Saturday, August 29, 2020

वनामकृविची विस्तार शिक्षण परिषदेची २३ वी बैठक संपन्न

 

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाच्या विस्तार शिक्षण परिषदेची 23 वी बैठक कुलगुरू मा. डॉ. अशोक ढवण यांच्या अध्यक्षतेखाली दि.२८ ऑगस्‍ट रोजी संपन्न झाली. बैठकीस शिक्षण संचालक डॉ. डी. एन. गोखले, संचालक संशोधन डॉ. डी. पी. वासकर, विस्तार शिक्षण संचालक डॉ. डी. बी. देवसरकर, जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी डॉ. संतोष आळसे आदींची प्रमुख उपस्थिती होती.

मार्गदर्शनात कुलगुरू मा. डॉ. अशोक ढवण म्‍हणाले की, सद्यस्थितीत कोरोना विषाणु प्रादुर्भावाच्‍या पार्श्‍वभुमीवर शेतकरी बांधवापर्यंत कृषि तंत्रज्ञान पोहचविण्‍याकरिता कृषि विद्यापीठ ऑनलाईन पध्‍दतीचा योग्‍यरितीने उपयोग करित आहेत, हे कार्य अधिक प्रभावी व कार्यक्षमरित्‍या करण्‍याकरिता सर्वांनी प्रयत्‍न करावेत, असा सल्‍ला त्‍यांनी दिला.  

प्रास्ताविकात विस्तार शिक्षण संचालक डॉ. डी. बी. देवसरकर यांनी विस्तार उपक्रमात विद्यापीठातील सर्व महाविद्यालय व संशोधन केंद्रातील शास्त्रज्ञांनी सक्रिय सहभाग घ्यावा अशी अपेक्षा व्यक्त केली. बैठकीत मान्यवरांच्या सुचनेप्रमाणे राबविण्यात येणा-या विस्तार उपक्रमांची दिशा निश्चित करण्यात आली. मुख्य विस्तार शिक्षण अधिकारी डॉ. व्ही. बी. कांबळे यांनी मागील बैठकीच्या कार्यवृत्तातावरील कार्यवाही व विस्तार उपक्रमांचा अहवाल सादर केला. बैठकीस कृषि अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. यु. एम. खोडके, कृषि महाविद्यालयाचे  प्राचार्य डॉ. सईद इस्माईल, सामुदायिक विज्ञान महाविद्यालयाच्‍या प्राचार्या डॉ.जयश्री झेंड, उद्यानविद्या महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. टी. बी. तांबे, विभाग प्रमुख डॉ. दिलीप मोरे, हे निमंत्रित उपस्थित होते. सुत्रसंचालन डॉ. डी. डी. पटाईत यांनी केले. बैठक यशस्वीतेसाठी प्रा. वसंत ढाकणे, डॉ.संतोष चिक्षे आदींनी परिश्रम घेतले. 

Friday, August 28, 2020

वनामकृवित ३० एकर प्रक्षेत्रावर बहुवर्षीक व हंगामी सव्वीस प्रकाराच्‍या चारापिकांची लागवड

नेपियर चारापिकाचे ठोंब विक्रीसाठी उपलब्‍ध


वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील संकरित गो पैदास प्रकल्‍पाच्‍या वतीने कुलगुरू मा डॉ अशोक ढवण व संशोधन संचालक डॉ दत्‍तप्रसाद वासकर यांच्‍या मार्गदर्शनाखाली बहुवर्षीक व हंगामी चारा पिकांचे ३० एकर प्रक्षेत्र विकसित करण्‍यात आले आहे. यात सव्वीस प्रकाराचे एकदल व व्दिदल चारापिकांचा समावेश आहेत. सद्यस्थितीत शेतकरी पशुपालकांना नाममात्र दरामध्‍ये नेपियर जातीच्‍या विविध वाणांचे ठोंब विक्रीसाठी उपलब्‍ध आहेत, अशी माहिती प्रकल्‍पाचे प्रभारी अधिकारी डॉ दिनेशसिंह चौहान यांनी दिली.

