Saturday, March 31, 2018

वनामकृवितील पाणी व्यवस्थापन प्रकल्पाच्‍या वतीने आदिवासी शेतकरी मेळावा संपन्न

आदिवासी शेतक-यांना तुषार व ठिबक सिंचन संचाचे वाटप
वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील अखिल भारतीय समन्‍वयीत सिंचन पाणी व्यवस्थापन प्रकल्पाच्‍या वतीने आदिवासी उपयोजना अंतर्गत दि. ३१ मार्च रोजी आदिवासी शेतकरी मेळाव्‍याचे आयोजन करण्‍यात आले होते. मेळाव्‍याचे उदघाटन कुलगुरू मा. डॉ बी. व्‍यंकटेश्‍वरलु यांच्‍या हस्‍ते झाले तर विद्यापीठ कार्यकारी परिषदेचे सदस्‍य मा डॉ पी. आर. शिवपुजे, संशोधन संचालक डॉ दत्तप्रसाद वासकर, विस्तार शिक्षण संचालक डॉ प्रदीप इंगोले, कुलसचिव डॉ गजेंद्र लोंढे, मुख्यशास्त्रज्ञ डॉ उदय खोडके, प्राचार्या डॉ हेमा सरंबेकर आदींची प्रमुख उपस्थिती होती.
अध्यक्षीय भाषणात कुलगुरु मा. डॉ. बी. व्‍यंकटेश्‍वरलु यांनी सिंचन पाणी व्यवस्थापन प्रकल्पाव्‍दारे राबविण्‍यात येत असलेल्‍या आदिवासी उपयोजनेमुळे आदिवासी शेतक-यांमध्‍ये नवीन कृषि तंत्रज्ञानाबाबत जागृती होत असल्‍याचे मत व्‍यक्‍त करून प्रकल्पातील शास्त्रज्ञ व कर्मचारी यांचे अभिनंदन केले. तसेच आदिवासी शेतकऱ्यांसाठी विद्यापीठाव्‍दारे तांत्रिक कार्यशाळाचे आयो‍जन करण्‍याच्‍या सुचना त्‍यांनी दिल्‍या.
मा. डॉ पी आर शिवपूजे आपल्‍या भाषणात म्‍हणाले की, आदिवासी शेतक-यांनी केवळ शेती उत्पादन वाढवून न थांबता मूल्यवर्धन व प्रक्रिया उद्योग सुरु करावीत तसेच शेतीस पशुपालन व दुध उत्पादानाची जोड देण्‍याचा सल्‍ला त्‍यांनी दिला. संशोधन संचालक डॉ दत्‍तप्रसाद वासकर यांनी वाई या गावात सन २०१५ पासून विद्यापीठाने राबविलेल्या विविध योजानांची माहिती देऊन मौजे जावरला येथील शेतकऱ्यांना यापुढेही विद्यापीठाकडून तांत्रिक पाठिंबा राहील असे आश्वासन दिले.
जावरला येथील सरपंच भूपेंद्र आडे व वाई येथील शेतकरी श्री दुधाळकर यांनी आपल्या मनोगतात विद्यापीठ आदिवासी गावात राबवित असलेल्‍या उपक्रमाबाबत आभार व्‍यक्‍त करून यापुढेहि विद्यापीठ शास्‍त्रज्ञांनी तांत्रिक साहाय्य करण्‍याची विनंती केली. कार्यक्रमात मान्यवरांचे हस्ते नांदेड जिल्‍हातील किनवट तालुक्‍यातील मौजे जावरला येथील अकरा आदिवासी शेतकऱ्यांना तुषार सिंचन संच तर हिंगोली जिल्‍हातील कळमनुरी तालुक्‍यातील मौजे वाई येथील अकरा आदिवासी शेतकऱ्यांना ठिबक सिंचन संच वाटप करण्यात आले.
प्रास्ताविकात मुख्य शास्त्रज्ञ डॉ उदय खोडके यांनी आदिवासी उपयोजना उपक्रमांची माहिती दिली तर सुत्रसंचालन प्रा. गजानन गडदे यांनी केले. तांत्रिक सत्रात शेतकऱ्यांना ठिबक व तुषार सिंचन पद्धती वापर व काळजी याबाबत विद्यापीठ शास्‍त्रज्ञांनी मार्गदर्शन केले तसेच प्रक्षेत्रावरील प्रात्यक्षिक दाखविण्यात आले. कार्यक्रमास आदिवासी शेतक-यांसह विद्यापीठातील अधिकारी व कर्मचारी मोठ्या संखेने उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वीतेसाठी नंदकिशोर गिराम, प्रभाकर सावंत, अंजली इंगळे, रत्नाकर पाटील, दादाराव भरोसे, देवेंद्र कुरा, प्रकाश मोते, संजय देशमुख आदींनी परिश्रम घेतले.Friday, March 30, 2018

बौध्दिक स्‍वामित्‍व कायद्याव्‍दारे स्‍वत: पैदासकार शेतकरी पिकांच्‍या वाणाची रॉयल्‍टी मिळवु शकतात....बौध्दिक संपदा सल्‍लागार श्रीमती पल्‍लवी कदम


वनामकृवितील परभणी कृषि महाविद्यालयाचा रोजगार मार्गदर्शन व समुपदेशन कक्ष व स्‍पर्धा मंच यांच्‍या संयुक्‍त विद्यमाने आयोजित व्‍याख्‍यानात प्रतिपादन
वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील परभणी कृषि महाविद्यालयाचा रोजगार मार्गदर्शन व समुपदेशन कक्ष व वनामकृवि विद्यार्थ्‍यी स्‍पर्धामंच यांच्‍या संयुक्‍त विद्यमाने दिनांक 27 मार्च रोजी पिकांच्‍या वाणांचे पेटंट व शेतक-यांचे हक्‍क संरक्षण याविषयावर पुणे येथील बौध्दिक संपदा सल्‍लागार श्रीमती पल्‍लवी कदम यांच्‍या व्‍याख्‍यानाचे आयोजन करण्‍यात आले होते. कार्यक्रमाच्‍या अध्‍यक्षस्‍थानी कुलगुरू मा. डॉ. बी. व्‍यंकटेश्‍वरलु हे होते तर शिक्षण संचालक डॉ विलास पाटील, प्राचार्य डॉ डि एन गोखले आदींची व्‍यासपीठावर प्रमुख उपस्थिती होती.
मार्गदर्शनात श्रीमती पल्‍लवी कदम म्‍हणाल्‍या की, शेतक-यांचा वाण म्‍हणजे जो शेतक-यांचे पुर्वापार पध्‍दतीने लागवड करून शोधला आहे किंवा शेतक-यांच्‍या शेतावर ज्‍याचा शोध लागतो, अशा पिकांच्‍या वाणाची नोंदणी बौध्दिक स्‍वामित्‍व कायद्याव्‍दारे स्‍वत: पैदासकार शेतकरी करून रॉयल्‍टी मिळवु शकतो. अध्‍यक्षीय भाषणात कुलगुरू मा. डॉ बी. व्‍यंकटेश्‍वरलु म्‍हणाले की, कृषिच्‍या विद्यार्थ्‍यांनी बौध्‍दीक स्‍वामित्‍व कायद्याचा अभ्‍यास करावा, या क्षेत्रात सल्‍लागार म्‍हणुन निश्चितच कॅरियर करू शकतील.
प्रास्‍ताविक प्रा. आर व्‍ही चव्‍हाण यांनी तर सुत्रसंचालन प्रा. पी के वाघमारे यांनी केले, आभार डॉ पी आर झंवर यांनी मानले. कार्यक्रम यशस्‍वीतेसाठी स्‍पर्धामंचाच्‍या सदस्‍यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमास विद्यापीठातील प्राध्‍यापक, कर्मचारी व पदव्‍युत्‍तर विद्यार्थ्‍यी मोठया संख्‍येने उपस्थित होते.

