Saturday, May 30, 2015

मराठवाडयातील शेतक-यांना वि‍हीर व कुपनलिका पुनर्भरणाशिवाय पर्याय नाही.....कुलगुरू मा डॉ. बी. व्‍यंकटेश्‍वरलु
वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विदयापीठातंर्गत असलेल्‍या परभणी येथील अखिल भारतीय समन्‍वयीत कोरडवाहू शेती संशोधन प्रकल्‍पाच्‍या संशोधन प्रक्षेत्रावर विकसीत तंत्रज्ञानाव्‍दारे कुपनलिकेचे पुनर्भरणाचे उद्घाटन नुकतेच कुलगुरू मा. डॉ. बी. व्‍यंकटेश्‍वरलु यांच्‍या हस्‍ते करण्‍यात आले. यावेळी संशोधन संचालक डॉ. दत्‍तप्रसाद वासकर यांच्‍या प्रमुख उपस्थिती होती. उद्घाटनाप्रसंगी कुलगुरू मा डॉ बी व्‍यंकटेश्‍वरलु म्‍हणाले की, मराठवाडयातील कुपनलिका व विहीरीतील पाण्‍याची पातळी अधिकाधिक खालवत असुन शेतक-यांना पुनर्भरणाशिवाय पर्याय नाही. कुपनलिका पुनर्भरणाने वाढलेल्‍या भूजल साठयातून पिकांना संरक्षित पाणी देऊन कोरडवाहू शेती पिक उत्‍पादनात शाश्‍वतता येऊ शकेल. संशोधन संचालक डॉ. दत्‍तप्रसाद वासकर यांनी भूजलसाठा वाढविण्‍यासाठी विद्यापीठातील सर्व संशोधन केंद्राच्‍या विहिर व कुपनलिकेंचे पुनर्भरण करण्‍यात येणार असल्‍याचे सांगितले.
      याप्रसंगी मान्‍यवरांना मुख्‍य शास्‍त्रज्ञ डॉ. भगवान आसेवार कुपनलिका पूनर्भरणाची सविस्‍तर तर कृषि शास्‍त्रज्ञ अभियंता प्रा. मदन पेंडके यांनी पुनर्भरणाच्‍या तांत्रिक बाबींची माहिती दिली. ज्‍या शेतक-यांना विहीर व कुपनलिकेचे शास्‍त्रशुध्‍द व तांत्रीक पध्‍दतीने पुर्नभरणाची करावयाचे आहे, त्‍यांनी अधिक माहितीसाठी मुख्‍य शास्‍त्रज्ञ डॉ. भगवान आसेवार (९४२००३७३५९) व शास्‍त्रज्ञ अभियंता प्रा. मदन पेंडके (९८९०४३३८०३) यांच्‍याशी संपर्क साधण्‍याचे आवाहन विद्यापीठाच्‍या वतीने करण्‍यात आले असुन कुपनलिका पुर्नभरणाचे मॉडेल परभणी येथील अखिल भारतीय समन्‍वयीत कोरडवाहू शेती संशोधन प्रकल्‍पाच्‍या प्रक्षेत्रावर पाहण्‍यासाठी उपलब्‍ध आहे.
        उद्घाटन प्रसंगी सहयोगी अधिष्‍ठाता डॉ उदय खोडके, वरीष्‍ट शास्‍त्रज्ञ डॉ. आंनद गोरे, कनिष्‍ठ मृदाशास्‍त्रज्ञ डॉ. गणेश गायकवाड, डॉ. मेघा सुर्यवंशी, श्री. पिंगळे, सौ. सारीका नारळे उपस्थित होते. कार्यक्रम यशस्‍वीतेसाठी श्री. सय्यद, अभियंता श्री. माणिक समिंद्रे, नरसिंग भंडारे यांनी परिश्रम घेतले.  

