Saturday, October 31, 2015

वनामकृविच्‍या राष्‍ट्रीय सेवा योजनेच्‍या वतीने राष्‍ट्रीय एकता दिन साजरा


वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाच्‍या राष्‍ट्रीय सेवा योजनेच्‍या वतीने सरदार वल्‍लभभाई पटेल यांच्‍या 139 व्‍या जयंती निमित्‍त राष्‍ट्रीय एकता दिन साजरा करण्‍यात आला तसेच माजी पंतप्रधान स्‍व इंदिरा गांधी यांची पुण्‍यतिथी साजरी करण्‍यात आली. कार्यक्रमाच्‍या अध्‍यक्षस्‍थानी शिक्षण संचालक डॉ अशोक ढवण हे होते तर व्‍यासपीठावर प्राचार्य डॉ धर्मराज गोखले, प्राचार्य डॉ विलास पाटील, प्राचार्य डॉ उद्य खोडके, प्राचार्य प्रा विशाला पटणम, प्राचार्य डॉ पी एन सत्‍वधर व विद्यार्थी कल्‍याण अधिकारी डॉ महेश देशमुख उपस्थित होते. याप्रसंगी सरदार वल्‍लभभाई पटेल व माजी पंतप्रधान स्‍व इंदिरा गांधी यांच्‍या प्रतिमेचे पुजन मान्‍यवरांच्‍या हस्‍ते करण्‍यात येऊन अभिवादन करण्‍यात आले. शिक्षण संचालक डॉ अशोक ढवण यांनी उपस्थितांना देशाच्‍या अखंडतेसाठी एकात्मतेची शपथ दिली. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन रासेयोचे कार्यक्रमाधिकारी प्रा ए एस कांबळे यांनी केले. कार्यक्रमास विद्यापीठातील अधिकारी, कर्मचारी व विद्यार्थी मोठया संख्‍येने उपस्थित होते. 

Friday, October 30, 2015

कृषि तंत्रज्ञान विस्‍तार क्षेत्रात वनामकृवि व रिलायंस फाउंडेशन यांच्‍या सामंजस्‍य करार

सार्वजनिक - खाजगी भागीदारी तत्‍वावर रिलायंस फाउंडेशनशी सामंजस्‍य कराराने आधुनिक माहिती तंत्रज्ञानाने विद्यापीठ कृषि तंत्रज्ञान प्रसारास लागणार हातभार 


वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ व रिलायंस फाउंडेशन यांचे दरम्‍यान कृषि तंत्रज्ञान माहिती प्रसाराकरीता सामंजस्‍य करार दि ३० ऑक्‍टोबर रोजी करण्‍यात आला. कार्यक्रमाच्‍या अध्‍यक्षस्‍थानी कुलगुरू मा डॉ बी व्‍यंकटेश्‍वरलु हे होते तर शिक्षण संचालक डॉ अशोक ढवण, विस्‍तार शिक्षण संचालक डॉ बी बी भोसले, कुलसचिव डॉ डी एल जाधव, मुंबर्इ येथील रिलायंस फाउंडेशनच्‍या मुख्‍य वित्‍ताधिकारी श्रीमती नेहा हुद्दार, रिलायंस फाउंडेशनचे प्रकल्‍प प्रमुख श्री सेंथीलकुमारन कृष्‍णन यांची प्रमुख उपस्थिती होती. याप्रसंगी कृषि विद्यापीठाच्‍या वतीने विस्‍तार शिक्षण संचालक डॉ बी बी भोसले व रिलायंस फाउंडेशनच्‍या वतीने मुख्‍य वित्‍ताधिकारी श्रीमती नेहा हुद्दार यांनी सामंजस्‍य करारावर स्‍वाक्ष-या केल्‍या. या सामंजस्‍य करारानुसार ऑडिओ कॉन्‍फरन्‍स, व्हि‍डिओ क्लिप्‍स, मोबाईल संदेश, सामाजिक माध्‍यमे, चर्चासत्रे आदिंच्‍या माध्‍यमातुन कृषि तंत्रज्ञान माहिती प्रसार करण्‍यात येणार आहे.
अध्‍यक्षीय भाषणात कुलगुरू मा डॉ बी व्‍यंकटेश्‍वरलु म्‍हणाले की, गेल्‍या तीन वर्षात मराठवाडयातील शेतकरी विविध समस्‍यांना तोंड देत असुन शेतीतील उत्‍पादन खर्च वाढत आहे. विद्यापीठाचे कमी खर्चाचे तंत्रज्ञान शेतक-यांपर्यंत पोहचणे आवश्‍यक असुन मर्यादित मनुष्‍यबळाच्‍या सहाय्याने विद्यापीठ कृषि विस्‍तार कार्य करीत आहे. अनेक वेळेस शेतीत तातडीने उपाय योजनेसाठी विद्यापीठाचे तंत्रज्ञानाची गरज असते. योग्‍य तंत्रज्ञान, योग्‍य वेळेत, योग्‍य व्‍यक्‍तीपर्यंत पोहचविण्‍यासाठी सार्वजनिक - खाजगी भागीदारी तत्‍वावर रिलायंस फाउंडेशनशी सामंजस्‍य करार करून आधुनिक माहिती तंत्रज्ञानाच्‍या माध्‍यमातुन विद्यापीठ कृषि विस्‍तार कार्यास गती प्राप्‍त होईल. मराठवाड्यातील संकटग्रस्‍त शेतक-यांत उमेद जागृतीसाठीही याचा फायदा होईल, असे प्रतिपादन त्‍यांनी केले.
विस्‍तार शिक्षण संचालक डॉ बी बी भोसले यांनी आपल्‍या भाषणात सांगितले की, गेल्‍या तीन वर्षात विद्यापीठ व रिलायंस फाउंडेशन प्रायोगिक तत्‍वावर ऑडिओ कॉन्‍फरन्‍सच्‍या माध्‍यमातुन कृषि विस्‍तार कार्य करित असुन त्‍यास सामंजस्‍य करारामुळे अधिक व्‍याप्‍त स्‍वरूप प्राप्‍त होईल. रिलायंस फाउंडेशनच्‍या मुख्‍य वित्‍ताधिकारी श्रीमती नेहा हुद्दार यांनी आपल्‍या भाषणात रिलायंस फाउंडेशन विविध सामाजिक कार्य करित असुन सामंजस्‍य करारामुळे मराठवाडयात विद्यापीठ तंत्रज्ञान प्रसारास गती प्राप्‍त होऊन शेतक-यांना लाभ होऊल, असे सांगितले.  
कार्यक्रमात प्रगतशील शेतकरी विठ्ठल गलबे, महिला शेतकरी करूणा खांदेलोटे व श्री पोले यांनीही मनोगत व्‍यक्‍त केले. प्रास्‍ताविकात रिलायंस फाउंडेशनचे विभागीय समन्‍वयक श्री दिपक केकान गेल्‍यापासुन तीन वर्षात विद्यापीठ व रिलायंस फाउंडेशन प्रायोगिक तत्‍वावर राबवित असलेल्‍या कृषि विस्‍तार कार्याबाबत माहिती दिली. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन मुख्‍य विस्‍तार शिक्षण अधिकारी डॉ प्रशांत देशमुख यांनी केले. कार्यक्रमाच्‍या तांत्रिक सत्रात हुमणी किडीच्‍या व्‍यवस्‍थापन व विविध पिक लागवडीबाबत विस्‍तार शिक्षण संचालक डॉ बी बी भोसले, किडकशास्‍त्रज्ञ डॉ पी आर झंवर, डॉ यु एन आळसे यांनी मार्गदर्शन केले. कार्यक्रमास शेतकरी, विद्यापीठाचे अधिकारी व कर्मचारी मोठया संख्‍येने उपस्थित होते. 


Tuesday, October 27, 2015

मराठवाडयातील दुर्गम अश्‍या आदिवासीबहुल भागातही विद्यापीठ तंत्रज्ञान प्रभावीपणे पोहचत आहे......कुलगुरू मा. डॉ. बी. व्‍यंकटेश्‍वरलु

