Saturday, May 30, 2020

वनामकृविच्‍या वतीने ऑनलाईन सोयाबीन लागवड कार्यशाळेचे आयोजन

महाराष्‍ट्र राज्‍याचे कृषिमंत्री माननीय ना श्री दादाजी भुसे करणार शेतकरी बांधवाना संबोधीत

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील विस्‍तार शिक्षण संचालनालय व महाराष्‍ट्र शासनाचा कृषि विभाग यांचे संयुक्‍त विद्यमाने दिनांक २ जुन रोजी सकाळी ११.०० वाजता झुम मिटिंग सॉफ्टवेअरच्‍या माध्‍यमातुन ऑनलाईन सोयाबीन लागवड तंत्रज्ञान व प्रक्रिया कार्यशाळेचे आयोजन करण्‍यात आले असुन प्रमुख अतिथी म्‍हणुन राज्‍याचे कृषिमंत्री माननीय नामदार श्री दादाजी भुसे सहभागी होऊन संबोधीत करणार आहेत. कार्यक्रमाच्‍या अध्‍यक्षस्‍थानी कुलगुरू मा डॉ अशोक ढवण हे राहणार असुन विशेष अतिथी म्‍हणुन अकोला येथील डॉ पंजाबराव देशमुख कृषि विद्यापीठाचे कुलगुरू मा डॉ विलास भाले, राहुरी येथील महात्‍मा फुले कृषि विद्यापीठाचे कुलगुरू मा डॉ के पी विश्‍वनाथा, राज्‍याचे कृषि आयुक्‍त मा डॉ सुहास दिवसे हे सहभागी होणार आहेत. तसेच इंदौर येथील अखिल भारतीय सोयाबीन संस्‍थेचे संचालक डॉ व्‍ही एस भाटीया, पोकराचे प्रकल्‍प व्‍यवस्‍थापन कक्षाचे कृषि विद्यावेत्‍ता श्री विजय कोळेकर, विस्‍तार शिक्षण संचालक डॉ देवराव देवसरकर, औरंगाबाद विभागाचे कृषि सहसंचालक डॉ डी एल जाधव, लातुर विभागाचे कृषि सहसंचालक डॉ टी एन जगताप आदींचा प्रमुख सहभाग राहणार आहे.

कार्यशाळेत सोयाबीन पिकांचे विविध वाण व बिजोत्‍पादन तंत्रज्ञान यावर डॉ एस पी म्‍हेत्रे, सोयाबीन लागवडीवर डॉ यु एन आळसे, बीबीएफ तंत्राने सोयाबीन लागवडीवर डॉ स्मिता सोळंकी, सोयाबीन बीजप्रक्रियावर डॉ ए एल धमक, सोयाबीन बियाणे उगवणक्षमता तपासणीवर डॉ किशोर झाडे, सोयाबीन पिकांतील एकात्मिक कीड व्‍यवस्‍थापन डॉ पी आर झंवर, सोयाबीनवरील रोग व्‍यवस्‍थापन डॉ के टी आपेट, सोयाबीन पिकाचे काढणी पश्‍चात तंत्रज्ञान व मुल्‍यवर्धन यावर डॉ स्मिता खोडके आदी मार्गदर्शन करणार आहेत.   

झुम मि‍टिंग सॉफ्टवेअर च्‍या माध्‍यमातुन सहभागी होण्‍यासाठी आयडी 382 912 7898 व पासवर्ड 431401 यांचा वापर करावा किंवा कार्यशाळेचे विद्यापीठ युटयुब चॅनेल www.youtube.com/user/vnmkv वर थेट प्रक्षेपण पाहता येईल.  तरी सदरिल कार्यशाळेत जास्‍तीत जास्‍त शेतकरी बांधव व कृषि विस्‍तार कार्यकर्त्‍यानी सहभाग घ्‍यावा, असे आवाहन मुख्‍य विस्‍तार शिक्षणाधिकारी डॉ प्रशांत देशमुख, नाहेप मुख्‍य अन्‍वेषक डॉ गोपाळ शिंदे, परभणी जिल्‍हा अधिक्षक कृषि अधिकारी डॉ संतोष आळसे, अखिल भारतीय सोयाबीन प्रकल्‍पाचे प्रभारी अधिकारी डॉ एस पी म्‍हेत्रे आदींने केले आहे.

Thursday, May 28, 2020

टोळधाडीचा प्रादुर्भाव व खबरदारी

वनामकृविच्‍या किटकशास्‍त्रज्ञाचा सल्‍ला

देशात राजस्थानातील वाळवंटी जिल्हये व मध्यप्रदेशातील काही जिल्हयांमध्ये टोळधाडीचा प्रादुर्भाव मे महीन्याच्या पहील्या पंधरवाडयापासून झाल्याचे आढळुन आले, परंतू मागील काही दिवसापासून विदर्भातील काही जिल्हयात ‍विशेषत: नागपूर जिल्हयात काही प्रमाणात या वाळवंटी टोळ किडीचा प्रादूर्भाव दिसून येत आहे. या किडीचा प्रादुर्भाव असाच वाढत राहीला तर मराठवाडयात सुध्दा या कीडीचा शिरकाव होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे या कीडीला वेळीच रोखण्यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून या कीडीबाबत शेतकरी बांधवांना इत्यंभूत माहीती देऊन जनजागृती करणे गरजेचे आहे.

टोळ ही कीड आंतरराष्ट्रीय व जागतिक महत्वाची कीड समजली जाते. आपल्याकडे नाकतोडयाच्या गटातील टोळ आढळतात. या कीडींच्या प्रामुख्याने तीन प्रकारच्या प्रजाती (Species) आहेत. त्यापैकी Dessert locust म्हणजेच वाळवंटी टोळ ही तांबूस रंगाची असतात. ही अत्यंत खादाड व नुकसान करणारी कीड आहे. एका टोळधाडीत असंख्य टोळ असतात. टोळामध्ये दोन प्रकारच्या स्थिती असतात. जेव्हा टोळांची संख्या खूपच कमी व विरळ असते तेव्हा त्या स्थितीस एकाकी (Solitary phase) म्हणतात.

टोळचा जीवनक्रम

टोळांच्या जीवनात तीन अवस्था असतात. अंडी, पिल्ले किंवा बाल्यावस्था आणि पूर्ण वाढ झालेली प्रोढावस्था. अंडी अवस्था ही जमिनीत असते. या कीडीची मादी साधारणत: 50 ते 100 अंडयांच्या पुंजक्याने ओलसर रेताड जमिनीत अंडी घालते. अंडी अवस्था साधारणपणे हवामानानुसार दोन ते चार आठवडयांची असते पिले बाहेर पडतात. जमिनीतील ओलावा व हवेतील उष्णतामान यावर अंडयाच्या अवस्थेचा काळ अवलंबून असतो.

अंडयातून बाहेर पडलेल्या लहान टोळांना (पिल्लांना) पंख फुटलेले नसतात. लहान टोळ वाढत असताना 3 ते 5 दिवसांचे अंतराने पाच वेळा कात टाकतात. असे वाढत असतानाच त्यांना पंख फुटतात. कीडीची ही अवस्था (बाल्यावस्था) 4 ते 6 आठवडे राहते.