Wednesday, May 27, 2015

विद्यापीठ ऊस लागवड पध्‍दत संशोधनात पुढाकार घेणार........कुलगुरु मा. डॉ बी व्‍यंकटेश्‍वरलु

परभणी जिल्‍हातील पुर्णा तालुक्‍यातील गोळेगांव येथील ऊस उत्‍पादकांचा मेळावात प्रतिपादन

ऊस संशोधनात वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ पुढाकार घेणार असून तामिळनाडू आणि कर्नाटक राज्‍यातील सुधारीत ऊस लागवड पध्‍दतीवर विद्यापीठाच्‍या वसमत येथील ऊस संशोधन केंद्रात संशोधन करण्‍यात येणार असुन मराठवाड्यातील शेतक-यांना उपयुक्‍त तंत्रज्ञान शिफारस करण्‍यात येईल, अशी माहिती कुलगुरु मा. डॉ. बी. व्‍यंकटेश्‍वरलू यांनी दिली.
पुर्णा तालुक्‍यातील गोळेगांव येथे दि. २५ मे रोजी वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाच्‍या विस्‍तार शिक्षण संचालनालय, गोळेगांव ग्रामपंचायत व दैनिक गोदातीर समाचार यांच्‍या संयुक्‍त विद्यमाने ऊस उत्‍पादकांचा मेळावा पार पडला, यावेळी उद्घाटक म्‍हणून ते बोलत होते. कार्यक्रमाच्‍या अध्‍यक्षस्‍थानी बळीराजा शिक्षण संस्‍थेचे संस्‍थापक भाई लक्ष्‍मणराव गोळेगांवकर, प्रमुख अतिथी म्‍हणुन विस्‍तार शिक्षण संचालक डॉ. बी. बी. भोसले, पुर्णा कारखान्‍याचे संचालक गंगाधरराव धवण, शास्‍त्रज्ञ डॉ. अशोक कडाळे, डॉ. यु. एन. आळसे, प्रगतशील शेतकरी गजानन घुंबरे, प्रताप काळे, तालुका कृषि अधिकारी श्री रत्‍नाकर देशपांडे आदी उपस्थित होते.
      कुलगुरु मा डॉ. व्‍यंकटेश्‍वरलू पुढे म्‍हणाले की, पाण्‍याच्‍या कमतरतेमुळे ऊसाला आता ठिबकाशिवाय पर्याय नसुन ऊसाच्‍या खत व पाणी नियोजनात सुधारणा होणे गरजेचे आहे. त्‍यासाठी वसमत येथील ऊस संशोधन केंद्राचे बळकटीकरण करण्‍यात येईल. मराठवाडयातील ऊसाची गुणवता इतर राज्‍यापेक्षा सर्वाधिक असुन या भागात ऊसावर अधिक संशोधन व्‍हावे विद्यापीठ पुढाकार घेईल, असे प्रतिपादन त्‍यांनी केले.
विस्‍तार शिक्षण संचालक डॉ. बी बी भोसले आपल्‍या भाषणात म्‍हणाले की, शेतकरी पूर्णपणे तंत्रज्ञानाचा अवलंब करत नाही. शास्‍त्रज्ञांनी केलेल्‍या शिफारशीनुसार पिकांची जोपासणा करत नसल्‍याने उत्‍पादनात घट येते. ऊस लावतांना माती परिक्षण करुनच लागवड करावी, खताची मात्रा देतांना विद्यापीठाचा सल्‍लानुसारचे दया, असा सल्‍ला त्‍यांनी दिला.
बळीराजा शिक्षण संस्‍थेचे संस्‍थापक भाई लक्ष्‍मणराव गोळेगांवकर आपल्‍या भाषणात म्‍हणाले की शेतकरी जगला तरच जग वाचेल, सर्व वस्‍तुंची किंमत ठरलेली असते मात्र शेतक-यांच्‍या श्रमाची किंमत त्‍याला ठरविण्‍याचा अधिकार नाही. बळीराजा परिवाच्‍यावतीने बिगर कर्ज असणा-या प्रयोगशील शेतक-याचा पुरस्‍कार देवुन सन्‍मान करण्‍याची घोषणा भाई गोळेगांवकर यांनी केले. तसेच आत्‍महत्‍या केलेल्‍या शेतक-यांच्‍या मुलांना नौकरी लागेपर्यंत मोफत शिक्षण देण्‍याचाही निर्णय बळीराजा परिवाराने घेतल्‍याचे भाई लक्ष्‍मणराव गोळेगांवकर यांनी सांगीतले.