सदरिल नेपियर या एकदल चारापिकाच्‍या राहुरी येथील महात्‍मा फुले कृषि विद्यापीठाने विकसित केलेला गुणवंत, मध्‍यप्रदेशातील झांशी येथील कृषि विद्यापीठाचा आयजीएफआरआय-७, तामिळनाडु राज्‍यातील कोईंबतुर येथील कृषि विद्यापीठाने विकसित केलेल्‍या सीओबीएन-५ या वाणाची लागवड करण्‍यात आली आहे. या वाणांमध्‍ये प्रथिनांचे प्रमाण अधिक असुन कुसळाचे प्रमाण कमी आहे. जनावरांना पचनास हे गवत चांगले असुन पशुपालक शेतक-यांनी या गवताच्‍या वाणांची लागवड केल्‍यास पशुधनास सकस आहार उपलब्‍ध होऊ शकतो. या गवताची लागवड करण्‍यासाठी प्रक्षेत्रावरील ठोंब प्रति नग एक रूपया या नाममात्र दरांने शेतक-यांकरिता विक्रिसाठी उपलब्‍ध आहे. अधिक माहिती साठी डॉ दिनेशसिंह चौहान यांच्‍याशी मोबाईल क्रमांक ९४२३१७१७१५ यावर संपर्क साधावा.

Tuesday, August 25, 2020

सोयाबीनवरील शेंगा करपा रोगाचे व्यवस्थापन


मराठवाडयात सततच्या पावसामुळे सोयाबीनवर शेंगा करपा हा रोग काही भागात दिसून येत आहे व इतरही भागात येण्याची शक्यता आहे, तरी भविष्यातील नुकसान टाळण्यासाठी त्याचे वेळीच व्यवस्थापन करणे गरजेचे आहे.

रोगाची लक्षणे व नुकसान

हा रोग कोलोटोट्रीचम ट्रुन्‍कयॉडॅम (Collototrichum truncatum) हया बुरशीमुळे होतो. यात पाने, खोड व शेंगांवर अनियमित आकाराचे भुरकट, लालसर किंवा गर्द तपकिरी रंगाचे ठिपके पडतात व त्यावर नंतर काळी सूक्ष्म बुरशीपुंज दिसून येतात. शेंगांचा आकार लहान व पोचट राहतो व त्याचा बी तयार होण्यावर विपरीत परिणाम होतो.

रोगाचे व्यवस्थापन

रोग नियंत्रणासाठी व इतर निरोगी सोयाबीन वर पसरू नये म्हणून कार्बेन्डाझिम अधिक मॅन्कोझेब (संयुक्त बुरशीनाशक) - ५०० ग्रॅम किंवा टेब्युकोनॅझोल १०% अधिक सल्फर ६५ % (संयुक्त बुरशीनाशक) - ५०० ग्रॅम किंवा टेब्युकोनॅझोल २५.९ % - २५० मिली प्रति एकर फवारावे. आवश्यकता वाटल्यास दहा दिवसांनी परत एकदा फवारणी करावी.

वरील बुरशीनाशकाचे प्रमाण सर्व प्रकारच्या पंपाकरिता आहे, अशी माहिती वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील कृषि तंत्रज्ञान माहिती केंद्राच्‍या वतीने देण्‍यात आली आहे. अधिक माहितीसाठी कृषि तंत्रज्ञान माहिती केंद्राच्‍या कृषि माहिती वाहिनी दुरध्वनी क्रमांक ०२४५२ २२९००० यावर कार्यालयीन वेळेत संपर्क साधवा.

संदर्भ :  कृषि तंत्रज्ञान माहिती केंद्र, वनामकृवि संदेश क्रमांक: १२/२०२० ( २५ ऑगस्ट २०२०)

Saturday, August 22, 2020

कृषी अभियांत्रिकी महाविद्यालयात अवयवदान जनजागृती ऑनलाईन वेबिनार

मरावे परि अवयवरुपी उरावे – मा. कुलगुरू डॉ. अशोक ढवण

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि ि‍वद्यापीठातील कृषी अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजने मार्फत “अवयवदान जनजागृती” सप्ताह निमित्त अवयवदान या विषयावर जनजागृतीसाठी ऑनलाईन वेबिनारचे आयोजन दिनांक २० ऑगस्ट रोजी करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कुलगुरू मा. डॉ. अशोक ढवण हे होते तर प्रमुख वक्ते म्हणून प्रसिध्द बालरोगतज्ञ आणि या विषयावरील कार्य करणारे डॉ. संदीप कार्ले यांनी मार्गदर्शन केले. सदरील वेबिनारचे मुख्य आयोजक महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता व प्राचार्य डॉ. उदय खोडके हे होते.

