Thursday, March 31, 2022

वनामकृवित राष्ट्रीय छात्र सेनाच्‍या वतीने वृक्षारोपण केलेल्या वृक्षांना आच्छादन व परिसर स्वच्छता अभियान

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील कृषि महाविद्यालयाच्‍या राष्‍ट्रीय छात्र सेनाच्‍या वतीने दिनांक ३१ मार्च रोजी विद्यापीठाच्‍या स्‍थापनेचे सुवर्ण महोत्सवी वर्षाचे औजित्‍य साधुन विद्यापीठ परिसरात वृक्षारोपण केलेल्या वृक्षांना आच्छादन तसेच परीसरात स्वच्छता अभियान राबविण्यात  आला. याप्रसंगी कुलगुरू मा डॉ. अशोक ढवण, वृक्ष लागवड समन्‍वयक डॉ. हिराकांत काळपांडे, जिमखाना उपाध्‍यक्ष डॉ. संजीव बंटेवाड, डॉ. नेहारकर, डॉ. मिलींद सोनकांबळे आदींची प्रमुख उपस्थिती होती. सदरील अभियानामध्ये ८० पेक्षा जास्त छात्रसैनिकांनी लागवड करण्यात आलेल्या वृक्षांना आच्छादन करुन परीसर स्वच्छता केला. सदरील अभियानाकरीता ५२ महाराष्ट्र बटालियन, एन.सी.सी., नांदेड चे कमाडिंग ऑफिसर श्री. एम. रंगाराव यांनी शुभेच्छा दिल्या. अभियानाच्या यशस्वीतेसाठी लेप्टनंट डॉ. जयकुमार देशमुख, ज्ञानेश्वर पवार, अजय गुट्टे, संदीप व्हावळे, संदीप देवकत्ते, गोविंद शिंदे आदींनी परीश्रम घेतले.   


Wednesday, March 30, 2022

राज्यस्तरीय तीस दिवसीय ऑनलाईन सेंद्रीय शेती प्रशिक्षण कार्यक्रमाचा समारोप समारंभ

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी च्या सुवर्ण जयंती महोत्सवाचे औचित्य साधुन सेंद्रीय शेती संशोधन आणि प्रशिक्षण केंद्राच्‍या वतीने शेतकरी बंधु भगिनी, कृषि विज्ञान केंद्राचे विषय विशेषज्ञ, कृषि शास्त्रज्ञ, विद्यार्थी, कृषि विभागाचे अधिकारी, कर्मचारी व स्वयंसेवी संस्थांचे सदस्य यांचे साठी  राज्यस्तरीय तीस दिवसीय सेंद्रीय शेती प्रशिक्षणाचे ऑनलाईन वेबीनारच्या माध्यमातुन दिनांक 15 फेब्रुवारी ते 31 मार्च दरम्यान आयोजन करण्यात आले होते.

सदरील प्रशिक्षण कार्यक्रमाचा समारोप समारंभ दिनांक 31 मार्च गुरवार रोजी सायंकाळी 7.00 वा ऑनलाईन पद्धतीने झुम मिटींगव्दारे आयोजित करण्यात आला आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कुलगुरू मा डॉ. अशोक ढवण असून प्रमुख पाहुणे म्‍हणुन नवसारी कृषि विद्यापीठाचे (गुजरात) चे कुलगुरु मा. डॉ. झिनाभाई पटेल, राहुरी येथील महात्मा फुले कृषि विद्यापीठाचे माजी कुलगुरू मा  डॉ. राजाराम देशमुख आणि डेहराडुन येथील भा.कृ.अ.प.-भारतीय मृद व जल संधारण संस्थेचे संचालक डॉ. एम. मधु  हे उपस्थित राहणार आहेत. तर संशोधन संचालक डॉ. दत्तप्रसाद वासकर, कुलसचिव डॉ. धिरजकुमार कदम, डॉ पंजाबराव देशमुख जैविक शेती मिशनचे प्रकल्‍प संचालक श्री संतोष आळसे, नवसारी येथील एनएम कृषि महाविद्यालयाचे मृदविज्ञान शास्‍त्रज्ञ डॉ. सोनल त्रिपाठी, प्रगतशील शेतकरी कृषिभुषण श्री. सोपानराव अवचार आदींची उपस्थिती लाभणार आहे.

ऑनलाईन कार्यक्रमात सहभागी होण्‍यासाठी 7810015203 या झुम आयडी क्रमांक  आणि 12345 पासवर्ड चा वापर करावा, तरी समारोप ऑनलाईक कार्यक्रमात सहभागी होण्‍याचे आवाहन प्रकल्‍पाचे प्रमुख अन्‍वेषक डॉ. आनंद गोरे आणि सर्व सदस्य शास्त्रज्ञ यांनी केले आहे.