मेळाव्‍यात कृषि तंत्रज्ञान माहिती केंद्राचे व्‍यवस्थापक डॉ. यु एन आळसे यांनी माती परिक्षणावर मार्गदर्शन करून शेतक-यांच्‍या प्रश्‍नांना त्‍यांनी उत्‍तरेही दिली. डॉ. अशोक कडाळे यांनी शेतक-यांशी ऊस लागवडी संदर्भात थेट संवाद साधला. कार्यक्रमाचे प्रास्‍ताविकात दैनिक गोदातीरचे संपादक अॅड रमेशराव गोळेगांवकर यांनी मेळाव्‍याच्‍या आयोजनाबाबतची भूमिका स्‍पष्‍ट केली. भविष्‍यात विद्यापीठ आणि शेतकरी यांना एकत्र आणून शेतक-यांच्‍या मालाला बाजारपेठ निर्माण करण्‍यासाठी प्रयत्‍न करणार असल्‍याचेही त्‍यांनी सांगितले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गजानन अंबोरे यांनी तर आभार प्रदर्शन प्रा. सुरेश दुधाटे यांनी केले. कार्यक्रम यशस्‍वीतेसाठी गोळेगावचे माजी सरपंच दिलीपराव दुधाटे, उध्‍दवराव तेलंग, रामराव ढवळे, संभाजीराव भोसले, सखाराम शिंदे आदीसह गांवक-यांनी पुढाकार घेतला. यावेळी विद्यापीठाच्‍या माती परिक्षण फिरती प्रयोगशाळेमार्फत परिसरातील गांवातील शेतक-यांच्‍या मातीचे नमुने परिक्षणासाठी जमा करण्‍यात आले. मेळाव्‍यास शेतकरी मोठया संख्‍येने उपस्थित होते. 

Friday, May 22, 2015

परिश्रमास प्रयत्नांची जोड दिल्यास यश मिळणे कठीण नाही.........प्राचार्य डॉ. उदय खोडके

 

परिश्रमास प्रयत्नांची जोड दिल्यास यश मिळणे कठीण नाही, महाविद्यालयातून प्राप्त ज्ञान आणि कौशल्यांचा राष्ट्र उन्नतीसाठी विद्यार्थ्‍यांनी वापर करावा, असे आवाहन सहयोगी अधिष्ठाता तथा प्राचार्य डॉ. उदय खोडके यांनी कृषी अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालयातील कृषी अभियांत्रिकीच्‍या पदवी अभ्यासक्रमाच्या अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांच्या दिनांक २१ मे रोजी आयोजित निरोप समारंभ कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी व्‍यासपीठावर डॉ स्मिता खोडके, प्रा व्ही एम भोसले, प्रा एच डब्लू आवारी आदींची प्रमुख उपस्थिती होती.
प्राचार्य डॉ. उदय खोडके पुढे म्‍हणाले की, शेतीत यांत्रिकीकरणाची मोठी गरज असुन शेतक-यांना याबाबत चांगली सेवा देण्‍याची मोठी संधी कृषी अभियांत्रिकीच्‍या पदवीधरांना आहे. कृषी अभियांत्रिकीच्‍या पदवीधरांनी शेतक-यांसाठी कार्य करावा, असा सल्‍ला ही त्‍यांनी दिला. कार्यक्रमात प्रा गोपाळ शिंदे यांनी नोकरीच्या संधी याविषयी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. यावेळी रघुनाथ जगतापधनराज जाधवअभयसिंह पवारअनंता हांडेविवेक महाजन, पंढरी मस्के या अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्‍यक्‍त केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा मधुकर मोरे यांनी केले तर सूत्रसंचालन विद्यार्थी प्रतिनिधी राजेंद्र पवार आणि गोविंद फुलारी यांनी केले. यावेळी मान्यवरांच्या हस्ते अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांचा स्मृतीचिन्ह आणि पुष्पगुछ देवून सत्कार करण्यात आला. या प्रसंगी प्रा.पंडित मुंडे, प्रा.दयानंद  टेकाळेप्रा.सुमंत जाधवप्रा.सुहास जाधवप्रा.प्रमोदिनी मोरेप्रा.रविंद्र शिंदेप्रा.लक्ष्‍मीकांत राऊतमारेप्रा.मधुकर मोरेविद्यार्थी प्रतिनिधी नवनाथ घोडके आदींसह प्राध्‍यापक व अधिकारीविद्यार्थी मोठ्या संख्‍येने उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वीतेसाठी पांचाळकच्छवेगिरीखिल्लारेकटारेशेळके आणि रणेर आदींनी परिश्रम घेतले.

