Wednesday, September 30, 2020

बदनापुर (जालना) येथील कृषि विज्ञान केंद्राच्‍या वतीने राष्ट्रीय पोषण महिना निमित्‍त ऑनलाईन महिला प्रशिक्षण संपन्‍न

सोयाबीन हे प्रथिने व उर्जा या पोषक घटकाचे उत्तम सत्रोत.... डॉ. डी. बी. देवसरकर

वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी अंतर्गत असलेल्‍या बदनापुर येथील कृषी विज्ञान केंद्राच्‍या वतीने राष्ट्रीय पोषण महिना निमित सोयाबीनवर आधारित प्रक्रिया उद्योग निर्मिती व त्याची पोषण मुल्येया विषयावर जागतिक हृदय दिनाचे औचित्य साधून दिनांक २९ स्पटेंबर रोजी एक दिवसीये ऑनलाईन पद्धतीने महिला प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

कार्यक्रमाच्‍या अध्‍यक्षस्‍थानी विस्‍तार शिक्षण संचालक डॉ. डी. बी. देवसरकर हे होते तर प्रमुख व्‍यक्‍त्‍या कृषी अभियांत्रिकी महाविद्यालयाच्‍या डॉ. स्मिता खोडके, कृषि विज्ञान केंद्राचे प्रमुख डॉ. एस. डी. सोमवंशी आदींची प्रमुख उपस्थिती होती.

अध्‍यक्षीय मार्गदर्शनात डॉ. डी. बी. देवसरकर म्‍हणाले की, सोयाबीन हे प्रथिने, उर्जा व स्निग्ध पदार्थ यांचे उत्तम स्‍त्रोत आहे. सोयाबीनमधील प्रथिने इतर अन्नपदार्थच्या (वनस्पतीजन्य) तुलनेत जास्त चांगल्या प्रतीची असतात. यामुळे सोयाबीन मधील प्रथिनांची तुलना प्राणीज पदार्थातील प्रथिनांसोबत जसे की अंडी, मांस यांच्या बरोबरीने असते. स्निग्ध पदार्थाचे भरपूर प्रमाण असलेले एकमेव कडधान्य (गळीत धान्याच्या बरोबरीने) म्हणुन याची गणना करण्यात येते.

तांत्रिक सत्रात डॉ. स्मिता खोडके यांनी सोयाबीनवर आधारित प्रक्रिया उद्योग निर्मिती यावर मार्गदर्शन केले तर सोयाबीन पोषण मुल्ये व त्या पासून विविध पदार्थ निर्मिती यावर विषय विशेषज्ञ (गृह विज्ञान) डॉ. साधना उमरीकरयांनी मार्गदर्शन केले. तसेच उपस्थित महिला शेतकऱ्यांच्या शंकाचे निरसन हि केले. यावेळी डॉ. एस. डी. उमरीकर, डॉ एस. डी. सोमवंशी, डॉ. आर. एल. कदम  व डॉ. डी. आर. कांबळे द्वारे लिखित  समतोल आहार व पोषक थाळीयावरील घडीपत्रिकेचे विमोचन मान्‍यवरांनी केले.

प्रास्ताविक डॉ. एस. डी. सोमवंशी यांनी केले तर सुत्रसंचालन विषय विशेषज्ञ (विस्तार शिक्षण) डॉ. राहुल कदम यांनी केले. कार्यक्रमास राज्‍यातून शेतकरी महिला, लघु उद्योजक व अधिकारी यांनी मोठ्या प्रमाणात उपस्थिती दर्शविली.

Saturday, September 26, 2020

सेंद्रीय पध्दतीने करा पिकांची लागवड ........... शास्त्रज्ञ डॉ. एन. रविशंकर

वनामकृवित आयोजित पंधरा दिवसीय प्रशिक्षण कार्यक्रमात प्रतिपादन

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील सेंद्रीय शेती संशोधन आणि प्रशिक्षण केंद्र, पशुशक्तीचा योग्य वापर प्रकल्प व फार्म टु फोर्क, मुबंई यांचे सयुक्‍त विद्यमाने आयोजित राज्यस्तरीय पंधरा दिवसीय ऑनलाईन सेंद्रीय शेती प्रशिक्षण कार्यक्रमाच्या चौथ्या दिवशी दिनांक 24 सप्‍टेबर रोजी मोदीपुरम (उत्तर प्रदेश) येथील सेंद्रिय शेती नेटर्वक प्रकल्पाचे प्रमुख शास्त्रज्ञ डॉ. एन. रविशंकर व अकोला येथील डॉ पंजाबाराव देशमुख कृषि विद्यापीठातील विस्तार कृषि विद्यावेत्ता डॉ. विनोद खडसे हे प्रमुख वक्ते होते. कार्यक्रमाच्‍या अध्‍यक्षस्‍थानी बंगलुरू येथील कृषि विद्यापीठाचे माजी संचालक संशोधन डॉ. एम. ए. शंकर होते तर डॉ. वासुदेव नारखेडे, वाशिम येथील प्रगतशील शेतकरी श्री. गोविंद देशमुख यांची प्रमुख उपस्थिती होती.

अध्‍यक्षीय भाषणात डॉ. एम. ए. शंकर म्‍हणाले की, जमिनीतील सेंद्रिय पदार्थांमुळे जमिनीचे आरोग्य सुधारते, जमिनीचा पोत, पाणी धरुन ठेवण्याची क्षमता वाढते आणि पिंकाना संतुलित अन्नद्रव्याची उपलब्धता होते. सेंद्रिय पदार्थ जमिनीतील अन्नद्रव्य उपलब्ध स्वरुपात आणण्याचे काम करत असून हे एक प्रकारचे जमिनीचे दुधच आहे, ज्यामुळे सुक्ष्मजीवाणू आणि जमिन ही जीवंत राहते, अशा प्रकारच्या प्रशिक्षणाची हीच योग्य वेळ असल्याचे त्यांनी नमुद केले.

डॉ. एन. रविशंकर यांनी सेंद्रिय पध्दतीने पिकांचे लागवड तंत्रज्ञान या विषयी मार्गदर्शन करतांना म्‍हणाले की, वर्षातुन किमान एक वेळा हिरळवळीचे खत जमिनीत गाडावे, पिकांची लागवड करतांना मिश्र पिक आणि अंतरपिक पध्दतींचा वापर करावा, किंडीचे आणि रोगांचे सेंद्रिय पध्दतीने नियंत्रण करतांना लिंबाच्या पानांचा रस उपयोगात आणावा, शेताच्या बांधावर एरंडीसारखी पिके लावावीत.

डॉ. विनोद खडसे यांनी सेंद्रिय शेतीमध्ये कंपोस्टींगचे महत्व यावर मार्गदर्शन केले. ते म्‍हणाले की, कंपोस्टींगच्या वेगवेगळया पध्दती जसे नॉडेप, मुलस्थानी, परस्थानी, प्राणवायूसहित, प्राणवायूरहित, कुजविणे, सडविणे आदीं शेतकरी बांधवांनी अमलात आणाव्यात. कंपोस्टींग पध्दतीला प्रभावित करणारे घटक उदा. कर्ब : नत्रांचे गुणोत्तर प्रमाण, आर्द्रता, हवेचे प्रमाण, खडयांचा आकार, तापमान, सामु इत्यादीचे महत्व त्यांनी सांगितले.