अंडयातुन बाहेर पडल्यानंतर वाढीच्या अवस्थेत कीड खालीलप्रमाणे 4 ते 5 वेळा कात टाकते.

प्रथम अवस्था : अंडयातून नुकतीच बाहेर पडलेले पिल्लू पांढरे असते व 1 ते 2 तासात काळया रंगाचे होते.

दुसरी अवस्था : डोके मोठे व चटकन लक्षात येणारा फिकट गुलाबी रंग हे या अवस्थेचे वैशिष्ट आहे.

तिसरी अवस्था : छातीच्या दोन्ही बाजूस दोन पंखांच्या जोडी बाहेर पडण्याची स्थिती.

चौथी अवस्था : विशिष्ट काळा व पिवळा रंग.

पाचवी अवस्था : विशिष्ट तेजस्वी पिवळा व काळया रंगाचा पॅटर्न

नुकसानीचा प्रकार

टोळांची सर्व पिल्ले एकत्र येवून मोठया थव्याने वाटेतील वनस्पतींचा फडशा पाडत पुढे सरकतात. अशाप्रकारे हे थवे पुढे सरकत असताना सायंकाळ झाल्यावर झाडा - झुडपांमध्ये वस्तीस राहतात. पुर्ण वाढलेले थव्याचे स्थितीतील प्रौढ टोळ तांबुस रंगाचे असतात. ते अतिशय चपळ व खादाड असतात. ही टोळधाड पिकांचे जास्तीत जास्त नुकसान करते. शिवाय ही टोळधाड दुरवर उडून जात असल्याने अशा टोळधाडीपासुन फार मोठा धोका असतो. हिरवी पाने, फुले, फळे, बिया फांदी व पालवी आदिंचा टोळ फडशा पाडत असतात. एका दिवसात टोळ त्यांच्या वजनाएवढे अन्न खात असते. एक चौरस किमी क्षेत्रात जर टोळधाड असेल तर त्यामध्ये जवळजवळ 3000 क्विंटल टोळ असतात. बाल्यावस्थेतील पिल्ले त्यांच्या वजनापेक्षा 6 ते 8 पटीने जास्त अन्न खातात. तांबूस टोळ पुर्णावस्थेत पोहोचल्यावर पिवळया रंगाचे होतात. असे पिवळे टोळ अंडी घालण्यास अनुकूल अशी ओलसर रेताड जमिनीच्या शोधात फिरतात. टोळाचे थवे ताशी 12 ते 16 किमी वेगाने उडतात.

आर्थिक नुकसानाची पातळी : प्रति हेक्टरी दहा हजार प्रौढ किंवा प्रती झुडुप पाच ते सहा पिल्‍ले अशा कोणत्याही स्थितीत किडीची संख्या आर्थिक नुकसान पातळीच्यावर जाईल त्यावेळी लगेचच व्यवस्थापनाच्या उपाययोजना कराव्यात. टोळकिडीची संख्या कमी तसेच प्रमाण विखुरलेले असल्यास नियंत्रणाच्या उपाययोजना करणे प्रभावी ठरत नाही, तसेच ते पर्यावरणासाठी हानीकारक ठरु शकते.

नियंत्रणाचे उपाय :

Ø अंडी घातलेल्या जागा शोधून जमिनीच्या भोवताली चर खोदल्यास पिलांना अटकाव करुन नियंत्रण करता येते. अंडी शोधुन सामुहीकरित्या नष्ट करावीत.

Ø टोळांची सवय थव्या-थव्याने एका दिशेने जात असतात. त्यामूळे पुढे येणा-या थव्यांच्या वाटेवर 60 सेमी रूंद व 75 सेमी खोल चर खणून त्यात या पिलांना पकडता येते.

Ø संध्याकाळी / रात्रीच्या वेळी झाडा झुडपांवर टोळ जमा होतात अशावेळी प्रादुर्भावग्रस्त शेतामध्ये मशाली पेटवून तसेच टायर जाळून धूर केल्याने नियंत्रण होते.

Ø थव्यांच्या स्थितीत पिल्लांची संख्या जास्त असल्याने नीम तेल हेक्‍टरी 2.5 लिटर या प्रमाणे फवारणी केल्यास प्रभावी असल्याचे दिसून आले आहे.

Ø विष आमिशाचा वापर - गहू किंवा भाताचे तूस यामध्ये फिप्रोनील 5 एस.सी. व 292 ई.सी. व त्यामध्ये किडीस आकर्षित करण्यासाठी मळी मिसळून रात्री किडीने आश्रय घेतलेल्या झाडाच्या आजूबाजूस किंवा प्रादुर्भावग्रस्त शेतामध्ये प्रति हेक्टरी 20 – 30 किलो याप्रमाणे फेकून द्यावे. जेणेकरुन, सदर आमिष खाल्यावर किडीचा मृत्यू होईल.

Ø मेटा-हायझीयम ॲक्रीडीयम व मायक्रोस्पोरीयम, पॅरानोसेमा लोकस्टी (पुर्वीचे नाव नोसेमा लोकस्टी) या जैविक किटकनाशकांचा वापर अनेक देशांत केला जातो.

Ø मिथील पॅराथीआन 2 टक्के भुकटी 25 ते 30 किलो प्रति हेक्टरी धुरळणी करावी.

Ø क्लोरोपायरीफॉस 20 ई. सी. 2.4 मिली, क्लोरोपायरीफॉस 50 ई.सी. 1 मिली., डेल्टामेथ्रीन 2.8 ई.सी.1 मिली, डायफ्लूबेंझुरॉन 25 ई.सी. 25 डब्लु.पी., लॅम्ब्डा सायहॅलोथ्रीन 5 ई.सी. 1 मिली, लॅम्ब्डा सायहॅलोथ्रीन 10 डब्ल्यू.पी., फिप्रोनिल 5 एस.सी. 0.25 मिली, मॅलाथिऑन 50 ई.सी. 3.7 मिली, मॅलाथिऑन 25 डब्लु.पी. 7.4 ग्रॅम प्रति लिटर पाणी या प्रमाणात सदरील किटकनाशकांची टोळ नियंत्रणासाठी शिफारस अलिकडेच केंद्रिय किटकनाशक मंडळ व नोंदणी समितीने केलेली आहे.

तरी टोळधाडीचा मराठवाडयातील संभाव्य धोका लक्षात घेता, खबरदारीचा उपाय म्हणून शेतक-यांनी या किडीबाबत जागरूक राहावे व प्रादुर्भाव दिसून येताच सजगपणे किडींचे व्यवस्थापन करावे, असे आवाहन वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील कृषि किटकशास्त्र विभागाच्‍या वतीने करण्यात आले आहे.