जल संवर्धनासारख्‍या समाजोपयोगी कामात युवकांनी पुढाकार घ्‍यावा ..... मा श्री शिवानंद टाकसाळे

मौजे सायाळा खटींग येथे जलशक्‍ती अभियानांतर्गत अंतर्गत जल संवर्धनाची शपथ व संवाद कार्यक्रम संपन्‍न

परभणी जिल्‍हा परिषद आणि वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील कृषि महाविद्यालयाच्‍या राष्‍ट्रीय सेवा योजनेच्‍या वतीने दिनांक २९ मार्च रोजी जलशक्‍ती अभियान अंतर्गत जलसंधारणाची शपथ आणि संवाद कार्यक्रमांचे परभणी तालुक्‍यातील सायाळा खटींग या ग्रामपंचायतीमध्‍ये आयोजन करण्‍यात आले होते. शासनाच्‍या जलशक्‍ती अभियांनातर्गत कॅच द रेन व्‍हेअर इट फॉल्‍स, व्‍हेअर इट फॉल्‍स या मोहिमेला अनुसरून जिल्‍हयातील नागरिकांमध्‍ये पाणी बचतीचा संदेश पोहोचावा म्‍हणुन सायाळा खटिंग ग्रामपंचायतीमधील ग्रामस्‍थ आणि युवकांनी जलसंर्धवनणाची शपथ घेतली.

कार्यक्रमास प्रमुख अतिथी तथा मार्गदर्शक म्‍हणुन जिल्‍हा परिषदेचे मुख्‍य कार्यकारी अधिकारी मा श्री शिवानंद टाकसाळे हे होते, पंचायत विभागाचे उपमुख्‍य कार्यकारी अधिकारी श्री ओमप्रकाश यादव, स्‍वच्‍छ भारत मिशनचे उपमुख्‍य कार्यकारी अधिकारी श्री राजेंद्र तुबाकले,  गट विकास अधिकार श्री शिवाजी कांबळे, रासेयोचे कार्यक्रम अधिकारी डॉ प्रविण कापसे, डॉ मधुकर खळगे, डॉ विजय जाधव, डॉ अनुराधा लाड, विस्‍तार अधिकारी श्री विश्‍वनाथ पुरी, सरपंच श्री काळे, ग्रामसेवक चंद्रमुनी चावरे, लेखाधिकारी श्री विष्‍णु कारले, माऊली खटिंग, संवाद ज्ञानेश्‍वर गायकवाड आदीची मुख्‍य उपस्थिती होती.

मार्गदर्शनांत मा श्री शिवानंद टाकसाळे म्‍हणाले की, युवकांनी आपले ध्‍येय निश्चित करून त्‍याच्‍या पुर्तीसाठी कठोर परिश्रम घ्‍यावा. युवक हे समाजातील खरी ताकद आहे, त्‍यांनी छत्रपती शिवाजी महाराज, डॉ बाबासाहेब आंबेडकर, डॉ एपीजे अब्‍दुल कलाम यासाररख्‍या थोरपुरूषांचा आदर्श घेऊन त्‍यांचा विचारांचा अंगीकार करावा. ग्रामस्‍थ आणि युवकांनी मिळुन गावात स्‍वच्‍छता, जल संवर्धन, वृक्षांची लागवड व जोपासना आदी समाजोपयोगी कामे हाती घ्‍यावीत. यावेळी गावाच्‍या परिसरात असलेल्‍या वृक्षांच्‍या संवर्धन करण्‍याचे आवाहन मा श्री शिवानंद टाकसाळे यांनी गावक-यांनी केले.

आपल्‍या भाषणात श्री राजेंद्र तुबाकले म्‍हणाले की, युवकांना व ग्रामस्‍थांना यांनी गावाची स्‍वच्‍छता व पाण्‍याचे संवर्धन करण्‍यासाठी कार्य करावे. युवकांनी प्रामाणिकपणे प्रयत्‍न केल्‍या निश्चित केलेले ध्‍येय प्राप्‍त करता येते. तर श्री ओमप्रकाश यादव यांनी संतांच्‍या दृष्‍टांत देते म्‍हणाले की, राष्‍ट्रीय स्‍वच्‍छता, पाणी बचत व वृक्ष लागवडीत आदीत सर्वांनी सामुदायिकरित्‍या पुढाकार घ्‍यावा.

