Wednesday, November 27, 2013

‘गृह विज्ञान आपल्‍या दारी, कुटूंबाचे कल्‍याण करी’ अभिनव उपक्रमास ग्रामीण महिलांचा उत्‍स्‍फुर्त प्रतिसाद

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातंर्गत असलेल्‍या गृह विज्ञान महाविद्यालय, परभणी तर्फे मराठवाड्यातील विविध खेड्यातून ज्ञान प्रबोधनाचे कार्य करण्‍याच्‍या दृष्‍टीने गृह विज्ञान आपल्‍या दारी, कुटूंबाचे कल्‍याण करी अभिनव अभियानाचे उदघाटन नुकतेच आय. आय. टी. दिल्‍ली येथील आंतरराष्‍ट्रीय ख्‍यातीच्‍या प्राध्‍यापिका डॉ. रत्‍नमाला चटर्जी, शिक्षण संचालक डॉ. विश्‍वास शिंदे, संशोधन संचालक डॉ. दत्‍तप्रसाद वासकर, कुलसचिव श्री काशीनाथ पागिरे, गृह विज्ञान महाविद्यालयाच्‍या सहयोगी अधिष्‍ठाता प्रा. विशाला पटनम यांच्‍या उपस्थितीत पार पडला. अभियानामध्‍ये निवडक शंभर गावात वेगवेगळ्या चमुंद्वारे शनिवारी वेगवेगळ्या महत्‍वाच्‍या विषयांवर ग्रामस्‍थ व त्‍यांच्‍या कुटूंबियांना गृह विज्ञान ज्ञान विषयक माहिती देऊन त्‍यांच्‍या जीवनाचा दर्जा उंचावण्‍यासाठी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्‍यात येणार आहे. कार्यक्रमांतर्गत प्रभावीपणे मल्‍टीमीडीयाचा उपयोग करुन तसेच प्रात्‍यक्षिके दाखवून महिलांना, विद्यार्थ्‍यांना तसेच ग्रामस्‍थांना महत्‍वाच्‍या विविध कौटुंबिक आणि वैयक्तिक सक्षमीकरणासंबंधी सजग करण्‍यात येणार आहे. या करिता दृकश्राव्‍य साधने, मल्‍टीमिडीया, प्रदर्शने, व्हिडीओ फिल्‍म, साउंड बार, प्रात्‍यक्षिके, प्रत्‍यक्ष अनुभव इ. प्रभावी साधने व पध्‍दतीचा उपयोग करण्‍यात येणार आहे. अभियानांतर्गत पहिल्‍या फेरीमध्‍ये हिंगोली जिल्‍ह्यातील हट्टा, आडगांव आणि बोरी सावंत या उपक्रमास प्रत्‍यक्ष प्रारंभ करण्‍यात आला, त्‍यास ग्रामीण महिलां, विद्यार्थी तथा ग्रामस्‍थानी उत्‍स्‍फुर्त प्रतिसाद दिला. हट्टा येथे डॉ. रत्‍नमाला चटर्जी यांनी भेट देऊन सरपंच व उपस्थित महिलांशी संवाद साधला व उपक्रमास शुभेच्‍छा दिल्‍या. या कार्यक्रमात सदरील गावामध्‍ये महिलांना गर्भावस्‍थेत घ्‍यावयाची काळजी व महत्‍व या विषयावर सहयोगी अधिष्‍ठाता प्रा. विशाला पटनम यांनी तर सक्षम गृहिणींच्‍या आवश्‍यक जबाबदा-या व याकरीता घ्‍यावयाची विशेष खबरदारी व शेतीमधील कष्‍ट्प्रद कामे कमी करण्‍यासाठी उपयुक्‍त शेती अवजारे या विषयांवर विभाग प्रमुख डॉ. हेमांगीनी सरंबेकर यांनी मार्गदर्शन केले. मौजे आडगांव आणि बोरी सावंत येथे गृह विज्ञान शिक्षण आणि दर्जेदार बाल शिक्षणाची गरज या विषयांवर अनुक्रमे डॉ. जया बंगाळे व डॉ. वीणा भालेराव यांनी मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाच्‍या शेवटी तज्ञांनी केलेल्‍या मार्गदर्शनावर आधारित प्रश्‍न मंजुषा घेवून अचुक उत्‍तरे देणा-या लाभार्थ्‍यांना उत्‍कृष्‍ट श्रोता पुरस्‍कार देण्‍यात आले. इलेक्‍ट्रॉनिक साधनांच्‍या सहाय्याने उपयुक्‍त घोषवाक्‍यांच्‍या माध्‍यमातून गावांमधून जागरुकता निर्माण केली. कार्यक्रमाच्‍या यशस्‍वीतेसाठी विभाग प्रमुख डॉ. प्रभा अंतवाल, डॉ. शंकर पुरी, चित्रा बेलूरकर, रेश्‍मा शेख, ज्‍योत्‍स्‍ना नेर्लेकर, संगीता नाईक, मंजुषा रेवणवार, रुपाली पतंगे व अर्चना भोयर आदीनी परीश्रम घेतले. 

Tuesday, November 26, 2013

कराड येथील राष्ट्रिय कृषि प्रदर्शनातील विद्यापीठाच्‍या दालनास मुख्‍यमंत्री व उपमुख्‍यमंत्री यांची भेट

विद्यापीठाचे दालनास महाराष्‍ट्र राज्‍याच्‍या मा मुख्‍यमंत्री मा ना श्री पृथ्‍वीराजजी चव्‍हाण व मा उपमुख्‍यमंत्री मा ना श्री अजितदादा पवार यांनी भेट दिली त्‍यावेळी माहिती देतांना विद्यापीठाचे श्री वैजनाथ सातपुते.