Wednesday, March 28, 2018

विद्यार्थ्यांनी स्वत:तील कमतरता ओळखुन त्यावर मात करण्यासाठी प्रयत्न करावेत.....नांदेड परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक मा. श्री. चिरंजीव प्रसाद

वनामकृवितील मध्‍यवर्ती रोजगार मार्गदर्शन व समुपदेशन कक्षाच्‍या वतीने आयोजित व्‍याख्‍यानात प्रतिपादन 

स्‍पर्धा परिक्षेची तयारी करतांना, मनात दृढ निश्चिय असला पाहिजे. विद्यार्थ्‍यांना स्‍वत: तील सामर्थ्‍य व कमतरतेची जाणीव असली पाहिजे. स्‍वत:तील कमतरता ओळखुन त्‍यावर मात करण्‍यासाठी जाणीवपुर्वक प्रयत्‍न करावेत, असे प्रतिपादन नांदेड परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक मा. श्री. चिरंजीव प्रसाद यांनी केले. वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील मध्‍यवर्ती रोजगार मार्गदर्शन व समुपदेशन कक्षाच्‍या वतीने दिनांक 28 मार्च रोजी स्‍पर्धा परिक्षा व व्‍यक्‍तीमत्‍व विकास याविषयावर आयोजित व्‍याख्‍यानाप्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाच्‍या अध्‍यक्षस्‍थानी कुलगुरू मा. डॉ. बी. व्‍यंकटेश्‍वरलु हे होते तर परभणी जिल्‍हा पोलिस अधिक्षक डॉ दिलीप झळके, शिक्षण संचालक डॉ विलास पाटील, सहाय्यक पोलिस अधिक्षक श्री संदिप घुगे, कुलसचिव डॉ गजेंद्र लोंढे, प्राचार्य डॉ डि एन गोखले, कक्षाचे सहअध्‍यक्ष डॉ एच व्‍ही काळपांडे, विद्यार्थ्‍यी कल्‍याण अधिकारी डॉ महेश देशमुख आदींची व्‍यासपीठावर प्रमुख उपस्थिती होती.
मार्गदर्शनात मा. श्री. चिरंजीव प्रसाद पुढे म्‍हणाले की, उपलब्‍ध संसाधनांचा योग्‍य वापर व दुरदृष्‍टी ही दोन गुण असलेली व्‍यक्‍ती चांगले नेतृत्‍व करू शकत. डॉ. ए पी जी अब्‍दुल कलाम, डॉ. स्वामीनाथन, डॉ वर्गीस कुरियन आदी शास्‍त्रज्ञामध्‍ये नेतृत्‍व गुण होती, या महान व्‍यक्‍तींच्‍या कार्यांनी व विचारांनी समाजातील अनेक व्‍यक्‍तींचे जीवन प्रभावीत झाले. विद्यार्थ्‍यांनी जाणीवपुवर्क स्‍वत:तील संवाद कौशल्‍य व लिखाण कौशल्‍य विकसित करण्‍याचा सल्‍लाही त्‍यांनी दिला.   
तुळजापुर येथील सहाय्यक पोलिस अधिक्षक श्री संदिप घुगे आपल्‍या मार्गदर्शनांत म्‍हणाले की, स्‍पर्धा परिक्षेची तयारी करतांना वेळेचे नियोजन करणे गरजेचे असुन आपली दिनचर्या निश्चित केली पाहिजे, वायफळ बाबींवर वेळ खर्च करू नये. महाविद्यालयीन जीवनात कोणत्‍याही कायद्याच्‍या कचाटयात अडकु नये, याची दक्षता विद्यार्थ्‍यांनी घेण्‍याचा सल्‍ला त्‍यांनी दिला.  
कार्यक्रमात विद्यार्थ्‍यी विचारलेल्‍या स्‍पर्धेपरिक्षेबाबतच्‍या अनेक शंका व प्रश्‍नांना मान्‍यवरांनी उत्‍तरे देऊन समाधान केले. विद्यापीठातील राष्‍ट्रीय छात्रसेनेतील छात्रसैनिक राहिलेले व आज उच्‍चपदावर पोलिस अधिकारी म्‍हणुन कार्यरत असलेले पंडित रेजितवाड, देविदास मुपडे, रामदास निर्दोडे, शशिकांत शेळके, अण्‍णासाहेब पवार आदींचा मान्‍यवरांच्‍या हस्‍ते सत्‍कार करण्‍यात आला.
प्रास्‍ताविक शिक्षण संचालक डॉ विलास पाटील यांनी केले. सुत्रसंचालन डॉ जयकुमार देशमुख यांनी केले तर आभार डॉ पपिता गौरखेडे यांनी मानले. कार्यक्रम यशस्‍वीतेसाठी प्रा एस व्‍ही कल्‍याणकर, डॉ मीना वानखडे, कैलास भाकड, सतिश सुरासे, विजय रेड्डी, सिताराम पवार, अजित पाटील, पुजा मकासरे, मानकर आदींनी परिश्रम घेतले. कार्यक्रमास विद्यापीठातील प्राध्‍यापक, कर्मचारी व विद्यार्थ्‍यी मोठया संख्‍येने उपस्थित होते.