कार्यक्रमाचे प्रास्‍ताविक डॉ प्रविण कापसे यांनी केले, सुत्रसंचालन डॉ विजय जाधव यांनी केले तर आभार डॉ अनुराधा लाड यांनी मानले. कार्यक्रम यशस्‍वीतेसाठी रासेयोचे स्‍वयंसेवक व स्‍वयंसेविका, ग्रामस्‍थांनी परिश्रम घेतले. मौजे सायाळा खटींग येथे रासेयोचे विशेष शिबिर घेण्‍यात येत असुन यात ग्राम स्‍वच्‍छता, वृक्ष संवर्धन, हुंडाबळी नाटीका, व्‍यसनधीनता पथनाटय आदीसह विविध मार्गदर्शनपर उपक्रम राबविण्‍यात येत आहे.  





Tuesday, March 29, 2022

कृषी प्रक्रिया व मुल्यवर्धन उद्योग उभारणीसाठी मोठा वाव ……. डॉ. देवराव देवसरकर

कृषी प्रक्रिया अभियांत्रिकी विभागाच्‍या वतीने आयोजित “कृषी प्रक्रीयेद्वारे उद्योजगता विकास” या तीन दिवसीय प्रशिक्षणात प्रतिपादन 

परभणी कृषी विद्यापीठाने अधिक लोह आणि झिंक युक्त ज्वारी आणि बाजरी यांच्या जाती संशोधित केलेल्या आहे. जे विकेल ते पिकविणे अत्यंत गरजेचे आहे. मराठवाडा विभागात सोयबीन प्रक्रिया, डाळ मिल, तृणधान्य प्रक्रिया आणि मुल्यवर्धन यासाठी मोठा वाव असुन यशस्वी उद्योजक होण्यासाठी जिद्द, सातत्य, आत्मविश्वास आणि परिश्रम यांची गरज असल्याचे प्रतिपादन विस्तार शिक्षण संचालक डॉ देवराव देवसरकर यांनी केले.

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील कृषी अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालयाच्‍या कृषी प्रक्रिया अभियांत्रिकी विभागाच्‍या वतीने दिनांक 28 ते 30 मार्च दरम्‍यान आयोजित “कृषी प्रक्रीयेद्वारे उद्योजगता विकास” या तीन दिवसीय प्रशिक्षण कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. व्यासपीठावर नांदेड येथील सर्वज्ञ हर्बल न्यूटरासीटीकल प्रा. लि. कंपनीचे अध्यक्ष उद्योजक डॉ. कन्हैय्या कदम हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते तर कार्यक्रमाच्‍या अध्यक्षस्‍थानी महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. उदय खोडके, प्रशिक्षण आयोजक कृषी प्रक्रिया अभियांत्रिकी विभागाच्‍या प्रमुख डॉ स्मिता खोडके आदीची प्रमुख उपस्थिती होती.

मार्गदर्शनपर भाषणात डॉ. कन्हैया कदम यांनी आरोग्य आणि अर्थकारण या दोन्ही विषयांचा समतोल फ़क़्त योग्य प्रकारच्या शेती उत्पादित घटक व त्यांच्या प्रक्रियेवर अवलंबून आहे. शेतमालावर योग्य प्रकारची प्रक्रिया करून समाजास पोषणयुक्त उत्पादने ग्राहकांना उपलब्ध करून देणे आवश्यक आहे. हर्बल औषधांच्या माध्यमातून विविध दुर्धर आजारांसाठी आयुर्वेद शास्‍त्राच्या आधारे रसायन व विषविरहित उत्पादने उपलब्ध करून दिल्‍यास शेतकऱ्यांना त्याचा फायदा होऊ शकेल, असे ते म्‍हणाले.

अध्यक्षीय भाषणात सहयोगी अधिष्ठाता डॉ. उदय खोडके म्‍हणाले की, कृषी क्षेत्रात कृषी अभियांत्रिकीचे अनन्य साधारण महत्व असून कृषी मालावर प्रक्रिया करून मुल्यवर्धन केल्यास शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ होऊ शकते. कृषीमाल प्रक्रियेवर आधारित छोटे छोटे उद्योग उभारण्यास मोठ्या संधी असुन शासन देखिल अन्नप्रक्रिया उद्योगावर प्राधान्‍य देत असल्‍याचे ते म्हणाले.