Thursday, May 21, 2015

प्राचार्य डॉ. बालासाहेब ठोंबरे यांचे दु:खद निधन

वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातर्गत असलेल्‍या अंबाजोगाई येथील कृषी महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्‍ठाता तथा प्राचार्य डॉ बालासाहेब ठोंबरे यांचे दिनांक १८ मे रोजी –हद्यविकाराच्‍या झटक्‍याने दु:खद निधन झाले, मृत्‍यु समयी त्‍यांचे वय ५९ वर्षाचे होते. डॉ ठोंबरे यांनी कृषी विद्यापीठात विस्‍तार शिक्षण विभागाचे प्राध्‍यापक, विभाग प्रमुख, विद्यापीठाचे कुलसचिव, महाविद्यालयाचे प्राचार्य अशा विविध पदांवर कार्य केले असुन आपल्‍या ३५ वर्षांच्‍या प्रदीर्घ सेवेत त्‍यांनी एक आदर्श, शिस्‍तप्रिय व विद्यार्थीप्रीय प्राध्‍यापक म्‍हणुन नावलौकिक मिळविला होता. दिनांक १८ रोजी त्‍यांच्‍या मुळ गावी मौजे उंदरी ता केज जि बीड येथे त्‍यांच्‍या पार्थिवावर शोकाकुल वातावरणात अंत्‍यसंस्‍कार करण्‍यात आले. यावेळी शिक्षण संचालक डॉ अशोक ढवण, प्राचार्य डॉ धर्मराज गोखले, प्राचार्य डॉ शरद शडगार, प्राचार्य डॉ बाळासाहेब चव्‍हण आदींसह सामाजिक, राजकीय, शैक्षणिक क्षेत्रातील अनेक मान्‍यवर उपस्थित होते. एक उत्‍तम अभ्‍यासक, संशोधक तथा विस्‍तार कार्याचा अभ्‍यासु शिक्षक गमावल्‍यची भावना यावेळी उपस्थितांनी व्‍यक्‍त केली. त्‍यांच्‍या पश्‍चात आई, वडिल, चुलते, भाऊ, पत्‍नी, कन्‍या, जावई, नातु असा मोठा परिवार आहे. विद्यापीठाच्‍या वतीने त्‍यांना श्रध्‍दांजली वाहण्‍यात आली. 

Monday, May 18, 2015

शेतक-यांच्‍या जीवनात कृषि विद्यापीठांचे स्‍थान महत्‍वाचे ....... कृषी राज्‍यमंत्री मा. ना. प्रा. राम शिंदे