मार्गदर्शनात डॉ. संदीप कार्ले म्हणाले कि, देहदानाची ही संकल्पना आपल्या समाजात अजूनही म्हणावी तशी रुजलेली नाही त्यामुळे कधी धर्माचा विरोध म्‍हणून तर कधी  आप्तस्वकीयांच्या देहाची चिरफाड करू द्यायला मन धजावत नाही किंवा देह्दानाबाबात्च्या गैरसमजामुळे देहदानाला विरोध करतात. समाजात अनेक गरजवंत व्यक्ती आहेत कि ज्यांना अवयवदानामुळे जीवनाची नवसंजीवनी मिळेल. त्यामुळे त्वचा, डोळे, हृदय, फुफ्फुस, यकृत, किडनी आदी मानवी अवयवांचे मरणोत्तर दान करून अनेक व्यक्तींना नवीन जीवन मिळू शकते. डॉ. संदीप कार्ले यांनी अवयवदानाची शास्त्रीय दृष्टीकोनातून विस्तृत अशी माहिती सर्व उपस्थितांना दिली. मृत्यूनंतर २ ते ३ तासात त्वचादान करणे चांगले असते. डॉक्टर दात्याच्या घरी येऊन अर्ध्या तासाची शस्त्रक्रिया करतात तेव्हा रक्ताचा थेंबहि येत नाही, तसेच दात्याचा देहही विद्रूप होत नाही. त्वचादानामुळे अॅसिडने अथवा आगीत होरपळून जखमी झालेल्या अनेक रुग्णांचे प्राण वाचवता येतात. प्रक्रिया केलेली त्वचा टिकवून ठेवता येते. त्वचादानानंतर लगेच नेत्रदान करणे चांगले असते. नेत्रदानानंतर कृत्रिम नेत्र बसवतात, त्यामुळे देह विद्रूप होत नाही. नेत्रदानातून मिळालेल्या कॉरनियाच्या उपयोगाने दोन वा अधिक अंध व्यक्तींनादृष्टी मिळू शकते. मोतीबिंदू ऑपरेशन झालेली, चष्मा वापरणारी, रक्तदाब/मधुमेह पिडीत व्यक्तीही निधानंतर नेत्रदान करू शकतात. नेत्रादानानंतर कोर्निया प्रयोगशाळेत तपासून प्रक्रिया करून त्याचे ४८ तासात प्रत्यारोपण केले जाते.

अध्यक्षीय भाषणात मा. कुलगुरू डॉ. अशोक ढवण म्‍हणाले की, अवयवदानाने समाजातील जाती धर्मातील विषमता दूर होऊन बंधुत्वाची भावना वाढीस लागण्यास मदत होईल. मृत्यूनंतर हि आपला देह मानवी कल्याणाकरिता उपयोगी पडावा, ही प्रेरणा केवळ देहदान व अवयव दानातून निर्माण होते. तसेच आपला वेळआयुष्य इतरांच्या भल्यासाठी खर्च करणारी, गरजूंच्या मदतीला धावणारी अनेक देवमाणसे आपल्या समाजात आहेत. गरजू व्यक्तींची मदत करून इतरांच्या कामी येण्याचा संस्कार त्यांच्या मनात खोलवर रुजलेला असतो. देहदान व अवयवदानाच्या मार्गाने अशा व्यक्तींना त्यांच्या मनाचे मोठेपण मरणोत्तर सुद्धा जपता येऊ शकते. अश्या प्रकारे देहदानाचे महत्त्व समजावून सांगताना त्यांनी “मरावे परि अवयव रुपी उरावे” असा संदेश दिला.

प्रास्ताविकात प्राचार्य डॉ. उदय खोडके यांनी अवयव दानाविषयीची वास्तविकता सर्व समाज घटकांना विशेषता तरुण पिढीला माहिती होऊन जनजागृती व्हावी, याबाबतचे गैरसमज दूर व्हावे व सर्व घटकांचे मदतीने या चळवळीला बळ प्राप्त व्हावे अशी अपेक्षा व्यक्त केली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. रवींद्र शिंदे यांनी केले तर आभार प्रा. संजय पवार यांनी मानले. कार्यक्रम यशस्वीतेकरिता प्रा. विवेकानंद भोसले, नाहेप प्रकल्प प्रमुख डॉ. गोपाल शिंदे, प्रा. विणा भालेराव,  रश्मी बंगाळे, रवी कल्लोजी यांनी सहकार्य केले. 

