Saturday, September 23, 2023

सोयाबीन पिकावरील सद्यस्थितीत किडींचे व्यवस्थापनाबाबत वनामकृविच्‍या कृषि संवाद मालिकेत मार्गदर्शन

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाचे कुलगुरु मा. डॉ. इन्द्र मणि यांच्या अभिनव संकल्‍पनेतुन मराठवाडयातील शेतक-यांकरिता कृषि विद्यापीठ आणि कृषि विभाग यांचे संयुक्‍त विद्यमाने विविध पिकांवरील कीड-रोग सर्वेक्षण व सल्ला प्रकल्प (क्रॉपसॅप) व फलोत्पादन पिकावरील कीड-रोग सर्वेक्षण व सल्ला प्रकल्प (हॉर्टसॅप) अंतर्गत ऑनलाईन कृषि संवाद मालिका आयोजित करण्‍यात येत असुन दिनांक २० सप्टेंबर रोजी सदर मालिकेचा नववा भाग माननीय कुलगुरु यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला. या संवाद कार्यक्रमात कृषि अधिकारी, कृषि विस्‍तारक आणि शेतकरी बांधव यांनी मोठया संख्‍येने सहभाग नोंदविला.

तांत्रिक सत्रामध्ये सोयाबीन वरील सद्यस्थितीत किडींचे व्यवस्थापन या विषयावर किटकशास्‍त्रज्ञ डॉ. राजेंद्र जाधव यांनी मार्गदर्शन केले. मार्गदर्शनात डॉ. राजेंद्र जाधव यांनी हिरवी घाटे अळी व तंबाखुची पाने खाणारी अळी या किडीची प्रादुर्भावाची पातळी समजण्याकरीता सर्वेक्षणाकरीता  प्रत्येक किडीसाठी हेक्टरी ५ कामगंध सापळे  शेतात लावावेत. शेतात इंग्रजी टि (T) अक्षरासारखे पक्षीथांबे लावावेत. सद्यस्थितीवरील सोयाबीनवर पाने खाणा-या अळया, खोडमाशी, पाने खाणा-या अळया, चक्री भुंगयाचा प्रादुर्भाव आर्थिक नुकसान संकेत पातळीवर गेल्यास पाने खाणा-या अळीसाठी फ़्ल्युबेन्डामाईड ३९.३५ एससी 3 मिली किंवा स्पायनेटोरम ११.७ एससी ९ मिली प्रती १० लिटर पाणी मिसळुन फवारावे. खोडमाशी व चक्रीभुगयासाठी थायामिथॉक्झाम १२.६ अधिक लॅमडा साहॅलोथ्रीन ९.५  झेडसी २.५ मिली किंवा क्लोरॅनट्रानीलीप्रोल १८.५ एससी किंवा 3 मिली किंवा बिटासायफल्युथ्रीन ८.४९ + इमिडाक्लोप्रीड १९.८१ टक्के ७ मिली प्रति १० लिटर पाण्यात मिसळुन फवारणी करण्‍याचा सल्‍ला दिला.

वनस्‍पती रोग तज्ञ डॉ. गजेंद्र जगताप यांनी सोयाबीनवरील चारकोलरॉट व्यवस्थापनाबाबत मार्गदर्शन केले तर डॉ. अरुण गुटटे यांनी मार्गदर्शनात म्‍हणाले की, केडीएस-७२६, केडीएस-७५३ या सोयाबीनच्या जातींच्या झाडांची तसेच पावसाचा ताण पडल्यामुळे पाने जास्त प्रमाणात पिवळी पडुन गळत आहेत. ज्या शेतक-यांनी मायक्रोन्युट्रींयट ग्रेड-१, सल्फर व पोटॅशयुक्त खते दिली त्यांच्या शेतात पाने पिवळी पडण्याचे प्रमाण कमी दिसुन आले आहे.