कृषि विद्यापीठ सदैव शेतकर्‍यांच्या पाठीशी­­­­ ............. कुलगुरू मा डों अशोक ढवण

वनामकृवी व रिलायन्स फाऊंडेशन यांच्‍या संयुक्‍त विद्यमाने आयोजित ऑडिओ कॉन्‍फरन्‍सींग कार्यक्रमात प्रतिपादन

मराठवाडयातील शेती पुढे अनेक समस्‍या आहेत, शेतकरी बांधवांच्या कृषि विषयक समस्या सोडविण्यासाठी विद्यापीठ नेहमीच शेतकर्‍या सोबत आहे. शेतकरी बांधवांनी खचून न जाता कोणत्याही समस्येला तोंड देण्यासाठी सज्ज राहावे, विद्यापीठ सदैव तुमच्या पाठीशी आहे, असे प्रतिपादन कुलगुरू मा. डॉ. अशोक ढवण यांनी केले. वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ व रिलायन्स फाऊंडेशन यांच्‍या संयुक्‍त विद्यमाने दिनांक 27 मे रोजी आयोजित ऑडिओ कॉन्‍फरन्‍सींग कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी विस्‍तार शिक्षण संचालक डॉ देवराव देवसरकर, कृषि तंत्रज्ञान  माहिती केंद्राचे प्रमुख डॉ. यू यन आळसे, शास्‍त्रज्ञ डॉ. एस. जे शिंदे, डॉ. बी. एस. कलालबंडी प्रा. डी.डी. पटाईत आदींनी सहभाग घेतला.

कुलगुरू मा डॉ अशोक ढवण यांनी खरीप हंगाम अवघ्या काही दिवसावर येऊन ठेपला आहे अश्या लॉकडाऊनच्या परिस्थितीत शेतकर्‍यांना कृषि विषयक माहिती देण्यासाठी विद्यापीठ व रिलायन्स फाऊंडेशन राबवत असलेला ऑडिओ कॉन्फरन्सच्या चांगला उपक्रम राबवित असुन विस्तार कार्यकर्ते व रिलायंस फाउंडेशन यांचे त्‍यांनी कौतुक केले.

विस्तार शिक्षण संचालक डॉ डी बि देवसरकर आपल्‍या मार्गदर्शनात म्हणाले की, शेतकर्‍यांनी येणार्‍या भविष्यात जमिनीचे आरोग्य सांभाळणे ही काळाची गरज बनली असून शेतकर्‍यांनी मृद व पाणी नमुने तपासणी करणे गरजेचे आहे. माती परीक्षण केल्याने शेत जमिनीचा प्रकार, तिचे भौतिक, रासायनिक, कायिक गुणधर्म, अन्नद्रव्याच्या उपलब्धतेनुसार जमिनीमध्ये हवा, पाणी यातील समतोल राखणे, क्षारता, घट्टपणा आदी त्रुटी दूर करणे, जमिनीत उपलब्ध अन्नद्रव्य तसेच पिकाला आवश्यक अन्नद्रव्य मात्रा या आधारे आवश्यक खत मात्रांचा अवलंब करणे शक्य होते. खरीप हंगामावर डॉ. यू एन आळसे यांनी सहभागी शेतकर्‍यांना मार्गदर्शन केले ज्यात बीज प्रक्रिया, बियाणे निवड, घरघुती बियाण्याचा वापर, नवीन संशोधित वाण आणि जमिनीचा प्रकार व पाऊसमानाप्रमाणे पिक पद्धतीचे नियोजन आदीबाबत शेतकऱ्यांच्या प्रश्नांना उत्तरे दिली. किटकशास्त्रज्ञ प्रा. दिगंबर पटाईत यांनी सहभागी शेतकर्‍यांना हुमणी किड, सोयबीन व कपाशीवरील किड व्यवस्थापनाबद्दल मार्गदर्शन केले. तसेच डॉ. एस. जे शिंदे, डॉ. बी. एस. कलालबंडी प्रा. डी.डी. पटाईत यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नांना उत्तरे दिली. करोंना विषाणू परिस्थितीत शेतकऱ्यांनी शेतीची कामे करतांना सामाजिक अंतर जोपासणे गरजेचे असल्‍याचे सांगितले. कार्यक्रमात शेतकरी बांधवांनी आपल्या घरातच बसून फोनद्वारे फळबाग व्यवस्थापन, खरीप पूर्व नियोजन, जमीन मशागत, हुमणी नियंत्रणाचे उपाय यावर प्रश्न विचारले. या कॉन्फरंसमध्‍ये जिल्ह्यातील चारशे शेतकरी बांधवांनी सहभाग नोंदवला. कार्यक्रमाचे आयोजन रिलायन्स फोन्डेशन परभणी जिल्हा व्यवस्थापक विलास सवाणे व कार्यक्रम सहाय्यक रामाजी राऊत यांनी केले.


Friday, May 22, 2020

वनामकृविच्‍या लातूर येथील विलासराव देशमुख कृषी जैवतंत्रज्ञान महाविद्यालयास तीन कोटीचे अर्थ साहाय्य


भारत सरकारच्या जैवतंत्रज्ञान विभागाच्‍या अर्थ साहाय्याने कृषि जैवतंत्रज्ञानातील पदव्‍युत्‍तर अभ्‍यासक्रमास मिळणार बळकटी


वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी अंतर्गत असलेल्‍या लातूर येथील विलासराव देशमुख कृषी जैवतंत्रज्ञान महाविद्यालयातील पदव्यूत्तर अभ्यासक्रमास भारत सरकारच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालयाच्या जैवतंत्रज्ञान विभागामार्फत येत्या पाच वर्षात सुमारे ३ कोटी रुपयांचा निधीस मान्‍यता प्राप्त झाली आहे. यासाठी भारत सरकारच्‍या दिल्ली येथील जैवतंत्रज्ञान विभागाच्‍या माध्‍यमातुन देशातील विविध संस्थाकडून प्रस्ताव मागवण्यात आले होते. या उपक्रमाचे समन्वयक कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा. हेमंत पाटील यांनी लॉकडाऊनच्या कालावधीत या प्रस्तावाचे ऑनलाईन सादरीकरण केले होते. महाराष्ट्र राज्यातून या उपक्रमास मान्यता मिळवलेले हे एकमेव महाविद्यालय आहे. कृषी क्षेत्रात जैवतंत्रज्ञानाचे महत्व ओळखून महाराष्ट्राचे दिवंगत मुख्यमंत्री विलासराव देशमुख साहेब केंद्र सरकार मध्ये विज्ञान व तंत्रज्ञान मंत्री असताना या महाविद्यालाच्या रूपाने लातूरमध्ये जैवतंत्रज्ञान विषयातील अत्याधुनिक प्रयोगशाळा स्थापनेसाठी मोलाचे सहकार्य दिले होते. या उपक्रमाच्या मान्यतेसाठी व प्रस्ताव सादरीकरणासाठी प्रकल्प समन्वयक प्रा.हेमंत पाटील, सह-समन्वयक डाॅ राहुल चव्हाण,  डॉ. अमोल देठे, डॉ. विद्या हिंगे, डॉ. योगेश भगत आदींनी मोलाचे योगदान दिले. या यशाबद्दल विद्यापीठाचे कुलगुरू मा. डॉ. अशोक ढव यांनी सर्व प्राध्यापक संशोधकांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा देऊन प्राप्त होणाऱ्या निधीचा विद्यार्थ्यांना संशोधनासाठी शिष्यवृत्ती तसेच शैक्षणिक सुविधांचे बळकटीकरण करून देशाच्या कृषि विकासासाठी अधिक सक्षम व कौशल्यपुर्ण मनुष्यबळ निर्मितीवर भर देण्यात येईल अशी अपेक्षा त्‍यांनी व्‍यक्‍त केली.