स्‍वर्गीय यशवंतराव चव्‍हाण यांच्‍या 29 व्‍या स्‍मृती दिनानिमित्‍त दि. 24 ते 28 नोव्‍हेबर 2013 दरम्‍यान कराड येथे 10 वे यशवंतराव चव्‍हाण कृषि औद्योगीक व पशुपक्षी प्रदर्शनाचे आयोजन करण्‍यात आले असुन या प्रदर्शनाचे उदघाटन मा मुख्‍यमंत्री मा ना श्री पृथ्‍वीराजजी चव्‍हाण यांच्‍या हस्‍ते करण्‍यात आले. या प्रदर्शनात या प्रदर्शनात राज्‍यातील चारही कृषि विद्यापीठे, कृषि विभाग, विविध कंपन्‍या आदीचे दालने उभारण्‍यात आले असुन वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाचे दालनास महाराष्‍ट्र राज्‍याच्‍या मा मुख्‍यमंत्री मा ना श्री पृथ्‍वीराजजी चव्‍हाण व मा उपमुख्‍यमंत्री मा ना श्री अजितदादा पवार यांनी दि 25 नोव्‍हेबर रोजी भेट दिली. विद्यापीठाच्‍या दालनात विद्यापीठाने विकसीत केलेले विविध तंत्रज्ञान, पिकांचे विविध वाणे व नमुणे, अन्‍नतंत्रज्ञान महाविद्यालयाचे विविध प्रक्रिया पदार्थ ठेवण्‍यात आलेले आहेत. या दालनास मा मुख्‍यमंत्री व मा उपमुख्‍यमंत्री यांच्‍यासह कृषि‍ व पणन मंत्री मा ना श्री राधाकृष्‍णजी विखे पाटील, वनमंत्री मा. ना. श्री पतंगराव कदम, पशुसंवर्धन व दुग्‍धव्‍यवसाय मंत्री मा. ना. श्री मधुकरराव चव्‍हाण, कृषि आयुक्‍त मा. श्री उमाकांतजी दांगट आदि मान्‍यवरांनी भेटी दिल्‍या. मा. मुख्‍यंमंत्री यांनी विद्यापीठाचा सोयाबीनच्‍या एमएयुएस-162 या वाणाची विशेष चौकशी केली. 
या विद्यापीठाच्‍या दालनास शेतक-यांनी मोठ्या संख्‍येनी शेतक-यांनी भेटी दिल्‍या असुन विद्यापीठाने विकसीत केलेल्‍या सोयाबीनचे वाण एमएयुएस-71 व एमएयुएस-162 या वाणाची विशेष मागणी करीत आहेत. विद्यापीठाचे विस्‍तार शिक्षण संचालक डॉ. अशोक ढवण यांच्‍या मार्गदर्शनाखाली या कृषि प्रदर्शनात विद्यापीठाचे दालण मांडण्‍यात आले असून श्री वैजनाथ सातपुते व श्री संजय मोरे हे शेतक-यांना माहिती देत आहेत.

Monday, November 25, 2013

‘गृहविज्ञान आपल्‍या दारी : कुटुंबाचे कल्‍याण करी’ या अभिनव अभियानास प्रारंभ

‘गृहविज्ञान आपल्‍या दारी : कुटुंबाचे कल्‍याण करी’ या अभिनव अभियानाचे उदघाटन प्रसंगी दिल्‍ली ये‍थील भारतीय तंत्रज्ञान संस्‍थेच्‍या आंतरराष्‍ट्रीय किर्तीच्‍या नॅनो तज्ञा डॉ रत्‍नमाला चॅटर्जी , शिक्षण संचालक डॉ विश्‍वास शिंदे, संशोधन संचालक डॉ दत्‍तप्रसाद वासकर, कुलसचिव श्री का वि पागीरे, गृहविज्ञान महाविद्यालयाच्‍या प्राचार्या प्रा विशाला पटणम व कृषि महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ बी व्‍ही आसेवार आदी

      वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठांतर्गत गृहविज्ञान विद्याशाखा इ. स. 1976 पासुन परभणी जिल्‍ह्यातील विविध खेड्यातून ज्ञान प्रबोधनाचे कार्य करत आहे. गृहविज्ञान विद्याशाखेत विद्यार्थ्‍यांना दिले जाणा-या विविध विषयाचे ज्ञान हे प्रत्‍येक कुटुंबाला, व्‍यक्‍तीला आवश्‍यक आणि सहजपणे अवलंब करता येण्‍यासारखे आहे, जेणेकरुन ग्रामीण कुटुंबांना त्‍यांचे जीवनमान तसेच राहणीमान उंचावण्‍यास मदत होते. असे हे गृहविज्ञान शाखेचे मराठवाड्यातील जिल्‍ह्यातील ग्रामीण भागातील कुटूंबाला मिळावे अश्‍या हेतुने गृहविज्ञान आपल्‍या दारी: कुटुंबाचे कल्‍याण करी या अभिनव अभियानाची कल्‍पना गृहविज्ञान विद्याशाखेच्‍या वतीने ग्रामीण कुटूंबांना गृहविज्ञानाचा अधिकाधिक फायदा व्‍हावा म्‍हणून नोव्‍हेंबर महिन्‍याच्‍या 23 तारखेपासून हे अभियानाचे उदघाटन दिल्‍ली ये‍थील भारतीय तंत्रज्ञान संस्‍थेच्‍या आंतरराष्‍ट्रीय किर्तीच्‍या नॅनो तज्ञा डॉ रत्‍नमाला चॅटर्जी , शिक्षण संचालक डॉ विश्‍वास शिंदे, संशोधन संचालक डॉ दत्‍तप्रसाद वासकर, कुलसचिव श्री का वि पागीरे, गृहविज्ञान महाविद्यालयाच्‍या सहयोगी अधिष्‍ठाता व प्राचार्या प्रा विशाला पटणम व कृषि महाविद्यालयाचे प्रभारी सहयोगी अधिष्‍ठाता व प्राचार्य डॉ बी व्‍ही आसेवार यांच्‍या प्रमुख उपस्थिती दि 22 नोव्‍हेबर रोजी झाले. या अभियानांतर्गत प्रत्‍येक शनिवारी गृहविज्ञान तज्ञ, संशोधन सहयोगी, इतर स्‍थानिक तज्ञ यांचे दोन चमु दोन खेड्यात जाउन विविध विषयावर व्‍याख्‍याने, प्रात्‍यक्षिके, व्हिडीओ फिल्‍म आणि प्रदर्शनी यांच्‍या सहाय्याने तज्ञ प्रबोधन करतील. वातावरण्‍ निर्मितीसाठी इलेक्‍ट्रानिक माध्‍यमातुन ग्रामीण जीवनाचा दर्जा उंचावण्‍याशी सुसंगत घोषवाक्‍याचा गजर संपूर्ण गावभरात केला जाणार आहे. यात पुढील विषयावर विशेष मार्गदर्शन करण्‍यात येणार आहे.
1.     घ्‍या गृहविज्ञानाचे शिक्षण विकासाचे वरदानी दालन.
2.    स्त्रियांचे दरहजारी घटणारे प्रमाण : सामाजिक स्‍थैर्यावरील मोठे संकट
3.    सक्षम गृहिणी - आवश्‍यक खबरदारी आणि जबाबदारी
4.    स्‍वस्‍थ कौटुंबिक संबंध - स्‍वस्‍थ मानसीक आरोग्‍य
5.    महाभारत दर्शन - कौटुंबिक कल्‍याण दर्पण
6.    दर्जेदार बाल शिक्षण - पाल्‍याच्‍या उज्‍वल भविष्‍याची गुरुकिल्‍ली
7.    किशोरवयीन मुल्‍यांचे स्‍वयंकाळजी पाल्‍य पालकांतील संघर्षाचे समायोजन
8.    चांगले पोषण चांगले आरोग्‍य हीच खरी कौटुंबिक बचत / दौलत
9.    कौटुंबिक उत्‍पनास लावण्‍या हातभार गृहिणींनो करा लघु उद्योगाचा स्विकार
10.   पर्यावरणा विषयक आव्‍हाने : कुटुंबाची जबाबदारी
तसेच कार्यक्रमाच्‍या शेवटी तज्ञांनी केलेल्‍या प्रबोधनावर आधारीत 10 प्रश्‍न विचारले जातील सर्व प्रश्‍नांची अचुक उत्‍तरे देण्‍याच्‍या सहभागी व्‍यक्‍तीस उत्‍कृष्‍ट श्रवण पुरस्‍कार देण्‍यात येईल.


Friday, November 22, 2013

नॅनो तंत्रज्ञानात मनुष्‍याचे जीवन सुकर करण्‍याची मोठी शक्‍ती.....नॅनो तज्ञा डॉ रत्‍नमाला चॅटर्जी

दिल्‍ली ये‍थील भारतीय तंत्रज्ञान संस्‍थेच्‍या आंतरराष्‍ट्रीय किर्तीच्‍या नॅनो तज्ञा डॉ रत्‍नमाला चॅटर्जी मार्गदर्शन करतांना 
अध्‍यक्ष समारोपीय भाषणात शिक्षण संचालक डॉ विश्‍वास शिंदे मार्गदर्शन करतांना, व्यासपीठावर  नॅनोतज्ञा डॉ रत्‍नमाला चॅटर्जी, संशोधन संचालक डॉ दत्‍तप्रसाद वासकर व कुलसचिव श्री का वि पागीरे, प्राचार्या प्रा विशाला पटणम व कृषि महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ बी व्‍ही आसेवार आदी 