ज्‍वार संशोधन केंद्रातर्फे आदिवासी उपयोजनेंतर्गत आदिवासी शेतकरी मेळावा संपन्‍न 


विद्यापीठाचे तंत्रज्ञानाचा लाभ मराठवाड्याच्‍या दुर्गम भागातील शेतक-यांना व्‍हावा हे उद्दीष्‍ट ठेऊन नांदेड व हिंगोली जिल्‍हयातील आदीवासीबहुल गावात आदिवासी उपयोजनेंतर्गत विद्यापीठ विविध संशोधन केंद्राच्‍या माध्‍यमातुन पोहचत आहे. त्‍यात प्रमुख्‍याने जल व्‍यवस्‍थापनासह विविध विद्यापीठ विकसित तंत्रज्ञानाच्‍या प्रसारावर भर देण्‍यात येत आहे. आदीवासी शेतक-यांनी बीजोत्‍पादनाचा कार्यक्रम हाती घेऊन एक बीजोत्‍पादन ग्राम तयार करावे, असे प्रतिपादन वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाचे कुलगुरू मा. डॉ. बी. व्‍यंकटेश्‍वरलु यांनी व्‍यक्‍त केले. वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील ज्‍वार संशोधन केंद्र व हैद्राबाद येथील भारतीय कदन्‍न अनुसंधान संस्‍था यांच्‍या वतीने आदिवासी उपयोजनेंतर्गत दि २७ ऑक्‍टोबर रोजी आयोजीत आदिवासी शेतकरी मेळाव्‍याच्‍या उद्घाटनाप्रसंगी ते बोलत होते. व्‍यासपीठावर विद्यापीठ कार्यकारी परिषदेचे सदस्‍य व माजी शिक्षण संचालक मा. डॉ. पी. आर. शिवपुजे, विद्यापीठ कार्यकारी परिषदेचे सदस्‍य मा. श्री. रविंद्र पतंगे, संशोधन संचालक डॉ. दत्‍तप्रसाद वासकर, माजी संशोधन संचालक डॉ. एस. टी. बोरीकर, हैद्राबाद येथील वरिष्‍ठ शास्‍त्रज्ञ डॉ. आर. आर. चापके, मौजे रामवाडीचे सरपंचा सरस्‍वतीताई डाखोरे, उपसरपंच श्री. व्‍यंकोजी ठोंबरे, यशोदाताई टाले आदींची प्रमुख उपस्थिती होती.
कुलगुरू मा. डॉ. बी व्‍यंकटेश्‍वरूलु पुढे म्‍हणाले की, ज्‍वारी हे पिक बदलत्‍या हवामानाला प्रतिकारक पीक असल्‍याने शेतकरी बंधुनी आपल्‍या पिक पध्‍दतीत ज्‍वारीचा समावेश करावा, जेणे करून जनावरांसाठी वैरण व खाण्‍यासाठी धान्‍य उत्‍पादन घेता येईल. अनेक शेतक-यांनी ठिबंक सिंचनाच्‍या सहाय्याने ज्‍वारीचे विक्रमी उत्‍पादन घेतले आहे. ज्‍वारीचे पीक शेतक-यांना फायदेशीर ठरण्‍यासाठी ज्‍वारी काढणी यंत्र विकसीत करण्‍याचे प्रयत्‍न विद्यापीठाचे चालु आहेत.
संशोधन संचालक डॉ दत्‍तप्रसाद वासकर आपल्‍या भाषणात म्‍हणाले की, परभणी येथील ज्‍वार संशोधन केंद्रास ८७ वर्षाचा इतिहास असुन ज्‍वारीच्‍या विविध सुधारित जाती राज्‍याला दिल्‍या आहेत. लवकरच विद्यापीठाच्‍या वतीने ज्‍वार लागवड तंत्रज्ञानावर आधारीत मोबाईल अॅप्‍सची निर्मिती करण्‍यात येणार असुन कापुस व ज्‍वार या पिकाचे स्‍वतंत्र संकेतस्‍थळ ही मराठीत शेतक-यांसाठी उपलब्ध करण्‍यात येईल. हैद्राबाद येथील वरिष्‍ठ शास्‍त्रज्ञ डॉ. आर. आर. चापके यांनी आपल्‍या भाषणात ज्‍वारीवर आधारीत प्रक्रिया उद्योगाच्‍या विकासाची गरज असल्‍याचे प्रतिपादित केले तर विद्यापीठ कार्यकारी परिषदेचे सदस्‍य मा. डॉ. पी. आर. शिवपुजे यांनी ज्‍वार संशोधन केंद्राने राबविलेले ज्‍वार तंत्रज्ञानाचे विविध प्रात्‍यक्षिके शेतक-यांना मार्गदर्शक ठरतील अशी आशा व्‍यक्‍त केले.
मानवाच्‍या अन्‍न पोषणात ज्‍वारीचे महत्‍व वाढत असल्‍याचे मत विद्यापीठ कार्यकारी परिषदेचे सदस्‍य मा. श्री. रविंद्र पतंगे यांनी व्‍यक्‍त केले तर माजी संशोधन संचालक डॉ एस टि बोरीकर यांनी विद्यापीठातील ज्‍वार संशोधन केंद्र हे निजाम काळातील संशोधन केंद्र असुन आदिवासी शेतक-यांनी विद्यापीठाच्‍या विविध तंत्रज्ञानाचा लाभ घ्‍यावा असे आवाहन केले. मौजे रामवाडी येथील प्रगतशील शेतकरी भारत बोडखे, संतोषीमाता बचतगटाच्‍या अध्‍यक्षा श्रीमती पुण्‍यरत्‍नाताई मोरे यांनीही आपले मनोगत व्‍यक्‍त केले.