कार्यक्रमात डॉ. राहुल रामटेके, प्रा.भास्कर भुइभार, डॉ. स्मिता खोडके, डॉ. स्मिता सोलंकी, डॉ. हरीश आवारी, डॉ. सुभाष विखे, प्रा. भालचंद्र सावंत, प्रा. पंडित मुंढे, डॉ. सुमंत जाधव, प्रा. मधुकर मोरे, प्रा.प्रमोदिनी मोरे, प्रा.दत्ता पाटील, प्रा. विशाल इंगळे, प्रा. श्याम गरुड, लक्ष्मीकांत राऊतमारे आदीसह. विद्यार्थी, प्राध्यापक, प्रतिष्ठित व्यक्ती, कर्मचारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

Friday, August 21, 2020

मराठवाडयातील शेतकरी बांधवाचे जीवनमान उंचावण्‍याकरिता सोयाबीनची उत्‍पादकता वाढ आवश्‍यक ........ कृषिमंत्री मा ना श्री दादाजी भुसे

वनामकृवित तीन दिवसीय ऑनलाईन सोयाबीन कार्यशाळेच्‍या समारोपा प्रंसगी प्रतिपादन

सोयाबीन हे महाराष्‍ट्रातील कापसानंतर दोन क्रमांकाचे महत्‍वाचे पिक असुन मराठवाडा व विदर्भातील शेतकरी बांधवाचे जीवनमान उंचावण्‍याकरिता सोयाबीनची उत्‍पादकता वाढविणे गरजेचे आहे. याकरिता सोयाबीन बियाणे निवड, उगवणक्षमता तपासणी, पेरणी पासुन ते काढणी पर्यंत तसेच काढणी पश्‍चात तंत्रज्ञान आदी विषयीचे सर्वकष माहिती शेतक-यांपर्यंत पोहचली पाहिजे. सोयाबीनचे बियाणे अत्‍यंत संवेदशील असते, त्‍यांची काढणी व काढणी पश्‍चात हाताळणी योग्‍य होणे आवश्‍यक आहे. असे प्रतिपादन महाराष्‍ट्र राज्‍याचे कृषिमंत्री मा ना श्री दादाजी भुसे यांनी केले.

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील विस्तार शिक्षण संचालनालय, खिल भारतीय समन्‍वयीत सोयाबीन संशोधन प्रकल्प व नाहेप प्रकल्‍प यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक 19 ते 21 ऑगस्ट दरम्‍यान तीन दिवसीय ऑनलाईन सोयाबीन कार्यशाळा संपन्न झाली, या कार्यशाळेच्‍या समारोपा प्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाच्‍या अध्‍यक्षस्‍थानी कुलगुरू मा डॉ अशोक ढवण हे होते तर विस्‍तार शिक्षण संचालक डॉ देवराव देवसरकर, जिल्‍हा अधिक्षक कृषि अधिकारी श्री संतोष आळसे, सोयाबीन संशोधन प्रकल्‍पाचे डॉ एस पी म्‍हेत्रे, विस्‍तार कृषि विद्यावेता डॉ उद्धव आळसे आदींची प्रमुख उपस्थिती होती.  