वनामकृवित ऑनलाइन पद्धतीने साजरा केला जागतिक मधमाशी दिनवसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील कृषि किटकशास्त्र विभाग व मराठवाडयातील सर्व कृषि विज्ञान केंद्राचे पिक संरक्षण विषय विशेषज्ञ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजीत तिसरा जागतिक मधमाशी दिन दिनांक २० मे रोजी कोविड-१९ प्रादुर्भावाच्या पार्श्वभुमीवर ऑनलाइन चर्चासत्राचे आयोजन करुन साजरा करण्यात आला.

र्चासत्राचे उद्घाटकुलगुरु मा डॉ. अशोक ढवण यांनी केले तर शिक्षण संचालक डॉ. धर्मराज गोखले व संचालक विस्तार शिक्षण डॉ. देवराव देवसकर यांचा प्रमुख सहभाग होता. चर्चासत्रात विभाग प्रमुख डॉ. संजीव बंटेवाड, वनस्पती रोगशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. कल्याण आपेट, वनस्पतीशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. जगदीश जहागीरदार, प्रगतिशील मधमाशी संगोपक श्री. दिनकर पाटिल आदीचाही सहभाग होता.

अध्‍यक्षीय भाषणात कुलगुरु मा. डॉ. अशोक ढवण म्‍हणाले की, मधमाश्याचे पिकातील परागीभवनात मोठी भुमिका असुन मानवीस अन्‍न पुरवठा करण्‍यात त्‍यांचे योगदान आहे. मधमाश्यांची जीवनशैली, मधमाश्यांचे कुठलीही गाजावाजा न करता नेमुन दिलेले कार्य अविरतपणे करतात, ही जीवनशैली मानवाने आत्मसात करण्याची गरज आहे. मधमाशी पालन हा केवळ एक शेतीपुरक जोडधंदा न ठरता एक यशस्वी उद्योग होण्याची गरज व्यक्त केली. मराठवाड्यातील सर्व कृषि विज्ञान केंद्रानी मधमाशी पालनाचे प्रशिक्षणाचे वेळोवेळी आयोजन करुण उद्योजक निर्माण करावेत असे आवाहन त्‍यांनी केले.

यावेळी मनोगतात डॉ. देवराव देवसकर यांनी मधमाश्याचे परागीभवनातील महत्व या बाबतच्या संशोधनावर भर देण्याची गरज व्यक्त केली तर डॉ. धर्मराज गोखले यांनी मधाचे आयुर्वेदिक गुणधर्म व आहारातील महत्व याविषयी माहिती दिली.

मान्‍यवरांच्‍या हस्‍ते मधुमक्षिका पालन एक कृषिपुरक उद्योग या पुस्तिकेचे विमोचन करण्‍यात आले. तांत्रिक सत्रात किटकशास्त्र विभागाचे प्राध्यापक डॉ. पुरुषोत्तम नेहरकर यांनी प्रात्यक्षिकाद्वारे मधमाशाच्या विविध प्रजाती बददल माहिती दिली तर चाकुर येथील प्रगतिशील शेतकरी श्री. दिनकर पाटील यांनी चाकुर येथून चर्चासत्रा सहभाग नोंदवुन मधमाशी संगोपन, मध काढनी, विविध प्रजातचा मध आदींबाबत प्रात्यक्षिकाद्वारे माहिती दिली.

कार्यक्रमाचे प्रास्‍ताविकात विभाग प्रमुख डॉ. संजीव बंटेवाड यांनी मधमाशाचे महत्व सांगितले. सुत्रसंचालन खरपुडीचे विषय विशेषज्ञ डॉ. अजय मिटकरी यांनी केले तर आभार प्रदर्शन मांजरा केव्हीकेचे विषय विशेषज्ञ डॉ. संदीप देशमुख यांनी केले. चर्चासत्रात शंभर पेक्षा जास्‍त शेतक-यांना सहभाग नोंदविला. चर्चासत्रात कृषि कीटकशास्त्र विभागातील डॉ. पुरुषोत्तम झंवर, डॉ. धीरज कदम, डॉ. सदाशिव गोसलवाड, डॉ. मिलिंद सोनकांबळे, डॉ. बस्वराज भेदे, डॉ. अनंत बडगुजर, डॉ. फारिया खान व डॉ. श्रध्दा धुरगुडे आदीसह विभागातील विद्यार्थी, कर्मचारी सोशल डीस्टंसिंगच्या नियमाचे काटेकोरपने पालन करुण सहभागी झाले होते तुळजापुर येथून डॉ. श्रीकृष्ण झगडे सहभाग नोंदविला.

Wednesday, May 20, 2020

संशोधनात्‍मक लेखणातील वाड्‍ःमयचौर्य रोखण्‍याची गरज ........ कुलगुरू मा डॉ अशोक ढवण

वनामकृवित संशोधनात्‍मक लिखाणावर ऑनलाईन प्रशिक्षण कार्यक्रमास सुरूवात


कृषि विद्यापीठाचे मानांकन उच्‍चाविण्‍यासाठी जागतिकस्‍तरावर संशोधनात्‍मक लेख प्रसिध्‍द होणे आवश्‍यक आहे. जागतिकस्‍तरावर  कृषि विद्यापीठाचे  संशोधन पोहचवण्‍याकरिता संशोधन लेखणाचा दर्जा वाढविण्‍याची गरज आहे. सॉफ्टवेअरच्‍या माध्‍यमातुन संशोधन लेखणातील वाड्‍ःमयचौर्य रोखण्‍यासाठी विद्यापीठाने स्‍वतंत्र धोरण निश्चित केले आहे, असे प्रतिपादन कुलगुरू मा डॉ अशोक ढवण यांनी केले. वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील विद्यापीठ ग्रंथालय व विस्‍तार शिक्षण विभाग यांच्‍या संयुक्‍त विद्यमाने दिनांक 20 मे ते 24 मे दरम्‍यान संशोधनात्‍मक लिखाणावर ऑनलाईन प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्‍यात आले असुन या प्रशिक्षणाच्‍या उदघाटन प्रसंगी (दिनांक 20 मे रोजी) ते बोलत होते. कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्‍हणुन शिक्षण संचालक डॉ धर्मराज गोखले, सावित्रिबाई फुले पुणे विद्यापीठातील ग्रंथालय व माहितीशास्‍त्राचे विभाग प्रमुख डॉ राजेंद्र कुंभार, तसेच विस्‍तार शिक्षण विभागाचे प्रमुख डॉ राजेश कदम, विद्यापीठ ग्रंथपाल डॉ संतोष कदम आदीनी ऑनलाईन सहभाग घेतला.