प्रास्ताविकात डॉ. स्मिता खोडके यांनी प्रशिक्षणा मागील भूमिका विषद केली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. मधुकर मोरे यांनी केले तर आभार प्रदर्शन प्रा. प्रमोदिनी मोरे यांनी केले. कार्यक्रमास विद्यापीठातील अधिकारी, विभाग प्रमुख, प्राध्यापक आणि प्रशिक्षणार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वीतेसाठी डॉ. श्याम गरुड, शंकर शिवणकर, हेमंत रुपनर, निल्झा ओझेस, शलाका कलमनुरीकर, तेस्वीविनी कुमावत, सीमा आखाडे, पल्लवी वैद्य, रचना जाधव, आदित्य खिस्ते, माउली खातिंग, रीन्केश जाधव आदींनी परिश्रम घेतले.

सदरिल तीन दिवसीय प्रशिक्षण भारतीय कृषी अनुसंधान परिषद, नवी दिल्ली यांचे अर्थसहाय्याने अनुसूचित जाती या प्रवर्गातील व्यक्तींसाठी आयोजित केलेले असून यामध्ये विदर्भ, दक्षिण महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील प्रशिक्षणार्थी सहभागी झालेले आहेत. तांत्रिक मार्गदर्शनासोबतच वित्त पुरवठा, प्रकल्प अहवाल तयार करणे, प्रक्रिया उद्योगाची उभारणी आदी विषयावर या प्रशिक्षणात मार्गदर्शन करण्‍यात येणार आहे.


शेतक-यांचे कृषि विषयक प्रश्‍न सोडविण्‍यासाठी विद्यापीठ सदैव तत्‍पर ...... कुलगुरू मा डॉ अशोक ढवण

नांदेड येथील कापुस संशोधन केंद्रात आयोजित शेतकरी मेळाव्‍यात प्रतिपादन

नांदेड, परभणी व हिंगोली जिल्ह्यांतील ग्रामीण अर्थकारण हळद, कापूस व केळी या पीकांवर अवलंबून असुन या पीकांतील वाढते कीड-रोगांचे व्यवस्थापनासाठी तंत्रज्ञान विकसीत करणे आणि त्याबाबत मार्गदर्शन करण्यासाठी कृषि विद्यापीठ सदैव तत्पर असल्‍याचे प्रतिपादन कुलगुरू मा. डॉ. अशोक ढवण यांनी केले. वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठांतर्गत असलेले नांदेड येथील कापूस संशोधन केंद्रामध्ये सहयोगी संचालक बियाणे कार्यालय, कापूस संशोधन केंद्र आणि केळी संशोधन केंद्र यांच्या संयुक्‍त विद्यमाने दिनांक २८ मार्च रोजी आयोजीत हळद, केळी व कापूस पीक शेतकारी मेळाव्‍याचे आयोजन करण्‍यात आले होते, मेळाव्‍याच्‍या उदघाटन प्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमास निवासी उपजिल्हाधिकारी श्री प्रदीप कुलकर्णी, जिल्हा पुरवठा अधिकारी श्री लतीफ पठाण, वनामकृविचे संचालक संशोधन डॉ. दत्तप्रसाद वासकर, जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी श्री रविशंकर चलवदे, कापूस विशेषज्ञ डॉ. खिजर बेग आदींची प्रमुख उपस्थिती होती.

कुलगुरू मा डॉ अशोक ढवण म्हणाले की, परभणी येथून शेतकर्‍यांना मिळणारे विद्यापीठाचे बायोमिक्सया उत्पादनामुळे शेतकर्‍यांचे हळदीच्या उत्पादनामध्ये आमुलाग्र वाढ दिसून येत आहे. त्यामुळे या उत्पादनाचे वितरण विभागातील सर्व जिल्हयातील विद्यापीठाच्या केंद्रावर करण्यात येत आहे. त्याचप्रमाणे मराठवाडा विभागातील प्रमुख पीक म्हणून सोयाबीन पीकाचे महत्व वाढत आहे. राज्यामध्ये वनामकृविच्या सोयाबीन बियाण्यास सर्वाधिक प्रमाणात  मागणी आहे. याच्या जोडीला उन्हाळी हंगामातील सोयाबीन बिजोत्पादनातील उद्भवणारे प्रश्न ओळखणे व त्यावर उपाययोजना सुचविण्याची जवाबदारी आपल्यावर आहे अशी जाणीव त्यांनी व्यक्त केली.

संशोधन संचालक डॉ दत्‍तप्रसाद वासकर म्‍हणाले की, विद्यापीठाचे नवीन संकरीत वाण महाबीजच्या माध्यमातून लवकरच बीटी स्वरूपात उपलब्ध करण्यात येत असुन भविष्यात शेतकर्‍यांचा बियाण्यावरील खर्च कमी करण्यासाठी कापसाचे बीटी स्वरुपातील सरळ वाण विकसीत करण्यात येत आहेत. विद्यापीठ नियमित विस्तार व प्रशिक्षणाच्‍या माध्‍यमातुन राज्यातील हळदीतील व केळी पीकातील करपा रोगांबाबत व कपाशीवरील गुलाबी बोंडअळी या अडचणी सोडविण्यासाठी प्रयत्‍नशील असल्‍याचे ते म्‍हणाले.