Monday, March 26, 2018

वनामकृवि अंतर्गत असलेल्‍या औरंगाबाद येथील बाजरी संशोधन प्रकल्‍प सर्वोकृष्‍ट संशोधन केंद्र

अखिल भारतीय समन्‍वयीत बाजरी संशोधन प्रकल्‍पाच्‍या 53 व्‍या वार्षिक गट बैठकीचे जोधपुर (राजस्‍थान) येथील कृषि विद्यापीठात दिनांक 22 ते 24 मार्च दरम्‍यान आयोजन करण्‍यात आले होते. सदरिल बैठकीत वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठांतर्गत असलेल्‍या औरंगाबाद येथील राष्‍ट्रीय कृषि संशोधन प्रकल्‍पाच्‍या अखिल भारतीय सन्‍मवयीत बाजरी संशोधन प्रकल्‍पास सन 2017-18 साठी उल्‍लेखनीय संशोधन कार्यासाठी सर्वोकृष्‍ट संशोधन केंद्र म्‍हणुन सन्‍मानित करण्‍यात आले. जोधपुर कृषि विद्यापीठाचे कुलगुरू मा. डॉ बलराज सिंग हस्‍ते प्रमाणपत्र व मानचिन्‍ह विद्यापीठ शास्‍त्रज्ञांना प्रदान करण्‍यात आले. यावेळी आयसीएआरचे सहाय्यक महासंचालक डॉ आय एस सोलंकी, प्रकल्‍प सन्‍मवयक डॉ सी तारा सत्‍यवती आदींची प्रमुख उपस्थिती होती.
वनामकृविच्‍या औरंगाबाद येथील बाजरी संशोधन प्रकल्‍प केंद्रानी लोहयुक्‍त एएचबी-1200 व एएचबी-1269 ही दोन वाण विकसित केलेली असुन या वाणांची राष्‍ट्रीय पातळीवर लागवडीसाठी शिफारस करण्‍यात आलेली आहे तसेच हैद्राबाद येथील आंतरराष्‍ट्रीय संस्‍था इक्रीसॅट सोबतच्‍या उत्‍कृष्‍ट सन्‍मवयीत संशोधन कार्य, कृषिविद्या व पिक विकृतीशास्‍त्रातील शिफारसी आदी संशोधन कार्याच्‍या योगदानामुळे केंद्रास सन्‍माननित करण्‍यात आले आहे. कुलगुरू मा. डॉ बी व्‍यंकटेश्‍वरलु व संशोधन संचालक डॉ दत्‍तप्रसाद वासकर यांच्‍या मार्गदर्शनाखाली सदरिल बाजरी संशोधन केंद्रातील कार्यरत शास्‍त्रज्ञ सहयोगी संशोधन संचालक डॉ एस बी पवार, वरिष्‍ठ पैदासकार डॉ एन वाय सातपुते, डॉ जी पी जगताप, डॉ डि एम लोमटे, डॉ आर सी सावंत, डॉ एस एस घुगे, प्रा. एस बी कदम, डॉ एस आर जक्‍कावाड, डॉ एन आर पतंगे, एस एल माने, बी एन लघाने आदीचे संशोधनात मोलाचे योगदान आहे.

Saturday, March 24, 2018

कृषी पद्व्‍युत्‍तर अभ्‍यासक्रमाच्‍या सामाईक परीक्षा सुरळीत प्रारंभ

पुणे येथील महाराष्ट्र कृषी विद्यापीठ परीक्षा मंडळा तर्फे महाराष्‍ट्र राज्‍यातील चारही कृषि विद्यापीठातील पदव्‍युत्‍तर अभ्‍यासक्रमांत प्रवेशासाठी सामाईक प्रवेश परीक्षा (सीईटी) घेण्‍यात येते. शैक्षणिक वर्ष 2018-19 साठीच्‍या प्रवेशासाठी सदरिल परीक्षेचे आयोजन दिनांक 23 ते 25 मार्चच्‍या दरम्‍यान असुन सदरिल परीक्षांची सुरूवात दिनांक 23 मार्च झाली. या परिक्षेची परिक्षा केंद्रे मराठवाडयात परभणी, बदनापुर, अंबेजोगाई, लातुर या ठिकाणी असलेल्‍या कृषि महाविद्यालयात करण्‍यात आली आहे. दिनांक 25 मार्च रोजी परभणी येथील परिक्षा केंद्रावर एकुण 1532 परिक्षार्थी परिक्षा देणार असुन त्‍यांची आसनव्‍यवस्‍था कृषि महाविद्यालय (परीक्षा आसन क्र. 04010001 ते 0401108), अन्‍नतंत्रज्ञान महाविद्यालय (परीक्षा आसन क्र. 04011009 ते 04011248) व कृषि अभियांत्रिकी महाविद्यालयात (परीक्षा आसन क्र. 04011249 ते 04011447) करण्‍यात आली आहे, असे विद्यापीठ परीक्षा विभागाच्‍या वतीने कळविण्‍यात आले आहे.   
सदरिल परीक्षा महात्‍मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी, डॉ पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला, वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी व डॉ बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोली या चारही कृषी विद्यापीठांतर्गत असलेल्‍या कृषी, उद्यानविद्या, वनशास्‍त्र, सामाजिक विज्ञान, कृषि अभियांत्रिकी, अन्‍नतंत्र, जैवतंत्रज्ञान, मत्‍स्‍यविज्ञान, पशुसंवर्धन व कृषि व्‍यवसाय व्‍यवस्‍थापन याविषयातील पदव्‍युत्‍तर अभ्‍यासक्रमासाठी राबविण्‍यात येत आहेत.

Thursday, March 22, 2018

माळसोन्ना येथे सामाजिक विज्ञान महाविद्यालयाचे रासेयो विशेष शिबिर संपन्‍न


वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापिठातील सामाजिक विज्ञान महाविद्यालयाच्या वतीने माळसोन्ना (ता. जि. परभणी) येथे राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रमांतर्गत विशेष शिबिराचे आयोजन करण्‍यात आले होते. दिनांक 19 मार्च रोजी शिबिराचे उद्घाटन प्रसंगी विस्‍तार शिक्षण संचालक डॉ. पी. जी. इंगोले यांच्‍या हस्‍ते झाले. यावेळी सहयोगी अधिष्ठाता व प्राचार्य डॉ. हेमांगिनी सरंबेकर, सरपंच सौ. लक्ष्मीबाई पूर्णे, प्रा पी एस चव्हाण, रासेयो कार्यक्रमाधिकारी डॉ. अनुराधा लाड आदींची प्रमुख उपस्थिती होती. मार्गदर्शन करतांना डॉ. पी. जी. इंगोले यांनी विद्यापीठ प्रकाशित शेतीभाती मासिकाची शेतक-यांसाठी उपयुक्तता सांगितली तर रासेयोच्‍या स्वयंसेवकांनी पथनाट्याच्‍या माध्‍यमातुन समाज प्रबोधन करण्‍याचा सल्‍ला त्‍यांनी दिला. डॉ. हेमांगिनी सरंबेकर यांनी राष्ट्रीय सेवा योजना व स्वयंसेवकांची भूमिका याबद्दल मार्गदर्शन केले. शिबिरात महिला, युवक व बालकांचा विकास व कल्याण हा उद्देश ठेऊन विविध उपक्रम राबविण्‍यात आले. शिबिरात डॉ. जया बंगाळे यांनी बालविकासात पालकांची भूमिकायावर मार्गदर्शन केले तर डॉ. जया रोडगे यांनी कृत्रिम दागिने बनविण्याचे प्रात्यक्षिके दाखविली. तसेच डॉ. सुनिता काळे यांनी वस्त्र कलेतून उद्योजकताया विषयावर मार्गदर्शन केले तर डॉ. फरझाना फारुखी यांनी टोमॅटो सॉस व चिंचेचे लोणचे तयार करण्‍याचे प्रात्यक्षिके सादर केली. सदर शिबिरातील मार्गदर्शन उपयुक्त असल्याचे मनोगत ग्रामस्थांनी व्यक्त केले. शिबिर यशस्वितेसाठी रासेयो स्वयंसेवकांनी व ग्रामस्थांनी परिश्रम घेतले.