कॅन्‍सर सारख्‍या आजारामध्‍ये केमोथेरपीमुळे रूग्‍नास अनेक दुष्‍परीणामास सामोरे जावे लागते, नॅनो तंत्रज्ञानामुळे हया प्रकारचे दुष्‍परिणाम कमी होणार आहे. नॅनो तंत्रज्ञानात मनुष्‍याचे जीवन सुकर करण्‍याची मोठी शक्‍ती आहे, असे प्रतिपादन दिल्‍ली ये‍थील भारतीय तंत्रज्ञान संस्‍थेच्‍या आंतरराष्‍ट्रीय किर्तीच्‍या नॅनो तज्ञा डॉ रत्‍नमाला चॅटर्जी यांनी केले. वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठात नॅनो तंत्रज्ञान : एक संशोधनात्‍मक दृष्टिक्षेप याविषयावर  नॅनोतज्ञा डॉ रत्‍नमाला चॅटर्जी यांचे व्‍याख्‍यान गृ‍हविज्ञान महाविद्यालय व कृषि महाविद्यालय यांच्‍या संयुक्‍त विद्यामाने आयोजित करण्‍यात आले होते, त्‍यावेळी त्‍या बोलत होत्‍या. कार्यक्रमाच्‍या अध्‍यक्षस्‍थानी शिक्षण संचालक तथा अधिष्‍ठाता डॉ विश्‍वास शिंदे होते तर संशोधन संचालक डॉ दत्‍तप्रसाद वासकर व कुलसचिव श्री का वि पागीरे, गृहविज्ञान महाविद्यालयाच्‍या सहयोगी अधिष्‍ठाता व प्राचार्या प्रा विशाला पटणम व कृषि महाविद्यालयाचे प्रभारी सहयोगी अधिष्‍ठाता व प्राचार्य डॉ बी व्‍ही आसेवार यांची प्रमुख उपस्थिती होती. 
     व्‍याख्‍यानात त्‍या पुढे म्‍हणाल्‍या की, कृषि क्षेत्रात अधिक उत्‍पादनासाठी, किड व रोगाचे निदान व व्‍यवस्‍थापन, जल व्‍यवस्‍थापन, उर्जा बचत, दुग्‍ध शास्‍त्र आदी शाखेत नॅनो तंत्रज्ञानाचा मोठा उपयोग होणार आहे. यावेळी त्‍यांनी पॉवर पाईन्‍टच्‍या मदतीने नॅनो तंत्रज्ञानाबाबत सविस्‍तर मार्गदर्शन केले. अध्‍यक्ष समारोपीय भाषणात शिक्षण संचालक डॉ विश्‍वास शिंदे म्‍हणाले की, नॅनो तंत्रज्ञानामुळे शेती क्षेत्रात क्रांतीकारक बदल होणार आहे. उपलब्‍ध तंत्रज्ञानाने न सोडविण्‍यात येणारे कृषि क्षेत्रातील अनेक प्रश्‍न नॅनो तंत्रज्ञानाने आपण सोडवु शकु.  
     कार्यक्रमाचे प्रास्‍ताविक गृहविज्ञान महाविद्यालयाच्‍या सहयोगी अधिष्‍ठाता व प्राचार्या प्रा विशाला पटणम यांनी केले. सुत्रसंचलन डॉ विना भालेराव तर आभार प्रदर्शन डॉ जया बंगाळे यांनी केले. व्‍याख्‍यानास विद्यार्थी, प्राध्‍यापकवृंद व कर्मचारीवृंदानी मोठया संख्‍येने उपस्थित होते. याच कार्यक्रमात गृ‍हविज्ञान महाविद्यालयचा गृहविज्ञान आपल्‍या दारी : कुटूबाचे कल्‍याण करी या अभिनव विस्‍तार शिक्षण कार्यक्रमाचे मान्‍यवरांच्‍या हस्‍ते उदघाटन करण्‍यात आले. 

Wednesday, November 20, 2013

वानप्रस्‍थाश्रमातील जीवनही नातवडांमुळे सुसहयजीवनाच्‍या तिस-या टप्‍प्‍यातील म्‍हणजेच वानप्रस्‍थाश्रमातील जीवनही केवळ नातवंडामुळे सुसहय व आनंदी झाले असल्‍याची कबुली जागतिक आजीआजोबा महोत्‍सवात उपस्थित आजीआजोबांनी दिली. नोव्‍हेबर महिन्‍यातील तिस-या रविवारी साज-या होणा-या जागतिक आजीआजोबा महोत्‍सवाचे आयोजन विद्यापीठातंर्गत असलेल्‍या गृहविज्ञान महाविद्यालयातील एलपीपी स्‍कुल मार्फत करण्‍यात आले होते.
कार्यक्रमाच्‍या अध्‍यक्षा सहयागी अधिष्‍ठाता तश्रा प्राचार्या प्रा विशाला पटणम होते तर आजी आजोबांचे प्रतिनिधी श्री शिवाजी कच्‍छवे, श्रीमती कुसुमताई औंढेकर, प्रा रमन्‍ना देसेटी यांची विशेष उपस्थिती होती. कुटुंबामध्‍ये नातवंडाच्‍या संगोपनात महत्‍त्‍वाची भुमिका निभावणा-या आजी आजोबांविषयी कृतज्ञता व्‍यक्‍त करण्‍यासाठी हा महोत्‍सव सर्व कुटुबियांनी मोठया उत्‍साहाने साजरा करण्‍याची गरज आहे, असे प्रतिपादन प्रा विशाला पटणम यांनी भाषणात केले. ज्‍या बालकांना आजी आजोबांचा सहवास लाभतो अशा बालकांचा सर्वागींण विकास‍ही उत्‍तमरित्‍या होतो असे त्‍या म्‍हणल्‍या. या महोत्‍सवानिमित्‍त नातवंडाच्‍या संगोपणात माझा वाटा याविषयावर निबंध स्‍पर्धा आजी आजोबांसाठी घेण्‍यात आली, त्‍या स्‍पर्धातील विजेते श्रीमती लक्ष्‍मीबाई कामाजी डाकोरे, मनिषा दत्‍तात्रय जोशी, श्री शिवाजी कच्‍छवे व कुसुम शंकरराव औढेंकर यांना अनुक्रमे प्रथम, व्दितीय व तृतीय क्रमांक पटकावला त्‍यांचे अध्‍यक्षांच्‍या हस्‍ते स्‍मृतीचिन्‍ह व प्रमाणपत्रे देउन सत्‍कार करण्‍यात आला. यावेळी विजेत्‍या आजी आजोबांनी आपल्‍या उत्‍कट भावना व्‍यक्‍त केल्‍या. कार्यक्रमाचे संचलन डॉ जया बंगाळे यांनी तर आभार प्रदर्शन डॉ वीणा भालेराव यांनी केले. कार्यक्रम यशस्‍वीतेसाठी विभागातील प्राध्‍यापक वृंद व कर्मचारी वृंदाचे सहकार्य लाभले.