प्रगतशील शेतकरी श्री. गोविंद देशमुख यांनी त्यांचे अनुभव कथन केले तर डॉ. वासुदेव नारखेडे यांनीही आपले मनोगत व्‍यक्‍त केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. आनंद गोरे सुत्रसंचालन डॉ ज्योती गायकवाड यांनी केले. सदरिल ऑनलाईन प्रशिक्षण कार्यक्रमात मोठया संख्‍येने शेतकरी बंधु भगिनी, शेतकरी युवक, युवती, विद्यार्थी, उद्योजक सहभागी झाले आहेत.

Thursday, September 24, 2020

वनामकृवित रबी पिकांसाठी उपयुक्‍त द्रवरूप जिवाणु खते विक्रीकरिता उपलब्‍ध

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील मृद विज्ञान व कृषि रसायनशास्त्र विभागातंर्गत असलेल्या अखिल भारतीय मृदा जैव विविधता - जैविक खत प्रकल्पातंर्गत रब्बी हंगामाच्या विविध पिकांसाठी विद्यापीठ उत्पादित उपयुक्त द्रवरुप जिवाणू खते शेतक­यांना विक्री करिता उपलब्ध आहेत.

जिवाणू खतांमध्ये रायझोबियम, अॅझोटोबॅक्टर, स्फुरद विरघळविणारे जिवाणू खत (पीएसबी), पालाश विरघळविणारे व वहन करणारे जिवाणू खत, जस्त उपलब्धता वाढविणारे जिवाणू खत, रायझोफॉस (भुईमुग व हरभरा पिकांसाठी), अॅझोटोफॉस (गहू, करडई, ज्वारी आदी पिकांसाठी) व नत्र, स्फुरद, पालाश, गंधक आणि जस्त (एनपीके, सल्फर, झिंक) यांचे एकत्रित द्रवरुप जिवाणू खत कापुस, हळद, ऊस, आद्रक, पपई, पेरु, केळी, डाळींब, टरबुज, खरबुज, संत्रा, मोसंबी, फळभाज्या व पालेभाज्या इत्यादी पिकांसाठी रुपये 375 प्रति लिटर या माफक दराने शेतक­यांसाठी उपलब्ध आहेत. अशी माहीती या प्रकल्पाचे प्रमुख संशोधक डॉ. अनिल धमक यांनी दिली.

द्रवरुप जिवाणू खतांची उपयुक्तता व फायदे

जिवाणू खत म्हणजे पिकांसाठी उपयुक्त जीवंत किंवा सुप्त अवस्थेतील जिवाणूंचे निर्जंतुक वाहकामध्ये केलेले मिश्रण होय. बियाण्यास बीजप्रक्रिया, रोपास अंतरक्षीकरण किंवा मातीतून वापरल्यास जमिनीतील उपयुक्त जिवाणुंच्या संख्येत वाढ होऊन आवश्यक अन्नद्रव्यांचा पुरवठा होतो. परिणामी उत्पादनात वाढ होते. जमिनीचा पोत सुधारण्यासाठी मदत होते. जमीन जैविक क्रियाशिल बनते. मुळांच्या संख्येत व लांबीत भरपुर वाढ होऊन मुख्य खोडांपासुन दुरवरील तसेच खोलवरील अन्नद्रव्य, पाणी पिकास उपलब्ध होते. पिकांची रोग व किड प्रतिकार शक्ती वाढते. पिकांना अन्नद्रव्ये जमिनीतून शोषण करण्यास मदत करतात तसेच जमिनीची नैसर्गिक सुपिकता टिकून ठेवतात. जिवाणू खतांमुळे पिकांना दिलेल्या रासायनिक खतांचा कार्यक्षमरित्या वापर होण्यास मदत होते.

सेंद्रीय उत्पादनास योग्य बाजारभाव मिळवण्यासाठी प्रमाणीकरण आवश्‍यक...........डॉ. अे. के. यादव

वनामकृवित आयोजित राज्‍यस्‍तरीय प्रशिक्षणाचे ऑनलाईन वेबीनार मालिकेत प्रतिपादन

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील सेंद्रीय शेती संशोधन आणि प्रशिक्षण केंद्रपशुशक्‍तीचा योग्‍य वापर प्रकल्‍प आणि मुंबई येथील फार्म दु फोर्क सोल्‍युशन्‍य यांचे संयुक्‍त विद्यमाने सेंद्रीय शेती यावर पंधरा दिवसीय राज्‍यस्‍तरीय प्रशिक्षणाचे ऑनलाईन वेबीनार मालिकेच्‍या माध्‍यमातुन आयोजन दिनांक २१ सप्‍टेबर ते ९ ऑक्‍टोबर दरम्‍यान करण्‍यात आले असुन प्रशिक्षणाच्‍या दुस-या दिवशी दि. २१ सप्‍टेबर रोजी सेंद्रीय शेती विषयक विविध योजनाबाबत भारत सरकारच्‍या कृषि व शेतकरी कल्याण मंत्रालयातील सल्लागार डॉ. अे. के. यादव व पुणे येथील कृषि आयुक्तालयातील सेंद्रीय शेती राज्य समन्वयक श्री. सुनिल चौधरी यांनी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाच्‍या अध्‍यक्षस्‍थानी संशोधन संचालक डॉ. दत्तप्रसाद वासकर हे होते तर श्री. कराड येथील प्रगतशील शेतकरी श्री अनिल कुलकर्णी हे सहअध्यक्ष होते.

डॉ. अे. के. यादव यांनी भारत सरकारच्‍या सेंद्रीय शेतीच्‍या विविध योजनाबाबत माहिती देतांना म्‍हणाले की, भारतातील प्रादेशिक विविधता लक्षात घेता विविध प्रकारच्या सेंद्रीय उत्पादनास व निर्यातीस मोठा वाव आहे. सेंद्रीय शेतमालास योग्‍य बाजारभाव मिळवण्‍यासाठी प्रमाणीकरण फार गरजेचे असल्‍याचे सांगुन सेंद्रीय शेतमाल प्रमाणीकरणाबाबत सविस्‍तर माहिती दिली. तर श्री. सुनिल चौधरी यांनी सेंद्रीय शेतीसाठी राज्य शासनाच्या योजनांची माहिती देऊन शेतकरी बांधवानी गट प्रमाणीकरणावर करण्‍याचा सल्‍ला त्‍यांनी दिला­ प्रगतशील शेतकरी श्री. अनिल कुलकर्णी यांनीही आपले मनोगत व्‍यक्‍त केले.

अध्‍यक्षीय भाषणात संशोधन संचालक डॉ. दत्तप्रसाद वासकर म्‍हणाले की, सेंद्रीय शेतीत काम करतांना शेतक-यांचे अनुभव अतिशय महत्वाचा असुन विद्यापीठात होत असलेल्या संशोधनात शेतक-यांचा सहभाग असणे गरजेचे आहे. सेंद्रीय शेती करतांना पिकांच्या लागवडीपासून काढणीपर्यंतचे तंत्रज्ञान विकसीत करण्याचा विद्यापीठाचा प्रयत्न आहे. गट माध्‍यमातुन शेतक-यांनी सेंद्रीय शेती व सेंद्रीय प्रमाणीकरण करावे, असा सल्‍ला त्‍यांनी दिला.

कार्यक्रमाचे प्रास्‍ताविक मुख्‍य आयोजन डॉ आनंद गोरे यांनी केले तर सुत्रसंचालन श्री. उमेश कांबळे यांनी केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी डॉ स्मिता सोलुंकी, डॉ. रणजित चव्हाण, डॉ. कैलास गाढे आदीसह विद्यापीठातील अधिकारी व कर्मचारी यांनी परिश्रम घेतले. ऑनलाईन प्रशिक्षणात शेतकरी बंधुभगिनी, शेतकरी युवक, युवती, विद्यार्थी, कृषि उद्योजक मोठया संख्येने सहभागी झाले होते.