मेळाव्‍यात आदिवासी उपयोजनेतंर्गत निवडक ७० आदिवासी शेतक-यांना व सहा आदिवासी महिला बचत गटांना कोळपे, बियाणे, बीजप्रक्रिया औषधे, विद्यपीठ कृषि दैनंदिनी व पेरणी यंत्र आदींचे वाटप मान्‍यवरांच्‍या हस्‍ते करण्‍यात आले. मान्‍यवरांच्‍या हस्‍ते ज्‍वार संशोधन केंद्राच्‍या प्रक्षेत्रावर नियोजीत ३० मी x ३० मी आकाराच्‍या शेततळयाचे उद्घाटन करण्‍यात आले तसेच ग्रामीण कृषि कार्यानुभव कार्यक्रमाच्‍या कृषिदुतांच्‍या मदतीने मान्‍यवरांच्‍या हस्‍ते वृक्षारोपण करण्‍यात आले. विद्यापीठ शास्‍त्रज्ञ लिखित ज्‍वारी पिकावर आधारित विविध घडीपत्रिकेचे विमोजन मान्‍यवरांच्‍या हस्‍ते करण्‍यात आले. कार्यक्रमाचे प्रास्‍ताविक ज्‍वार संशोधन केंद्राचे प्रभारी अधिकारी डॉ हिराकांत काळपांडे यांनी केले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन श्री ऋषिकेश औढेंकर यांनी तर आभार प्रदर्शन डॉ विक्रम घोळवे यांनी केले. मेळाव्‍यास हिगोंली जिल्‍ह्यातील कळमनुरी तालुक्‍यातील मौजे रामवाडी येथील आदिवासी शेतकरी, विद्यापीठ शास्‍त्रज्ञ, अधिकारी व कर्मचारी मोठया संख्‍येने उपस्थित होते. कार्यक्रम यशस्‍वीतेसाठी ज्‍वार संशोधन केंद्रातील अधिकारी, कर्मचारी व रावेच्‍या कृषिदुतांनी परिश्रम घेतले.