कृषि विज्ञान केंद्रे जिल्‍हास्‍तरावरील कृषि ज्ञानाचे मुख्‍य केंद्रस्‍थान.....कुलगुरू मा. डॉ. बी. व्‍यंकटेश्‍वरलु

वनामकृवित अंतर्गत असलेल्‍या मराठवाडयातील कृषि विज्ञान केंद्राची वार्षिक कृति आराखडा कार्यशाळा संपन्‍न
देशात साधारणत: 590 पेक्षा जास्‍त कृषि विज्ञान केंद्रे असुन जिल्‍हास्‍तरावर ही केंद्रे कृषि ज्ञानाचे मुख्‍य केंद्रस्‍थान आहेत, यामुळे केंद्रातील विषय विशेषज्ञावर कृषि तंत्रज्ञान विस्‍ताराची मोठी तांत्रिक जबाबदारी आहे, असे प्रतिपादन कुलगुरू मा. डॉ. बी. व्‍यंकटेश्‍वरलु यांनी केले. वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठांतर्गत असलेल्‍या मराठवाडयातील अकरा कृषि विज्ञान केंद्राच्‍या दिनांक २२ मार्च रोजी आयोजित वार्षिक कृषि आराखडा कार्यशाळेच्‍या उदघाटन प्रसंगी ते बोलत होते. व्‍यासपीठावर पुणे येथील अटारीचे संचालक डॉ लखन सिंग, विस्‍तार शिक्षण संचालक डॉ प्रदिप इंगोले, मुख्‍य विस्‍तार शिक्षण अधिकारी डॉ प्रशांत देशमुख आदींची प्रमुख उपस्थिती होती.
कुलगुरू मा. डॉ बी व्‍यंकटेश्‍वरलु पुढे म्‍हणाले की, कृषि विज्ञान केंद्राच्‍या कृति आराखडाचे नियोजन काळजीपुर्वक करून आराखडयाची प्रभावी व कार्यक्षमरित्‍या अंमलबजावणी करावी. विद्यापीठ विकसित विविध पिकांची वाण व कृषि तंत्रज्ञान प्रसारावर भर द्यावा. येणा-या हंगामात कापसावरील शेंदरी बोंडअळीचा प्रार्दुभाव होऊ नये म्‍हणुन शेतकरी, कृषि विभाग, कापुस व्‍यापारी व कापुस प्रक्रीयादार आदीच्‍या सहकार्याने कार्य करण्‍याचा सल्‍लाही त्‍यांनी दिला.
पुणे अटारीचे संचालक डॉ लखण सिंग आपल्‍या मार्गदर्शनात म्‍हणाले की, प्रत्‍येक कृषि विज्ञान केंद्रानी आपआपल्‍या भागातील कृषि परिस्थितीकेचा अभ्‍यास करून अनूकुल नवीनतम कृषि तंत्रज्ञानाचा समावेश शेतक-यांच्‍या शेतावर घेण्‍यात येणा-या प्रात्‍याक्षिकांत करावा व त्‍या तंत्रज्ञानाचे परिणाम विश्‍लेषण करावे.
कार्यक्रमाचे प्रास्‍ताविक विस्‍तार शिक्षण संचालक डॉ प्रदिप इंगोले यांनी केले तर सुत्रसंचालन डॉ प्रशांत देशमुख यांनी केले. कार्यशाळेत विद्यापीठातील कृषि शास्‍त्रज्ञ व विभाग प्रमुख यांनी मार्गदर्शन केले तसेच कार्यशाळेत मराठवाडयातील एकरा कृषि विज्ञान केंद्राचे कार्यक्रम सन्मवयक व विषय विशेषज्ञांनानी सहभाग नोंदविला व वार्षिक कृति आराखडा निश्चित करण्‍यात आला.

Tuesday, March 20, 2018

वनामकृवित अखिल भारतीय उच्‍च शिक्षण सर्वेक्षण कार्यक्रमांतर्गत एक दिवसीय कार्यशाळा संपन्‍न

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठात मानव संसाधन विकास मंत्रालयाच्‍या वतीने राबविण्‍यात येत असलेले अखिल भारतीय उच्‍च शिक्षण सर्वेक्षण कार्यक्रमांतर्गत एक दिवसीय कार्यशाळेचे आयोजन दिनांक 19 मार्च रोजी करण्‍यात आले होते. कार्यशाळेचे उदघाटन कुलगुरू मा. डॉ. बी. व्‍यंकटेश्‍वरलु यांच्‍या हस्‍ते करण्‍यात आले, यावेळी शिक्षण संचालक डॉ विलास पाटील, प्रभारी प्राचार्य डॉ जी एम वाघमारे, विभाग प्रमुख डॉ के व्‍ही देशमुख, प्रा. हेमंत पाटील, प्रशिक्षक सागर बांदर, परसप्‍पा माशाळ, विद्यापीठ समन्‍वयक अधिकारी प्रा. आर व्‍ही चव्‍हाण आदींची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी मार्गदर्शन करतांना कुलगुरू मा. डॉ. बी व्‍यंकटेश्‍वरलु म्‍हणाले की, राष्‍ट्रीय पातळीवर उच्‍च शिक्षणाबाबत धोरणात्‍मक निर्णय घेतांना प्रत्‍यक्ष देशातील उच्‍च शिक्षणाबाबत सांख्यिकिय आडकेवारी अत्‍यंत महत्‍वाची भुमिका बजावते, त्‍याकरिता प्रत्‍येक उच्‍च शिक्षण देणा-या संस्‍थांनी  सदरिल आकडेवारी तत्‍परतेने अद्यावत करणे आवश्‍यक आहे.
शिक्षण संचालक डॉ विलास पाटील यांनीही मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे प्रास्‍ताविक विभाग प्रमुख डॉ के व्‍ही देशमुख यांनी केले. सुत्रसंचालन डॉ सचिन मोरे यांनी केले तर आभार विद्यापीठ समन्‍वयक अधिकारी प्रा. आर व्‍ही चव्‍हाण यांनी मानले. कार्यक्रमास मराठवाडयातील विद्यापीठ अंतर्गत विविध घटक व संलग्‍न महाविद्यालयाचे एकुण 38 प्रतिनिधी उपस्थित होते. कार्यशाळा यशस्‍वीतेसाठी प्रा. विजय जाधव, प्रा आर एफ ठोंबरे, एम जी कठाळे आदीसह कृषि अर्थशास्‍त्र विभागातील अधिकारी व कर्मचारी परिश्रम घेतले.