प्रमुख अतिथी श्री लतीफ पठाण यांनी विद्यापीठाचे प्रमुख पीकांचे संशोधन भरीव असे  योगदान असल्‍याचे म्‍हणाले तर निवासी उपजिल्हाधिकारी श्री प्रदीप कुलकर्णी यांनी जिल्ह्यातील कृषि समस्यांचे निराकरणासाठी विद्यापीठाच्या कार्य कौतुकास्‍पद असल्‍याचे म्‍हणाले.

प्रगतीशील शेतकरी व कृषि विभागाचे माजी संचालक यांनी कृषि यांत्रिकीकरण व रबी-उन्हाळी हंगामातील सोयाबीन बाबत संशोधनाच्या आवश्यकतेची गरज असल्याचे सांगितले. तांत्रिक सत्रात नांदेड व हिंगोली जिल्ह्यामधील हळद व केळी पीकाचे वाढते क्षेत्र व त्यावरील समस्यांवर करावयाच्या उपाययोजनांबाबत या मेळाव्यामध्ये माहिती देण्यात आली. हळद लागवडीबाबत डॉ. विश्वनाथ खंदारे, केळी पीकातील व्यवस्थापनाबाबत डॉ. संतोष पिल्लेवाड तर विवीध पिकांतील कीटकनाशक प्रतिकारक्षमता व्यवस्थापनाबाबत डॉ. बस्वराज भेदे यांनी उपस्थित शेतकर्‍यांना मार्गदर्शन केले.

प्रास्ताविक कापूस विशेषज्ञ डॉ. खिजर बेग यांनी केले. सूत्रसंचालन प्रा. अरविंद पांडागळे यांनी केले तर डॉ. विजयकुमार चिंचाणे यांनी आभार मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रा. अरूण गायकवाड, डॉ. अमोल मिसाळ, डॉ. राजेश धुतमाल, डॉ. सुजाता धुतराज, श्रीमती सुरेवाड, श्रीमती ताटीकुंडलवार, सर्वश्री पांचाळ, तुरे, गौरकर, अडकीने, सोनुले, जाधव, शिंदे इत्यादींनी परिश्रम घेतले.


Monday, March 28, 2022

मौजे सायाळा खटिंग येथे रासेयोचे विशेष शिबीराचे आयोजन

 

देशाच्‍या स्‍वातंत्र्याचे अमृत महोत्‍सवी वर्ष आणि वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाच्‍या स्‍थापनेचे सुवर्ण महोत्‍सवी वर्षाचे औजित्‍य साधुन परभणी कृषि महाविद्यालयाच्‍या राष्‍ट्रीय सेवा योजनेच्‍या वतीने मौजे सायाळा खटिंग येथे विशेष शिबीराचे आयोजन करण्‍यात आले असुन दिनांक २८ मार्च रोजी शिबीराचे उदघाटन प्राचार्य डॉ सय्यद ईस्‍माईल यांच्‍या हस्‍ते करण्‍यात आले. कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्‍हणुन सरपंच्‍या श्रीमती वत्‍सलाताई काळे या होत्‍या तर शिक्षण प्रभारी डॉ रणजित चव्‍हाण, नाहेप प्रकल्‍पाचे मुख्‍य अन्‍वेषक डॉ गोपाल शिंदे, श्री तुकाराम काळे, कार्यक्रमाधिकारी डॉ प्रविण कापसे, डॉ मधुकर खळगे, डॉ अनुराधा लाड आदींची प्रमुख उपस्थिती होती.

अध्‍यक्षीय भाषणात डॉ सय्यद ईस्‍माईल म्‍हणाले की, राष्‍ट्रीय सेवा योजनेच्‍या माध्‍यमातुन सामाजिक बांधिलकी म्‍हणुन कृषिच्‍या विद्यार्थ्‍यांनी समाजाची व शेतकरी बांधवाची सेवा करावी. कृषि विद्यार्थ्‍यांनी पदवी अभ्‍यासक्रमात प्राप्‍त केलेल्‍या शास्‍त्रीय ज्ञानाचा शेतकरी बांधवामध्‍ये प्रसार करावा. विद्यार्थ्‍यांनाही शेतकरी बांधवाकडुन शेतीविषयक अनेक बाबी शिकण्‍यासारख्‍या आहेत. शिबिराच्‍या माध्‍यमातुन विचारांची देवाण घेवाण झाली पाहिजे, असे ते म्‍हणाले.