वनामकृविच्‍या ख‍रीप पीक शेतकरी मेळावा मोठा प्रतिसाद
खरीप पीक शेतकरी मेळाव्‍याचे उद्घाटन करतांना कृषी राज्‍यमंत्री मा ना प्रा राम शिंदे, सोबत कुलगुरू मा डॉ बी व्‍यंकटेश्‍वरलु, माजी कुलगुरू मा डॉ व्‍ही एम मायंदे, मा श्री केदार साळुंके, मा श्री विजयराव गव्‍हाणे, डॉ बी बी भोसले आदी 
विद्यापीठाच्‍या शेती भाती मासिकाचे विमोचन करतांना कृषी राज्‍यमंत्री मा ना राम शिंदे, डॉ बी व्‍यंकटेश्‍वरलु, डॉ व्‍ही एम मायंदे, मा आमदार मोहनराव फड, मा श्री केदार सांळुके, मा श्री विजयराव गव्‍हाणे, डॉ बी बी भोसले, कुलसचिव डॉ ड‍ि एल जाधव आदी
कृषी राज्‍यमंत्री मा ना राम शिंदे यांच्‍या हस्‍ते वसंतराव नाईक कृषीभुषण पुरस्‍कार प्राप्‍त शेतकरी श्री पांडुरंग आवाड यांचा सत्‍कार करतांना डॉ बी व्‍यंकटेश्‍वरलु, डॉ व्‍ही एम मायंदे, मा आमदार मोहनराव फड, मा श्री केदार सांळुके, मा श्री विजयराव गव्‍हाणे, डॉ बी बी भोसले, कुलसचिव डॉ ड‍ि एल जाधव आदी
मेळाव्‍यात मार्गदर्शन करतांना कृषी राज्‍यमंत्री मा ना प्रा राम शिंदे, व्‍यासपीठावर कुलगुरू मा डॉ बी व्‍यंकटेश्‍वरलु, माजी कुलगुरू डॉ व्‍ही एम मायंदे, आमदार रामराव वडकुते, आमदार मोहनराव फड, मा श्री केदार सांळुके, विस्‍तार शिक्षण संचालक डॉ बी बी भोसले, कुलसचिव डॉ डि एल जाधव आदी
***************************
कृषि विद्यापीठाने विकसीत केलेल्‍या बियाणास शेतक-यांमध्‍ये मोठी मागणी, हेच शेतक-यांची विद्यापीठाप्रती असलेली विश्‍वासार्हता सिध्‍द करते. कृषि विद्यापीठांचे शेतक-यांच्‍या जीवनात महत्‍वाचे स्‍थान असुन विद्यापीठाची कृषि विस्‍तार यंत्रणा मराठवाड्यातील प्रत्‍येक जिल्‍ह्यात बळकट करण्‍यासाठी येईल, असे प्रतिपादन कृषी राज्‍यमंत्री मा. ना. प्रा. राम शिंदे यांनी केले. वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्‍या ४३ व्‍या वर्धापन दिनानिमित्‍त विस्‍तार शिक्षण संचालनालय व महाराष्‍ट्र शासनाचा कृषि विभाग यांच्‍या संयुक्‍त विद्यमाने दिनांक १८ मे रोजी आयोजित खरीप शेतकरी मेळाव्‍याच्‍या उद्घाटनाप्रसंगी ते बोलत होते. याप्रसंगी विशेष अतिथी म्‍हणुन अकोला येथील डॉ पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे माजी कुलगुरू मा डॉ व्‍ही एम मायंदे उपस्थित होते तर अध्‍यक्षस्‍थानी विद्यापीठाचे कुलगुरू मा डॉ बी व्‍यंकटेश्‍वरलु होते. व्‍यासपीठावर मा. आ. मोहनराव फड, मा. आ. रामराव वडकुते, विद्यापीठ कार्यकारी परिषद सदस्‍य मा. श्री केदार साळुंके, माजी आ. विजयराव गव्‍हाणे, मा.श्री विठ्ठलराव रबदडे, विस्‍तार शिक्षण संचालक डॉ बी बी भोसले, कुलसचिव डॉ डि एल जाधव, जिल्‍हा अधिक्षक कृषी अधिकारी श्री साहेबराव दिवेकर यांची प्रमुख उपस्थिती होती.