कार्यक्रमाच्‍या प्रास्ताविकात किटकशास्‍त्रज्ञ डॉ. पुरुषोत्तम नेहरकर यांनी कृषि संवाद कार्यक्रमाची माहिती दिली तर कार्यक्रमाचे सुत्रसंचालन डॉ अनंत लाड यांनी केले. सदर कृषि संवाद कार्यक्रमातील सल्‍ला शेतकरी बांधवा उपयुक्‍त ठरल असल्‍याचे मत सहभागी शेतकरी व कृषि अधिकारी यांनी व्‍यक्‍त केले. सदर कृषि संवाद कार्यक्रमास लातुर विभागाचे विभागीय कृषि सहसंचालक श्री. साहेबराव दिवेकर, विभागीय कृषि सहसंचालक श्री. रमेश जाधव, विभाग प्रमुख (कृषि किटकशास्त्र) डॉ. पुरुषोत्तम नेहरकर, डॉ. शिवाजीराव म्हेत्रे, डॉ. गजेंद्र जगताप, क्रॉपसॅप समन्वयक अधिकारी डॉ. अनंत लाड, किटकशास्त्रज्ञ डॉ. राजेंद्र जाधव, डॉ. राजरतन खंदारे, डॉ. योगेश मात्रे, श्री. दिपक लाड आदीसह कृषि विभागातील अधिकारी, कर्मचारी व मराठवाड्यातील शेतक-यांनी सहभाग नोंदवला.

Monday, September 18, 2023

हळदीवरील कंद माशी, करपा आणि कंदकुजचे कसे कराल व्यवस्थापन

वनामकृवितील कृषि तंत्रज्ञान माहिती केंद्रातील तज्ञांचा सल्‍ला

सध्यपरिस्थितीत हळद वाढीच्या अवस्थेमध्ये आहे. अशावेळी हळदीला कंदमाशी या किडीचा प्रादुर्भाव दिसून येतो आहे आणि येणाऱ्या काळात करपा, पानावरील ठिपके या रोगांचा प्रादुर्भाव होऊ शकतो. त्यामुळे भविष्यात होणारे नुकसान टाळण्यासाठी या रोगांचे तसेच सद्यस्थितीतील कंदमाशीचे पुढील प्रमाणे व्यवस्थापन वेळीच करण्‍याचा सल्‍ला वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील कृषि तंत्रज्ञान माहिती केंद्रातील तज्ञ डॉ.डी.डी.पटाईत, डॉ.जी.डी.गडदे आणि श्री.एम.बी.मांडगे  यांनी दिला.

हळदी वरील कंदमाशी व्यवस्थापन: प्रत्येक १५ दिवसांच्या अंतराने क्विनॉलफॉस (२५ टक्के प्रवाही) २० मि.ली. किंवा डायमिथोएट (३० टक्के प्रवाही ) १५ मि.ली. यापैकी एका कीटकनाशकाची प्रति १० लिटर पाणी या प्रमाणे झाडावर आलटून पालटून फवारणी करावी व सोबत चांगल्या दर्जाचे स्टिकर मिसळावे. उघडे पडेलेल्या कंदाजवळ कंदमाशीची मादी अंडी घालते त्यामुळे उघडे पडलेले कंद मातीने वेळोवेळी झाकून घ्यावेत. वेळेवर हळदीची भरणी करावी. पीक तण विरहित ठेवावे. जमिनीतून क्‍लोरपायरीफॉस ५० टक्के ५० मि.लि. प्रति १० लिटर पाणी या प्रमाणात घेऊन आळवणी करावी. याच पद्धतीने कीटकनाशकाची आळवणी प्रतिबंधात्मक उपाय म्हणून एक महिन्याच्या अंतराने प्रत्येक महिन्यात निश्चित करावी. हळद पीक काढल्यानंतर शेतात राहिलेल्या पिकांचे अवशेष, सडके कंद नष्ट करावेत. तसेच एकरी २-३ पसरट तोंडाची भांडी वापरून प्रत्येक भांड्यात भरडलेले एरंडीचे बी २०० ग्रॅम घेऊन त्यात १ ते १.५ लिटर पाणी घ्यावे. ८ ते १० दिवसांनी या मिश्रणामध्ये तयार होणाऱ्या विशिष्ट गंधाकडे कंदमाशीचे प्रौढ आकर्षित होतात व त्यात पडून मरतात.