Friday, October 23, 2015

नविन तंत्रज्ञान शेतकऱ्यांनी आत्मसात करावे..........शिक्षण संचालक डॉ. अशोक ढवण

वसमत तालुक्‍यातील मौजे बाभुळगांव येथे ग्रामीण कृषि कार्यानुभव कार्यक्रमातंर्गत शेतकरी मेळावा संपन्‍न
प्रत्येक गावामध्ये कृषि ट्टा स्थापन करुन शेतक-यांनी नविन तंत्रज्ञान आत्मसात करावे व आपल्‍या शेतीत नवनविन प्रयोग करुन उत्पादन वाढवावे, असे प्रतिपादन शिक्षण संचालक डॉ अशोक ढवण यांनी केले. वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ अंतर्गत असलेल्‍या औंढा नागनाथ तालुक्‍यातील गोळेगांव येथील कृषि महाविद्यालय आणि वसमत येथील प्रादेशिक ऊस संशोधन केंद्र यांच्या संयुक्त विद्यामाने ग्रामीण कृषि कार्यानुभव कार्यक्रमातर्गत मौजे बाभुळगाव येथे दि. २० ऑक्‍टोबर रोजी शेतकरी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते, मेळाव्‍याच्‍या अध्‍यक्षस्‍थानावरून ते बोलत होते. याप्रसंगी व्‍यासपीठावर प्रमुख पाहुणे कुलसचिव डॉ. दिनकर जाधव, सरपंच श्री. बाबाराव नवघरे, वसमत कृषि उत्पन्न बाजार समितीचे सभापती श्री. चंद्रकांत नवघरे, प्राचार्य डॉ विलास पाटील, डॉ. उध्दव आळसे, डॉ. एस. डी. जेठुरे यांची प्रमुख उपस्थिती होती.  
  कुलसचिव डॉ दिनकर जाधव आपल्‍या मार्गदर्शनात म्‍हणाले की, नवीन तंत्रज्ञान अवलंब करुन शेतक-यांनी आपल्‍या शेतीचे उत्पन्न वाढवावे, जे विकणार आहे तेच शेतकऱ्यांनी पिकवावे, दर्जेदार मालाचे उत्पन्न घेऊन शेतीच्या स्पर्धेत शेतकऱ्यांनी सहभागी व्हावे. मेळाव्‍याच्‍या तांत्रिक सत्रात कृषि विद्यावेत्‍ता डॉ. उध्दव आळसे यांनी रब्बी पिकाबददल मार्गदर्शन केले तर डॉ. एस. डी. जेठुरे यांनी फुलशेतीबद्दल माहिती देऊन शेतकऱ्यांच्या प्रश्नांना उत्तरे दिली
   मौजे बाभुळगांव व पिपळा (चौरे) येथे ग्रामीण कृषि कार्यक्रमाअंतर्गत गोळेगांव येथील कृषि हाविद्यालय विद्यार्थी गेल्या सहा महिण्यापासुन विविध शेती विषयक कार्यक्रम राबवित असुन प्रामुख्याने विवि पिकांची लागवड पध्दतीची तांत्रीक माहिती, वृक्षलागवड, किड व रोग व्यवस्थापन, लसीकरण, फळ प्रकीया या गोष्टी विशेष भर देण्‍यात आला. यावर आधारित चलचित्राचे सादरीकरण कार्यक्रम अधिकारी डॉ. सुनिल उमाटे यांनी केले. मेळाव्याकृषिदुत अजिंक्य भालेराव व सांळुखे हयांनी त्याचे मनोगत व्यक्त केले. मेळाव्‍याचे प्रास्‍ताविकात प्राचार्य डॉ विलास पाटील यांनी केले तर  सुत्रसंचालन कृषिदुत प्रदिप घोंगडे यांनी केले. शेतकरी मेळाव्यास मौजे बाभुळगाव, चौरे पिपळा व परिसरातील शेतकरी मोठया संख्‍येने उपस्थित होते. मेळाव्‍याचे आयोजन प्राचार्य डॉ विलास पाटील व कार्यक्रम समन्वयक डॉ. राजेश कदम यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आल. कार्यक्रम यशस्‍वीतेसाठी प्रादेशिक ऊस संशेधन केंद्राचे प्रभारी अधिकारी डॉ. दिपक लोखंडे, महाविद्यालयाचे प्राध्‍यापक डॉ. आर डी चांगुले, प्रा. जी ए भालेराव, प्रा. व्‍ही एन शिंदे, प्रा. डि के झटे यांच्‍यासह कृषिदुत व कृषिकन्या यांनी परिश्रम घेतले.

Sunday, October 18, 2015

कोरडवाहु शेतीत शाश्‍वततेसाठी शेती पुरक जोडधंद्याची साथ हावीच....... कुलगुरू मा डॉ बी व्‍यंकटेश्‍वरलु

ग्रामीण कृषि कार्यानुभव कार्यक्रमांतर्गत परभणी तालुक्‍यातील मौजे रायपुर येथे रबी शेतकरी मेळावा संपन्‍न
कोरडवाहु शेती समोर अनेक समस्‍या असुन कोरडवाहु शेतीत शाश्‍वतता आणण्‍यासाठी शेती पुरक जोडधंद्याची साथ हावीच. दुग्‍ध व्‍यवसाय, शेळी पालन, कुक्कूट पालन, रेशीम उद्योग आदी अनेक शेती पुरक जोडधंद्यास मराठवाड्यात वाव आहे, असे प्रतिपादन वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाचे कुलगुरू मा डॉ बी व्‍यंकटेश्‍वरलु यांनी केले. परभणी येथील कृषि महाविद्यालय व अखिल भारतीय समन्‍वयीत सिंचन पाणी व्‍यवस्‍थापन योजना यांच्‍या संयुक्‍त विद्यमाने ग्रामीण कृषि कृषि कार्यानुभव कार्यक्रमांतर्गत मौजे रायपुर येथे रब्‍बी पिक शेतकरी मेळाव्‍याचे आयोजन दिनांक 14 ऑक्‍टोबर रोजी करण्‍यात आले होते, मेळाव्‍याच्‍या अध्‍यक्षस्‍थानावरून ते बोलत होते. व्‍यासपीठावर प्राचार्य डॉ डि एन गोखले, रायपुरचे सरपंच दत्‍तराव मस्‍के, पोलिस पाटील बाबाराव मस्‍के, इटलापुरचे सरपंच ज्ञानोबा खटिंग, उपसरपंच संजय रेंगे, विभाग प्रमुख डॉ जी एम वाघमारे, डॉ आर डी आहिरे आदींची प्रमुख उपस्थिती होती.