याप्रसंगी शिक्षण संचालक डॉ धर्मराज गोखले यांनी सहभागी प्रशिक्षणार्थीना संबोधीत केले  तसेच डॉ राजेंद्र कुंभार यांनी संशोधन लेखनातील वाड्‍ःमयचौर्य एक आव्‍हान यावर मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे प्रास्‍ताविक विद्यापीठ ग्रंथपाल डॉ संतोष कदम यांनी केले. सुत्रसंचालन डॉ प्रविण कापसे यांनी केले तर आभार विस्‍तार शिक्षण विभागाचे प्रमुख डॉ राजेश कदम यांनी मानले.

सदरिल प्रशिक्षण कार्यक्रमात कर्नाटक, उत्‍तर प्रदेश व राज्‍यातुन विविध विद्यापीठातील चारशेपेक्षा जास्‍त संशोधक, पदव्‍युत्‍तर विद्यार्थ्‍यी व प्राध्‍यापकांनी सहभाग नोंदविला आहे. या प्रशिक्षणात दर्जेदार प्रकाशनात नैतिक पैलू यावर औरंगाबाद येथील डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील डॉ डि के वीर, वाड्‍ःमयचौर्य एक समस्‍या यावर वनामकृविचे माजी शिक्षण संचालक डॉ विलास पाटील, उरकुंट अंन्‍टी प्‍लाजेरीझम सॉफ्टवेअर बाबत पुणे येथील प्रशिक्षक प्रिती राठी, संशोधन मेट्रिक्स वर गुलबर्गा विद्यापीठातील डॉ सुरेश जंगे, लिखाणाचे अवतरण यावर गोवा विद्यापीठाचे डॉ गोपा कुमार यांचे मार्गदर्शन होणार आहे.

प्रशिक्षण आयोजन समितीत विस्‍तार शिक्षण विभाग प्रमुख डॉ राजेश कदम, विद्यापीठ ग्रंथपाल डॉ संतोष कदम, जनसंपर्क अधिकारी डॉ प्रविण कापसे, डॉ रणजित चव्‍हाण, प्रा रवि शिंदे, श्री संतोष ढगे, डॉ वंदना जाधव, भगवान कांबळे, श्री मोहन झोरे आदींचा समावेश आहे.

Monday, May 18, 2020

ऑनलाईन तंत्रज्ञानाचा अवलंब करून शेतकरी बांधव ही आधुनिक होत आहेत..... कृषिमंत्री मा ना श्री दादाजी भुसे

वनामकृविच्‍या 48 व्‍या वर्धापन दिनी राज्‍याचे कृषिमंत्री मा ना श्री दादाजी भुसे यांनी साधला शेतक-यांशी संवाद


आज कोरोना विषाणु रोगाच्‍या पार्श्‍वभुमीवर मानवाच्‍या जीवनात मोठे बदल होत आहेत, काही ठिकाणी शेतमालाची शेतकरी बांधव ग्राहकांना थेट विक्री करित आहेत. या संकल्‍पनेस प्रोत्‍साहन देण्‍याचा शासनाचा प्रयत्‍न राहणार आहे. यामुळे शेतक-यांना शेतमालाचे दोन पैसे जास्‍त मिळतील व ग्राहकांना कमी किंमतीमध्‍ये शेतमाल मिळेल. आज शेतकरी आधुनिक होत असुन ऑनलाईन माध्‍यमाचा तो शेती करतांना उपयोग करित आहे. मराठवाडयातील कापुस व सोयाबीन मुख्‍य पिके आहेत, येणा-या खरिप हंगामात शेतक-यांना लागणारे बियाणे, खत व इतर निविष्‍ठा पुरेशा प्रमाणात उपलब्‍ध होणार आहे, त्‍याचे नियोजन शासनाने केले आहे. शेतक-यांनी सोयाबीन पिकांमध्‍ये स्‍वत: कडील बियाणाचा वापर करावा, याकरिता सोयाबीनची उगवणक्षमता तपासुन घ्‍यावी. कापसामध्‍ये गेल्‍या वर्षी गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव पाहाता, यावर्षी मान्‍सुन पुर्व कापसाची लागवड न करता, पुरेसा पाऊस पडल्‍यानंतरच कापुस लागवड करावी. विद्यापीठाने संशोधनाच्‍या माध्‍यमातुन विकसित केलेले तंत्रज्ञान शेतक-यांपर्यंत पोहचविण्‍याचा प्रयत्‍न करावा, असे प्रतिपादन कृषि मंत्री मा ना श्री दादाजी भुसे यांनी ऑनलाईन कृषि संवाद कार्यक्रमात केली आहे.

परभणी येथील वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाच्या 48 व्या वर्धापन दिनानिमीत्त दरवर्षी होणार खरिप मेळावा कोरोनाच्या संकटामुळे रद्द करुन सोमवारी (ता.18) विद्यापीठाच्‍या वतीने झुम मि‍टिंग मोबाईल अॅप व युटयुब च्या माध्यमातून ऑनलाईन कृषीसंवाद कार्यक्रमाचे आयोजन केले होते, या कार्यक्रमात महाराष्‍ट्राचे कृषिमंत्री मा ना श्री दादा भुसे यांनी सहभागी शेतक-यांशी संवाद साधला. या संवाद कार्यक्रमात राज्याचे कृषि सचिव मा श्री एकनाथ डवले, पुणे अटारीचे संचालक डॉ लाखन सिंग यांची प्रमुख उपस्थिती होती तर कार्यक्रमाच्‍या अध्‍यक्षस्‍थानी कुलगुरु मा डॉ. अशोक ढवण हे होते. संशोधन संचालक डॉ. दत्तप्रसाद वासकर, शिक्षण संचालक डॉ. धर्मराज गोखले, विस्तार शिक्षण संचालक डॉ. देवराव देवसरकर, औरंगाबाद विभागीय सहसंचालक डॉ डि एल जाधव, लातुर विभागीय सहसंचालक श्री टि एन जगताप, परभणी जिल्हा कृषि अधिक्षक श्री संतोष आळसे, नाहेप प्रकल्पाचे मुख्य डाॅ गोपाल शिंदे यांच्यासह शास्त्रज्ञ, कृषि विभागाचे अधिकारी आणि मराठवाड्यातील शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

कृषि मंत्री मा ना श्री दादाजी भुसे पुढे म्हणाले, लवकरच राज्याचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री हे खरिप हंगामा आढावा बैठक घेणार आहेत. शेतकरी बांधवनाना काही तक्रार असल्यास कृषि विभागाशी थेट संपर्क करा असे आवाहन करून विद्यापीठाच्‍या ऑनलाईन संवाद कार्यक्रमाच्‍या माध्‍यमातुन शेतकऱ्यांशी संवाद साधताना आनंद झाल्‍याचे मत त्यांनी व्‍यक्‍त केले.

या संवादात शेतकरी प्रताप काळे (धानोरा काळे ता.पूर्णा.जि.परभणी), मंगेश देशमुख (पेडगाव ता.जि.परभणी) सोपान शिंदे (पांगरा शिंदे ता.वसमत जि.हिंगोली) रामदास ढाकने (रा.जालना), राधेश्याम अटल (गेवराई,जि.बीड) आदीसह या शेतकऱ्यांनी आपले प्रश्न मांडले. त्यांच्या प्रश्नांना कृषिमंत्री मा ना श्री.दादाजी भुसे यांनी उत्तरे दिली.

