Thursday, February 29, 2024

वनामकृविच्‍या वतीने राष्ट्रीय विज्ञान दिन साजरा

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाच्या शिक्षण संचालनालयाद्वारे दिनांक २८ फेब्रुवारी रोजी राष्ट्रीय विज्ञान दिन आभासी माध्यमाद्वारे साजरा करण्यात आला. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी माननीय कुलगुरू डॉ. इन्द्र मणि हे होते तर प्रमुख वक्ते म्हणून संशोधन मूल्य संस्थेचे अध्यक्ष प्रा. आर. के. कोटनाला हे होते. 

मार्गदर्शनात माननीय कुलगुरू डॉ. इन्द्र मणि यांनी शास्त्रज्ञांनी संशोधन करतांना न्यायीक बाबी या बाह्य स्वरूपाच्या असतात परंतु नीती आणि मूल्य हे स्वतःच्या अंतर्भूत बाबी आहेत. या बाह्य आणि अंतर्गत बाबी योग्य पद्धती शास्त्रज्ञांनी ओळखाव्यात आणि त्या दृष्टीने कार्य करावे. खरा शास्त्रज्ञ हा स्वतः झिजतो आणि समाजाला योग्य संशोधन देतो, असे त्‍यांनी नमूद केले.

प्रमुख वक्ते प्रा. आर. के.  कोटनाला यांनी आपल्या भाषणात म्‍हणाले की, परीक्षेमधील शैक्षणिक एकरूपता आणि नीती मूल्यांचा उपयोग करावा. भारतामध्ये उच्च दर्जेचे संशोधन विकसित होत आहेत, हरीत शक्ती, हायड्रोइलेक्ट्रिक सेल ची निर्मिती ही भारतासाठी गर्वाची बाब आहे. ज्ञानाचा योग्य वापर करून उद्योग, विक्री व्यवस्थापन आणि तंत्रज्ञान विकासात नीती मूल्यांचे अवलंबन करण्‍याचा सल्‍ला त्‍यांनी दिला. शिक्षण संचालक डॉ. उदय खोडके यांनी कार्यक्रमाचे आयोजन केले होते, या कार्यक्रमात विद्यापीठातील विविध महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता, विभाग प्रमुख, प्राध्यापक आणि विद्यार्थी मोठया संख्येने सहभागी झाले होते.

Wednesday, February 28, 2024

वनामकृवि अंतर्गत रस्त्याच्या मजबुतीकरण आणि डांबरीकरणाच्या कामाचा शुभारंभ

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी अंतर्गत असलेल्या रस्त्यांची अवस्था मागील काही वर्षापासून अतिशय खराब झालेली होती. याचा त्रास विद्यापीठातील कर्मचारी, विद्यार्थी, शेतकरी होत असे, हा रस्ता चांगला व्हावा म्हणून शहरातील व बाहेरील अनेक नागरिकांनी विद्यापीठाचे कुलगुरू मा डॉ. इन्द्र मणि यांच्याकडे इच्छा व्यक्त करत होते. याकरिता माननीय कुलगुरू पदाचा कार्यभार स्‍वीकारल्‍यानंतर त्‍वरीत प्रस्‍ताव तयार करण्‍यात आला. त्यास यश प्राप्त होऊन महाराष्ट्र शासनाने विद्यापीठातील २६ किलोमीटर लांबीचे अंतर्गत रस्ते मजबुतीकरणास आणि डांबरीकरणास मंजुरी दिली. त्यासाठी आवश्यक असलेला निधी रुपये १४.७५ कोटी विद्यापीठास देण्यात आला. दिनांक २८ फेब्रुवारी रोजी कुलगुरू मा डॉ इन्‍द्र मणि यांच्‍या शुभहस्ते विद्यापीठातील रस्‍त्‍याच्‍या मजबुतीकरण आणि डांबरीकरणाच्‍या कामाचा शुभारंभ करण्‍यात आला.

मार्गदर्शनात मा डॉ इन्‍द्र मणि यांनी रस्‍ते मजबुतीकरिता दिलेल्‍या निधी बाबत महाराष्ट्र शासनाचे आभार व्‍यक्‍त करून विद्यापीठातील जमिनीची प्रत ओळखुन रस्ते मजबुतीकरणाचे आणि डांबरीकरणाचे काम अद्यावत मानांकाप्रमाणे अतिशय उत्कृष्ट दर्जेचे करण्‍याची सूचना संबंधित यंत्रणेस दिली. विद्यापीठात शहरातील नागरिक, राज्य आणि देशपातळीवरील कृषि तज्ञ, राजकीय, प्रशासकीय अधिकारी नियमित येतात. याबाबीचा विचार करून बांधकाम गुत्‍तेदारांनी उच्‍च दर्जेच्‍या रस्‍त मजबुतीकरणाचे काम करावे. सदर काम पल्लवी कन्स्ट्रक्शनाचे श्री. सुधीर पाटील करित असुन कामाचा दर्जा उंचावण्याबाबत माननीय कुलगुरू यांनी त्‍यांना प्रोत्साहित केले. 

प्रास्‍ताविकात विद्यापीठ अभियंता इंजिनियर श्री. दीपक कशाळकर म्‍हणाले की, रस्‍ते मजुबतीकरणाचे पुर्ण मानांकाप्रमाणे होण्‍याच्‍या दृष्‍टीने वेळोवेळी यंत्रणेव्‍दारे मुल्‍यांकन करण्‍यात येणार आहे. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उप-विद्यापीठ अभियंता डॉ. दयानंद टेकाळे यांनी केले. याप्रसंगी संशोधन संचालक डॉ. दत्तप्रसाद वासकर, विस्तार शिक्षण संचालक डॉ. धर्मराज गोखलेशिक्षण संचालक डॉ. उदय खोडके, संचालक (बियाणे) डॉ.  देवराव देवसरकरकुलसचिव श्री. पुरभा काळे, नियंत्रक श्री. प्रवीण निर्मळ, शाखा अभियंता श्री शेख अहमद, विद्यापीठातील विविध महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता, विविध विभागाचे विभाग प्रमुख आणि  अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.