  कुलगुरू मा डॉ बी व्‍यंकटेश्‍वरलु पुढे म्‍हणाले की, मराठवाड्यातील शेतीपुढे मजुरांचा प्रश्‍नही मोठा असुन शेतीचे यांत्रिकीकरण करावे लागेल. विशेषत: सोयाबीन व ज्‍वारी काढणी, कापुस वेचणी आदी कामे यंत्राव्‍दारे करू शकतो. विद्यापीठात ज्‍वारी काढणी व कापुस वेचणीच्‍या यांत्रिकीकरणावर संशोधन चालु आहे. प्राचार्य डॉ डि एन गोखले यांनी आपल्‍या भाषणात विद्यापीठाच्‍या संशोधन शिफारशींचा शेतक-यांनी अवलंब करण्‍याचा सल्‍ला दिला. 
  तांत्रिक सत्रात लिंबुवर्गीय फळ लागवडीवर डॉ जी एम वाघमारे यांनी मार्गदर्शन केले तर कीड व्‍यवस्‍थापनावर डॉ डि जी मोरे, रब्‍बी पिकांवरील रोग व्‍यवस्‍थापनावर डॉ एस एल बडगुजर, हरभरा लागवडीवर डॉ जी डी गडदे, शाश्‍वत शेतीसाठी पशुधन व्‍यवस्‍थापनावर डॉ ए टी शिंदे यांनी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे प्रास्‍ताविक विभाग प्रमुख डॉ. आर. डी. आहिेरे यांनी केले तर सुत्रसंचालन कृषिदुत विशाल राठोड व आभार प्रदर्शन कार्यक्रमाधिकारी प्रा पी के वाघमारे यांनी केले. 
  मेळाव्‍यास परिसरातील शेतकरी मोठया संख्‍येने उपस्थित होते. कार्यक्रम यशस्‍वीतेसाठी प्रभारी अधिकारी डॉ. ए. एस. कडाळे आणि डॉ. पि. के. वाघमारे यांच्या मार्गदर्शनाखाली कृषिदुत नागेश लिंगायत, अभिनय काटे, संतोष किरवले, कुमार पानझडे, प्रतीक पठाडे, लक्ष्‍मण शेरे, रेंगे, आनंद शेटे, सारंग काळे, सतीश खेडेकर, मुदिराज चंद्रकांत, गजानन लोहाटे, भारत खेलबाडे, दत्‍ता पांचाळ, अनिकेत लबडे, आकाश खिस्‍ते, सचिन फड, वाघमारे, गायकवाड, पिलमवाड, पंडीत, काळदाते, नेमाजी राऊत आदींनी परिश्रम घेतले.

Saturday, October 17, 2015

जीवनात यशस्‍वी होण्‍यासाठी कठोर परिश्रमाला पर्याय नाही .......कुलगुरू मा डॉ बी व्‍यंकटेश्‍वरलु

कृषि महाविद्यालयातील नुतन प्र‍वेशित पद्व्‍युत्‍तर विद्यार्थ्‍यांचा उद्बोधन कार्यक्रम संपन्‍न