अध्यक्षयीय समारोपात कुलगुरु डॉ.अशोक ढवन म्हणाले, मजुरांची टंचाई असल्याने यांत्रिकीकरणावर भर दिली जात आहे. मजुरांचे कष्ट कमी करण्यासाठी विद्यापीठाने यंत्रे विकसीत केली आहेत, तसेच उत्पादन खर्च कमी करण्याचे तंत्रज्ञान भर राहणार आहे. महिलाचं काबाडकष्‍ट कमी करण्‍यासाठी उपयुक्‍त तंत्रज्ञान विद्यापीठाने विकसित केले आहे, त्‍याच्‍या प्रसारावर विद्यापीठाचा भर आहे. प्रक्रिया उद्योग, कृषि मालाचे मुल्यवर्धन यासाठी उपयुक्‍त तंत्रज्ञान विकसित करण्‍यावर विद्यापीठाचा प्रयत्‍न आहे. ऑनलाईन संवादात शेतकरी आपआपल्‍या घरून व बांधावरून विद्यापीठाशी संवाद साधत आहेत. कीतीही अडचणी आल्‍या तरी विद्यापीठ शास्‍त्रज्ञ शेतक-यांपर्यंत पोहचत आहेत, अशी प्रतिक्रीया त्‍यांनी दिली.

ऑनलाईन संवाद कार्यक्रमात संशोधन संचालक डॉ. दत्तप्रसाद वासकर, शिक्षण संचालक डॉ. धर्मराज गोखले, औरंगाबाद विभागीय सहसंचालक डॉ डि एल जाधव, लातुर विभागीय सहसंचालक श्री टि एन जगताप, परभणी जिल्हा कृषि अधिक्षक संतोष आळसे आदींनी आपले मनोगत व्‍यक्‍त केले. तांत्रिक संत्रात विद्यापीठ शास्‍त्रज्ञ डॉ उदय आळसे, प्रा अरविंद पाडागळे यांनी कापुस, सोयाबीन लागवडीवर मार्गदर्शन करून शेतक-यांच्‍या कृषि विषयक प्रश्‍नांना उत्‍तरे दिली. कार्यक्रमाचे प्रास्‍ताविक विस्तार शिक्षण संचालक डॉ. देवराव देवसरकर, सुत्रसंचालक जनसंपर्क अधिकारी डॉ प्रविण कापसे यांनी केले तर आभार मुख्‍य विस्‍तार शिक्षणाधिकारी डॉ प्रशांत देशमुख यांनी मानले.


Thursday, May 14, 2020

वनामकृविच्‍या ४८ व्‍या वर्धापन दिनी ऑनलाईन कृषि संवादाचे आयोजन

ऑनलाईन कृषि संवादात कृषिमंत्री माननीय नामदार श्री दादाजी भुसे हे शेतक-यांना संबोधीत करणार

विद्यापीठ शास्‍त्रज्ञ करणार खरिप पिक लागवडीवर मार्गदर्शन

परभणी येथील वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील विस्‍तार शिक्षण संचालनालयाच्‍या वतीने दिनांक १८ मे रोजी विद्यापीठ वर्धापन दिनानिमित्‍त दरवर्षी खरीप शेतकरी मेळाव्‍याचे आयोजन करून साजरा करण्‍यात येतो. परंतु यावर्षी करोना रोगाचा वाढता प्रादुर्भाव व राज्‍यात लॉकडाऊनच्‍या पार्श्‍वभुमीवर यावर्षीचा खरिप शेतकरी मेळावा रद्द करण्‍यात आला असुन ऑनलाईन कृषि संवाद कार्यक्रमाचे आयोजन सोमवार दिनांक १८ मे रोजी सकाळी ११.०० वाजता करण्‍यात आले आहे. 

ऑनलाईन कृषि संवादात महाराष्‍ट्राचे कृषिमंत्री माननीय नामदार श्री दादाजी भुसे हे विशेष अथिती म्‍हणुन सहभागी होऊन शेतकरी बांधवांना संबोधीत करणार आहेत. कार्यक्रमाच्‍या अध्‍यक्षस्‍थानी कुलगुरू मा डॉ अशोक ढवण राहणार असुन पुणे येथील अटारीचे संचालक डॉ लाखन सिंग कार्यक्रमात प्रमुख सहभाग आहेत. या कार्यक्रमास शिक्षण संचालक डॉ धर्मराज गोखले, संशोधन संचालक डॉ दत्‍तप्रसाद वासकर, विस्‍तार शिक्षण संचालक डॉ देवराव देवसरकर आदींचा सहभाग राहणार आहे. कार्यक्रमाचे आयोजन झुम मि‍टींग सॉफ्टवेअरच्‍या माध्‍यमातुन करण्‍यात येणार असुन शेतकरी बांधवानी झुम मिटींग सॉफ्टवेअर आपल्‍या मोबाईल मध्‍ये डाऊनलोड करून मिटिंग आयडी 382 912 7898 वर पासवर्ड 229000 टाकुन सहभाग नोंदवावा.

सदरिल कार्यक्रमात विद्यापीठ शास्‍त्रज्ञ खरिप हंगामातील कापुस, सोयाबीन, तुर लागवड तंत्रज्ञान व इतर कृषि तंत्रज्ञानावर मार्गदर्शन करणार असुन सहभागी शेतक-यांच्‍या निवडक प्रश्‍नांना उत्‍तर देणार आहेत. तरी सदरिल ऑनलाईन कृषि संवाद कार्यक्रमात शेतकरी बांधवानी सहभागी व्‍हावे, असे आवाहन मुख्‍य विस्‍तार शिक्षण अधिकारी डॉ प्रशांत देशमुख, जिल्‍हा अधिक्षक कृषि अधिकारी श्री संतोष आळसे, नाहेप प्रकल्‍पाचे मुख्‍य शास्‍त्रज्ञ डॉ गोपाल शिंदे यांनी केले आहे. या संपुर्ण कार्यक्रमाचे प्रक्षेपण विद्यापीठाच्‍या युटयुब चॅनेल www.youtube/user/vnmkv वर उपलब्ध होणार आहे.

Meeting ID: 382 912 7898 Password: 229000

वनामकृवितील अधिकारी व कर्मचा-यांच्‍या वतीने मुख्‍यमंत्री सहाय्यता निधीत तेवीस लाख रूपयांची रक्कम जमा


महाराष्‍ट्र राज्‍यातील कोरोना विषाणुच्‍या संसर्गाने उदभवलेल्‍या पार्श्‍वभुमीवर उपाययोजनांसाठी मुख्‍यमंत्री सहाय्यता निधीला परभणी येथील वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील अधिकारी व कर्मचा-यांच्‍या वेतनातुन एक दिवसाचे वेतन देणगी म्‍हणुन तेवीस लाख सत्‍तावीस हजार रूपयाचा धनादेश मा जिल्‍हयाधिकारी श्री दिपक मुगळीकर यांना विद्यापीठ कुलसचिव श्री रणजित पाटील व नियंत्रक श्री एन एस राठोड यांनी दिनांक 14 मे रोजी सुपूर्द केला, यावेळी उपकुलसचिव श्री पी के काळे, सहाय्यक नियंत्रक श्री जी बी उबाळे आदी उपस्थित होते. 

