Tuesday, January 30, 2024

युवक महोत्सव स्पर्धेत वनामकृविच्‍या विद्यार्थीनीचे घवघवीत यश

पश्चिम विभागीय आंतर विद्यापीठीय युवक महोत्सव स्पर्धा दिनांक २२ ते २६ जानेवारी दरम्‍यान नागपुर येथील राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठात आयोजित करण्यात आली होती. या युवक महोत्सवात वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाचे ३६ विद्यार्थ्‍यांनी लोकनृत्य, माईम, स्कीट, व फाईन आर्ट या प्रकारात विविध स्‍पर्धा प्रकारात सहभाग  नोंदविला होता. यात एकुण तीन पदक पटकावुन तीन विद्यार्थीनीनी घवघवीत यश संपादन केले. मेहंदी कला प्रकारात सिध्‍दी देसाई हिने सुवर्ण पदक आणि कार्टुनींग मध्‍ये चतुर्थ स्‍थान पटकावले तसेच मातीकला प्रकारात प्रिती लवुडिया हिने रौप्‍य पदक, पोस्‍टर मेकिंग मध्‍ये साक्षी डाकुलगे हिने मध्‍ये कास्‍य पदक पटकावले.

या यशाबद्दल कुलगुरु कुलगुरू डॉ. इन्द्र मणि यांनी विशेष कौतुक करतांना म्‍हणाले, कृषी शिक्षणात मुलींचे प्रमाण वाढत असुन या विद्यार्थीनी कला व सां‍स्‍कृतिक स्‍पर्धेत विद्यापीठाचे नाव उज्‍वल करित आहेत. संचालक शिक्षण डॉ. उदय खोडके, कुलसचिव डॉ. पु. को. काळे, विद्यार्थी कल्याण अधिकारी डॉ. पी. आर. झंवर यांनी यशस्वी विद्यार्थीनीचे व संघव्यवस्थापक यांचे अभिनंदन केले. डॉ. आशा देशमुख, यांनी संघ व्यवस्थापक म्हणून काम केले.



Friday, January 26, 2024

जय जवान, जय किसान, जय विज्ञान, जय अनुसंधान …….. कुलगुरू मा डॉ इन्‍द्र मणि

वनामकृवित ७५ वा प्रजासत्‍ताक दिवस उत्‍साहात साजरा



देशाच्‍या प्रगतीमध्‍ये कृषी क्षेत्राचे मोठे योगदान असुन आज देश अन्‍नधान्‍यात स्‍वयंपुर्ण झाला तर फळ भाजीपाला उत्‍पादनात आघाडीवर आहे. याचे सर्व श्रेय शेतकरी बांधवाचे परिश्रम, शासनाचे धोरण, कृषि संशोधनाची जोड यामुळे शक्‍य झाले आहे, म्‍हणुनच जय जवान, जय किसान, जय विज्ञान आणि जय अनुसंधान हा नारा दिला जातो, असे प्रतिपादन कुलगुरू मा डॉ इन्‍द्र मणि यांनी केले. वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाच्‍या मुख्‍य प्रांगणात कुलगुरू मा. डॉ. इन्‍द्र मणि यांच्‍या हस्‍ते ध्‍वजारोहण करून प्रजासत्‍ताक दिन उत्‍साहात साजरा करण्‍यात आला, त्‍यावेळी मार्गदर्शन करतांना ते बोलत होते. कार्यक्रमास  संशोधन संचालक डॉ दत्‍तप्रसाद वासकर, विस्‍तार शिक्षण संचालक डॉ धर्मराज गोखले, कुलसचिव श्री पी के काळे, विद्यापीठ नियंत्रक श्री प्रविण निर्मलप्राचार्य डॉ सय्यद ईस्‍माईल, प्राचार्या डॉ जया बंगाळे, प्राचार्य डॉ राजेश क्षीरसागर, प्राचार्य डॉ व्‍ही एस खंदारे, विद्यार्थी कल्‍याण अधिकारी डॉ पी आर झंवर  आदींची प्रमुख उपस्थिती होती.

