Wednesday, September 30, 2015

वनामकृविचा "विदयापीठ आपल्‍या दारी: तंत्रज्ञान शेतावरी" उपक्रमास पुनश्‍च: प्रारंभ होणार

मराठवाडयातील आठही जिल्‍हयात तर परभणी व हिंगोली जिल्‍हयातील साधारणत: ६० ते ७० गावांत रा‍बविण्‍यात येणार उपक्रम

सन २०१५-१६ मध्‍ये मराठवाडा विभागात झालेल्‍या कमी पावसामुळे उद्भवलेली पीक परिस्थितीत आपत्‍कालीन पीक व्‍यवस्‍थापन, सदयस्थितीत पीक संरक्षण, येणा­या रबी हंगामाचे नियोजन या करिता वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाचे शास्‍त्रज्ञ शेतक-­यांच्‍या शेतावर थेट भेट देऊन मार्गदर्शन करण्‍यासाठी यावर्षीही कुलगुरु मा. डॉ. बी. व्‍यंकटेश्‍वरलू व विस्‍तार शिक्षण संचालक डॉ. बी. बी. भोसले यांच्‍या मार्गदर्शनाखाली "विदयापीठ आपल्‍या दारी : तंत्रज्ञान शेतावरी" उपक्रमास दिनांक १ ऑक्‍टोबर पासुन पुनश्‍च: प्रारंभ करण्‍यात येणार आहे. विदयापीठ शास्‍त्रज्ञ व कृषि विभाग यांच्‍या समन्‍वयाने तसेच मराठवाडयातील आठही जिल्‍हयात विद्यापीठातंर्गत असलेल्‍या विभागीय कृषि विस्‍तार शिक्षण केंद्र, कृषि विज्ञान केंद्र, सर्व महाविदयालये, व संशोधन योजना यांच्‍या सहकार्याने हा विशेष विस्‍तार उपक्रम आयोजित करण्‍यात आला आहे. या अंतर्गत परभणी येथील कृषि तंत्रज्ञान माहिती केंद्राच्‍या वतीने विदयापीठाचे तंत्रज्ञान प्रभावीपणे शेतक-­यांपर्यंत पोहचविण्‍यासाठी परभणी व हिंगोली जिल्‍हयाकरिता तालुकास्‍तरीय तंत्रज्ञान प्रसार कार्यक्रमाचा कृति आराखडा करण्‍यात आला असुन सदरिल उपक्रमात कृषि विभागाच्‍या समन्‍वयाने प्रत्‍येक तालुक्‍यातील चार ते सहा गावाचा समावेश करण्‍यात आला आहे. प्रत्‍येक दिवशी दोन ते तीन गांवाचा दौरा करण्‍याचे नियोजित आहे. या दोन जिल्‍हयासाठी शास्‍त्रज्ञांचे एकुण चार चमू करण्‍यात आले असुन यात कृषिविदया, किटकशास्त्र, वनस्‍पती विकृतीशास्‍त्र, मृदाशास्‍त्र, उदयानविदया, पशुसंवर्धन व दुग्‍धशास्‍त्र व कृषि अभियांत्रिकी आदीं विषयातील सात विषयतज्ञांचा समावेश राहणार आहे. या उपक्रमातंर्गत छोटे मेळावे, गटचर्चा, मार्गदर्शन, प्रक्षेत्र भेट अशा स्‍वरुपाचे कार्यक्रम घेतले जाणार असुन हंगामी खरीप पीके, फळे, भाजीपाला, पीक संरक्षण व मुलस्‍थानी जलसंधारण, रबी हंगामाचे नियोजन आदी विषयांवर शेतक­-यांना शास्त्रज्ञांकडुन मार्गदर्शन केले जाणार आहे. या उपक्रमात सद्यस्थितीतील आपत्‍कालीन परिस्थितीत पीक व्‍यवस्‍थापन व पीक संरक्षण यावर विशेष भर देण्‍यात येणार आहे. मागणी आधारित काटेकोर विस्‍तार‍ शिक्षण असे या कार्यक्रमाचे स्‍वरुप राहणार आहे. परभणी व हिेंगोली जिल्‍हयामध्‍ये सदरील विस्‍तार कार्यक्रम दि ३० सप्‍टेबर ते १७ ऑक्‍टोबर दरम्‍यान साधारणत: ६० ते ७० गावांत राबविण्‍यात येणार असुन एकुण प्रवास अंदाजे अंतर ४१०० कि.मी होणार आहे. तरी या कार्यक्रमाचा शेतकरी बांधवांनी लाभ घ्‍यावा, असे आवाहन विस्‍तार शिक्षण संचालक डॉ. बी. बी. भोसले, विस्‍तार कृषिविदयावेत्‍ता डॉ. यु. एन. आळसे व प्रा. डी. डी. पटाईत यांनी केले आहे.