कृषी राज्‍यमंत्री मा. ना. प्रा. राम शिंदे पुढे म्‍हणाले की, हवामान बदलामुळे शेतीपुढे अनेक समस्‍या निर्माण झाल्‍या असुन मराठवाड्यात विशेषत: पाण्‍याचा प्रश्‍न गंभीर झाला आहे. येणा-या हंगामात पाऊसाचा थेंब न थेंब शिवारात व गावात आडवण्‍यासाठी व जिरवण्‍यासाठी शासनाने सुरु केलेल्‍या जलयुक्‍त शिवार महत्‍वकांक्षी कार्यक्रमामुळे शेतक-यांना निश्चितच लाभ होणार आहे. पाण्‍याचे स्‍त्रोत वाढविण्‍यासाठी वाटरबॅक संकल्‍पनेचा अवलंब करावा लागेल. आजच्‍या स्‍पर्धेच्‍या युगात शेतक-यांनाही बदलावे लागेल, शेतक-यांनी आधुनिक तंत्रज्ञानाची कास धरावी. येणा-या हंगामात प्रत्‍येक शेतक-यांना माती परिक्षण करुनच पिकांना खतांची योग्‍य मात्रा द्यावी यामुळे अनावश्‍यक खतांचा वापर टाळता येईल. तसेच पाण्‍याच्‍या उपलब्‍धतेनुसार पिक पध्‍दतीचा अवलंब करावा. इस्‍त्राईल शेती पध्‍दतीनुसार पॉलीहाऊस, शेडनेट आदींचा अवलंब करून शेतक-यांनी नियंत्रीत शेती करावी. शासनाने कृषि मुल्‍य आयोगाची स्‍थापना केली असुन शेतक-यांच्‍या कृषि मालाला उत्‍पादनावर आधारीत योग्‍य भाव देण्‍यासाठी शासन प्रयत्‍नशील आहे. शेतक-यांमध्‍ये उमेद निर्माण करण्‍यासाठी व आत्‍मविश्‍वास वाढीसाठी शासन व विद्यापीठ शेतक-यांच्‍या पाठीशी खंबीर उभे आहे. कृषि संशोधनासाठी शासनस्‍तराला जास्‍तीत जास्‍त अनुदानाची तरतुद करण्‍याचा प्रयत्‍न करण्‍यात जाईल. विद्यापीठ निर्मित उतीसंवर्धन रोपांना शेतक-यांमध्‍ये मोठी मागणी असुन या प्रयोगशाळेच्‍या बळकटी करणासाठी विद्यापीठाने सादर केलेल्‍या तीन कोटीचा प्रस्‍ताव मंजुर करण्‍यात येत आहे, अशी घोषणा यावेळी त्‍यांनी केली.  
अकोला येथील डॉ पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे माजी कुलगुरू मा डॉ व्‍ही एम मायंदे मार्गदर्शन करतांना म्‍हणाले की, वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाने मराठवाड्यातील शेतक-यांसाठी विविध पिकांचे १०० पेक्षा जास्‍त वाणे व शेकडो तंत्रज्ञान विकसीत केले आहे, हेच विद्यापीठाच्‍या ४२ वर्षाच्‍या कारकिर्दीचे प्रमाणपत्र आहे. मराठवाड्यातील ८७ टक्‍के शेती ही कोरडवाहु असुन अपुरे सिंचन, सतत दुष्‍काळ, पावसाची अनियमितता यामुळे शेतक-यांसमोर अनेक समस्‍या आहेत. यासाठी शासन राबवित असलेले जलयुक्‍त शिवार कार्यक्रमामुळे पावसाच्‍या पाण्‍याचा कार्यक्षमरित्‍या वापर होऊ शकेल. तसेच पाणलोटक्षेत्र विकास कार्यक्रमाच्‍या धर्तीवर शेतीचा विकास होणे गरजेचे आहे. शेतक-यांनी विद्यापीठांनी विकसीत केलेल्‍या कोरडवाहू तंत्रज्ञानाचा अवलंब करावा. विविध पिकांत रुंद सरी व वरंबा पध्‍दतीचा अवलंब करावा, शेतीमध्‍ये यांत्रीकीकरण काळाची गरज असुन कृषि अवजार बॅकेची स्‍थापना करावी. शासन अनेक विमा योजना राबवित असुन त्‍याची माहिती शेतक-यांपर्यंत पोहोचवावी लागेल, असे प्रतिपादन त्‍यांनी केले.