यावेळी कुलगुरू मा डॉ इन्‍द्र मणि यांनी प्रजासत्‍ताक दिनांच्‍या सर्वांना शुभेच्‍छा देऊन पुढे म्‍हणाले की, कृषि क्षेत्राच्‍या विकासात कृषि संशोधनाचे महत्‍व असुन कृषि तंत्रज्ञानाच्‍या आधारेच देशात हरित क्रांती झाली. परभणी कृषी विद्यापीठाने संशोधनाव्‍दारे विविध पिकांच्‍या अधिक उत्‍पादन देणारे वाण विकसित केले, त्‍यास शेतकरी बांधवामध्‍ये मोठी मागणी आहे. यावर्षी विद्यापीठातील साधारणत: दोन हजार एकर पडित जमीन लागवडी खाली आणण्‍यात आली, त्‍यामुळे विद्यापीठाचे बीजोत्‍पादन दुप्‍पट होण्‍यास मदत झाली आहे. कृषि डिजिटल तंत्रज्ञान ड्रोन तंत्रज्ञान, रोबोटिक्‍स मध्‍ये परभणी कृषी विद्यापीठ कार्य करित आहे. जास्‍तीत जास्‍त शेतकरी बांधवा पर्यंत तंत्रज्ञान पोहचविण्‍याकरिता आपण यावर्षी ३५० पेक्षा जास्‍त गावात माझा एक दिवस माझा बळिराजासाठी उपक्रम राबविला, यामुळे कृषी शास्‍त्रज्ञ – शेतकरी यांच्‍यातील नाते अधिक दृढ होत आहे.

याप्रसंगी छात्रसेना अधिकारी डॉ. जयकुमार देशमुख यांच्‍या मार्गदर्शनाखाली छात्रसैनिकांनी कुलगुरू यांना मानवंदना दिली. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन श्री उदय वाईकर यांनी केले. कार्यक्रमास विद्यापीठातील अधिकारी, कर्मचारी विद्यार्थी  मोठया संख्‍येने उपस्थित होते.






Thursday, January 25, 2024

सेंद्रीय शेती हा शाश्‍वत शेतीचा पाया……कुलगुरू मा. डॉ. इन्द्र मणि

सेंद्रीय शेती ऑनलाईन संवाद मालिकेचे उदघाटन, प्रत्येक महिन्याच्या दुस-­या व चौथ्या मंगळवारी करण्‍यात येेणार मार्गदर्शन

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील सेंद्रीय शेती संशोधन आणि प्रशिक्षण केंद्र व शेकरू फाऊंडेशन (मुंबई) यांचे वतीने राज्यस्तरीय ऑनलाईन सेंद्रीय व नैसर्गिक शेती प्रशिक्षण व संवाद मालिकेचे आयोजन प्रत्येक महिन्याच्या दुस­या व चौथ्या मंगळवारी करण्यात येत आहे. या श्रृखंलेचे उद्धघाटन दिनांक  २३ जानेवारी रोजी सायंकाळी ऑनलाईन पध्दतीने संपन्न झाले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कुलगुरू मा. डॉ. इन्द्र मणि हे होते. नागपुर येथील जैविक व नैसर्गिक शेती केंद्राचे विभागीय संचालक डॉ. अजय सिंह राजपुत यांचे मुख्य तांत्रिक मार्गदर्शन झाले. या प्रसंगी संशोधन संचालक डॉ. दत्तप्रसाद वासकर, विस्‍तार शिक्षण संचालक डॉ. धर्मराज गोखले, विभाग प्रमुख डॉ. प्रविण वैद्य, डॉ. डब्ल्यु. एन. नारखेडे, डॉ. आनंद गोरे, डॉ. स्मिता खोडके, डॉ. पपिता गौरखेडे, डॉ. श्रध्दा धुरगुडे, डॉ. प्रितम भुतडा आदी उपस्थित होते.

अध्यक्षीय मार्गदर्शनात कुलगुरू मा डॉ. इन्द्र मणि म्हणाले की, सर्वांचे आरोग्य महत्वाचे आहे, आज एक देश एक स्वास्थ्य (आरोग्य) संकल्पना महत्वाची असून त्यात जमीनीचे, पिकाचे / वनस्पतीचे, मनुष्य व प्राण्यांचे स्वास्थ्य हे एकामेकांवर अवलंबून आहे. शाश्‍वत उत्पादन हे उद्दिष्ट असावे. रसायने विरहीत शेतीपेक्षा कमी रसायने वापरून केली जाणारी शेती करावी व त्यानंतर टप्प्याटप्प्याने सेंद्रीय व नैसर्गिक शेतीकडे जावे. त्यामुळे अचानक केला जाणारा बदल हा शेती क्षेत्र व एकूणच पर्यावरण यांचासाठी स्विकार्य होईल. आज सेंद्रीय व नैसर्गिक शेती मध्ये निविष्ठांची निर्मीती व उपलब्धता या बाबी महत्वाच्या आहेत. सेंद्रीय व नैसर्गिक शेती मध्ये निविष्ठांची बाहेरून खरेदी करण्यापेक्षा शेतक­यांनी त्या स्वत: शेतावर  बनविने व त्या वापरणे आवश्यक आहेत. त्या कशा कमी खर्चात व शास्त्रीय दृष्टया तयार करता येतील असे प्रशिक्षण शास्त्रज्ञांनी शेतक­यांना देणे आवश्यक आहे. भारतीय शेतकर­यांची सामाजिक, आर्थिक व स्थानिक परिस्थिती बघून, त्यांच्या समस्या लक्षात घेवून त्यांना मार्गदर्शन करणे आवश्यक आहे. सेंद्रीय प्रमाणिकरण ही प्रक्रिया कमी खर्चाची व सोपी करणे आवश्यक आहे. शेताचे, शेतमालाचे, संपुर्ण गावाचे यापैकी कशाचे प्रमाणिकरण करायचे हा निर्णय महत्वाचा ठरतो. सेंद्रीय शेतमालाचे विक्री व्यवस्थापन व सुविधा यावर लक्ष देणे गरजेचे आहे. शास्त्रज्ञांनी शास्त्रीय दृष्टीकोनातून काम करावे, नव्याने जमीनीचा आरोग्य निर्देशांक विकसीत करावा.           