Thursday, September 24, 2015

बीटी कपाशीवर मर, अल्‍टरनॅरिया ब्‍लाईट, जीवाणुजन्‍य करपा आदी रोगांचा प्रादुर्भाव

मराठवाड्यात मागील आठवाड्यात पडलेल्या परतीच्या पावसामूळे बी टी कपाशीत आकस्मिक मर (झाडे उमळणे) बऱ्याच ठिकाणी दिसून येत असुन कपाशीचे पिक जास्त पाण्यास संवेदनशील असल्यामुळे काळ्या कमी निचऱ्याच्या जमिनीमध्ये ही समस्या मोठ्या प्रमाणात आढळून येते. त्यासाठी शेतकऱ्यांनी शेतातील पाण्याचा निचरा करावा, कपाशीची झाडे उंमळत किंवा मरत असल्यास कॉपर ऑक्सीक्लोराईड २५ ग्रॅम किंवा कार्बनडेंझीम २० ग्रॅम अधिक १५० ग्रॅम युरिया १५० ग्रॅम पोटॅश प्रति १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी तसेच आळवणी सुद्धा करावी. आळवणी करतेवेळेस दुपारच्या वेळेस झाडाची सावली पडते, त्याठिकाणी रिंगण पद्धतीने झाडाच्या उंचीनुसार ५०० ते ७५० मिली प्रति झाड याप्रमाणे आळवणी करून झाडांच्या बुडाजवळील माती पायाने दाबुन घ्यावी.
ज्या ठिकाणी बुरशीजन्य करपा (अल्टरनॅरिया ब्लाईट) या रोगाचा प्रादुर्भाव आढळून येत आहे त्या ठिकाणी मॅनकोझेब २५ ग्रॅम प्रति १० लिटर पाणी या प्रमाणात घेऊन फवारणी करावी. जीवाणूजन्यकरपा रोगाच्या नियंत्रणासाठी स्ट्रेप्टोमायसिन सल्फेट ते . ग्रॅम + कॉपर ऑक्सीक्लोराइड २५ ग्रॅम प्रति १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी, असे आवाहन संतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाचे विस्तार शिक्षण संचालक डॉ. बी. बी. भोसले कापूस संशोधन केंद्र, नांदेड येथील कापूस विशेषज्ञ डॉ. के. एस. बेग यांनी केले आहे.