अध्‍यक्षीय समारोपात कुलगुरू मा. डॉ बी व्‍यंकटेश्‍वरलु म्‍हणाले की, मराठवाड्यातील शेतक-यांमध्‍ये विद्यापीठ बियाणाबाबत मोठी मागणी असुन विद्यापीठाचा येणा-या काळात अधिक बीजोत्‍पादन करण्‍याचा मानस असुन बिजोत्‍पादनासाठी अधिक सिंचन सुविधासाठी प्रस्‍ताव शासनास सादर केलेला आहे. विद्यापीठातील मनुष्‍यबळाच्‍या कमतरतेवर लवकरच तोडगा काढण्‍यात येणार आहे. मराठवाडयातील कापुस हे मुख्‍य नगदी पिक असुन विद्यापीठ विकसित नांदेड-४४ हा शेतक-यांत लोकप्रिय असलेला वाण लवकरच बीटीमध्‍ये परावर्तीत करण्‍यासाठी येणार आहे. विद्यापीठाने महाबीजशी सामंजस्‍य करार केलेला असुन येत्‍या दोन ते तीन वर्षात नांदेड-४४ चा बीटी वाण शेतक-यांना उपलब्‍ध होईल. विद्यापीठाच्‍या विस्‍तार कार्यात अधिक मजबुत करण्‍याचा विद्यापीठाचा मानस आहे, असे प्रतिपादन त्‍यांनी केले. विद्यापीठ कार्यकारी परिषदेचे सदस्‍य मा. केदार साळुंके यांनी शेतक-यांनी विद्यापीठाचे कमी खर्चीक तंत्रज्ञानाचा अवलंब करावा, असे मत आपल्‍या मनोगतात व्‍यक्‍त केले.
कार्यक्रमाच्‍या प्रास्‍ताविकात विस्‍तार शिक्षण संचालक डॉ बी बी भोसले यांनी विद्यापीठाच्‍या विस्‍तार कार्याची मा‍हिती देवुन विद्यापीठ आत्‍पकालीन पिक पध्‍दतीचा नवीन आराखडा शेतक-यांना लवकरच उपलब्‍ध करुन देणार असल्‍याचे सांगीतले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन डॉ माधुरी कुलकर्णी व प्रा. अरुण गुट्टे यांनी केले तर आभार प्रदर्शन मुख्‍य विस्‍तार शिक्षण अधिकारी डॉ पी आर देशमुख यांनी केले.
याप्रसंगी मराठवाड्यातील कृषि पुरस्‍कार प्राप्‍त शेतक-यांचा मान्‍यवरांच्‍या हस्‍ते सत्‍कार करण्‍यात आला, यात पांडुरंगराव आवाड, आनंतराव देशमुख, विजयराव नरवाडे, भिकनराव वराडे, नामदेव जगदाळे, नारायण चौधरी, भिमराव कदम, शेषराव निरस, उत्‍तमराव भोसले, केदार जाधव, दत्‍तप्रसाद मुंदडा आदिंचा समावेश होता. मान्‍यवरांच्‍या हस्‍ते विद्यापीठ विकसित विविध पीकांचे बियाणे विक्रीचे उद्घाटन करण्‍यात आले तसेच विद्यापीठ शास्‍त्रज्ञ लिखित शेतीभाती मासीकाचे व विविध प्रकाशनाचे विमोचन मान्‍यवरांच्‍या हस्‍ते करण्‍यात आले.
मेळाव्‍याप्रसंगी आयोजित परिसंवादात विद्यापीठ शास्‍त्रज्ञ डॉ. बी. बी. भोसले यांनी एकात्मिक किड व्‍यवस्‍थापन, डॉ. एस. पी. मेहत्रे यांनी सोयाबीन लागवड, प्रा. ए. जी. पंडागळे यांनी कापुस लागवड यावर मार्गदर्शन केले. कोरडवाहु फळपिके व शेडनेट तंत्रज्ञान यावर डॉ. ए. एस. कदम, एकात्मिक तणव्‍यवस्‍थापन यावर डॉ. ए. के. गोरे, शेतीचे यांत्रीकीकरण यावर प्रा. पि. ए. मुंढे, ठिंबक सिंचनाद्वारे पाणी व खत व्‍यवस्‍थापन यावर डॉ. उदय खोडके, कडधान्‍य लागवड तंत्रज्ञान यावर प्रा. पि. ए. पगार यांनी तर एकात्मिक अन्‍नद्रव्‍य  व्‍यवस्‍थापन यावर डॉ. हरीहर कौसडीकर यांनी मार्गदर्शन केले. तसेच शेतक-यांच्‍या विविध शेती विषयक शंकांचे शास्‍त्रज्ञांनी समाधान केले. या प्रसंगी कृषि प्रदर्शनीचे आयोजन करण्‍यात आले होते. मेळाव्‍यास शेतकरी बंधुभगिनींनी मोठया संख्‍येने उपस्थित होते.
विद्यापीठा विकसित बियाणे विक्रीचे उद्घाटन करतांना
कृषी प्रदर्शनीचे उद्घाटन करतांना
कृषी प्रदर्शनीतील किडकशास्‍त्र विभागाच्‍या दालनाची पाहणी करतांना