डॉ गोपाल शिंदे यांनी यंत्रमानव, ड्रोन आणि कृत्रिम बुध्‍दीमत्‍ताचा शेती क्षेत्रात वापराबाबत माहिती देतांनी सांगितले की येणारे युग हे डिजिटल शेतीचे युग असुन याकरिता कुशल मनुष्‍यबळाची आवश्‍यकता लागणार आहेत. यात कृषिचे विद्यार्थी मोलाची भुमिका बजावु शकतात. डिजिटल शेतीच्‍या माध्‍यमातुन कृषि पदवीधरांना रोजगाराच्‍या अनेक संधी प्राप्‍त होणार आहेत, असे सांगुन ड्रोन तंत्रज्ञानाचे प्रात्‍याक्षिकाव्‍दारे मार्गदर्शन केले.

रासेयोचे हे विद्यार्थ्‍यांतील समाज सेवेची आवड करणारे व्‍यासपीठ असल्‍याचे आपल्‍या मनोगतात डॉ रणजित चव्‍हाण म्‍हणाले. 

कार्यक्रमाचे प्रास्‍ताविक डॉ प्रविण कापसे यांनी केले. सुत्रसंचालन स्‍वयंसेवक प्रद्युघ्न जांगिलवाड यांनी केले तर आभार डॉ अनुराधा लाड यांनी मानले. कार्यक्रम यशस्‍वीतेसाठी रोसेयोचे स्‍वयंसेवकांनी परिश्रम घेतले.


लातूर येथील कृषी जैवतंत्रज्ञान महाविद्यालयात जैवतंत्रज्ञानावर सात दिवसीय प्रशिक्षण

भारतीय स्वातंत्र्याचे अमृत महोत्सवी वर्ष व वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ स्थापनेच्या सुवर्ण महोत्सवी वर्षाचे औचित्य विद्यापीठांतर्गत असलेल्‍या लातूर येथील विलासराव देशमुख कृषी जैवतंत्रज्ञान महाविद्यालयात जैवतंत्रज्ञान आणि जैवमाहिती तंत्रज्ञान साधनांचा पीक सुधारणेसाठी एकत्रित वापरया विषयावर सात दिवसीय प्रशिक्षणाचे दिनांक २२ मार्च ते २९ मार्च दरम्‍यान आयोजित करण्‍यात आले, प्रशिक्षणाचे उदघाटन दिनांक २२ मार्च रोजी पार पडले. उदघाटन कार्यक्रमाच्‍या अध्‍यक्षस्‍थानी प्राचार्य प्रा. हेमंत पाटील हे होते. प्रमुख पाहुणे म्‍हणुन अंबाजोगाई कृषि महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.बी.एम.ठोंबरे हे होते.

अध्‍यक्षीय भाषणात प्रा हेमंत पाटील म्‍हणाले की, कृषी जैवतंत्रज्ञान व जैवमाहिती तंत्रज्ञानचे येणा-या काळात महत्व प्राप्‍त होणार असुन यात विद्यार्थ्‍यांना मोठय संधी आहेत. सदरील प्रशिक्षणात प्रात्‍याक्षिकांवर भर देण्‍यात आला असुन जैवतंत्रज्ञानाबाबत विद्यार्थ्‍यांतील कौशल्‍य विकसत होण्‍यास मदत होईल. मार्गदर्शनात डॉ.बी.एम.ठोंबरे यांनी जैवतंत्रज्ञान व जैवमाहिती तंत्रज्ञानाचा वापर होऊन भविष्यात शेतकऱ्यांच्या पिकाची गुणवत्ता व उत्पादन क्षमता वाढू शकेल असा विश्वास व्यक्त केला.