Tuesday, February 27, 2024

वनामकृविस राष्ट्रीय कृषी विकास योजनेअंतर्गत चार नवीन संशोधन प्रकल्‍प मंजूर

कृषि संशोधन कार्यास मिळाली बळकटी..... कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र  मणि

मराठवाड्यातील शेतकऱ्यांच्या विकासासाठी मराठवाड्यातील आठही जिल्ह्यातून विद्यापीठाच्या विविध संशोधन आणि विस्तार केंद्राद्वारे सतत प्रयत्नशील असलेल्या वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ परभणीस कृषि मंत्रालय (महाराष्ट्र शासन) मार्फत राष्ट्रीय कृषी विकास योजनेअंतर्गत चार नवीन संशोधन प्रकल्‍प मंजूर झाले असून त्यासाठी आवश्यक असणारा रुपये २१००.७७ लाख (अक्षरी रू. एकेविस कोटी सत्याहत्तर हजार) इतक्या किमतीच्या निधीस मंजुरी मिळाली आहे. 

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी नेहमी संशोधन कार्यावर भर देते. सध्या विद्यापीठाचे संशोधने राष्ट्रीय पातळीवर गाजत असून नुकतेच विद्यापीठाच्या सात वाणांना राष्ट्रीय पातळीवर मंजुरी मिळाली आहे आणि या आठवड्यात महाराष्ट्र शासनाने विद्यापीठास संशोधनासाठी नवीन चार प्रकल्‍प मंजूर करून विद्यापीठाच्या संशोधन कार्यास बळकटी दिली आहे. या प्रकल्‍पांमध्ये नैसर्गिक शेती आणि नैसर्गिक उत्पादनातील कीटकनाशकांचे अवशेष तपासणी प्रयोगशाळेकरिता रू ८६३.०२ लाखाची तरतुद केली असुन शेतकरी सहभाग कृती संशोधन शाश्वत विकासासह लिंबूवर्गीय हरित व्यवस्थापन कार्यक्रमाकरिता रू. ४९३.०० लाखाची तरतुद केली आहे. रू. ४२८.८४ लाखाची तरतुद प्रगत वनस्पती विश्लेषण प्रयोगशाळेची स्थापना आणि वनस्पती विश्लेषण आणि उती चाचणी द्वारे सामान्यतः उगवलेल्या पिकामध्ये पोषक तत्त्वांच्या कमतरतेचे निदान योजने करिता केली असुन रू. ३१५.९१ लाखाची शाश्वत आणि नैसर्गिक शेतीसाठी सूक्ष्मजीव आणि यांत्रिक उपायांचा वापर करून प्रवेगक कंपोझिटींगवर शेतकऱ्यांचा सहभागात्मक संशोधन केंद्र यांचा समावेश आहे.

अशा या महत्वकांक्षी चारही संशोधन प्रकल्‍पाव्‍दारे शेतकऱ्यांच्या सहभागातून संशोधन कार्य होणार असुन  यामुळे गरजेवर आधारित संशोधन होईल आणि या संशोधनाचा मराठवाड्यातील शेती उद्योगास पाठबळ मिळून मराठवाड्यातील शेती उद्योग शाश्वत होईल अशी आशा विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. इन्द्र मणि यांनी व्यक्त करून महाराष्ट्र शासनाचे आभार मानले. सदर प्रकल्‍प माननीय कुलगुरू मा डॉ इन्‍द्र मणि आणि संशोधन संचालक डॉ दत्‍तप्रसाद वासकर यांच्‍या मार्गदर्शनाखाली मुख्‍य शास्‍त्रज्ञ डॉ गजेंद्र लोढे, डॉ पी एस नेहरकर, डॉ महेश वाघमारे, डॉ गजेंद्र जगताप यांनी महाराष्‍ट्र शासनास सदर केले होते.

Monday, February 26, 2024

संमिश्र शिक्षण पद्धती कृषि शैक्षणिक विकासातील पुढचे पाऊल...... कुलगुरू डॉ. इन्द्र मणि

वनामकृवित आयोजित संमिश्र शिक्षण पद्धतीवरील दोन दिवसीय कार्यशाळा संपन्‍न

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील शिक्षण संचालनालय आणि नवी दिल्‍ली येथील भारतीय कृषी अनुसंधान परिषदेच्‍या भारतीय कृषि सांख्यिकी संशोधन संस्‍था यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक २४ आणि २५ फेब्रवारी रोजी संमिश्र शिक्षण पध्‍दती (ब्लेंडेड लर्निंग) यावर दोन दिवसीय कार्यशाळा संपन्‍न झाली. कार्यशाळेचे उदघाटन कुलगुरू मा डॉ इन्‍द्र मणि यांच्‍या हस्‍ते झाले तर प्रमुख पाहुणे म्‍हणुन भारतीय कृषी अनुसंधान परिषदेचे उपमहासंचालक (शिक्षण संचालक) डॉ. आर. सी. अग्रवाल, संगणक अनुप्रयोग विभागाचे प्रमुख डॉ सुदीप मारवा यांची आभासी माध्‍यमातुन तर व्‍यासपीठावर शिक्षण संचालक डॉ उदय खोडके, प्राचार्य डॉ सय्यद ईस्‍माइल, प्राचर्या डॉ जया बंगाळे आदींची प्रमुख उपस्थिती होती.

अध्यक्षीय भाषणात कुलगुरू मा डॉ. इन्द्र मणि यांनी म्‍हणाले की, मर्यादीत मनुष्यबळावर प्रभावी शिक्षणाचे कार्य करण्यासाठी संमिश्र शिक्षण पद्धती हे शैक्षणिक विकासातील एक महत्त्वाचे पुढचे पाऊल आहे. यामुळे विद्यार्थ्यांना आणि शैक्षणिक व्यवस्थेस मोठा लाभ मिळणार आहे. विद्यार्थ्यांना गुणात्मक वाढ होण्यासाठी आभासी (ऑनलाइन) माध्यमातून देण्यात येणाऱ्या शैक्षणिक साहित्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये गुणात्मक वाढ होऊ शकते.

मार्गदर्शनात उपमहासंचालक डॉ. आर. सी. अग्रवाल म्‍हणाले की, नवीन शिक्षण पद्धतीमध्ये संमिश्र शिक्षण पद्धतीचे अनन्य असे महत्त्व असुन यामध्ये ४० टक्कया पर्यंत अभ्यासक्रम विद्यार्थ्यांना ॲग्रीदीक्षा, स्वयंम सारख्या आभासी माध्यमाद्वारे नियमित अभ्यासामध्ये मिश्रित करून पूर्ण करता येऊ शकतो. यामुळे शिक्षक आणि विद्यार्थी यांना वेळेचे योग्य नियोजन करून उत्कृष्ट शिक्षणाची समान संधी सर्व विद्यार्थ्‍यांना प्राप्‍त होणार आहे.