Tuesday, September 22, 2020

शेतकरी चिंतामुक्‍त झाला पाहिजे याकरिता सर्वांनी प्रयत्‍न करण्‍याची गरज ..... राज्‍याचे कृषिमंत्री मा ना श्री दादाजी भुसे

वनामकृवित आयोजित सेंद्रीय शेती यावर पंधरा दिवसीय राज्‍यस्‍तरीय प्रशिक्षणाचे ऑनलाईन वेबीनार मालिकेच्‍या उदघाटन प्रसंगी प्रतिपादन

प्रशिक्षणास उत्‍स्‍फुर्त प्रतिसाद, पाच हजार पेक्षा जास्‍त शेतकरी व कृषि विस्‍तारकांनी नोंदविला सहभाग 

सेंद्रीय शेतमालाबाबत ग्राहकांची विश्‍वासहर्ता ही प्रमाणीकरणावर अवलंबुन असुन सेंद्रीय शेतमालाचे प्रमाणीकरण सुलभ होण्‍याच्‍या दुष्‍टीने प्रयत्‍न केला जाईल. राज्‍याचे मुख्‍यमंत्री महोदय मा ना श्री उध्‍दव ठाकरे यांच्‍या संकल्‍पनेतुन विकेल ते पिकेल अभियान राबविण्‍यात येऊन शेतकरी बांधवाकडुन शेतमाल थेट ग्राहकांपर्यत उपलब्‍ध करून देण्‍याचा संकल्‍प आहे. बाजारपेठेचा कल ओळखुन मुल्‍यसाखळी निर्माणकरून शेतमालाला हमीभाव नाही तर हमखास भाव मिळण्‍याकरिता विकेल ते पिकेल अभियान राबविण्‍यात येणार आहे. यात सेंद्रीय शेतमालास प्राध्‍यान्‍य देण्‍यात येईल. अनेक कृषि पदवीधर इतर क्षेत्रात कार्य करतात, परंतु शेती व शेतकरी बांधवाकरिता त्‍यांनी कार्य केले पाहिजे. लॉकडाऊनच्‍या काळात शेतकरी बांधवानी अन्‍नधान्‍य, भाजीपाला, फळ कमी पडु दिले नाहीत, याचे फार मोठे उपकार समाजावर आहेत. शेतकरी बांधवाच्‍या पाठिशी समाज, कृषि विभाग व कृषि विद्यापीठ यांनी खंबीरपणे उभे राहीले पाहिजे. शेतकरी चिंतामुक्‍त झाला पाहिजे, याकरिता सर्वांनी प्रयत्‍न करण्‍याची गरज असल्‍याचे प्रतिपादन राज्‍याचे कृषिमंत्री मा ना श्री दादाजी भुसे यांनी केले.

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील सेंद्रीय शेती संशोधन आणि प्रशिक्षण केंद्र, पशुशक्‍तीचा योग्‍य वापर प्रकल्‍प आणि मुंबई येथील फार्म दु फोर्क सोल्‍युशन्‍य यांचे संयुक्‍त विद्यमाने सेंद्रीय शेती यावर पंधरा दिवसीय राज्‍यस्‍तरीय प्रशिक्षणाचे ऑनलाईन वेबीनार मालिकेच्‍या माध्‍यमातुन आयोजन दिनांक २१ सप्‍टेबर ते ९ ऑक्‍टोबर दरम्‍यान करण्‍यात आले असुन दिनांक २१ सप्‍टेबर रोजी प्रशिक्षणाच्‍या उदघाटनप्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाच्‍या अध्‍यक्षस्‍थानी कुलगुरू मा डॉ अशोक ढवण होते तर विशेष अतिथी म्‍हणुन गुजरात येथील आनंद कृषि विद्यापीठाचे कुलगुरू मा डॉ आर व्‍ही व्‍यास हे उपस्थित होते.  संशोधन संचालक डॉ दत्‍तप्रसाद वासकर, नागपुर येथील क्षेत्रीय जैविक शेती केंद्राचे क्षेत्रीय संचालक डॉ ध्रुवेंद्र कुमार, भारत सरकारच्‍या कृषि व शेतकरी कल्‍याण मंत्रालयातील सल्‍लागार डॉ ए के यादव, कृषि आयुक्‍तालयातील कृषि संचालक श्री दिलीप झेंडे, प्रगतशील शेतकरी श्री सोपानराव अवचार, आयोजक डॉ आनंद गोरे, डॉ स्मिता सोळंकी, डॉ उमेश कांबळे आदींची प्रमुख उपस्थिती होती.  

कृषिमंत्री मा ना श्री दादाजी भुसे पुढे म्‍हणाले की, हरितक्रांतीमुळे देश अन्‍नधान्‍यात स्‍वयंपुर्ण झाला, वाढत्‍या लोकसंख्‍येला अन्‍नाची गरज लक्षात घेऊन जास्‍त उत्‍पादनाकरिता आपण शेतीत संकरित वाण, रासायनिक किटकनाशके, खते आदींचा वापर केला. परंतु रासायनिक खतांचा व किटकनाशकांच्‍या अति वापरामुळे मानवी आरोग्‍यावर गंभीर परिणाम पाहता सेंद्रीय शेतीचे महत्‍व वाढतांना दिसत आहे, कोरोना विषाणुच्‍या प्रादुर्भावात सेंद्रीय शेतीचे महत्‍व अधिकच अधोरेखित झाले आहे. सेंद्रीय शेती यशस्‍वीपणे करणारे अनेक शेतकरी बांधव आहेत,त्‍यांचा अनुभव इतर शेतकरी बांधवासाठी महत्‍वाचा असुन सेंद्रीय शेतीतील अडचणी लक्षात घेऊन शासनस्‍तरावर योग्‍य ते धोरण आखण्‍यात येईल.

अध्‍यक्षीय समारोपात कुलगुरू मा डॉ अशोक ढवण म्‍हणाले की, सेंद्रीय शेतमालाची देशांतर्गत व विदेशीतील बाजारपेठ वाढत आहे. मनुष्‍याच्‍या आरोग्‍य विषयक संकल्‍पना बदलत आहे, ग्राहक विषमुक्‍त अन्‍नाकडे वळत आहेत. त्‍यामुळे सेंद्रीय शेतमालास वाढती मागणी पा‍हाता, सेंद्रीय शेतमाल उत्‍पादनाची व्‍याप्‍ती वाढत आहे. शासन, कृषि विभाग व कृषि विद्यापीठ सेंद्रीय शेतीस चालना देत आहे. छोटे व मध्‍यम शेतकरी बांधव एकत्रित येऊन गटाच्‍या माध्‍यमातुन सेंद्रीय शेती केल्‍यास निश्चितच त्‍यांना लाभ होणार आहे. सेंद्रीय शेतीस लागणा-या निविष्‍ठांची निर्मिती शेतकरी बांधवानी स्‍वत: केल्‍यास उत्‍पादन खर्च कमी होऊन आर्थिक लाभ जास्‍त होईल. विद्यापीठ उत्‍पादीत द्रवरूप जैविक खते व बॉयोमिक्‍सला शेतकरी बांधवाची मोठी मागणी होत असल्‍याचेही ते म्‍हणाले.