मार्गदर्शनात डॉ. राजपूत यांनी या पर्यावरणाचे व मानवाचे आरोग्य व चांगले अन्न हा अधिकार सर्वांचा आहे असे सांगितले. ते पुढे म्हणाले की, हरीतक्रांतीमुळे शेती उत्पादनात वाढ झाली पण पोषकता कमी झाली. आजार वाढले, प्रश्न वाढले, जमिनीचे आरोग्य खालावले, यामुळे नैसर्गिक शेतीकडे वळावे. त्यांनी नैसर्गिक शेतीची संकल्पना व जिवामृत, बिजामृत, वाफसा व आच्छादन हे नैसर्गिक शेतीची चार महत्वाचे स्तंभ असून यावर सविस्तर माहिती दिली. याशिवाय शेतक­यांनी मिश्र पीक पध्दती व पारंपारिक ज्ञानांचा अवलंब नैसर्गिक शेतीमध्ये करावा असे आवाहन केले. त्यांनी पाच स्तरीय पीक पध्दती, इमा मार्केट, शेत माल उत्पादनावर आधारित बाजारपेठ यावर माहिती दिली.

डॉ. प्रविण वैद्य यांनी जमीनीचे आरोग्य सुधारण्यासाठी जमीनीचा कर्ब वाढवणे आवश्यक असून विविध सेंद्रीय निविष्ठांचा पर्याय शोधणे आवश्यक आहे असे सांगितले. याशिवाय शेतक­यांचे अनुभव लक्षात घेवून त्यांना मार्गदर्शन करणे आवश्यक आहे, असे सांगितले.

कृषिभुषण शेतकरी श्री. ओंकार शिंदे यांनी सेंद्रीय शेतीमध्ये सुरुवात ही कडधान्य पिके, भरडधान्य पिके, निवडक भाजीपाला पिके यापासून सुरूवात करावी जेणेकरून उत्पादनात घट येणार नाही, असे आवाहन शेतकरी बंधू-भगिणीना केले. याशिवाय त्यांनी सेंद्रीय शेतीमध्ये मजुरांचा प्रश्न, सुधारित यंत्रे व यांत्रिकीकरणाची गरज, प्रमाणिकरण खर्च कमी करणे, बाजारपेठ व विक्री व्यवस्था यावर काम करण्याची गरज व्यक्त केली. तसेच सेंद्रीय शेतमालाला वेगळी आधारभूत किंमत शासनाकडून मिळावी अशी अपेक्षा व्यक्त केली.

प्रास्ताविकात डॉ. आनंद गोरे यांनी सेंद्रीय शेती प्रकल्पातर्फे राबविण्यात आलेल्या प्रशिक्षण कार्यक्रमाचे व विविध उपक्रमांची माहिती दिली. सुत्रसंचालन डॉ. प्रितम भुतडा व आभार प्रदर्शन डॉ. श्रध्दा धुरगुडे यांनी केले. कार्यक्रमास विद्यापीठातील प्राचार्य, विभाग प्रमुख, शास्त्रज्ञ, प्राध्यापक, अधिकारी, कर्मचारी, विद्यार्थी आणि विशेष म्हणजे शेतकरी बंधु-भगिनी मोठा प्रमाणावर उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी डॉ. श्रध्दा धुरगुडे, डॉ. पपिता गौरखेडे, डॉ. प्रितम भुतडा, डॉ. सुनिल जावळे, श्री. रघुनाथ थोरात, श्री. सचिन रणेर व श्री. अजय कटारे आदींनी परिश्रम घेतले.

