पाटील, सहयोगी अधिष्ठता डॉ. डी. एन. गोखले, कुलसचिव डॉ. जी. के. लोंढे  आदींनी अभिनंदन केले.

वनामकृवितील सामाजिक विज्ञान महाविद्यालयात व्‍यक्तिमत्‍व संवर्धन कार्यशाळा संपन्‍न


वनामकृवितील सामाजिक विज्ञान महाविद्यालयाच्‍या विद्यार्थ्‍यांच्‍या व्‍यक्तिमत्‍व संवर्धनासाठी जिमखान्‍याच्‍या वतीने चार दिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्‍यात आले होते. या कार्यशाळेत कर्मानुसार होणारी फलप्राप्‍ती, मनावरील नियंत्रण, सकारात्‍मक दृष्टिकोण, एकाग्रता व कार्यक्षमता वाढविण्‍यासाठी ध्‍यानधारणा आदी विषयांवर मानवी मुल्‍य तज्ञ बीके सीमा, बीके अर्चना, प्राचार्य प्रा. विशाला पटनम यांनी मार्गदर्शन केले. कार्यशाळेचे आयोजन प्राचार्य प्रा. विशाला पटनम यांच्‍या मार्गदर्शनाखाली करण्‍यात आले होते. कार्यशाळेत महाविद्यालयाच्‍या विद्यार्थ्‍यांनी मोठया संख्‍येने सहभाग नोंदविला होता. सदरिल कार्यशाळेचा स्‍वत:चे कर्तव्‍य व भुमिका सक्षमपणे पार पाडण्‍यास निश्चितच फायदा होईल, अशी प्रतिक्रिया यावेळी सहभागी विद्यार्थ्‍यांनी व्‍यक्‍त केली.

Monday, September 25, 2017

वनामकृविच्‍या कृषी महाविद्यालयात राष्‍ट्रीय सेवा योजना दिन साजरा

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील परभणी कृषी महाविद्यालयात दिनांक 24 सप्‍टेबर रोजी राष्‍ट्रीय सेवा योजना दिन साजरा करण्‍यात आला. कार्यक्रमास शिवाजी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ बाळासाहेब जाधव हे प्रमुख पाहुणे म्‍हणुन उपस्थित होते तर अध्‍यक्षस्‍‍थानी प्राचार्य डॉ डि एन गोखले हे होते. व्‍यासपीठावर प्रा विजयकुमार जाधव, प्रा. रणजित चव्‍हाण, डॉ पपिता गौरखेडे आदींची प्रमुख उपस्थिती होती.

याप्रसंगी प्राचार्य डॉ बाळासाहेब जाधव मार्गदर्शन करतांना म्‍हणाले की, राष्‍ट्रीय सेवा योजना ही केवळ योजना नसुन विद्यार्थ्‍यांना सुसंस्‍कृत करणारी चळवळ आहे, याव्‍दारे विद्यार्थ्‍यांचे व्‍यक्‍तीमत्‍व विकासित होण्‍यास निश्चितच हातभार लाभतो. महाविद्यालयीन जीवनात विद्यार्थ्‍यांनी रासेयोच्‍या माध्‍यमातुन समाज सेवा करावी, असे प्रतिपादन त्‍यांनी केले तर अध्‍यक्षीय भाषणात प्राचार्य डॉ डि एन गोखले यांनी विद्यार्थ्‍यांनी रासेयोच्‍या कार्यातुन सामाजिक बांधिलक जोपासण्‍याचा सल्‍ला दिला. कार्यक्रमाचे सुत्रसंचालक स्‍वयंसेविका सोनाली उबाळे हिने केले तर आभार प्रियांका माटे हिने मानले. याप्रसंगी रासेयोच्‍या स्‍वयं‍से‍वकांनी महिला सबलीकरण, शेतकरी आत्‍महत्‍या आदीवर आधारित नाटीका सादर केले. कार्यक्रमास महाविद्यालयातील अधिकारी, कर्मचारी व विद्यार्थ्‍यी मोठया संख्‍येने उपस्थित होते.