मार्गदर्शनात आनंद कृषि विद्यापीठाचे कुलगुरू मा डॉ आर व्‍ही व्‍यास यांनी गुजरात राज्‍यातील शेतीत व सेंद्रीय शेतीत द्रवरूप जैविक खतांचा मोठया प्रमाणात केला जात असल्‍याचे सांगुन त्‍यांनी द्रवरूप जैविक खतांचा महत्‍व व वापराबाबत सविस्‍तर मार्गदर्शन केले. संशोधन संचालक डॉ दत्‍तप्रसाद वासकर यांनी परभणी कृषि विद्यापीठाच्‍या सेंद्रीय शेती संशोधन कार्याबाबत माहिती दिली. यावेळी भारत सरकारच्‍या कृषि व शेतकरी कल्‍याण मंत्रालयातील सल्‍लागार डॉ ए के यादव, कृषि आयुक्‍तालयातील कृषि संचालक श्री दिलीप झेंडे, प्रगतशील शेतकरी श्री सोपानराव अवचार आदींनीही आपले मनोगत व्‍यक्‍त केले.

प्रास्‍ताविकात आयोजक डॉ आनंद गोरे यांनी प्रशिक्षणाबाबतची पार्श्‍वभुमी सांगितली. सुत्रसंचालन डॉ प्रविण कापसे व डॉ पपिता गौरखेडे यांनी केले तर आभार डॉ स्मिता सोळंकी मानले. प्रशिक्षण कार्यक्रमाचे समन्‍वयक डॉ रणजित चव्‍हाण, डॉ अनुराधा लाड, श्री अभिजीत कदम असुन कार्यक्रम यशस्‍वीतेसाठी विद्यापीठातील अधिकारी व कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.  

सदरील पंधरा दिवसीय प्रशिक्षणात सेंद्रीय पीक लागवड तंत्रज्ञान, सेंद्रीय शेतीमध्‍ये अन्‍नद्रव्‍य व्‍यवस्‍थापन, कीड व रोग व्‍यवस्‍थापन, अवजारांचा कार्यक्षम वापर, सौर ऊर्जा व इतर अपारंपारिक साधनांचा वापर, निविष्‍ठांची निर्मिती व वापर, विक्री व बाजारपेठ तंत्रज्ञान, सेंद्रीय प्रमाणीकरण आदी विविध विषयांवर राज्‍यातील व देशातील नामांकित कृषि विद्यापीठे, संशोधन संस्‍था, स्‍वयंसेवी संस्‍थेतील तज्ञ मार्गदर्शन करणार आहेत. सदरिल प्रशिक्षणाकरिता ५००० पेक्षा जास्‍त शेतकरी बंधु भगिनी, कृषि विज्ञान केद्राचे विषय विशेषज्ञ, कृषि शास्‍त्रज्ञ, कृषि विभागातील अधिकारी, कर्मचारी, स्‍वयंसेवी संस्‍थाचे सदस्‍य, विद्यार्थी आदींनी सहभागाकरिता नोंदणी केली असुन प्रशिक्षण यशस्‍वीरित्‍या पुर्ण करणा-यांना डिजिटल प्रमाणपत्राचे वितरित करण्‍यात येईल. संपुर्ण कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण विद्यापीठाचे युटयुब चॅनेल youtube.com/user/vnmkv यावर होणार आहे.

Sunday, September 20, 2020

वनामकृविच्‍या वतीने सेंद्रीय शेती वर राज्‍यस्‍तरीय ऑनलाईन पंधरा दिवसीय प्रशिक्षणाचे आयोजन

राज्‍याचे कृषिमंत्री मा ना श्री दादाजी भुसे यांच्‍या प्रमुख उपस्थित ऑनलाईन उदघाटन

देशातील नामांकित तज्ञ करणार मार्गदर्शन, रोज सायंकाळी ७.०० वाजता ऑनलाईन मार्गदर्शन 

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील सेंद्रीय शेती संशोधन आणि प्रशिक्षण केंद्र, पशुशक्‍तीचा योग्‍य वापर प्रकल्‍प आणि मुंबई येथील फार्म दु फोर्क सोल्‍युशन्‍य यांचे संयुक्‍त विद्यमाने दिनांक २१ सप्‍टेबर ते ९ ऑक्‍टोबर दरम्‍यान सेंद्रीय शेती यावर पंधरा दिवसीय राज्‍यस्‍तरीय प्रशिक्षणाचे ऑनलाईन वेबीनार मालिकेच्‍या माध्‍यमातुन आयोजन करण्‍यात आले आहे. प्रशिक्षणाचे उदघाटन दिनांक २१ सप्‍टेबर रोजी सायंकाळी ७.०० वाजता राज्‍याचे माननीय कृषिमंत्री मा ना श्री दादाजी भुसे यांच्‍या हस्‍ते ऑनलाईन पध्‍दतीने होणार असुन कार्यक्रमाच्‍या अध्‍यक्षस्‍थानी कुलगुरू मा डॉ अशोक ढवण राहणार आहेत. विशेष अतिथी म्‍हणुन  गुजरात येथील आनंद कृषि विद्यापीठाचे कुलगुरू मा डॉ आर व्‍ही व्‍यास हे उपस्थित राहणार असुन विद्यापीठाचे संशोधन संचालक डॉ दत्‍तप्रसाद वासकर, नागपुर येथील क्षेत्रीय जैविक शेती केंद्राचे क्षेत्रीय संचालक डॉ ध्रुवेंद्र कुमार, भारत सरकारच्‍या कृषि व शेतकरी कल्‍याण मंत्रालयातील सल्‍लागार डॉ ए के यादव, कृषि आयुक्‍तालयातील कृषि संचालक श्री दिलीप झेंडे, प्रगतशील शेतकरी श्री सोपानराव अवचार आदींची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे.

सदरील प्रशिक्षणात सेंद्रीय पीक लागवड तंत्रज्ञान, सेंद्रीय शेतीमध्‍ये अन्‍नद्रव्‍य व्‍यवस्‍थापन, कीड व रोग व्‍यवस्‍थापन, अवजारांचा कार्यक्षम वापर, सौर ऊर्जा व इतर अपारंपारिक साधनांचा वापर, निविष्‍ठांची निर्मिती व वापर, विक्री व बाजारपेठ तंत्रज्ञान, सेंद्रीय प्रमाणीकरण आदी विविध विषयांवर राज्‍यातील व देशातील नामांकित कृषि विद्यापीठे, संशोधन संस्‍था, स्‍वयंसेवी संस्‍थेतील तज्ञ मार्गदर्शन करणार आहेत.

सदरिल प्रशिक्षणात शेतकरी बंधु भगिनी, कृषि विज्ञान केद्राचे विषय विशेषज्ञ, कृषि शास्‍त्रज्ञ, कृषि विभागातील अधिकारी, कर्मचारी, स्‍वयंसेवी संस्‍थाचे सदस्‍य, विद्यार्थी आदींनी जास्‍तीत जास्‍त संख्‍येने उपस्थित राहण्‍याचे आवाहन आयोजन प्रमुख अन्‍वेषक डॉ आनंद गोरे, संशोधन अभियंता डॉ स्मिता सोलंकी, फार्म टु फोर्क सोल्‍युशन्‍सचे संचालक श्री उमेश कांबळे यांनी केले आहे. प्रशिक्षण कार्यक्रमाचे समन्‍वयक डॉ रणजित चव्‍हाण, डॉ अनुराधा लाड, डॉ पपिता गौरखेडे, श्री अभिजीत कदम हे आहेत. कार्यक्रमात सहभाग नोंदवण्‍यासाठी  https://forms.gle/E55kzXUEdDfRHbPg6  येथे करून ऑनलाईन फोर्म भरावा. आजपर्यंत दिड हजार पेक्षा जास्त जणांनी नोंदणी केली असुन  प्रशिक्षण यशस्‍वीरित्‍या पुर्ण करणा-यांना डिजिटल प्रमाणपत्राचे वितरित करण्‍यात येईल. सहभागी होण्‍याकरिता झुम मिंटिंग आय डी ९९५ ६३१४ ८२४१ व पॉसवर्ड १२३४५ वापर करावा. कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण विद्यापीठाचे युटयुब चॅनेल youtube.com/user/vnmkv यावर होणार आहे. 