डॉ. सुदीप मारवा यांनी संमिश्र शिक्षण पद्धतीमध्ये असलेले वेगवेगळे पैलू समजावून सांगुन माध्यमाचा प्रभावीपणे उपयोग केल्‍यास विद्यार्थ्‍यांना अध्‍यायनाकरिता चांगला लाभ होणार असल्‍याचे सांगितले.

दोन दिवसीय कार्यशाळे प्रशिक्षक श्री तरूण खुराणा यांनी संमिश्र शिक्षण पध्‍दती सॉफ्टवेअर वर सविस्‍तर प्रशिक्षण दिले. प्रस्ताविकात संचालक शिक्षण डॉ. उदय खोडके यांनी भविष्यात विद्यापीठांमध्ये संमिश्र शिक्षण पद्धतीचे प्रभावी अंमलबजावणी करण्याच्या दृष्टीने हे विद्यापीठ पूर्णतः तयारी करत असल्याचे संबोधले. सूत्रसंचलन डॉ. मिर्झा बेग यांनी तर आभार समन्वयक डॉ. प्रवीण कापसे यांनी केले.

संमिश्र शिक्षण पद्धती म्हणजे खडू ,फळा आणि वर्ग खोल्या मध्ये शिकवणे यासोबतच आभासी (ऑनलाइन) माध्यमाचे मिश्रण करून शिकविणे होय. दोन दिवसीय कार्यशाळेत १५२ प्राध्यापक, शास्त्रज्ञ आणि विद्यार्थ्‍याना यांना संमिश्र शिक्षण पद्धतीचे प्रशिक्षण दिले. समारोपीय कार्यक्रम शिक्षण संचालक डॉ उदय खोडके यांच्‍या अध्‍यक्षतेखाली पार पडला. कार्यशाळेत सहभागीतांना प्रमाणपत्राचे वितरण करण्‍यात आले. कार्यक्रमास विविध महाविद्यालयाचे प्राचार्य, विभाग प्रमुख, प्राध्‍यापक, कर्मचारी आणि विद्यार्थी मोठया संख्‍येने उपस्थित होते. 

कार्यशाळा यशस्‍वीतेकरिता संचालक शिक्षण डॉ. उदय खोडके यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ. सचिन मोरे, डॉ. प्रवीण कापसे, डॉ. संतोष फुलारी, डॉ रवि शिंदे, डॉ भोसले, डॉ संतोष कदम, डॉ एआयबी मिर्झा, डॉ डि के झाटे, डॉ जी एम कोटे, डॉ अनशुल लोहकरे आदीसह शिक्षण संचालनयाच्‍या कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.






Saturday, February 24, 2024

वनामकृवि आयोजित पश्चिम विभागीय कृषी मेळाव्याची यशस्वी सांगता

पावसाच्या मोठ्या खंडामध्येही तग धरणारे वाण विकसित करू ........ कुलगुरू मा डॉ. इन्द्र मणि 


वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी आणि परभणी आत्‍मा, कृषि विभाग (महाराष्‍ट्र शासन) यांच्‍या संयुक्‍त विद्यमाने कृ‍षी तथा शेतकरी कल्‍याण मंत्रालय (भारत सरकार), नवी दिल्‍ली पुरस्‍कृत पश्चिम विभागीय कृषि मेळावा आणि कृषि प्रदर्शनीचे भव्‍य आयोजन दिनांक २१, २२, आणि २३ फेब्रुवारी, २०२४ रोजी विद्यापीठाच्‍या क्रीडा संकुल प्रागंणात करण्‍यात आले होते, या मेळावाचा समारोपीय कार्यक्रम दिनांक २३ फेब्रुवारी रोजी संपन्‍न झाला. 

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माननीय कुलगुरू डॉ. इन्द्र मणि होते तर विशेष उपस्थिती माननीय जिल्हाधिकारी श्री रघुनाथ गावडे तर प्रमुख पाहुणे म्हणून कृषी विस्तार (भारत सरकार) सहसंचालक श्रीपाद खळीकर, कार्यकारी परिषद सदस्य श्री भागवत देवसरकर, प्रगतशील शेतकरी श्री. चंद्रकांत वरपूडकर, नागपुर येथील विभागीय सेंद्रीय शेती संशोधन केंद्राचे विभागीय संचालक श्री. अजय सिंह राजपूत, श्री. भारत कुमार देवडा, श्री विजय आगरे, माजी कुलगुरू डॉ. के पी गोरे हे होते तर व्यासपीठावर विस्तार शिक्षण संचालक डॉ. धर्मराज गोखले, शिक्षण संचालक डॉ. उदय खोडके, संचालक बीजोत्पादन डॉ. देवराव देवसरकर, नियंत्रक श्री प्रवीण निर्मळ, कुलसचिव श्री पि के. काळे, डीआरडीए प्रकल्प संचालक श्रीमती रश्मी खांडेकर उपसंचालक डॉ. गजेंद्र लोंढे, समन्वयक डॉ. राजेश कदम, मुख्य विस्तार अधिकारी डॉ. प्रशांत देशमुख आदींची उपस्थिती होती.