जागतिक पुरूष दिन उत्साहात साजरा
Monday, November 18, 2013

गुजरात येथील नवसारी कृषी विद्यापीठाच्‍या विद्यार्थ्‍यानी दिली वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठास भेट

वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठात आलेल्या गुजरात येथील नवसारी कृषि विद्यापीठच्या ८४ विद्यार्थ्‍यानी दि १८.११.२०१३ रोजी कृषी तंत्रज्ञान माहिती केंद्रास भेट दिली. या प्रसंगी कृषी तंत्रज्ञान माहिती केंद्राचे व्यवस्‍थापक डॉ. आनंद गोरे यांनी "विद्यापीठ आपल्या दारी, तंत्रज्ञान शेतावारी" या महत्वाकांशी उपक्रमाबद्दल माहिती दिली. तसेच विद्यापीठाने संशोधित केलेल्या विविध पिकांच्या जाती / बी -बियाणे बद्दल माहिती दिली. कृषी विषयी माहिती देणारे विविध प्रकाशने, घडीपत्रिका, माहिती पुस्तिका या बद्दल मार्गदर्शन केले. ऑडीवो कॉन्फेर्सिंग आणि दर मंगळवारी सकाळी १० ते १२ या वेळेत प्रसारित होणा-या "कृषी वाहिनी" व स्पर्श पटल (टच स्क्रीन) या सेवेबदल मार्गदर्शन केले. विद्यापीठ आणि कृषी तंत्रज्ञान माहिती केंद्राने सुरु केलेल्या नवीन ब्लोग बदल व कृषी तंत्रज्ञान माहिती केंद्र मध्ये शेतकरीसाठी नवीन सुरु केलेल्या संगणक विभाग बद्दल माहिती दिली. याप्रसंगी केंद्राचे कर्मचारी डी. डी. पटाईत, सतीश जाधव, दयानंद दिक्षित, रंजना लांडगे, सचिन रनर, श्री कठारे हे उपस्थित होते. सदरिल विद्यार्थ्‍यांनी विद्यापीठातील उती-संवर्धन, पशु-संवर्धन व दुग्ध व्‍यवसाय, कृषी अन्न तंत्रज्ञान महाविद्यालय, कृषी अभियांत्रिकी विभाग, उद्यानविद्या विभागास भेटी दिल्या.

Friday, November 15, 2013

‘नॅनो तंत्रज्ञान : एक संशोधनात्मक दृष्टिक्षेप’ यावर नॅनोतज्ञा डॉ रत्नमाला चॅटर्जी यांचे व्याख्यान

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठात नॅनो तंत्रज्ञान : एक संशोधनात्‍मक दृष्टिक्षेप याविषयावर नवी दिल्‍ली ये‍थील भारतीय तंत्रज्ञान संस्‍थेच्‍या नॅनो तज्ञा डॉ रत्‍नमाला चॅटर्जी यांचे व्‍याख्‍यानाचे आयोजन दि 22 नोव्‍हेंबर 2013 शुक्रवारी सकाळी 10.30 वाजता कृषि महाविद्यालयाच्‍या सभागृहात करण्‍यात आले. कार्यक्रमाच्‍या अध्‍यक्षस्‍थानी शिक्षण संचालक तथा अधिष्‍ठाता डॉ विश्‍वास शिंदे राहणार असुन संशोधन संचालक डॉ दत्‍तप्रसाद वासकर व कुलसचिव श्री का वि पागीरे यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे. व्‍याख्‍यानास विद्यार्थी, प्राध्‍यापकवृंद व कर्मचारीवृंदानी मोठया संख्‍येने उपस्थित राहण्‍याचे आवाहन गृहविज्ञान महाविद्यालयाच्‍या सहयोगी अधिष्‍ठाता व प्राचार्या प्रा विशाला पटणम व कृषि महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्‍ठाता व प्राचार्य डॉ बी बी भोसले यांनी केले आहे.  याच कार्यक्रमात गृ‍हविज्ञान महाविद्यालयचा गृहविज्ञान आपल्‍या दारी : कुटूबाचे कल्‍याण करी या अभिनव विस्‍तार शिक्षण कार्यक्रमाचे मान्‍यवरांच्‍या हस्‍ते उदघाटन करण्‍यात येणार आहे. 

Wednesday, November 13, 2013

मा कुलगूरू श्री संजीव जयस्‍वाल यांनी घेतला विद्यापीठ कार्याचा आढावा

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाचे नवनियुक्‍त कुलगूरू तथा विभागीय आयुक्‍त मा श्री संजीव जयस्‍वाल विद्यापीठाच्‍या कार्याचा आढावा बैढकीत मार्गदर्शन करतांना. बैठकीस परभणी जिल्‍हाचे जिल्‍हाधिकारी मा श्री एस पी सिंग, औरंगाबादचे अतिरिक्‍त जिल्‍हाधिकारी मा श्री किशन लवांदे, शिक्षण संचालक डॉ विश्‍वास शिंदे, विस्‍तार शिक्षण संचालक डॉ अशोक ढवण, संशोधन संचालक डॉ दत्‍तप्रसाद वासकर व कुलसचिव श्री का वि पागिर