हळदीमधील पानावरील ठिपके आणि करपा व्यवस्थापन: करपाजन्य रोगग्रस्त पाने वेळोवेळी जमा करून जाळून नष्ट करावीत आणि शेतात स्वच्छता राखावी. प्रादुर्भाव कमी असल्यास कार्बेडेंझीम ५० टक्के - ४०० ग्रॅम किंवा मॅन्कोझेब ७५ टक्के ५०० ग्रॅम किंवा कॉपर ऑक्झीक्लोराइड ५० टक्के - ५०० ग्रॅम यापैकी एका बुरशीनाशकाची प्रति एकर याप्रमाणे सोबत स्टिकर मिसळून फवारणी करावी. प्रादुर्भाव जास्त असल्यास एजोक्सिस्ट्रोबीन १८.२ टक्के अधिक डायफेनोकोनॅझोल ११.४ टक्के (पूर्वमिश्रित बुरशीनाशक) - २०० मिली किंवा प्रोपीकोनॅझोल २५ टक्के - २०० मिली किंवा क्लोरथॅलोनील ७५ टक्के - ५०० ग्रॅम यापैकी एका बुरशीनाशकाची प्रति एकर याप्रमाणे सोबत स्टिकर मिसळून फवारणी करावी.

हळदीमधील कंदकुज व्यवस्थापन : कंदकुज करीता प्रतिबंधात्मक उपाय म्हणून एकरी २ ते २.५ किलो ट्रायकोडर्मा शेणखतामध्ये मिसळून जमिनीतून द्यावे. जास्त पावसामुळे शेतात साठलेल्या अतिरिक्त पाण्याचा वेळोवेळी निचरा करावा. जेणेकरून कंदकुज होण्यास कारणीभूत असलेल्या बुरशीचा प्रसार कमी करता येईल. कंदकूज झाली असल्यास जमिनीतून कार्बेडेंझीम ५० टक्के -१ ग्रॅम किंवा मॅन्कोझेब ७५ टक्के -३ ग्रॅम किंवा कॉपर ऑक्झीक्लोराइड ५० टक्के ५ ग्रॅम यापैकी एका बुरशीनाशकाची प्रति लिटर पाण्यात मिसळून दरवेळी महिन्यातून एकदा आळवणी करावी. (आळवणी करताना जमिनीमध्ये वापसा असावा. आळवणी केल्यानंतर पिकास पाण्याचा थोडा ताण द्यावा.)

अधिक माहितीसाठी विद्यापीठातील कृषि तंत्रज्ञान माहिती केंद्राशी दुरध्‍वनी क्रमांक ०२४५२ २२९००० वर संपर्क करावा.





(संदर्भ: हळद संशोधन केंद्र, कसबे डिग्रज जि. सांगली) 

टीप : हळद पिकावर केंद्रीय कीटकनाशक मंडळातर्फे लेबल क्‍लेम नसल्याने विद्यापीठ शिफारशीत संशोधनाचे निष्कर्ष दिले आहेत.

सौजन्‍य : वनामकृवि संदेश क्रमांक: ०६/२०२३  (११ सप्टेंबर २०२३)

Sunday, September 17, 2023

कमी पर्जन्‍यमान व जमीनीतील ओलावा यांचा विचार करून रबी पीकांचे नियोजन करावे ...... कुलगुरू मा डॉ इन्‍द्र मणि

मराठवाडा मुक्‍ती संग्राम दिनाच्‍या अमृत महोत्‍सवी वर्षा निमित्‍त आयोजित रबी पीक परिसंवादात प्रतिपादन