Friday, September 18, 2020

कृषी विकासात कृषी अभियंत्यांचे मोठे योगदान ....... कुलगुरू मा डॉ. अशोक ढवण

वनामकृविच्‍या कृषी अभियांत्रिकी महाविद्यालयात अभियंता दिन साजरा

सध्याच्या परिस्थितीत कृषी क्षेत्रात कृषी अभियांत्रिकी तंत्रज्ञानाची अत्यंत गरज असून कृषी अभियंत्यांनी कृषी यांत्रिकीकरण, पाणीव्यवस्थापन, मृद व जल संधारण, कृषी प्रक्रिया व मूल्य वर्धन, अपारंपरिक उर्जा स्त्रोत या क्षेत्रात नवनवीन तंत्रज्ञानाची निर्मिती केली आहे. या सुधारित तंत्रज्ञानाचा गरजेनुसार कृषीक्षेत्रात अवलंब होत असुन कृषीक्षेत्रात कृषी अभियंत्यांचे योगदान मोठे असल्याचे प्रतिपादन कुलगुरू मा. डॉ. अशोक ढवण यांनी केले.

वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील कृषी अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालय परभणीच्या वतीने दिनांक 16 सप्‍टेबर रोजी भारतरत्न सर मोक्षगुंडम विश्वेश्वरया यांच्या जन्मदिन अभियंता दिन साजरा करण्यात आला, यानिमित्त आयोजित कृषी अभियंत्यांसाठी रोजगाराच्या संधी व आव्‍हाने या विषयावरील आयोजित ऑंनलाइन सत्राच्या अध्यक्षीय भाषणात ते बोलत होते. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून कुलसचिव श्री रणजीत पाटील, आयोजक महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. उदय खोडके, माजी विद्यार्थी नेटाफिम इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक श्री रणधीर चौहान, पुणे येथील जॉन डीयरचे प्रोडक्ट विक्री व्यवस्थापक शिवानी कौल, मंत्रालय मुंबई येथील अवर सचिव श्रीकांत आंडगे, लातूरचे उद्योजक श्री माणिक जाधव, पुणे येथील कृषी अभियांत्रिकी सल्लागार सुप्रिया कुलकर्णी, जिमखाना उपाध्यक्ष डॉ. राहुल रामटेके आदींची उपस्थिती होती.

कुलगुरू मा डॉ अशोक ढवण पुढे म्‍हणाले की, सर विश्वेश्वरया यांनी अभियंता या व्यवसायास गौरव प्राप्त करून दिला असुन कृषि यांत्रिकीकरणात अनेक आव्‍हाने आहेत, येणार काळातही कृषी अभियंत्यांची कृषी क्षेत्रात प्रमुख भुमिका राहणार आहे. कोरोनाच्या काळातही कृषी क्षेत्रात होत सकारात्मक प्रगती उल्लेख करून शेतकर्यांनी केलेल्या मेहनतीसाठी त्यांचे कौतुक केले.

कुलसचिव श्री रणजीत पाटील यांनी भाषणांत विद्यार्थ्यानी आपल्या क्षमता ओळखून योग्य कार्य क्षेत्राची निवड करावी आणि आपले ध्येय साध्य करण्यासाठी विद्यार्थ्यानी आपल्यातील क्षमतांचा पुरेपूर वापर करावा असे आवाहन केले.

कार्यक्रमात कृषी व क्षेत्रातील संधी व आवाहने, कृषी यांत्रिकीकरण, स्पर्धात्मक परीक्षांची तयारी, यशस्वी उद्योजक होण्याची गुरुकिल्ली आणि कृषी अभियांत्रिकी क्षेत्रातील सेवा व सल्ला संधी या विषयावर प्रमुख वक्ते श्री रणधीर चौहान, शिवानी कौल, श्रीकांत आंडगे, माणिक जाधव आणि सुप्रिया कुलकर्णी यांनी मार्गदर्शन करून कृषी अभियंता विद्यार्थांना करिअर करिता पुढील काळात मदत करण्याचे आश्वासन दिले. उपस्थित विद्यार्थ्यानी विचारलेल्या शंकांचे व प्रश्नांचे समाधान केले. प्रास्‍ताविकात प्राचार्य डॉ. उदय खोडके यांनी महान भारतीय अभियंता सर विश्वेश्वरया यांच्या प्रेरणादायी व्यक्तित्व व नैतिक मुल्ले यावर प्रकाश टाकला. डॉ. राहुल रामटेके यांनी प्रमुख वक्त्यांचा परिचय करून दिला. सूत्रसंचालन प्रा. मधुकर मोरे यांनी तर आभार प्रदर्शन प्रा. रविंद्र शिंदे यांनी केले. कार्यक्रमात महाविद्यातील विभाग प्रमुख प्रा. भास्कर भूईभार, डॉ. स्मिता खोडके, डॉ. स्मिता सोलंकी, प्रा. विवेकानंद भोसले, डॉ. हरीश आवारी, डॉ. सुभाष विखे आदीसह विद्यापीठातील अधिकारी, प्राध्यापक आणि आजी माजी विद्यार्थी मोठया संख्‍येने सहभागी झालेले होते. 

Thursday, September 17, 2020

विकेल ते पिकेल ही योजना शेतीला उद्योजकतेकडे नेणारी ठरेल ....... कुलगुरू मा डॉ अशोक ढवण

वनामकृविच्या वतीने आयोजित ऑनलाईन रबी शेतकरी मेळाव्यात प्रतिपादन

कोरोनाकाळात संपुर्ण जनजीवन विस्‍कळीत झाले असतांनासर्व आर्थिक व्‍यवहार ठप्‍प झालेले असतांनाना शेती थांबली ना शेतकरी थांबलाअर्थ व्‍यवस्‍थेवर गंभीर स्‍वरूपाचे परिणाम जाणवत आहेतपरंतु कृषिक्षेत्राची कामगिरी चमकदार झाल्‍याचे दिसुन येते आहेटाळेबंदीत शेतमालभाजीपालफळे आदी कोठेही कमी पडले नाही याचे श्रेय शेतकरी बांधवाना जातेटाळेबंदीमुळे शेतमाल विक्रीतील मध्‍यस्थ व दलाल आपोआपच हटले आहेतशेतकरी व थेट ग्राहक यांच्‍या मध्‍ये नवे बंध निर्माण झाले आहेतनुकतेच संवाद कार्यक्रमात राज्‍याचे माननीय मुख्‍यमंत्री ना श्री उध्‍दवजी ठाकरे यांनी विकेल ते पिकेल या योजनेच्‍या माध्‍यमातुन कृषि उत्‍पादन व विक्री व्‍यवस्‍था निर्माण करण्‍याचं सुतोवाच केले आहेयावेळी राज्‍याचे कृषिमंत्री मा ना श्री दादाजी भुसे उपस्थित होते. तसेच मागील महिन्‍यात विद्यापीठ आयोजित शेतमाल प्रक्रिया उद्योजकांचा ऑनलाईन मेळाव्‍यात राज्‍याचे उद्योगमंत्री मा ना श्री सुभाषजी देसाई यांनी शेतमाल प्रक्रिया उद्योगांना चालना देण्‍याच्‍या दृष्‍टीकोनातुन शासनस्‍तरावरून आवश्‍यक ती पाऊले उचलेले जातीलअसे सांगितलेयामुळे भविष्‍यात कृषि औद्योगिकीकरणाच्‍या माध्‍यमातुन शेतमाल मुल्‍यवर्धन व प्रक्रियाबाजारपेठेतील त्‍याचं सादरीकरणत्‍यातुन साध्‍य  होणारी ग्रामीण कृषी रोजगार योजना नीटपणे पुढे गेली तर निश्चितच नवी रचना उभी राहीलयातुनच विकेल ते पिकेल ही योजना शेतीला उद्योजकतेकडे नेणारी ठरेलअसे प्रतिपादन कुलगरू  मा डॉ अशोक ढवण यांनी केले.