 

 

Saturday, January 20, 2024

मौजे मटकऱ्हाळा येथे रब्बी हंगामातील पिकावरील कीड व रोगाविषयी मार्गदर्शन

रिलायन्स फाऊंडेशन व  वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी यांच्या संयुक्त विद्यमाने  दिनांक १९ जानेवारी रोजी डिजिटल फार्म स्कुल या उपक्रमा अतंर्गत रबी हंगामातील पिकावरील कीड, व रोग निदान कॅम्पचे आयोजन मौजे मटकऱ्हाळा ता.जि. परभणी येथे करण्यात आले. उपक्रमात कृषि तंत्रज्ञान माहिती केंद्राचे विस्तार कृषि विद्यावेत्ता तथा व्यवस्थापक डॉ.गजानन गडदे व वरिष्ठ संशोधन सहायक श्री.मधुकर मांडगे यांनी शेतकऱ्यांच्या शेतावर भेटी देऊन हरभरा, तूर, गहू व ज्वारी या पिकाची पाहणी केली. भेटी दरम्यान हरभरा पिकात घाटेअळी व मर, गहू पिकामध्ये खोडमाशी तसेच ज्वारी पिकामध्ये लष्करी अळीचा प्रादुर्भाव आढळून आल्याचे निदान करण्यात आले. यावेळी कीड व रोगावरील  व्यवस्थापन आणि खत व पाणी व्यवस्थापन यावर गटचर्चेतून मार्गदर्शन करण्‍यात आले. सदर कार्यक्रमाचे आयोजन रिलायन्स फाउंडेशनचे जिल्हा व्यवस्थापक श्री. नितीन कोल्हे आणि रिलायन्स फाउंडेशन चे कार्यक्रम सहाय्यक श्री.रामा राऊत यांनी केले. कार्यक्रमास शेतकरी बांधव मोठया संख्‍येने उपस्थित होते.

Friday, January 19, 2024

बदलत्‍या हवामान परिस्थितीत बांबु लागवड एक चांगला पर्याय ....... महाराष्‍ट्र राज्‍य कृषि मुल्‍य आयोगाचे अध्‍यक्ष मा श्री पाशा पटेल यांचे प्रतिपादन





कार्बन उत्सर्जन वाढल्यामुळे तापमानात प्रचंड वाढ होत आहे. याचा परिणाम ऋतुचक्रावर झाला आहे. हवामान बदलाचा शेती क्षेत्रावर मोठा परिणाम होत आहे, वाढते तापमान, अनिश्चित पर्जन्‍यमान यामुळे कृषि उत्‍पादनात अनिश्चितता निर्माण होत आहे. भविष्‍यात शेतीमाल उत्‍पादनात मोठी घट होण्‍याचे भाकित अनेक जागतिक संस्थांनी केले आहे. बदलत्‍या हवामानात शाश्‍वत शेती करिता कृषि संशोधनात भर दयावा लागेल, असे प्रतिपादन महाराष्‍ट्र राज्‍य कृषि मुल्‍य आयोगाचे अध्‍यक्ष मा श्री पाशा पटेल यांनी दिनांक १८ जानेवारी वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठात आयोजित बैठकीत ते बोलत होते.  यावेळी माननीय कुलगुरू डॉ इन्‍द्र मणि, यावेळी शिक्षण संचालक डॉ उदय खोडके, विस्‍तार शिक्षण संचालक डॉ धर्मराज गोखले, कुलसचिव श्री पी के काळे, विभाग प्रमुख डॉ दिगांबर पेरके, डॉ सचिन मोरे आदींची उपस्थिती होती.

मा श्री पाशा पटेल पुढे म्‍हणाले की, बदलत्‍या हवामान परिस्थितीत शेतकरी बांधवाकरिता बाबु लागवड उपयुक्‍त ठरू शकेल. बांबु पासुन अनेक वस्‍तु बनवु शकतो, घरातील व कार्यालयातील फर्निचर बनविण्‍याकरिता बांबुला प्रोत्‍साहन दिले पाहिजे. बांबुचे झाड सर्वाधिक काबॅन डायऑक्‍साईड शोषुन घेते, त्‍यामुळे तापमान कमी करण्‍यासाठी बांबु लागवड उपयुक्‍त ठरेल. बांबुपासुन आकर्षक फर्निचर, विविध वस्‍तु तयार तसेच इथेनॉल निर्मिती शक्‍य आहे. बांबू लागवडीच्‍या स्‍वरूपात शेतकरी बांधवाना एक चांगला पर्याय आहे. देशातील विविध राज्‍यात विविध पिकांच्‍या लागवड खर्च मुल्‍यामापनामुळे लागवडी खर्चात मोठी तफावत आढळते, याबाबत अभ्‍यास करण्‍याची गरज आहे.

कुलगुरू मा डॉ इन्‍द्र मणि म्‍हणाले की, लवकरच नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण कृषि विद्यापीठात राबविण्‍यात येणार असुन कौशल्‍य विकास आधारीत विविध अभ्‍यासक्रम सुरू करण्‍यात येत आहेत. यात बांबु लागवड तंत्रज्ञान व फर्निचर निर्मिती याचा समावेश करण्‍यात येईल. बांबुचा वापर प्राचीन काळी आपण करतच होतो, त्‍याच प्रमाणे बाबु आधारीत अनेक बाबी आपण करू शकतो. बदलत्‍या हवामानात अनूकुल सौरऊर्जा आधारीत अॅग्रीपीव्‍ही, शेततळे यासारख्‍या तंत्रज्ञान विकास व संशोधन यावर कृषि विद्यापीठ कार्य करीत असल्‍याचे ते म्‍हणाले. 