शेतकरी बांधवांनी हवामान बदलानुसार रबी पिकांचे नियोजन करावे. या वर्षी खरीप हंगामात पाऊसाचे प्रमाण कमी राहीले असुन पडणा-या पावसात खंड पडला, यामुळे खरीप पीकाच्‍या वाढीवर परिणाम झाला आहे. पावसाचे कमी प्रमाण आणि उपलब्‍ध जमीनीतील ओलावा यांचा विचार करून येणा-या रबी पीकांची निवड करावी. परभणी कृषि विद्यापीठ विकसित ज्‍वार, करडई, जवस आदी पिकांच्‍या वापर करावा, असा सल्‍ला कुलगुरू मा डॉ इन्‍द्र मणि यांनी दिला. मराठवाडा मुक्‍ती संग्राम दिनाच्‍या अमृत महोत्‍सवी वर्षानिमित्‍त वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील विस्‍तार शिक्षण संचालनालय व कृषि विभाग (महाराष्‍ट्र शासन) यांचे संयुक्‍त विद्यमाने रबी पीक परिसंवादाचे आयोजन दिनांक १७ सप्‍टेंबर रोजी करण्‍यात आले होते, कार्यक्रमाच्‍या अध्‍यक्षस्‍थानावरून ते बोलत होते. कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी म्‍हणुन नागपुर येथील महाराष्‍ट्र पशु आणि मत्‍स्‍य विज्ञान विद्यापीठाचे कुलगुरू मा डॉ. नितिन पाटील आणि परभणीचे माजी खासदार मा अॅड सुरेशराव जाधव हे होते. व्‍यासपीठावर संचालक (संशोधन) डॉ दत्‍तप्रसाद वासकर, विस्‍तार शिक्षण संचालक डॉ धर्मराज गोखले, संचालक (शिक्षण) डॉ उदय खोडके, जिल्‍हा अधिक्षक कृषि अधिकारी श्री दौलत चव्‍हाण, श्री किशोर कदम आदींची प्रमुख उपस्थिती होती.

कुलगुरू मा डॉ इन्‍द्र मणि पुढे म्‍हणाले की, विद्यापीठातील करडई, बाजरा आणि गळीत धान्‍य संशोधन केंद्रास उत्‍कृष्‍ट संशोधन केंद्राचा राष्‍ट्रीय पुरस्‍कार प्राप्‍त केला असुन आंतरराष्‍ट्रीय हरित विद्यापीठाचा पुरस्‍कार न्‍युयॉर्क येथे प्रदान करण्‍यात आला आहे. शेतकरी कल्‍याणाकरिताचा कृषि विद्यापीठांची स्थापना झाली असुन प्रथम शेतकरी बांधवाची सेवा या भावनेने सर्वांनी कार्य केले पाहिजे. शेतकरी सेवा हिच ईश्‍वर सेवा आहे. रासायनिक खते व किटकनाशकांचा वापर मर्यादीत करून जैविक खते व जैविक किटकनाशकांचा वापर वाढवावा लागेल. शेतीत अधिक उत्‍पादनापेक्षा शाश्‍वत उत्‍पादनावर भर असला पाहिजे. विद्यापीठ कृषि यांत्रिकीकरण व डिजिटल तंत्रज्ञानाच्‍या शेतीत वापर वाढविण्‍याकरिता प्रयत्‍न करित आहे. नुकतेच शेतीत ड्रोन तंत्रज्ञानाचा फवारणी करिता वापराबाबत मार्गदर्शक तत्‍वे निश्चित करण्‍यात आली आहेत. भविष्‍यात ड्रोन तंत्रज्ञानाचा मोठा उपयोग शेतीत होणार आहे.  

प्रमुख अतिथी कुलगुरू मा डॉ नितिन पाटील म्‍हणाले की, अनिश्चित पर्जन्‍यमान्‍याच्‍या पार्श्‍वभुमीवर शेतकरी बांधवांनी पिक लागवडी सोबतच कृषि पुरक व्‍यवसाय केला पाहिजे. यात शेळी पालन, बकरी पालन, मत्‍स्य पालन, दुग्‍ध व्‍यवसाय आदीची जोड दिल्‍यास आर्थिक स्‍थैर्य प्राप्‍त होऊ शकते. राजस्‍थान मध्‍ये अत्‍यंत कमी पाऊस पडतो, परंतु त्‍या ठिकाणी शेतकरी विविध पशु व्‍यवसाय करतात. नागपुर येथील महाराष्‍ट्र पशु व मत्‍स्य विज्ञान विद्यापीठांतर्गत असलेले राज्‍यातील विविध पशु विज्ञान महाविद्यालयात याबाबत वेळोवेळी प्रशिक्षण दिले जाते, त्‍याचा लाभ शेतकरी बांधवांनी घ्‍यावा असे प्रतिपादन त्‍यांनी केले.