अध्‍यक्षीय भाषणात कुलगुरू मा डॉ इन्‍द्र मणि म्‍हणाले की, विद्यापीठ संशोधनास प्रथम प्राधान्य देते यातूनच शेतकऱ्यांना महत्त्वपूर्ण शिफारशी आणि तंत्रज्ञान दिले जाते, हे तंत्रज्ञान प्रसारणासाठी पश्चिम विभागीय कृषी महामेळाव्याचे यशस्वी आयोजन करून शेतकऱ्यापर्यंत तंत्रज्ञान पोहोचविण्यात यश प्राप्त झाल्याचे मत व्यक्त करून म्‍हणाले की, तांत्रिक सत्रामध्ये विविध क्षेत्रातील राष्‍ट्रीय पातळीवरील कृषि तज्ञ, प्रगतशील शेतकरी, धोरणकर्ते यांचे मार्गदर्शनाचा लाभ शेतकरी बांधव आणि विद्यार्थ्यांना होईल. मेळाव्‍याच्‍या निमित्ताने आयोजित प्रदर्शनाच्या दालनातून दोन कम्बाईन हार्वेस्टर सह अनेक शेती व गृह उपयोगी वस्तूंची विक्री झाली तर अनेक दालनधारक उद्योजकांना ऑर्डर्स मिळाल्या, यामुळे सहभागी उद्योजकांना मोठी संधी प्राप्त झाली. माननीय कृषी मंत्री नामदार श्री धनंजय मुंडे यांनी व्‍यक्‍त केलेली अपेक्षा पावसाचा मोठा खंड पडला तरी तग धरणारे व शाश्वत उत्पादन देणारे वाण विकसित करण्याचे संशोधन हाती घेण्यासाठी विद्यापीठ शास्त्रज्ञांना सुचित केले‌. याबरोबरच अपर मुख्य सचिव (कृषी) मा. श्री अनुप कुमार आयएएस, मा. श्री पाशा पटेल, अध्यक्ष, कृषी मूल्य आयोग (म. रा.) मा. खा. प्रा. फौजिया खान, मा. संचालक तथा कुलगुरू डॉ. ए.के‌. सिंग भारतीय कृषी अनुसंधान परिषद - भाकृसंसं,  नवी दिल्ली यांच्याही सूचनांचा आदर करून त्याप्रमाणे कार्य करण्याचे धोरण हे विद्यापीठ आखेल असे नमूद केले.

मार्गदर्शनात जिल्हाधिकारी श्री रघुनाथ गावडे म्‍हणाले की, विद्यापीठात आयोजित करण्‍यात आलेल्‍या प्रदर्शनीचा लाभ होत असुन अनेक शेतकरी बांधव आणि दालनधारकांनी सदर प्रदर्शन एक दिवस अधिक वाढण्‍याची विनंती केली, यातच या मेळाव्‍याचे यश लक्षात येते. याप्रकारे वेळोवेळी विद्यापीठाने कृषि प्रदर्शन आयोजित करण्‍याची अपेक्षा त्‍यांनी व्‍यक्‍त केली.

सहसंचालक, कृषी विस्तार, भारत सरकार श्री श्रीपाद खळीकर म्‍हणाले की, मा. कुलगुरू डॉ. इन्द्र मणि यांचा दिल्लीतील विविध कार्यक्रमातील अनुभव आणि त्यांनी हाताळलेले मोठे प्रकल्प या अनुभवाचा लाभ परभणी विद्यापीठाला नक्कीच मिळेल अशी अशा व्यक्त केली. माजी कुलगुरू डॉ. के. पी. गोरे यांनी मराठवाड्यातील शेतकऱ्यांसमोर समस्यांचे डोंगर असताना हे विद्यापीठ योग्य दिशेने कार्य करते तसेच शेतकऱ्यांना आदराचे स्थान मिळवून देण्याचेही कार्य करत आहे. शेतकऱ्यांनी काळानुरूप व हवामान बदलानुसार आपली पीक पद्धती बदलण्याचे आवाहन केले.

प्रास्ताविकात विस्तार शिक्षण संचालक डॉ. धर्मराज गोखले यांनी मेळाव्या दरम्यान झालेल्या कार्यांचे व सहभागींचे वर्णन करून विद्यापीठ प्रशासनाचे आणि सहभागींचे आभार मानले. सूत्रसंचालन डॉ. वनिता घाडगे-देसाई यांनी केले तर आभार मुख्य विस्तार अधिकारी डॉ प्रशांत देशमुख यांनी मानले. सदर कृषि मेळाव्‍यात पश्चिम भारतातील महाराष्‍ट्रासह गुजरात, राजस्‍थान, मध्‍य प्रदेश, छत्‍तीसगड, गोवा, दीव-दमन आणि दादर नगर हवेली इत्‍यादी सहा राज्‍यातील शेतकरी बांधव, कृषी तज्ञ, कृषि संशोधक, धोरणकर्ते, कृषि कंपन्‍या, कृषि अधिकारी, कृषि विस्‍तारक, आणि कृषि उद्योजक हजारोच्‍या संख्‍येने सहभागी झाले होते. सार्वजनिक संस्‍था, खासगी कंपन्‍या, अशासकीय संस्‍था, शेतकरी उत्‍पादक कंपन्‍या आणि बचत गट यांच्‍या ३०० पेक्षा जास्‍त दालनाचा समावेश होता, यात पशु प्रदर्शन, कृषि औजारांचे प्रदर्शन, विविध शेती निविष्‍ठा, बी बियाणे आदींचा समावेश होता. कार्यक्रमास शेतकरी बांधव, कृषी तज्ञ, कृषि संशोधक, धोरणकर्ते, कृषि कंपन्‍या, कृषि अधिकारी, कृषि विस्‍तारक, आणि कृषि उद्योजक यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. याप्रसंगी प्रदर्शनातील विविध दालनांना मिळालेल्या पुरस्कारांचे वितरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. तसेच मेळाव्याच्या सर्व कार्यकारणी सदस्यांचे अभिनंदन करण्यात आले. कार्यक्रमास शेतकरी बांधव, विद्यापीठातील अधिकारी, कर्मचारी, विद्यार्थी, विविध कंपन्‍याचे दालनधारक, पशुपालक, शास्‍त्रज्ञ उपस्थित होते. 



Friday, February 23, 2024

अन्‍नतंत्र महाविद्यालयात उभारण्‍यात आलेल्‍या कॉमन इन्क्युबेशन सेंटर मधील प्रात्‍यक्षिक चाचणीचे उदघाटन