Wednesday, September 20, 2017

वनामकृविच्‍या मृद विज्ञान व कृषि रसायनशास्‍त्र विभागास तुर्की येथील आंतरराष्‍ट्रीय संशोधन केंद्राच्‍या शास्‍त्रज्ञांची भेट


वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील मृद विज्ञान व कृषि रसायनशास्त्र विभागास तुर्की येथील आंतरराष्‍ट्रीय संशोधन केंद्राच्‍या शास्‍त्रज्ञा डॉ उल्‍फेत इरडाल व डॉ. गोनु आयपिक यांनी भेट दिली व विभागातील पदव्‍युत्‍तर अभ्‍यासक्रमाच्‍या विद्यार्थ्‍यांशी संवाद साधला. यावेळी शिक्षण संचालक डॉ. विलास पाटील, प्राचार्य डॉ. धर्मराज गोखले, विभाग प्रमुख डॉ. टी. बी. तांबे, डॉ सय्यद इस्माईल आदीची प्रमुख उपस्थिती होती. तुर्कीच्‍या शास्‍त्रज्ञांनी विभागाच्‍या प्रयोगशाळेस भेट देऊन समाधान व्यक्त केले. विभागातील शिक्षणसंशोधनविषयी डॉ सय्यद इस्माईल यांनी माहिती दिली. विद्यार्थ्‍यांना मार्गदर्शन करतांना प्राध्यापक डॉ. उल्फेत म्‍हणाल्‍या की, पदव्युत्तर विद्यार्थ्यांनी शिक्षण संशोधन प्रामाणिकपणे कार्य केल्यास शेतकऱ्यांच्या ब-याचश्या अडचणी दुर होऊ शकतील. शिक्षण संचालक डॉ. विलास पाटील यांनी युवकांनी नेतृत्व गुणांचा विकास करणे गरजेचे असुन पदव्‍युत्‍तर अभ्‍यासक्रमातील विद्यार्थ्‍यांनी संशोधनावर भर द्यावा व संशोधनाचा उपयोग शेतक-यांच उन्‍नतीसाठी करण्‍याचा त्‍यांनी सल्‍ला दिला. यावेळी विभागातील नवप्रवेशीत प्रथम वर्षाच्‍या विद्यार्थ्‍याचे स्‍वागत करण्‍यात आले. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन डॉ. पपीता गौरखेडे यांनी केले तर आभार डॉ. सुरेश वाईकर यांनी मानले. कार्यक्रमाविभागातील विद्यार्थ्य डॉ अनिल धमक, डॉ महेश देशमुख, प्रा. भाग्यरेखा गजभीये, प्रा. प्रभाकर अडसुळ, संतोष पिल्लेवाड, सदाशिव अडकीणे, एस.एम. महावलकर आदीसह कर्मचारी आणि विद्यार्थी मोठया संख्‍येने उपस्थित होते. 