महाविद्यालयीन जीवनातच व्‍यक्‍तीमत्‍व विकास होत असतो, याच काळात विद्यार्थ्‍यांनी संवाद कौशल्‍य विकसित केले पाहिजे. जीवनात यशस्‍वी होण्‍यासाठी कठोर परिश्रमाशिवाय पर्याय नाही, असे प्रतिपादन वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाचे कुलगुरू मा डॉ बी व्‍यंकटेश्‍वरलु यांनी केले. परभणी कृषि महाविद्यालयाच्‍या वतीने पद्व्‍युत्‍तर पदवी अभ्‍यासक्रमास नुतन प्रवेशित विद्यार्थ्‍यांचा स्‍वागत समारंभ व उद्बोधन कार्यक्रमाचे आयोजन दि १७ ऑक्‍टोबर रोजी करण्‍यात आले होते, कार्यक्रमाच्‍या अध्‍यक्षस्‍थानावरून ते बोलत होते. यावेळी प्रमुख अतिथी म्‍हणुन विद्यापीठ कार्यकारी परिषदेचे सदस्‍य मा डॉ पी आर शिवपुजे, मा श्री रविंद्र देशमुख व मा श्री अनंतराव चोंडे हे उपस्थित होते तर प्राचार्य डॉ डि एन गोखले, जिमखाना उपाध्‍यक्ष डॉ विलास पाटील, डॉ डि बी देवसरकर, प्रा एन जी लाड आदींची व्‍यासपीठावर प्रमुख उपस्थिती होती.
कुलगुरू मा डॉ बी व्‍यंकटेश्‍वरलु पुढे म्‍हणाले की, कृषि क्षेत्रापुढे विशेषत: मराठवाडयातील कोरडवाहु शेतीपुढे अनेक आव्‍हाने असुन यावर आधारित संशोधनावर कृषि पद्व्‍युत्‍तर विद्यार्थ्‍यांनी भर दयावा. विद्यापीठ कार्यकारी परिषदेचे सदस्‍य मा डॉ पी आर शिवपुजे यांनी व्‍यक्‍तीचा दृष्टिकोनच अनेक समस्‍याचे समाधान करू शकतो व आंतर विद्याशाखा संशोधन होणे गरजेच असल्‍याचे सांगितले. तसेच विद्यापीठ कार्यकारी परिषदेचे सदस्‍य मा श्री रविंद्र देशमुख यांनी विद्यार्थ्‍यांनी स्‍वत:च्‍या शिक्षणाचा उपयोग समाजहितासाठी करावा, असा सल्‍ला दिला तर विद्यापीठ कार्यकारी परिषदेचे सदस्‍य मा श्री अनंतराव चोंडे यांनी कृषि पदवीधरांनी संशोधनातुन भविष्‍य घडवावे असे सांगितले. कार्यक्रमात प्रा एन जी लाड यांनी महाविद्यालयाच्‍या शैक्षणिक नियमावलीबाबत मार्गदर्शन केले. महाविद्यालयात नुतन प्रवेशित विद्यार्थ्‍यीनी मनोगत व्‍यक्‍त केले तर नुतन प्रवेशित विद्यार्थ्‍यांचे मान्‍यवरांच्‍या हस्‍ते पुष्‍पगुच्छ देऊन स्‍वागत करण्‍यात आले.
कार्यक्रमाच्‍या प्रास्‍ताविकात प्राचार्य डॉ डि एन गोखले यांनी महाविद्यालयाच्‍या शै‍क्षणिक कार्याची माहिती देऊन महाविद्यालयाने देशास व राज्‍यास अनेक शास्त्रज्ञ, प्राध्‍यापक व अधिकारी दिले असल्‍याचे सांगितले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन डॉ ए एस कार्ले यांनी केले तर आभार प्रदर्शन डॉ बाबासाहेब ठोंबरे यांनी केले. कार्यक्रमास महाविद्यालयातील विभाग प्रमुख, प्राध्‍यापक, कर्मचारी व विद्यार्थ्‍यी मोठया संख्‍येने उपस्थित होते. 
मार्गदर्शन करतांना विद्यापीठ कार्यकारी परिषदेचे सदस्‍य मा डॉ पी आर शिवपुजे
मार्गदर्शन करतांना विद्यापीठ कार्यकारी परिषदेचे सदस्‍य मा श्री अनंतराव चोंडे
मार्गदर्शन करतांना विद्यापीठ कार्यकारी परिषदेचे सदस्‍य मा श्री रविंद्र देशमुख

अंबेजोगाई येथील कृषि महाविद्यालयाच्‍या वतीने मौजे पळसखेडा येथे रबी पिक शेतकरी मेळावा संपन्‍न

ग्रामीण कृषि कार्यानुभव कार्यक्रमातंर्गत विविध उपक्रम


सौजन्‍य
सहयोगी अधिष्‍ठाता तथा प्राचार्य
कृषि महाविद्यालय, अंबाजोगाई जि बीड