मार्गदर्शनात माजी खासदार मा अॅड सुरेशराव जाधव म्‍हणाले की, शेतकरी बांधवाच्‍या गरजचा व हवामान बदल यांचा विचार करून विद्यापीठाने संशोधन करावे. अचुक हवामान अंदाज करिता अधिकाधिक संशोधन व्‍हावे. शेतकरी सक्षम झाला तरच देश सक्षम होईल. आज आपण विक्रमी अन्‍नधान्‍य निर्मिती करीत आहोत, आज आपणास सकस अन्‍नधान्‍याची गरज आहे. महाराष्‍ट्र शासनाने परभणी कृषि विद्यापीठांतर्गत चार महाविद्यालये आणि एक सोयाबीन संशोधन केंद्राची घोषणा केली असुन यामुळे शेतकरी बांधवा लाभ होणार आहे.

कार्यक्रमाचे प्रास्‍ताविकात डॉ धर्मराज गोखले विद्यापीठ विकसित विविध पिकांच्‍या वाणांचा शेतकरी बांधवांनी अवलंब करण्‍याचा सल्‍ला दिला. सुत्रसंचालन डॉ विणा भालेराव यांनी केले तर आभार मुख्‍य शिक्षण विस्‍तार अधिकारी डॉ प्रशांत देशमुख यांनी केले. परिसंवादात हवामान बदलानुसार रबी पिकांचे नियोजन, शुन्‍य मशागत व संवर्धीत शेती, शेततळयाचे नियोजन, रबी पिक लागवड, पिकांवरील किड-रोग व्‍यवस्‍थापन आदीं विषयावर विद्यापीठ शास्‍त्रज्ञांनी मार्गदर्शन केले तसेच शेतकरी बांधवाच्‍या कृषि विषयक विविध प्रश्‍नांची उत्‍तरे विद्यापीठ शास्‍त्रज्ञांनी चर्चासत्रात दिली. मान्‍यवरांच्‍या हस्‍ते विद्यापीठ विकसित रबी पीकांच्‍या बियाणे विक्रीचे उदघाटन करण्‍यात आले तसेच विद्यापीठ शास्‍त्रज्ञ लिखित घडीपत्रिका व प्रकाशनांचे विमोचन करण्‍यात आले. परिसंवादास शेतकरी बांधव, कृषि अधिकारी मोठया संख्‍येने उपस्थित होते.








वनामकृवित मराठवाडा मुक्‍ती संग्राम दिन साजरा

 

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठात मराठवाडा मुक्‍ती संग्राम दिनाच्‍या अमृत महोत्‍सवानिमित्‍त दिनांक १७ सप्‍टेंबर रोजी मुख्‍य प्रांगणात माननीय कुलगुरू मा डॉ इन्‍द्र मणि यांच्‍या हस्‍ते ध्‍वजारोहन करण्‍यात आले. कार्यक्रमास संशोधन संचालक डॉ दत्तप्रसाद वासकर, विस्‍तार शिक्षण संचालक डॉ धर्मराज गोखले, शिक्षण संचालक डॉ उदय खोडके, कुलसचिव श्री पी के काळेविद्यापीठ नियंत्रक श्री एन एम लांडगे, प्राचार्य डॉ सय्यद ईस्‍माइल, प्राचार्या डॉ जया बंगाळे, प्राचार्य डॉ राजेश क्षीरसागर, सहयोगी अधिष्‍ठाता डॉ गजेंद्र लोंढे, विद्यार्थ्‍यी कल्‍याण अधिकारी डॉ सचिन मोरे आदींसह विद्यापीठातील अधिकारी, कर्मचारी आणि विद्यार्थी मोठया संख्‍येने उपस्थित होते. याप्रसंगी माननीय कुलगुरू डॉ इन्‍द्र मणि यांनी मराठवाडा मुक्‍ती करिता शहिद वीरांना विनम्र अभिवादन करून मराठवाडा मुक्‍ती संग्राम दिनाच्‍या सर्वांना शुभेच्‍छा दिल्‍या. यावेळी राष्‍ट्रीय छात्रसैनिकांनी माननीय कुलगुरू यांना छात्र अधिकारी लेफ्टनंट डॉ जयकुमार देशमुख यांच्‍या नेतृत्‍वाखाली सलामी देण्‍यात आली. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन सिनेगायक श्री उदय वाईकर यांनी केले.


Friday, September 15, 2023

वनामकृवि च्या करडई संशोधन केंद्रास राष्‍ट्रीय पुरस्‍कार

वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील अखिल भारतीय समन्वयीत करडई संशोधन प्रकल्पास राष्ट्रीय स्तरावरील उत्कृष्ट संशोधन केंद्राचा पुरस्कार रायपुर (छत्तीसगड) येथील इंदिरा गांधी कृषी विद्यापीठात संपन्‍न झालेल्‍या तेलबिया पिकांच्या वार्षिक सभेमध्ये प्रदान करण्‍यात आला. सदर पुरस्‍कार भारतीय कृषी अनुसंधान परिषदेचे सहाय्यक संचालक (तेलबिया) डॉ. संजय गुप्ता यांच्या हस्ते परभणी कृषि विद्यापीठाच्‍या शास्‍त्रज्ञांना प्रदान करण्यात आला. 

सदर करडई संशोधन प्रकल्‍पाच्‍या वतीने आतापर्यंत अधिक उत्पादन देणारे दर्जेदार करडईचे वाण विकसित आणि प्रसारीत केलेले आहेत. यामध्ये शारदा, परभणी कुसुम (पीबीएनएस -१२), परभणी ४०, परभणी ८६ (पूर्णा), परभणी सुवर्णा (पीबीएनएस -१५४), पीबीएनएस-१८४ या वाणांचा समावेश आहे. परभणी कुसुम हा वाण राष्ट्रीय स्तरावर तुल्यबळ वाण म्हणून मागील १५ वर्षापासून संशोधनामध्ये वापरला जातो तसेच हा वाण देशभर शेतकरी बांधवामध्ये मोठया प्रमाणात प्रचलित आहे. या संशोधन केंद्राने १०० टक्के यांत्रिकीकरणाच्या संशोधन शिफारशीच्या माध्यमातून करडईचे मध्यवर्ती प्रक्षेत्रावर मोठ्या प्रमाणात बीजोत्पादन केलेले आहे. या केंद्राने केलेल्या संशोधन व विस्ताराच्या कार्यामुळे करडई उत्पादनात महाराष्ट्र राज्य देशभरात अग्रेसर आहे. या सर्व बाबींची दखल घेत २०१७ ते २०२१ या कालावधीत केलेल्या संशोधन कार्यासाठी भा.कृ.अ.नु.प.- भारतीय तेलबिया संशोधन संस्था, हैद्राबाद यांनी भारतीय कृषी संशोधन परिषदेने यांच्या मूल्यांकनाच्या आधारे करडई संशोधन प्रकल्प, वनामकृवि, परभणी ला उत्कृष्ट तेलबिया संशोधन केंद्र पुरस्कार देऊन गौरविले आहे. 

याबद्दल पुरस्‍काराबाबत विद्यापीठाचे कुलगुरू मा डॉ इन्‍द्र मणि यांनी संचालक संशोधन डॉ. दत्तप्रसाद वासकर, संशोधन केंद्राचे प्रभारी अधिकारी डॉ. शामराव घुगे व केंद्रातील शास्त्रज्ञांचे अभिनंदन करतांना  म्‍हणाले की, तेलबिया पिकात करडई हे महत्‍वाचे पिक असुन विद्यापीठाच्‍या अनेक करडईचे वाण शेतकरी बांधवामध्‍ये मोठया प्रमाणात प्र‍चलित आहेत, ही विद्यापीठाकरिता अभिमानाची बाब आहे. सदरील पुरस्कार मिळविण्यासाठी संचालक संशोधन डॉ. दत्तप्रसाद वासकर यांनी मोलाची भूमिका पार पाडली. 


Thursday, September 14, 2023

वनामकृवित बैल पोळा उत्‍साहात साजरा

कुलगुरू मा डॉ इन्‍द्र मणि यांच्‍या हस्‍ते विद्यापीठाच्‍या विविध विभागातील बैलांचे करण्‍यात आले पुजन 








Wednesday, September 13, 2023

मराठवाडा मुक्‍ती संग्राम निमित्‍त अमृत महोत्‍सव ज्‍योतीचे वनाकृविच्‍या वतीने स्‍वागत


मराठवाडा मुक्ती संग्राम दिन अमृत महोत्सव ज्योत माननीय राज्यपाल यांच्या शुभहस्ते प्रज्वलीत करून कृषिभूषण श्री गोविंदराव पवार हे मराठवाड्याच्या हुतात्मा स्मारकास अभिवादन करून परभणी येथे १३ सप्टेंबर रोजी वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाच्‍या वतीने माननीय कुलगुरू डॉ. इन्‍द्र मणि यांच्या शुभहस्ते ज्योत प्रज्वलित करून ज्योतीचे स्वागत करण्यात आले. मा. कुलगुरू यांच्या शुभहस्ते कृषीभूषण श्री गोविंदराव पवार यांचा सत्कार करण्यात आला.

आपल्‍या भाषणात श्री गोविंदराव पवार यांनी ५ सप्टेंबर २०२३ रोजी माननीय राज्यपाल यांनी प्रचलित केलेली ज्योत असुन मराठवाडा मुक्ती संग्राम अमृत महोत्सवा निमित्त वृक्षारोपणाचे महत्त्व व त्यानिमित्ताने एक घर एक वृक्ष या उपक्रम राबविण्‍यात येत असल्‍याचे सांगितले. श्री गोविंदराव पवार हे परभणी कृषी विद्यापीठाचे पदवीधारक असुन वृक्षलागवड उपक्रमामध्ये सर्वांनी सहभागी व्हावे असे आवाहन केले.

माननीय कुलगुरू डॉ इन्‍द्र मणि यांनी कृषिभूषण श्री गोविंदराव पवार यांचे विद्यापीठा तर्फे अभिनंदन करून या उपक्रमाला शुभेच्छा दिल्या. मराठवाड्यात वन क्षेत्र अत्‍यंत कमी असुन नैसर्गिक संतुलन राखण्‍याकरिता वृक्ष लागवड उपक्रमाची व्‍याप्‍ती वाढवीने अत्‍यंत आवश्‍यक आहे. याकरिता विद्यापीठ प्रक्षेत्रावरही मोठया प्रमाणात वृक्ष लागवड मोहिम हाती घेतली असुन विद्यार्थ्यांनाही हरित मराठवाडा करिता प्रोत्‍साहित केले जाईन, असे ते म्‍हणाले.  

प्रास्ताविक प्रा. दिलीप मोरे यांनी केले तर आभार विद्यार्थी कल्याण अधिकारी डॉ. सचिन मोरे यांनी मानले. याप्रसंगी शिक्षण संचालक तथा अधिष्ठाता डॉ. उदय खोडके, डॉ. राजेश कदम, डॉ. हिराकांत काळपांडे, डॉ. प्रवीण घाटगे, डॉ. शिवाजी शिंदे डॉ. रवी शिंदे, डॉ. आगरकर, अशोक खिल्लारे, राम चव्हाण, घोरवाडे, मंचक वाघ, फाजगे आदी उपस्थित होते. कार्यक्रमास सर्व शाखांचे विद्यार्थी,विद्यार्थिनी, प्राध्यापक, कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Tuesday, September 12, 2023

वनामकृवित रविवारी रबी पीक परिसंवादाचे आयोजन

मराठवाडा मुक्‍ती संग्राम दिनाच्‍या अमृत महोत्‍सवी वर्षानिमित्‍त वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील विस्‍तार शिक्षण संचालनालय कृषि विभाग (महाराष्‍ट्र शासन) यांचे संयुक्‍त विद्यमाने रबी पीक परिसंवादाचे आयोजन दिनांक १७ सप्‍टेंबर रोजी सकाळी ११.०० वाजता कृषी महाविद्यालयाच्‍या सभागृहात करण्‍यात आले आहे.  परिसंवादाच्‍या उदघाटन कार्यक्रमाच्‍या अध्‍यक्षस्‍थानी कुलगुरू मा डॉ इन्‍द्र मणि हे राहणार असुन प्रमुख अतिथी म्‍हणुन अकोला येथील डॉ पंजाबराव देशमुख कृषि विद्यापीठाचे कुलगुरू मा डॉ शरद गडाख आणि नागपुर येथील महाराष्‍ट्र पशु आणि मत्‍स्‍य विज्ञान विद्यापीठाचे कुलगुरू मा डॉ. नितिन पाटील हे उपस्थित राहणार आहेत. संचालक (शिक्षण) डॉ उदय खोडके, संचालक (संशोधन) डॉ दत्‍तप्रसाद वासकर, संचालक (बियाणे व लागवड सामुग्री) डॉ देवराव देवसरकर आदींची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे. 