Wednesday, May 13, 2020

वनामकृवि उत्‍पादित तुर, मुग व खरीप ज्‍वारीचे बियाणे जुनच्‍या पहिल्‍या आठवडयात होणार उपलब्‍ध

परभणी येथील वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाचा वर्धापन दिनानिमित्‍त दरवर्षी दिनांक १८ मे रोजी खरीप शेतकरी मेळाव्‍याचे आयोजन करण्‍यात येते. परंतु करोना रोगाचा वाढता प्रादुर्भाव व राज्‍यात लॉकडाऊनच्‍या पार्श्‍वभुमीवर यावर्षीचा खरिप शेतकरी मेळावा रद्द करण्‍यात आला असुन ऑनलाईन कृषि संवाद कार्यक्रम घेण्‍यात येणार आहे. विद्यापीठ उत्‍पादीत तुर, मुग व खरीप ज्‍वारी पिकांच्‍या वाणांचे बियाणे खरीप हंगामात पेरणीसाठी विद्यापीठ कार्यक्षेत्रातील जिल्‍हयात शेतक-यांना उपलब्‍ध करण्‍याचा विद्यापीठाचा प्रयत्‍न आहे. याकरिता मराठवाडयातील विद्यापीठाच्‍या कार्यक्षेत्रातील जिल्‍हयात कार्यरत असलेल्‍या कृषि विज्ञान केंद्रे, संशोधन केंद्रे व कृषि महाविद्यालये यांच्‍या माध्‍यमातुन बियाणे विक्रीस जुन महिण्‍याच्‍या पहिल्‍या आठवडयात उपलब्‍ध करून देण्‍यात येणार आहे.

याकरिता औरंगाबाद येथील कृषि विज्ञान केंद्र, हिंगोली येथील गोळेगाव कृषी महाविद्यालय, नांदेड येथील कापुस संशोधन केंद्र, लातुर येथील गळीत धान्‍य संशोधन केंद्र, जालना जिल्‍हयातील बदनापुर येथील कृषि विज्ञान केंद्र, बी जिल्‍हयातील खामगांव येथील कृषि विज्ञान केंद्र, उस्‍मानाबाद जिल्‍हयातील तुळजापुर येथील कृषि विज्ञान केंद्र तसेच परभणी मुख्‍यालयी बीज प्रक्रीया केंद्रात हे बियाणे विक्रीसाठी उपलब्‍ध होईल, अशी माहिती विद्यापीठातील बीज प्रक्रिया केंद्राच्‍या वतीने देण्‍यात आली आहे.

सदर सत्‍यतादर्शक तथा प्रमाणित बियाणाचे दर पुढील प्रमाणे राहातील

तुर पिकाचे बीडीएन–७११ (पांढरा), बीडीएन-७१६ (लाल), बीएसएमआर-७३६ (लाल) या वाणाचे ६ किलो बॅगची किंमत ७८० रूपये असुन मुगात बीएम-२००३-२ या वाणाचे ६ किलो बॅगची ७८० रूपये आहे तर खरीप ज्‍वारीत परभणी शक्‍ती वाणाची ४ किलो बॅग २४० रूपये किंमतीस उपलब्‍ध होणार आहे, अशी माहिती बीज प्रक्रीया केंद्राच्‍या वतीने देण्‍यात आली आहे. 

Tuesday, May 12, 2020

पेरणीकरिता सोयाबीनचे घरचे बियाणे वापरण्‍यापुर्वी तपासा उगवणक्षमता

तीन पध्‍दतीने क‍रता येईल घरच्‍या घरी तपासणी, वनामकृवि शास्‍त्रज्ञांचा सल्‍ला  

महाराष्ट्र राज्यामध्ये सोयाबीन पिकाखालील सर्वसाधारण क्षेञ ३५ लाख हेक्‍टर असून लागवडीखालील  क्षेञ दिवसेंदिवस वाढआहे. खरीप २०२० मध्ये सोयाबीन पिकाखाली ४० लाख हेक्‍टर क्षेञ अपेक्षित आहे. राज्यात मागील वर्षीच्या आक्टोबर नोव्हेंबर महिन्यामध्ये वादळी अवकाळी पावसामुळे सोयाबीन पिकांचे व बिजोत्पादनाचे मोठया प्रमाणात नुकसान झाले, सोयाबीन बियाणे नाजुक असल्यामुळे उगवणशक्‍ती तपासणीत मोठया प्रमाणात हे बियाणे नापास झाले. उपरोक्त वाढत जाणा-या क्षेञासाठी लागणारी बियाणेची गरज भागविण्यासाठी विविध स्ञोताद्वारे बियाणे उपलब्ध करावे लागणार आहे. अशा परिस्थितीत पेरणीसाठी व सोयाबीनच्या उत्पादन खर्चात बचत करण्यासाठी शेतकरीस्तरावर स्वउत्पादित सोयाबीन बियाण्याच्‍या वापरावर आपणास भर दयावा लागेल. याकरिता शेतकरी बांधवानी स्‍वत: कडील सोयाबीन बियाणाची उगवणक्षमता तपासणी करून वापरा करण्‍याचे आवाहन वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाच्‍या बियाणे विभागाने केले आहे.

सोयाबीन हे स्वपरागसिंचीत पीक असल्याने या पिकाचे बियाणे सरळ वाणांचे आहेत. त्यामुळे दरवर्षी बियाणे बदलाची आवश्‍यकता नाही. मागील दोन वर्षात पेरणी केलेल्या प्रमाणित बियाण्यांपासून उत्पादित होणारे सोयाबीन बियाणे शेतक-यांनी पेरणीसाठी वापरल्यास उत्पादन खर्च कमी होऊ कतो. प्रमाणित बियाण्यांपासून उत्पादित बियाण्यांची चाळणी करुन चांगल्या प्रतीचा बियाण्याची निवड करावी. सोयाबीन बियाणाचे बाह्रयावरण नाजूक व पातळ असल्याने साठवणूक केलेल्या बियाण्यांची हाताळणी काळजी पूर्वक करावी. पोती उंचावरुन आदळली जाणार नाहीत याची काळजी घ्यावी. स्वऊत्पादीत मागील वर्षीचे बियाणे पेरणीसाठी वापरण्याकरीता त्यांची उगवणक्ती तपासणे अत्यंत गरजेचे असते, त्यावरुन चांगल्या उगवण क्षमतेची खाञी पटू कते. उगवणक्षमतेनुसार पेरणी करत बियाण्याचप्रमाण ठरविता येऊ ेल. सदरिल उगवणक्षमता तपासणी शेतकरी बांधव घरच्‍या घरी पुढील तीन पध्‍दतीने करू शकतात.