प्रशिक्षणाचे आयोजन कुलगुरू मा डॉ. अशोक ढवण व संचालक शिक्षण डॉ. धर्मराज गोखले यांच्‍या मार्गदर्शनानुसार करण्‍यात आले होते. प्रशिक्षणात कृषी जैवतंत्रज्ञान, कृषी वनस्पती रोगशास्त्र, व कीटकशास्त्र शाखेतील पदव्युत्तर शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना विविध विषयावर तज्ञ मंडळी मार्गदर्शन करणार आहेत. यात प्रामुख्याने कोरीया येथील जीओनसंग्‍य राष्‍ट्रीय विद्यापीठातील संशोधक डॉ. उल्हास कदम व डॉ. राहुल शेळके, अमेरिकेतील पॅसिफिक एज ग्रुपचे संचालक डॉ. बालाजी आगलावे, पुणे येथील सावित्रीबाई फुले विद्यापीठातील जैवमाहितीशास्‍त्रज्ञ डॉ. पायल घोष, डॉ. अमोल देठे, मोन्‍सॅन्‍टो शास्‍त्रज्ञ डॉ. संदीप दांगट, आदी तज्ञ मंडळी मार्गदर्शन करणार आहेतकार्यक्रमाचे प्रास्‍ताविक प्रशिक्षण समन्वयक डॉ. राहुल चव्हाण यांनी केले. सुत्रसंचालन डॉ. दीप्ती वानखडे यांनी केले तर आभार डॉ. विद्या हिंगे यांनी मानले.  जैवतंत्रज्ञान विभाग (भारत सरकार) यांच्‍या अर्थ सहाय्याने प्रशिक्षणाचे आयोजन करण्‍यात आले. प्रशिक्षण आयोजन समितीत प्रा. बी. एन. आगलावे, डॉ. विद्या हिंगे, डॉ. दीप्ती वानखडे, अभिजीत देशमुख आदींचा सहभाग आहे. कार्यक्रमास प्राध्‍यापककर्मचारी व विद्यार्थी मोठया संख्‍येने उपस्थित होते.

Sunday, March 27, 2022

शेतीमाल विपणन तंत्र आत्मसात करण्‍याची गरज .... प्राचार्य डॉ. विश्वनाथ शिंदे

वनामकृवित आयोजित तीस दिवसीय सेंद्रीय शेती प्रशिक्षणात प्रतिपादन

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील सेंद्रीय शेती संशोधन आणि प्रशिक्षण केंद्राच्‍या वतीने तीस दिवसीय राज्यस्तरीय सेंद्रीय शेती प्रशिक्षण कार्यक्रमाचे ऑनलाईन वेबीनारच्या माध्यमातुन दिनांक १५ फेब्रुवारी ते ३१ मार्च दरम्यान कुलगुरु मा. डॉ. अशोक ढवण व संचालक संशोधन डॉ. दत्तप्रसाद वासकर यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजन करण्यात आले आहे. दिनांक २६ मार्च रोजी सेंद्रीय शेतमालाचे बाजारपेठ व्यवस्थापन यावर अकोला येथील डॉ. पंजाबराव देशमुख जैविक शेती मिशनाचे व्यवस्थापक श्री. आशिष मुडावदकर यांचे तर वर्धा येथील नवी उमेद शेतकरी उत्पादक कंपनीच्‍या सचिव श्रीमती सुनिता वाघमारे यांचे नवी उमेद शेतकरी उत्पादक कंपनीची विक्री व्यवस्थापनातील यशोगाथा यावर व्याख्यानाचे आयोजित करण्यात आले होते. कार्यक्रमाच्‍या अध्यक्षस्थानी मालेगाव (जि. नाशिक) येथील कृषि व्यवसाय व्यवस्थापन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विश्वनाथ शिंदे हे होते. ता. पुर्णा (जि. परभणी) येथील प्रगतशील शेतकरी डॉ. दिलीप श्रृंगारपुतळे, आयोजक मुख्‍य अन्‍वेषक डॉ. आनंद गोरे, डॉ. स्मिता खोडके, डॉ. रणजीत चव्हाण, डॉ. पपीता गौरखेडे आदींची प्रमुख उपस्थिती होती.  

अध्‍यक्षीय भाषणात डॉ. विश्वनाथ शिंदे म्‍हणाले की, शेतीमध्ये शेतकरी कष्ट करतात तांत्रिक ज्ञान व तंत्रज्ञानाचा उपयोग करतात परंतु विक्री व्यवस्थापनात कमी पडल्यामुळे हवा तसा आर्थिक लाभ होत नाही. यामुळे शेतक­यांनी कष्टा सोबतच आपल्या शेती उत्पादनाचे रुपांतर उत्पन्नात करण्यासाठी विक्री व्यवस्थापनाचे कौशल्य व तंत्र शिकले पाहिजे. देशात व परदेशात सेंद्रीय उत्पादनास मोठी मागणी आहे, हे करोना महामारीच्या काळात अधिक प्रकर्षाने दिसून आले. सेंद्रीय प्रमाणीकरणाच्या यंत्रणेमार्फत प्रमाणीकरण करुन घेऊन विक्री व्यवस्थापनासाठी शेतक­यांनी एकत्र येणे ही काळाची गरज आहे. सेंद्रीय तृणधान्य, कडधान्य, मसाला पीके यांची मोठी मागणी असून यासाठी योग्य पॅकींग, आकर्षक पध्दतीने माहिती, आकर्षक घोषणा व विक्री दालने या माध्यमातुन विक्री करावी.