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील अन्नतंत्र महाविद्यालय येथे केंद्र शासन साहिय्यीत प्रधानमंत्री सुक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग खाद्य प्रसंस्करण उद्योग मंत्रालय (भारत सरकार) अंतर्गत सामाईक उष्मायन केंद्र, (कॉमन इन्क्युबेशन सेंटर) ची उभारणी करण्यात आली आहे. त्या अंतर्गत आधुनिक गुळप्रक्रिया प्रकिया संस्करणामध्ये ऊसाच्या रसापासून उत्तम प्रतीचा गुळ, पावडर, गुळवडी व काकवी यासारख्या प्रक्रियायुक्त पदार्थ तयार करण्याचे प्रात्यक्षिक चाचणीचे उदघाटन कुलगुरू मा डॉ. इन्‍द्र मणि नवी दिल्‍ली येथील भारतीय कृषि संशोधन संस्‍थेचे संचालक तथा कुलगुरू मा  डॉ. ए. के. सिंग  यांच्या शुभहस्ते दिनांक २२ फेब्रुवारी  रोजी करण्यात आले. कार्यक्रमास शिक्षण संचालक डॉ. उदय खोडके, विभाग प्रमुख डॉ. हिराकांत काळबांडे प्रमुख उपस्थिती होती. प्राचार्य डॉ. राजेश क्षीरसागर, डॉ. हेमंत देशपांडे, डॉ. सुरेंद्र सदावर्ते, डॉ. अनुप्रिता जोशी यांनी पश्चिम विभागीय कृषि मेळावासाठी आलेल्या प्रगतशील शेतकरी, महिला बचत गट, नवउद्योजक यांच्या भेटी दरम्यान गुळ प्रक्रिया तंत्रज्ञान व यंत्र सामग्री बद्दल माहिती दिली. या प्रसंगी डॉ. वेदप्रकाश सुर्वे, डॉ. कैलास गाढे, डॉ. प्रविण घाटगे, डॉ. गिरीश माचेवाड, डॉ. भारत आगरकर, डॉ. भानुदास पाटील, डॉ. भोकरे आदीसह विद्यालयातील कर्मचारी उपस्थित होते.


वनामकृवि आणि नवी दिल्‍ली येथील भारतीय कृषि संशोधन संस्‍था यांच्‍यात सामंजस्‍य करार

 

भारतीय कृषि संशोधन संस्था, नवी दिल्‍ली आणि वनामकृवि, परभणी यांच्‍या सामंजस्‍य करार

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ आणि नवी दिल्‍ली येथील भारतीय कृषि संशोधन संस्‍था यांच्‍यात दिनांक २२ फेब्रुवारी रोजी कृषि शिक्षण, संशोधन आणि विस्‍तार शिक्षण कार्याकरिता सामजंस्‍य

करार करण्‍यात आला. भारतीय कृषी संशोधन संस्थेचे माननीय संचालक डॉ ए के सिंग, वनामकृविचे कुलगुरू मा डॉ इन्‍द्र मणि, शिक्षण संचालक डॉ उदय खोडके, विस्‍तार शिक्षण संचालक डॉ धर्मराज गोखले, कुल‍सचिव श्री पी के काळे, प्राचार्य डॉ राकेश आहिरे, डॉ डि के पाटील, डॉ एच व्‍ही काळपांडे, डॉ डी एस पेरके, डॉ किरण जाधव, डॉ गोदावरी पवार आदींची उपस्थिती होती.  

यावेळी डॉ ए के सिंग म्‍हणाले की, परभणी कृषि विद्यापीठ निर्मित तुर, सोयाबीन, ज्‍वारी, बाजरी पिकांच्‍या अनेक वाण अत्‍यंत उपयुक्‍त आहेत. या सामंजस्‍य करारामुळे दोन्‍ही संस्‍थेतील संशोधनास मदत होणार आहे. तर कुलगुरू मा डॉ इन्‍द्र मणि म्‍हणाले की, भारतीय कृषि संशोधन संस्‍था ही देशातील एक अग्रगण्‍य संस्‍था असुन या करारामुळे परभणी कृषी विद्यापीठातील विद्यार्थी त्‍यांच्‍या संशोधनास मदत होणार आहे. दोन्‍ही संस्‍थेच्‍या माध्‍यमातुन अद्यायवत विषयावर विविध प्रकारचे अभ्यासक्रम एकत्रित राबविले जातील. शेतकरी यांच्या हितासाठी विविध तंत्रज्ञान व बियाणे यांचे देवाणघेवाण सोपे होईल. नाविन्यपूर्ण संशोधन प्रकल्प सुरू करण्याचा विद्यापीठाचा मानस असल्‍याचे ते म्‍हणाले. याप्रसंगी विद्यापीठातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

Thursday, February 22, 2024

पश्चिम विभागीय कृषि मेळावा आणि प्रदर्शनी निमित्‍त आयोजित तांत्रिक सत्रात विविध मान्‍यवरांचे मार्गदर्शन

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी आणि परभणी आत्‍मा, कृषि विभाग (महाराष्‍ट्र शासन) यांच्‍या संयुक्‍त विद्यमाने कृ‍षी तथा शेतकरी कल्‍याण मंत्रालय (भारत सरकार), नवी दिल्‍ली पुरस्‍कृत पश्चिम विभागीय कृषि मेळावा आणि कृषि प्रदर्शनीचे भव्‍य आयोजन दिनांक २१, २२, आणि २३ फेब्रुवारी, २०२४ रोजी विद्यापीठाच्‍या क्रीडा संकुल प्रागंणात करण्‍यात आले आहे. या निमित्‍त आयोजित तांत्रिक सत्रात विविध मान्‍यवरांनी मार्गदर्शन केले. महाराष्‍ट्र राज्‍याचे अपर मुख्‍य सचिव मा श्री अनुप कुमार यांनी पिक उत्‍पादकतेतील आव्‍हाने आणि कृषि विविधीकरणाची गरज यावर विशेष मार्गदर्शन केले. मार्गदर्शन मा श्री अनुप कुमार म्‍हणाले की, महाराष्‍ट्रातील कापुस, सोयाबीन, बाजरी, मुग पिकांची सरासरी उत्‍पादकता कमी असुन उपलब्‍ध साधनसंपत्‍ती नियोजनपुर्वक वापर करावा लागेल. शेतीत केवळ उत्‍पादन वाढच नव्‍हे तर निव्‍वळ नफा वाढ महत्‍वाची आहे. शाश्‍वत उत्‍पादनाकरिता पिक लागवडीच्‍या योग्‍य शिफारसी शेतकरी बांधवा दयावी लागतील. हवामान बदलाचा मोठा परिणाम पर्जन्‍यमानावर होत असुन अनेक वेळा अतिवृष्‍टीचा मोठा फटका शेतक-यांना बसला आहे. आपणास फळबाग आणि भाजीपाल लागवडीकडे वळावे लागेल. शेती शाळेच्‍या माध्‍यमातुन शेतक-याना प्रशिक्षण दयावे, असे ते म्‍हणाले. तर लोकसभातुन ग्रामीण विकास यावर पाटोदाचे माजी सरपंच श्री भास्‍कर पेरे  पाटील म्‍हणाले की, किफायतशीर शेतीसाठी पिकते तिथे विकले गेले पाहिजे. शेती उत्पादनावर प्रक्रिया होऊन शेतमाल ग्रामीण पातळीवर किंवा आहेत तिथेच विक्री झाला पाहिजे. शेतकऱ्यांनी निसंकोचित आणि लाज न बाळगता आपला माल स्वतः विक्री करावा असे त्‍यांनी आव्हान केले. शेतकरी आणि ग्राहक यांच्यातील दुवा ग्रामपंचायतीनी व्हावे आणि शेतकऱ्यांचा माल विक्री करण्यासाठी विविध उपाय योजना राबवाव्यात. पाच हजाराची टॅक्स घेऊन पंधरा हजाराच्या सुविधा देऊन सुद्धा २५ टक्के नफा मिळवणारी पाटोदाची ग्रामपंचायत आहे. गावामध्ये चार प्रकारचे नळ आहेत एका मधून धुण्यासाठी दुसर्‍यातून धरणाचे तिसऱ्यातून शुद्ध पाणी पिण्याचे आणि चौथ्या मधून पहाटे पाच ते सकाळी आठ पर्यंत अंघोळीसाठी गरम पाण्याचे नळ आहेत. समाजाला योग्य शिकवण देण्याची गरज आहे. काम करून घेण्याची कला प्रशासनाने आणि व्यक्तीने आत्मसात करणे आवश्यक आहे, असे ते म्‍हणाले.