Thursday, September 17, 2015

एकजूटिने करू दुष्‍काळाचा सामना......परिवहन मंत्री मा ना श्री दिवाकररावजी रावते

वनामकृवित रबी पीक शेतकरी मेळावा संपन्‍न
मराठवाडा मुक्‍ती संग्रामात शेतक-यांचे मोठे योगदान होते, मराठवाडयातील शेतकरी संघर्ष करणारा शेतकरी असुन सद्यस्थितीतील दुष्‍काळाचा सामना शेतकरी, शासन व कृषि विद्यापीठ एकत्रितरित्‍या करू, असे प्रतिपादन परिवहन मंत्री तथा परभणीचे पालकमंत्री मा ना श्री दिवाकररावजी रावते यांनी केले. वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाचे विस्‍तार शिक्षण संचालनालय व महाराष्‍ट्र शासनाचा कृषि विभाग यांचे संयुक्‍त विद्यमाने मराठवाडा मुक्‍ती दिनानिमित्‍त आयोजीत रबी पीक शेतकरी मेळाव्‍याच्‍या उद्घाटनाप्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाच्‍या अध्‍यक्षस्‍थानी कुलगुरू मा डॉ बी व्‍यंकटेश्‍वरलु हे होते तर व्‍यासपीठावर संसद सदस्‍य मा श्री संजय जाधव, परभणी विधानसभा सदस्‍य मा डॉ राहुल पाटील, जिल्‍हाधिकारी मा श्री राहुल रंजन महिवाल, विद्यापीठ कार्यकारी परिषदेचे सदस्‍य श्री केदार सोळुंके, श्री रविंद्र देशमुख, शिक्षण संचालक डॉ अशोक ढवण, संशोधन संचालक डॉ दत्‍तप्रसाद वासकर, विस्‍तार शिक्षण संचालक डॉ बी बी भोसले, कुलसचिव डॉ दिनकर जाधव, जिल्‍हा अधिक्षक कृषि अधिकारी डॉ साहेबराव दिवेकर यांची प्रमुख उपस्थिती होती.परिवहन मंत्री मा ना श्री दिवाकररावजी रावते पुढे म्‍हणाले की, कोरडवाहु शेतक-यांच्‍या दृष्‍टीने योग्‍य हवामानाचा अंदाज अत्‍यंत महत्‍वाचा असुन लवकरच शासन मंडळस्‍तरावर हवामान अंदाज देणारी यंत्रणा उभारणार आहे. तसेच कृषि विद्यापीठाच्‍या दर्जेदार बियाण्‍यास शेतक-यांत मोठी मागणी असुन लवकरच शेतक-यांत प्रचलीत असलेला कपाशीचा नांदेड-४४ हा वाण बी टी स्‍वरूपात उपलब्‍ध करूण देण्‍यात येणार आहे. जलयुक्‍त शिवार अभियांनातर्गत जास्‍तीत जास्‍त शेततळे निर्माण करण्‍याचा शासन मानस असल्‍याचे त्‍यांनी आपल्‍या भाषणात सांगितले.