Saturday, March 17, 2018

वेबकास्टींग व्दारे माननीय पंतप्रधानांनी देशातील शेतकरी व कृषि शास्त्रज्ञांना केले संबोधित

वनामकृवि अंतर्गत जालना जिल्‍हातील बदनापुर येथे नवीन कृषि विज्ञान केंद्राचे पंतप्रधानाच्‍या हस्‍ते उदघाटन
नवी दिल्‍ली येथे आयोजित कृषि उन्‍नती मेळावा 2018 निमित्‍त देशाचे माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी दिनांक 17 मार्च रोजी वेबकास्‍टींग व्‍दारे देशातील शेतकरी व कृषि शास्त्रज्ञाना संबोधित केले. सदरिल कार्यक्रमाच्‍या थेट प्रक्षेपणाचे आयोजन वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील विस्‍तार शिक्षण संचालनालय व परभणी येथील कृषि विज्ञान केंद्र यांच्‍या संयुक्‍त विद्यमाने कृषि महाविद्यालयाच्‍या सभागृहात करण्‍यात आले होते. यावेळी कुलगुरू मा. डॉ. बी. व्‍यंकटेश्‍वरलु, शिक्षण संचालक डॉ विलास पाटील, प्राचार्य डॉ जी एम वाघमारे, मुख्‍य विस्‍तार शिक्षणाधिकारी डॉ पी आर देशमुख, अतिक व्‍यवस्‍थापक डॉ यु एन आळसे आदींची प्रमुख उपस्थिती होती.
माननीय पंतप्रधान आपल्‍या भाषणात म्‍हणाले की, 2022 पर्यंत शेतक-यांचे उत्‍पन्‍न दुप्‍पट करण्‍याच्‍या दृष्‍टीने सरकारने अनेक योजना कार्यान्‍वीत केल्‍या आहेत. नवीन कृषि तंत्रज्ञानाचा अवलंब करून अनेक राज्‍यातील शेतकरी दुध, दाळ, गहु आदीं शेतमालाचे विक्रमी उत्‍पादन घेत आहेत. कृषि उन्‍नती मेळाच्‍या माध्‍यमातुन देशातील दोन महत्‍वाच्‍या घटकांशी बोलण्‍याची संधी प्राप्‍त झाली असुन एक शेतकरी जो आपल्‍यासाठी भोजनाची सोय करतो व दुसरा कृषि शास्‍त्रज्ञ जे नवनवीन कृषि तंत्रज्ञानाची निर्मिती करतात, असे मत त्‍यांनी यावेळी व्‍यक्‍त केले.
कार्यक्रमात देशातील 25 नवीन कृषि विज्ञान केंद्राचे उदघाटन माननीय पंतप्रधान यांच्‍या हस्‍ते झाले, यात वनामकृवि अंतर्गत बदनापुर (जिल्‍हा जालना) येथील कृषि विज्ञान केंद्राचाही समावेश आहे. सदरिल आयोजित वेबकास्‍टींग कार्यक्रमास शेतकरी, विद्यापीठातील शास्‍त्रज्ञ कर्मचारी, विद्यार्थ्‍यी मोठया संख्‍येने उपस्थित होते. कार्यक्रम यशस्‍वीतेसाठी अरूणा खरवडे, अनिल तुपे, डॉ एस जी पुरी, डॉ एन एम तांबोळी आदींनी परिश्रम घेतले.

Friday, March 16, 2018

मौजे खटिंग सायाळा येथे वनामकृवि अंतर्गत असलेल्‍या महाविद्यालयाच्‍या रासेयो स्‍वयंसेवकांनी राबविले विविध सामाजिक उपक्रम

स्‍वयंसेवकांनी बांधला गेबीयन बंधारा व 70 स्‍वयंसेवकांनी केले रक्‍तदान 

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठांतर्गत असलेल्‍या कृषि महाविद्यालय, कृषि अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालय तसेच उद्यानविद्या महाविद्यालय यांच्‍या संयुक्त विद्यमाने राष्‍ट्रीय सेवा योजनाचे विशेष शिबीराचे आयोजन मौजे खटिंग सायाळा येथे करण्‍यात आले होते. सदरिल शिबीरात स्‍वयंसेवकांनी विविध सामाजिक उपक्रम राबविले. श्रमदानाच्‍या माध्‍यमातुन गेबीयन बंधारा बाधला तसेच ग्रामस्‍वच्‍छता, व्‍यक्‍तीमत्‍व विकास, उमेद कार्यक्रम, कृषि तंत्रज्ञान प्रसार मोहिम, स्‍वच्‍छता फेरी, शेतकरी चर्चासत्र, अंधश्रध्‍दा निर्मुलन, योग प्रशिक्षण, एडस जनजागरण, आरोग्‍य तपासणी आदी सामाजिक उपक्रमाचे आयोजन करण्‍यात आले होते. वाचवा पाणी, वाचवा शेतकरी याविषयावर कृषि महाविद्यालयातील स्‍वयंसेव‍क लक्ष्‍मण कदम, उन्‍नती निकम, विद्या ढेपे, कृष्‍णा हरकळ, गोपाल जंगले, शामबाला माने आदीनी पथनाटय सादर केले. डॉ कनकदंडे यांनी रक्‍तदानाचे महत्‍व विशद करून रक्‍तदान शि‍बीराची सुरूवात केली. रक्‍तदान शिबीरात 70 स्‍वयंसेवक व स्‍वयंसेविकांनी रक्‍तदान केले. दिनांक 14 मार्च रोजी विस्‍तार शिक्षण संचालक डॉ प्रदिप इंगोले यांनी स्‍वयंसेवकांना शेतक-यांसाठी कार्य करण्‍याचा सल्‍ला दिला. सदरिल शिबीराचा समारोप दिनांक 15 मार्च रोजी झाला. यावेळी व्‍यासपीठावर प्रसिध्‍द कवी प्रा अरूण पवार, प्रा. राजेंद्र गहाळ, डॉ. कनकदंडे, डॉ शिरूरे, सरपंचा वच्‍छलाबाई काळे, उपसरपंच लक्ष्‍मणराव खटिंग, प्रा. आर व्‍ही चव्‍हाण आदींची प्रमुख उपस्थिती होती. प्रसिध्‍द कवी प्रा अरूण पवार यांनी अफु नावाची कविता सादर करून शेतक-यांच्‍या समस्‍या मांडल्‍या तसेच स्‍त्रीवरील अत्‍याचाराचे चित्र आपल्‍या कवितेच्‍या माध्‍यमातुन सादर करून उपस्थितांना मंत्रमुग्‍ध केले.
अध्‍यक्षीय समारोप प्रा. आर व्‍ही चव्‍हाण यांनी केला तर प्रास्‍ताविक डॉ जयकुमार देशमुख यांनी केले. सुत्रसंचालन विनोद ओसावार यांनी केले तर आभार रंगोली पडघण हिने केले. कार्यक्रम यशस्‍वीतेसाठी रासेयो कार्यक्रमाधिकारी प्रा. विजयकुमार जाधव, डॉ जयकुमार देशमुख, प्रा. एस पी सोळंके, डॉ पपिता गोरखेडे, डॉ संजय पवार आदींसह रासेयोचे स्‍वयंसेवक स्‍नेहल इंगले, स्‍वप्‍ना शिंदे, सुमीत माने, तेजस्विनी भदरे, रोहणी पालेकर, प्रतिक्षा गुंडरे, कृष्‍णा, उफाड व गावकरी यांनी परिश्रम घेतले. 