तांत्रिक सत्रात कुलगुरू मा डॉ इन्‍द्र मणि, नियोजन आयोगाचे माजी सदस्‍य डॉ व्‍ही व्‍ही सदामते आणि विस्‍तार शिक्षण संचालक डॉ धर्मराज गोखले यांची प्रमुख उपस्थिती होती. तांत्रिक सत्रात दिनांक २१ फेबुवारी रोजी शेतीमध्‍ये डिजिटल तंत्रज्ञानाचा वापर यावर डॉ व्‍ही एन काळे यांनी मार्गदर्शन केले तर शेतमालास आयात-निर्यातीमधील संधी यावर डॉ अमोल यादव यांनी, भरडधान्‍य प्रक्रिया व भरडधान्‍य पदार्थ यावर श्री महेश लोंढे यांनी मार्गदर्शन केले तर भरडधान्‍यांचे मुल्‍यवर्धन यावर श्री वीरशेट्टी पाटील यांनी मार्गदर्शन केले. दिनांक २२ फेब्रुवारी रोजी व्‍यापारीदृष्‍टीने सिताफळ लागवडावर डॉ एन एम कसपटे, गटशेतीव्‍दारे आंबा लागवडीवर डॉ बी एम कापसे, आंबा फळबाग व्‍यवस्‍थापनावर श्री चंद्रकांत वरपुडकर, रेशीम शेतीवर श्री अजय मोहिते, सिंचन पाणी व्‍यवस्‍थापन आणि कृषि पर्यटनावर डॉ सुरेश कुलकर्णी, कृषि पर्यटातील संधी यावर श्री मनोज हाडवळे तसेव दुपारच्‍या सत्रात नैसर्गिक शेतीतील अनुभव यावर कृषिभुषण श्री सुभाष शर्मा, नैसर्गिक शेतीवर श्री संतोष आळसे, सेंद्रीय शेतीतील अनुभव श्रीमती विद्याताई रूद्राक्ष, सेंद्रीय व नैसर्गिक शेतीतील संधी यावर डॉ ए एस राजपुत, जागर सेंद्रीय शेतीचा यावर श्री शिवराम घोडके, लोकसभातुन ग्रामीण विकास यावर श्री भास्‍कर पेरे पाटील यावेळ मार्गदर्शन केले.


 

वनामकृवितील पश्चिम विभागीय कृषि मेळावा निमित्‍त आयोजित कृषि प्रदर्शनास मोठा प्रतिसाद

कृषि प्रदर्शनीचा उद्या शेवटचा दिवस

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी आणि परभणी आत्‍मा, कृषि विभाग (महाराष्‍ट्र शासन) यांच्‍या संयुक्‍त विद्यमाने कृ‍षी तथा शेतकरी कल्‍याण मंत्रालय (भारत सरकार), नवी दिल्‍ली पुरस्‍कृत पश्चिम विभागीय कृषि मेळावा आणि कृषि प्रदर्शनीचे भव्‍य आयोजन दिनांक २१, २२, आणि २३ फेब्रुवारी, २०२४ रोजी विद्यापीठाच्‍या क्रीडा संकुल प्रागंणात करण्‍यात आले असुन आज दिनांक २२ फेब्रुवारी रोजी शेतकरी बांधव, कृषि विस्‍तारक, शास्‍त्रज्ञ, कृषि उद्योजक आणि विद्यार्थी यांनी उत्‍स्‍फुत प्रतिसाद दिला. कृषी प्रदर्शनीत सार्वजनिक संस्‍था, खासगी कंपन्‍या, अशासकीय संस्‍था, शेतकरी उत्‍पादक कंपन्‍या आणि बचत गट यांच्‍या ३०० पेक्षा जास्‍त दालनाचा असुन पशु प्रदर्शन, कृषि औजारांचे प्रदर्शन, विविध शेती निविष्‍ठा, बी बियाणे आदींचा समावेश आहे. यावेळी आयोजित पशु प्रदर्शनीत विविध जातीचे पशुधन त्‍यात देशी गोवंश, देशी म्‍हैसवर्गीय जाती, शेळी, कुक्‍कट पालन, कुत्रांच्‍या विविध जाती,  दुग्‍धजन्‍य पदार्थ, गांडुळ खत निर्मिती, विविध चारा पिके आदी दालनाचा समावेश आहे.  कृषि औजारांच्‍या प्रदर्शनीत बैलचलित यंत्र, ट्रक्‍टर चलित यंत्र, आधुनिक सिंचन यंत्रणा, ठिंबक सिंचन, तुषार सिंचन, सुक्ष्‍म सिंचन आदींची समावेश आहे. जिल्‍हा ग्रामीण विकास यंत्रणाच्‍या माध्‍यमातुन आयोजित खाद्य महोत्‍सवासही नागरीकांनी मोठी गर्दी केलेली पाहावयास मिळाली. दिनांक २३ फेबुवारी रोजी सदर कृषि मेळावा आणि कृषि प्रदर्शनीचा शेवटचा दिवस असुन माननीय कृषीमंत्री मा ना श्री धनंजय मुंडे, कुलगुरू मा डॉ इन्‍द्र मणि, पुणे येथील कृषि परिषदेचे महासंचालक मा श्री रावसाहेब भागडे आणि मान्‍यवरांच्‍या उपस्थित समारोपीय कार्यक्रम होणार आहे.