कुलगुरू मा डॉ बी व्‍यंकटेश्‍वरलु अध्‍यक्षीय भाषणात म्‍हणाले की, मराठवाडयातील पाऊसाचे प्रमाण कमी कमी होत असुन ३० ते ४० टक्‍के उपलब्‍ध जमिनीतील ओलावा बाष्‍पीभवणाव्‍दारे उडुन जातो, जमिनीतील हा ओलावा टिकुण ठेवण्‍यासाठी विद्यापीठस्‍तरावर संशोधन हाती घेण्‍यात येणार आहे. विद्यापीठाकडे हरभरा व करडई पिकांच्‍या विद्यापीठ विकसित बियाणे मुबलक प्रमाणावर उपलब्‍ध असुन त्‍याचा वापर शेतक-यांनी करावा. विद्यापीठाने यावर्षी कपाशी लागवडीवर अप्‍स ची निर्मिती केली असुन लवकरच सोयाबीन व हळद पिकांवर अप्‍स तयार करण्‍यात येईल, असे प्रतिपादन त्‍यांनी केले. मेळाव्‍यात कार्यकारी परिषदेचे सदस्‍य मा श्री केदार सांळुके यांनी दुष्‍काळ परिस्थितीत शेतक-यांनी हताश न होता परतीचा पाऊसाचा लाभ घ्‍यावा असा सल्‍ला त्‍यांनी दिला तर मा श्री रविंद्र देशमुख यांनी आपल्‍या भाषणात विद्यापीठांने शेतक-यांच्‍या शेतावर विविध प्रात्‍यक्षिकांची संख्या वाढण्‍यात येण्‍याची शिफारस केली.याप्रसंगी किडकशास्‍त्र विभागाच्‍या वतीने तयार करण्‍यात आलेल्‍या कापुस लागवडीवर आधारीत अप्‍सचे लोकार्पण मान्‍यवरांच्‍या हस्‍ते करण्‍यात आले. तसेच विद्यापीठाचे न्‍युजलेटर, शेतीभाती, विद्यापीठ शास्‍त्रज्ञ लिखित विविध घडीपत्रिका, पुस्‍तीका आदींचे विमोचन मान्‍यवरांच्‍या हस्‍ते करण्‍यात आले. याप्रसंगी कृषि प्रदर्शनाचे व विद्यापीठ विकसित रबी पिकांच्‍या बियाणे विक्रीचे उद्घाटनही करण्‍यात आले. कार्यक्रमाच्‍या प्रास्‍ताविकात विस्‍तार शिक्षण संचालक डॉ बी बी भोसले यांनी विद्यापीठाच्‍या विस्‍तार कार्याबाबत माहिती दिली. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन डॉ विना भालेराव यांनी केले तर आभार प्रदर्शन मुख्‍य विस्‍तार शिक्षण अधिकारी डॉ प्रशांत देशमुख यांनी केले. 
मेळाव्‍याच्‍या तांत्रिक सत्रात दुष्‍काळी परिस्थितीतील चारा पीक व्‍यवस्‍थापनावर डॉ बी बी ठोंबरे, सद्यस्थितीत खरीप व रब्‍बी पिकांवरील किंडीचे व्‍यवस्थापनावर डॉ बी बी भोसले व डॉ पी आर झंवर, कापुस व तुर, रब्‍बी पिकां‍वरील रोग व्‍यवस्‍थापनावर डॉ ए पी सुर्यवंशी, रब्बी ज्‍वार लागवडीवर प्रा एस एस सोळंके, हरभरा लागवडीवर डॉ डि के पाटील, करडई लागवडीवर डॉ एस बी घुगे तसेच आपत्‍कालीन परिस्थितीतील पीक नियोजनावर डॉ बी व्‍ही आसेवार व बीबीएफ यंत्राचा सुयोग्‍य वापरावर प्रा पी ए मुंढे मार्गदर्शन केले. मेळाव्‍यास मोठया संख्‍येने शेतकरी उपस्थित होते.
Monday, September 14, 2015