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील विस्तार शिक्षण संचालनालय व कृषि विभाग (महाराष्ट्र शासनपरभणी यांचे संयुक्त विद्यमाने मराठवाडा मुक्ती संग्राम दिनानिमित्त दिनांक १७ सष्टेबर रोजी आयोजित ऑनलाईन रबी शेतकरी मेळाव्याच्या अध्‍यक्षस्‍थानावरून ते बोलत होतेमेळाव्‍याचे उदघाटक भारत सरकारच्या कृषि नियोजन आयोगाचे माजी सल्लागार तथा कृषि विस्तार विशेषज्ञ मा डॉ व्ही व्ही सदामते हे होते तर कार्यक्रमास विस्तार शिक्षण संचालक डॉ डि बी देवसरकरसंशोधन संचालक डॉ दत्तप्रसाद वासकरशिक्षण संचालक डॉ धर्मराज गोखले आदींची प्रमुख उपस्थिती होती.

अध्यक्षीय भाषणात कुलगुरू मा डॉ अशोक ढवण म्हणाले कीकरोना रोगाच्‍या प्रादुर्भावात परभणी कृषि विद्यापीठाने अनेक ऑनलाईन प्रशिक्षणवर्ग व व्‍याख्‍यानमालेचे आयोजन करून विद्यापीठ शास्‍त्रज्ञ व शेतकरी यांच्‍या सातत्‍याने संवाद साधलापुढील हंगामात विद्यापीठ विकसित दर्जेदार बियाणे शेतकरी बांधवाना पुरविण्‍याचा मानस असल्‍याचे मत त्‍यांनी सांगितले.

मेळाव्‍याचे उदघाटक मा डॉ व्ही व्ही सदामते मार्गदर्शनात म्‍हणाले कीशेती क्षेत्र हे विस्‍तृत असे क्षेत्र असुन या क्षेत्रात मोठया प्रमाणात रोजगार उपलब्‍ध केला जाऊ शकतोआज शेतकरी बांधवांनी एकत्रित येऊन शेती करणे गरजेचे असुन ­केंद्र व राज्‍य शासनाने गट शेती व शेतकरी उत्‍पादक कंपन्‍यांना प्रोत्‍साहन देणा-या अनेक योजना सुरू केल्‍या आहेतया योजना गाव पातळीपर्यंत पोहचल्‍या पाहिजेतशेतकरीकृषि शास्‍त्रज्ञकृषि अधिकारी यांच्‍यात विविध माध्‍यमातुन सातत्‍यांने संवाद होणे गरजेचे आहेकृषि तंत्रज्ञानाच्‍या माध्‍यमातुन आज कृषि उत्‍पादनात आपण भरीव अशी कामगिरी केलीपरंतु उत्‍पादीत शेतमालाची प्रक्रिया व विपणन यावर देण्‍याची गरज आहे. कोरडवाहु शेती विकासासाठी कृषि विस्‍तार कार्यात सार्वजनिक - खासगी भागीदारी तत्‍वाचा वापर करावा लागेलअसे प्रतिपादन त्‍यांनी केले.

प्रास्ताविकात विस्तार शिक्षण संचालक डॉ डी बी देवसरकर यांनी विद्यापीठ विकसित रबी पिकांच्‍या मुख्य वाणाबाबत मार्गदर्शन करून विद्यापीठ विकसित कमी खर्चिक कृषि तंत्रज्ञानाचा शेतकरी बांधवानी अवलंब करावा असे आवाहन केले. सुत्रसंचालन जनसंपर्क अधिकारी डॉ प्रविण कापसे यांनी केले तर आभार मुख्य विस्तार शिक्षणाधिकारी डॉ व्ही बी कांबळे यांनी मानले.

ऑनलाईन तांत्रिक सत्रात रबी हंमागातील विविध पिक लागवड तंत्राज्ञानावर विद्यापीठ शास्त्रज्ञांनी  मार्गदर्शन केलेयात ज्वार लागवडीवर डॉ एल एन जावळेहरभरा लागवडीवर डॉ सी बी पाटीलकरडई लागवडीवर डॉ एस पी म्हेत्रेगहु लागवडीवर डॉ एस एम उमाटे आदींनी मार्गदर्शन केले तसेच शेतकरी बांधवाच्या रबी पिक लागवडी संबंधीत शंकांचे समाधान डॉ यु एन आळसेडॉ ए व्ही गुटटेडॉ व्ही पी सुर्यवंशीडॉ एस पी पवारडॉ शिवाजी शिंदे, डाॅ डी डी पटाईत आदींनी केलेऑनलाईन कार्यक्रमाकरिता नाहेप प्रकल्‍प अन्‍वेषक डॉ गोपाल शिंदे यांच्‍या मार्गदर्शनाखाली डॉ अविनाश काकडेडॉ रश्‍मी बंगाळेइंजि रविकुमार कल्‍लुजीइंजि खेमचंद कापगाते, डॉ हेमंत रोकडे आदींनी सहकार्य केले. ऑनलाईन कार्यक्रमात झुम अॅप मिटिंग व विद्यापीठ युटयुब चॅनेलाच्या माध्यमातुन कृषि व शेतकरी बांधवानी मोठया संख्येने सहभागी झाले होते.

वनामकृविच्‍या औरंगाबाद येथील कृषि विज्ञान केंद्रात राष्ट्रीय पोषण माह निमित्त महिला शेतकरी प्रशिक्षण संपन्न

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठांतर्गत असलेल्‍या औरंगाबाद येथील कृषि विज्ञान व इफको यांच्या संयुक्त विदयमाने मराठवाडा मुक्ती संग्राम दिन व राष्ट्रीय पोषण माह २०२० याचे औचित्य साधून महिला शेतकरी प्रशिक्षणाचे आयोजन 16 सप्‍टेबर रोजी करण्‍यात आले होते.  अध्‍यक्षस्‍थानी राष्‍ट्रीय कृषि संशोधन प्रकल्‍पाचे प्रमुख डॉ. सुर्यकांत पवार हे होते तर कार्यक्रमाचे प्रमुख पाहूणे म्हणून औरंगाबाद जिल्हा परिषदेच्‍या महिला व बालविकास विभागाच्या सभापती मा. सौ. अनुराधाताई चव्हाण या उपस्थिती होत्‍या तर जिल्हा कार्यक्रम अधिकारी  महिला व बालविकास श्री प्रसाद मिरकले, इफको, औरंगाबाद क्षेत्र प्रबंधक श्री अनिल कुलकर्णी, गंगापुरच्या बालविकास प्रकल्प अधिकारी सौ. कोमल कोरे, मा. रामेश्वर ठोंबरे आदी मान्यवर उपस्थित होते.