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाचे नवनियुक्‍त कुलगूरू तथा विभागीय आयुक्‍त मा श्री संजीव जयस्‍वाल यांनी दि 13 नोव्‍हेंबर 2013 रोजी बैढकीत विद्यापीठाच्‍या कार्याचा आढावा घेतला. बैठकीस परभणी जिल्‍हाचे जिल्‍हाधिकारी मा श्री एस पी सिंग, औरंगाबादचे अतिरिक्‍त जिल्‍हाधिकारी मा श्री किशन लवांदे व विद्यापीठाचे वरिष्‍ठ अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. विद्यापीठाचे शिक्षण संचालक डॉ विश्‍वास शिंदे यांनी विद्यापीठाच्‍या शैक्षणिक कार्याबाबत, विस्‍तार कार्याबाबत विस्‍तार शिक्षण संचालक डॉ अशोक ढवण यांनी तर संशोधन कार्याबाबत संशोधन संचालक डॉ दत्‍तप्रसाद वासकर यांनी सविस्‍तर माहीती दिली. बैठकीत विद्यापीठाच्‍या विविध प्रश्‍नांची चर्चा करण्‍यात आली. विद्यापीठाचे प्रशासकीय पातळीवरील काही प्रलंबित प्रश्‍न विभागीय आयुक्‍त या नात्‍याने माझ्या कार्यकाळात मार्गी लावता आल्‍यास मला आंनद होईल, असे उद्गार मा श्री संजीव जयस्‍वाल यांनी काढले. बैठकीच्‍या शेवटी मा कुलगरू यांनी विद्यापीठाच्‍या वरिष्‍ठांना विद्यापीठाचा प्रशासनाच्‍या दृष्टिने योग्‍य त्‍या सुचना दिल्‍या. बैठकीस कुलसचिव श्री का वि पागिर, विद्यापीठ नियंत्रक श्री एन जे सोनकांबळे, विद्यापीठ अभियंता श्री अब्‍दुल रहिम, निम्‍नस्‍तर शिक्षणाचे सहयोगी अधिष्‍ठाता डॉ डि बी देवसरकर, परभणी कृषि महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्‍ठाता तथा प्राचार्य डॉ बी बी भोसले, गोळेगांब कृषि महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्‍ठाता तथा प्राचार्य डॉ विलास पाटील, कृषि अभियांत्रिकी महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्‍ठाता तथा प्राचार्य डॉ उदय खोडके, गृ‍ह विज्ञान महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्‍ठाता तथा प्राचार्य प्रा विशाला पटणम, उदयानविद्या महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्‍ठाता तथा प्राचार्य डॉ एस बी रोहीदास व विविध विभागाचे विभाग प्रमुख उपस्थित होते.