Wednesday, March 14, 2018

वनामकृवितील विस्‍तार शिक्षण विभागाच्‍या वतीने शेतकरी आत्महत्याच्या बाबींची मिमांसा प्रकल्पातंर्गत पाथरी व सेलु येथे कार्यशाळा संपन्न

वसंतराव नार्इक मराठवाडा कृषि विद्यापीठातील विस्‍तार शिक्षण विभाग आणि राष्‍ट्रीय कृषि विज्ञान निधी यांच्‍या संयुक्‍त विद्यमाने राबविण्‍यात येत असलेला 'शेतकरी कुटुबांच्‍या सामर्थ्‍य निर्मितीतुन शेतकरी आत्‍महत्‍याच्‍या बाबींची मिमांसाया प्रकल्‍पांतर्गत स्‍वयंसेवकांसाठी दिनांक 8 व 9 मार्च रोजी पाथरी व सेलु येथील कृषि महावि़द्यालयात एक दिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्‍यात आले होते.

यावेळी विस्‍तार शिक्षणाचे विभाग प्रमुख डॉ. आर. डी. अहिरे, प्राचार्य डॉ एस जी जोंधळे, डॉ. पी. एस. कापसे, डॉ कुत्‍ताबादकर, आर बी लोंढे, प्रा निरज चव्‍हाण आदींची प्रमुख उपस्थिती होती. कार्यशाळेत डॉ. आर. डी. आहिरे यांनी शेतकरी आत्‍महत्‍या मागील कारणे या विषयावर विद्यार्थ्‍यांना मार्गदर्शन करून कृषिच्‍या विद्यार्थ्‍यांनी तणावग्रस्‍त शेतकरी बांधवांशी संवाद साधुन त्‍यांना मानसिक आधार देण्‍याचा सल्‍ला दिला. सदरिल प्रकल्‍प प्राचार्य डॉ. डी. एन. गोखले यांच्‍या मार्गदर्शनाखाली राबविण्‍यात येत आहे. या प्रकल्‍पाच्‍या माध्‍यमातुन ग्रामीण भागातील महाविद्यालयीन युवकांच्‍या सामर्थ्‍य निर्मितीवर भर देण्‍यात येत असुन तणावग्रस्‍त शेतक-यांचा संशोधनात्‍मक अभ्‍यास करण्‍यात येत आहे. यासाठी महाविद्यालयीन विद्यार्थ्‍यांतुन स्‍वयंसेवकाची निवड करून त्‍यांना प्रशिक्षीत करण्‍यात येत आहे. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन डॉ. पी. एस. कापसे यांनी तर आभार आर बी लोंढे यांनी मानले. या कार्यशाळेत पाथरी येथील 150 तसेच सेलु येथील 120 कृषि पदवीच्‍या विद्यार्थ्‍यीनी सहभाग नोंदविला होता.

Tuesday, March 13, 2018

राष्‍ट्रीय सेवा योजनेच्‍या उपक्रमातुन सामाजिक बांधिलकीची जाण महाविद्यालयीन युवकांना होते....शिक्षण संचालक डॉ विलास पाटील

वनामकृवि अंतर्गत असलेल्‍या विविध महाविद्यालयाच्‍या रासेयो अंतर्गत मौजे खटिंग सायाळा येथे आयोजित विशेष शिबीराचे उदघाटन
राष्‍ट्रीय सेवा योजनेच्‍या विविध उपक्रमातुन सामाजिक बांधिलकीची जाण महाविद्यालयीन युवकांना होऊन आत्‍मविश्‍वास वाढीस लागण्‍यास मदत होते. राष्‍ट्रीय सेवा योजना हे विद्यार्थ्‍याच्‍या व्‍यक्‍तीमत्‍व विकासासाठी मोठे व्‍यासपीठ आहे, असे प्रतिपादन शिक्षण संचालक डॉ विलास पाटील यांनी केले. वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठांतर्गत असलेल्‍या कृषि महाविद्यालय, कृषि अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालय तसेच उद्यानविद्या महाविद्यालय यांच्‍या संयुक्त विद्यमाने राष्‍ट्रीय सेवा योजनाचे विशेष शिबीराचे आयोजन मौजे खटिंग सायाळा येथे करण्‍यात आले असुन दिनांक 13 मार्च रोजी उदघाटना प्रसंगी ते बोलत होते. व्‍यासपीठावर अंधश्रध्‍दा निर्मुलन समितीचे राज्‍य सचिव प्रा माधव बावगे, प्राचार्य डॉ डि एन गोखले, प्राचार्य डॉ ए एस कडाळे, प्राचार्य डॉ टी बी तांबे, विद्यार्थ्‍यी कल्‍याण अधिकारी डॉ ए एस देशमुख, सरपंचा वच्‍छलाबाई काळे, उपसरपंच लक्ष्‍मणराव खटिंग आदींची प्रमुख उपस्थिती होती.
अंधश्रध्‍दा निर्मुलन समितीचे राज्‍य सचिव प्रा माधव बावगे आपल्‍या मार्गदर्शनात म्‍हणाले की, बुवाबाजी व भोंदुगिरी हा समाजास लागलेला रोग असुन उच्‍च शिक्षित वर्ग ही यास बळी पडत आहे, असे सांगुन प्रात्‍यक्षिकाव्‍दारे समाजातील अंधश्रध्‍देच्‍या आधारे होत असलेल्‍या फसवेगिरी वर प्रकाश टाकला.
कार्यक्रमात प्राचार्य डॉ डि एन गोखले, प्राचार्य डॉ ए एस कडाळे, प्राचार्य डॉ टी बी तांबे व विद्यार्थ्‍यी कल्‍याण अधिकारी डॉ ए एस देशमुख यांनीही मार्गदर्शन केले. प्रास्‍ताविक प्रा. व्‍ही बी जाधव यांनी केले. सुत्रसंचालन तेजस्‍वीनी भदरे हिने केले तर आभार स्मिता देशमुख हिने मानले. कार्यक्रम यशस्‍वीतेसाठी रासेयो कार्यक्रमाधिकारी प्रा. विजयकुमार जाधव, डॉ जयकुमार देशमुख, प्रा. एस पी सोळंके, डॉ पपिता गोरखेडे, डॉ संजय पवार आदींसह रासेयोचे स्‍वयंसेवक व गावकरी यांनी परिश्रम घेतले. 
यावेळी रासेयो स्‍वयंसेविकांनी महिला सबलीकरण व स्‍त्रीभ्रुण हत्‍यावर आधारित पथनाटय सादर केले. सदरिल शिबीरात ग्रामस्‍वच्‍छता, श्रमदान, व्‍यक्‍तीमत्‍व विकास, उमेद कार्यक्रम, कृषि तंत्रज्ञान प्रसार मोहिम, प्रभात फेरी, शेतकरी चर्चासत्र, अंधश्रध्‍दा निर्मुलन, योग प्रशिक्षण, एडस जनजागरण, आरोग्‍य तपासणी, रक्‍तदान शिबीर आदी सामाजिक उपक्रमाचे आयोजन करण्‍यात आले आहे. 