बैठकीचे सुत्रसंचालन डॉ सचिन मोरे यांनी केले. बैठकीस प्राचार्य डॉ व्‍ही एस खंदारे,  प्रा के एल कातकडे, डॉ अनिल गोरे, डॉ पी आर झंवर, डॉ हरिश आवारी, डॉ के एस बेग, डॉ एस डि विखे आदी उपस्थित होते.

Wednesday, January 17, 2024

वनामकृविस सेरा सुविधेचा बेस्ट युसेज पुरस्कार

संशोधनास चालना देण्यासाठी नवी दिल्ली येथील भारतीय कृषि अनुसंधान परिषदे द्वारे कृषि क्षेत्रातील ई-रिसोर्सची ऑनलाईन यंत्रणा म्हणजेच सेरा प्रकल्प राबविण्यात येतो. यात उत्कृष्ट दर्जाची सहा हजारापेक्षा अधिक आंतरराष्ट्रीय व राष्ट्रीय ई-नियतकालिके कृषि संशोधकांसाठी उपलब्ध आहेत. या सुविधेचा योग्यरित्या उपयोग वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील शास्त्रज्ञ प्राध्यापक व विद्यार्थ्यांनी सन २०२२ मध्ये आपल्या संशोधनासाठी केला याबाबत पश्चिम विभागातुन विद्यापीठ ग्रंथालयास जे-गेट सीआरएच्या सर्वोत्कृष्ट पुरस्कार (J-Gate@CeRA  - बेस्ट युसेज पुरस्कार) प्राप्‍त केला. सदरील पुरस्कार दिनांक २१ डिसेंबर २०२३ रोजी आनंद (गुजरात) येथे आनंद कृषि विद्यापीठ आयोजीत कार्यशाळेत प्रदान करण्‍यात आला. विद्यापीठ ग्रंथपाल डॉ. संतोष कदम व श्री. मोहनकुमार झोरे यांनी स्वीकारला. पुरस्‍काराबाबत कुलगुरू मा डॉ इन्‍द्र मणि यांनी अभिनंदन करून म्‍हणाले की, सेरा पुरस्‍कारामुळे हे लक्षात येत आहे की, विद्यापीठातील संशोधक व विद्यार्थी राष्‍ट्रीय व आंतरराष्‍ट्रीय पातळीवरील कृषि क्षेत्रातील संशोधन लेखाचे सातत्‍याने वाचन करीत आहेत.  

कन्सोर्टियम फॉर ई-रिसोर्सेस इन अॅग्रीकल्चर (CeRA - सेआरए या नावाने प्रसिद्ध) हे भारतीय कृषी संशोधन परिषदेच्या अंतर्गत राष्ट्रीय कृषी संशोधन आणि शिक्षण प्रणाली लायब्ररींसाठी कृषी ग्रंथालयांचे एक ई-कन्सोर्टियम आहे. देशातील सर्व संशोधक, शिक्षक आणि विद्यार्थी, धोरणकर्ते, नियोजक, प्रशासक आणि विस्तार तज्ञांना कृषी आणि संबंधित विज्ञानातील निवडक जर्नल्ससाठी ऑनलाइन सुविधा यात आहे. हे व्यासपीठ ज्ञानाच्या प्रगतीत आणि भारतातील कृषी क्षेत्राच्या वाढीसाठी योगदान देते. संशोधन उपक्रमांना प्रोत्साहन देण्यासाठी आणि चा वापर करण्यासाठी, दरवर्षी प्रादेशिक प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित केले जातात ज्यामध्ये संस्थांना विविध श्रेणींमध्ये पुरस्कार दिले जातात.


Thursday, January 11, 2024

"माझा एक दिवस माझ्या बळीराजासाठी" या उपक्रमांतर्गत विद्यापीठातील शास्त्रज्ञांनी केले शेतकऱ्यांना मार्गदर्शन