मराठवाडयात कपाशीवर शेंदरी बोंडअळीचा प्रादुर्भाव

वनामकृविच्‍या शास्‍त्रज्ञांचे वेळीच व्यवस्थापन करण्‍याचे आवाहन

सद्यस्थितीत कपाशीचे पिक बोंडे धरण्याच्या अवस्थेत असून कपाशीवर शेंदरी बोंडअळीचा प्रादुर्भाव मराठवाडयातील सर्वच कापूस उत्पादक जिल्हया आढळून येत आहे. शेंदरी बोंडअळी ही कपाशीवरील अतिशय घातक कीड असुन कपाशी पिकावर या किडीचा प्रादुर्भाव साधारणता ऑक्टोबर नंतर आढळून येतो. मागील वर्षी बऱ्याचशा शेतकऱ्यांनी मोठया प्रमाणावर कपाशीचे फरदड (पुर्नबहार) घेतल्याने चालु खरीप हंगामात या शेंदरी बोंडअळीचा प्रादुर्भाव सुरुवातीपासूनच कमी अधिक प्रमाणात दिसून येत आहे.
प्रादुर्भावाची प्रमुख कारणे - कपाशीच्या फरदडीखाली क्षेत्रात वाढ झाल्यामुळे किडीच्या जीवनक्रमात खंड पडत नाही.हंगाम संपल्यानंतर कपाशीच्या पऱ्हाटया अवशेष शेतात किंवा शेताजवळ तसेच रचून ठेवणे वेळेवर विल्हेवाट लावणे. बीटी जनुकास प्रतिकारशक्ती निर्माण झाल्यामुळे बीटी कपाशीवर या बोंडअळीचा प्रादुर्भाव होत आहे. कपाशीच्‍या चोहुबाजुने आश्रय पिकाच्या ओळी लावणे. योग्यवेळी शेंदरी बोंडअळीच्या व्यवस्थापनाकडे दुर्लक्ष झाले आहे.
सदयस्थितीत शेतक-यांनी पुढील प्रमाणे व्यवस्थापन करावे
प्रादुर्भावग्रस्त गळालेली पाने बोंडे जमा करुन नष्ट करावे. कपाशीत डोमकळ्या दिसून आल्यास त्या तोडून आतील अळीसह नष्ट करावे. गुलाबी बोंडअळीसाठीचे कामगंध सापळे हेक्‍टरी पाच याप्रमाणे वापरावे, सरासरी 8 ते 10 पतंग प्रति सापळा सतत 2 ते 3 दिवस ही आर्थिक नुकसानीची पातळी समजावी. ट्रायकोग्रामाटॉयडीया बॅक्ट्री या परोपजीवी गांधीलमाशीचे कार्ड (1.5 लाख अंडी/हे.) कपाशीत लावावेत.
एक जीवंत अळी किंवा दहा हिरवी बोंडे किंवा 8-10 पतंग प्रति कामगंध सापळा सलग तीन रात्री आढळुन आल्‍यास आर्थिक नुकसानीची पातळी समजावी व पुढीलपैकी कोणत्‍याही किटकनाशकांची फवारणी करावी
कीटकनाशके
प्रमाण / 10 लि. पाणी
अझाडिरॅक्टीन 0.15 टक्के
50 मिली
अझाडिरॅक्टीन 0.30 टक्के
40 मिली
प्रोफेनोफॉस 50 ईसी किंवा
20 मिली
थायोडीकार्ब 75 डब्ल्युपी किंवा
20 ग्रॅम
लॅमडा साहॅलोथ्रीन 5 ईसी
10 मिली
थायामिथिक्झाम 12.6 टक्के + लॅमडा साहॅलोथ्रीन 9.5 टक्के झेड सी
04 मिली
फेनप्रोफेथ्रिन 10 ईसी 
10 मिली
फेनप्रोफेथ्रिन 30 ईसी 
04 मिली
क्लोरपायरीफॉस 50 टक्के + सायपरमेथ्रीन 5 टक्के सी
20 मिली
डेल्टामेथ्रीन 1 टक्के + ट्रायझोफॉस 35 टक्के .सी.
16 मिली
प्रोफेनोफॉस 40 टक्के + सायपरमेथ्रीन 4 टक्के .सी.
20 मिली

वरीलप्रमाण हे साध्या पंपासाठी असुन पेट्रोल पंपासाठी हे प्रमाण तीनपट वापरावे. शेंदरी बोंडअळीमुळे होणारे संभाव्य नुकसान टाळण्यासाठी शेतकऱ्यांनी वेळीच जागरूक होऊन वरील प्रमाणे उपाययोजना कराव्यात असे अवाहान किटकशास्त्र विभागाचे विभाग प्रमुख डॉ. पी.आर.झंवर, डॉ. . जी. बडगुजर प्रा.बी.व्ही.भेदे यांनी केले आहे.