अध्‍यक्षीय भाषणात डॉ. सुर्यकांत पवार म्‍हणाले की, बदल्या पीकपध्दतीमुळे खादय संस्कृतीही बदलली असुन आजच्या जीवनशैलीत प्रत्येकांनी रोग प्रतिकारकशक्ती वाढीकरिता प्रयत्‍न करावेत. जैवसमृध्द पिकांचे आहारात समावेश असणे गरजेचे आहे. विविध पिकांचे आरोग्यविषयक गुणधर्म लक्षात घेवून जैवसमृध्द असणा-या बाजरी, ज्वारी तीळ, मटकी, करडई, नाचणी, भगर, राळे आदी पिकांची लागवड करावी. यामुळे पोषक आहार मिळेल व त्याचा उपयोग सुदृढ आरोग्यासाठी होईल. परभणी कृषि विद्यापीठ विकसित जैवसमृध्‍द लोहाचे प्रमाण जास्‍त असणारे बाजरीचा वाण एएचबी १२०० व एएचबी १२६९ तसेच ज्वारीचा परभणी शक्ती या वाणाचा लागवडी करिता आवश्‍य वापर करावा, असे ते म्‍हणाले.

मा. सौ. अनुराधाताई चव्हाण मार्गदर्शनात म्हणाल्या की, शेतीच्या विकासात महिलांचा सिंहाचा वाटा आहे. कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीची आरोग्‍य सुदृढ करायचे असेल तर महिलेने आरोग्यविषयक ज्ञान घेणे महत्वाचे आहे. पोषणबाग ही काळाची गरज असुन या पोषणबाग लागवडीचे प्रशिक्षण घ्‍यावे. औरंगाबाद जिल्हयात कुपोषणमुक्त करिता पोषणबाग लागवडीसाठी मोठया प्रमाणावर राबविण्यात येणार आहे. जिल्हयातील शेतक-यांच्या विकासामध्ये औरंगाबाद कृषि विज्ञान केंद्र च्या कार्याचेही कौतुक करून दत्तक गावात झालेल्या विकासात शेतकरी समाधानी असल्याचे सांगितले.

इफकोचे क्षेत्र प्रबंधक श्री कुलकर्णी यांनी शेतक-यांत इफकोच्या विविध कार्या विषयी सविस्तर माहिती दिली.तसेच येणा-या काही दिवसात लिक्विड युरिया ५०० मिलीची बॉटल उपलब्ध होणार असल्याचीही माहिती देऊन इफकोच्या खतांच्या खरेदीवर शेतक-यांना इफकोमार्फत अपघाती विमाही दिला जातो, असेही त्यांनी सांगितले. प्रा. गीता यादव यांनी संतुलित आणि चौरस आहाराविषयी विशेष मार्गदर्शनात म्हणाल्या की, आजच्या बदलत्या जीवनशैलीत संतुलित आणि चौरस आहाराचे सेवन करणे अत्यंत महत्वाचे आहे. फास्ट फुडचा वापर कमी करुन सकस आहार घेणे महत्वाचे आहे. प्रत्येक व्यक्तींनी आपल्या वजनाची पडताळणी करणे महत्वाचे आहे व त्यानुसार वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी पोषणयुक्त थालीचा आपल्या आहारात अवलंब करणे गरजेचे  असल्‍याचे त्यांनी सांगितले. तर उदयानविदया विषय विशेषज्ञ डॉ. दर्शना भुजबळ म्हणाल्या की, घरालगत असणा-या मोकळया जागेत कुटुंबाची गरज भागविण्यासाठी ताज्या व रसायन मुक्त भाजीपाला पिकांची लागवड परसबागेत केली जाते. यात घरातील सांडपाणी , काडीकचरा व इतर पदार्थांचा सेंद्रीय खत म्हणून वापर करुन अत्यंत पोषक भाजीपाल्याची निर्मिती करता येते.

कार्यक्रमात.ऑनलाईन रब्बी शेतकरी मेळाव्यात कुलगुरु  मा डॉ. अशोक ढवण यांचे भाषणाचे थेट प्रक्षेपणही करण्यात आले. प्रास्ताविक कार्यक्रम समन्वयक डॉ. किशोर झाडे यांनी केले, विषय विशेषज्ञ डॉ. बस्वराज पिसुरे यांनी सुत्रसंचालन केले तर डॉ. अनिता जितूरकर यांनी आभार मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी श्री अशोक निर्वळ, श्री इरफान शेख, श्री शिवा काजळे, श्री लक्ष्मण शिंदे व कृषि विज्ञान केंद्रातील कर्मचारी यांनी मोलाचे सहकार्य केले. कार्यक्रमात एकुण ८४ अंगणवाडी सेविका, महिला शेतकरी व अधिकारी सहभागी झाले होते. यावेळी पोषणबाग निर्मितीसाठी इफकोव्दारे देण्यात आलेल्या भाजीपाला किटचे वाटप करण्यात आले.

Wednesday, September 16, 2020

सोयाबीनच्‍या उभ्‍यापिकातील शेंगामधील बियाण्‍याची उगवण समस्‍या व उपाय

मराठवाडा विभागात सोयाबीनची पेरणी खरिप हंगामात साधारणत:१५ जुन ते ३० जुन दरम्‍यान झालेली आहे. हे पिक सध्‍या शारीरिक पक्‍वतेच्‍या / शेंगा भरलेल्‍या अवस्‍थेत आहे. मागील  ८ ते १० दिवसांतुन सतत ढगाळ वातावरण, कमी सुर्यप्रकाश व  पाऊस सुरू असल्‍यामुळे दिवसाचे तापमान २० ते २५ डिग्री से. असुन आर्द्रता ९० टक्‍क्यापेक्षा जास्‍त आहे. शारिरीक पक्वतेनंतर शेंगा वाळण्‍यासाठी व बियामधील ओलावा कमी होण्‍यासाठी तापमान ३० ते ३५ डिग्री से. असावे लागते, या काळात आर्द्रता ५० टक्कयापेक्षा कमी असावी लागते. तसेच प्रखर सुर्यप्रकाश आणि निरभ्र आकाश असावे लागते. परंतु सद्य‍ परिस्थितीत ही साखळी विस्‍कळीत झालेली असल्‍यामुळे काही ठिकाणी सोयाबीनच्‍या उभ्‍यापिकातील शेंगामधील बियाण्‍याची उगवण झालेली आहे, हे शारिरीक व्‍यंग / विकृती असुन सतत पडणा-या पावसामुळे निर्माण झाले आहे.

उपाय – शेतात चर काढुन पाण्‍याचा निचरा करावा व शेतामध्‍ये हवा खेळती ठेवावी. पाऊस थांबताच सोयाबीन पिकाची काढणी करून काडाचे छोटे - छोटे ढिग करून प्रखर सुर्यप्रकाशामध्‍ये शेतातच वाळवावे. त्‍यानंतर प्रादुर्भाव किंवा उगवण झालेल्‍या शेंगा बाजुला काढुन मळणी करावी, अशी माहिती वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाचे सोयाबीन पैदासकर डॉ एस पी म्‍हेत्रे यांनी दिली आहे.