मौजे सातेफळ व मौजे खंदारबन (ता.वसमत जि.हिंगोली) येथे राबविण्‍यात आला उपक्रम

संपुर्ण मराठवाडा विभागात वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाचे कुलगुरू मा डॉ इन्‍द्र मणि यांच्‍या संकल्‍पनेतुन विस्‍तार शिक्षण संचालनालयाच्‍या वतीने "माझा एक दिवस माझ्या बळीराजासाठी" उपक्रम दिनांक १ सप्‍टेंबर २०२२ पासुन राबविण्‍यात येत आहे, या उपक्रमात संपुर्ण मराठवाडयातील आठही जिल्‍हयात दर महिन्‍याच्‍या दुस-या बुधवारी शास्‍त्रज्ञ व प्राध्‍यापक प्रत्‍यक्ष शेतकरी बांधवाच्‍या शेतात जाऊन त्‍यांच्‍या समस्‍या जाणुन घेऊन मार्गदर्शन करतात. यात विद्यापीठातील सर्व कृषी विज्ञान केंद्रेे, महाविद्यालयेे, संशोधन केंद्रे, विभागीय विस्‍तार शिक्षण केंद्रे येथील संशोधक व प्राध्‍यापक सहभाग राहतो. याचा भाग म्‍हणुन दिनांक १० जानेवारी रोजी कृषी तंत्रज्ञान माहिती केंद्राच्‍या वतीने दिनांक १० जानेवारी रोजी "माझा एक दिवस माझ्या बळीराजासाठी" उपक्रम अंतर्गत विद्यापीठ शास्त्रज्ञांनी मौजे सातेफळ येथे श्री. रंगनाथ स्वामी व मौजे खंदारबन ता.वसमत जि.हिंगोली येथे श्री. सदाशिव पाटील यांच्या शेतावर भेटी देऊन उपस्थित शेतकरी बांवधाना विविध विषयावर मार्गदर्शन केले. यावेळी विस्‍तार शिक्षण संचालक डॉ.धर्मराज गोखले, उद्यानविद्या महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.व्ही.एस.खंदारे, विस्तार कृषी विद्यावेत्ता डॉ.जी.डी.गडदे, मुख्‍य विस्‍तार शिक्षण अधिकारी डॉ प्रशांत देशमुख, उद्यान तज्ञ डॉ.बी.एम.कलालबंडी, किटकशास्‍त्रज्ञ डॉ.डी.डी.पटाईत, तालुका कृषी अधिकारी श्री सुनील भिसे, श्री.मधुकर मांडगे आदींची उपस्थिती होती.

मार्गदर्शनात डॉ. धर्मराज गोखले म्‍हणाले की, पेरू व करवंद या पिकाची फक्त लागवड न करता योग्य भाव मिळण्यासाठी या फळपिकांची प्रक्रिया करून विक्री करावी. विद्यापीठामार्फत करवंदावरील प्रक्रियेविषयी शेतकऱ्यांना कुठलीही समस्या आल्यास अथवा प्रक्रियेविषयी प्रशिक्षण हवे असल्यास त्यांनी  विद्यापीठाशी संपर्क करण्‍याचे आवाहन केले.

 डॉ.जी.डी.गडदे यांनी माझा एक दिवस माझ्या बळीराजासाठी या उपक्रमाची माहिती देतांना म्‍हणाले की, सदरील कार्यक्रम महाराष्ट्र शासनातर्फे मागील वर्षी राबविण्यात आला होता, विद्यापीठाचे माननीय कुलगुरू डॉ. इन्‍द्र मणि यांच्या सूचनेनुसार व संचालक विस्तार शिक्षण डॉ.डी.एन.गोखले यांच्या मार्गदर्शनाखाली सदरील कार्यक्रम प्रत्येक महिन्याच्या दुसऱ्या बुधवारी विद्यापीठाच्या सर्व महाविद्यालय, संशोधन केंद्र व प्रत्येक कार्यालयामार्फत शेतकऱ्यांच्या शेतावर जाऊन राबविण्यात येतो.

डॉ. व्ही. एस. खंदारे यांनी करवंदावर तसेच इतर फळांवर करावयाच्या प्रक्रियेविषयी आणि डॉ. बी. एम. कलालबंडी यांनी करवंद लागवड याविषयी उपस्थित शेतकऱ्यांना सखोल असे मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ.डी.डी.पटाईत यांनी केले. यावेळी विद्यापीठ शास्‍त्रज्ञांनी तूर, हळद, कांदा, केळी, करवंद व पेरू अशा विविध पिकांची पाहणी केली तसेच शेतकऱ्यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांना योग्य उपाययोजना सुचविल्या. या उपक्रमांतर्गत ज्ञानदिप हायटेक नर्सरी, वसमत यांच्यामार्फत शेतकऱ्यांसाठी करवंद लागवड या चर्चासत्राचे आयोजन करण्यात आलेले होते. कार्यक्रमास परिसरातील साधारणत:  ५० शेतकरी उपस्थिती लाभली.