१) मातीमध्ये उगवणक्षमता तपासणी : या पद्धतीत कुंडी किंवा ट्रे मध्ये / भागापर्यंत माती भरावी. नंतर या मातीच्या थरावर एकासारख्या अंतरावर मोजून बी ठेवावेत व त्यावर एक ते दोन से.मी. जाडीचा मातीचा थर टाकावा. हात फवारणीच्या (हैण्ड स्प्रयेरच्या) सहाय्याने कुंडी किंवा ट्रे वर पाणी शिंपडावे. बियांच्या आकारानुसार मातीमध्ये ओलेपणा ठेवावा. अशा कुंडया किंवा ट्रे आवश्‍यक असणा-या तापमान व आर्द्रता असलेल्या ठिकाणी ठेवल्यानंतर साधारणत: आठ ते दहा दिवसांमध्ये बियाणांची उगवण होऊन त्याची उगवणक्षमता तपासता येते.

२) कुंडीत बियाणे तपासणी : एका कुंडीत चांगली माती भरुन त्यात शंभर बियांचे दाणे उथळ पेरावेत व पाणी देऊन पाच ते सात दिवसात किती रोपे उगवतात याची पाहणी करावी. जर बियाण्याची उगवणक्ती ७० टक्कयाहून जास्त असेल तरच ते बियाणे पेरणीसाठी वापरावेत.

३) वर्तमानपञाचा कागद वापरुन बियाणे तपासणी : वर्तमानपञाचा एक कागद घेऊन त्याला चार घड्या पाडाव्यात त्यामुळे कागदाची जाडी वाढेल. नंतर तो पूर्ण कागद पाण्याने ओला करावा. प्रत्येकी दहा बिया घेऊन त्या एका रांगेत समान अंतर सोडून वर्तमानपञाच्या टोकाच्या भागावर ठेवून त्याची गुंडाळी करावी. अशा रीतीने शंभर बियांच्या दहा गुंडाळया तयार कराव्यात. नंतर या गुंडाळ्या पॉलीथीन पिवीत चार दिवस तशाच ठेवाव्यात. चार दिवसांनंतर त्यामधील बिजांकुर मोजावे.

शेतक-यांनी स्वत:कडील बियाणे वापरण्यापूर्वी त्याची उगवणक्षमता उपरोक्त पध्दतीने घरच्या घरी तपासून जर उगवणक्षमता ७० टक्के पेक्षा कमी असल्यास त्याप्रमाणात अधिकचे बियाणे पेरणीसाठी वापरावे. जर उगवण क्षमता ६५ ते ७० टक्के असेल तर पेरणीसाठी एकरी ३२.५ ते ३०.० किलो बियाणे वापरावे. जर उगवणक्षमता ६० ते ६४ टक्के असेल तर पेरणीसाठी एकरी ३५.० ते ३३.० किलो बियाणे

वापरावे. सोयाबीन बियाणे टोकण पध्दतीने किंवा बीबीएफ प्लॅटरच्या सहाय्याने रुंद वरंबा सरी पध्दत यंञाने पेरणीसाठी प्रति हेक्टरी ५० ते ५५ किलो बियाणे वापरावेत.

जिवाणु संवर्धके व बुरशीनाशकाची बीजप्रक्रिया : रायझोबियम व पीएसबी या जिवाणू संवर्धकाची प्रत्येकी २०० ते २५० ग्रॅम प्रति १० ते १५ किलो बियाण्यास पेरणीपूर्वी तीन तास अगोदर बीजप्रक्रिया करुन बियाणे सावलीत वाळवावे. पेरणीपूर्वी प्रति किलो बियाण्यास ग्रॅम थायरमची बुरशीरोगांपासून संरक्षणासाठी बीजप्रक्रिया करावी. मान्‍सुनचा ७५ ते १०० मिमी पाऊस झाल्यानंतरच सोयाबीनची पेरणी करावी.

अशी माहिती विद्यापीठाच्‍या बियाणे विभागाणे दिली आहे.


Friday, May 8, 2020

शेतकर्‍यांनी आंतर पीक पद्धतीचा अवलंब करावा ........विस्तार शिक्षण संचालक डॉ.डी.बी देवसरकर


ऑडिओ कॉन्फरन्स व्‍दारे वनामकृवि शास्‍त्रज्ञांनी साधला 42 गावातील शेतक-यांशी संवाद
वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ परभणी आणि  रिलायन्स फाऊंडेशन द्वारा आयोजित दिनांक 6 मे रोजी ऑडिओ कॉन्फरन्स व्‍दारे शेतकरी – शास्‍त्रज्ञ संवादाचे आयोजन करण्‍यात आले होते. यात 42 गावामधील 50 शेतकरी बांधवांनी सहभाग नोंदविला. यावेळी विद्यापीठाचे विस्तार शिक्षण संचालक डॉ.डी.बी. देवसरकर आपल्‍या मार्गदर्शनात येणार्‍या खरीप हंगाम मध्ये उत्पन्न वाढीसाठी शेतकरी बांधवांनी आंतर पीक पद्धतीचा वापर करण्‍याचा सल्‍ला दिला. ते म्हणाले की, आंतर पीक लागवड करतांना एकाच कुळातील दोन किंवा त्यापेक्षा जास्त पिके एका क्षेत्रावर घेऊ नयेत, एकाच प्रकाराचे पिकांची मुळांच्‍या प्रकार असणा-या पिकांची निवड आंतरपीक पद्धतीत करू नये. आंतरपीक पद्धतीत लवकर पक्व होणारी व उशिरा पक्व होणारी पिके एकत्रितपणे निवडावी. यामध्ये त्यांनी आंतर पीक पद्धतीचे विविध प्रकार, मिश्र पीक पद्धती, जोड ओळ पद्धत, पट्टा पद्धत आदींची फायदे सांगुन एक पीक पद्धतीपेक्षा जास्त उत्पन्न मिळते, दोनपैकी किमान एका पिकाच्या उत्पन्नाची शाश्वती अधिक असते, तसेच जमिनीचा मगदूर ही टिकून राहण्यास मदत होते असे सांगितले.  संवादात बीज प्रक्रिया व बियाणे निवड, ऊस खत व्यवस्थापन या संदर्भात कृषि तंत्रज्ञान माहिती केंद्राचे व्यवस्थापक तथा कृषि विद्यावेत्ता डॉ. यू. एन. आळसे यांनी माहिती दिली तर गोळेगांव कृषि महाविद्यालय चे सहयोगी प्राध्यापक डॉ.एस.जे. शिंदे यांनी आंबा, पेरु, सिताफळ आदी फळबाग लागवड व हळद लागवड यावर मार्गदर्शन केले. प्रा डी डी पटाईत यांनी कीड - रोग व्यवस्थापनावर माहिती दिली. विद्यापीठ शास्‍त्रज्ञांनी कोविड १९ परिस्थितीत शेतकऱ्यांनी शेतीची कामे करतांतना योग्‍य सामाजिक अंतर जोपासणे अत्‍यंत गरजेच असल्‍याचे सांगितले. कार्यक्रमात शेतकरी बांधवांनी आपल्या घरातच बसून फोनद्वारे फळबाग व्यवस्थापन, खरीप पूर्व नियोजन, जमीन मशागत आदीवर प्रश्न विचारले. कार्यक्रमाचे आयोजन रिलायन्स फाउंडेशन परभणी जिल्हा व्यवस्थापक विलास सवाणे व कार्यक्रम सहाय्यक रामाजी राऊत यांनी केले .