वनामकृवि उत्‍पादित रबी पिकांचे बियाणे विक्री करिता सप्‍टेबरच्‍या शेवटच्‍या आठवडयात जिल्‍हास्‍तरावर उपलब्‍ध होणार

मराठवाडा मुक्‍ती संग्राम दिनी वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाच्‍या वतीने दरवर्षी १७ सप्‍टेंबर रोजी रब्‍बी शेतकरी मेळाव्‍याचे व बियाणे विक्रीचे आयोजन करण्‍यात येते. परंतु या वर्षी कोविड १९ विषाणुच्‍या संसर्ग मोठया प्रमाणात वाढल्‍यामुळे सामा‍जिक आंतरीकरणाचे पालन होण्‍याच्‍या दृष्‍टीने या वर्षीचा १७ सप्‍टेंबरचा रबी शेतकरी मेळावा ऑनलाईन पध्‍दतीने होत आहे. मराठवाडयातील शेतक-यांना विद्यापीठ उत्‍पादीत हरभरा, करडई, गहु, जवस, सुर्यफुल, रबी ज्‍वार आदी पिकांच्‍या वाणांचे बियाणांचा रबी हंमागात पेरणीसाठी लाभ घेता यावा या अनुषंगाने केवळ परभणी मुख्‍यालयी विक्री व्‍यवस्‍था न ठेवता, मराठवाडा विभागातील प्रत्‍येक जिल्‍हयात विद्यापीठांतर्गत असलेल्‍या कृषि विज्ञान केंद्रे, संशोधन केंद्र आदी ठिकाणी करण्‍यात येणार आहे. विद्यापीठ अंतर्गत असलेल्‍या औरंगाबाद, बदनापुर (जालना), खामगांव (बीड), तुळजापुर (उस्‍मानाबाद) येथील कृषि विज्ञान केंद्रे तसेच लातुर येथील गळीत धान्‍य संशोधन केंद्र, नांदेड येथील कापुस संशोधन केंद्र, गोळेगांव (हिंगोली) येथील कृषि महाविद्यालय व परभणी येथील बीज प्रक्रिया केंद्रात सप्‍टेबर महिन्‍याच्‍या शेवटच्‍या आठवडयात बियाणे विक्रीसाठी उपलब्‍ध करून देण्‍यात येणार असुन शेतकरी बांधवांनी याचा लाभ घ्‍यावा, असे आवाहन विद्यापीठाच्‍या वतीने करण्‍यात आले आहे.

Tuesday, September 15, 2020

वनामकृविच्‍या वतीने ऑनलाईन रबी शेतकरी मेळाव्‍याचे आयोजन

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील विस्‍तार शिक्षण संचालनालय व कृषि विभाग (महाराष्‍ट्र शासन) परभणी यांचे संयुक्‍त विद्यमाने मराठवाडा मुक्‍ती संग्राम दिनानिमित्‍त दिनांक 17 सप्‍टेंबर गुरूवार रोजी सकाळी 11.00 वाजता ऑनलाईन रबी शेतकरी मेळाव्‍याचे आयोजन करण्‍यात आले असुन कार्यक्रमाचे उदघाटन भारत सरकारच्‍या कृषि नियोजन आयोगाचे माजी सल्‍लागार तथा कृषि विस्‍तार विशेषज्ञ मा डॉ व्‍ही व्‍ही सदामते यांच्‍या ह्रस्‍ते होणार आहे. कार्यक्रमाच्‍या अध्‍यक्षस्‍थानी कुलगुरू मा डॉ अशोक ढवण राहणार असुन पुणे येथील कृषि तंत्रज्ञान उपयोजन संशोधन संस्‍थेचे (अटारी) संचालक मा डॉ लाखन सिंग हे विशेष अतिथी म्‍हणुन सहभागी होणार आहेत.

ऑनलाईन तांत्रिक सत्रात रबी हंमागातील विविध पिक लागवड तंत्राज्ञानावर विद्यापीठ शास्‍त्रज्ञ मार्गदर्शन करणार आहेत. यात ज्‍वार लागवडीवर डॉ एल एन जावळे, हरभरा लागवडीवर डॉ सी बी पाटील, करडई लागवडीवर डॉ एस पी म्‍हेत्रे, गहु लागवडीवर डॉ यु एम उमाटे मार्गदर्शन करणार असुन शेवटी शेतकरी बांधवाच्‍या रबी पिक लागवडी संबंधित शंकांचे समाधान डॉ यु एन आळसे, डॉ ए व्‍ही गुटटे, डॉ व्‍ही पी सुर्यवंशी, डॉ एस पी पवार आदी करणार आहेत.

ऑनलाईन कार्यक्रमात सहभागी होण्‍याकरिता झुम अॅप मिटिंग आयडी 953 393 3361 व पासवर्ड 12345 यांचा वापर करावा, कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण विद्यापीठ युटयुब चॅनेल www.youtube.com/user/vnmkv वर होणार आहे. सदरिल ऑनलाईन रबी मेळाव्‍याच्‍या कार्यक्रमास जास्‍तीत जास्‍त शेतकरी बांधवानी सहभाग नोंदवावा, असे आवाहन आयोजक विस्‍तार शिक्षण संचालक डॉ डी बी देवसरकर, मुख्‍य विस्‍तार शिक्षणाधिकारी डॉ व्‍ही बी कांबळे व परभणी जिल्‍हा अधिक्षक कृषि अधिकारी श्री संतोष आळसे यांनी केले आहे.

Monday, September 14, 2020

वनामकृविच्‍या वतीने सेंद्रीय शेतीवर तीन दिवसीय ऑनलाईन कार्यशाळेचे आयोजन

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील सेंद्रीय शेती संशोधन आणि प्रशिक्षण केंद्र वतीने सेंद्रिय शेती प्रशिक्षण, सेंद्रीय शेतीमध्ये यांत्रिकीकरण, मृद व जलसंधारण आणि प्रमाणीकरणया विषयावर तीन दिवसीय ऑनलाईन कार्यशाळेचे आयोजन दिनांक 16 ते 18 सप्टेंबर रोजी सायंकाळी 7.00 ते 8.30 या वेळेत करण्यात आले आहे. सदरिल कार्यशाळेचे आयोजन कुलगुरु मा. डॉ. अशोक ढवण व संशोधन संचालक डॉ. दत्तप्रसाद वासकर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्‍यात आले. तीन दिवसीय कार्यशाळेत दिनांक 16 सप्टेंबर रोजी सेंद्रीय शेती प्रमाणीकरण व विक्री व्यवस्थापनयावर सेंद्रीय प्रमाणीकरण तज्ञ श्री बाळासाहेब खेमनर मार्गदर्शन करणार असुन दिनांक 17 सप्टेंबर रोजी सेंद्रीय शेतीमध्ये बैलचलित अवजारांचा कार्यक्षम वापरयावर पशुशक्तीचा योग्य वापर प्रकल्पाच्‍या संशोधन अभियंता डॉ. स्मिता सोळंकी या मार्गदर्शन करणार आहेत तसेच दिनांक 18 सप्टेंबर रोजी मृद व जलसंधारण: सेंद्रीय शेतीचा आत्मायावर कोरडवाहू शेती संशोधन प्रकल्पातील कृषि अभियंता डॉ. मदन पेंडके हे मार्गदर्शन करणार आहे. सदरिल कार्यशाळेत जास्तीत जास्त शेतकरी बांधव, शेतकरी महिला, शेतकरी युवक-युवती यांनी ऑनलाईन सहभाग नोंदवावा, असे आवाहन कार्यक्रमाचे आयोजक प्रकल्‍पाचे प्रमुख अन्वेषक डॉ. आनंद गोरे, प्रशिक्षण समन्वयक डॉ. सौ. पपीता गौरखेडे, डॉ. सौ. अनुराधा लाड, डॉ. सुनिल जावळे आदी केले आहे. प्रत्‍यक्ष झुम मिटिंग मध्‍ये सहभागी होण्‍याकरिता झुम आयडी 92868513731 व पासवर्ड 123456 या वापर करावा. अधिक माहितीसाठी डॉ. पपीता गोरखेडे (8007745666), डॉ. अनुराधा लाड (9860859399), डॉ. सुनील जावळे (9422111061) यांच्‍याशी संपर्क करावा.