Thursday, January 4, 2024

सक्रिय जनगणित कार्यशाळा संपन्न

परभणी ऍस्ट्रॉनिकल सोसायटी व वनामकृविचा अभिनव उपक्रम

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ आणि परभणी एस्ट्रॉनिकल सोसायटी यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक ४ जानेवारी रोजी एक दिवसीय सक्रिय जनगणित कार्यशाळेचे आयोजन आले होते. कार्यशाळेचे उदघाटन कुलगुरू मा डॉ इन्‍द्र मणि यांच्‍या हस्‍ते झाले. कार्यशाळेत गणित तज्ञ डॉ. विवेक माँटेरिओ आणि गीता महाशब्दे यांनी मार्गदर्शन केले. व्‍यासपीठातवर शिक्षणाधिकारी योजना संजय ससाणे, डॉ.योगेंद्र रॉय, विद्यापीठ अभियंता श्री.दीपक काशाळकर, संप्रियाताई राहुल पाटील, डॉ.रामेश्वर नाईक, डॉ.पी आर पाटील आदींची प्रमुख उपस्थिती होती.

अध्‍यक्षीय भाषणात कुलगुरू मा डॉ इन्‍द्र मणि म्‍हणाले की, गणित हा सर्व शास्त्रांचा पाया असुन गणितात पांरागत असणे आवश्‍यक आहे.

परभणी ऍस्ट्रॉनॉमिकल सोसायटी गत अनेक वर्षांपासून विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेच्या आणि वैज्ञानिक संशोधनाच्या अनेक उपक्रमांचे आयोजन करत असते, त्याचाच एक भाग म्हणून परभणी जिल्ह्यातील सर्व तालुक्यातील ९३ उपक्रमशील गणित शिक्षकांनी कार्यशाळेत सहभाग नोंदविला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक आणि पाहुण्यांचा परिचय उपक्रमशील शिक्षक नागेश वाईकर यांनी करून दिला. सूत्रसंचालन कैलास सुरवसे यांनी तर आभार सुधीर सोनुनकर यांनी मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी परभणी एस्ट्रॉनॉमिकल सोसायटीचे अध्यक्ष डॉ. रामेश्वर नाईक, सचिव सुधीर सोनुनकर, डॉ. रणजीत लाड, श्रीमती कमल चव्हाण, प्रसाद वाघमारे, श्री.दत्ता बनसोडे, आकाश नरवाडे, श्री.आनंद बडगुजर, डॉ.बाहुबली निंबाळकर, अशोक लाड, दीपक शिंदे, प्रसन्न भावसार, ज्ञानराज खटिंग आदींनी परिश्रम घेतले.

महिला निरोगी तर देश निरोगी ..... कुलगुरू मा डॉ इन्‍द्र मणि

तुळजापुर येथील कृषि विज्ञान केंद्रात महिला शेतकरी मेळावा संपन्‍न

शेती कामात महिलांचा मोठा वाटा आहे, परंतु महिला आपल्‍या आरोग्‍याकडे दुर्लक्ष करतात. ग्रामीण भागातील प्रत्येक महिलांनी कुटुंबासोबत स्वतःच्या स्वास्थ्याकडे लक्ष देणे अत्‍यंत गरजेचे आहे. जर महिला निरोगी झाली तर संपूर्ण घर राहील, घर निरोगी राहिले तर समाज निरोगी होईल आणि समाज निरोगी झाला तर संपूर्ण देश निरोगी होईल, असे प्रतिपादन कुलगुरू मा डॉ इन्‍द्र मणि यांनी केले.

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाच्‍या विस्‍तार शिक्षण संचालनालयांतर्गत असलेले तुळजापुर येथील कृषि विज्ञान केंद्र, महिला आर्थिक विकास महामंडळ, वॉटर ऑरगनाझेशन ट्रस्‍ट आणि स्‍वयंम शिक्षण प्रयोग, धाराशिव यांच्‍या संयुक्‍त विद्यमाने क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंती निमित्त दिनांक ३ जानेवारी महिला शेतकरी मेळाव्‍याचे आयोजन करण्‍यात आले होते, मेळाव्‍याच्‍या अध्‍यक्षस्‍थानावरून कुलगुरू मा डॉ इन्द्र मणि बोलत होते. व्‍यासपीठावर अटारी पुणेचे संचालक डॉ. सुब्रतो रॉय, विभागीय सहसंचालक श्री साहेबराव दिवेकर, विस्तार शिक्षण संचालक डॉ धर्मराज गोखले, कृषी विभागाचे श्री अभिमन्यू काशीद, उस्मानाबाद कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ एम बी पाटील, कृषी विज्ञान केंद्राच्या कार्यक्रम समन्वयक श्रीमती वर्षा मरवाळीकर आदींची प्रमुख उपस्थिती होती. 