Wednesday, February 21, 2024

कृषि क्षेत्रात डिजिटल तंत्रज्ञानाचा वापर करण्‍याची आवश्यकता....... कृषि मंत्री मा ना श्री धनंजयजी मुंडे

वनामकृवीत आयोजित पश्चिम विभागीय कृषि मेळावा आणि कृषि प्रदर्शनाची आज पासून सुरुवात 

देशातील महाराष्‍ट्रासह सहा राज्‍यातील शेतकरी बांधव आणि कृषि तज्ञांचा सहभाग


भारत अन्‍नधान्‍यात स्‍वयंपुर्ण देशच नव्‍हे तर अन्‍नधान्‍यात निर्यातदार देश म्‍हणुन ओळखला जातो. भारताची अर्थव्यवस्था ही शेती क्षेत्राशी निगडीत आहे. आज देश अन्‍नधान्य, दुध उत्‍पादन, फळे आणि भाजीपाल उत्‍पादनात जगात आघाडीवर आहे. जगातील सर्वात जास्त पशुधन आपल्‍या देशात आहे. हे सर्व कृषी तंत्रज्ञान आणि शेतकरी बांधवाच्‍या अथक परिश्रमाने शक्‍य झाले आहे. आज हवामान बदलामुळे मोठया प्रमाणात शेतीवर परिणाम होत आहे. विद्यापीठ निर्मित हवामानास अनुकूल कृषि तंत्रज्ञान, विविध पिकांची वाण शेतकरी बांधवापर्यंत गेली पाहिजेत. तसेच विद्यापीठाने बदलत्‍या हवामानास अनुकूल उप‍युक्‍त तंत्रज्ञान विकसित करण्‍यावर भर दयावा. पाऊसात अधिक दिवसाचा खंड पडला तरी शाश्‍वत उत्‍पादन देणा-या पिकांच्‍या वाणाची निर्मिती केली पाहिजे, असे प्रतिपादन कृषि मंत्री मा ना श्री धनंजयजी मुंडे यांनी केले. 

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी आणि परभणी आत्‍मा, कृषि विभाग (महाराष्‍ट्र शासन) यांच्‍या संयुक्‍त विद्यमाने कृ‍षी तथा शेतकरी कल्‍याण मंत्रालय (भारत सरकार), नवी दिल्‍ली पुरस्‍कृत पश्चिम विभागीय कृषि मेळावा आणि कृषि प्रदर्शनीचे भव्‍य आयोजन दिनांक २१, २२, आणि २३ फेब्रुवारी, २०२४ रोजी विद्यापीठाच्‍या क्रीडा संकुल प्रागंणात करण्‍यात आले आहे. मेळाव्‍याचे उदघाटनाप्रसंगी ते बोलत होते. माननीय कृषि मंत्री मा ना श्री धनंजय मुंडे यांनी मेळाव्‍याचे ऑनलाईन माध्‍यमातुन उदघाटन केले.

कार्यक्रमाच्‍या अध्‍यक्षस्‍थानी कुलगुरू मा डॉ इन्‍द्र मणि हे होते तर विशेष अतिथी म्‍हणुन राज्‍य कृषी मुल्‍य आयोगाचे अध्‍यक्ष मा श्री पाशा पटेल, राज्‍यसभा सदस्‍य मा खा प्रा फौजिया खान, भारतीय कृषि संशोधन संस्‍थेचे संचालक तथा कुलगुरू मा डॉ ए के सिंग, आमदार मा श्री सुरेश वरपुडकर, माननीय जिल्‍हाधिकारी श्री रघुनाथ गावडे, राष्‍ट्रीय कामधेनु आयोगाचे सदस्‍य श्री सुनिल मानसिंगका, भारतीय किसान संघाचे राष्ट्रीय संघटन मंत्री श्री दिनेश कुलकर्णी, प्रसिध्‍द सिने अभिनेता श्री उपेंद्र लिमये, नियोजन आयोगाचे माजी सदस्‍य डॉ व्‍ही व्‍ही सदामते, एनएससी संचालक डॉ सुधीर कोकरे, भारतीय किसान संघाचे प्रदेश संघटन मंत्री श्री दादा लाड, डाळींब संशोधन केंद्राचे डॉ राजीव मराठे, राष्‍ट्रीय कांदा लसुन संशोधन केंद्राचे डॉ विजय महाजन, कृषि मंत्रालयातील अतिरिक्‍त आयुक्‍त डॉ वाय आर मीना, डॉ व्‍ही एन काळे, माजी कुलगुरू डॉ ए के गोरे, माजी कुलगुरू डॉ अशोक ढवण आदींची उपस्थिती होती तर व्‍यासपीठावर विभागीय कृषि सहसंचालक श्री साहेबराव दिवेकर, विस्‍तार शिक्षण संचालक डॉ धर्मराज गोखले. संशोधन संचालक डॉ दत्‍तप्रसाद वासकर, शिक्षण संचालक डॉ उदय खोडके, आत्‍मा प्रकल्‍प संचानक श्री दौलत चव्‍हाण, श्री रवि हरणे,  श्री संतोष आळसे, डिआरडीए प्रकल्‍प संचालक श्रीमती रश्‍मी खांडेकर, समन्‍वक डॉ राजेश कदम आदी उपस्थित होते.  