मार्गदर्शनात प्रमुख वक्ते श्री. आशिष मुडावदकर म्‍हणाले की, बाजारपेठेत सेंद्रीय मालासोबतच बिगर सेंद्रीय माल बाजारपेठेत विक्रीसाठी येत आहे. अशावेळी ग्राहक व उत्पादक या दोन्ही घटकांची होणारी फसवणुक टाळण्यासाठी प्रमाणीकरण व उत्पादनाच्या सविस्तर माहितीसह विक्री प्रणाली विकसीत करणे गरजेचे आहे. ग्राहकांचा विश्वास संपादन करण्यासाठी सेंद्रीय प्रमाणीकरणाची माहिती, किंमत, गुणवत्ता व इतर वैशिटये याबाबतची माहिती उत्पादनासोबत योग्य पॅकींगसह दिल्यास योग्य बाजारभाव मिळण्यास मदत होते. चांगला बाजारभाव मिळण्यासाठी ग्राहकांची संख्या, उत्पन्न, अपेक्षा लक्षात घेऊन सेंद्रीय उत्पादन चांगल्या पॅकींग व गुणवत्तेसह उपलब्ध करुन देणे आवश्यक आहे.

श्रीमती सुनिता वाघमारे यांनी नवी उमेद शेतकरी उत्पादक कंपनीची विक्री व्यवस्थापनातील यशोगाथा सांगतांना म्हणाल्या की, नवी उमेद शेतकरी उत्पादक कंपनी मध्ये एकूण ३५०० महीला काम करत आहेत. ही कंपनी केवळ महिलांनी उभी केली असून आज या कंपनीची उलाढाल ३ कोटी पेक्षा अधिक आहे. शेतकरी जो माल उत्पादन करतो त्या मालास पाहिजे तसा भाव मिळत नाही. किंवा उत्पादीत केलेला माल त्याच दिवशी आहे त्या भावात विकावा लागतो. या सर्व अडचनी लक्षात घेऊन आम्ही कंपणी स्थापन केली त्यानुसार आम्ही गाव पातळीवर बैठका घेतो. शेतक­यांकडील माल विकत घेतो, यामुळे शेतकरी ते ग्राहक यांच्यातील मध्यस्थांची साखळी कमी केली. त्यामुळे शेतकरी ते ग्राहक असा थेट संपर्क होऊन शेतक­यांना योग्य बाजारभाव मिळतो. शेतक­यांनी त्यांच्या शेती मालाची वयक्तीक किंवा गटा मार्फत एकत्र येऊन प्रक्रिया केली तर मुल्यवर्धन होऊन अधिक बाजरभाव मिळु शकतो.

प्रगतशील शेतकरी डॉ. दिलीप श्रृंगारपुतळे आपले मनोगत व्यक्त करतांना म्‍हणाले की, संत तुकडोजी महाराज यांच्या ग्रामगीते नुसार आम्ही ग्रामीण पातळीवर काम करत आहोत. आज शेती समोर अनेक समस्या आहेत. यामुळे यावर मात करण्यासाठी तंत्रज्ञानाबरोबरच शेतक­यांनी मानसीकता बदलने आवश्यक आहे. आम्ही शेती सेवा ग्रुम च्या माध्ययामातुन शाश्वत शेती करत असुन स्वत:चा शेतमाल स्वत: विक्री करत आहेत. यामध्ये आमचे सदस्य आंबा, टरबुज, केळी, मोसंबी, संत्री इ. फळांची स्वत: पँकीग करुन विशिष्ट ग्राहक वर्गापर्यंत पोहचुन विक्री करतात. शेतामधील चांगल्या प्रतिच्या मालाला जो पर्यंत चागला भाव मिळत नाही तोपर्यंत शेतक­यांची प्रतीष्ठा वाढणार नाही.

प्रशिक्षण कार्यक्रमात शेतकरी बंधू भगिनी तसेच विद्यार्थी, कृषि शास्त्रज्ञ, कृषि विज्ञान केंद्राचे विषय विशेषज्ञ यांनी मोठ्या प्रमाणावर सहभाग घेतला. सुत्रसंचलन डॉ. संतोष फुलारी यांनी केले तर आभार श्री. मंगेश मांडगे यांनी मानले. डॉ. संतोष कांबळे यांनी संकलक म्हणुन काम पाहिले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी डॉ. संतोष बोरगावकर, श्री. सतिश कटारे आदींनी परिश्रम घेतले.