Friday, November 8, 2013

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाचे कुलगूरू मा डॉ के पी गोरे यांना निरोप
वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाचे कुलगूरू मा डॉ के पी गोरे यांनी वयाचे 65 वर्ष पुर्ण केल्‍यामुळे दि 07 नोब्‍हेंबर 2013 रोजी कुलगुरू पदावरून निवृत्‍त झाले. त्‍यानिमित्‍त विद्यापीठाच्‍या वतीने समारंभाचा कार्यक्रम आयोजित करण्‍यात आला होता. कार्यक्रमाच्‍या अध्‍यक्षस्‍थानी परभणीचे जिल्‍हाधिकारी मा श्री एस पी सिंग हे होते तर शिक्षण संचालक डॉ विश्‍वास शिंदे, विस्‍तार शिक्षण संचालक डॉ अशोक ढवण, संशोधन संचालक डॉ दत्‍तप्रसाद वासकर, कुलसचिव श्री का वि पागिरे, सौ कलावंतीताई गोरे, जेष्‍ट स्‍वातंत्रसेनानी श्री आर डी देशमुख, प्रगतशील शेतकरी श्री सोपानराव अवचार यांची प्रमुख उपस्थिती होती. याप्रसंगी मा डॉ के पी गोरे यांचा जिल्‍हाधिकारी मा श्री एस पी सिंग यांच्‍या हस्‍ते सपत्‍नीक सत्‍कार करण्‍यात आला.
सत्‍काराला उत्‍तर देतांना कुलगूरू मा डॉ के पी गोरे म्‍हणाले की, विद्यापीठ ही केवळ संस्‍था नसून आमचा सर्वांचा श्‍वास आहे, येथील सर्व अधिकारी, कर्मचारी व सर्व सहकारी यांच्‍या मोलाच्‍या सहकार्यामुळे आज विद्यापीठाचा नावलौकिक देशपातळी झाला आहे. आपल्‍या भूमीची व लोकांची सेवा करण्‍याची कुलगूरू या नात्‍याने संधी मिळाली, त्‍यासंधीचा विद्यापीठाचा विकास व प्रगतीसाठी उपयोग केला. ज्‍या विद्यापीठात शिक्षण घेतले त्‍याच विद्यापीठाचा कुलगुरू झालो हे माझे भाग्‍य समजतो असे भाग्‍य फार थोडया व्‍यक्‍तीना प्राप्‍त होते. याच भागातील असल्‍यामुळे सहाजिकच या विभागाची प्रगतीसाठी,शेतकरीवर्गाची उन्‍नतीसाठी विद्यापीठ परिवाराच्‍या सहकार्याने प्रयत्‍न केले. राष्‍ट्रीय पातळीवर जेआरएफ परिक्षेत विद्यापीठाच्‍या 100 पेक्षा अधिक विद्यार्थ्‍यांचे यश, द्विपदवी सामंजस्‍य करार, दर्जेदार शिक्षण व संशोधनासाठी प्रयोगशाळांची निर्मिती व बळकटीकरण, ग्रंथालये व वर्ग खोल्‍यांचे अदयावतीकरण, विद्यापीठास्‍तरावर उत्‍कृष्‍ट शिक्षक पुरस्‍काऱांची सुरूवात, पिंगळगड सिंचन विकास प्रकल्‍प, शेती अवजारे निर्मिती, चाचणी व प्रशिक्षण केंद्र, विद्यापीठ आपल्‍या दारी तंत्रज्ञान शेतावरी हा विशेष विस्‍तार उपक्रम, सार्वजनिक खाजगी भागीदारीतील अन्‍न व फळ प्रक्रिया प्रकल्‍प, गोळेगांव येथे ग्रामीण भागातील विद्यार्थी, शेतक-यांच्‍या दृष्‍टीने कृषि महाविद्यालयाची स्‍थापना, चाकूर येथील कृषि व्‍यवसाय व्‍यवस्‍थापन महाविद्यालयास शिक्षक व शिक्षकेत्‍तर पदांची मान्‍यता, नांदेड व चाकूर येथील अतिक्रमण काढण्‍याची मोहिम आदी उपक्रम कमी मनुष्‍यबळ असतांनाही यशस्‍वीरित्‍या राबवु शकलो. यासाठी कल्‍पना माझी होती परंतु ही कल्‍पना साकार करण्‍याचे कार्य सर्वानी केली हे निश्चित. विद्यापीठ शास्‍त्रज्ञ, प्राध्‍यापक व कर्मचारी आदीनी शेतकरी व विद्यार्थी केंद्रबिंदु मानुन प्रामाणिकपणे कार्य करावे, असा सल्‍ला ही त्‍यांनी दिला.
अध्‍यक्षीय समारोपात जिल्‍हाधिकारी मा श्री एस पी सिंग म्‍हणाले की, मा डॉ के पी गोरे यांच्‍या नेतृत्‍वाखाली विद्यापीठाचे नावलौ‍किक देशापातळी झाले. त्‍यांच्‍या कमी कार्यकाळात विद्यापीठाचे कृषि शिक्षण, संशोधन व विस्‍तार कार्य अधिक वेगाने व प्रभावीपणे झाले. त्‍यांचे हेच कार्य याच पध्‍दतीने पुढे नेण्‍याची जबाबदारी विद्यापीठाच्‍या कर्मचारांवर आहे. डॉ गोरे यांच्‍या कल्‍पनेने सुरू केलेला विद्यापीठ आपल्‍या दारी, तंत्रज्ञान शेतावरी यासारख्‍या उपक्रमाची व्‍याप्‍ती वाढविणे गरजेचे आहे. ज्‍याप्रमाणे आई आपल्‍या मुलावर प्रेम करते तसे प्रेम डॉ गोरे यांनी विद्यापीठावर केले, त्‍यामुळे आज विद्यापीठ गतीमान झालेले दिसत आहे. प्रत्‍येकाची भुमिका विद्यापीठ विकासासाठी महत्‍वाची आहेच, पंरतु डॉ गोरे यांच्‍या सारख्‍या नेतृत्‍वाची जोड पाहीजे हे निश्चित. हा वारसा पुढे नेण्‍याचे काम आता विद्यापीठाच्‍या कर्मचारांवर आहे, असे गौरोवदगार त्‍यांनी काढले.
यावेळी मान्‍यवरांसह परभणी कृषि महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ बी बी भोसले, गोळेगांव कृषि महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ विलास पाटील, गृहविज्ञान महाविद्यालयाच्‍या प्राचार्या प्रा विशाला पटणम, कृषि अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ उदय खोडके, विद्यार्थी कल्‍याण अधिकारी डॉ महेश देशमुख, मुख्‍य वसतीगृह अधिक्षक डॉ एच व्‍ही काळपांडे यांनी आपले मनोगत व्‍यक्‍त केले. 
कार्यक्रमास विद्यापीठातील प्राध्‍यापकवृंद, कर्मचारीवृंद, विद्यार्थी, प्रगतशील शेतकरी, प्रतिष्‍ठीत नागरीक मोठया संख्‍येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन डॉ माधुरी कुलकर्णी यांनी तर आभार प्रदर्शन विभाग प्रमुख डॉ बी एम ठोंबरे यांनी केले. कार्यक्रमाची सांगता श्री उदय वाईकर यांच्‍या निरोपगीतानी झाली. 

कुलगूरू पदाचा अतिरिक्‍त कार्यभार विभागीय आयुक्‍त मा श्री संजीव जयस्‍वाल यांच्‍याकडे

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाचे कुलगूरू मा डॉ के पी गोरे यांनी वयाचे 65 वर्ष पुर्ण केल्‍यामुळे दि 07 नोब्‍हेंबर 2013 रोजी कुलगुरू पदावरून निवृत्‍त झाले. कुलगूरू पदाचा अतिरिक्‍त कार्यभार विभागीय आयुक्‍त मा श्री संजीव जयस्‍वाल (आय ए एस) यांना स्‍वीकाराण्‍याचे आदेश महाराष्‍ट्र राज्‍याचे माननीय राज्‍यपाल तथा कुलपती मा श्री के शंकरनारायणन यांच्‍याकडुन विद्यापीठास प्राप्‍त झाले. मा डॉ के पी गोरे यांनी 25 जानेवारी 2011 रोजी कुलगुरू पदाचा कार्यभार स्‍वीकारला होता.

Friday, November 1, 2013

कृषि महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्‍ठाता व प्राचार्य डॉ एन डी पवार सेवानिवृत

डॉ एन डी पवार यांचा सेवानिवृतीनिमित्त सपत्‍नीक सत्‍कार करण्‍यातांना विद्यापीठाचे कुलगूरू मा डॉ किशनराव गोरे, शिक्षण संचालक डॉ विश्‍वास शिंदे, विस्‍तार शिक्षण संचालक डॉ अशोक ढवण, कुलसचिव श्री का वि पागिरे, सौ पुष्‍पाताई पवार व श्री औटुंबर चव्‍हाण
 

      वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातंर्गत असलेल्‍या परभणी येथील कृषि महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्‍ठाता व प्राचार्य डॉ एन डी पवार दि 31 ऑक्‍टोबर रोजी सेवानिवृत झाले. त्‍यानिमित्‍त विद्यापीठाच्‍यावतीने त्‍यांना निरोप देण्‍यात आला. कार्यक्रमाच्‍या अध्‍यक्षस्‍थानी विद्यापीठाचे मा. कुलगूरू डॉ किशनरावजी गोरे तर शिक्षण संचालक डॉ विश्‍वास शिंदे, विस्‍तार शिक्षण संचालक डॉ अशोक ढवण, कुलसचिव श्री का वि पागिरे, सौ पुष्‍पाताई पवार यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमात डॉ एन डी पवार यांचा सपत्‍नीक सत्‍कार करण्‍यात आला.
      अध्‍यक्षयीय भाषणात मा कुलगूरू डॉ किशनरावजी गोरे म्‍हणाले कि, डॉ एन डि पवार यांच्‍या काळात विद्यार्थी-प्राध्‍यापकांत चांगले संबंध निर्माण झाले. परभणीचे कृषि महाविद्यालयाने राष्ट्रिय व राज्‍य पातळीवर मोठया प्रमाण प्रशासक, कृषि शास्‍त्रज्ञ, अधिकारी निर्माण केले असुन राज्‍यात महाविद्यालयाची एक वेगळी ओळख आहे. हे महाविद्यालय विद्यापीठ प्रशासनाच्‍या दृष्टिने अत्‍यंत महत्‍वाचा घटक असुन त्‍यांचा कार्यभार डॉ पवार यांनी मोठया कार्यकुशलतेने सांभाळा. कोणतीही संस्‍था हि मोठे कार्य करू शकते जर त्‍यातील कार्यरत व्‍यक्‍तीचे कार्य चांगले असेल. डॉ पवार यांचे यशाचे गमक म्‍हणजे त्‍यांचे टिम वर्क आधारे केले प्रशासन होय. डॉ पवार यांच्‍या कार्यकाळात विद्यार्थ्‍याचे आंतरराष्ट्रिय वसतीगृहाचे बांधकाम, जुने वसतीगृहे, वर्ग खोल्‍या व प्रयोगशाळांचे मोठया प्रमाणावर नुतनीकरण केले गेले. महाविद्यालयाचा परिसर चांगले नंदनवन निर्माण झाले आहे. गेली चार वर्षे डॉ पवार यांच्‍या कार्यकाळात विद्यार्थ्‍यात शिस्‍तीचे वातावरण निर्माण झाले तसेच परिसर मुलाखतीमार्फत मोठया प्रमाणात विद्यार्थ्‍यांना नौक-या प्राप्‍त झाल्‍या. डॉ पवार यांच्‍यातील कार्यतत्‍परता व प्रामाणिकपणा हे गुण तरूण शास्‍त्रज्ञ व प्राध्‍यापकांनी प्रेरणादायी आहेत.
      सत्‍काराला उत्‍तर देतांना डॉ एन डी पवार म्‍हणाले की, सर्वाच्‍या सहकार्यानी व कुलगूरूच्‍या खंबीर पाठिंबामुळे सर्वात मोठया कृषि महाविद्यालयाचा कार्यभार यशस्‍वीपणे पुर्ण करू शकलो.
      कार्यक्रमात शिक्षण संचालक डॉ विश्‍वास शिंदे, विस्‍तार शिक्षण संचालक डॉ अशोक ढवण, प्राचार्या प्रा विशाला पटणम, प्राचार्या डॉ विलास पाटील, विद्यापीठ कर्मचारी संघाचे अध्‍यक्ष प्रा दिलीप मोरे, डॉ आनंद गोरे, विद्यार्थी कल्‍याण अधिकारी डॉ महेश देशमुख, डॉ एच व्‍ही काळेपांडे, प्रा अनिस कांबळे, श्री औटुंबर चव्‍हाण आदीनीं आपले मनोगत व्‍यक्‍त केले. 
      डॉ एन डी पवार यांनी विद्यापीठात 37 वर्ष सेवा केली. नौकरीची कृषि सहायक पदावरून सुरूवात करून ते सहायक प्राध्‍यापक, सहयोगी प्राध्‍यापक, प्राध्‍यापक, विभाग प्रमुख ते सहयोगी अधिष्‍ठाता याविविध पदावर कार्य केले. काही काळ ते विस्‍तार शिक्षण संचालक म्‍हणुनही कार्यतर होते. विद्यापीठाच्‍या कृषि शिक्षण, संशोधन व विस्‍तार शिक्षण क्षेत्रात त्‍यांनी मोलाचे योगदान दिले. विशेषता विद्यापीठातर्गत असलेल्‍या सर्वात मोठया कृषि महाविद्यालयाचा कमी मनुष्‍यबळात महाविद्यालयाचा कारभार यशस्‍वीरित्‍या सांभाळला.
     कार्यक्रमात नवनियुक्‍त कृषि महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्‍ठाता तथा प्राचर्या डॉ बी बी भोसले यांचा सत्‍कार करण्‍यात आला. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन डॉ नंदु भुते यांनी तर आभार प्रदर्शन डॉ धीरज कदम यांनी केले. प्रास्‍ताविक डॉ बी एम ठोंबरे यांनी केले तर श्री उदय वाईकर यांच्‍या निरोप गीताने कार्यक्रमाची सांगता झाली. कार्यक्रमास विद्यार्थी, कर्मचारी व प्राध्‍यापक वृंद मोठया संख्‍येने उपस्थित होते.