मार्गदर्शनात कृषिमंत्री मा ना श्री धनंजय मुंडे पुढे म्‍हणाले की, परभणी कृषी विद्यापीठ आणि कृषि विभागाच्‍या वतीने आयोजित शेतकरी मेळावा आणि कृषि प्रदर्शनीच्‍या माध्‍यमातुन राष्‍ट्रीय-आंतरराष्‍ट्रीय पातळीवरील नाविण्‍यपूर्ण कृषि तंत्रज्ञान, कृषि संशोधन पाहण्‍याची सुवर्ण संधी शेतकरी बांधवांना उपलब्‍ध झाली असुन याचा लाभ मराठवाडयातील शेतकरी बांधवांनी घ्‍यावा. यात सहभागी सहा राज्‍यातील शेतकरी, तज्ञ आणि कृषि उद्योजक एकत्रित येत आहेत, त्‍यांची विचारांची देवाणघेवाण होणार आहे. अनेक शेतकरी आपआपल्‍या शेतीत चांगले प्रयोग करतात, शेतकरीही एक संशोधक आहे. यामुळे विविध राज्‍यातील शेती व तेथील शेतकरी बांधवाचे अनुभव जाणुन घेण्‍याची संधी आहे. केद्र शासन आणि राज्‍य शासन शेती आणि शेतकरी विकासाकरिता अनेक योजना राबवित आहेत. पी एम किसान योजना तसेच नमो महासन्‍मान योजनेचा लाभ जास्‍तीत जास्‍त शेतकरी बांधवा होण्‍याकरिता पुढाकार घेण्‍यात आला. राज्‍यातील शेतक-यांसाठी फलदायी ठरलेली पोकरा योजनेची व्‍याप्‍ती वाढविण्‍यात आली. खरीप हंगामात प्रधानमंत्री पीकविमा योजने अधिक सोयीची करण्‍यात आली. सेंद्रीय शेती विषमुक्‍त शेती योजना प्रभावीपणे राब‍विण्‍यात येत आहे. शेतकरी कल्‍याण हेच शासनाचे ध्‍येय आहे. यावर्षी पाऊसाच्‍या अनियमिततामुळे काही भागात उत्‍पादनात घट आली, जास्‍तीत जास्‍त शेतकरी बांधवा नुकसान  भरपाई मिळण्‍याकरिता प्रयत्‍न करण्‍यात आला. 

मा ना श्री पाशा पटेल म्‍हणाले की, हवामान बदलाचा मानवी जीवनावर आणि शेतीवर मोठा परिणाम होत आहे. हवामानात कार्बनची पातळी वाढ झाली आहे. जागतिक तापमान वाढ होत आहे, पर्यावरण वाचवायचे असेल तर जंगलाची वाढ होणे आवश्यक आहेयामुुुुळेच हवामान संतुलित राहील व शेती व्यवसायात शाश्‍वतता येईल. याकरिता सामाजिक आणि कृषि विद्यापीठ पातळीवर प्रयत्‍नांची गरज आहे. 

अध्‍यक्षीय भाषणात कुलगुरू मा डॉ इन्‍द्र मणि म्‍हणाले की, शेती आणि शेतकरी विकास याकरिता आपणास कार्य करण्‍याची संधी आपणास मिळाली आहे. कृषी संशोधकांनी शेतकरी हा केंद्रबिदु ठेवुण समर्पित भावनेने कार्य करावे. परभणी कृषी विद्यापीठ विकसित बियाणास  शेतकरी बांधवा मध्‍ये मोठी मागणी आहे, यावर्षी विद्यापीठातील २००० एकर पडित जमीन वहती खाली आणुन पैदासकार बीजोत्‍पादन दुप्‍पट करण्‍यात आले. येणा-या तीन वर्षात ५०००० क्विंटल बीजोत्‍पादनाचा विद्यापीठाचे लक्ष आहे. विद्यापीठाने डिजिटल तंत्रज्ञानात आघाडी घेतली असुन यात कुशल मनुष्‍यबळ निर्मितीवर भर देत आहे. गेल्‍या वर्षी ८० विद्यार्थी आणि प्राध्‍यापक १२ देशात प्रशिक्षण घेऊन आले आहेत, याचा लाभ संशोधनात होणार आहे. विद्यापीठ राबवित असलेला माझा एक दिवस माझ्या बळीराजासाठी उपक्रमामुळे शेतकरी – शास्‍त्रज्ञ यांच्‍यातील प्रत्‍यक्ष संवाद वाढला आहे.

मार्गदर्शनात कुलगुरू मा डॉ ए के सिंग म्‍हणाले की, परभणी कृषि विद्यापीठात अनेक नाविण्‍यापुर्ण उपक्रम राबविण्‍यात येत आहेत. राष्‍ट्रीय पातळीवर डॉ इन्‍द्र मणि यांच्‍या नेतृत्‍वाखाली शेतीत क्षेत्रात ड्रोन वापराबाबतची प्रमाणित कार्य पध्‍दती निश्चित करण्‍यात आली, याचा लाभ शेतकरी बांधवा होणार आहे. भविष्यात कार्बन क्रेडिटच्या माध्यमातून शेतकऱ्यांची आर्थिक उन्नती होऊ शकते त्या दृष्टीने शेतकरी बांधवांनी विचार करावा, असे प्रतिपादन केले.

प्रास्ताविकात विस्तार शिक्षण संचालक डॉ. धर्मराज गोखले यांनी विद्यापीठाचे विस्तार कार्य व मेळाव्याच्या आयोजनाची पार्श्वभूमी विशद केली. सुत्रसंचालन डॉ वनिता घाडगे देसाई यांनी केले आभार डॉ प्रशांत देशमुख यांनी मानले. यावेळी आयोजित कृषी प्रदर्शनीचे उदघाटन मान्‍यवरांच्‍या हस्ते करण्‍यात आले. सदर कृषि मेळाव्‍यात पश्चिम भारतातील महाराष्‍ट्रासह गुजरात, राजस्‍थान, मध्‍य प्रदेश, छत्‍तीसगड, गोवा, दीव-दमन आणि दादर नगर हवेली इत्‍यादी सहा राज्‍यातील शेतकरी बांधव, कृषी तज्ञ, कृषि संशोधक, धोरणकर्ते, कृषि कंपन्‍या, कृषि अधिकारी, कृषि विस्‍तारक, आणि कृषि उद्योजक हजारोच्‍या संख्‍येने सहभागी झाले आहेत. सार्वजनिक संस्‍था, खासगी कंपन्‍या, अशासकीय संस्‍था, शेतकरी उत्‍पादक कंपन्‍या आणि बचत गट यांच्‍या ३०० पेक्षा जास्‍त दालनाचा असुन पशु प्रदर्शन, कृषि औजारांचे प्रदर्शन, विविध शेती निविष्‍ठा, बी बियाणे आदींचा समावेश आहे. कार्यक्रमास शेतकरी बांधव, कृषी तज्ञ, कृषि संशोधक, धोरणकर्ते, कृषि कंपन्‍या, कृषि अधिकारी, कृषि विस्‍तारक, आणि कृषि उद्योजक यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला.