Thursday, December 29, 2022

वनामकृवित ट्रायकोकार्ड निर्मिती प्रशिक्षण संपन्‍न

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विदयापीठ व आत्मा परभणी यांच्या संयुक्त विद्यमाने कीड व्यवस्थापनामध्ये ट्रायकोकार्डचा वापर व निर्मिती तंत्रज्ञान या विषयावर दिनांक 27 व 28 डिसेंबर रोजी दोन दिवसीय प्रशिक्षण कार्यक्रम कृषि तंत्रज्ञान माहिती केंद्रात संपन्न झाला. कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी अध्यक्ष म्हणून मुख्य विस्तार शिक्षण अधिकारी डॉ.पी.आर.देशमुख हे होते तर आत्मा चे प्रकल्प संचालक श्री विजय लोखंडे आणि तालुका कृषि अधिकारी श्री.पठाण हे प्रमुख पाहुणे म्हणून लाभले होते. व्‍यासपीठावर कृषी तंत्रज्ञान माहिती केंद्राचे व्यवस्थापक डॉ. जी. डी. गडदे, कीटकशास्त्रज्ञ डॉ.डी.डी.पटाईत, डॉ.मधुमती कुलकर्णी, श्री.एम.बी.मांडगे आदी उपस्थित होते.

प्रशिक्षणात शेतकऱ्यांना प्रयोगशाळेत ट्रायकोकार्ड निर्मीतीचे प्रात्यक्षीक दाखवण्यात आले. तसेच जैविक कीड व्यवस्थापन, एकात्मिक कीड व्यवस्थापन व ट्रायकोग्रामाचे जैविक शेतीमध्ये महत्त्व याबाबत मार्गदर्शन विद्यापीठ शास्‍त्रज्ञ डॉ. डि. डि. पटाईत, डॉ. श्रद्धा धुरगुडे, श्री.मांडगे यांनी केले. प्रशिक्षणाच्‍या समारोपात प्रशिक्षणार्थी शेतक-यांनी मनोगतात ट्रायकोकार्डचा वापर व निर्मीती हा विषय अत्यंत उपयोगाचा सांगुन प्रशिक्षणात अनेक आत्‍मसात केल्‍याचे मत व्‍यक्‍त केले. तसेच विद्यापीठ हे आमच्यासाठी गुरू सारखे मार्ग दाखविण्याचे कार्य करते, अशी भावना व्यक्त केली. सहभागी शेतकऱ्यांना उपसंचालक आत्मा श्री प्रभाकर बनसावडे, डॉ.जी.डी.गडदे, डॉ.मधुमती कुलकर्णी, डॉ डि डि पटाईत यांच्या हस्ते प्रमाणपत्र वितरित करण्यात आले. प्रशिक्षण यशस्वीतेसाठी श्री.ज्ञानोबा माहोरे, श्री.दिगांबर रेंगे, श्री.नितीन मोहिते, श्री.पांडुरंग डिकळे, शेख साजीद व शेख सुलताना आदींनी परीश्रम घेतले. प्रशिक्षणाकरिता परभणी जिल्ह्यातील २७ शेतकरी सहभागी झाले होते.



Monday, December 26, 2022

सामुदायिक विज्ञान महाविद्यालयातील प्रायोगिक पूर्व प्राथमिक शाळेत चिमुकल्‍यांंनी साजरा केला नाताळ सण

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील सामुदायिक विज्ञान महाविद्यालयातील मानव विकास व कौटुंबिक अभ्यास विभागात असणाऱ्या प्रायोगिक पूर्व प्राथमिक शाळेत नाताळ हा सण उत्साहात साजरा करण्यात आला. यानिमित्ताने प्राचार्य डॉ. जया बंगाळे यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना शुभेच्छा देऊन येशु ख्रिस्त यांच्या मानवजाती करिता केलेल्‍या महान जीवन कार्याला उजाळा दिला. यावेळी विद्यार्थ्यांनी ख्रिसमस ट्री, स्नो मॅन, सान्ताक्लॉज आदींचा वस्‍तु तयार करून सुंदर सजावट केली होती. कार्यक्रम यशस्वीतेसाठी प्रा. नीता गायकवाड, डॉ. वीणा भालेराव, प्रा. प्रियंका स्वामी व प्रायोगिक पूर्व प्राथमिक शाळेचे शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी तथा विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन शिक्षिका श्रुती औंढेकर यांनी केले.

Saturday, December 24, 2022

वनामकृवित अन्‍न प्रक्रियावर आधारीत सामाईक उष्मायन केंद्राच्‍या इमारतीचे भुमिपुजन

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील अन्‍नतंत्रज्ञान महाविद्यालयात नवी दिल्‍ली येथील केंद्रीय अन्‍न प्रक्रिया उद्योग मंत्रालयाच्‍या प्रधानमंत्री सुक्ष्‍म अन्‍न प्रक्रिया उद्योग योजने (PMFME) अंतर्गत सामाईक उष्मायन केंद्र (कॉमन इन्‍क्‍युबेशन सेंटर) उभारण्‍यास मान्‍यता मिळालेली असुन दिनांक २० डिसेंबर रोजी या केंद्राच्‍या इमारत बांधकामाचे भुमिपुजन कुलगुरू मा डॉ इन्‍द्र मणि यांच्‍या हस्‍ते करण्‍यात आले. यावेळी शिक्षण संचालक डॉ धर्मराज गोखले, संशोधन संचालक डॉ दत्‍तप्रसाद वासकर, विस्‍तार शिक्षण संचालक डॉ देवराव देवसरकर, कुलसचिव डॉ धिरजकुमार कदम, विद्यापीठ नियंत्रक श्रीमती दिपाराणी देवतराज, विद्यापीठ अभियंता श्री दीपक कशाळकर, प्राचार्य डॉ राजेश क्षीरसागर, प्राचार्य डॉ उदय खोडके, प्राचार्य डॉ सय्यद ईस्‍माईल, विद्यापीठ वास्तुविशारद श्री युनूस आदींची प्रमुख उपस्थिती होती.

यावेळी मार्गदर्शनात कुलगुरू मा डॉ इन्‍द्र मणि म्‍हणाले की, कृषि व सलग्‍न शाखेतील पदवीधर नौकरी मिळविणारे नव्‍हे तर नौकरी देणारे उद्योजक झाले पाहिजे,  याकरिता अन्‍नतंत्र महाविद्यालयात उभारण्‍यात येणाऱ्या सामाईक इन्‍क्‍युबेशन केंद्रामुळे अन्‍न प्रक्रिया उद्योग विकासास चालना मिळेल. शेतकरी बांधवानी उत्‍पादीत केलेल्‍या शेतमालावर प्रक्रिया केल्‍यास निश्चितच अधिक लाभ होऊन शेतक-यांच्या उत्पन्नात वाढ होऊ शकेल. मराठवाडा विभागात शेतमाल प्रक्रिया उद्योग वाढीस मोठा वाव आहे. विद्यापीठातील अन्‍नतंत्र महाविद्यालयातील पदवीधर, नवउद्योजक, शेतकरी, शेतकरी उत्‍पादक कंपनी, बचत गटातील सदस्‍य भविष्‍यात या इन्‍क्‍युबेशन केंद्रात प्रशिक्षित होऊन मराठवाडयातील शेतमाल प्रक्रिया उद्योग विकासात मोलाचा हातभार लावतील. यामुळे एक जिल्‍हा एक उत्‍पादन संकल्‍पनेस चालना मिळेल.

प्रास्‍ताविकात प्राचार्य डॉ राजेश क्षीरसागर यांनी सदर केंद्राचा परिसरातील शेतकरी बांधव, नव उद्योजक यांना उपयोग होणार असून गुळ व गुळापासुन विविध पदार्थ, मसाले प्रक्रिया उद्योग, ऊसाच्‍या रसापासुनचे विविध पेय पदार्थ आदी उद्योग विकासावर भर देण्‍यात येणार असल्‍याचे सांगितले.

कार्यक्रमाचे सुत्रसंचालन डॉ अनुप्रिता जोशी यांनी केले तर आभार डॉ प्रविण घाटगे यांनी मानले. कार्यक्रमास अन्‍नतंत्रज्ञान महाविद्यालयातील विभाग प्रमुख प्रा. दिलीप मोरे, प्रा. हेमंत देशपांडे, डॉ कैलास गाढे, डॉ. पवार, डॉ भारत आगरकर आदीसह विद्यापीठातील अधिकारी, कर्मचारी आणि विद्यार्थी मोठया संख्‍येने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी कर्मचारी व महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी परिश्रम घेतले.

राज्याचे कृषी आयुक्तालय येथील नोडल ऑफिसर व संचालक (कृषी प्रक्रिया व नियोजन) श्री सुभाष नागरे आणि उपसंचालक (कृषी प्रक्रिया व नियोजन) श्री वराळे साहेब यांच्या मार्फत महाराष्ट्रात पीएमएफएमई योजना राबविण्यात येत असुन त्यांचे सदर प्रकल्‍पास मोलाचे मार्गदर्शन लाभणार आहे. सदर इन्‍क्‍युबेशन केंद्र उभारण्‍यास केंद्र सरकार कडुन ३.२९५ कोटीच्या निधीस मंजुरी मिळाली असुन प्राप्‍त निधी केंद्राची स्‍वतंत्र नवीन इमारत, प्रक्रिया उपकरणे, गुणवत्‍ता नियंत्रण प्रयोगशाळा विकासाकरिता खर्च करण्‍यात येणार आहे. या केंद्राचा वापर व्‍यापारी तत्‍वावर करण्‍यात येणार असुन लहान उद्योजक, शेतकरी उत्‍पाक कंपन्‍या, बजत गट आदींना प्रशिक्षीत करून त्‍याच्‍या व्‍दारे उद्योजकता विकास करण्‍यात येणार आहे. शेतकरी बांधवाना भाडे तत्‍वावर सदर केंद्रातील सुविधा पुरविण्‍यात येणार असुन यामुळे शेतमाल प्रक्रिया स्‍टार्ट अप उद्योगास चालना मिळणार आहे. लहान उद्योजकांना सामाईक इनक्‍युबेशन केंद्राची सुविधा पुरवुन त्‍यांच्‍या वरील आर्थिक भार कमी करणे हा सुध्‍दा त्‍याचा उद्देश आहे. यासाठी कृषी आयुक्तालय पुणे हे राज्‍य नोडल एजन्‍सी म्‍हणुन कार्य करणार असुन जालना येथील रसायन तंत्रज्ञान संस्‍थेचे संचालक डॉ उदय अन्‍नापुरे हे मार्गदर्शक म्‍हणुन कार्य करणार आहे.

Friday, December 23, 2022

प्रशिक्षणाच्‍या माध्‍यमातुन शेतकरी आणि ग्रामीण युवकांच्‍या उद्योजकता विकासाकरिता परभणी कृषि विद्यापीठाचा प्रयत्‍न ...... कुलगुरू मा. डॉ. इन्‍द्र मणि

वनामकृवित रेशीम उद्योजक कौशल्‍य विकास प्रशिक्षणाचे उदघाटन

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील किटकशास्‍त्र विभाग अंतर्गत असलेल्‍या रेशीम संशोधन योजना आणि जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, परभणी यांच्या संयुक्त विद्यामान किमान कौशल्‍य विकास कार्यक्रमाच्‍या जिल्‍हास्‍तरीय योजना २०२२-२३ अंतर्गत तीन महिण्‍याच्‍या रेशीम उद्योजक प्रशिक्षणाचे आयोजन करण्‍यात आले असुन सदर प्रशिक्षणाचे उदघाटन दिनांक २२ डिेसेंबर झाले. कार्यक्रमाच्‍या अध्‍यक्षस्‍थानी कुलगुरू मा. डॉ. इन्‍द्र मणि होते, तर  प्रमुख अतिथी म्‍हणुन कौशल्‍य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहाय्यक आयुक्त डॉ. प्रशांत खंदारे, प्राचार्य डॉ. सय्यद ईस्माइल, जिल्हा रेशीम विकास अधिकारी श्री. गोविंद कदम, केंद्रिय रेशीम मंडळाचे शास्‍त्रज्ञ श्री. अशोक जाधव, विभाग प्रमुख डॉ. पुरोषोत्तम नेहेरकर, रेशीम तज्ञ डॉ चंद्रकात लटपटे आदींची प्रमुख उपस्थिती होती.

अध्‍यक्षीय भाषणात कुलगुरू मा डॉ. इन्‍द्र मणि म्‍हणाले की, शेतकरी बांधवाच्‍या आर्थिक स्‍थर्य करिता केवळ शेतीवर अवलंबुन भागणार नसुन कृषि पुरक उद्योग करण्‍याची गरज आहे. यशस्‍वी उद्योजक होण्‍याकरिता कौशल्‍य आत्‍मसात करणे गरजेचे आहे. येणा-या काळात परभणी कृषी विद्यापीठ शेतकरी व ग्रामीण युवकांच्‍या कौशल्‍य विकासाकरिता विविध प्रशिक्षण आयोजित करणार आहे. या कौशल्‍याच्‍या आधारे शेतकरी व ग्रामीण युवकांना स्‍वयंरोजगार सुरू करून इतरांना रोजगार देण्‍याकरिता सक्षम करण्‍याचा प्रयत्‍न राहणार आहे. याचाच भाग म्‍हणुन रेशीम उद्योग व मधमक्षिका पालन कौशल्‍य प्रशिक्षण कार्यक्रम राबविण्‍यात येत आहे. रेशीम किटक व मधमाशा हे दोन्ही मानवाच्या फायद्याचे किटक असून निसर्गात समतोल राखण्‍यास याची आपणास मदत होते. मधमामाच्या पोळयातील प्रत्येक माशीचे शिस्तबध्द काम, राणी माशी, कामकरी माशी, नर माशीचे सांधीक कार्य तसेच रेशीम किटक हे स्वत:चे जीवन समर्पन करून मानवाला रेशीम धागा देतो,  यापासुन मानवास अनेक गोष्‍टी शिकण्‍यासारख्‍या आहेत.

प्रशिक्षणाबाबत माहिती देतांना श्री. प्रशांत खंदारे म्‍हणाले की, सदर प्रशिक्षण तीन महिण्याचे असून ग्रामीण भागातील युवकांत उद्योजकता विकास व्हावा व रेशीम उद्योजक निर्माण व्हावेत या उद्देश्‍याने आयोजित करण्‍यात आले आहे. प्रास्‍ताविकात प्रशिक्षणाचे आयोजक डॉ चंद्रकांत लटपटे यांनी रेशीम किटकांचा जीवनक्रम, रेशीम किटक संकरवाण निर्मीती, विद्यापीठातील संशोधन कार्य याबाबत मार्गदर्शन करून प्रशिक्षणाची सविस्‍तर माहिती दिली.

कार्यक्रमाचे सुत्रसंचालन वरिष्ठ संशोधन सहाय्यक श्री. धनंजय मोहोड यांनी केले तर आभार डॉ. पी. एस. नेहेरकर यांनी मानले. कार्यक्रमास डॉ. मिलिंद सोनकांबळे, डॉ. अनंत लाड, डॉ. जायवार, पाणी व्यवस्थापन योजनाचे प्रभारी अधिकारी डॉ. हरीश आवारी, ऊत्ती संवर्धन प्रयोगशाळेचे प्रभारी अधिकारी डॉ. आनंद दौडे, डॉ.प्रविण घाडगे, डॉ. सदावर्ते आदीसह विद्यापीठातील अधिकारी व कर्मचारी आणि परभणी जिल्हयातील ४० प्रशिक्षणार्थी उपस्थित होते.


Thursday, December 22, 2022

कृषि ड्रोन पायलट प्रशिक्षण संस्थेच्‍या उभारणीकरिता वनामकृविचा सामजंस्‍य करार

कृषि ड्रोन पायलट प्रशिक्षण संस्थेच्‍या उभारणीकरिता वनामकृविचा सामजंस्‍य करार

कृषी क्षेत्रात काटेकोर आणि अचूक पद्धतीने विविध कामे करण्याकरिता ड्रोनचा वापर वाढणार असुन विविध पिकात किड-रोग व्‍यवस्‍थापन, अन्‍नद्रव्‍य व्‍यवस्‍थापन, पाणी व्यवस्थापनासाठी, शेतातील माहिती संकलन यासाठी ड्रोनचा वापर करण्याचे प्रयत्न केले जात आहेत. ड्रोनचा वापर करण्यासाठी नागरी विमान वाहतूक संचालनालयाने ड्रोन वापराबाबत नियम आखुन दिलेले आहेत. त्यानुसार ड्रोन चालवण्यासाठी ड्रोन पायलट परवाना आवश्‍यक आहे. हा परवाना नागरी विमान वाहतूक संचालनालयाने अधिकृत केलेल्‍या ड्रोन पायलट प्रशिक्षण संस्थेकडून घ्यावा लागतो. 

अधिकृत ड्रोन पायलट प्रशिक्षण संस्‍था वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठात स्‍थापन करण्‍या‍च्‍या दृष्‍टीने वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ आणि गुरूग्राम (हरियाणा) येथील आईओटेक वर्ल्ड एविएशन प्राइवेट लिमिटेड यांच्‍यात दिनांक २० डिसेंबर रोजी सामजंस्‍य करार करण्‍यात आला. सामजंस्‍य करारावर कुलगुरू मा. डॉ. इन्‍द्र मणि आणि आईओटेक वर्ल्ड एविएशन प्राइवेट लिमिटेडचे संचालक श्री. अनुपकुमार उपाध्‍याय तसेच विद्यापीठामार्फत डॉ उदय खोडके आणि डॉ विशाल इंगळे यांनी स्वाक्षऱ्या केल्या. यावेळी कुलसचिव डॉ धिरजकुमार कदम, विद्यापीठ नियंत्रिका श्रीमती दिपाराणी देवतराज, कृषि अभियांत्रिकी महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्‍ठाता डॉ उदय खोडके, नाहेप प्रकल्‍प मुख्‍य अन्‍वेषक डॉ गोपाल शिंदे, जनसंपर्क अधिकारी डॉ प्रविण कापसे, डॉ विशाल इंगळे, डॉ दत्‍ता पाटील, आदींची उपस्थिती होती. सामजंस्‍य कराराचा आराखडा कुलगुरू मा डॉ इन्‍द्र मणि यांच्‍या मार्गदर्शनाखाली डॉ उदय खोडके यांनी तयार केला आहे.

सदर करारामुळे पिकनिहाय ड्रोन वापराच्‍या संशोधनास चालना मिळणार असुन ड्रोन आधारित शास्‍त्रशुध्‍द पध्‍दतीने फवारणी करणे, फवारणी करिता विविध प्रकाराचे नोझल तयार करणे, कृत्रिम बुध्‍दीमत्‍ता आणि मशीन लर्निंग तंत्रज्ञानाचा वापर करून योग्‍य गतीने आणि काटेकोरपणे फवारणी करणे याबाबत  प्रशिक्षण व संशोधन कार्यास चालना मिळणार आहे.

कुलगुरू मा डॉ इन्‍द्र मणि यांच्‍या अध्‍यक्षतेखाली असलेल्‍या राष्‍ट्रीय पातळीवरील समितीने नुकतेच नऊ पिकांतील ड्रोन वापराच्‍या सुरक्षित व कार्यक्षम वापराबाबतचे मार्गदर्शक तत्‍वे देशाच्‍या कृषि आणि शेतकरी कल्‍याण मंत्रालयाच्‍या कृषि, सहकार आणि शेतकरी कल्‍याण विभागास सादर केले असुन मृदा आणि पिक अन्‍नद्रव्‍य व्‍यवस्‍थापनाबाबत मार्गदर्शक तत्‍वे तयार करण्‍याकरिता मा डॉ इन्‍द्र मणि यांच्‍या अध्‍यक्षतेखाली नवीन समितीचे गठण करण्‍यात आले आहे. सदरील समिती विविध पिकांमध्‍ये ड्रोन वापराबाबत  मार्गदर्शक तत्‍वे तयार करणार आहेत.

Wednesday, December 21, 2022

राणीसावरगांव येथे आयोजित शेतकरी पशुपालक मेळाव्‍यास मोठा प्रतिसाद

शेतकरी कल्‍याणा‍करिता सर्वांनी एकत्रित कार्य करण्‍याची आवश्‍यकता ....... कुलगुरू मा डॉ इन्‍द्र मणि

विद्यापीठातील पशुशक्‍तीचा योग्‍य वापर योजनेचे कार्य कौतुकास्‍पद ........ जिल्‍हाधिकारी मा श्रीमती आंचल गोयल

विद्यापीठातील पशुशक्‍तीचा योग्‍य वापर संशोधन गोपालकांना पुरक ..... मा श्री गोपालभाई सुतारीया


कृषि क्षेत्रात कार्य करणा-या विविध विभाग व संस्‍था यांनी शेतकरी कल्‍याणाकरिता एकत्रित कार्य करण्‍याची आवश्‍यकता आहे. जिल्‍हा प्रशासन, कृषि विभाग, राज्‍य शासनाचे विविध विभाग, कृषि विद्यापीठ, शेती क्षेत्रात कार्य करणा-यां अशासकीय संस्था, खासगी संस्‍था, केंद्रीय संशोधन संस्‍था आदी संस्‍था कृषि विकासाकरिता कार्य करित आहेत, सर्वांनी एकत्रित कार्य केल्‍यास शेतकरी बांधवाचा विकास प्रभावीपणे करणे शक्‍य असल्‍याचे प्रतिपादन कुलगुरू मा डॉ इन्‍द्र मणि यांनी केली. वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील अखिल भारतीय समन्वयीत संशोधन प्रकल्प पशुशक्‍तीचा योग्य वापर योजना आणि राणी सावरगांव येथील श्री. छत्रपती शिवाजी महाराज गोशाळा यांचे संयुक्त विद्यामाने राणीसावरगांव (ता. गंगाखेड जि. परभणी) येथ दिनांक २० डिसेंबर रोजी आयोजित विद्यापीठ विकसित बैलचलित अवजारांचा समावेश असलेले भाडेतत्वावर कृषि अवजारे सेवा केंद्राचे (कस्टम हायरिंग सेंटर) उदघाटन व शेतकरी पशुपालक मेळाव्‍याच्‍या अध्‍यक्षस्‍थानावरून ते बोलत होते.

कार्यक्रमास उदघाटक म्‍हणुन परभणी जिल्हाधिकारी मा श्रीमती आंचल गोयल या उपस्थिती होत्‍या तर प्रमुख अतिथी म्‍हणुन अहमदाबाद येथील बंसी गिर गोशाळाचे अध्यक्ष मा. गोपालभाई सुतारीया उपस्थित होते. व्‍यासपीठावर मुंबई येथील ग्लोबल विकास ट्रस्टचे मुख्यसंचालक मा. श्री मयंक गांधी, भारतीय जीव पशु कल्याण व राष्‍ट्रीय पंचगव्य अनुसंधान समितीचे सदस्य श्री. सुनिल मानसिंहका, संशोधन संचालक डॉ दत्‍तप्रसाद वासकर, कृषि सहसंचालक श्री साहेबराव दिवेकर, प्राचार्य डॉ उदय खोडके, विभाग प्रमुख डॉ गजेंद्र लोंढे, जिल्‍हा अधिक्षक कृषि अधिकारी श्री विजय लोखंडे,  उपजिल्‍हाधिकारी श्री सुधीर पाटील,  आयोजक संशोधन अभियंता डॉ स्मिता सोलंकी, गोशाळाचे संचालक श्री शिवप्रसाद कोरे, डॉ राहुल रामटेके आदीची प्रमुख उपस्थिती होती.

कुलगुरू मा डॉ इन्‍्रद मणि पुढे म्‍हणाले की, जागतिक स्‍तरावर आणि देशात पाणी, मृदा, ऊर्जा आदीसह नैसर्गिक साधनसंपत्‍तीचे मोठा -हास होत आहे. शाश्‍वत शेती करिता नैसर्गिक साधनसपत्‍तीचे संवर्धन करण्‍याची जबाबदारी प्रत्‍येकाची आहे. शेतीला शेती पुरक व्‍यवसायाची जोड देण्‍याची गरज आहे. मृदाचे आरोग्‍य सुधारण्‍याकरिता शेणखताचा वापर वाढविणे गरजे, यात शेतीतील पशुधनाची महत्‍वाची भुमिका आहे. परभणी कृषि विद्यापीठातील पशुशक्‍तीचा योग्‍य वापर योजनेच्‍या माध्‍यमातुन अनेक उपयुक्‍त कृषि अवजारे नि‍र्माण केली असुन त्‍याच्‍या प्रसार संपुर्ण राज्‍यात करण्‍याचा मोठा प्रयत्‍न केला जात आहे. राज्‍यातील आदिवासी शेतकरी बांधवापर्यंत ही अवजारे पोहचिण्‍याचे चांगले कार्य होत असल्‍याचे ते म्‍हणाले.   

मार्गदर्शनात जिल्‍हाधिकारी मा श्रीमती आंचल गोयल म्‍हणाल्‍या की, शेतीत नवनवीन तंत्रज्ञानामुळे उत्‍पादन व उपन्‍न वाढ होत आहे. शेतकरी बांधवा स्‍वय: अध्‍यायन  करून शेती केली पाहिजे. परभणी कृषि विद्यापीठाच्‍या पशुशक्‍तीच्‍या योग्‍य वापर योजनेचे कार्य अत्‍यंत कौतुकास्‍पद असुन या योजनेत विकसित केलेले विविध कृषि अवजारांना शासकीय अनुदान देण्‍याकरिता प्रयत्‍न केला जाईल, यास जिल्‍हा निधीतही तरतुद केली जाईल. बदलत्‍या हवामानास अनुकुल शेती पध्‍दतीचा अवलंब करावा लागेल, सोयाबीन व कापुस ही एकच एक पिक पध्‍दतीतुन बाहेर पडले पाहिजे. परभणी जिल्‍हयातील फळबाग लागवडीचे क्षेत्र वाढीकरिता जिल्‍हा प्रशासन प्रयत्‍न करित असुन याचे दृश्‍य परिणाम येणा-या दिवसात दिसतील. कृषी विद्यापीठाच्‍या माध्‍यमातुन जिल्‍हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्‍या योजने अंतर्गत रेशीम उद्योग, मधुमक्षिका पालन, अन्‍न प्रक्रिया आदीवर आधारित विविध कौशल्‍य विकास कोर्सेस सुरू करण्‍यात येत असुन जास्‍तीत जास्‍त युवकांनी याचा लाभ घेण्‍याचे त्‍यांनी आवाहन केले. 

मा श्री गोपालभाई सुतारिया म्‍हणाले की, भारतीय संस्‍कृतीत गायीस माता म्‍हटले असुन शेतीत गायीस मोठे महत्‍व आहे. केवळ दुध उत्‍पादनाकरिता गायीचे संगोपन नसुन गायीचे शेण व मलमुत्र यांच्‍या वापरामुळे मातीतील कर्बाचे प्रमाणात वाढी मोठी मदत होते. यापासुन निर्माण केलेले गोअमृत यामुळे किड, रोग व्‍यवस्‍थापन, उत्‍पादन वाढ शक्‍य आहे. परभणी कृषि विद्यापीठाच्‍या पशुशक्‍तीचा योग्‍य वापर योजनेच्‍या माध्‍यमातुन बैलचलित अवजारे निर्मिती व संशोधन हे गोपालक व गोशाळा वयवस्‍थापकांना पुरक असल्‍याचे सांगुन त्यांनी बंसी गिर गोशाळा करित असलेल्‍या विविध कार्याची माहितीचे सादरिकरण केले.

यावेळी मनोगतात श्री सुनिल मानसिंहका यांनी भारतीय गोवंशाचे संगोपन व संवर्धन करण्‍याची गरज असल्‍याचे सांगितले तर श्री मयंक गांधी यांनी वृक्ष लागवड करतांना फळबागे लागवडीवर भर देण्‍याचा सल्‍ला दिला. संशोधन संचालक डॉ दत्‍तप्रसाद वासकर म्‍हणाले की, परभणी कृषि विद्यापीठातील पशुशक्‍तीचा योग्‍य वापर योजना ही राज्‍यातील एकमेव प्रकल्‍प बैलचलित अवजार निर्मितीकरिता कार्य करित असल्‍याचे सांगितले तर लातुर विभागीय कृषी सहसंचालक श्री साहेबराव दिवेकर यांनी विविध कृषि विषयक योजनेचा लाभ घेण्‍याचे आवाहन शेतकरी बांधवांना केले.

कार्यक्रमाच्‍या प्रास्‍ताविकात आयोजक डॉ स्मिता सोळंकी म्‍हणाल्‍या की, राणी सावरगांव येथे उभारण्‍यात आलेल्‍या भाडेतत्वावर कृषि अवजारे सेवा केंद्रात विद्यापीठ विकसित बैलचलित अवजारे परिसरातील शेतकरी बांधवांना भाडेतत्‍वावर वापराकरिता राणीसावरगांव येथील श्री. छत्रपती शिवाजी महाराज गोशाळा येथे उपलब्ध करून देण्यात आली असुन या अवजारांचे प्रात्यक्षिके प्रत्यक्ष शेतावर दाखवण्यात येणार असल्‍याचे सांगितले.  तर श्री शिवप्रसाद कोरे यांनी सदर अवजारांचा लाभ जास्‍तीत जास्‍त शेतकरी बांवधांनी होण्‍याकरिता श्री छत्रपती शिवाजी महाराज गोशाळा प्रयत्‍नशील राहील, असे आश्‍वासन दिले.

कार्यक्रमाचे सुत्रसंचालन श्री संदेश देशमुख यांनी केले तर आभार शिवसांब कोरे यांनी मानले. कार्यक्रमास राणी सावरगांव व परिसरातील एक हजार पेक्षा जास्‍त शेतकरी बांधव, व शेतकरी महिला उपस्थित होते. कार्यक्रम यशस्‍वीतेकरिता विद्यापीठातील अधिकारी, कर्मचारी आणि राणी सावरगांव येथील गावक-यांनी परिश्रम घेतले.

राणी सावरगांव येथे उभारण्‍यात आलेल्‍या भाडेतत्वावर कृषि अवजारे सेवा केंद्रात विद्यापीठ विकसित बहुविध पेरणी यंत्र, धसकटे गोळा करणे अवजार, तिहेरी कोळपे, बैलचलित सरी पाडणे यंत्र, ऊसाला माती लावणे अवजार, हळदीला माती लावणे अवजार, हळद काढणी अवजार, एक बैलाची अवजारे, कापसातील कोळपणी व खत देणे अवजार, बैलचलित सोलार तणनाशक व किटकनाशक फवारणी यंत्र, आजारी पशुधन उभा करणे यंत्र इत्यादी विविध अवजारे उपलब्‍ध करण्‍यात आली आहेत.





Sunday, December 18, 2022

दिनांक १ जानेवारी ते ५ जानेवारी २०२३ दरम्‍यान सिल्‍लोड (औरंगाबाद) येथे राज्‍यस्‍तरीय सिल्‍लोड कृषी महोत्‍सव

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त आणि महाराष्ट्रातील चारही कृषी विद्यापीठांना ५० वर्षे पूर्ण झाली असून या विद्यापीठांनी विकसित केलेले तंत्रज्ञान शेतक-यांपर्यंत पोहोचविण्‍याच्‍या दृष्‍टीने कृषी विभागाच्‍या पुढाकाराने दिनांक १ जानेवारी ते ५ जानेवारी, २०२३ या कालावधीत राज्‍याचे कृषि मंत्री मा ना अब्‍दुल सत्‍तार यांच्‍या संकल्‍पनेतुन सिल्लोड (जि. औरंगाबाद) येथे राज्यस्तरीय सिल्लोड कृषि महोत्सव - २०२३ पार पडणार आहे. पाच दिवस चालणा-या महोत्‍सवात राज्यातील चारही कृषि विद्यापीठांनी केलेले संशोधन नवीन वाणांची निर्मिती याबाबत माहिती, कृषि प्रात्‍यक्षिके पाहण्‍यास मिळणार असुन शेतकऱ्यांशी थेट संवाद, विविध चर्चासत्रे आणि प्रात्यक्षिके आणि विविध योजनांची शेतकऱ्यांना थेट माहिती हे या महोत्सवाचे वैशिष्ट्य आहे. 

वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ (परभणी), महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहूरी (अहमदनगर), डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ (अकोला), आणि डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोली (जि. रत्नागिरी) या चार विद्यापीठांनी केलेली संशोधने, कृषी विभागाची प्रात्यक्षिके, परिसंवाद, तंत्रज्ञान, राज्यातील शेतक-यांच्या यशोगाथा, असे एकत्रित सादरीकरण करणारा हा पहिलाच राज्यस्तरीय कृषी महोत्सव असुन यात राज्यभरातील विविध प्रयोग ज्यामध्ये उत्पादनक्षम शेती, एकात्मिक पीक व्यवस्थापन, एकात्मिक किड व रोग व्यवस्थापन, एकात्मिक शेती व्यवस्थापन, सेंद्रिय व नैसर्गिक शेतीची प्रात्यक्षिके विद्यापीठांकडून सादर केली जाणार आहेत. राज्यभरातील जवळपास १० लाख शेतकरी या महोत्सव आणि प्रदर्शनास भेट देतील, असा विश्वास कृषि मंत्री मा ना अब्‍दुल सत्‍तार यांनी व्यक्त केला आहे.

आगामी वर्ष हे आंतरराष्ट्रीय स्तरावर २०२३ हे वर्ष भरड धान्यांचं म्हणून साजरे होणार असुन यात महाराष्ट्राची भुमिका, महाराष्ट्राच्या कृषी विभागाचे कार्यक्रम यावरही महोत्सवातील चर्चासत्रांमधून विचारमंथन होणार आहे. महोत्सवात कृषि विद्यापीठाच्या समन्वयाने विविध पिकांच्या लागवड तंत्रज्ञान पासून ते विपणनापर्यंत माहिती देणाऱ्या चर्चासत्रांचे आयोजन करण्यात आले आहे. कापूस, सोयाबीन आणि इतर तेलबियांच्या प्रक्रिया उद्योग, त्यासंबंधी होणारं संशोधन, नवीन वाणांचं संशोधन, बदलेले वातावरण पर्जन्य आणि उष्णता यांच्या बदलांचा वेध घेऊन करण्यात येत असलेलं संशोधन याचेही सादरीकरण महोत्सवात करण्यात येणार आहे.

महोत्सवात कृषि विभाग, कृषि विद्यापीठे यांच्यासह शासनाचे विविध विभाग याबरोबरच कृषि तंत्रज्ञानात सहभाग असणारे विविध खासगी कंपन्‍या यांची दालने असणार आहेत. कृषी विभागाच्या दालनामध्ये एकात्मिक पाणलोट व्यवस्थापन, पोकरा, स्मार्ट, काढणी पश्चात तंत्रज्ञान, फळप्रक्रिया यांचा समावेश राहणार असुन बाजारपेठांचं नवीन तंत्रज्ञान, ड्रोन तंत्रज्ञान याची माहिती दिली जाणार आहे. याशिवाय कृषी विज्ञान केंद्र, महाराष्ट्र कृषी उद्योग विकास महामंडळ, महाबीज, महाराष्ट्र राज्य वखार महामंडळ, राष्ट्रीय फलोत्पादन अभियान अशा योजनांची माहिती दालने, कृषी निविष्ठा, तंत्रज्ञान, सिंचन साधने, शेतीविषयक अवजारे, मशिनरी, नवनवीन यांत्रिकीकरण, ऑटोमेटेड फार्मिंग, शेतीपूरक लघुउद्योगांसाठी विशेष दालन, राज्यभरातील विविध शेतकरी गटांनी तयार केलेली उत्पादने आदींसह महोत्सवात एकूण सहाशे दालने असणार आहेत. तसेच सायंकाळी शेतकऱ्यांसाठी आणि महोत्सवात सहभागी होणाऱ्या नागरिकांसाठी विविध प्रबोधानात्मक व सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले आहे. तर‍ि अधिकाधिक शेतकऱ्यांनी या महोत्सवास भेट देऊन येथील चर्चासत्रे, प्रदर्शन, प्रात्यक्षिके याचा लाभ घ्यावा, असे आवाहन कृषि विभाग (महाराष्‍ट्र राज्‍य) आणि वसंतराव नाईक मराठवाडा कृृृषि विद्यापीठ यांच्‍या वतीने करण्‍यात येत आहे.