मा ना श्री दादाजी भुसे पुढे म्‍हणाले की, पुढील वर्षी शेतकरी बांधवाना घरचे बियाणे ठेवण्‍या करिता त्‍यांची काढणी व काढणी पश्‍चात हाताळणी याबाबत याच वर्षी काढणीच्‍या वेळी मार्गदर्शन करावे. पेरणीच्‍या वेळी बियाणे 5 सेंमी पेक्षा जास्‍त खोल पडले नाही पाहिजे यांची दक्षता घेणे आवश्‍यक आहे. पेरणी बीबीएफ पध्‍दतीने केल्‍यास निश्चितच उत्‍पादनात वाढ होते. शेतकरी उत्‍पादक कंपन्‍यानी दर्जेदार बियाणे निर्माण करून शेतक-यांपर्यंत पोहचवावे. केवळ सोयाबीन उत्‍पादकतेत वाढीवर भर न देता, त्‍यांचे विपनण तसेच मराठवाडयात सोयाबीन प्रक्रिया उद्योगात वाढीसाठी प्रयत्‍न केला जाईल. सदरिल तीन दिवसीय कार्यशाळेत जे निष्‍कर्ष आहेत, त्‍यांचा शासनस्‍तरावर विचार करून अंमलबजावणी करण्‍यात येईल. पुढील वर्षी सोयाबीन पिकाचे 25 ते 30 टक्के उत्‍पादन वाढीचे उद्दीष्‍ट ठेऊन राज्याचा कृषि विभाग, कृषि विद्यापीठे, शेतकरी उत्पादक कंपन्या, सोयाबीन प्रक्रिया उद्योजक, प्रगतशील शेतकरी आदींनी ए‍कत्रित प्रयत्‍न करण्‍याचे आवाहन त्‍यांनी  केले.

अध्‍यक्षीय भाषणात कुलगुरू मा डॉ अशोक ढवण म्‍हणाले की, शेतकरी व शेतकरी बियाणे उत्‍पादक कंपन्‍याना दर्जेदार पायाभुत व प्रमाणित बियाणे पुढील हंगामात उपलब्‍ध करून देण्‍याकरिता विद्यापीठाने सोयाबीन बीजोत्‍पादनाचा महत्‍वकांक्षी उपक्रम हाती घेतला असल्‍याचे सांगितले.

दिनांक १९ ऑगस्ट रोजी कार्यशाळेचे उद्घाटन कुलगुरू डॉ. अशोक ढवण यांच्या हस्ते झाले. तीन दिवसीय ऑनलाईन कार्यशाळेत सोयाबीन पिकाचे वाण व बीज उत्पादन तंत्रज्ञान, बीजप्रक्रिया, उगवणशक्ती, जिवाणू खतांचा वापर, आधुनिक लागवड तंत्रज्ञान, कीड व रोग व्यवस्थापन, आयात निर्यात धोरण, विक्री व बाजार व्यवस्थापन, शासकीय खासगी सहभाग – पीपीपी, प्रक्रिया उद्योग आदीं विषयावर डॉ. एस. पी. म्हेत्रे, डॉ. गोदावरी पवार, डॉ. उद्धव आळसे, डॉ. आर. एस. जाधव, डॉ. सी. व्ही. अंबाडकर, डॉ. स्मिता खोडके, डॉ. आर. व्ही. चव्हाण, डॉ. अे. व्ही. गुटटे, डॉ. एस. बी. पवार, श्री.अनंत गायकवाड, श्री. वैभव कहाते, डॉ पी. एस. लहाने, श्री. संतोष आळसे, श्री. के. आर. सराफ आदींनी मार्गदर्शन केले. तसेच कार्यशाळेत प्रगतशील शेतकरी श्री. दिलीप अंभारे, अॅड. अमोल रणदिवे व श्री. शेषेराव निरस यांनी शेतकरी उत्पादक कंपन्या व शेतक-यांचे सोयाबीनबाबतच्या समस्यांचा उहापोह केला.

कार्यशाळेत झालेल्‍या चर्चाच्‍या आधारे सोयाबीन पिकाचे वाण, बिजप्रक्रिया, पेरणी, कीड व रोगनियंत्रण, काढणी पश्चात तंत्रज्ञान, सोयाबीन  प्रक्रिया आदी संदर्भात विविध शिफारशीचे सादरिकरण प्रा अरूण गुट्टे यांनी केले. प्रास्ताविकात संचालक विस्तार शिक्षण डॉ. डी. बी. देवसरकर यांनी कार्यशाळेचे प्रायोजन विषद केले. सुत्रसंचलन डॉ. प्रविण कापसे तर आभार डॉ. विश्वनाथ कांबळे यांनी केले. कार्यशाळेच्या यशस्वी आयोजनात डॉ. गोपाळ शिंदे, डाॅ वसंत सुर्यवंशी, डॉ किशोर झाडे, डॉ अजय किनखेडकर, डॉ सचिन सोमवंशी, डॉ. दिगांबर पटाईत, प्रा.वसंत ढाकणे व डॉ. संतोष चिक्षे यांनी सहभाग घेतला.