गरजु शेतकरी व सहकार्याच्‍या कुटुंबीयांना कृषि महाविद्यालयाच्‍या माजी विद्यार्थ्‍याचा मदतीचा हात


वनामकृवी अग्रीकोस १९८५ च्या माजी विद्यार्थ्यांचा स्तुत्य उपक्रम

कुलगुरू मा डॉ. बी. वेंकटेश्वरलू यांच्‍या हस्‍ते श्रीमती वैशाली माऊली रापतवाड यांना धनादेश देतांना, याप्रसंगी भारतीय कृषि शास्त्रज्ञ निवड मंडळाचे माजी अध्यक्ष डॉ. चारुदत्त मायी, शिक्षण संचालक डॉ. अशोक ढवन, कुलसचिव डॉ. दिनकर जाधव, प्राचार्य डॉ. धर्मराज गोखले, प्राचार्य डॉ. विलास पाटील, विद्यार्थी केंद्रीय कार्यकारिणी अध्यक्ष डॉ. बाबासाहेब ठोंबरे आदि. 
*****************
वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातंर्गत असलेल्‍या कृषि महाविद्यालयाच्‍या १९८५ च्या बॅचच्‍या माजी विद्यार्थ्यांचे दरवर्षी संमेलन होत असते व त्यात यावर्षी आत्‍महत्‍याग्रस्‍त शेतक-यांच्‍या व गरजु सहका-यांच्‍या कुटुंबीयांना मदत करण्याचे निश्चित करण्‍यात आले असुन मराठवाड्यातील आठ जिल्ह्यातून प्रत्येकी एका आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबियास आर्थिक मदत केली आहे. तसेच गरजु सहाक-यांच्‍या कुटुंबीयांना मदत करण्‍यात आली. याच उपक्रमातंर्गत परभणी जिल्‍हातील मानवत तालुक्‍यातील मौजे शेवडी येथील आत्महत्याग्रस्त शेतकर्‍यांच्या कुटुंबीयांना १५०००/- चा धनादेश देऊन आर्थिक मदत करण्‍यात आली. नुकतेच एका कार्यक्रमात कुलगुरू मा डॉ. बी. वेंकटेश्वरलू यांच्‍या हस्‍ते आत्‍महत्‍या केलेले शेतकरी स्‍व माऊली रापतवाड यांच्‍या पत्‍नी श्रीमती वैशाली माऊली रापतवाड यांना धनादेश देण्‍यात आला. याप्रसंगी भारतीय कृषि शास्त्रज्ञ निवड मंडळाचे माजी अध्यक्ष डॉ. चारुदत्त मायी, शिक्षण संचालक डॉ. अशोक ढवन, कुलसचिव डॉ. दिनकर जाधव, प्राचार्य डॉ. धर्मराज गोखले, प्राचार्य डॉ. विलास पाटील, विद्यार्थी केंद्रीय कार्यकारिणी अध्यक्ष डॉ. बाबासाहेब ठोंबरे यांची प्रमुख उपस्थिती होती.
तसेच या माजी विद्यार्थ्‍यानी त्यांच्या सहकारी मित्र चांदणी (पिंपळेवाडी) (ता. परांडा, जि. उस्मानाबाद) येथील स्व. प्रा. हरीचंद्र पवार यांच्‍या कुटुंबियांस रुपये एक लक्ष दहा हजाराची आर्थिक मदत केली. मान्‍यवरांच्‍या हस्‍ते श्रीमती प्रतिभा हरीचंद्र पवार यांना आर्थिक मदत धनादेशाद्वारे देण्यात आली. याप्रसंगी ५०००/- रुपयाचा धनादेश कुलगुरू मा डॉ. बी. वेंकटेश्वरलू यांनी व रुपये ५०००/- चा धनादेश अधिष्ठाता डॉ. अशोक ढवन यांनी मदत म्हणून दिला. या उपक्रमातून आत्तापर्यंत श्रीमती सुनिता देवराव टोपारे यांना रुपये एकावन्न हजार व श्रीमती सुनिता संजय सोनवणे यांना रुपये एक लक्ष एक हजारची आर्थिक मदत या माजी विद्यार्थ्‍यांनी केली आहे.
परिस्थितीमुळे असहाय्य झालेल्यांच्या मदतीसाठी समाजातल्या मंडळींनीच पुढे येणे गरजेचे असुन समाज आपल्या पाठिशी असलेच्‍या भावनेमुळे अशांना उभारी मिळू शकते, त्यामुळे समाजाचे ऋण मानून मदतीसाठी पुढे येणार्‍या या वनामकृवीच्‍या माजी विद्यार्थ्‍यांचा उपक्रम आत्मिक बळ देणारे आहेत, असे उद्गार याप्रसंगी कुलगुरू मा डॉ. बी. वेंकटेश्वरलू यांनी काढले. या उपक्रमासाठी विद्यार्थी केंद्रीय कार्यकारिणी अध्यक्ष डॉ. बाबासाहेब ठोंबरे, विकास टाचले, प्रशांत सीरस, श्रीपति डुकरे, बाबुलाल शिंदे, रविंद्र जाधव, प्रकाश देशमुख, राजेश्वर पाटील, भास्कर आगळे, रविंद्र भोसले, देवीदास पालोद्कर, संजय मिरजकर आदींनी पुढाकार घेतला.
सहकारी मित्र चांदणी (पिंपळेवाडी) (ता. परांडा, जि. उस्मानाबाद) येथील स्व. प्रा. हरीचंद्र पवार यांच्‍या कुटुंबियांस रुपये एक लक्ष दहा हजाराची आर्थिक मदत देतांना