Monday, March 12, 2018

रेशीम कोष उत्‍पादन वाढीसाठी शेतकरी कौशल्‍य विकास प्रशिक्षण कार्यक्रम संपन्‍न


केंद्रिय रेशीम मंडळाचे परभणी येथील अनुसंधान विस्‍तार केंद्र व वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील रेशीम संशोधन योजना यांच्‍या संयुक्‍त विदयामाने दुबार रेशीम कोष उत्‍पादन वाढीसाठी शेतकरी कौशल्‍य विकास प्रशिक्षण कार्यक्रम दि. 9 ते 11 मार्च दरम्‍यान रेशीम संशोधन योजना येथे संपन्‍न झाला. दि. 9 मार्च रोजी विस्‍तार शिक्षण संचालक डॉ.पी.जी. इंगोले यांच्‍या हस्‍ते कार्यक्रमाचे उदघाटन झाले. यावेळी कृषि माहिती तंत्रज्ञान प्रसार केंद्राचे व्‍यवस्‍थापक डॉ. यु. एन. आळसे, अनुसंधान विस्‍तार केंद्राचे शास्‍त्रज्ञ श्री. ए. जे. कारंडे, रेशीम संशोधन योजनाचे प्रभारी अधिकारी डॉ. सी. बी. लटपटे आदींची उपस्थिती होती.
यावेळी मार्गदर्शन करतांना डॉ. पी. जी. इंगोले म्‍हणाले की, शेतक-यांनी आत्‍मा प्रकल्‍पांतर्गत शेतकरी गट स्‍थापन करून आधुनिक शेती पध्‍दतीने यशस्‍वीरित्‍या रेशीम कोष उत्‍पादनाबरोबर पशुधन व दुग्‍धव्‍यवसाय, फुलशेती, फळशेती करु शकतात. शासनासही शेतकरी गटास प्रशिक्षण व अनुदान देणे सोयीचे होते.
कार्यक्रमाचे आयोजक श्री. ए. जे. कारंडे यांनी तांत्रिक मार्गदर्शन केले. रेशीम संशोधन योजनाचे प्रभारी अधिकारी डॉ. सी. बी. लटपटे यांनी शास्‍त्रीय पध्‍दतीने तुती लागवड व तुती मशागत, तुती छाटणी, प्‍लास्‍टीक नेत्रीका व संगोपन गृह निर्जंतूकीकरण याचे प्रात्‍यक्षिकासह शेतक-यांना मार्गदर्शन केले.
तसेच शेंद्रा येथील उदयोजक प्रगतीशील शेतकरी माऊली अवचार व आतम चिमाजी जोंधळे यांच्‍या कीटक संगोपन शेडला प्रक्षेत्र भेटीचे आयोजन करण्‍यात आले होते. कार्यक्रमात हिंगोली, लातूर, बीड, परभणी आदी जिल्‍हयातून 57 शेतकरी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन डॉ.सी.बी. लटपटे यांनी केले. कार्यक्रमास यशस्‍वीतेसाठी रुपा राऊत, शेख सलीम, राकेश व्‍यास, जे.एन. चौडेकर, बालासाहेब गोंधळकर, अरुण काकडे आदींनी परिश्रम घेतले.

Friday, March 9, 2018

देशसेवा करण्‍याची संधी असा दृष्टिकोन ठेवुन स्‍पर्धा परिक्षेची तयारी करा....माजी आयएएस अधिकारी मा. श्री. अविनाश धर्माधिकारी

वनामकृवितील परभणी कृषि महाविद्यालयाचा रोजगार मार्गदर्शन व समुपदेशन कक्ष व स्‍पर्धा मंच यांच्‍या संयुक्‍त विद्यमाने आयोजित व्‍याख्‍यानात प्रतिपादन
प्रशासकीय क्षेत्रात करिअर निवडतांना पैसा, सुरक्षितता, सन्‍मान, अधिकार व देशसेवेची संधी या पंचशिलांचा विचार करतांना देशसेवेची संधी असा दृष्टिकोन ठेवुन स्‍पर्धा परिक्षेची तयारी करा. स्‍पर्धा परिक्षेची तयारी करतांना सर्वांचे भले करण्‍याचा उद्देश असणे आवश्‍यक असुन प्रशाकीय सेवेत स्‍वच्‍छ व कार्यक्षम अधिकारी होण्‍याचे स्‍वप्‍न उराशी बाळगले पाहिजे, असे प्रतिपादन  माजी भारतीय प्रशासकीय अधिकारी तथा पुणे येथील चाणक्‍य मंडळाचे संचालक मा. श्री. अविनाश धर्माधिकारी यांनी केले. वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील परभणी कृषि महाविद्यालयाचा रोजगार मार्गदर्शन व समुपदेशन कक्ष व वनामकृवि विद्यार्थ्‍यी स्‍पर्धामंच यांच्‍या संयुक्‍त विद्यमाने दिनांक 9 मार्च रोजी आधुनिक भारताचा इतिहास याविषयावर आयोजित व्‍याख्‍यानाप्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाच्‍या अध्‍यक्षस्‍थानी विस्‍तार शिक्षण संचालक डॉ प्रदिप इंगोले हे होते तर विद्यापीठ कार्यकारी परिषदेचे सदस्‍य मा. डॉ पी आर शिवपुजे, प्राचार्य डॉ डि एन गोखले, कक्षाचे अध्‍यक्ष डॉ पी आर झंवर, स्‍पर्धामंचाचे अध्‍यक्ष कैलास भाकड आदींची व्‍यासपीठावर प्रमुख उपस्थिती होती.
मार्गदर्शनात मा. श्री अविनाश धर्माधिकारी पुढे म्‍हणाले की, कोणतेही काम हाती घेतल्‍यास  कामावर आपली श्रध्‍दा असली पाहिजे. सातत्‍य, चिकाटी व शिस्‍त पाहिजे. भारत जगात निश्चितच महासत्‍ता होणार असुन जगाला शांततेचा संदेश देणार देश होणार आहे. भारताच्‍या आधुनिक इतिहासाची वर्तमानाशी जोड लावा. इतिहासापासुन प्रेरणा घेऊन आधुनिक भारत घडविणारे व्‍यक्‍ती बना. इंग्रजांनी आपल्‍या देशावर दिडशे वर्ष राज्‍य केले, आज आपण स्‍वतंत्र झालो परंतु आपल्‍या मनावर इंग्रजांचे राज्‍य आजही कायम आहे, असे मत व्‍यक्‍त करून त्‍यांनी भारतीय इतिहासाबाबत सविस्‍तर माहिती दिली.
विस्‍तार शिक्षण संचालक डॉ प्रदिप इंगाले अध्‍यक्षीय भाषणात म्हणाले की विद्यार्थ्‍यींनी निर्धारासह कष्‍ट व सातत्‍याची जोड दिल्‍यास कोणत्‍याही क्षेत्रात यश संपादन करू शकतात.
प्रास्‍ताविक प्राचार्य डॉ डि एन गोखले यांनी केले. सुत्रसंचालन प्रा रणजित चव्‍हाण यांनी तर आभार डॉ पी आर झंवर यांनी मानले. कार्यक्रम यशस्‍वीतेसाठी कैलास भाकड, चंद्रकांत दाडगे, शशीकांत गळमे, विशाल पाटील आदींसह स्‍पर्धामंचाच्‍या सदस्‍यानी परिश्रम घेतले. कार्यक्रमास विद्यापीठातील प्राध्‍यापक, कर्मचारी व विद्यार्थ्‍यी मोठया संख्‍येने उपस्थित होते.