डॉ इन्‍द्र मणि म्हणाले की, कृषि शिक्षणात मुलींच्या संख्येमध्ये मोठी वाढ झाली असुन त्‍यांच्‍या शारिरीक स्‍वास्‍थ्य चांगले राहण्‍याकरिता विद्यापीठात विशेष लक्ष दिले जात आहे. त्‍यांच्‍या करिता स्‍वंतत्र व्यायाम शाळा करण्‍यात येत आहेत. विविध खेळा व क्रीडा प्रकारात निरनिराळ्या स्तरावर दैदीप्यमान यश मिळवत आहेत. महिलाही समाजाची सर्जक आहे, संपूर्ण जगाची निर्मिती ही स्‍त्रीपासुनच झालेली आहे. आज महिला नोकरी व्यापार आदि क्षेत्रातही महिला देश विदेशात आघाडीवर आहेत. तुळजापूर कृषी विज्ञान केंद्र हे या भागातील महिलांच्या विकासाकरिता कटिबद्ध असून केंद्राच्या पुननिर्माणाचे कार्य विद्यापीठाने हाती घेतले आहे. महिलांचा सक्षमीकरणाकरिता तुळजापुर कृषी विज्ञान केंद्र चांगले कार्य करित आहे. मेळाव्यातील निरनिराळ्या व्याख्यात्यांना महिलांनी ऐकावे त्यातून मिळणारे ज्ञान आत्मसात करावे असे ते म्हणाले. 

विस्तार शिक्षण संचालक डॉ. धर्मराज गोखले मार्गदर्शनात म्हणाले की, परभणी कृषि विद्यापीठाने विविध विषयांवर संशोधन करून शिफारशी दिल्या आहेत. शेतीत काबाड कष्ट करणाऱ्या महिलांचे श्रम कमी करून त्यांचे आरोग्य म्हणून उंचावण्यासाठी शिफारशी करण्यात आलेले आहेत. यात मका सोलनी यंत्र ज्यामुळे एक महिला एका तासात २० किलोग्रॅम मका सहज सोलू शकते. भेंडी तोडणी यंत्र आणि कापूस वेचणी करताना महिलांना होणाऱ्या त्रासापासून वाचवण्यासाठी ‘कापूस वेचणी कोट’ ची  निर्मिती करण्यात आलेली आहे. विद्यापीठ विकसित ज्वारी, बाजरीच्या जाती यात भरपूर जास्त लोहयुक्त असून त्यामुळे महिलांचे रक्तातील लोहचे प्रमाण वाढण्यास मदत होते. तुळजापूर कृषी विज्ञान केंद्र चांगले काम करत, विद्यापीठ प्रकाशित मासिक शेतीभातीचे वर्गणीदार होण्‍याचे आवाहन त्‍यांनी केले.

आटारी पुणेचे संचालक डॉ. सुब्रोतो राय म्हणाले की, भारत सरकारचे कृषी मंत्रालय महाराष्ट्र सोबत भारतातील महिलाकरिता भरीव योगदान देत असून लवकरच १२० नवीन कृषी विज्ञान केंद्राची देशात सुरुवात करण्यात येणार आहे. भारतीय कृषी अनुसंधान परिषद नवी दिल्ली यांच्याकडून महिलांकरिता कृषी विज्ञान केंद्राच्‍या माध्यमातून शेती व शेती आधारित उद्योगधंद्यांवर प्रशिक्षण आयोजित करण्यात येत असून त्याचा महिलांनी लाभ घ्यावा. तर श्री साहेबराव दिवेकर म्हणाले, की शासन शेतकरी महिलांकरीता विविध योजनांची अंमलबजावणी करत असून त्यामधून महिलांनी व महिलांच्या गटांनी कृषी विज्ञान केंद्राकडून तांत्रिक ज्ञान मिळवून सदरील योजनांच्या माध्यमातून प्रगती साधावी.

सदरील महिला मेळाव्या दरम्यान जिल्ह्यातील यशस्वी शेतकरी महिलांचा कृषी विज्ञान केंद्राकडून सन्मानचिन्ह, प्रशस्तीपत्र देऊन सन्मान करण्यात आला. सदरील सत्काराला उद्देशून श्रीमती मनीषा गायकवाड, उमा कराड, सारिका बोरगाव यांनी आपले मनोगत व यशोगाथा महिलांसमोर मांडली. मेळाव्याचे सूत्रसंचालन श्रीमती स्वप्नाली झाडे आभार प्रदर्शन डॉ विजयकुमार जाधव तर यशस्वीतेसाठी डॉ भगवान आबाड, डॉ. भैयासाहेब गायकवाड, श्री. जगदेव हिवराळे डॉ नकुलरवाडीकर, श्री. शिवराज रुपनर, श्री. बालाजी कदम, डॉ दर्शना भुजबळ, श्रीमती अपेक्षा कसबे, श्री. रणेर राठोड आदींनी प्रयत्न केलेमेळाव्‍यात तांत्रिक सत्रात विविध विषयावर शास्‍त्रज्ञ व तज्ञांना मार्गदर्शन केले. मेळाव्‍यात मोठया प्रमाणात महिलांचा सहभाग होता.