परिसंवादात रबी पिक लागवड, पिकांवरील किड-रोग व्‍यवस्‍थापन आदीं विषयावर विद्यापीठ शास्‍त्रज्ञ मार्गदर्शन करणार आहे. सदर परिसंवादास जास्‍तीत जास्‍त शेतकरी बांधवांनी उपस्थित राहण्‍याचे आवाहन विस्‍तार शिक्षण संचालक डॉ धर्मराज गोखले आणि परभणीचे जिल्‍हा अधिक्षक कृषि अधिकारी श्री दौलत चव्‍हाण यांनी केले आहे. परिसंवादाचे थेट प्रेक्षपण विद्यापीठ युटयुब चॅनेल www.youtube.com/user/vnmkv वर करण्‍यात येणार आहे.

वनामकृवि कर्मचारी सहकारी पतसंस्था म. परभणी. ची ४६ वी वार्षिक सर्वसाधारण सभा संपन्न

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ कर्मचारी सहकारी पतसंस्था मर्यादीत परभणी ची ४६ वी वार्षिक सर्वसाधारण सभा दिनांक १० सप्‍टेंबर रोजी संपन्न परभणी कृषि महाविद्यालयाच्‍या सभागृहात संपन्‍न झाली. कार्यक्रमास कुलगुरू मा डॉ इन्‍द्र मणि यांची विशेष उपस्थिती होती तर अध्‍यक्षस्‍थानी पतसंस्‍थेचे अध्‍यक्ष डॉ प्रविन उद्धवराव घाटगे हे होते. व्‍यासपीठावर शिक्षण संचालक डॉ उदय खोडके, प.जि.मध्यवर्ती सहकारी बॅकेचे  मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. व्ही. आर. कुरूंदकर यांच्या प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमात मान्‍यवरांच्‍या हस्ते सभासदांच्या १० वी व १२ वी गुणंवत मुलाचा गुणगौरव करूण सत्कार करण्यात आला.

मार्गदर्शनात कुलगुरू मा डॉ इन्‍द्र मणि यांनी पतसंस्‍थेच्‍या माध्‍यमातुन विद्यापीठाच्‍या सदस्यांना आर्थिक अडचणीच्‍या काळात मोठी मदत होते असे प्रतिपादन केले. सभेत संस्थेच्या अहवालाचे वाचन करण्यात आले तसेच आर्थिक पत्रकावर आलेल्या प्रश्नाचे यथोचित उत्तरे देउन अध्यक्षांनी सभासदांचे समाधान केले.

सदर कार्यक्रमासाठी संस्थेचे अध्यक्ष डॉ प्रविण घाटगे, उपाध्यक्ष डॉ. एस. पी. म्हेत्रे, मानद सचिव श्री. एस. एस. खताळ, संचालक मंडळातील सदस्य डॉ एम. एस. देशमुख, डॉ आर. पी. कदम, डॉ. एस. बी. घुगे. डॉ आर. व्ही. चव्हाण. डॉ डी. एस. चैहाण. श्री. आर. व्ही. खोबे, श्री. बी. जी. कोकणे, श्री, आर. एस. खरोडे, श्री. बी. बी. उबाळे, श्री. के. व्ही. शिंदे पाटील, श्री. एस. ए. हिवराळे, डॉ. डी. टी. पाथ्रीकर, सौ. सुधा अशोक सालगोडे, श्री. शेख अहेमद शे. शहाबुद्यीन आदीसह पतसंस्‍थेचे सदस्‍य मोठया संख्‍येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन श्री. एस. एस. खताळ यांनी केले व आभार डॉ एस. बी. घुगे यांनी मानले.