Wednesday, May 13, 2015

वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठात खरीप शेतकरी मेळाव्याचे आयोजन

वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्‍या ४३ व्‍या वर्धापन दिनानिमित्‍त वनामकृविचे विस्‍तार शिक्षण संचालनालय व महाराष्‍ट्र शासनाचा कृषि विभाग यांच्‍या संयुक्‍त विद्यमाने खरीप शेतकरी मेळाव्‍याचे आयोजन दिनांक १८ मे रोजी सकाळी ११.०० वाजता विद्यापीठाच्‍या प्रशासकीय इमारती जवळील नविन पदव्‍युत्‍तर वसतीगृह मैदानावर करण्‍यात आले असुन मेळाव्‍याचे उद्घाटन महाराष्‍ट्र राज्‍याचे कृषी राज्‍यमंत्री मा. ना. प्रा. राम शिंदे यांच्‍या हस्‍ते होणार आहे. मेळाव्‍यास विशेष अतिथी म्‍हणुन अकोला येथील डॉ पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे माजी कुलगुरू मा डॉ व्‍ही एम मायंदे लाभणार असुन अध्‍यक्षस्‍थानी विद्यापीठाचे कुलगुरू मा डॉ बी व्‍यंकटेश्‍वरलु राहणार आहेत. सदरिल मेळाव्‍यास शेतकरी बंधुभगिनींनी मोठया संख्‍येने उपस्थित राहण्‍याचे आवाहन विस्‍तार शिक्षण संचालक डॉ बी बी भोसले, जिल्‍हा अधिक्षक कृषि अधिकारी श्री एस के दिवेकर व मुख्‍य विस्‍तार शिक्षण अधिकारी डॉ पी आर देशमुख यांनी केले आहे. या प्रसंगी खरीप पीक परिसंवादात विद्यापीठ शास्‍त्रज्ञ विविध विषयावर मार्गदर्शन करणार असुन कृषि प्रदर्शनीचेही आयोजन करण्‍यात आले आहे. परिसंवादात विद्यापीठ शास्‍त्रज्ञ सोयाबीन, कापुस, कडधान्‍य पिके, हळद व अद्रक, ऊस, चारा पिके, इतर खरिप पिके, भाजीपाला, कोरडवाहु फळपिके आदीं पीकांचे लागवड तंत्रज्ञान, विविध पिकांवरील किड व रोग व्‍यवस्‍थापन, तण व्‍यवस्‍थापन, शेतीचे यांत्रिकीकरण व शेडनेट तंत्रज्ञान, कृषि प्रक्रिया उद्योग, शेततळे निगा व देखभाल, पशुधन व्‍यवस्थापन, गृहविज्ञान तंत्रज्ञान, कृषि जोडधंदे व गटशेती आदीं विषयावर मार्गदर्शन करणार आहेत.

वनामकृविच्‍या कृषि तंत्रज्ञान माहिती केंद्राच्‍या व्‍यवस्‍थापकपदी डॉ. यु. एन. आळसे यांची नियुक्‍ती

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी अंतर्गत कृषि तंत्रज्ञान माहिती केंद्राच्‍या विस्‍तार कृषि विद्यावेत्‍ता तथा व्‍यवस्‍थापकपदी डॉ. यु. एन. आळसे यांची नियुक्‍ती करण्‍यात आली असुन नुकतेच त्‍यांनी यापदाचा पदभार स्‍वीकारला. विस्‍तार कृषि विद्यावेत्‍ता या नात्‍याने विद्यापीठ व प्रत्‍यक्ष शेतकरी यांच्‍यातील महत्‍वाचा दुवा म्‍हणुन महत्‍वाचे कार्य करावे लागते. डॉ. यु एन आळसे यांना कृषि विस्‍तारात मोठा अनुभव असुन यापुर्वी ते ज्‍वार कृषि विद्यावेत्‍ता म्‍हणुन ज्‍वार संशोधन केंद्र येथे कार्यरत होते. तसेच अखिल भारतीय समन्‍वयीत पाणी व्‍यवस्‍थापन प्रकल्‍पात त्‍यांनी वरिष्‍ठ शास्‍त्रज्ञ म्‍हणुनही काम केले आहे. त्‍यांच्‍या नियुक्‍तीबद्दल विस्‍तार शिक्षण संचालक डॉ. बी. बी. भोसले, कुलसचिव डॉ. डी. एल. जाधव, मुख्‍य विस्‍तार शिक्षणाधिकारी डॉ. पी.आर. देशमुख, विस्‍तार शिक्षणाधिकारी प्रा. पी. एस. चव्‍हाण आदींनी त्‍यांचे अभिनंदन केले. याप्रसंगी विस्‍तार शिक्षण संचालक डॉ. बी बी भोसले म्‍हणाले की, विस्‍तार कृषि विद्यावेत्‍ता हे पद फार महत्‍वाचे असुन विद्यापीठात संशोधन शेतक-यांच्‍या शेतावर पोहचविण्‍याची मोठा जबाबदारीचे त्‍यांच्‍यावर कार्य आहे. महाराष्‍ट्र शासनाच्‍या कृषि विभागाच्‍या सहकार्याने कृषि विस्‍तार कार्य करावे लागते. कृषि विभागातील सर्व अधिका-यांनी डॉ. यु एन आळसे यांच्‍या संपर्क राहुन विद्यापीठाचे तंत्रज्ञान शेतक-यांपर्यंत पोहचविण्‍यासाठी सहकार्य करावे, असे त्‍यांनी आवाहन केले.