Thursday, March 8, 2018

शालेय मुलांसाठी व्यक्तिमत्व विकास कार्यशाळा संपन्न


वसंतराव नाईक मराठवाडा कृषि पिद्यापीठातील मानव विकास व अभ्यास विभागाच्या अनुभवाधारित शिक्षण कार्यक्रमांतर्गत शालेय मुलांसाठी विशेष कार्यशाळेचे आयोजन दिनांक 6 मार्च रोजी करण्‍यात आले होते. परभणी शहरातील एकूण 13 शाळांच्या 92 विद्यार्थ्‍यांनी कार्यशाळेत सहभाग घेतला. कार्यशाळेस प्रमुख मार्गदशिका, बाल विकास शास्त्रज्ञ आणि विभाग प्रमुख प्रा.विशाला पटनम या होत्या. कार्यशाळेत विकासाचे टप्पे, वैयक्तिक काळजी, चांगल्या सवयी, शिष्टाचार, मनावरील ताबा आदीं विद्यार्थ्‍यांचे जीवनावश्‍यक विषयावर माहिती देण्यात आली. यावेळी विद्यार्थ्‍यांची वाढांक पडताळणी करून दहा विद्यार्थ्‍यांना बेस्ट चाईल्ड बेस्ट पॅरेटं अॅवार्ड देऊन सन्मानित करण्यात आले. विद्यार्थ्‍यांची पृथ्थकरण व कल्पनाशक्‍ती पडताळणीकरीता स्पर्धा घेण्यात येऊन पवन, शुभम धापसे, जीवन, मानव, सुजल व शुभम सोनुने या विद्यार्थ्‍यांना प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. कार्यशाळेव्‍दारे अनेक नाविन्यपूर्ण बाबी माहित झाल्याचे मनोगत विद्यार्थ्‍यांनी व्यक्त केले. सदरिल कार्यशाळा अनुभवाधारित शिक्षण कार्यक्रमांचे विषय शिक्षिका डॉ. वीणा भालेराव व विद्यार्थ्‍यी रोहन वानरे, कोमल वर्मा व कुमार पप्पू यांनी आयोजित केली होती.

Tuesday, March 6, 2018

बदलत्‍या हवामानास अनुकूल कृषि तंत्रज्ञानाचा प्रसार करण्‍याची गरज..... कुलगुरू मा. डॉ. बी. व्‍यंकटेश्‍वरलु

बदलत्‍या हवामानास अनुकूल कृषि तंत्रज्ञानावरील दोन दिवसीय कार्यशाळेचे उदघाटन
शेती क्षेत्र हे बदलत्‍या हवामानास जास्‍त संवेदनशील असुन आशिया खंडातील विकसनशील देशातील शेतीवर मोठा परिमाण होत आहे. हवामान बदलात तापमान वाढ व पर्यज्‍यमानातील तफावत हे मुख्‍य बाबी असुन याचा त्‍वरित प्रभाव विविध पिकांतील उत्‍पादनावर होत आहे. बदलत्‍या हवामानास अनुकूल विद्यापीठ विकसित कृषि तंत्रज्ञानाचा प्रसार शेतक-यांमध्‍ये करण्‍याची गरज असल्‍याचे प्रतिपादन कुलगुरू मा. डॉ. बी व्‍यंकटेश्‍वरलु यांनी केले. नवी दिल्‍ली येथील ऊर्जा व साधनसंपत्‍ती संशोधन संस्‍था, महाराष्‍ट्र कृषि स्पर्धात्मकता प्रकल्‍प व वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी यांचे संयुक्‍त विद्यमाने बदलत्‍या हवामानास अनूकुल कृषि तंत्रज्ञान प्रकल्‍पाच्‍या वतीने आयोजित दोन दिवशीय प्रशिक्षण कार्यशाळेचे उदघाटनाप्रसंगी (दि. 6 मार्च) ते बोलत होते. कार्यक्रमास शिक्षण संचालक डॉ विलास पाटील, विस्‍तार शिक्षण संचालक डॉ प्रदिप इंगोले, प्राचार्य डॉ डि एन गोखले, प्राचार्य डॉ डि बी देवसरकर, डेरीच्‍या शास्‍त्रज्ञ डॉ अपर्णा गजभीय आदींची प्रमुख उपस्थिती होती.
कुलगुरू मा. डॉ बी व्‍यंकटेश्‍वरलु पुढे म्‍हणाले की, बदलत्‍या हवामानामुळे पिकांवरील किड व रोगांचा प्रादुर्भाव कमी वेळातच वाढत असुन त्‍यावर नियंत्रण मिळविणे अवघड जात आहे. हवामान बदलाचा शेती पुरक व्‍यवसाय जसे दुध उत्‍पादन व कूकुटपालनावरही प्रभाव होत असल्‍याचे त्‍यांनी सांगितले.
कार्यक्रमात विस्‍तार शिक्षण संचालक डॉ प्रदिप इंगोले व डॉ अपर्णा गजभीय यांनीही मनोगत व्‍यक्‍त केले. प्रास्‍ताविकात शिक्षण संचालक डॉ विलास पाटील यांनी प्रकल्‍पाची माहिती दिली. सुत्रसंचालन डॉ जी ए भालेराव यांनी केले तर आभार शुशांत यांनी मानले. दोन दिवसीय कार्यशाळेत बदलत्‍या हवामानास अनुकूल कृषि तंत्रज्ञानाबाबत विद्यापीठ शास्‍त्रज्ञ मार्गदर्शन करणार असुन यात मराठवाडयातील आत्‍माचे कृषि अधिकारी सहभागी झाले आहेत. उदघाटन कार्यक्रमास विद्यापीठातील अधिकारी, कर्मचारी व शास्‍त्रज्ञ मोठया संख्‍येने उपस्थित होते.